पुणे- कसबा आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही पोटनिवडणुका लढवण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छाआहे त्यामुळेहि निवडणूक बिनविरोध करता येईल काय ? याबाबत मला शंका आहे असे वक्तव्य येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे .
अजित पवार यांनी असे म्हटले आहे कि,’ दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांची आज भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत. तसंच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे, असं ते म्हणाले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहे. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आता जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटेयांनी 2019 च्या विधानसभेच्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या नावामध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे.