पुणे-फुरसुंगी, येथील हॉटेल ब्लू बेरीमध्ये कार्यरत असलेल्या महिला कॅशियरने हॉटेल मालकाची १.५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सीमा सिन्हा (रा. करीमगंज, आसाम) हिच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल मालक शेखर हनुमंत कामठे (वय ४४) यांच्या तक्रारीनुसार, सीमा सिन्हा ही डिसेंबर २०२१ पासून हॉटेलमध्ये कॅशियर म्हणून काम करत होती. २ जानेवारीला रात्री जेव्हा मालक हॉटेलमध्ये आले, तेव्हा कॅशियर गायब होती आणि तिचा मोबाईल फोनही बंद होता. संशय आल्याने मालकांनी कॅश काउंटरची तपासणी केली असता त्यांना रोख रक्कम गायब असल्याचे आढळले.
तपासात उघड झाले की, आरोपी कॅशियरने ग्राहकांकडून येणारी रक्कम थेट तिच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करून घेत होती. हॉटेल मालकाचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली. एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे.

