पुणे, : पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोशिएशनने पुणे येथील मोशी शाखेचे सहाय्यक अभियंता श्री. विक्रांत वरूडे यांच्याविरुद्ध केलेल्या विविध तक्रारींची चौकशी सध्या सुरु असून चौकशीअंती त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
कुठल्याही अधिकार्याची बदली करणे हा पूर्णपणे प्रशासकीय विषय असून त्याबाबतीत वारंवार पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोशिएशनचे श्री. संतोष सौंदणकर यांच्याकडून होत असलेले आरोप हे अतिशय चुकीचे व तथ्यहिन आहेत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या भोसरी विभाग अंतर्गत मोशी शाखेचे सहाय्यक अभियंता श्री. वरुडे यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारींची चौकशी करण्याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोशिएशनने ऊर्जामंत्री मा. ना. चंद्गशेखर बावनकुळे यांना दि. 23 जानेवारीला दिले होते. मा. मंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक विभाग कार्यालयस्तरावर चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
श्री. संतोष सौंदणकर हे स्वतः इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांची कामे भोसरी विभाग अंतर्गत आहेत. सहाय्यक अभियंता श्री. वरूडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप हे विशेष आकसापोटी करण्यात येत आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रशासनाने श्री. सौंदणकर यांचे म्हणणे ऐकून बदली करणे संयुक्तिक नसून याबाबतीत पुढील कार्यवाही सुरु आहे.