बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडिज (ई कॉमर्स ऑपरेशन्स)शेवटच्या वर्षात इंटर्नशिपचा समावेश
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसीत) या शैक्षणिक वर्षापासून कौशल्य विकासावर आधारित बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडिज (बीएमएस) (ई कॉमर्स ऑपरेशन्स) हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सागर फडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
पदवीच्या शेवटच्या वर्षात दोन्ही सत्रांमध्ये नेमून दिलेल्या उद्योगसमुहामध्ये इंटर्नशिप हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत अशाप्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे बीएमसीसी हे पहिलेच महाविद्यालय आहे.
या अभ्यासक्रमात कौशल्यविकास आणि वाणिज्य शाखांवर आधारित प्रत्येकी १५ विषय आणि व्यवस्थापन शाखेवर आधारित ३ विषयांचा समावेश असणार आहे. एमओओसीमधून विद्यार्थ्यांना २ विषय निवडता येतील. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती व नमुना अर्ज महाविद्यालयाच्या www.bmcc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बीएमसीसीने लॉजिस्टिक सेक्टर स्किल कौन्सिलसोबत (एलएसएससी) सामंजस्य करार केला आहे. त्याद्वारे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिपची व्यवस्था करता येणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने स्किल इंडिया कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत एलएसएससीची स्थापना केली होती.
महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या शिफारशीवरून महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयातील अभ्यास, एक वर्षाचा उद्योगसमुहातील प्रत्यक्ष अनुभव व प्रशिक्षण आणि उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करणार्या विषयांचा अभ्यासक्रमातील समावेशामुळे विद्यार्थ्यांना उद्योग, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. डॉ. वर्षा देशपांडे या अभ्यासक्रमाच्या समन्वयिका आहेत.