पुणे :आपल्या अलौकिक प्रतिभेतून कला आणि साहित्य विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती आता एका क्लिक उपलब्ध होणार आहे. कॅटलिस्ट फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हा विधायक उपक्रम हाती घेतला असून लवकरच अण्णाभाऊ साठे यांच्यावरील या पहिल्यावहिल्या वेबसाईटचे संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या अनावरण होईल. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेने हा विधायक उपक्रम हाती घेतला आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक प्रयत्न म्हणून माजी पत्रकार सुनील माने यांनी ‘कॅटलिस्ट फाऊंडेशनची’ स्थापना केली. सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण या विभागामध्ये काम करणे हा त्या पाठीमागील उद्देश आहे. खासदार गिरीश बापट हे या संस्थेचे पालक तर लष्करातून सेवानिवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी.बी शेकटकर या संस्थेचे मेंटॉरआहेत.
कॅटलिस्ट फाऊंडेशनची स्थापना केल्यानंतर सातत्याने काही तरी नवीन करायचे या विचाराने ही संस्था कार्यरत आहे. हाच ध्यास बाळगून संशोधन केल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील वेबसाईट नसल्याचे लक्षात आले. म्हणूनच अण्णाभाऊंचे महान कार्य डिजिटल स्वरुपात जनतेसमोर आणण्याच्या निश्चयाने या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. अण्णाभाऊंचे अलौकिक व्यक्तिमत्व, त्यांची व्यापक साहित्य संपदा, स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील त्यांचे योगदान, लोकशाहीर म्हणून त्यांनी केलेले समाजप्रबोधन या विषयीची एकत्रित माहिती या वेबासाईटच्या माध्यमातून देण्याचा संस्थेचा प्रयास आहे. ही वेबसाईट अण्णाभाऊंच्या बद्दल उपलब्ध होणारी माहिती सतत उपलब्ध करून देईल. त्यांचे राज्य सरकारने प्रकाशित केलेले साहित्य या वेबसाईटवर उपलब्ध राहील. त्याची परवानगी साहित्य संस्कृती मंडळाने फाऊंडेशनला दिली आहे.
बदलत्या युगाप्रमाणे माहितीचे अदानप्रदान करण्यासाठी आजची तरुणाई मोबाईल, संगणक आणि इंटरनेट सारख्या डिजिटल माध्यमांना प्राध्यान्य देते. आमची संस्था प्रामुख्याने तरुणांसाठी काम करणारी संस्था असल्याने याचाच एक भाग म्हणून अण्णाभाऊंचा चरित्रपट वेबसाईटच्या माध्यमातून साकारण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. हा उपक्रम लोकाभिमुख असून यास तरुणांचा प्रतिसाद लाभेल असा विश्वास संस्थेच्या सचिव लक्ष्मीकांता माने यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला.