Home Blog Page 742

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रमात सहभाग,

पुणे-राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकारण, सामाजिक, साहित्य, कला, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ पुण्यातच नाही, तर राज्य, देशभरातून आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाअंतर्गत भव्य पुस्तक प्रदर्शनासह विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम, बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने वाचन चळवळ वृद्घिंगत करण्यासाठी बुधवारी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम राबवण्यात आला. सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, गणेश मंडळे, शासकीय कार्यालये, ग्रंथालये अशा विविध ठिकाणी दुपारी १२ ते १ या वेळेत पुस्तकांचे वाचन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमात सहभागी होऊन वाचन करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांत पोस्ट केली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कोथरूडचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सिद्धार्थ शिरोळे,उद्योजक पुनीत बालन, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, आमदार हेमंत रासने,अभिनेत्री विभावरी देशपांडे, लेखक किरण यज्ञोपवीत, ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक अशा अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच समता भूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले मंडई, अंधशाळा, मेट्रो स्थानक, पुणे महापालिका अशा ठिकाणी पुस्तक वाचन करण्यात आले.

पुण्यातील ऐतिहासिक अप्पा बळवंत चौक येथे झालेल्या उपक्रमात आमदार चंद्रकांत पाटील सहभागी झाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, की ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत, हा उपक्रम महत्त्वाचा आहे. आयुष्यात वाचनाला फार महत्त्व आहे. वाचनामुळे आयुष्याला दिशा मिळते, दृष्टी मिळते, मन मोठे होते. राजकारण्यांनीही मन मोठे करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. अनेक राजकारणी उत्तम वाचक, लेखक आहेत. वाचनासाठी एकाग्रता लागते. आजच्या काळात वाचनाच्या पद्धती बदलल्या आहेत. ऑडिओ बुक्स उपलब्ध झाली आहेत. पुस्तके मोबाईलवर मिळतात. महाराष्ट्रातील ११ हजार सार्वजनिक वाचनालयांमुळे वाचनाची चांगली संस्कृती आहे. या ग्रंथालयांना राज्य सरकारकडून ४०० कोटी रुपये अनुदान दिले जाते.

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. २७ हजारांहून अधिक छायाचित्रे पाठवण्यात आली आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता पुणे पुस्तक महोत्सव अधिक व्यापक होईल असा विश्वास वाटतो, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

बॉलीवूडची कपूर फॅमिली अन पंतप्रधान नरेंद्र मोदी .. सारेच रमले, एका रम्य भेटीत …

राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवासाठी कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. पीएम मोदींसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, करिश्मा आणि रिद्धिमा यांच्यासह कपूर कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत.

करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये करिनाने लिहिले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज कपूर यांच्या 100व्या जयंतीसाठी आम्ही आमंत्रित केले. त्यांना भेटून खूप छान वाटतं. यासाठी आपले मनःपूर्वक आभार.”राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या काळात राज कपूर यांचे चित्रपट 40 शहरे आणि 135 चित्रपटगृहांमध्ये दाखवले जातील.

वीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने कर्नाटकचा केला महाराष्ट्राने निषेध !

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटक विधान परिषदेच्या सभापतींना दिले पत्र

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या सीमा भागातील मराठी भाषिक रहिवाशांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. त्याचबरोबर, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही नाराजी व्यक्त केली.सभागृहाच्या भावना लक्षातच घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरत्ती यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय हा अत्यंत निषेधार्थ प्रकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आहेत त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची जाणीव कर्नाटक सरकारनेही ठेवायला हवी”, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तसेच, या महत्त्वाच्या मुद्द्याची तत्काळ दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटक विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरत्ती यांना केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “अलीकडेच माझ्या निदर्शनास आले की, कर्नाटक सरकार विधानसभेच्या सभागृहातून थोर स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा विचार करत आहे. असे झाले तर नक्कीच या देशातील प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या मनात तीव्र संताप निर्माण होईल. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे आणि ते कधीही कमी करता येणार नाही हे वेगळे सांगायला नको.

स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि देशाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीतून देशाला मुक्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न जगभरात ओळखले जातात. विधिमंडळ हे लोकांच्या मनाचे प्रतिबिंब आणि प्रतिनिधित्व करते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पिठासीन अधिकारी या नात्याने मी लोकांच्या भावना जाणते त्यामुळे, वस्तुस्थिती आणि भावना समोर आणल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही या निर्णयावर पूर्ण विचार कराल आणि वीर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कायम कर्नाटक विधानसभा सभागृहाच्या भिंतीवर राहील याची खात्री केली जाईल.”

बेळगावमध्ये सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महाराष्ट्रातलं सरकार आणि महाराष्ट्राचे विधिमंडळ हे एकमताने आणि पूर्ण शक्तीने सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी आहे. ज्याप्रकारे कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर अत्याचार होतोय त्याचा निश्चितपणे आम्ही सर्व निषेध करतो महाराष्ट्राची जनता आणि जगभरातले मराठी माणसं हे त्यांच्या पाठीशी आहेत.सीमाभागातील जनतेच्या शिक्षण, रोजगार, मराठी शाळा, सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत जी अवहेलना होते त्याबाबत तुम्ही सरकारची जबाबदारी पार पाडायला हवी.

पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद शनिवारपासून

महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन : नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन यावर सखोल चर्चा ; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद ‘स्पेक्ट्रम २०२४’ महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. दिनांक १४ आणि १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता औंधमधील भारतीय विज्ञान व संशोधन संस्था येथे ही परिषद होणार आहे, अशी माहिती पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ.राधिका परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. नितीन कोलते, डॉ. आश्विनी मिसाळ, डॉ. वृषाली वरद उपस्थित होते. 
परिषदेच्या उद््घाटन सोहळ्यास आॅल इंडिया आॅप्थलोमोलॉजिकल  सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समर बसक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राधिका परांजपे म्हणाल्या, या परिषदेत नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन उपाययोजना यांवर  सखोल चर्चा केली जाणार आहे. परिषदेत भारतातील आणि परदेशातील आघाडीचे नेत्र तज्ञ, संशोधक आणि नेत्रचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
परिषदेत ब्रिटन, ओमान सह कलकत्ता, बंगळुरु, ओडिसा, जोधपूर, नवी दिल्ली, केरळ तामिळनाडू, गुजरात येथील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, महाराष्ट्रातून पुण्यासह मुंबई, नागपूर येथील तज्ञ देखील सहभागी होणार आहेत. नेत्र विज्ञान क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे पुण्यात प्रथमच आयोजन

उद्योग-व्यवसाय विस्तार आणि परदेशी गुंतवणुकीच्या संधींविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नव उद्योजकांनाही संकल्पना मांडण्यासाठी मिळणार व्यासपीठ

पुणे : उद्यमशील युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, बदलत्या काळानुरूप नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती गर्जे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गानू, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या महासंचालक शितल पांचाळ, नवउद्योजक सागर बाबर उपस्थित होते.
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) दि. 10 आणि दि. 11 जानेवारी 2025 या कालावधीत द ऑर्किड हॉटेल, बालेवाडी पुणे येथे होणार आहे. या परिषदेत भारतासह, अमेरिका, युनाटेड किंग्डम, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच जगभरातील विविध देशांमधून उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार यांचा सहभाग असणार आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 500 व्यावसायिक, नवउद्योजक, कल्पक उद्योजक तसेच गर्जे ग्लोबल संस्थेमार्फत परदेशातील शंभराहून अधिक व्यावसायिक, उद्योजक व मान्यवर सहभागी होणार असून त्यांना उद्योग-व्यवसायातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसायांच्या संधी, बदलत्या संकल्पना, निर्मिती क्षेत्रातील उद्योजकता याविषयीही तज्ज्ञ अनुभव कथन करणार आहेत.
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहित करत जागतिक पातळीवर व्यवसाय विस्तारासाठी नवनवीन संधींची उपलब्धता करून दिली जाणार असून महाराष्ट्राच्या व्यावसायिक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील उद्योग व व्यवसायात गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती होण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योजक व परदेशातील गुंतवणूकदार यांना एका मंचावर संवादाची संधी मिळणार असून युवा उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना गुंतवणूदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिला उद्योजकांसाठी देखील व्यवसायाच्या संधी आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून व्यवसायवाढीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
या परिषदेत देश-विदेशातून वक्ते, सरकारी आस्थापना, व्यावसायिक संघटना तसेच वाणिज्य दुतावासातील अधिकारी, व्यावसायिक धोरणकर्ते यांना आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स 2025चे संयोजक सचिन ईटकर असून नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार, व्हेरिस्मो नेटवर्क्सचे अध्यक्ष प्रकाश भालेराव (अमेरिका), पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, रवी बोरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉन्क्लेव्ह होत आहे.
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून त्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2024 आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध 5 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल

0

सातारा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध 5 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला आहे. तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी आनंद आणि किशोर यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.

जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रार देण्यात आली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन

0

मुंबई, दि. ११ :- जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’तर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणाशी संबंधित बाबींसंदर्भातील सखोल संशोधन, त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी आणि सक्रीय लोकसहभाग यांच्या माध्यमातून डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेले कार्य या पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पश्चिम घाटासंदर्भात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अहवालामुळे या क्षेत्राच्या संवर्धनासाठी शासनासह लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना उभारी मिळाली आहे. डॉ. गाडगीळ यांच्या पुरस्कारामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, क्षारपड जमिनींचे वाढतं प्रमाण यासारख्या समस्यांवर संशोधन, अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या जागतिक पुरस्काराबद्दल डॉ. माधव गाडगीळ यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. भविष्यातील त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस: नाना पटोले

नागपूर अधिवेशन किमान एका महिन्याचे हवे, चर्चेपासून पळ काढण्यासाठीच पाच दिवसांचे अधिवेशन.

रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून, निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा.

मुंबई, दि. ११ डिसेंबर २०२४
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरु आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ऑपेरेशन लोटस’, असा हल्लाबोल करत हा प्रकार निषेधार्ह आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना आहे. आपल्या मतावर दरोडा टाकल्याची जनतेच्या मनात शंका आहे. मारकडवाडीनंतर अशी भावना देशपातळीवर वाढीस लागली आहे. ग्रामसभा ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही. रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून केला असून निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ असे नाना पटोले म्हणाले.

भाजपा युती सरकारचे पहिले अधिवेशन नागपूरात होत आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. महागाई, बेरोजगारी, नोकरभरती, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला हमीभाव देणे अशा मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट ३ लाख रुपयांची कर्ज दिली पाहिजे, नोकरीभरती कशी करणार अशा विविध मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे, यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे अशी मागणी केली होती पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढत आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वाद नाही. तीनही पक्ष एकत्र बसून विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करतील व नागपूर अधिवेशनात सरकार यावर निर्णय घेईल. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता व गटनेता ठरवण्याचे सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना दिले आहेत, त्यावरही लवकरच निर्णय होईल असे पटोले म्हणाले.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी

पुणे, दि. 11: पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 1 जानेवारी 2025 रोजी मोठया प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय खासगी वाहनाने तसेच सार्वजनिक वाहनाने येत असतो. विजयस्तंभाजवळ मोठी गर्दी होऊ नये यासाठी लोणीकंद, पेरणे, वढू खुर्द हद्दीतील काही मोकळया जागांमध्ये येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. तसेच पीएमपीएमएलच्या बसेस थांबण्याकरिता तात्पुरते बसस्टॉप उभारण्यात येतात. या विविध ठिकाणच्या पार्किंगसाठी तसेच सदर कार्यक्रमाच्यावेळी जयस्तंभ परिसरात अनुचित प्रकार घडून आल्यास तात्काळ बाहेर जाण्याकरिता जयस्तंभाच्या बाजूला असलेली जागा अतितातडीची बाहेर पडण्याची (एमर्जन्सी एक्झिट) म्हणून तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष डॉ. दिवसे यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 65 अन्वये खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार लोणीकंद येथील गट क्र. 752, 760, 754, 763, 762, 753, 756, 757, 17, 18, 19, 21,28-2, 10, 1, 309, 125, 129, 130, 131, 132, 194, 197, 198, 183 तसेच वढू खुर्द गावातील गट क्र. 118/1, 119, 121, 122, 123, 128, 173, 174/1, फुलगाव येथील गट क्र. 200/1 ब आणि पेरणे येथील 933/2 अ, 934/2, 1226 या गट क्रमांकातील मोकळया जागा अनुयायांच्या वाहनांच्या पार्किंगकरिता अधिग्रहित करण्यात येणार आहेत. पीएमपीएमएल पार्किंगसाठी लोणीकंद येथील गट क्र. 2, 3, 4/1, 4/2 तर बुकस्टॉलकरिता पेरणे येथील गट क्र. 963/1, 950, 944, 967 या मोकळया जागा अधिग्रहित करण्यात येणार आहेत. याशिवाय पेरणे येथील गट क्र. 489 ही सरकारी गायरानाची जागा अतिरिक्त जमीन असेल.

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेरणे येथील गट क्र. 1040, 1042 मधील जागा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित करण्यात येणार आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था वक्फ बोर्ड पार्किंग, जीत ढाब्यासमोर, पुणे नगर हायवेवर, शिक्रापूर, तोरणा पार्किंग बजरंगवाडी, शिक्रापूर, टोरांटो गॅस, खालसा पंजाबी ढाबा, चौधरी ढाबा, जातेगाव खुर्द, शंभू महादेव तळेगाव ढमढेरे, कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी, कोरेगाव भिमा बाजारतळ, इनामदार पार्किंग कोरेगाव भिमा, क्रिशा होंडा शोरुम ड्रॉप पॉईंट कोरेगाव भिमा, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पॉईंट कोरेगाव भिमा, वढू बु, हॉटेल वहिनीसमोरील पार्किंग याप्रमाणे पार्किंग, पिकअप पॉईंट, ड्रॉप पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

महावितरणध्ये ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालयाचे उद्घाटन

पुणे: महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजावी यासाठी रास्तापेठ येथील पुणे परिमंडलाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालय सुरु करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.

धकाधकीच्या क्षेत्रामध्ये अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुस्तकाच्या रुपाने नवीन मित्र मिळावे, वाचनकला विकसित व्हावी तसेच जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने रास्तापेठ येथे स्वतंत्र दालनात ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालय उभारण्यात आले आहे. यामध्ये वीजक्षेत्रासह सामाजिक, ऐतिहासिक तसेच विविध क्षेत्रातील नामवंत लेखकांचे पुस्तके, कथासंग्रह, कादंबरी उपलब्ध आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पुस्तके वाचण्यासाठी घरी नेता येणार आहे. तसेच वाचनालयाशेजारी विरंगुळा कक्ष असून त्यात कॅरम व बुद्धीबळ खेळण्यासाठी उपलब्ध आहे. या शिवाय वाहन चालकांसाठी वाहक कक्ष उभारण्यात आला आहे.

या तिनही उपक्रमांचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, संजीव नेहेते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे, कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, विरेंद्र मुळे, रवींद्र बुंदेले, माणिक राठोड, चंद्रकांत दिघे, सहायक संचालक गजानन खेडेकर आदींची उपस्थिती होती.

निर्यातदारांचे एक दिवसीय संमेलनाचे आयोजन

पुणे, दि. 11: उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत ‘निर्यातदारांचे एक दिवसीय संमेलन’ जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली १३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी 10 वा. द्वारा मे. गॅबेरिएल इंडिया लि. 29, माईलस्टोन, पुणे-नाशिक महामार्ग, मौजे कुरुळी, ता. खेड, येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या संमेलनात निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादन, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधीकामकाज करणारे घटक, संशोधक, बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वृषाली सोने यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ११: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा इच्छुक सुशिक्षित बेरोजगार व कारागीर व महिला बचतगटाने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर. खरात यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगाकरीता ५० लाख रुपये तर सेवा उद्योगाकरीता २० लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराचे किमान वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती ,जमाती , महिला, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त-जमाती, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि माजी सैनिकांकरीता वयोमर्यादा पाच वर्ष शिथील राहतील.

