Home Blog Page 717

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला २ लाखांचा टप्पा

राज्यात पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक ४० टक्के प्रतिसाद

पुणे, दि. २७ डिसेंबर २०२४: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे प्रादेशिक विभागातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये तब्बल दोन लाखांचा टप्पा गाठला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ११३ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. तसेच ‘गो-ग्रीन’ योजनेमुळे या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागात मिळाला असून राज्यात महावितरणच्या १६ परिमंडलांमध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलामध्ये १ लाख ३४ हजार वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.

पर्यावरणात दिवसेंदिवस प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज झाली आहे. पुणे प्रादेशिक विभागातील वीजग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे. ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन ऑनलाइनद्वारे त्वरित वीज बिल भरणा करणे आणखी शक्य झाले आहे. लघुदाब वीजग्राहकांनी कागदी बिलांचा वापर बंद करून ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर सातारा जिल्ह्यातील १३ हजार १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेतून कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ मधील ग्राहकांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. त्याची गरजेनुसार केव्हाही प्रिंट काढता येईल. सोबतच वेबसाईटवर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in वेबसाईट येथे सुविधा उपलब्ध आहे.

दाऊदी बोहरा समाजानं घेतला मोठा निर्णय- 15 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी

पुणे : सध्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलं ही मोबाईलचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. जेवण करताना मोबाईल, घरी असताना मोबाईल, तसंच झोपताना देखील मोबाईलचा वापर होतो. मोबाईल स्क्रीनचा वापर अधिक होत असल्यानं लहान मुलांवर याचा मोठा परिणाम होत आहे. हीच बाब लक्षात घेत दाऊदी बोहरा समाजानं मोठा निर्णय घेतला आहे. या समाजानं घातली आहे. या निर्णयाचं समजाकडून स्वागत करण्यात येत असून हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं बोललं जातय.

लहान मुलांना मोबाईल बंदी : जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या देशात शहरात दाऊदी बोहरा समाज हा आपल्याला पाहायला मिळतो. या समाजाची ओळख म्हणजे या समाजाचे लोक व्यवसाय करतात. अतिशय जागृत आणि एकमेकांना मदत करणारा, अशी या समाजाची ओळख आहे. या समाजाचे धर्मगुरू सय्यदना यांनी मुंबई येथे झालेल्या व्याख्यानात समाजातील लहान मुलांना मोबाईल बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाईल न वापरण्याबाबत जनजागृती : याबाबत दाऊदी बोहरा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते युसुफ डांबरवाले म्हणाले, “सध्या लहान मुलांमध्ये मोबाईल स्क्रीन बाबतचा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त आमच्या समजापुरता मर्यादित नाही. आजकाल प्रत्येकाच्या घरात ही समस्या निर्माण झाली आहे. लहान मुलं सध्या मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत असतात. मुलं रडली किंवा जेवत नसली की त्यांना पालकही मोबाईल देतात. हीच बाब लक्षात घेत धर्मगुरू सय्यदना यांनी प्रवचनात 15 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाचं आम्ही सर्वजण पालन करत आहोत. तसंच ठिकठिकाणी जाऊन मुलांमध्ये मोबाईल न वापरण्याबाबत जनजागृती करत आहोत.”

हा क्रांतिकारी निर्णय : यावेळी याच समाजाचे मुर्तुझा मॅनेजर म्हणाले, “जेव्हा आमच्या सय्यदना यांनी हा निर्णय घेतला तेव्हापासूनच आम्ही याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. आमच्यात धर्मगुरू सय्यदना जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असतो. आता त्यांचा हा निर्णय लहान मुले देखील मान्य करत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी मुलं मोबाईल वापरत नाहीत. हा क्रांतिकारी निर्णय असून मी तर सर्वांना आवाहन करेन की, याची अंमलबजावणी सर्वांनी करावी.”

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला सुरुवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पुणे केंद्रात बाजी मारणाऱ्या म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‌‘बस नं. 1532‌’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीला आज (दि. 27) सुरुवात झाली.
महाअंतिम फेरीत पाच विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळच्या सत्रात म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणेच्या ‌‘बस नं. 1532‌’चे आणि न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या ‌‘देखावा‌’ या एकांकिकांचे सादरीकरण झाले. तर सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन), संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (रंगवास्तू) यांचे सादरीकरण झाले.

