Home Blog Page 734

सारथी संस्थेमार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ

पुणे, दि. 17 : छत्रपती शाहू महाराज संधोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे यांच्यावतीने राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा- कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबद्ध तऱ्हेने व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचा शुभारंभ सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, माजी संचालक मधूकरराव कोकाटे, माजी संचालक नवनाथ पासलकर नव्याने सुरु करण्यात आलेल्या इनक्युबेशन केंद्रांचे पदाधिकारी व अधिकारी तसेच सारथी संस्थेचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. निंबाळकर म्हणाले, आत्तापर्यंत संपूर्ण राज्यात 12 इनक्युबेशन केंद्रांचा समावेश करण्यात आला असून यामधून अनेक यशस्वी उद्योजक तयार होत आहेत. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा गटातील नवोदित उद्योजकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास, ज्ञान आणि आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे सांगून लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार अभ्यासक्रमासाठी महिलांची प्राधान्याने निवड करावी, असेही श्री. निंबाळकर म्हणाले.
श्री. काकडे यांनी प्रास्ताविकात इनक्युबेशन उपक्रमाबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले या नवउद्योजकांना एक वर्षासाठी 25 हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसाय कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी इनक्युबेशन केंद्रामध्ये मार्गदर्शन, कार्यालयीन जागा, तंत्रज्ञान, प्रशासकीय सहाय्य, सॉफ्टवेअर सुविधा, बैठकीसाठी सभागृह आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे सांगून निवड झालेल्या लाभार्थ्यांनी स्टार्टअपच्या अनोख्या कल्पना सादर कराव्यात, असे आवाहन श्री. काकडे यांनी केले.
यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत पाच नवीन इनक्युबेशन केंद्राद्वारे प्रशिक्षण, सरसेनापती प्रतापराव गुजर सारथी अधिछात्रवृत्ती संशोधन प्रबंध सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, स्पर्धा प्रशिक्षण, महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत सीओईपी मधील कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. इनक्युबेशन केंद्रांमध्ये एमआयटी, लोणीकाळभोर, आयसर, पुणे, बारामती फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील एफ.एम.सी.आय.आय.आय. इनक्युबेशन केंद्रांचा समावेश आहे.

वेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडची रु. 16,000 दशलक्षचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (आयपीओ) शुक्रवारपासून सुरू होणार

● दर्शनी मूल्य १ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी 610 ते 643 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. 

●  बिड/इश्यू उघडण्याची तारीख – शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 आणि बिड/इश्यू बंद होण्याची तारीख – मंगळवार, 24 डिसेंबर 2024

●     अँकर तारीख – अँकर गुंतवणूकदारांची बिडिंग तारीख बिड/ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक कामकाजाच्या दिवस आधीची आहे, म्हणजेच गुरुवार, 19 डिसेंबर 2024.

●     बोली किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 23 इक्विटी शेअर्सच्या पटीत केली जाऊ शकते.

●     कर्मचारी आरक्षण भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर ₹30 ची सवलत दिली जात आहे.

●     आरएचपी लिंक: https://jmfl.com/Common/getFile/4220

पुणे-, 17 डिसेंबर 2024: वेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचा (पूर्वीचे नाव आयसीसी रिअॅल्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड) (“कंपनी”) इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) बोली/प्रस्ताव शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख बोली/प्रस्ताव उघडण्याच्या तारखेच्या एका कामकाजाच्या दिवसापूर्वी म्हणजेच गुरुवार, 19 डिसेंबर 2024 आहे. बोली/प्रस्ताव बंद होण्याची तारीख मंगळवार, 24 डिसेंबर 2024 आहे.**

एकूण प्रस्तावित इक्विटी शेअर्सचा आकार (प्रत्येकाचा दर्शनी मूल्य रु. 1) एकूण रु. 16,000 दशलक्ष इतका आहे, ज्यामध्ये एकूण रु. 16,000 दशलक्ष पर्यंतचा नवीन प्रस्ताव (“एकूण प्रस्ताव आकार”) समाविष्ट आहे.

प्रत्येक शेअरसाठी 610 ते 643 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.  ( प्राइस बँड).

पात्र कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी आरक्षण भागात (“कर्मचारी आरक्षण भाग सवलत”) बोली लावताना प्रति इक्विटी शेअर रु. 30 ची सवलत दिली जात आहे. बोली किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी लावता येईल आणि त्यानंतर 23 इक्विटी शेअर्सच्या पटीतच लावता येईल (“बोली लॉट”).

कंपनी नेट उत्पन्नाचा उपयोग मुख्यतः पुढील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्तावित आहे – कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची अंशतः किंवा पूर्ण परतफेड/पूर्वतफेड आणि त्यावरील व्याजाच्या देय रकमेचा भरणा.

पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष आणि व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे कार्यकारी संचालक अतुल आय. चोरडिया म्हणाले, “व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडच्या प्रस्तावित आयपीओद्वारे पंचशील आणि ब्लॅकस्टोनसाठी प्रादेशिक आदरातिथ्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा साध्य होत आहे.”