अर्जदार यापुर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नवीन उद्योजक, कारागिर, संस्था व बचत गट योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. दहा लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण व २५ लाख रुपयावरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण असावा. एका कुटुबांतील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.(कुटुंबाची व्याख्या ही पती पत्नी अशी राहील.)

अर्ज करतावेळी आधारकार्ड, शैक्षणिक दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, लोकसंख्येबाबत ग्रामसेवकाचा दाखला, प्रकल्प अहवाल विहित नमुन्यातील इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म, पॅन कार्ड, गुण् पत्रिका या कागदपत्रांसह छायाचित्र सोबत असावे.

इच्छुकांनी https://maha-cmegp.gov.in/homepage या संकेत स्थळावर अर्ज ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करतांना ‘केव्हीआयबी’ या एजन्सीची निवड करावी. अधिक माहितीकरीता जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, २४-ब पुणे मुंबई रस्ता, शासकीय दुध डेअरी समोर नवीन शिवाजी नगर. एस.टी. स्टॅन्ड शेजारी खडकी पुणे-४११००३ तसेच दु.क्र. ०२० २५८११८५९ आणि -dviopune@rediffmall.com या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले आहे.

पुण्याचे पालकमंत्री ? चंद्रकांतदादाना पसंती :अजितदादांना नापसंती ?

पुणे- केवळ राजकीयच नाही तर बांधकाम व्यावसायिक,आणि उद्योजक यांच्या वर्तुळातून आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून देखील पुण्याच्या पालकमंत्री पदी कोण हवे असा प्रश्न विचारला तर कोथरुडचे आमदार,माजी मंत्री चंद्रकांतदादा यांच्या नावालाच पसंती मिळते आहे.अजितदादांच्या नावाला मात्र नापसंती मिळते आहे.शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मंत्रीपद दिले तर त्यांचाही नावाला पालकमंत्री पदाची मोठी पसंती या क्षेत्रांतून मिळताना दिसत आहे.

दरम्यान पुण्याचे पालकमंत्रिपदासाठी दोन्ही नेते आग्रही असल्याचे सांगितले जाऊ लागल्याने महायुतीमध्ये मंत्रिपदावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. आताच्या सरकारमध्ये देखील त्यांनाच मिळणार की भाजप चंद्रकांत पाटलांना पुण्याचे पालकमंत्री करणार याकडे सध्या लक्ष लागले आहे.

अजित पवार महायुतीमध्ये आल्यावर त्यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह केला आणि त्यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना सोलापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. जेव्हा चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा देखील अजित पवारांनी जिल्ह्याच्या प्रशासनावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अजित पवार मूळ पुण्याचेच असल्याने त्यांचा पुण्यातील प्रशासनावर पूर्वीपासूनच दबदबा राहिला आहे.सडाफटिंग स्वभाव,रोज पहाटेच उठणे आणि सर्वांना धारेवर धरून कामाला लावणे या गुणांसह..अनेक निवेदने आणि पत्रांना सरळ सरळ केराची टोपली दाखविणे अशा प्रकारच्या तक्रारीसह हम करेसो वृत्ती देखील अजितदादा राबवितात असा त्यांच्यावर आरोप केला जातो तर चंद्रकांतदादा हे मात्र मृदू स्वभावाचे ऐकून घेणारे आणि मध्य मार्ग काढून कोणी नाराज होणार नाही याची काळजी घेणारे म्हणून ओळखले जातात.या दोहोंना पालकमंत्रीपद द्यायचे ठरविले नाही तर सिद्धार्थ शिरोळे यांना पालकमंत्रीपद देऊन पाहावे असे अनेकांचे मत आहे.

अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पुण्यातील राजकारण हे प्रामुख्याने सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने तसेच सहकारी संस्था आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री होणे हे अजित पवारांसाठी महत्त्वाचे आहे. अजित पवार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदारांना निधी देखील उपलब्ध करून देतात. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रिपद भाजप ला मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

लोकशाही वाचविण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरती घ्या- अरविंद शिंदे

पुणे-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्र्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कस काय लागू शकतात असा प्रश्न पडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यामध्ये ‘सर्व निवडणुकी बॅलेट पेपरवरती घ्याव्‍यात’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी पेठ येथील महाराष्ट्र बँकेशेजारी सह्यांची मोहिम राबविण्यात आली.

