मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील 4 महिन्यांत तरुंगात जाणार असल्याचा दावा दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी केला आहे. अजित पवार पुढील 4 महिन्यांत तुरुंगात जातील. त्यानंतर पक्षाशी कधीही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे त्या म्हणाल्यात. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात आता माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे या प्रकरणी मी आता हायकोर्टात याचिका दाखल करून अजित पवारांच्या अटकेची मागणी करणार आहे. अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू असले तरी, ते पुढील 4 महिन्यांत तुरुंगात जातील, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी शरद पवारांना त्यांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटलांविरोधात केलेल्या कथित बंडाची आठवण करून दिली. काही लोकांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. याऊलट आम्ही वयाच्या साठीनंतर वेगळी भूमिका घेतली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले आहे.
शालिनीताई पाटलांनी यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होणार असल्याचा दावाही केला. अजित पवार जेलमध्ये जाणार असल्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण, त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पक्षाचा केव्हाही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस हेच नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे.
शालिनीताई पाटील यांनी यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या बंडाशी केलेली तुलनाही चुकीची असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, या दोन्ही बंडांमध्ये मुलभूत फरक आहे. शरद पवारांनी केलेले बंड हे त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी केले होते. पण आता अजित पवार यांनी केलेले बंड पूर्णतः स्वार्थासाठी आहे.
मी शरद पवार यांच्यावर यापूर्वीही टीका केली. ती मी माझ्या पतीचे सरकार कोसळल्यामुळे संतापाच्या भरात केली होती. पण शरद पवार यांनी प्राप्त परिस्थितीनुसार ती भूमिका घेतली होती हे नंतर मला समजले, असेही शालिनीताई पाटील यावेळी पवारांविषयी सहानुभूती दाखवत म्हणाल्या.

