भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या वतीने मोफत कार्यशाळेचे आयोजन
पुणे : संगीत हे विविध राग, सुर आणि तालांनी बनलेले आहे. संगीतामुळे आपले आयुष्य तालमय बनते. आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी संगीत किंवा नृत्य हे केवळ एखाद्या संस्थेचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शिकू नये, तर त्याचा आपल्या आयुष्यात योग्य वापर करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य तालमय करण्यासाठी वापर करावा, असे मत ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे पं. सुरेश तळवलकर यांच्या तबलावादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, प्राध्यापक प्रवीण कासलिकर, देविका बोरठाकूर, लीना केतकर, रोहित कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
सुरेश तळवलकर म्हणाले, ताल आणि लय यांचे ज्ञान आले म्हणजे आपल्याला संपूर्ण संगीत समजले असे नाही. संगीत हे महासागर आहे तो एका आयुष्यात कोणालाही समजू शकत नाही. कलाकार कितीही मोठा झाला तरी तो कायम संगीताचा विद्यार्थीच असतो. आपण विद्यार्थी म्हणूनच संगीताची सेवा केली तरच संगीत आपल्याला समजू शकेल आणि त्याचा आपण योग्य प्रकारे आनंद घेऊ शकतो व तो आनंद आपण आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांना देऊ शकतो.
भारती विद्यापीठाने संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. आम्ही जेव्हा संगीताची सेवा सुरू केली त्यावेळी अशा प्रकारच्या उत्तम सुविधा उपलब्ध नव्हत्या. भविष्यात देशाचे नाव जगाच्या पटलावर गाजवणारे अनेक कलाकार निर्माण होऊ शकतात, याची मला खात्री आहे, असा विश्वास पं. सुरेश तळवलकर यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रा.शारंगधर साठे म्हणाले, विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा आणि त्यांच्या कलेची देवाणघेवाण करता यावी यासाठी आम्ही कार्यशाळा आयोजित करतो. यामुळे विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रामध्ये प्रवास करताना प्रेरणा मिळते आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे उद्दिष्ट गाठायचे आहे याचीही कल्पना येते. संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ क्लासरूम शिक्षणावर भर देत नाही तर प्रत्यक्ष संगीत विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले पाहिजे, यासाठी कार्यशाळांचे आयोजन करतो त्यामधून अनेक मोठे कलाकार घडतात.
सुरेश तळवलकर यांनी विद्यार्थ्याना लयकारीची तयारी करण्याची सोपी सूत्रे समजावली, तसेच गायन,वादन, नृत्य या बरोबर साथ करताना संगीत आणि नृत्य काय विषय मांडत आहे याचे भान ठेवून कशी साथ केली पाहिजे हे उदाहरण देत सांगितले. या कार्यशाळेला तबला, पखवाज, गायन, नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

