पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात भारताच्या दुस-या मानांकीत देव जावीयाने चेक प्रजासत्ताकच्या वितेक होरक याचा तर मुलींच्या गटात रशियाच्या अव्वल मानांकीत मारिया शोल्कोवाने चीनच्या थियांमी मी हीचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे पार पडलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात 2 तास चाललेल्या सामन्यात भारताच्या दुस-या मानांकीत देव जावीयाने चेक प्रजासत्ताकच्या वितेक होरक याचा 5-7, 6-3, 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये देवला संघर्ष करावा लागला. सहाव्या गेममध्ये देवने वितेकची सर्व्हीस ब्रेक करत 4-4 अशी बरोबरी साधली. मात्र आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत वितेक होरक याने 7-5 असा सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली. पुढच्या दोन सेटमध्ये देवने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दोन्ही सेट 6-3, 6-3 असे सहज जिंकत विजेतेपद पटकावले. दुहेरीत कझाकस्तानच्या रोस्टीस्लाव गॅलफिंगरच्या साथीत देवने विजोतोपद पटकावत दुहेरी मुकूट संपादन केला. मुळचा अहमदाबाद, गुजरात येथील देव 12वी इयत्तेत शिकतो.
मुलींच्या गटात 3 तास 26 मिनि़ट चाललेल्या संघर्षपुर्ण लढतीत रशियाच्या अव्वल मानांकीत मारिया शोल्कोवा हीने चीनच्या बिगर मानांकीत थियांमी मी हीचा 6-7(2), 7-5, 7-5 असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूला करंडक व 100 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 60 आयटीएफ गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गद्रे मरिन्स् एक्स्पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गद्रे मरिन्स् एक्स्पोर्टचे विक्री आणि विपणन विभाग प्रमुख संकल्प थाली, डेक्कन जिमखानाचे जनरल सेक्रेटरी विश्वास लोकरे, स्पर्धा संचालक व क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर सुरजित बंडोपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: मुले:
देव जावीया(भारत)(2)वि.वि.वितेक होरक(चेक प्रजासत्ताक) 5-7, 6-3, 6-3
मुली:
मारिया शोल्कोवा(रशिया)(1)वि.वि.थियांमी मी(चीन) 6-7(2), 7-5, 7-5