दि. 28 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी 9 वाजता
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (यात्रा)
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी (होळयो नागरा)
सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड (समाप्त)
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पिंडग्रान)

वेळ : सायंकाळी 4 वाजता
शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर (कलम 375)
आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख (हिरो नंबर 1)
राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर (व्हाय नॉट?)
सरस्वती भुवन आर्टस्‌‍ ॲण्ड कॉमर्स कॉलेज, छत्रपती संभाजीनगर (शहाजी)
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (तमसो मा ज्योतिर्गमय)

दि. 29 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी 9 वाजता
देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर (फाटा)
म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस (सखा)
प्रादर्शिक कला विभाग -1 (सं. गा. बा. अ. वि.), अमरावती (उत्खनन)
विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी)

अध्यापनात वैविध्यता आणण्यासाठी ‌‘आनंद पेरीत जाताना‌’ ललित लेखसंग्रह ठरेल वस्तुपाठ : प्रा. रवींद्र कोठावदे

दयानंद घोटकर लिखित ‌‘आनंद पेरीत जाताना‌’ ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन

पुणे : अध्यापनातील तोच-तोपणा टाळत वैविध्यता आणून ते अधिक प्रभावी कसे करता येईल याचा वस्तुपाठ ‌‘आनंद पेरीत जाताना‌’ या ललित लेखसंग्रहातून शिक्षकांना नक्कीच मिळेल. आपले चुकते कुठे, नेमके काय करावे आणि करू नये हे सुद्धा यातून कळेल, असे प्रतिपादन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले.
दयानंद घोटकर लिखित ‌‘आनंद पेरीत जाताना‌’ या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अभिनव विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. कोठावदे बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापीका वंदना अणेकर यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षिका नयना सावंत मंचावर होत्या.
प्रा. कोठावदे पुढे म्हणाले, वास्तव स्वीकारून आपल्या पाल्याची जडणघडण कशी करावी याचे मार्गदर्शनही या ललित लेखसंग्रहातून होण्यास मदत होणार आहे. ललित लेखनाचा आधार घेऊन प्रहसनाद्वारे विषयांची मांडणीही चांगल्याप्रकारे होऊ शकेल.
मुख्याध्यापिका वंदना अणेकर म्हणाल्या, शाळेचे माजी शिक्षक असलेल्या घोटकर यांनी पुस्तक प्रकाशनाचा मान शाळेला दिला ही आनंदाची बाब आहे. या पुस्तकाचे वाचन विद्यार्थ्यांसह पालकांनीही करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
दयानंद घोटकर म्हणाले, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात वावरत असताना खूप काही शिकायला मिळाले. त्यातील काही अनुभवांमधून निवडक प्रसंग छोट्या-छोट्या ललित लेखांमधून मांडले आहेत. यातीलकाही लेख हलके-फुलके तर काही वैचारिक स्वरूपाचे आहेत. यात मातृभाषा, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाचा सन्मान तसेच प्रार्थना, छंद, शिक्षा याविषयांवरही लेखन केले आहे. शिक्षकांसह पालकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती जोशी यांनी केले. दिलीपराज प्रकाशनने पुस्तक निर्मिती केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार.

बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आदिवासी महोत्सव

आदिवासी उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड आयोजित धानोरी येथे शोभायात्रा