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकारे आहे. निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२% मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वा., ते ६५.०२% तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्‍हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ % झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३% वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे ईव्‍हीएम संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणूनच सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्‍यात ही मोहिम राबवित आहोत.’’  

     यावेळी असंख्य नागरिकांनी या मोहिमेस पसंती दर्शवली आणि या मोहिमेत सहभाग घेवून सह्या केल्या.

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी,प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे,माजी नगरसेवक रफिक शेख,अजित दरेकर, लता राजगुरू, हनुमंत पवार, राज अंबिके, सुनिल घाडगे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, सुजित यादव, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, डॉ. रमाकांत साठे, अविनाश अडसुळ, राज घेलोत, प्रकाश पवार, प्राची दुधाने, अर्चना शहा, राजश्री अडसुळ, सुंदरा ओव्‍हाळ, पपिता सोनवणे, प्रिंयका मदाळे, अनिता धिमधिमे, विजया थोरात, जान्हवी दुधाने, प्राजक्ता गायकवाड, विमल खांडेकर, कल्पना शंभरकर, लता घडसिंग, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके, नितीन वायदंडे, अभिजीत महामुनी, सुरेश चौधरी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.  

‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’मुळे मूत्राशय मार्गाशी संबंधित उपचारांत सुलभता-डॉ. संजय कुलकर्णी

‘युरोकुल’तर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत जगभरातील ६०० युरोलॉजिस्टचा सहभाग
पुणे : “आक्रसलेला मूत्रमार्ग मोठा करण्यासह त्यातील अडथळा दूर करणे, लघवीचा मार्ग शेंड्याऐवजी अंडकोशाजवळून असेल, तर तो नीट करणे, लिंगाची वक्रता घालवणे, ताठरता येण्यासाठी कृत्रिम उपकरण बसवणे, अपघातात तुटलेला लघवीचा मार्ग जोडणे या आणि अशा किचकट शस्त्रक्रिया करून मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी ‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’ उपयोगी ठरत असून, उपचारांत सुलभता येत आहे,” असे प्रतिपादन युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले.

बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी यांच्या वतीने मूत्राशय मार्गाच्या किचकट शस्त्रक्रियांची दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. युरोकुल येथे डॉ. संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुण्यातील डॉ. पंकज जोशी, लंडन येथील प्रा. अँथनी मंडी, इटली येथील डॉ. गुइडो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉ. गणेश गोपालकृष्णन, लंडन येथील ज्युलियन शाह, डॉ. मिरोस्लाव्ह दोर्डोव्हिक, कतार येथील डॉ. तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉ. ली झाह, डॉ. दिमित्री निकोलावास्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. भारतातील पाचशे, तर विदेशातील ८० तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, दोन दिवसांच्या या कार्यशाळेत एकूण १८ शस्त्रक्रिया झाल्या. ‘युरोकुल’मध्ये झालेल्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात झाले. जगभरातून आलेल्या ५०० हुन अधिक युरोलॉजिस्टने या शस्त्रक्रिया ‘याची देही याची डोळा’ पाहिल्या. कार्यशाळेतून मिळालेल्या नाविन्यपूर्ण माहितीमुळे सहभागी यूरोलॉजिस्टच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसत होता. माझ्याकडे असलेले ज्ञान इतरांना देऊन चांगले युरोलॉजिस्ट तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे.

‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल, तर रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोषाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो. अपघातामध्ये किडनी व लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटल्याने पोटात होणारी लघवी थांबवण्यासाठी नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या साह्याने करण्यात आले. यासह अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रोबोटमार्फत इथे करण्यात आल्याचे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.

प्रा. मंडी व प्रा. ली जाह म्हणाले की, पूर्वी मूत्रमार्ग मोठा करण्यासाठी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया, स्वतः नळी घालून उपाययोजना कराव्या लागत. आता या उपचारांमुळे रुग्णांचे जीवन सुसह्य झाले आहे. ‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘युरोकुल’ची सामाजिक बांधिलकी’
‘युरोकुल’विषयी बोलताना भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या, ‘युरोलॉजी’ व ‘नेफरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे.