आज व उद्या वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार
पुणे, दि. २७ ऑगस्ट २०२१: प्रामुख्याने वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १० लाख ३४ हजार ७०४ ग्राहकांकडे ४२५ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे.
दरम्यान सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २८) व रविवारी (२९) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. यासोबतच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात घरगुती ४ लाख ४० हजार २२६ ग्राहकांकडे १३७ कोटी ८१ लाख, वाणिज्यिक ७३ हजार ७२८ ग्राहकांकडे ५१ कोटी ४६ लाख, औद्योगिक ५ हजार ५८९ ग्राहकाकंडे ७ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरगुती १ लाख ७५ हजार ९६८ ग्राहकांकडे ५८ कोटी ८५ लाख, वाणिज्यिक २८ हजार २०० ग्राहकांकडे २३ कोटी ९४ लाख व औद्योगिक ५ हजार ६८४ ग्राहकांकडे ११ कोटी ६६ लाख रुपये थकीत आहेत. तर महावितरणच्या मुळशी, राजगुरुनगर व मंचर विभागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ३ लाख ५ हजार ३०९ ग्राहकांकडे १३३ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वारंवार आवाहन करून देखील थकबाकीचा भरणा होत नसल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला महावितरणने आता मोठा वेग दिला आहे. त्यामुळे दि. २८ व २९ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.