पिंपरी, पुणे (दि.२७ डिसेंबर २०२४) क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी उत्सव समिती पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि.२९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता, धानोरी पुणे येथील चैतन्य गगनगिरी कार्यालय येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता धानोरी येथील आदिवासी भीमाशंकर तरुण मित्र मंडळ, मुंजाबा वस्ती येथून चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजन समिती सदस्य विठ्ठल कोथेरे, पांडुरंग ढेंगळे, पांडुरंग तळपे, माजी नगरसेविका आशाताई सुपे, उषाताई मुंढे तसेच दीपक साबळे, निवृत्ती शेळकंदे, दत्तात्रय कोकाटे, गौरी लांघी, प्रतीक्षा जोशी, आनंद भवारी, ढवळा ढेंगळे, सतीश लेंभे, रूपाली डगळे, दीपक विरणक, संजय मांडवे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या सांस्कृतिक महोत्सवात आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड शहर सह समस्त आदिवासी समाज संघटना पुणे, सर्व आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
या शोभायात्रेचे उद्घाटन सीताताई किरवे यांच्या हस्ते आणि राजीव नंदकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्ष स्थानी विठ्ठल कोथेरे हे असणार आहेत.
यावेळी श्रीकांत कोळप, श्रीनिवास दांगट, मुकेश कोळप, आशादेवी दुरगुडे, हरी मोहन मीना साहेब, डॉ. पुनाजी गांडाळ, शकुंतलाताई धराडे, भाऊसाहेब सुपे, मारुती सांगडे, देवराम लांडे, रोहिणी चिमटे, संगीता केंगले आधी प्रमुख पाहुणे उपस्थिती राहणार आहेत. तसेच डॉ. संजय दाभाडे, डॉ. अमोल वाघमारे, डॉ. निर्मला झांजरे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या महोत्सवामध्ये भीमाशंकर आदिवासी तरुण मंडळ धानोरी, सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ धानोरी, सह्याद्री आदिवासी महिला प्रतिष्ठान पिंपळे गुरव, आदिवासी समाज कृती समिती पुणे, महाराष्ट्र आदिवासी सेवा संघ दिघी पुणे, भारत माता मित्र मंडळ दिघी, आदिवासी महासंघ पुणे, पिंपरी चिंचवड मनपा अनुजमाती शिक्षक कर्मचारी संघटना, सह्याद्री आदिवासी विकास व प्रबोधन संस्था पिंपळे गुरव, पीएमपीएमएल आदिवासी कर्मचारी संघटना पुणे, मागासवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पुणे, डॉ. एस. एम. सुपे मेमोरियल फाउंडेशन, सह्याद्री आदिवासी ठाकूर ठाकर उन्नती मंडळ महाराष्ट्र, सह्याद्री आदिवासी नोकरवर्ग ठाकूर ठाकर, सह्याद्री आदिवासी कोळी महादेव समाज संस्था महाराष्ट्र राज्य, आदिवासी गौंड समाज मंडळ पुणे, कोकणा कोकणी आदिवासी समाज सेवा संघ पुणे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन पुणे, ट्रायबल डॉक्टर फोरम महाराष्ट्र, ट्रायबल इंजिनियर फोरम महाराष्ट्र, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र, हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी संघटना पुणे, वीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना पुणे विद्यापीठ, एसटी कामगार संघटना दापोडी, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र, पुणे मनपा अनु जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, आदीम यंग ग्लॅडीएटर्स महाराष्ट्र, आदी शिवशक्ती युवक प्रतिष्ठान बोपखेल पुणे, ५१२ कमांड पतसंस्था खडकी पुणे, नवजीवन आदिवासी संस्था बोपखेल पुणे, आदिवासी सामाजिक विकास संस्था पुणे, बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा महाराष्ट्र पुणे, आदिवासी सेवा मंडळ पुणे, पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, भीमाशंकर मित्र मंडळ गणेश नगर बोपखेल, संगम मित्र मंडळ किवळे, आदिवासी सेवा प्रतिष्ठान पुणे, आदिवासी युवा मंच हडपसर, बिरसा क्रांती दल पुणे, उत्कर्ष संस्था महाराष्ट्र, पुणे शहर आदिवासी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आदी संस्था सहभागी होणार आहेत.
यामध्ये पालघर येथील कलापथक आदिवासी नृत्य सादर करणार आहे. तर तेजुर येथील कलापथक डांगी नृत्य, धानोरी येथील आदिवासी महिला पथक आदिवासी नृत्य सादर करतील आणि पालघर येथील विक्रम कवटे गायन सादर करणार आहेत. या महोत्सवात सर्व आदिवासी बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हडपसरमध्ये नशेच्या ड्रग्जची इंजेक्शन्स विकणाऱ्या अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुरला पकडले

