Home Blog Page 670

बदलापूर अत्याचार प्रकरण:शाळेचे फरार ट्रस्टी तुषार आपटे, उदय कोतवाल दीड महिन्यानंतर अटकेत

बदलापूर चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार प्रकरण तापल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते.आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरांगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरेही ओढले होते. अखेर या दोन्ही आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतले आहे. दोघांनाही आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे. बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पुढील चौकशीसाठी एसआयटी टीमकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.या दोघांना राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप केले गेले होते. शाळेत घडलेला प्रकार पोलिसांना न कळवणे, पुरावे नष्ट करणे असे या दोघांवर आरोप होते. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास सव्वा महिना हे दोघे फरार होते. सहआरोपी भाजपशी संबंधित असल्याचा विरोधक आरोप करत होते. तर मुख्य आरोपी शिंदे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. शिंदे हा पोलिस चकमकीत मारला गेला. तरीही कोतवाल व आपटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना याच प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपींना वाचवले जात असून पोलिसांकडून संस्थाचलकांना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला आहे. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावे देखील नष्ट केले असल्याचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलांनी देखील पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. शाळेमध्ये घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनाने पोहोचवली नाही तसेच सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आलेले नाहीत. तसेच पोलिसांनी अद्याप फरार शाळा व्यवस्थापनातील आरोपींना पकलडे नाही, असा आरोप वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे.

लेबनॉनमध्ये 2 किमीपर्यंत आत घुसले इस्रायली सैनिक, हिजबुल्लाहशी चकमक

लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या भू-युद्धात बुधवारी (2 ऑक्टोबर) इस्त्रायली सैन्य मरून अल-रस गावाच्या 2 किमीच्या आत पोहोचले. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली सैनिकांची येथे हिजबुल्लाहच्या सैनिकांशी चकमकही झाली होती.

समोरासमोर झालेल्या या लढाईत आतापर्यंत 2 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण जखमी झाले आहेत. इस्रायलचा पेजर हल्ला, वॉकी-टॉकी हल्ला आणि हवाई हल्ल्यानंतर आता हिजबुल्लाहच्या विरोधात जमीनीवरील कारवाई आहे.

इस्रायल लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, गाझामध्ये हमास, इराण आणि येमेनमध्ये हुथीशी लढत आहे. मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर 180 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) सांगितले की हा हल्ला मोसाद मुख्यालय, नेवाटीम एअर बेस आणि टेल नोफ एअर बेसला लक्ष्य करण्यात आला. इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने नष्ट केली.

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला नाही, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

बालेवाडी येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बँड स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे, दिनांक २ : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय बँड स्पर्धा संपन्न झाल्या.

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, उपविभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता संघ प्रिया वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.काठमोरे म्हणाले, शालेय जीवनामध्ये उत्तम नागरिक घडविण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धा आवश्यक आहे. बँड स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सांघिक भावना, राष्ट्रप्रेम आदी भावना वाढीस लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा केल्यास मिळणारे यश शाश्वत असते.

डॉ.आवटे म्हणाल्या, राज्यस्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यापूर्वीच यश संपादन केले आहे. हे कौतुकास्पद आहे. बँड स्पर्धेमधून खिलाडूवृत्ती वाढीस लागते. स्पर्धेमध्ये यश किंवा अपयश हे महत्त्वाचे नसून स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्वतः आनंद घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असते.

डॉ. सावरकर म्हणाल्या, राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघांना मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील विभागांतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्तरावर महाराष्ट्रातील संघानी यश मिळविल्यास राष्ट्रीय स्तरावर विजेते संघांचे सादरीकरण होईल. संघाना शुभेच्छा देवून त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या.

या बँड स्पर्धेमध्ये पाईप बँड व ब्रास बँड या प्रकारामध्ये मुलांच्या गटातून सहा संघानी व मुलींच्या गटातून सहा संघांनी सादरीकरण केले. राज्यस्तरावरील या स्पर्धेमध्ये ३५० विद्यार्थी व २४ शिक्षक सहभागी झाले.

राज्यस्तरीय बँड स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
ब्रास बँड-मुले (प्रथम) – संजीवनी सैनिकी विद्यालय, कोपरगाव. मुली ( प्रथम ) – सेंट एलॉयसिस कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, भुसावळ.
पाईप बँड-मुले (प्रथम)-राजाराम बापू पाटील सैनिकी विद्यालय, इस्लामपूर. मुली (प्रथम)-भोसला सैनिकी विद्यालय, नाशिक.

श्रीनिवास राव रावुरी हे बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून रुजू

पुणे: भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने श्रीनिवास राव रावुरी (मित्र आणि सहयोगींसाठी श्रीनीयांची मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) म्हणून नियुक्ती केली आहेते कंपनीच्या गुंतवणूक संघाचे नेतृत्व करण्यासोबतच गुंतवणुकीच्या कामगिरीला अनुकूल पोर्टफोलिओ करण्यासाठी त्याचे व्यवस्थापन करतीललीडर म्हणून श्रीनिवास जोखीम व्यवस्थापित करतानाच नियामक मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने ग्राहकांसाठी संपत्ती आणि सर्व भागधारकांसाठी नफा निर्माण करण्यासाठी कंपनीच्या मालमत्तेचे वाटप करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

श्रीनिवास हे एक अनुभवी गुंतवणूक व्यावसायिक आहेत, ज्यांना भारतीय वित्तीय बाजारपेठांमध्ये इक्विटी संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा जवळपास तीन दशकांचा अनुभव आहेभारतातील पहिल्या बुटीक इक्विटी रिसर्च फर्ममध्ये विश्लेषक म्हणून सुरुवात करूनत्यांनी रिअल इस्टेटइन्फ्रास्ट्रक्चरइंडस्ट्रियलटेलिकॉम आणि पॉवर यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन दशकांहून अधिक काळ घालविलागुंतवणूक तज्ज्ञ म्हणून श्रीनिवास यांचे इतर कार्य PGIM इंडिया ॲसेट मॅनेजमेंट आणि HDFC ॲसेट मॅनेजमेंट सारख्या संस्थांमध्ये होतेजिथे वाढ आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या संबंधित गुंतवणूक धोरणांना आकार दिलाते पीजीआयएम इंडिया ॲसेट मॅनेजमेंटमधून बजाज अलियान्झ लाइफमध्ये सहभागी झालेजिथे त्यांनी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला उद्योगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपनीमध्ये बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

नियुक्तीबद्दल बोलताना, तरुण चुघबजाज अलियान्झ लाइफचे एमडी आणि सीईओ म्हणाले, “आमच्या परिवर्तनीय प्रवासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर श्रीनिवास आमच्यासोबत आले आहेतआमचे नियामक वातावरण आणि मजबूत भारतीय अर्थव्यवस्था गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना आणखी मूल्य प्रदान करण्यासाठी एकत्र येत आहेतलाइफ इन्शुरन्समध्ये त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी त्यांचा भारतीय वित्तीय बाजारातील व्यापक अनुभव खूप मोलाचा ठरेल, कारण आम्ही आमच्या क्षमता मजबूत करत आहोत.

बजाज अलियान्झ लाइफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल श्रीनिवास म्हणाले, “शिस्तबद्ध गुंतवणूक आणि ऑफरमधील फायद्यांमुळे ग्राहकांना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करण्यासाठी जीवन विमा, आज सर्वात मजबूत आर्थिक साधनांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीसाठी ही एक सुरक्षा आहे. बजाज अलियान्झ लाइफसह ग्राहकांच्या या प्रवासात आता महत्त्वाची भूमिका बजावता येणार असल्याने मी उत्साहित आहे. कंपनीची उत्कृष्टता आणि नवोन्मेषाची प्रतिष्ठा सुस्थापित आहे. अशा चलित आणि केंद्रित संघात सहभागी होण्यास उत्सुक आहे.”

श्रीनिवास हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून, हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहेत्यांना टेनिस आणि घराबाहेर वेळ घालविण्याची आवड आहेत्यांना भारतीय शास्त्रीय संगीतातही रुची आहे.

गोवा खुल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

पुणे: गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील आर. बी. होरांगी अकॅडमी आणि सेंट फेलिक्स स्कुलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. क्योरूगी आणि पुमसे प्रकारात खेळाडूंनी प्रतिभेचे दर्शन घडवत नऊ सुवर्ण, चार रौप्य व १४ कांस्यपदकाची कमाई केली. तसेच सांघिक विजेतेपदही मिळवले. तायक्वांदो स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी केवळ तांत्रिक क्षमताच नाही, तर खेळाप्रती त्यांची अतूट बांधिलकीही दाखवली. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली.
उमैमाह सुफियान अन्सारी (पुमसे-रौप्य), स्तुती विशाल पटारे (पुमसे-कांस्य), सानिधी मिलिंद खांदोडे (पुमसे-कांस्य), हानिका गिरीश पाटील (पुमसे-सुवर्ण), निहारिका दीपक इंदिश (पुमसे-सुवर्ण), जोआना जोशुआ काकडे (पुमसे-कांस्य), दियारा बिजॉय नायर (पुमसे-कांस्य), व्हायोलिना दास (पुमसे-सुवर्ण, क्योरुगी-रौप्य), स्मेरा मोहन लोंढे (पुमसे-रौप्य), मिश्का अभिजित घाटे (पुमसे-कांस्य), कृतिका तुषार कांबळे (पुमसे-कांस्य), झोया रिझवान खान (पुमसे-कांस्य), अपूर्वा अमित मंडल (पुमसे व क्योरुगी-कांस्य), नीती कुलकर्णी (पुमसे-कांस्य, क्योरुगी-सुवर्ण), इरा गायकवाड (पुमसे-कांस्य), तनिषा योगेश मुदलियार (पुमसे-सुवर्ण), नील सारंग धोका (पुमसे-सुवर्ण), स्वराज कुटे (पुमसे-कांस्य), वीर प्रीतम कोठारी (पुमसे-कांस्य), अरविन मनजीत पिलाकुडी (पुमसे व क्योरुगी-सुवर्ण), रिशोना जेरी लुईस (पुमसे-रौप्य), मन्नत सोना (पुमसे-कांस्य), आदिती धनंजय ओव्हाळ (पुमसे-सुवर्ण) यांनी पदकांची कमाई केली.

फिफ्थ डॅन ब्लॅक बेल्ट मास्टर रवींद्र भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले असून, या कामगिरीतून त्यांचे त्यांचे कठोर परिश्रम आणि चिकाटी दिसून येते. आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जंग असोसिएशन संघ व्यवस्थापक गिरीश पाटील आणि सर्व पालकांनी पाठिंबा मुलांना प्रोत्साहित केले. मास्टर रवींद्र भंडारी, सीनियर उर्सुला पिंटो (पुणे प्रांतीय), सीनियर रोझमेरी आल्मेडा (शाळा व्यवस्थापक), सीनियर जेनिफर परेरा (शाळेचे मुख्याध्यापक), पर्यवेक्षक सीनियर एल्सा आणि श्रीमती लीना पॉल यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठामध्ये  ‘भारत-जपान फ्युजन फॅशन शो’

पुणे: येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठात उद्या, मंगळवार, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी बहुप्रतीक्षित भारत-जपान फ्युजन फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतीय आणि जपानी परिधान परंपरेचा संमिश्र प्रदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचा विषय “आपली सांस्कृतीक परंपरा जपा, शान वाढवा” असा ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये पारंपरिक भारतीय साडी आणि जपानी किमोनो यांचा समन्वयाने आधुनिक वेगळेपणा जपणाऱ्या फॅशनेबल कपड्यांचे प्रदर्शन दाखविले जाणार आहे.

पुण्यात अशाप्रकारच्या शोचे एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा आयोजन होत असून त्यातून विद्यार्थ्यांसह नागरिकांना भारतीय-जपानी वस्त्रकलेचा एक वेगळा अविष्कार पाहावयास मिळणार आहे. फॅशन शोमध्ये जपानी डिझायनर काजुको बारिसिक यांनी तयार केलेल्या खास संग्रहाचे सादरीकरण होणार आहे. या संग्रहात पुनर्नवीनीकृत किमोनो कापडांचा भारतीय डिझाइनसोबत असलेला संगम पाहायला मिळेल. याशिवाय, भारत-जपान संबंध तज्ञ टोमियो इसोगाई हे जपानमधील करिअर संधींबाबत मास्टरक्लास आयोजित करतील. या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव मिळणार आहे.

700 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारली  महात्मा गांधींची भव्य प्रतिमा

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार  ब्युरो-गोवा ने 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छ भारत दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला . आज पेडणे(पेरनेम) येथील व्हिस्काउंट ऑफ पेरनेम हायस्कूल, येथे सुमारे 700 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महात्मा गांधींची भव्य प्रतिमा साकार  केली.

‘संपूर्ण सरकार’ दृष्टीकोना अंतर्गत, स्वच्छता ‘प्रत्येकाची सवय’ बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त  व्हिस्काउंट शाळेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कला शिक्षक राजमोहन शेट्ये यांच्याकडे  पाच दिवस प्रशिक्षण घेतले होते. महात्मा गांधींची भव्य प्रतिमा साकारण्याच्या  संपूर्ण प्रक्रियेचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यात आले.

त्यानंतर, शाळेतील एका कार्यक्रमात बोलताना, शिक्षणतज्ज्ञ रुपा देशप्रभू म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे आणि अशा प्रकारे स्वच्छ भारत मोहिमेला एक व्यापक चळवळ बनवणे  महत्त्वाचे आहे. एक उत्कृष्ट राजकारणी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज जयंती असून त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थितांना संबोधित करताना, रियास बाबू, क्षेत्रीय  प्रचार अधिकारी, सीबीसी गोवा , म्हणाले की स्वच्छ भारत अभियान केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरते मर्यादित नाही. “नेचर मासिकाने या अभियानाच्या  प्रयत्नांची प्रशंसा केली आहे, त्यांनी अंदाज वर्तवला आहे की यामुळे दरवर्षी 60,000-70,000 बालमृत्यू टाळण्यात मदत झाली आहे . त्याचप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या 2018 च्या अहवालात  अंदाज वर्तवला आहे की या अभियानामुळे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये अतिसारामुळे होणारे 3 लाखांहून अधिक  मृत्यू रोखले गेले. त्यामुळे, हे अभियान जीव वाचवणे, आरोग्यदायी वातावरण आणि वंचितांना सन्मान प्रदान करणे याबद्दल आहे. ,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वच्छता संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथही घेतली. व्हिस्काउंट शाळेचे मुख्याध्यापक  राजेंद्र बोंद्रे, इतर शिक्षक कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि सीबीसीचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा एक भाग म्हणून, सीबीसी ने स्वच्छता मोहीम आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एक पेड माँ के नाम कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमही राबवण्यात आली. जनतेमध्ये स्वच्छतेप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उपक्रमांचा भाग म्हणून सीबीसी ने पणजीत आणि आसपासच्या परिसरात  स्वच्छता अभियानसंबंधी फलक देखील  लावले आहेत.

पैसे घेऊन चुकीची जमीन मोजणी करणाऱ्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा

– तक्रारदारासह कोर्टाचीही केली फसवणूक
– कारवाई न झाल्यास तक्रारदार यांचा उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा
– भूमी अभिलेख विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

पुणे : तक्रारदार यांचे त्यांच्या मूळ जागेवर घर बांधलेले असताना त्या जमिनीची शासकीय मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत शेजारी जागा असणाऱ्यांनी संगनमत करून त्यामध्ये परस्पर खोटा बदल केला. घर शेजाऱ्याच्या जागेवर बांधले असल्याचं कागदोपत्री दाखवुन ते कागदपत्रे कोर्टातही सादर केले. घर त्या जागेवरच नसूनही त्या कागदपत्रांवरून कोर्टाने घर पाडण्याचेही आदेशही दिले. याप्रकारे तक्रादार यांची फसवणूक आणि चक्क कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित भूमिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार मुळशी तालुक्यातील राउतवाडी येथे राहणारे अरुण राऊत यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचाही इशारा देखील त्यांनी दिला आहे.

याबाबत तक्रारदार तथा शेतकरी अरुण राऊत यांनी पौड तहसीलदार, पौड पोलीस ठाणे येथे आमरण उपोषण करण्याचा अर्ज केला आहे. अर्जानुसार राऊत यांचे राउतवाडी, लवळे, ता. मुळशी येथे गट नंबर 413 येथे दहा गुंठे जागा आहे. त्याला लागूनच गट नंबर 430 असून  त्याचे मालक शीतल नुपूर लडकत यांच्या सोबत गेली ३७ वर्षा पासून जमिनीवरून वाद सुरु आहे. याबाबत २००६ साली शासकीय मोजणी झाली, ती मोजणी भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी हेमंत निगडे यांनी केली.

त्या मोजणीची क प्रत गटाच्या नकाशा प्रमाणे केली. पण राऊत यांचे घर सीमेवर नसताना सु‌द्धा (गट नंबर 413 व गट नंबर 430) सीमेवरवर घर असल्याचे ड्रॉइंग काढून दाखवले. त्यानंतर राऊत यांनी खात्री करायला २०२१ ला खाजगी मोजणी केली. त्यात त्यांचे घर गट न. ४१३ मध्ये दाखवले व घरा मागे म्हणजे लाईन आणि घरापासून चे अंतर २५ फूट जागा सु‌द्धा दाखवली. त्यानंतरही २०२३ मध्ये दोन्ही गटाच्या सरकारी मोजण्या झाल्या ती मोजणी प्रसाद तरटे आणि अंकुश जाधव यांनी केल्या असता ती पण नकाशाला ग्राह्य न धरता त्यांचे पूर्ण घर गट न. ४३० मध्ये दाखवले.

वास्तविक पाहता राऊत यांचे घर गट क्रमांक 430 पासून दूर असल्याने त्यांनी हे प्रकरण मी सर्व वरिष्ठ अधिका-यान कडे पोहचवले व पौड च्या अधिका-यांना जागेवर आणून दाखवले परंतु ते फक्त मान हलवतात बाकी कुठलाही प्रतिसाद देत नाहीत. जागेबाबत पुरावा म्हणून तसे नकाशे देखील उपलब्ध आहेत. या प्रकरणा सबंधी त्यांनी शासकीय अधिकारी व प्रदिवादी यांच्या विरोधात हे प्रकरण लावून धरले आहे. अमरण उपोषण करणार असल्याने मला व माझ्या कुटुंबाच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे, तरी याबाबत योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाचा मला न्याय मिळवून ‌द्यावा आणि मोजणी अधिकारी, प्रतिवादी व अजून वरून कोणाचा हात असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून मला योग्य न्याय मिळवून ‌द्यावा, अन्यथा मी अमरण उपोषणास बसन्याचा निर्णय घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मोजणी ऑफीस मधिल अधिकारी व त्या वेळी मोजणी करणारे कर्मचारी आणि आमचे प्रतिवादी यांनी संगनमताने विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने मोजणी नकाशामध्ये घर नसताना सुद्‌धा नकाशामध्ये दाखवण्यात आले आहे. भूमिअभिलेख मोजणी अधिकाऱ्यांकडून कडून मोजणी संदर्भात सुनावणी बाबत योग्य तो निर्णय देण्यात टाळाटाळ करण्यात येत असून चुकीचे काम केल्यास संबंधित 3 मोजणी अधिकारी आणि प्रतिवादी याच्यावर यांची चौकशी करून कार्यवाही न झाल्यास मी सहकुटुंब २२ ऑक्टोबर २०२४ रोजी अमरण उपोषणास बसणार आहे, हे सगळ करून पण मला न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन करणार आहे.

