मुंबईत वडाळा येथे लवकरच 40 एकर क्षेत्रावर 4000 निवासस्थाने आणि कार्यालयीन वापराच्या तीन इमारती यांचा समावेश असलेला सीबीआयसीचा आगामी निवासी प्रकल्प उभारण्यात येणार – केंद्रीय महसूल सचिव
मुंबई, 14 सप्टेंबर 2022
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सीबीआयसी अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई प्रदेश केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्गासाठी नवी मुंबईत खारघर येथे उभारण्यात आलेल्या ‘केंद्रीय जीएसटी परिसर’ या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या प्रकल्पात राहायला येणाऱ्या सीबीआयसीच्या विविध श्रेणीतील पहिल्या पाच घरांचे मालक असलेल्या अधिकाऱ्यांना समारंभपूर्वक घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय महसूल विभागाचे सचिव तरुण बजाज, सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी, सीबीआयसीच्या प्रशासकीय सदस्य संगीता शर्मा, सीजीएसटीचे मुंबई प्रदेश प्रधान मुख्य आयुक्त अशोक कुमार मेहता, सीबीआयसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच सीजीएसटीच्या मुंबई प्रदेश विभागातील कर्मचारीवर्ग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता.
केंद्रीय जीएसटी परिसर हा विचारपूर्वक आराखड्यासह उभारण्यात आलेला आणि नवी मुंबई परिसरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला एक विस्तीर्ण निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पाजवळून मुंबई तसेच पुणे या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारे रस्ते जातात तसेच येथून रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या सुविधा सुलभतेने उपलब्ध आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, अमृत काळात या प्रकल्पाचे झालेले उद्घाटन, नव्या भारताचे सामर्थ्य दर्शविते.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा प्रकल्प हाती घेऊन, त्यासंबंधी परवानग्या मिळवून उत्तम पद्धतीने हे कार्य पूर्ण केल्याबद्दल सीबीआयसीचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी वर्गाचे विशेष कौतुक केले. देशात ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या कक्षेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी असे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वाला नेले जात आहेत अशा ठिकाणी उपस्थित राहून मनाला अत्यंत समाधान वाटते अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एनबीसीसी या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेने, महामारीच्या काळात देखील, खारघर येथील हा प्रकल्प विक्रमी वेळेत आणि अंदाजापेक्षा कमी खर्चात पूर्ण करण्यात आला आहे याची नोंद घेऊन सीतारामन म्हणाल्या, “हे काम अत्यंत अनुकरणीय आहे आणि सरकारी संस्था देखील अत्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतात आणि खासगी क्षेत्राशी असलेल्या स्पर्धेत उत्तम कामगिरी देखील करू शकतात हेच अशा प्रकारच्या कार्यातून सिध्द होते.” याच संदर्भात त्या पुढे म्हणाल्या की काही काळापूर्वी, सरकारी तसेच निम-सरकारी संस्थांकडे अविश्वासाच्या भावनेने बघितले जात होते. “दर्जाशी कोणतीही तडजोड न करता तसेच भविष्यकाळाचा विचार मनात ठेऊन विहित वेळेपूर्वी आणि अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्चात प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा आज दुर्मिळ प्रसंग आहे,”
सीबीआयसीच्या कामगिरीबद्दल बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, “तुम्ही सर्व असेच उत्तम काम यापुढेही करत रहा, महसूल निर्माण होईल याकडे लक्ष द्या, तुमच्या या कामाची नक्कीच दखल घेतली जात आहे, पंतप्रधानांनी नुकताच जीएसटी महसुलाचे प्रमाण वाढत असल्याचा विशेष कौतुकास्पद उल्लेख केला.” यावेळी बोलताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर चुकवेगिरीसारख्या फसवणुकीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटीक्स, आयओटी तसेच अशा इतर तंत्रज्ञानांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या अधिकाऱ्यांना अधिक उत्तम रीतीने प्रशिक्षित करण्याची गरज देखील व्यक्त केली.
या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या 110 कोटी रुपयांऐवजी हा प्रकल्प 100 कोटी रुपयांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या पथकाच्या कार्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी यावेळी बोलताना कौतुक केले.
केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले की , कर अधिकाऱ्यांकडून चांगली कामगिरी अपेक्षित असेल तर त्यांची विशेषत: त्यांच्या निवासाच्या बाबतीत, काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. गेल्या दीड वर्षापासून या संदर्भातील असे सर्व प्रकल्प मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील वडाळा येथे सीबीआयसीचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत असून 40 एकर भूखंडावरील हा मोठा प्रकल्प आहे . या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 770-780 सदनिका आणि कार्यालयांसाठी एक टॉवर बांधण्यात येणार आहे. यानंतर पुढील टप्प्यात दोन कार्यालयीन टॉवरसह सुमारे 4000 निवासी सदनिका बांधण्यात येणार असल्याची माहिती महसूल सचिवांनी दिली.
सीजीएसटीचे मुंबई क्षेत्र प्रधान मुख्य आयुक्त अशोक कुमार मेहता यांनी माहिती दिली की, गेल्या आर्थिक वर्षात 1,18,000 कोटी रुपयांहून अधिक महसूल संकलित करून सीजीएसटी मुंबई क्षेत्र हे देशातील सर्वाधिक महसूल संकलित करणारे क्षेत्र आहे. गेल्या 12 महिन्यांत मुंबई क्षेत्राने 11,000 कोटीं रुपयांची करचोरी शोधून काढल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय जीएसटी परिसर
गेल्या काळात आलेल्या कोविड-19 च्या दोन लाटांमुळे प्रकल्पाचे बांधकाम प्रभावित झालेले असताना देखील हा प्रकल्प करारात निर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत आणि 14 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पातील इमारती आधुनिक संरचनेच्या, पर्यावरण स्नेही तसेच शाश्वत बांधणीच्या असून त्या जीआरआयएचए3 मधील सर्व विहित मानकांची पूर्तता करणाऱ्या आहेत. या प्रकल्पातील घरे प्रशस्त, हवेशीर असून त्यात प्रकाश व्यवस्था तसेच इतर सुविधांसाठी उत्तम प्रतीचे साहित्य वापरण्यात आले आहे. विभागात कार्यरत सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी या प्रकल्पात सहा विविध प्रकारची 187 घरे बांधण्यात आली आहेत.
परवडणारी घरे
किफायतशीर दरातील घरे उपलब्ध होणे ही मुंबईतील सर्वात महत्वाची समस्या आहे. जनरल पूल निवासी योजना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरे उपलब्ध करून देत असते मात्र कर्मचारी वर्गात सतत होणाऱ्या नव्या नियुक्त्या आणि त्यात समाविष्ट असणारे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले उमेदवार यामुळे घरांची टंचाई निर्माण होऊन प्रतीक्षा यादी लांबत जाते. त्या दृष्टीकोनातून, सदर प्रकल्प म्हणजे अशा सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानविषयक समस्या सोडविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
जिथे सरकारी निवासस्थानांची टंचाई निर्माण होते तिथे संपूर्ण देशातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यांच्या कल्याणासाठी गृह प्रकल्प उभारण्याच्या दिशेने सीबीआयसी महत्वाची पावले उचलते.