डॉ. अनिल अवचट, मेधा कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी यांचा होणार सन्मान
‘तांबडी जोगेश्वरी’तर्फे ग्रामदेवता पुरस्कार-
पुणे : ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘ग्रामदेवता पुरस्कार’ यंदा जेष्ठ समाजसेवक आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल अवचट, मेक माय ड्रीम फाउंडेशनच्या संस्थापिका मेधा कुलकर्णी आणि बुलडाण्यातील केरवाडीच्या सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी यांना जाहिर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप ११,१११/- रुपये, मानचिन्ह असे आहे. येत्या शनिवारी (दि. १० ऑगस्ट) सायंकाळी ६.०० वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे या पुरस्काराचे वितरण होणार असून, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, योगेश समेळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने ‘ग्रामदेवता पुरस्कार’ देण्यास प्रारंभ झाला असून, यंदा त्याचे तिसरे वर्ष आहे. जोगेश्वरी मातेची प्रेरणा घेऊन आजच्या काळात काही चांगली समाजप्रबोधक, समाजबदलाची कार्ये केलेल्या तीन संस्थांचा अथवा व्यक्तिंचा सन्मान करावा, त्यांच्या विशेष गुणांचा समाजाला परिचय व्हावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्करार्थीच्या कार्याची माहिती समाजाला व्हावी, तसेच त्यांच्या बहुमोल विचारातून समाजाला प्रेरणा मिळावी, यासाठी हा पुरस्कार महत्वाचा असल्याचे तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली.