पिंपरी, पुणे (दि. ३ ऑक्टोंबर २०२४) राज्यातील मुस्लिम समुदायावर दहशत करण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या व्यक्तींकडून केला जात आहे. या दहशतीसाठी ते नेहमीच द्वेषपूर्ण भाषणांचा, दंगलीचा व सामूहिक हिंसेचा उपयोग करत आहेत. या सर्व बाबी रोखण्याची जबाबदारी असणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्या इशाऱ्यावरच राज्यात मुस्लिमांवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे प्रतिपादन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने गुरुवारी पिंपरी येथे मुस्लिम समाज प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, युसुफभाई कुरैशी, शाकिर शेख, हाजी गुलाम रसुल, इम्रान शेख, कारी इक्बाल उस्मानी, मौलाना उमर गाझी, मौलाना नय्यर नुरी, मुनाफ तरासगर, जमीर आवटी, शकील बेग, दस्तगीर हाजी मणियार आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये राहुल डंबाळे म्हणाले “की भारतीय जनता पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नसल्याने आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव स्पष्ट आहे. निवडणुकांमधील पराभव रोखण्यासाठी हिंदू मतदारांची दिशाभूल करून मुस्लिम विरोधी वातावरण तयार करून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. परंतु लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव अटळ असल्याने भाजप, शिवसेना यांनी धार्मिक ध्रुवीकरणाची पद्धती अवलंबणे बंद करावे.” असे आवाहन डंबाळे यांनी केले.
धार्मिक स्थळांवर कारवाई करताना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून भेदभाव केला जात असून राज्य सरकारच्या सूचनेनुसारच केवळ मुस्लिम धर्मीयांची प्रार्थनास्थळे अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली पाडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही महिन्यांपूर्वीच पिंपरी येथील मस्जिदीवर कारवाई झाल्यानंतर काल-परवा पुन्हा काळेवाडी येथे मध्यरात्री कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक पाहता शहरांमध्ये सर्वच धर्मीयांची बहुतांश प्रार्थना स्थळे अनधिकृत बांधलेली आहेत अशा प्रकारच्या प्रार्थना स्थळांवर कारवाई करणे बाबत सर्वोच्च न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्देशित केलेले असताना केवळ कट्टरतावादी दंगलखोरांना खुश करण्यासाठी त्यांच्या इशाऱ्यावरूनच राज्य सरकार मस्जिदींवर कारवाई करत आहे.
मुस्लिम धर्मियांविरुध्द सातत्याने केल्या जाणाऱ्या हेटस्पीच संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी खडे बोल सुनवले आहेत. काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारला नपुंसक शब्द मुंबई उच्च न्यायालयाने वापरला होता. परंतु मुस्लिम समाजाचे प्रेषीत महमंद पैंगबर यांचे बाबत आक्षेपार्ह विधान केल्या बद्दल रामगिरी महाराज याचे विरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५० पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु त्यांच्यावर अटकेची कारवाई न करता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे रामगिरी यांच्या वक्तव्याला समर्थन करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे देखील मुस्लिम विरोधात सातत्याने द्वेषपूर्ण भाषण देत आहेत. राणे यांच्या विरोधात देखील राज्यभरामध्ये विविध पोलीस ठाण्यात तीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर मोक्का कायद्यन्वये कारवाई करावी अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने विरोध करण्यात येत असून या संदर्भामध्ये सुमारे १८ राज्यांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तसेच याच विषयावर नेमलेल्या संयुक्त संसदीय समिती समोर या अनुषंगाने निवेदने सादर करण्यात आलेले आहे. आज अखेर पर्यंत तब्बल १ कोटी ३० लाख पेक्षा अधिक मुस्लिम समाज बांधवांनी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले व बोर्ड सुधारणा विधेयक रद्द करावे अशी मागणी संयुक्त संसदीय समिती कडे केलेली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक देखिल मागे घेतले जाईल. असा विश्वासही राहुल डंबाळे यांनी यावेळी व्यक्त केला.