ब्लॅकस्टोनच्या भारतातील रिअल इस्टेट विभागाचे प्रमुख तुषार परिख म्हणाले, “आम्हाला आमच्या दीर्घकालीन भागीदार पंचशील रिअल्टीसोबत व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडच्या आगामी आयपीओसाठी काम करताना आनंद होत आहे. या पोर्टफोलिओमध्ये जागतिक आदरातिथ्य ब्रँडद्वारे चालवले जाणारे प्रीमियम हॉस्पिटॅलिटी मालमत्तांचा समावेश आहे.”

हा SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अधीन असलेला एक इश्यू आहे. हा इश्यू SEBI ICDR नियम 6(2) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे, ज्यामध्ये SEBI ICDR नियम 32(2) नुसार कमीतकमी 75% नेट इश्यू प्रमाणात पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (“QIBs” आणि त्या विभागाला “QIB विभाग”) वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल, हे लक्षात घेतले आहे की, आमच्या कंपनीला BRLMs सह सल्लामसलतीनुसार, QIB विभागाच्या 60% पर्यंतची रक्कम अँकर गुंतवणूकदारांना SEBI ICDR नियमांच्या अधीन, स्वैच्छिक पद्धतीने वाटप करता येईल (“अँकर गुंतवणूकदार विभाग”), ज्यात तिसऱ्या भागाच्या रकमेची राखीव व्यवस्था देशांतर्गत म्युच्युअल फंडसाठी असेल. हे समजले जाते की, देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून योग्य बोली प्राप्त झाल्यास, Anchor Investor Allocation Price किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर. जर अँकर गुंतवणूकदार विभागातील बोली कमी झाली किंवा आवंटन न झाल्यास, उर्वरित समभाग QIB विभागात (Anchor Investor विभाग वगळता) जोडले जातील (“नेट QIB विभाग”).

तसेच नेट QIB विभागाच्या 5% रकमेचे आवंटन फक्त म्युच्युअल फंड्ससाठी प्रमाणानुसार केले जाईल आणि नेट QIB विभागाच्या उर्वरित रकमेचे आवंटन सर्व QIBs (Anchor Investors वगळता) समाविष्ट करून प्रमाणानुसार केले जाईल, ज्यात म्युच्युअल फंड्सही समाविष्ट आहेत, असे मानले जाते की, योग्य बोली इश्यू किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर प्राप्त होईल. तथापि, जर म्युच्युअल फंड्सकडून मिळालेल्या एकत्रित मागणीने शुद्ध QIB विभागाच्या 5% पेक्षा कमी मागणी केली, तर म्युच्युअल फंड विभागात उपलब्ध असलेल्या शिल्लक समभागांना उर्वरित QIB विभागात जोडले जाईल आणि QIBs साठी प्रमाणानुसार आवंटन केले जाईल.

तसेच शुद्ध इश्यूच्या 15% पेक्षा जास्त रक्कम नॉन-इन्स्टिट्युशनल बोलीदारांना (“NIBs”) प्रमाणानुसार आवंटनासाठी उपलब्ध होईल, त्यात (a) एक तृतीयांश भाग ₹200,000 पेक्षा जास्त आणि ₹1,000,000 पर्यंतच्या अर्ज आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव राहील; व (b) दोन-तृतीयांश भाग ₹1,00,0000 पेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव राहील, असे मानले जाते की, अशा उपविभागांपैकी कोणत्याही उपविभागात न भरलेली रक्कम NIBs च्या इतर उपविभागात SEBI ICDR नियमांच्या अनुषंगाने वितरित केली जाऊ शकते, तसेच नेट इश्यूच्या 10% पेक्षा जास्त रक्कम रिटेल इंडिव्हिज्युअल बोलीदारांना (“RIBs”) प्रमाणानुसार आवंटनासाठी उपलब्ध होईल. असे मानले जाते की, त्यांच्याकडून योग्य बोली इश्यू किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर प्राप्त होईल.

तसेच कर्मचारी आरक्षण भागात बोली देणाऱ्या पात्र कर्मचा-य़ांना प्रमाणानुसार समभाग वितरित केले जातील, त्यांच्याकडून इश्यू किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर योग्य बोली प्राप्त झाल्यास. सर्व बोलीदार (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता)ला अनिवार्यपणे अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“ASBA”) प्रक्रिया वापरावी लागेल, त्यांच्या संबंधित ASBA खात्याचे तपशील आणि UPI आयडी (UPI मेकॅनिझम वापरणाऱ्या UPI बोलीदारांसाठी) प्रदान करणे आवश्यक आहे, याच्या अनुषंगाने संबंधित बोली रक्कम SCSB कडून किंवा UPI मेकॅनिझमअंतर्गत ब्लॉक केली जाईल, तसेच इश्यूमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असेल. अँकर इन्व्हेस्टर्सना ASBA प्रक्रियेद्वारे इश्यूच्या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून JM फायनान्शियल लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, IIFL सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे कार्यरत आहेत.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगली साहसी एसआरटीएल मॅरेथॉन स्पर्धा…


स्वराज्यच्या सुवर्णमार्गावर धावणाऱ्या चित्ताधारक एसआरटी अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनमध्ये ४ नवीन रेकॉर्ड

वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनचे आयोजन

पुणे: छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) किल्ल्यांच्या परिसरात एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यंदाच्या स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. सिंहगडाच्या पायथ्यापासून राजगड चढाई ते तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग दरवर्षी स्पर्धक पार करतात. भारतासहित साऊथ कोरिया, नॉर्वे, फ्रांस, स्पेन, साऊथ आफ्रिका, कॅनडा, पोलंड या ८ देशातील खेळाडूंसह भारतातील २७ राज्य आणि ५५ शहरातील एकूण ११०० हुन अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन १०० किमी, ५३ किमी, २५ किमी व ११ किमी अशा वेगवेगळ्या विभागात आयोजित केली गेली. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
विजयी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व विशेष सन्मान चिन्ह दिले गेले. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ही १०० किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली, तसेच २०२४ हे एक विशेष वर्ष ठरले आहे कारण यावर्षी चारही अंतर श्रेणींमध्ये नवीन विक्रमी वेळांच्या नोंदी झाल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांना जोडणारी प्राचीन मार्गाची एक रोमांचकारी मॅरेथॉन असून स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा घेतली गेली. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसियेशनची म्हणजेच ITRAचे सदस्य आहे. एसआरटी अल्ट्रा ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील UTMB पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात.

छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा गडकिल्ल्यांच्या सानिध्यातील ही स्पर्धा पुर्वीच्या काळी प्रवास,व्यापार शेतीसाठी वापरलेला हा मार्ग ऐतिहासिक पाऊलखुणांची आठवण करून देणारा आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून स्वतःच्या आरोग्यासाठी व आनंदासाठी वेळ काढणे महत्त्वाचे झाले आहे. एसआरटीएल मॅरेथॉन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आरोग्य अशा तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलीस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने हि स्पर्धा दरवर्षी यशस्वी पार पडते.
एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, मारूती गोळे, ऍड. राजेश सातपुते, हर्षद राव, अमर धुमाळ, व हवेली, दौंड, मुळशी, वेल्हा व पुण्यातील ५०० स्वयंसेवकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

यावर्षी दार्जिलींग चा हेमंत लिंबू याने १०० किमी अंतर १०ः३२ः३३ या वेळात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला, ते सोम बहाद्दूर थामी याने ५३ किमी ५ः२३ः४३ या वेळात पूर्ण करून विक्रम केला. गुजरात चे इनेश वसवा ने २५ किमी २:१३ः४० या वेळात पूर्ण करून विक्रम केला व अमित शर्माने ११ किमी १ः१५ः१५ वेळात विक्रम नोंदवला. या स्पर्धेसाठी ऍथलीट ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यात आला याचे नैतृत्व कोच योगेश सानप यांनी केले व त्यांना कोच अनंत कचरे व कोच श्यामल मोंडल यांनी सहकार्य केले.

SRT ULTRA 2024 निकाल

* सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा – एसआरटीएल १०० कि.मी. अंतर व ३८७० मी. चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – हेमंत लिंबू – १०ः३२ः३३ new record

क्र. २ – विशाल वाळवी – १२ः१६ः२१
क्र. ३ – रामदास मेस्त्री – १४ः५६ः३२

महिला विजेता –
क्र. १ – स्नेहल योगिता – १९:५०ः०२
क्र. २ – सुफिया सूफी – २०:४२ः१५
क्र. ३. – शर्वरी खेर- २२ः४४ः३६

* सिंहगड-राजगड-तोरणा – ५३ कि. मी. व २३२० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – सोम बहादूर थामी – ५ः२३ः४३ new record
क्र. २ – अभिनीत सिंग – ८ः०८ः२९
क्र. ३ – साई किरण एस – ८ः१३ः४९

महिला विजेता –
क्र. १ – ऋुतूजा माळवदकर – ८:१३:५६
क्र. २ – सहाना विश्वनाथ – ११:०३:४९
क्र. ३. – हेमा आवळे – ११:४०:४६

* सिंहगड-राजगड – २५ कि. मी. व ११०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – इनेश वासवा – २:१३ः४० new record
क्र. २ – अनुराग कोणकर – २:१६ः४३
क्र. ३ – विशाल राजभर – २:२७ः४४

महिला विजेता –
क्र. १ – त्रूप्ती भोसले – ३:५३ः२७
क्र. २ – श्रद्धा वास्सा – ४:२१ः०५
क्र. ३. – श्वेता खेराज – ४:३८ः१३

* सिंहगड हाफ व्हर्टीकल कि.मी. – ११ कि. मी. व ७०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – अमित शर्मा – १ः१५ः१५ new record
क्र. २ – भागवत धुमाळ – १:३०ः०८
क्र. ३ – डॅनियल सेयमोर – १:३७ः१३

महिला विजेता –
क्र. १ – निशा मिश्रा – १:४४ः१३
क्र. २ – शाबू गोसावी – १:४८ः२२
क्र. ३. – सुरभी मेरूकर- १ः५३ः५२

–  वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन.

मनुस्मृती हे वैदिक संविधान- पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज

पुण्यात तीन दिवसीय दीक्षा व संगोष्टी कार्यक्रम 
पुणे : काळानुसार सनातन सिद्धांताला जगाला मानावेच लागेल. सुसंस्कृत, सुरक्षित, सुशिक्षित, संपन्न हे हिंदू राष्ट्राचे स्वरूप आहे. वैदिक संविधानाचे नाव मनुस्मृती आहे. जीवनाचे सार्थक करण्यासाठी मनू ने जे काही सांगितले त्याचे पालन केले पाहिजे. फक्त पोट आणि परिवारापर्यंत हिंदूंनी मर्यादित राहायला नको. तरच त्यांना योग्य तो सन्मान मिळेल, असे मत पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज यांनी व्यक्त केले.

श्रीमज्जगुरु पुरी शंकराचार्य स्वागत समिती, पुणे तर्फे बी.टी. कवडे रस्त्यावरील मियामी टेरेस येथे पत्रकार संवाद व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यामध्ये  तीन दिवसीय दीक्षा व संगोष्टी कार्यक्रम दि.२० डिसेंबर पर्यंत सकाळी ११.३० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मियामी टेरेस,  बी.टी. कवडे रस्ता येथे शंकराचार्य महाराज उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. 

स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज म्हणाले,  हिंदू राष्ट्र होणे शक्य आहे. कारण आपले पूर्वज हे सनातनी वैदिक आर्य हिंदू होते. त्यामुळे भारत देशाला हिंदू राष्ट्र बनण्यासाठी कोणतीही अडचण नाही. भारत विश्वगुरू आहे. संयुक्त राष्ट्र सारख्या संघटनाही त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतात येतात. त्यामुळे भारत हा विश्वगुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमर्यादित महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी नरेंद्र मोदींना नितीश आणि नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालावे लागत आहे. त्यांना आता सांभाळण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. 

लघु उद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १७: जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या पात्र लघु उद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

राज्य शासनाच्यावतीने लघु उद्योजकाना जिल्हा पुरस्कार २०२३ व जिल्हा पुरस्कार २०२४ देण्यात येणार आहे. जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये व व्दितीय पुरस्कार १० हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग २, उद्योग आधार, उद्यम रजिस्ट्रेशन हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षे नॉदणीकृत असावा. १ जानेवारी २०२० पूर्वीची नोंदणी उद्योग, आधार,उद्यम रजिस्ट्रेशन तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा बँकेचा थकबाकीदार नसावा. जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगाची निवड करण्यात येणार आहे.

इच्छुकांसाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथे विनामुल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३९५८७,२५५३७५४१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप….

काँग्रेस, ठाकरे, पवार मला विश्वासात घेत होते:पण राष्ट्रवादीत तिघेच निर्णय घेतात; भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर आरोप

नाशिक/येवला –

वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर आपल्या समर्थकांसमोर त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे.येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला-लासलगावचा किल्ला आपण लढवला, तुमचे आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते. विशेष करून मराठा समाजाचे आभार. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात घडवला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत केवळ माझा कोणताही हस्तक्षेप नसतो. आमच्या पक्षात केवळ अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी केला. त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार मला विश्वासात घेत होते, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान मिळाले होते. यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतानाही आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की नाही हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असल्याचेही संकेत दिले. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात. चर्चेत किंवा निर्णय प्रक्रियेत माझा सहभाग शून्य आहे. आमदारकीचे कुणाला तिकीट द्यायचे हे सुद्धा मला माहिती नसते. खासदारकीची उमेदवारी कुणाला द्यायची? हे ही मला माहिती नाही. मंत्री कुणाला करायचे? हे ही आम्हाला ठावूक नाही. हे केवळ त्या तिघांनाच ठावूक असते. आम्ही या पक्षात आमची सिनिअॅरिटी घेऊनच आलो होतो. यापूर्वी शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्हाला विश्वासात घेतले जायचे. पण इकडे असे काहीच होत नाही.

मी माझ्या कार्यकर्त्यांपुढे माझी व्यथा मांडली आहे. नक्की काय झाले हे त्यांना समजले पाहिजे. मी त्यांना सगळा इतिहास सांगितला. पूर्वी काय झाले? आता काय झाले? मागच्या 4-6 महिन्यात काय झाले? व मागील 8-10 दिवसांत काय झाले? हे सर्वकाही सांगितले आहे. त्यानंतर त्यांनीही मला मी घेईल त्या निर्णयामागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे, असे छगन भुजबळ म्हणालेत.

छगन भुजबळ यांनी यावेळी आपला उद्धव ठाकरेंसह शरद पवार व त्यांच्या पक्षातील सर्वच नेत्यांशी आपले चांगले संबंध असल्याचेही स्पष्ट केले. मी उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलतो. मी मागे शरद पवारांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याशीही बोलणे होते. सुप्रिया सुळेंशी कधी – कधी बोलणे होते. त्यात काय आहे? पूर्वी आम्ही एकत्र काम केले आहे. अशा विशिष्ट प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू असते, असे ते म्हणाले.

समाजाने नद्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले – विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार

‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

पुणे, प्रतिनिधी – नदीचे महत्व आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचले आहे. पुराणांमध्येदेखील नदीचे महत्व विशद केलेलं आहे. आजूबाजूला पर्यावरण क्षेत्रात एवढ्या चांगल्या संस्था आणि व्यक्ती काम करत असताना सुद्धा आपण समाज म्हणून नदीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची खंत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली.
लहानपणी सर्वांनी वाहत्या ओढ्यातील पाणी ओंजळीने पिलेलं आहे, मात्र आता आपण पाण्याची एवढी वाताहात लावलेली आहे की ते पाणी थेट पिण्यायोग्य राहिलेलं नाही. केवळ शासन आणि सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता नदी स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नद्यांच्या आरोग्यावरच आपले आरोग्य आणि भवितव्य अवलंबून असल्याने नद्यांचे संवर्धन करून त्यांची शाश्वतता राखणे ही काळाची गरज आहे. वनराईच्या ‘शाश्वत नद्या’ या विशेषांकामुळे नद्यांना स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्याच्या कार्यमोहिमांना बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरील पुणे पुस्तक महोत्सवामध्ये ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, वनराईचे विश्वस्त  रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले की, दैनंदिन जीवनात रासायनिक घटक असलेले साबण, शाम्पू, टूथपेस्ट, डिटर्जंट, फिनाइल, कीटकनाशके अशा अनेक वस्तू वापरत असतो. याद्वारे नैसर्गिकरित्या विघटन न होऊ शकणारे कित्येक रासायनिक घटक घराघरांतून सांडपाण्याच्या स्वरूपात नद्यांमध्ये मिसळत असतात. त्यामुळे अशी घातक रसायनयुक्त उत्पादने नाकारून त्याऐवजी निसर्गस्नेही व पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणे गरजेचे आहे. आपण केलेल्या चुकांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा विशेषांक केवळ संग्रही न ठेवता याचे वाचन, मनन चिंतन आणि कृती केल्यास निश्चितपणे पर्यावरणाचे रक्षक होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.

सागर धारिया म्हणाले की, नदी हा आपल्यासाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नसून आपला इतिहास, भूगोल, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा तो एक दुवा आहे. नद्यांवर फक्त धरणे बांधून आपल्याला जलसुरक्षा साधता येणार नाही, तर ‘गाँव का पानी गाँवमें, और खेत का पानी खेतमें’ हा विचार तळागाळामध्ये रुजवून दुष्काळ व पाणी टंचाईसारख्या समस्यांवर मात करता येईल. याच भूमिकेतून गेल्या चार दशकांपासून ग्रामीण भारतामध्ये पाणलोट व्यवस्थापन तंत्राचा वापर करून ‘वनराई’ संस्था नदी संवर्धनासाठी हातभार लावत आहे. 
अमित वाडेकर म्हणाले की, नद्यांच्या शाश्वततेसाठी ‘वनराई’च्या माध्यमातून सर्व स्तरांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ हा ‘वनराई’ वार्षिक विशेषांकही याचाच एक भाग आहे. या विशेषांकातून नद्यांबाबतच्या समस्या, उपाययोजना, प्रयोग, यशकथा इत्यादींवर समग्र चर्चा घडवून आणण्यात आली आहे. त्यामुळे हा विशेषांक वाचकांना नदी संवर्धनासाठी प्रेरित करेलच. शिवाय दिशादर्शकाचीही भूमिका बजावेल असा आम्हाला विश्वास आहे. या कार्यक्रमाचे आभार रोहिदास मोरे यांनी मानले, तर सुजाता मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. 

९८ व्या साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली संमेलन स्थळाची पाहणी.

दिल्ली, दि. १७: अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे भरणार आहे. संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली.
या पाहणीसाठी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ . शैलेश पगारिया, अतुल बोकरीया, प्रदीप पाटील,लेशपाल जवळगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांनी संमेलनस्थळावर उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तलकटोरा स्टेडियममध्ये किती लोक येऊ शकतात, त्यांची बसण्याची, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी होईल याची पाहणी त्यांनी केली. पुस्तक प्रदर्शन स्थळ, कवीकट्टा आदींची स्थळ पाहणी त्यांनी केली तसेच संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या

साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद या संमेलनासाठी अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह देशभरातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहतील, तसेच साहित्यप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्या अनुषंगाने सुव्यवस्थित नियोजन आणि सुरक्षेच्या बाबतीत काटेकोर उपाययोजना कराव्यात असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

संमेलनाच्या तीन दिवसांत साहित्यिक परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखत असे विविध कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक विक्रीसाठीही भव्य दालन इथं असणार आहे. या तयारीचीही माहिती पवार यांनी यावेळी घेतली.

‘महाराष्ट्र ही सलोख्याची आणि समन्वयाची भूमी आहे. ही ओळख निर्माण होण्यात मराठी वाङ्मयाचा मोठा वाटा आहे. भारताचे वैचारिक प्रतिनिधित्व करण्यात महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्याचा मोठा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या माणसांनी तर साहित्यात आणि देशाच्या जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. देशाच्या राजधानीत संमेलन होत असताना महाराष्ट्राच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठावर कसे नेता येईल’, यादृष्टीने प्रयत्न या संमेलनाच्या अनुषंगाने करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

संमेलनाचे सुसज्ज आयोजन व व्यवस्थापनासाठी सुसज्ज टीम, तांत्रिक सुविधा आणि उपस्थित साहित्य रसिकांच्या दृष्टीने हे संमेलन स्मरणीय कसे होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून हे संमेलन मराठी साहित्याचा अनोखा सोहळा ठरणार असून त्यातून मराठी साहित्य आणि सांस्कृतिक बंध विस्तारेल, असं संजय नहार यांनी यावेळी सांगितले.

शालेय बसचे ऑडिट होणे गरजेचे -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसचे ऑडिट त्वरीत व्हावे आणि शालेय कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज नागपूर येथे विधानसभेत बोलताना केली.

औचित्याचा मुद्दा उपस्थित करून आमदार शिरोळे यांनी पुण्यातील शालेय बसचा विषय सरकारसमोर मांडला. विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या बसला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना पाहता शालेय बस आणि व्हॅनच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे, असे शिरोळे यांनी बोलताना सांगितले.

पुण्यात ८ हजारहून अधिक शालेय बस आणि व्हॅन आहेत. या सर्व बसगाड्यांचे आणि व्हॅन्स चे ऑडिट होणे गरजेचे आहे, असे आ.शिरोळे यांनी सांगितले.

शालेय बस गाडीला आग लागल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या? याचे प्रशिक्षण पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दिले जावे. तसेच बस गाडीमध्ये आग विझवणारी यंत्रणा किती असावी? कुठे बसवली जावी? त्याचा वापर कसा केला जावा? विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे? याचे प्रशिक्षण शालेय कर्मचाऱ्यांना देण्यात यावे याकरिता सरकारने महापालिकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी शिरोळे यांनी केली.

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून, जनतेच्या भावनांशी सरकारला देणेघेणे नाही: नाना पटोले

ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक.

‘वन नेशन, नो इलेक्शन’ हे विधेयक लोकशाही व्यवस्था संपवण्यासाठी.

नागपूर, दि. १७ डिसेंबर २०२४
ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणी सरकारविरोधात विधान भवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खुन्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

सभागृहाचे कामकाज सुरु होताच नाना पटोले यांनी परभणीतील पोलीस अत्याचाराचा व दलित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी परभणीत जे कोंबिग ऑपरेशन केले ते शासन निर्मित होते का, यासह या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे त्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. या विषयावर बुधवारी चर्चा करु असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम विधानसभेला वापरल्या नाहीत, त्यासाठी गुजरातमधून ईव्हीएम मागवण्यात आल्या. ईव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. ईव्हीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत भाजपाचे लोक संचालक मंडळावर आहेत. निवडणूक आयोगाला असलेले संवैधानिक अधिकाराचा वापरही ते करू शकत नाहीत सर्व कारभार भाजपाच्या इशाऱ्यावर सुरु आहे यातून भाजपाची मानसिकता स्पष्ट होते. लोकशाही व्यवस्था संपवण्याची आरएसएसची जी मानसिकता आहे त्यासाठीच वन नेशन नो इलेक्शन विधेयक आणले जात आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

या गुरुवारी KBC 16 मध्ये: 1 करोडचा प्रश्न

अमिताभ बच्चन यांचा ‘कभी कभी’ पोशाखाचा किस्सा आणि प्रशांत त्रिपाठी साठी 1 करोडचा प्रश्न

