जाधव सिस्टर्सच्या गायनाने महोत्सवाची सांगता
पुणे : सुफी भीमगीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या जाधव सिस्टर्सच्या बहारदार गायनाने सांस्कृतिक महोत्सवाची सांगता झाली. मिलिंद जाधव यांची सुफियान चालींची रचना आणि जाधव सिस्टर्सची प्रभावी गायनशैली यामुळे रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या दमदार गाण्याला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विनया व विजया जाधव या सिस्टर्सचा हा सुफी जलवा पुणेकरांना मोहित करून गेला.
निमित्त होते, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवाची सांगता जाधव सिस्टर्सच्या सुफी अंदाजातील भीमगीतांच्या कार्यक्रमाने झाली. सांस्कृतिक महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातुन झालेल्या या कार्यक्रमावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘हे बुद्ध मा करुणा करा, स्विकार करा हे अभिवादना” या वंदन गीताने गायनास सुरवात झाली. ‘माऊली दीनांची तू, दलितांची आई तू’, ‘फुलों की सरगम में छेडू में भीम का नाम’, ‘नव्या युगाची आणि संघर्षाची ही कहाणी ‘, ‘जीवनाचा असा दिन यावा, भीमासाठी म्हणे जीव जावा’, ‘जलवा है, जलवा है, भीमजी का जलवा है’ अशी एक से बढकर गाणी विनया-विजया यांच्या जोडीने जुगलबंदीतून सादर केली. सुफी संगीतात भीमगीते ऐकण्याची पर्वणी पुणेकरांना मिळाली. सूत्रसंचालन परशुराम वाडेकर, दीपक म्हस्के यांनी केले. कोरस मिलिंद जाधव, तुषार गायकवाड, ऑरगनवर देवदत्त मेकाले, गिटारवर अभिजित अंबाडे, तबलावर वैभव जाधव, प्रशांत राठोड, ढोलकवर बॉबी कनोजिया ऑक्टोपॅडवर सोहेल कुरेशी यांनी साथसंगत केली.
———–
———–
लतादीदींनी भीमगीत गावे : वाडेकर
गेली कित्येक वर्ष आम्ही धम्मपहाटचा कार्यक्रम घेत आहोत.अनेक बडे गायक या मंचावर आले आणि शाहू, फुले आंबेडकर यांना अभिवादन केले. भारताची गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एक तरी भीमगीत गायला हवे, अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान बहाल केले. त्यांना मानवंदना म्हणून लतादीदींनी आमची ही विनंती स्वीकारून त्यांच्या मंजुळ आवाजात भीमगीत सादर करावे, अशी भावना महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली.