कोल्हापूर-कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी विकिपीडिया, राहुल सोलापूरकरसह रत्नागिरी मधील छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात चांगलीच कानउघडणी केली आहे .विकिपीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल असलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून शाहू महाराज यांनी टीका केली आहे. विकिपीडियावर ज्याला जे वाटते, तो ते टाकत आहे. पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली, त्याचा निषेध करायला हवा. या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीने ॲक्शन घेण्यात आली आहे. मात्र, ती कमी असल्याचे शाहू महाराजांनी म्हटले आहे.
करवीर संस्थानच्या वतीने पारंपारिक पद्धतीप्रमाणे आज शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ऐतिहासिक भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची पालखीतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी शाहू महाराजांनी राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध केला. तसेच विकिपीडियावरील मजकुरावरून देखील त्यांनी टीका केली.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी होत आहे याचा आनंद आहे. आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज हे निष्ठून बाहेर आले होते. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे ते उदाहरण आहे. मात्र शिवाजी महाराज आग्र्यातून परत कसे आले? हे कोणालाच माहिती नाही. या संदर्भात संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे देखील शाहू महाराजांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज हे देशातील सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण एकत्र होऊन देश पुढे नेऊ शकतो, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्वच पुतळ्यांची दखल घेतली गेली पाहिजे. राज्यांमध्ये पुतळे उभे केले जात आहेत. मात्र ते पुतळे परवानगी प्रमाणे होऊन बांधले जात आहेत का? हे तापायला हवे, असा सल्ला देखील शाहू महाराजांनी दिला आहे. पुतळा तयार करताना त्यामध्ये कोणता धातू वापरला गेला आहे? सिमेंट तसेच स्टीलचा दर्जा काय आहे? याचा रिपोर्ट तपासला गेला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी शाहू महाराज यांनी केली आहे. रत्नागिरी येथील किल्ल्यावर बसवण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यावरून शाहू महाराजांनी ही मागणी केली आहे.