पुणे-प्रथम आरोग्य सुविधाना प्राधान्य देत कोरोनाच्या महामारीचा सामना करीत असलेल्या पुणे महापालिकेची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे ? याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात ,अनेकदा निधी नसल्याचे कारण दिले जाते . आणि मोठमोठी ,किंवा छोटी छोटी विकासकामे हि तरतूद नाहीत म्हणून स्वीकारली जात नाहीत या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वास्तववादी आर्थिक स्थिती कडे लक्ष वेधणारी माहिती प्रकाशात आली आहे .
7000 कोटी चे बजेट असलेल्या महापालिकेच्या तिजोरीत २९८ कोटी ५३ लाख रुपयेआहेत तर महाराष्ट्र बँकेतील महापालिकेच्या फ्लेक्सी अकौंट मध्ये ११५१ कोटी रुपये आहेत .पालिके कडे गंगाजळी ची म्हणून शिल्लक असलेली ८८ कोटीची रक्कम पालिकेने एफडी केलेली आहे एकूण एफडी ८४० कोटी रुपये एवढी असल्याची माहिती मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांच्या लेखी पत्राला लेखी उत्तराने दिली आहे .म्हणजेच सुमारे २२०० कोटीच्या वर जाईल एवढी रक्कम पालिकेच्या खिशात आहे .अर्थात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असताना २० मे अखेरीस ची ही स्थिती आहे .याशिवाय महापालिकेला राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून देखील येणे असलेली रक्कम काही शे कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते आहे. पालिकेला देणी कीती आहेेेत हा प्रश्न देखील आहेच
गेल्या वर्षभरात कोरोनाच्या महामारीत पालिकेने आपल्या खिशातील एकूण रकमेच्या किती टक्के रक्कम जनतेच्या आरोग्य साठी खर्च केली हे अद्याप अधिकृतपणे पुढे आलेले नाही .आणि यापुढेही महापालिकेला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, तिसरी संभाव्य लाट , ब्लैक फंगुस आणि कोरोनावर उपचार, बालकांची आरोग्य सुरक्षा हि सर्वात प्रमुख आणि प्रथम प्राधान्याने करावयाची कामे आहेत . महापौर,उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेते यासह सर्वच गटनेते यांनी देखील नागरी आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले आहे . आणि महामारीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला हवी तशी मोकळीक दिलेली आहे.