– अरुण राऊत, तक्रारदार तथा शेतकरी, राउतवाडी, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे

चांगल्या शिक्षणानेच आर्थिक, सामाजिक स्थिती बदलेल

  • सुनील फुलारी यांचा बांधकाम मजुरांच्या मुलांना सल्ला; ‘बीएआय’र्फे गुणवंत मुलांचा सत्कार

पुणे : “बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती हलाखीची असते. त्यातूनही अनेक पालक मुलांना शिकवण्याची धडपड करतात. त्यामुळे शिक्षणाची संधी मिळालेल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःची व कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. चांगले शिक्षण घेऊन करिअर घडवले, तर आर्थिक व सामाजिक स्थिती बदलेल,” असा सल्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बांधकाम मजुरांच्या मुलांना दिला.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरच्या वतीने बांधकाम मजुरांच्या गुणवंत मुलांच्या सत्कार सोहळ्यात सुनील फुलारी बोलत होते. शनिवार पेठेतील विष्णुकृपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘बीएआय’च्या पश्चिम विभागाचे माजी उपाध्यक्ष रणजित मोरे, ‘बीआयए’ पुणे सेंटरचे चेअरमन सुनील मते, व्हाईस चेअरमन अजय गुजर, मानद सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील, कार्यक्रमाचे समन्वयक करण पवार उपस्थित होते. जवळपास १०० मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सुनील फुलारी म्हणाले, “बांधकाम मजुर व त्यांच्या मुलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. असोसिएशनने त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी. या मुलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. बांधकाम मजुरांप्रती सहानुभूती दाखवायला हवी. मजुरांनी आणि विशेषतः मुला-मुलींनी व्यसनांपासून दूर राहायला हवे. पोलीस भरती, बँक भरती व अन्य क्षेत्रातील करिअरकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. या कामात असोसिएशनने मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी.”

रणजित मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देताना तुम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन स्वतःसह कुटुंबाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे आवाहन केले. बिल्डर्स असोसिएशन बांधकाम मजुरांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी सांगितले.

सुनील मते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अजय गुजर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम हजारे यांनी आभार मानले.

काही प्रवृत्तींकडून गांधींच्या मृत्यूनंतरही गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जातोय -उल्हास पवार

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज शास्त्री पुतळा, दांडेकर पूल ते गोपाळकृष्ण गोखले पुतळा, फर्ग्युसन कॉलेज रोड पर्यंत “महात्मा गांधी विचार दर्शन रॅली” काढण्यात आली. तसेच काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘अनेक देशांनी महात्मा गांधींच्या विचारांना मानले आहे. पण काही प्रवृत्तींकडून गांधींच्या मृत्यूनंतरही गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधींनी मानवता, समता आणि नैतिकता या तीन मूलभूत मूल्यांवर भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. शांततेच्या मार्गाने जनशक्तीचे दर्शन जगाला घडवून दिले. शेवटच्या माणसांचा प्रथम विचार गांधींनी केला. आज विविध मार्गांनी महात्मा गांधी यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, ही मोठी खंत आहे. भारताचे सर्वोच्च नेतेही परदेशात गेल्यावर तुमचे नाव घेऊन तुमच्या पुतळ्याला वंदन करतात, मात्र काही अंधभक्त गांधींच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मूठभर लोकांच्या कृत्यामुळे गांधींजी आपल्याला वेदना होत असतील, आम्ही आपली क्षमा मागतो.’’
यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधी ज्यावेळी ज्यावेळी जे बोलायचे तसेच आचरण करायचे. आपल्या प्रत्येकामध्ये एक महात्मा गांधी आहे आणि तो आपण आचरला पाहिजे. महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात जी आंदोलने केली ती सर्व शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने केली. आज काही मूठभर समाज कठंक धार्मिक जातीय तेढ निर्माण करून देशाचे सार्वभैमत्व आणि अखंडत्वाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी हे आहेत. ‘शब्दांमध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते’, असा विश्वास बाळगणार्‍या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमी सगळ्यांना संगितले. देशातील लोकशाही ही अबाधीत राहिली पाहिजे. जे लोक लोकशाहीला बाधा आणण्याचे काम करीत आहे त्यांना आपण रोखले पाहिजे. जर अशा समाज कंठकांना रोखले नाही तर पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीला मुक्तपणे राहता येणार नाही.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘साम्राज्यवादी ब्रिटीशांनकडून केवळ देशाला स्वातंत्र मिळून दिले नाही तर राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया देखील स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून महात्मा गांधींनी केली. आज जगामध्ये चालू युध्द पाहिल्यानंतर अहिंसेच्या तत्वज्ञानाची किती नितांत गरज आहे हे आपण समजू शकतो.
निरनिराळे लढे असहकार, अहिंसा, सत्याग्रह या तत्वांवर आधारित आपण कसे यशस्वी होवू शकतो हे गांधीच्या जीवनाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येते. या मूल्यांचा आधार घेवून अफ्रिकेतील काही राष्ट्र स्वातंत्र्य मिळवू शकले आहेत. त्यांच्या आचाराचा व विचाराचा प्रचार करण्याची आजही गरज असून तरूण पिढीने त्यातून बोध घेणे गरजेचे आहे.’’
यानंतर नगरसेवक अविनाश बागवे यांनीही आपले महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या विषयी बहुमोल विचार व्‍यक्त केले.
या मिरवणुकीमध्ये महात्मा गांधी – लालबहाद्दूर शास्त्री, महात्मा गांधी – कस्तुरबा गांधी, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह, चले जाव चळवळ, पुणे करार आदी विषयांवर चित्ररथ तयार केले होते. या यात्रेमध्ये शारदा विद्यालय (इंग्रजी माध्यम), वसंतराव विद्यालय, प्रियदर्शनी शिक्षण संस्था, न्यू मिलियम स्टार या शाळेतील मुलांनी गांधींजीच्या आयुष्यातील महत्वांच्या घटना, गांधीजी व त्यांच्या समकालिन नेत्यांच्या वेशभुषा परिधान करून साकारण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे संयोजन महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नीता रजपूत व गणेश भंडारी यांनी केले होते.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार उल्हास पवार, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी,अविनाश बागवे,अजित दरेकर महिला अध्यक्षा पुजा आनंद, लता राजगुरू, उस्मान तांबोळी, कैलास गायकवाड, भीमराव पाटोळे, जेंद्र भुतडा, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, अक्षय माने, आसिफ शेख, विशाल जाधव, राज अंबिके, संदिप मोरे, मिलिंद अहिर, चैतन्य पुंरदरे, महेश हराळे, अभिजीत महामुनी, फैय्याज शेख, शाम काळे, संदिप मोरे, सचिन दुर्गोडे, ज्योती परदेशी, रफिक शेख,सुंदरा ओव्‍हाळ, नलिनी दोरगे, अजय खुडे, नरेंद्र खंडेलवाल आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

हात-पाय नसले तरी मनाने ताकदवान राहण्याची शिकवण सैनिकांकडून मिळते -निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले

क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला समर्थ गौरव पुरस्कार प्रदानसमर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढोल तलवार पथकाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा
पुणे : सीमेवर भारतीय सैन्य उभे राहते कारण देशप्रेमी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. देशातील लोक कायमच सैनिकांप्रती कृतज्ञ भावना ठेवतात. हेच सैनिक देशासाठी लढताना अपंगत्व आले तरी जिद्द सोडत नाहीत. आत्मविश्वासाने ते आलेल्या परिस्थितीला सामोरे जातात. दोन्ही हात-पाय नसले तरी मनाने ताकदवान राहिले पाहिजे हे त्यांच्याकडून शिकायला मिळते, असे मत निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक हे २५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहेत. त्यानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. यंदाचा समर्थ गौरव पुरस्कार क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भूषण गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी इन्स्टिट्यूटचे  डीन कर्नल वसंत बल्लेवार (निवृत्त) आणि कर्नल चंद्रशेखर चितळे (निवृत्त) यांनी पुरस्कार स्विकारला. 
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उद्योजक पुनीत बालन, किरण साळी, हनुमंत बहिरट, अ‍ॅड. प्रताप परदेशी, , डॉ. अ.ल.देशमुख, प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, विकास पवार, भूषण पंड्या, पराग ठाकूर, संकेत मते, शाहीर दादा पासलकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते,उपाध्यक्ष अथर्व कुलकर्णी, सचिव योगेश यादव,खजिनदार निरंजन माळवदकर, सदस्य जय सूर्यवंशी, संदेश खरात, नितीन डिंबर हे उपस्थित होते.

रुपये २५ हजार, सन्मान चिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी समर्थ प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील झाले. हिरामण बनकर विद्यालय, पुणे विद्यार्थी गृह यांना क्रीडा साहित्य खरेदी साठी प्रत्येकी २५ हजार आणि  वृद्धश्वर सिद्धेश्र्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये देण्यात आले. २५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व यावेळी घेण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.

वसंत बल्लेवार म्हणाले, भारताची सेना विश्वातील एक नंबर आहे. देशातील नागरिक सैनिकांप्रती ज्या भावना व्यक्त करतात आणि सहकार्य करतात त्यामुळे सैनिकांना स्फूर्ती मिळते. सिमेवर जेव्हा सैनिक उभा असतो, तेव्हा तो फक्त देशाचा विचार करत असतो. देशातील लोक हे सैनिकांची ताकद आहेत. समर्थ प्रतिष्ठानने केलेला हा सन्मान देशातील प्रत्येक सैनिकांपर्यंत पोहोचेल. त्यांचे मनोबल वाढविणारा हा सन्मान आहे.

कर्नल चितळे म्हणाले, देशासाठी कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना पुन्हा आत्मविश्वासाने स्वबळावर उभे करण्याचे काम क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये केले जाते. हे काम १०६ वर्षांपासून सुरु आहे. काळानुसार या संस्थेत बदल होत गेले. अनेक अपंग सैनिक या माध्यमातून उद्योजक झाले आहेत.

संजय सातपुते म्हणाले, वादनासोबतच सामाजिक बांधिलकी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जपली जाते. आजपर्यंत एकूण १ कोटी २५ लाखांपेक्षा अधिक रक्कम शैक्षणिक व सामाजिक कायार्साठी देणगी देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला आहे. पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले.  