फडणवीसांच्या इशाऱ्यावरच मुस्लिमांवर दहशतीचा प्रयत्न – राहुल डंबाळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ
बारामती, दि. ३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ वृंदावन लॉन्स येथे करण्यात आला. या अंतर्गत चार वाहनातून तालुकाभरात योजनेविषयी जनजागृती करण्यासह पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत पोहोचविणे, त्या माध्यमातून नोंदणी करणे, लाभार्थीना ‘आभा’ कार्ड वितरित करणे आणि या योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने माहिती देऊन जनजागृती करणे ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.
हा उपक्रम राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असून त्यासाठी ४ नोंदणी व्हॅन एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या सौजन्याने पुरविण्यात आल्या आहेत. राज्यशासन हे मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसच्या माध्यमातून नोंदणी उपक्रम राबविणार असून त्यासाठी प्रत्येक वाहनासाठी ४ स्वयंसेवक मानधन तत्त्वावर नेमण्यात आले आहेत, आदी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना देण्यात आली.
यावेळी एचडीएफसी बँकेचे विभाग प्रमुख राजा उपाध्याय, पुणे व बारामतीचे सिटी हेड पियूष शेठ, मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसचे समन्वयक कौस्तुभ बुटाला, नरेश चौधरी, संचालक डॉ. मिनल राघमवार, अभियान व्यवस्थापक सुनीता पवार आदी उपस्थित होते.
चैतन्य वाडेकर महाराजांना अटक
पुणे-पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या चैतन्य महाराज वाडेकर यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर खासगी जागेतील रस्ता व सुरक्षा भिंत जेसीबीच्या मदतीने उखडल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या या कारवाईत त्यांच्या समर्थकांत खळबळ माजली आहे.
चैतन्य महाराज वाडेकर आपल्या कुटुंबासह चाकण एमआयडीसी परिसरात राहतात. तिथे जागेच्या मुद्यावरून त्यांचा एका बिल्डरशी वाद झाला होता. सदर बिल्डरने वाडेकर यांच्या घरालगतची जागा विकसित केली आहे. तसेच तिथे एक कंपनी स्थापन केली आहे. वाडेकर यांनी या बिल्डरवर आपली जागा हडपल्याचा व आपल्या खासगी जागेतून रस्ता बांधण्यासह तिथे कम्पाउंड बांधल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी वाडेकर कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करण्याची मागणी केली होती. अखेर कोर्टाने वाडेकर यांच्या बाजूने निकाल देत सरकारी मोजणीचे निर्देश दिले. त्यानंतर या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तत्पूर्वीच, चैतन्य वाडेकर यांनी आपले भाऊ व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जेसीबी बोलावून रात्रीतूनच कंपनीकडे जाणारा रस्ता उखडून टाकला व सुरक्षा भिंतही पाडून टाकली.
चैतन्य वाडेकर यांच्या या कृतीविरोधात बिल्डने महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वाडेकरांना पोलिस ठाण्यात बोलावले. तिथे वाडेकरांनी सरकारी कारवाईपूर्वीच आपण रस्ता उखडल्याची चूक केल्याची बाब मान्य केली नाही. पोलिसांनी त्यांना अनेकदा समजावून सांगितले. पण ते आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी कायद्याची भाषा समजावून सांगत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर त्यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. पोलिसांनी या प्रकरणी चैतन्य वाडेकर यांच्यासह त्यांचे 3 भाऊ व इतर 2 सहकारी अशा एकूण 6 जणांना अटक केली आहे. तसेच घटनेतील जेसीबीही जप्त केला आहे.
चैतन्य वाडेकर सोशल मीडियात चांगलेच सक्रीय आहेत. त्यांचे तिथे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भांबोली गावात 17 ऑक्टोबर 1994 साली झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. इंस्टाग्राम व यूट्यूबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. या संस्थेंच्या माध्यमातून ते वारकरी संत, साहित्याचा प्रचार व प्रसार करतात. एक युवा किर्तनकार म्हणून त्यांची समाजाला ओळख आहे.