पुणे-हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंन्जेक्शनची बेकायदेशिरपणे विक्री करणा-या महिलेस पकडून हडपसर पोलीस तपास पथकाकडून अंदाजे १लाख रुपये किंमतीच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) च्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.बिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर वय २६ वर्षे रा. माळवाडी हडपसर असे या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’मागील काही महिन्यांपासून हडपसर परिसरातील अल्पवयीन मुले मॅफेनटरमाइनचे इन्जेक्शन घेवून नशापाणी करून गुन्हेगारीकडे वळत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी या बाबत सक्त कारवाई करणेबाबत तपास पथकास सुचना दिल्या होत्या.
दिनांक २६/१२/२०२४ रोजी तपासपथक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना प्राप्त गुप्त बातमी वरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक,. संतोष पांढरे, यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक, अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, आणि तपासपथक अंमलदार सुशील लोणकर, प्रशांत दुधाळ, निखील पवार, कुंडलीक केसकर, निलेश किरवे, गायत्री पवार यांचे सह मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने छापा कारवाई करून संशयीत महिला अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर वय २६ वर्षे रा. माळवाडी हडपसर पुणे हिस ताब्यात घेवुन तिच्याकडून एकूण १६० MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. त्याबाबत तिचेकडे विचारणा केली असता, ती सदरचे औषध हे नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ४००/- ते ५००/- रुपयाला विक्री करत असल्याचे सांगितले.
आरोपी महिला अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर, हिचेकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणा-या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होवु शकते हे माहित असताना सुध्दा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता आपले कब्जात घेवुन मिळून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१९४१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२७५, २७८,१२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपीकडे केले कौशल्यपुर्ण तपासात तिचेकडून MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या एकूण १६० बॉटल्स या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची बाजार भावानुसार अंदाजे किंमत १,००,०००/- इतकी आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. श्री. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, संतोष पांढरे, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे) श्री. अमर काळंगे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक

कात्रज नवले ब्रिजच्या शेजारी, हॉटेल राजवीर समोर मॅकडोल्ड नं.१ च्या नावाने गोव्याची दारू असलेल्या बाटल्यांचा साठा पकडला

अशोक घार्गे आणि गणेश पवारला कोठडी

पुणे- पुण्याच्या कात्रज देहूरोड मार्गावरील कोंढवा ते सोमाटणे चौकापर्यंत च्या हॉटेलात विविध ब्रांडच्या नावाने गोव्याची दारू विकली जात असल्याचा गवगवा होऊ लागला आहे या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाने आज केलेल्या कारवाईत कात्रज नवले ब्रिजच्या शेजारी, हॉटेल राजवीर समोर मॅकडोल्ड नं.१ च्या नावाने गोव्याची दारू असलेल्या बाटल्यांचा साठा पकडला आणि कात्रज मधील रहिवासी असलेल्या अशोक घार्गे आणि गणेश पवारला पकडले न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

