पुणे : सोनिया गांधी शतायुषी होवो, त्यांना चांगले आरोग्य लाभो, सोनियाजी…जीवेत शरद: शतम् अशा शुभेच्छा देण्यासोबतच महामृत्युंजय यज्ञ पुण्यामध्ये करण्यात आला. कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर कॉंग्रेसमधील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहकुटुंब या यज्ञामध्ये सहभाग घेत सोनियाजींना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी सुखी होवो व महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् होवो, ही प्रार्थना देखील करण्यात आली.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत सोनिया गांधी या शतायुशी होवो व त्यांना चांगले आरोग्य लाभो याकरीता सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये त्यांच्या वाढदिवशी महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले. महामृत्युंजय यज्ञ व पूजेमध्ये सप्ताहाचे व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांसह आबा बागुल, वीरेंद्र किराड, डॉ.सतिश देसाई, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, विकास लांडगे, काका धर्मावत, सौरभ अमराळे, अर्चना शहा, शलाका पाटील, भोला वांजळे, अॅड.भगवान भरगुडे, मिलींद पोकळे यांनी सहभाग घेतला.
माजी आमदार उल्हास पवार, आमदार चेतन तुपे, कमल व्यवहारे, रोहित टिळक, दत्ता बहिरट, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, विवेक भरगुडे, सुनील मलके, अरुण वाघमारे, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, अनिल आहेर, इंदिरा अहिरे यांसह कार्यकर्ते सहकुटुंब मोठया संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चारांच्या स्वरांनी मंदिरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. तर, मंदिरात साकारलेली आकर्षक पुष्पआरास देखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. मिलिंद राहुरकर गुरुजी व सहका-यांनी यज्ञाचे पौरोहित्य केले. महामृत्युंजय यज्ञाच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवो, ही प्रार्थना देखील करण्यात आली.
मोहन जोशी म्हणाले, देशातील वातावरण व परिस्थिती बदलत आहे. महिला अत्याचार, भ्रष्टाचार, जातीयता अशा विघातक शक्ती वाढत आहेत. या सर्व विघातक शक्तींचा नाश होणे गरजेचे आहे. त्याकरीता सोनिया गांधी यांनी देशाचे नेतृत्व करावे आणि त्याकरीता त्यांना दिर्घायुष्य लाभो. तसेच शेतकरी, कष्टकरी वर्गाला बळ मिळून त्यांच्या समस्या दूर होवो, ही प्रार्थना यज्ञाद्वारे करण्यात आली.