पुणे : देशभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा भारतातील सर्वात मोठा महोत्सव ‘द एपिक शो’ पुण्यात रंगणार आहे. एपिक फौंडेशन आणि लिओ क्लब ऑफ नेचर लवर्स या संस्थांतर्फे सोमवार, दि. ३ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळात बालगंधर्व रंगमंदीर येथे हा एपिक शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नवजीवन औरंगाबाद, सी.आर.रंगनाथन, पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट, रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अनंतपुरम, बाल कल्याण संस्था अशा विविध संस्थामधील दिव्यांग कलाकार जोगवा, पोवाडा, कुचिपुडी यासह चित्रपटातील गाण्यांवर आपली कला सादर करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात अपंगत्वावर मात करून यशाची शिखरे गाठणार्या काही दिव्यांग व्यक्तींचा ‘एपिक अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या वर्षी हा पुरस्कार महाबळेश्वर येथील दृष्टिहीन उद्योजक भावेश भाटिया (सनराईज कँडल्स), सेरेब्रल पाल्सीग्रस्त साहित्यिक, स्टॅन्डअप कॉमेडियन ओंकार वैद्य, अपंग गिर्यारोहक व धावपटू शेखर गौड, मुंबई येथील जन्मजात दृष्टिहीन फोटोग्राफर भावेश पटेल, व्हीलचेअरवरील पहिली महिला नृत्यांगना कृपा लोढीया आणि अपंग गायक, लेखक वक्ते साई कौस्तुभ दासगुप्ता यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती एपिक फाउंडेशनचे केदार गोडसे, शुभम देशपांडे व निखिल ततार यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिक माहिती शुभम देशपांडे (९७६५९२६३३९) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
यंदाच्या ‘एपिक अवार्ड’चे मानकरी :
१) भावेश भाटीया (अंध, उद्योजक) : लहानपणी अंधत्व आले पण तरीही खचून ना जाता मेणबत्त्या बनवण्याचे शिक्षण घेतले. याचा व्यवसाय सुरु करून आज सनराईज कॅन्डल्स हा त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार प्राप्त झाला आहे. महाबळेश्वर येथे त्यांचे वॅक्स म्युजियम आहे.
२) ओंकार वैद्य (सेरेब्रल पाल्सी, साहित्यिक): सेरेब्रल पाल्सी सारख्या आजाराने ग्रस्त असून लहानपणापासून हे कविता करतात. वयाच्या १६ व्या वर्षी लाडके माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते कला क्षेत्रातील बालश्री पुरस्कार मिळाला. पत्रकारीता व सोशल वर्क मध्ये यांचे उच्चशिक्षण झाले आहे. नुकतेच त्यांनी भाडीपा या मराठी युट्यूब चॅनलसोबत सेरेब्रल पाल्सी, पबजी आणि मी हे त्यांचे स्टॅन्ड अप कॉमेडी प्रसिद्ध झाले आहे.
३) शेखर गौड (अपंग, गिर्यारोहक व धावपटू): एका अपघातामध्ये त्यांना एक पाय, दुसर्या पायाचा अंगठा व एक हात गमवावा लागला. तरीही आज ते गिर्यारोहक आहेत व नुकतेच त्यांनी रशियातील माउंट एल्ब्रस हे सर्वात उंच शिखर सर केले. तसेच ते मॅरेथॉन मध्ये भाग घेतात व सायकलपटूही आहेत.
४) भावेश पटेल (अंध, फोटोग्राफर): जन्मजात अंध असून आज हे छायाचित्रकार आहेत. लक्स साठी त्यांनी कतरीना कैफचे फोटोशूट केले. ओप्पोच्या जाहिरातीमध्ये त्यांनी काम केले आहे.
५) कृपा लोधिया (अपंग, व्हीलचेअर नृत्यांगना): भारतातील पहिली महिला व्हीलचेअर डान्सर. इंडिया गॉट टॅलेंटच्या कुवेत पर्वामध्ये त्यांनी भारताचे नाव मोठे केले. गुजरातमध्ये यांना बरेच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच या रोप डान्सही करतात.
६) साई कौस्तुभ दासगुप्ता (९०% अपंग, गायक, लेखक, ग्राफिक डिजायनर, वक्ता): ब्रिटल बोन आजाराने ग्रस्त असल्याने हे ९० टक्के अपंग आहेत. गायक, ग्राफिक डीजायनर, लेखक आणि वक्ते आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे