पुणे : “प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेऊन धर्मादाय व विश्वस्त न्यास संस्थांनी आर्थिक व्यवस्थापन करावे. प्राप्तिकरासंबंधित सर्व दस्तावेज व हिशोब व्यवस्थित ठेवला, तर कारवाईची भीती राहणार नाही. कर जमा करणे ही सामान्य नागरिकांप्रमाणेच धर्मादाय संस्थाचीही जबाबदारी आहे. या संस्थांना योग्य मार्गदर्शन करून करभरणा करण्यात सनदी लेखापालांनी (सीए) महत्वाची भूमिका बजावावी,” असे प्रतिपादन प्राप्तिकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) प्रधान मुख्य आयुक्त अनुराधा भाटिया यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय), प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) आणि धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सत्रात अनुराधा भाटिया बोलत होत्या. करदात्या धर्मादाय संस्थांना येण्याऱ्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याच्या हेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पुणे आयकर आयुक्त नीरज बन्सल, धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, आयकर आयुक्त (अपील) के. के. मिश्रा, राजीवकुमार, ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, माजी अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए समीर लढ्ढा, सचिव व खजिनदार काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते. सीए शशांक पत्की यांनी या मार्गदर्शन सत्राचे समन्वयन व सूत्रसंचालन केले.
अनुराधा भाटिया म्हणाल्या, ”धर्मादाय संस्थांकडून अनेकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. प्राप्तिकर विभागाकडून कारवाईची वेळ आली की मग संबंधित संस्था आणि सीए दोघांची धावपळ होते. हे टाळण्यासाठी संस्थांनी कायद्यातील तरतुदींचे पालन पहिल्यापासून करावे. करदात्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सीएनी पुढाकार घ्यावा. एक वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये धर्मादाय विश्वस्त संस्थांकडून कर भरण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या सकारात्मक बदल पाहण्यास आम्ही आशावादी आहोत.”
नीरज बन्सल म्हणाले, ”महाराष्ट्रात जवळपास आठ लाख विश्वस्त संस्था आहेत. त्यापैकी फक्त ९१००० संस्थांना पॅन क्रमांक आहेत. ही गंभीर परिस्थिती आहे. परंतु सध्या करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे यात बदल घडतील. डिजिटलायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने कर चुकवणाऱ्यांना शोधणे सोपे जाईल. सीएनी आयकर विभाग आणि करदाता यांच्यातील दुवा म्हणून काम करावे.”
”करदात्यांनी प्रामाणिकपणे कर भरावा. सीएनेही त्याची व्यावसायिक नैतिक मूल्य पाळून काम करावे. धर्मादाय आयुक्तालय डिजिटलाईज होत असून, त्याचा फायदा संस्थांना होईल,” असे दिलीप देशमुख यांनी नमूद केले. के के मिश्रा यांनी अनेकजण समाजसेवी संस्था सुरु करतात. परंतु माहितीच्या अभावामुळे नोंदणी होत नसल्याचे सांगितले. सीए व धर्मादाय संस्थांच्या शंकांचे निरसन वक्त्यांनी केले. सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविक, तर सीए समीर लड्ढा यांनी संयोजन केले. विक्रांत सांळुखे यांनी आभार मानले.