महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन : नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन यावर सखोल चर्चा ; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद ‘स्पेक्ट्रम २०२४’ महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. दिनांक १४ आणि १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता औंधमधील भारतीय विज्ञान व संशोधन संस्था येथे ही परिषद होणार आहे, अशी माहिती पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ.राधिका परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. नितीन कोलते, डॉ. आश्विनी मिसाळ, डॉ. वृषाली वरद उपस्थित होते.
परिषदेच्या उद््घाटन सोहळ्यास आॅल इंडिया आॅप्थलोमोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समर बसक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राधिका परांजपे म्हणाल्या, या परिषदेत नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन उपाययोजना यांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. परिषदेत भारतातील आणि परदेशातील आघाडीचे नेत्र तज्ञ, संशोधक आणि नेत्रचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
परिषदेत ब्रिटन, ओमान सह कलकत्ता, बंगळुरु, ओडिसा, जोधपूर, नवी दिल्ली, केरळ तामिळनाडू, गुजरात येथील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, महाराष्ट्रातून पुण्यासह मुंबई, नागपूर येथील तज्ञ देखील सहभागी होणार आहेत. नेत्र विज्ञान क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.