पुणे : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या सब-ज्युनियर राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकाची कमाई करून १६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तमिळनाडूचेही १६ गुण झाले होते. मात्र, त्यांच्या खात्यात केवळ एकच सुवर्णपदक जमा होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
श्रीनगर येथील दल लेक येथे २० ते २६ जून दरम्यान ही स्पर्धा झाली. मुलींच्या सब-ज्युनियर गटात पेअरमध्ये महाराष्ट्राच्या भाग्यश्री घुले आणि अनुष्का गर्जे या जोडीने २ मिनिटे ८.१३ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्रच्या मुलींनी पाॅंडीचेरी आणि तमिळनाडूच्या जोडीला मागे टाकले. यानंतर मुलांच्या कोकलेस- ४ मध्ये महाराष्ट्र संघाने बाजी मारली. महाराष्ट्र संघाने एक मिनिटे ३९.०६ सेकंद वेळ नोंदवली. महाराष्ट्र संघात संसार सिंग, नितीन कुमार, राकेश सैनी, जसवंत सिंग यांचा समावेश होता. मुलांच्या डबल स्कलमध्ये महाराष्ट्रच्या सुमित शेळके आणि सागर सिंग यांनी १ मिनिटे ४१.६५ सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक मिळवले. पेअरमध्ये अथर्व राऊत आणि यशराज पगार यांनी महाराष्ट्राच्या खात्यात दुसरे रौप्यपदक जमा केले.
आंतरराज्य स्पर्धेत दुसरे स्थान
महाराष्ट्र संघ आंतरराज्य चॅलेंजर राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उपविजेता राहिला. महाराष्ट्राने यात एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकासह ११ गुण मिळवले. केरळ संघाने ३ सुवर्ण आणि एक ब्राँझ पदक मिळवले. १७ गुण मिळवून केरळ संघाने सर्वसाधारण जेतेपद पटकावले. महिलांच्या चॅलेंजर एकेरी स्कल मध्ये निकिता दरेकरने सुवर्णपदक मिळवले. तिने पश्चिम बंगालच्या ड्रिकप्रिया पॉलला मागे टाकले. डबल स्कलमध्ये कस्तुरी चौगुले आणि अनिता बोडके या जोडीने १ मिनिटे ५५.१९ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. पेअरमध्ये नीलेश धोंडगे आणि अनिकेत हळदे या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
प्रशिक्षक सुनील काकडे, विकल सारवे, समाधान गवळी, अमर पाटील, अंबादास तांबे, संदीप भापकर यांचे संजय वळवी यांनी अभिनंदन केले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा आणि मिनी आॅलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्या दृष्टीने महाराष्ट्र रोइंग असोसिएशन लवकरच निवड चाचणी शिबिर घेणार आहे.