पर्वतीतून माधुरी मिसाळांच्या विरोधात जोरदार छुपे प्रयत्न

पुणे-पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी सतीश मिसाळ आता पुन्हा निवडून आल्या तर मंत्रिपदाच्या त्या दावेदार होतील, आणि एक ताकदवर समजली जाणारी महिला येथे मंत्री होईल याच कारणाने त्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातील काहींनी विशिष्ठ माध्यम प्रचारकांना हाताशी धरून जोरदार प्रयत्न आणि पर्यटन सुरु केल्याचे दिसून आले आहे. मिसाळ यांच्या विरोधात भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडे तक्रार केल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत दि.1 ऑक्टोंबर 2024 रोजी पर्वती विधानसभा मतदार संघ येथे मोगरा हॉल बिबवेवाडी येथे मतदान प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याबाबत च्या या तक्रारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

पर्वती मतदारसंघांमध्ये आमदार माधुरी मिसाळ यांनी मनमानी कारभार करून अनेक जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून त्यांच्या घरातील कामगार व घरातील नातेवाईक यांना हाताशी धरून बिबवेवाडी येथे मतदान प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने पार पाडली आहे वास्तविक डावललेले कार्यकर्ते हे गेली 30 ते 40 वर्षे काम करीत असून दिलीप कांबळे, स्वर्गीय विश्वास गांगुर्डे व विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचे निवडणुकीत काम केलेले असून सर्व कार्यकर्ते नियुक्त प्रभारी असून या कार्यकर्त्यांना घेऊन हि प्रक्रिया पूर्ण राबवावी अशी मागणी करताना अपमान करून आपण विजय मिळवू शकतो का? असा प्रश्न विचारत या विषयावर गांभिर्याने विचार करून तातडीने निवडणूक प्रक्रिया पुन्हा करावी अशी मागणी भूपेंद्र यादव यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे. दरम्यान अशा पद्धतीने उमेदवारी मिळविण्यापूर्वी सुरु झालेल्या राजकारणाने आता कळस गाठला असून अशाच पद्धतीच्या राजकारणाचा गेल्या विधानसभेला खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादीला फटका बसला होता .हेच राजकारण आता भाजपात देखील सुरु झालेले दिसते आहे. हे असेच सुरु राहिले तर मिसाळच काय अन्य कोणीही उमेदवार भाजपने दिला तर खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादीच्या तोंडापर्यंत आलेला विजय जसा निसटून गेला तसाच प्रकार भाजपात पर्वती मतदार संघातूनही दिसून येईल असा सूत्रांचा दावा आहे.

नाट्यछटेचे लेखन आणि सादरीकरण नाटकापेक्षा कठीण राजीव तांबे

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे : भूमिका हा परकाया प्रवेश असतो. नाटकात वेगवेगळी पात्रे आपली भूमिका निभावतात; पण नाट्यछटेत एकाच कलाकाराला प्रसंग उभा करावा लगातो. त्यामुळे नाटकापेक्षा नाट्यछटेचे लेखन आणि सादरीकरण करणे या गोष्टी कठीण आहेत, असे प्रतिपादन बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण तांबे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 2) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी मंचावर होते.

नाट्यछटेचे लेखन कशा पद्धतीने व्हावे या संदर्भात कार्यशाळा आयोजित केली जावी, अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली.

सुरुवातीस प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती सांगितली. राजीव तांबे यांचा परिचय संध्या कुलकर्णी यांन करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
सुमन नाट्यछटा स्पर्धा (विजेते आणि नाट्यछटेचे नाव या क्रमाने)
गट 1 : वयोगट 9 ते 12 : प्रथम नित्य पवार (जिंकाव तर अर्जूनासारख).
गट 2 : वयोगट 13 ते 18 : प्रथम आर्या अमोल कुलकर्णी (सिम्मी काकूंची एलिझाबेथ), द्वितिय निलाक्षी निलेश नरवणे (माझं झाड).
गट 3 : वयोगट 19 ते 50 : प्रथम आम्रपाली देशपांडे (फस्ट्रेनशन आलय मला), द्वितिय निनाद देशपांडे (टचवूड), तृतिय दिपाली रवींद्र आखाडे (वंशाला दिवा तर हवाच!), उत्तेजनार्थ शिवांगी मलगुंडे (आपल्या व्ोळी असं होतं का हो?), शिल्पा पराग कुलकर्णी (वेळ).
गट 4 : वयोगट 50 वर्षांपुढील : प्रथम वंदना चेरेकर (मुक्या प्राण्यांवर दया करा), द्वितिय मीरा शेंडगे (निर्मला : द बॉस!)

शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणातील मर्म युवा कलाकारांनी जाणून घ्यावे : डॉ. विनय सहस्रबुद्धे

भरत नाट्य संशोधन विद्यालयातर्फे डॉ. विकास कशाळकर यांचा अमृत महोत्सवी सत्कार
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा खूप मोठी अन्‌‍ गहन आहे. संगीत साधना करणाऱ्या व्यक्तीला संगीताद्वारे जीवनरस मिळत राहतो. संगीत माणसाला खऱ्या अर्थाने ताजेतवाने व टवटवीत ठेवते. संगीत क्षेत्रात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाचे मर्म युवा कलाकारांनी समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
भरत नाट्य संशोधन विद्यालयातर्फे डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे भरत नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कशाळकर यांचा सत्कार डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. पंडित उल्हास कशाळकर, श्रीकांत कशाळकर, गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, गोविंदराव बेडेकर, प्रा. प्रकाश भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, शास्त्रीय संगीताची मैफल ऐकताना भावनिक आदानप्रदान होते. यातून मिळणारा आनंद, समाधान भारतीय शास्त्रीय संगीताने समाजाला अनेक वेळा दिले आहे. या संगीत साधनेच्या परंपरेतील परिश्रमी, तपस्वी व्यक्तीमत्त्व असलेल्या कशाळकर यांना संगीत साधनेत अतीव समाधान देणारे दीर्घायुरोग्य लाभो.
सत्कार सोहळ्यापूर्वी डॉ. विकास कशाळकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना पंडित पांडुरंग मुखडे (तबला), प्रविण कासलीकर (संवादिनी), परिमल कोल्हटकर, अभिषेक कुलकर्णी (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली. डॉ. कशाळकर यांनी मैफलीची सुरुवात राग भूपमधील ‌‘जप ले तू नाम प्रभू का‌’ या बंदिशीने केली. त्यानंतर वाचस्पती रागातील ‌‘तू ही करता, सुख के दाता‌’ ही बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‌‘अरज सुनो मोरे साई‌’ ही रचना अखेरीस सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे, रवींद्र खरे यांनी केले.
सुरुवातीस ‌‘यमनरंग‌’ या सांगीतिक कार्यक्रमात भरत नाट्य संशोधन विद्यालयाच्या बिल्वा द्रविड आणि त्यांच्या शिष्यांचे गायन झाले. यमन रागातील मराठी, हिंदी गीते, नाट्यगीते सादर केली. त्यांना ओंकार श्रोत्री, अमित लिमये (तबला), सचिन घाणेकर (पखवाज), नितीन पुरंदरे (संवादिनी) यांनी साथ केली. त्यानंतर विकास कुचेकर, अमित लिमये, केतकी वैद्य-गोडसे, ओंकार श्रोत्री यांचे एकल तबलावादन झाले. निवेदन लौकिका गोखले-रास्ते यांनी केले.

ABP माझा चे राजीव खांडेकर तसेच वंदना चव्हाण यांच्यासह मान्यवरांना‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार‌’ देऊन होणार सन्मान

30व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे दि. 3 ऑक्टोबर रोजी नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन

विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात ‌‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार‌’ देऊन गौरविले जाते. यंदा राजीव खांडेकर (ज्येष्ठ संपादक), ॲड. वंदना चव्हाण (माजी खासदार, पर्यावरणवादी), नितीन बानगुडे-पाटील (प्रसिद्ध व्याख्याते), डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन), आनंदी विकास (ज्येष्ठ संगीतकार व गायिका), हिंदवी पाटील (लावणी लोककलावंत) यांना उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

पुणे-नवरात्रौत सलग 10 दिवस चालू असणारा ‌‘पुणे नवरात्रौ महोत्सव‌’ हा सांस्कृतिक महोत्सव यंदा दिमाखदार 30वे वर्ष साजरे करीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे याचे शानदार उद्घाटन संपन्न होईल. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात या दिवशी सकाळी ६.०५ वाजता आबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते घटस्थापना होईल.

सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती लक्ष्यवेधी असेल.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून  माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी,  माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व  माजी आमदार उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अरविंद शिंदे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, पुणे शहर प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष संजय मोरे, अध्यक्ष, एनएसयूआय महाराष्ट्र प्र. काँग्रेस अमिर शेख, अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग्रेस पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती उद्घाटन सोहळ्यात असणार आहे.

उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ सनईच्या मंजुळ सुरांनी होणार असून दीपप्रज्वलनाने 30व्या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर देवीची सामूहिक आरती होईल.उद्घाटन सोहळ्याची सुरुवात  कथक नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांच्या ‌‘दुर्गा नमनाने‌’ होईल. त्यानंतर स्वाती धोकटे आणि विनोद धोकटे ‌‘देवीचा जागर व गोंधळ‌’ सादर करणार आहेत.

‌‘नृत्यरंग‌’ कार्यक्रमाअंतर्गत सिनेतारकांचा नृत्याविष्कार व बॉलीवुड धमाका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड यांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे करणार आहेत.

‌‘पुणे नवरात्रौ महोत्सवा‌’चा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील उद्घाटन सोहळा व सर्व रोजचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचे थेट प्रक्षेपण पुण्यात आयसीसी केबल नेटवर्क, जीटीपीएल केबल नेटवर्क, नेक्स्ट जनरेशन केबल नेटवर्क आणि एससीसी केबल नेटवर्क वरून केले जाणार आहे.

उद्घाटनानंतर सायंकाळी 7 वाजता ‌‘परंपरा‌’ कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला जाणार असून श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांचे कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे. अशी माहिती पुणे नवरात्रो महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.