या प्रकरणी अशी माहिती देण्यात आली कि,’ राज्य् उत्पादन शुल्क् विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त् सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत ,उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीच्या अनुषंगाने, निरीक्षक, राज्य् उत्पादन शुल्क्, सासवड विभाग, पुणे या पथकाने दि.२५/१२/२०२४ रोजी फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मदयावर धडक कारवाई केली. गोवा राज्य् निर्मित मदद्याची अवैध रित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य् उत्पादन शुल्क् सासवड विभाग, पुणे या पथकाने मोहिम राबवुन, मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार दि.२५/१२/२०२४ रोजी कात्रज नवले ब्रिजच्या शेजारी, हॉटेल राजवीर समोर, पुणे येथे संशयित दुचाकी वहान निळया रंगाची इलेक्टीक बजाज चेतक वाहन क्र.MH १२ VM १३७४ हे दुचाकी थांबवुन वाहन चालकांकडे असणाऱ्या गोणी बॅगमध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता, वाहन चालक यांनी संशयितरित्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजुस घेवुन तपासणी केली असता, गोणी बॅगमध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले मॅकडोल्ड नं.१ व्हिस्की च्या ७५० मि.ली क्षमतेच्या १३ सिलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर घटनेबाबत गुन्हा नोंद करून आरोपीत इसम रविद्र अशोक घारगे व गणेश दत्तात्रय पवार रा. कात्रज या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आरोपींची २९ डिसेंबर २०२४ पर्यंत तपासकामी एक्साईज कस्टडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास केला असता गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विविध ब्रांडचे विदेशी मद्याचे ७५० मि.ली क्षमतेचे १२ बॉक्स जप्त करण्यात आले. या वाहनासहित गाडीमध्ये प्रो. गुन्हयाचा एकुण ३,२९,२४५/- रु. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. तसेच सदरचा मदयसाठा विक्री करण्याचे उददेशाने वाहतुक करुन आणल्याचे आरोपींच्या तपासातुन स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, १०३ व १०८ अन्वये सासवड विभागाने गुन्हा रजि नं. ३३६/२०२४ दि २५/१२/२०२४ नुसार गुन्हा नोंद करुन विदेशी मदयाचा एकुण १,२४,२४५/- मुददेमालासह एक दुचाकी तसेच दोन मोबाईल असा एकुण ३,२९,२४५/- रु. किंमतीचा मुददेमाल जप्त केला. सदर कारवाईत निरीक्षक .एस.एस. बरगे, दुय्यम निरीक्षक एस.सी. शिंदे, पी.एम.मोहिते तसेच स.दु.नि.संदिप मांडवेकर, जवान दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे, आर.एम. कोळपे, सुनील कुदळे, बाळू आढाव, यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास एस.सी. शिंदे दुय्यम निरीक्षक राज्य् उत्पादन शुल्क् सासवड विभाग, बीट क्र. ०३ पुणे हे करीत आहेत. असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले पुढील तपास चालू आहे.

३०० सफाई कर्मचाऱ्यांसमवेत बापूसाहेब पठारे यांनी राबवली स्वच्छता मोहीम

विमाननगर: वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विमानगर येथे काल (ता. २७) ३०० सफाई कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगितले जाते.

या मोहिमेंतर्गत, विमाननगर भागातील विविध रस्त्यांची, फुटपाथ तसेच गटार इ. स्वच्छता करण्यात आली. तसेच, स्वच्छतेविषयी जनजागृतीदेखील केली. “एक लोकप्रतिनिधी व नागरिक म्हणून आपला परिसर, आपला मतदारसंघ, आपले शहर स्वच्छ ठेवणे कर्तव्य समजतो. महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा अनेक थोरांनी स्वच्छतेचे महत्त्व आपल्या कार्यातून, विचारांतून आपल्यासमोर मांडले आहेत. त्याच मार्गावर चालत स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊयात व येणाऱ्या काळात विविध मोहिमा राबवून आपले शहर स्वच्छ व सुंदर करूयात, असा संकल्प या मोहिमेत बापूसाहेब पठारे यांनी केला.

स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने युवा नेतृत्व सुरेंद्र पठारे तसेच महापालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक मुकुंद घम, समीर खुळे, सचिन गवळी, विनायक भोरडे, संदेश रोडे, राजेश आहेर, हनुमंत साळवी, सुषमा मुंडे उपस्थित होते.

मोहिमतील सफाई कर्मचाऱ्यांचे पठारे यांनी आभार मानले. यावेळी त्यांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. “येणाऱ्या काळात बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून मतदारसंघात स्वच्छतेच्या दृष्टीने अशाच पद्धतीच्या विविध मोहिमा, उपक्रम राबवण्यात येतील,” असा विश्वास सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.

नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी 

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेची मागणी ; परिषदेचे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी, परिषदेचे १५ विभाग असून त्याअंतर्गत युवा, महिला शिबीरांचे नियोजन व्हावे, दैवज्ञ समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होईल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे ठराव अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे पुण्यातील सभेत करण्यात आले.

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. समारोप प्रसंगी समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ.आनंद पेडणेकर, समाजश्रेष्ठी उदयराव गडकरी , चंद्रशेखर दाभोळकर, साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके आदी उपस्थित होते.

श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले होते. कमिटीचे सरपंच व स्वागताध्यक्ष अजय कारेकर, चिटणीस अरुण गडकरी, खजिनदार संजय चाचड, विश्वस्त नंदकुमार पेडणेकर, रत्नाकर काकतिकर यांनी संमेलनात आयोजनाकरिता विशेष परिश्रम घेतले.

