पुणे- प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोना विषाणू महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण करणेसाठी महापौर यांनी आज दि. २२/६/२०२० रोजी केळेवाडी, पौड रोड कोथरुड येथे पाहणी दौरा केला. पाहणी दौ-यादरम्यान स्थानिक सभासद व माजी उपमहापौर दीपक मानकर, सौ. छाया मारणे, सौ. वैशाली मराठे तसेच, रामचंद्र हंकारे- आरोग्य अधिकारी, ज्ञानेश्वर मोळक-सह महापालिका आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन), अविनाश सकपाळ-उपआयुक्त (झोनिपु), माधव जगताप-उपआयुक्त (अतिक्रमण), नितीन उदास, उपआयुक्त, परिमंडळ क्र. २, संदिप कदम -महापालिका सहाय्यक आयुक्त-कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय, संतोष मुळे-क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, पोर्णिमा गायकवाड- पोलिस उपआयुक्त, प्रतिभा जोशी -पोलिस निरिक्षक, आदी. अधिकारी उपस्थित होते.
सदर पाहणी दरम्यान महापौर यांनी मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या.
- केळेवाडी येथील पुणे महानगरपालिकेचा स्व. सुंदराबाई गणपत राऊत दवाखाना येथे त्वरित स्वॅब कलेक्शन सेंटर चालू करावे. या सगळ्या परिसरात स्वॅब घेतल्यानंतर नागरिकांना रिपोर्ट येईपर्यंत घरी सोडू नये. तसेच आवश्यक साधन सामुग्री, मंडप, उपयुक्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या.
- सदर परिसरामधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची यादी करुन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दैनंदीन स्वच्छता करुन घ्यावी. तसेच स्वच्छता केलेले फोटो संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना रोजचे रोज पाठवावे. प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेर फ्री हॅंड वॉश बेसिन बसविण्यात यावेत.
- प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व को-मॉर्बिड (ज्या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी आहे तसेच जे नागरिक इतर आजारांनी बाधित आहे ) व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी क्रस्ना डायग्नोस्टीक द्वारे करण्यात याव्यात. यासाठी मनपा प्रशासनाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात यावी. पॉझिटीव्ह रुग्णांवर आवश्यक ते पुढील सर्व उपचार तातडीने सुरु करावेत, जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही, अशा सूचना मा. महापौर यांनी केल्या.
- संपूर्ण परिसरासाठी सूक्ष्म प्रतिबंधित झोन तयार करुन आरोग्य विभागातील नर्सेस, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्या, आशा वर्कर यांची मदत घेऊन सर्वेक्षण करण्यात यावे.
- स्थानिक लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासन, मा. पोलिस उपआयुक्त, स्थानिक पोलिस निरिक्षक, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी दैनंदिन समन्वय साधावा.
- सदर ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र योजना राबवून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात.
- प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याबाबत मा. आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांना सूचना देण्यात आल्या. तसेच सदर रुग्णवाहीका रुग्णास वेळेवर उपलब्ध होणेसाठी व वस्तीमध्ये येणे व जाणेचे मार्ग त्यावेळेपर्यंत खुले करुन देणेबाबत पोलिस प्रशासनास सूचना देण्यात आल्या.
महापौर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, जरी संबंधित क्षेत्र प्रतिबंधित केले असले तरी, कोणीही घाबरून जाऊ नये. तसेच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांना योग्य ते सहकार्य करावे; जेणेकरून सर्वांनी योग्य ती काळजी घेतल्यास या संकटावर आपण नक्कीच मात करू.