फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीच्या ‘हेल्थ अँड फिटनेस’ ऍपचे अनावरण
पुणे : “नियमित व्यायाम, सकस आहार, ध्यान आणि सकारात्मक विचार या गोष्टी तुम्हाला निरोगी बनवतात. आनंदी जीवन जगण्यासाठी ‘स्वस्थ राहा मस्त राहा’ हा आरोग्यमंत्र अत्यंत गरजेचा आहे. माझ्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीच्या मागे हाच मंत्र आहे. तुम्ही सर्वानी हा मंत्र अंमलात आणावा, नियमित व्यायाम करून चांगला आहार घेत तणावमुक्त आयुष्य जगावे, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिने दिला.
‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिल्पा शेट्टी बोलत होती. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शिल्पाने ‘हेल्थ अँड फिटनेस’वर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी तिने बनविलेल्या ‘एसएस/सिम्पल सोलफूल बाय शिल्पा शेट्टी’ या ऍप्लिकेशनचे अनावरंही करण्यात आले. प्रसंगी फिक्की फ्लो पुणेच्या चेअरपर्सन रितू प्रकाश छाब्रिया, माजी अध्यक्षा संगीता ललवाणी, फिनोलेक्सचे चेअरमन प्रकाश छाब्रिया, अनिता सणस आदी उपस्थित होते. नेहा देशपांडे, डिम्पल सोमजी, मोनाली पटवर्धन व डॉ. निधी अगरवाल यांनी शिल्पा शेट्टीची मुलाखत घेतली. ४५० पेक्षा अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
शिल्पा शेट्टी म्हणाली, “आपल्याकडील सर्वच वस्तू उत्तम प्रतीच्या आहेत. त्यामुळे स्वदेशी वस्तू वापरण्याला माझे प्राधान्य असते. योग आणि आयुर्वेद ही भारतीय परंपरेची देण आहे. आपण आपल्या आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. माझ्या फिटनेसबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असते. परंतु, नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेण्याला मी प्राधान्य देते. कोणत्याही स्त्रीला प्रसूतीनंतर शारीरिक आकारांतील बदलांना सामोरे जावे लागते. मात्र, योग्य ती मेहनत घेतली तर आपले सौंदर्य आपण कायम ठेवू शकतो.”
“निरोगी आरोग्यासाठी हे ऍप उपयुक्त ठरणार आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात थोडासा फरक करावा लागतो. त्यातील सातत्यामुळे ते शक्य होते. आपण हे करू शकतो, असा आत्मविश्वास आणि त्यातील शिस्त महत्वाची असते. अभिनेत्री, मॉडेल, आई, गृहिणी अशा सगळ्या भूमिका पार पाडत असताना कुटुंबाची साथ मोलाची आहे. आई-वडील, पती यांची उत्तम पाठिंबा आहे.
रितू छाब्रिया म्हणाल्या, “सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्त शरीरयष्टीमुळे शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्याला भुरळ घालते. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी ती जितकी कटाक्ष आहे, तितकीच ती जागृतीसाठीही तयार आहे. तिने बनवलेल्या ऍपमुळे लाखो महिलांना आणि पुरुषांनाही नक्कीच फायदा होईल. फिक्की फ्लोच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार असून, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्याची सुरवात झाली आहे.” नेहा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री छाब्रिया यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.