समारोप सभेत विविध ठराव मांडून त्यावर चर्चा झाली. युवा, महिला विभाग आणि देशभरातील पतपेढी सक्षम करण्यासाठी पावले उचलली जातील. तळागाळातील समाज बांधव कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी समर्थ असला पाहिजे, याकडे लक्ष देऊन त्या दिशेने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील आणि सामाजिक बांधिलकी जपली जाईल, असा निर्धार उपस्थित ज्ञाती बंधू भगिनींनी महा सोहळ्याच्या सांगता समारंभात केला.

साहित्य संमेलनात समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी यांची ग्रंथ तुला करून विविध लेखकांची पुस्तके उपस्थितांना भेट देण्यात आली. विविध विषयांवर सत्रे, व्याख्याने, मार्गदर्शन असे अनेक कार्यक्रम यानिमित्ताने पार पडले.

सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर

0

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत डिसेंबरमध्ये दररोज सरासरी ८४४ शेतकऱ्यांना लाभ

मुंबई, दिनांक २७ डिसेंबर २०२४ – शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घ काळाचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

राज्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात दि. २६ पर्यंत २१,९५१ सौर कृषी पंप बसविण्यात आले, अर्थात दररोज सरासरी ८४४ पंप बसविण्यात आले. ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे.

राज्यात २०१५ पासून २०२३ पर्यंत विविध योजनेत १,८०,००० सौर पंप बसविण्यात आले होते. तथापि, या वर्षी मार्च २०२४ पासून आतापर्यंत फक्त आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात १,५८,००० सौर पंप बसविण्यात आले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला आहे.  

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे.

सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते.

बनावट दारू प्रकरणी छापा ६ जण पकडून ३१ लाखाचा ऐवज जप्त

पुणे- निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे या कार्यालयाने अहिल्यानगर जिल्हयात अवैध गोवा बनावटी विदेशी मद्याच्या वाहतुकीवर धडक कारवाई करून श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर ६ जणांना पकडून त्यांच्या कडून बनावट दारूच्या बाटल्यांसह एकूण ३१ लाखाचा ऐवज जप्त केला . या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. श्री. विजय सुर्यवंशी, सह आयुक्त प्रसाद सुर्वे (अं.व.द.)मुंबई व विभागीय उप आयुक्त सागर धोमकर ,यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे पथक अहिल्यानगर जिल्हयातील जामखेड हददीत अवैध दारु वाहतुक व विक्रीच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मिळालेल्या खात्रीलायक बातमीच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्हयातील जामखेड तालुक्यामधील अरणगाव गावचे हददीतील श्रीगोंदा जामखेड रोड वरील एच. पी. पोट्रोल पंपाजवळ पाळत ठेवली व सदर ठिकाणी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ चारचाकी वाहन व मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायनर वाहन येऊन महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ चारचाकी वाहनामधील गोवा बनावटीच्या मद्य मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायर वाहनामध्ये भरत असताना छापा मारुन गोवा बनावटीच्या अॅडीरियल व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या एकुण ३२४ सिलबंद बाटल्या (२७ बॉक्स) व वरील दोन वाहनासह अं. रु. १६,७२,७२०/- किंमतीचा मुददेमाल जप्त करुन चार इसमांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हयाच्या पुढील तपासामध्ये लोणारवाडी गावचे हददीत, भैरवनाथ मंदिराजवळ, ता. परांडा जि. धाराशिव या ठिकाणी छापा मारुन अशोक लेलॅण्ड कंपनीचा दोस्त चारचाकी वाहन क्र. एमएच ४५/ टी २२४७ व मारुती सुझुकी कंपनीची स्विफट डिझायर क्र. एमएच ०३ / एफ २७०५ सह अॅडरीयल व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या २१६ सिलबंद बाटल्या १८ बॉक्स असा अंदाजे रु. १४,५०,४८०/- किंमतीचा मुददेमाल रिकव्हरी पंचनाम्याखाली जप्त करुन दोन इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयामध्ये आतापर्यत रु. ३१,२३,२००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
सदर प्रकरणी १) दिपक आत्माराम खेडकर वय ४६ रा. रसाळनगर पोस्ट कार्यालयाशेजारी ता. जामखेड जि. अहिल्यानगर २) भरत शहाजी राळेभात वय ३५ वर्षे रा. राळेभातवस्ती, ता. जामखेड जि. अहिल्यानगर ३) मनोज दत्तात्रय रायपल्ली वय ४९ वर्षे रा. अतिथी कॉलनी बोरावके कॉलेज पाठीमागे ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, ४) दत्तात्रय गंगाधर सोनवणे वय ३२ वर्षे रा. मुठेवडगाव तुळशीराम महाराज मंदिरासमोर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, ५) शस्त्रगुण ऊर्फ शतृघ्न नवनाथ किर्दक वय ३७ वर्षे रा. लोणारवाडी पो. शेळगाव ता. परांडा जि. धाराशिव, ६) कैलास आण्णा जोगदंड वय ३४ वर्षे रा. लोणारवाडी पो. शेळगाव ता. परांडा जि. धाराशिव यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ अ, ई, ८१,८३,९० व १०८ अन्वये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विभागीय उप आयुक्त श्रीसागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने व धीरज सस्ते तसेच जवान प्रताप कदम, सतिश पोंधे, रणजीत चव्हाण, शशीकांत भाट, अनिल थोरात, अमोल दळवी व राहुल तारळकर यांनी केली असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक श्री. नरेंद्र थोरात हे करीत आहेत.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