(Sharad Lonkar)
या बुधवारी आणि गुरुवारी कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समक्ष लखनौहून आलेले प्रशांत त्रिपाठी असतील, जे महसूल विभागात लँड रेकॉर्डर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. त्यांचे वाक्चातुर्य आणि स्थिर बुद्धी यामुळे हा भाग रोमांचक असणार आहे. याच भागात श्री. त्रिपाठी 1 करोड रु. च्या प्रश्नाला तोंड देतील!
श्री. त्रिपाठी यांच्याशी गप्पा मारताना बिग बींना त्यांच्या दीवार आणि कभी कभी या त्यांच्या आवडत्या चित्रपटांची आठवण झाली. ते म्हणाले, “’दीवार’मधील एका अॅक्शन दृश्याचे शूटिंग उरकून श्री. बच्चन यांना ‘कभी कभी’चित्रपटातील एका रोमॅंटिक दृश्याच्या शूटिंगसाठी काश्मीरला जायचे होते. ते फार विचित्र वाटायचे, अचानक गियर बदलल्यासारखे! मी यश चोप्रा जींना म्हटले की ‘हे फार विचित्र वाटते. अॅक्शनवरून एकदम रोमान्स!’ त्यावर ते म्हणाले, ‘नाही नाही, सारे काही ठीक होईल.’ म्हणून मी सहज विचारले, ‘माझा पोशाख कसा असेल?’ मला अगदी 2 दिवसात निघायचे होते, त्यामुळे त्यांनी सांगितले, ‘तुझ्या घरी असेल, त्यापैकी काहीही चालेल’. त्यामुळे चित्रपटात जे काही कपडे तुम्हाला दिसतात, ते माझे स्वतःचेच आहेत.” पुढे बिग बीं मिश्किल सुरात म्हणाले, “आणि अजून ते कपडे मला परत केलेले नाहीत.”
गुरुवारी, प्रशांत त्रिपाठी यांच्यासमोर एक रोमांचक आव्हान असणार आहे – ते 15 व्या प्रश्नावर पोहोचणार आहेत. म्हणजे 1 करोडच्या प्रश्नाचा सामना करताना दिसणार आहेत. त्यामुळे बघत रहा, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन रात्री 9 वाजता आणि जाणून घ्या की ते या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार का, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये!

लिला पुनावाला फाउंडेशनचे २९ वर्षे: शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचा सशक्तीकरण प्रवास साजरा

पुणे : लिला पुनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) आपल्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त ६ शहरांतील १,५०० हून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित पण गुणवान मुलींना गुणवत्ता सह गरजू आधारित शिष्यवृत्त्या प्रदान केल्या. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर तसेच तेलंगणातील हैदराबाद आणि कर्नाटकमधील बेंगळुरू यांचा समावेश आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात, एलपीएफने अभियांत्रिकी, नर्सिंग आणि विज्ञान क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १,२०० हून अधिक मुलींना त्यांच्या संपूर्ण शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या. याशिवाय, ‘टूमॉरो टुगेदर’ या शालेय प्रकल्पाअंतर्गत पुणे विभागातील ७वी पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जवळपास ३०० मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आल्या.
या शिष्यवृत्ती प्रदान समारंभाचे आयोजन १३ वेगवेगळ्या कार्यक्रमांत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये एलपीएफच्या अध्यक्षा श्रीमती लिला पुनावाला – अध्यक्ष , श्री. फिरोज पुनावाला – संस्थापक विश्वस्त, कॉर्पोरेट भागीदार, दाते आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या.

संस्थेच्या स्थापनेपासून आजवर एलपीएफने १७,३०० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती प्रदान केल्या असून त्यामुळे सशक्त महिलांचे एक विस्तारित समुदाय निर्माण झाले आहे. पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे उपस्थित असलेल्या या संस्थेने शिक्षण आणि सशक्तीकरणाचा प्रवास सुरू ठेवला आहे.
एलपीएफ पुढील वर्षी आपला ३०वा वर्धापन दिन साजरा करणार असून या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त संस्थेने २०,००० मुलींना सशक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून तरुण आयुष्ये बदलण्याच्या आपल्या ध्येयाशी एलपीएफ दृढपणे बांधिल आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट; दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा

नागपूर-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आज नागपूर येथे पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. वास्तविक परंपरेप्रमाणेच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा देखील झाली. मात्र या चर्चेमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाचा कोणताही मुद्दा चर्चेत आला नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली. या भेटीत देखील विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूंत्रानी दिली आहे. राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन वर्षानंतर ही भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.

उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनीत बालन यांच्यासह मान्यवरांकडून फ्लॅग ऑफ

