पुणे, 29 एप्रिल 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात निशित रहाणे याने तर, मुलींच्या गटात लक्ष्यचा पाठिंबा असलेल्या पुण्याच्या अस्मि आडकर या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीत सहाव्या मानांकित पुण्याच्या अस्मि आडकर हिने चौथ्या मानांकित अग्निमित्रा भट्टाचार्यचा 6-3, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. अस्मि ही दहावी इयत्तेत अभिनव विद्यालय हायस्कूलमध्ये शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने याआधी हैदराबाद येथील 16 वर्षांखालील राष्ट्रीय सिरीज टेनिस स्पर्धेत आणि सोनिपत येथील 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
मुलांच्या गटात अंतिम लढतीत सातव्या मानांकित निशीत रहाणे याने सहाव्या मानांकित तनिष्क जाधवचा 6-1, 3-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. निशीत हा बीएमसीसी महाविद्यालयात 12 वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून फर्ग्युसन कॉलेज येथे प्रशिक्षक नंदन बाळ व संग्राम चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
दुहेरीत अंतिम लढतीत जय दिक्षीत व निशित रहाणे या जोडीने अर्णव कोकणे व आर्यन कोटस्थाने यांचा 1-6, 7-5, 10-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, मुलींच्या गटात अस्मि आडकरने प्रिशा शिंदेच्या साथीत मृण्मयी जोशी व श्रुती नानजकर या दुसऱ्या मानांकित जोडीचा 6-0, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डी.ई.एस. सोसायटीचे अध्यक्ष शरदराव कुंटे, डी.ई.एस. सोसायटीचे स्पोर्ट्स चेअरमन हेमराज रणपिसे, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आरजी परदेशी आणि एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक नंदन बाळ, गौतम सोनावणे, स्पर्धा संचालक संग्राम चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): मुले: निशीत रहाणे(महा)[7] वि.वि.तनिष्क जाधव(महा)[6] 6-1, 3-6, 6-1;
मुली: अस्मि आडकर(महा)[6] वि.वि.अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[4]6-3, 6-0;
दुहेरी गट: मुले: जय दिक्षीत/निशित रहाणे वि.वि.अर्णव कोकणे/आर्यन कोटस्थाने[3] 1-6, 7-5, 10-4;
मुली: अस्मि आडकर/प्रिशा शिंदे वि.वि.मृण्मयी जोशी/श्रुती नानजकर[2]6-0, 6-2.