पुणे, दि. २७ : पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असतात. अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे-अहिल्यानगर महामार्ग क्र.६० वर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५ वा. पासून ते १ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाचे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.

याअंतर्गत चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील.

पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्ग अशी वळविण्यात येतील. तसेच सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.

मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जातील. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने ३० डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल

पुणे, दि. २७: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी व इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा- मोरगाव- सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे. पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक बेलसर- कोथळे- नाझरे- सुपे- मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात येत आहे.

सुपा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध ३० डिसेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000

‘आपल्या नादी लागल्यास लै महागात पडेल’सुरेश धस यांचा अमोल मिटकरी यांना इशारा; मिटकरी यांचाही पलटवार

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या मुद्यावरून आता महायुतीमधील घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंबंधी मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली. त्यानंतर धस यांनी त्यांना ‘आपल्या नादी लागल्यास लै महागात पडेल’ असा धमकीवजा इशारा दिला. आता मिटकरी यांनी त्यांच्या या धमकीला गांभिर्याने घेत पोलिसांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे संतापलेल्या धस यांनी त्यांना आपल्या नादी न लागल्याचा इशारा दिला आहे. ‘अमोल मिटकरी फार लहान आहे. माझी त्याला एकदा विनंती आहे की, अमोल तू कोणाच्याही नादी लाग, पण या रगेलाच्या नादी लागू नको. तुला लै महागात पडेन. मी एकदा आता त्याचे ऐकून घेतो. वडीलकीच्या नात्याने त्याला एकदा समज देतो. तुझे कुणीकडेही दुकान चालव, पण माझ्याकडे दुकान चालवू नको’, असा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.

सुरेश धस यांच्या या इशाऱ्यानंतर अमोल मिटकरी यांनी पुन्हा त्यांच्यावर पलटवार केला. ‘आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे. महागात पडेल म्हणजे काय? यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,’ अशी मागणी मिटकरी यांनी एका ट्विटद्वारे केली. मिटकरी यांच्या प्रत्युत्तरामुळे या दोन्ही आमदारांतील कलगीतुरा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

अमोल मिटकरी म्हणाले होते की, केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचे पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत.संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादाना टार्गेट करने सुरु केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे ही धनंजय मुंडे यांची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

भाजप आमदाराने धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतली, अमोल मिटकरींचा आरोप

0

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून आता सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत खटके उडण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेत. त्याच मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. बीडमधील सर्वच आमदारांनी यासंबंधी वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी केली आहे. यात भाजप आमदार सुरेश धस यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी धस यांच्यावर धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही निशाणा साधला.अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचे पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत.

संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादाना टार्गेट करने सुरु केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे ही धनंजय मुंडे यांची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.