बारामती : बारामतीची प्रसन्न गुलाबी थंडीने सजलेली पहाट, हिरवाई नटलेले सुंदर रस्ते , एसआरपीएफ च्या शिस्तबद्ध बँड पथकाने रनर्सचे फिनिश पॉईंटवर केलेले अविस्मरणीय स्वागत आणि बारामतीचा विकास पॅटर्न न्याहाळत रनर्सने विक्रमी वेळेत साधलेली दौड यांमुळे पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, युवा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन, जान्हवी पुनीत बालन-धारिवाल, युवा नेते पार्थ पवार, अभिनेता जॅकी भगनानी यांनी पहाटे चार वाजता झेंडा दाखवून या मेरोथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला. वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनची मान्यतेने आणि तालुका स्तरावर आंतरराष्ट्रीय मानकांच्या दृष्टीने संपन्न होणारी बारामती पॉवर मॅरेथॉन ही कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅरॅथॉनसाठी पात्रता निकष गणली जाते. त्यामुळे देशभरातून अनेक ख्यातनाम रनर्स या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत असतात. सलग दुसऱ्या वर्षी पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्कृष्ट नियोजन , ट्रॅक वर असणारी हायड्रेशनची आणि एनर्जी पॉईंटची उत्तम व्यवस्था , मैदानावर जागोजागी उभारलेले सेल्फी पॉईंट आणि फोटोसेशन बूथ , चिंकाराच्या ब्रँडिंगने साधलेले वातावरण यांमुळे प्रोफेशनल रनर्ससोबतच यंदा बारामती आणि परिसरातील आरोग्यस्पर्धकांची संख्या वाढलेली बघायला मिळाली. एकूण २८०० हुन अधिक रनर्स मॅरेथॉन मध्ये विविध रनिंग कॅटेगरीसाठी सहभागी झाले होते. बारामती रेल्वे स्टेशन ग्राउंड येथे विविध पाच गटांमध्ये ही मॅरेथॉन पार पडली. खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी त्यांनी मॅरेथॉन आणि त्याचे आयोजन करणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे. बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्यांनी हे आव्हान लीलया पेलले असल्याचे सांगितले. तर बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष सतिश ननवरे म्हणाले , “पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱ्या पर्वाला रनर्सने दिलेला प्रतिसाद आम्हा सर्व आयोजकांचा उत्साह वाढविणारा आहे. मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी ज्यांचे पाठबळ लाभलेल्या युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह सर्वच प्रमुख प्रायोजकांचे आभार व्यक्त केले.

अजित पवारांकडून पुनीत बालन यांचे कौतुक स्पर्धकांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , “बारामतीची प्रगती चहुबाजूंनी होत असताना, त्याला क्रीडा क्षेत्र देखील अपवाद नाही. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धा महत्वाच्या ठरतात आणि या प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनात पुनीत बालन आणि त्यांच्या सौभाग्यवती जान्हवी या नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी रित्या सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. सतिश ननवरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेऊन ही मॅरेथॉन यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून विविध खेळाना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करत आहोत. बारामती पॉवर मॅरोथॉन स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि निटनेटके असे होते. या स्पर्धेत हजारो नागरिक-तरुण भल्या पहाटे उपस्थित राहून सहभागी झाले. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

मॅरोथॉन स्पर्धेतील विजेते
ही मॅरोथॉन तीन गटात झाली. ४५ किमी, २१ किमी, १० किमी, या रनिंग कॅटेगरी मधील , प्रथम तीन विजेते आणि मॅरेथॉन मध्ये सहभागी टॉप ५ क्लब्स आणि स्कुल रन मध्ये जास्तीत जास्त संख्येने स्पर्धक देणाऱ्या टॉप ०३ स्कुलला सुद्धा रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये ४२ किमी पुरुष (प्रथम -लते चांदेव , द्वितीय – गायकवाड दयाराम , तृतीय – पंकज सिंग ) ४२ किमी स्त्री (प्रथम -मनीषा जोशी , द्वितीय – उर्मिला बने , तृतीय – सिंधू उमेश) २१ किमी पुरुष (प्रथम -धोंडिबा गिरदवा , द्वितीय – आबासाहेब राऊत , तृतीय -डॉ.मयूर फरांदे ) २१ किमी स्त्री (प्रथम -शीतल तांबे , द्वितीय – शिवानी चौरसिया , तृतीय – स्मिता शिंदे ) १० किमी पुरुष (प्रथम -अमूल अमुने , द्वितीय -सुजल सावंत , तृतीय – आर्यन पवार ) १० किमी स्त्री (प्रथम -आरती बाबर , द्वितीय – सोनाली मटने , तृतीय -रोशनी निषाद )

‘पीडी’ ग्राहकांच्या वीजबिल थकबाकीमुक्ती ‘अभय’ योजनेला उरले आता १४ दिवस

पुणे विभागात आतापर्यंत २३ हजार ७७९ वीजग्राहक सहभागी

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२४: वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित (पर्मनंट डिस्कनेक्टेड) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ १४ दिवस उरले असून आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागातील २३ हजार ७७९ लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकीत वीजबिलांमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरु केली आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित लघु व उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. महावितरण अभय योजनेची मुदत येत्या दि. ३१ डिसेंबरला संपणार आहे. 

अभय योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभागात आतापर्यंत सहभागी २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात ८६२६ ग्राहकांनी १८ कोटी ७६ लाख, सातारा जिल्ह्यात ९९४ ग्राहकांनी १ कोटी ५१ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३३२८ ग्राहकांनी २ कोटी ८८ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ४०४३ ग्राहकांनी ४ कोटी ७४ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ३५५५ ग्राहकांनी २ कोटी ३१ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, पण त्या जागेवर वीजबिलांची थकबाकी राहणार असल्यामुळे या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी आहे. त्यामुळेच सध्या विजेची गरज नसतानाही ११ हजार ६५७ ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे तर ७९२० ग्राहकांनी पुनर्विजजोडणी आणि ४२०२ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या इतरही ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.