पुण्यात 6 वर्षीय 2 मुलींचे लैंगिक शोषण:वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली स्कूलबस
फडणवीसांचे कठोर कारवाई करण्याचे निर्देश
पुणे- वानवडी येथील एका नराधमाने 6 वर्षांच्या दोन मुलींचा स्कुल व्हॅनमध्ये लैंगिक छळ केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली. याच व्हॅनमध्ये चिमुकलींवर अत्याचार झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच संस्थाचालकांना स्कूलबस चालक व वाहकांची पार्श्वभूमी तपासण्याचे निर्देश दिलेत. तसेच या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही दिली आहे.तर आज सकाळी पत्रकारांनी पुण्यात अशा प्रकारचा मुलीच्या बाबत गुन्हा घडल्याची माहिती दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी याबाबत तुमच्याकडूनच हे समजलेय असे सांगत आपण माहिती घेतो असे म्हटले होते.
VIDEO | Pune: Vanchit Bahujan Aaghadi workers vandalised a school van that was brought to Wanwadi Police Station for investigation earlier today. It is alleged that the driver of the van had sexually assaulted two six-year-old girl students when they were returning home after… pic.twitter.com/usG5qSRhjr
— Press Trust of India (@PTI_News) October 3, 2024
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये एका चालकाने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आहे. त्याने आणखी एका मुलीवरही अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. अतिशय वाईट पद्धतीने हे शोषण झाले आहे. चालक फरार होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर कठोर कलमे लावली आहेत. आरोपीवर पोलिसांकडून निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल. त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांना बोलावण्यात आले आहे. यात त्यांचा काही दोष आहे का? याचा तपास केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन-चालक म्हणून काम करणारे योग्य आहेत की नाही, तसेच स्कूलबस चालकांची पार्श्वभूमी याची तपासणी केली पाहिजे, असे इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील वानवडी येथे एका 45 वर्षीय स्कुल व्हॅन चालकाने सहा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीच्या पालकांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर इतर मुलींची चौकशी केल्यानंतर आरोपीने आणखी एका मुलीचे शोषण केल्याचे समोर आले. याप्रकरणी आरोपी संजय रेड्डी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुली एका नामांकित शाळेतील आहेत. त्यामुळे या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनाही कठोर शासन करण्याचे संकेत दिले. प्रस्तुत प्रकरणातील आरोपींना काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे. मी अशा प्रकारच्या घटनांमध्ये राजकीय पक्ष वगैरे काहीही पाहत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे ते म्हणाले.
बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान:गणपती उत्सवाचा चोथा झाला-संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
सांगली-शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडेयांनी आता गणपती आणि नवरात्र उत्सवाबाबत बोलताना एक वादग्रस्त विधान केले आहे. नवरात्रातील दांडिया हिंदू समाजाला xx बनवत आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे, असे संभाजी भिडे म्हणाले. सांगली येथे आयोजित दुर्गामाता दौड वेळी ते बोलत होते.
संभाजी भिडे म्हणाले की, गणपती आणि नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले आहेत. असे इव्हेंट हिंदू समाजाला गांxx बनवत आहेत. नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत, जे उत्सवाची शुद्धता आणि परंपरा नाश करत आहेत. नवरात्रीचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असे भिडे यांनी सांगितले. तसेच काही माता-भगिनींनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असे आवाहन देखील भिडे यांनी केले.
… असा पंतप्रधान मिळाला आपले दुर्दैव
संभाजी भिडे यांनी यावेळी आपल्या भाषणात हिंदू समाजावर गंभीर टीका केली आहे. शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप बनण्याचा मार्ग शिकवला, पण आज गणपती आणि नवरात्र उत्सवात आम्ही समाजाला गोंधळात टाकत आहोत, असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्यावरही निशाणा साधला. हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्या देशाला दुर्दैवाने मिळाला, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूंना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण, चांगलं कोण हे हिंदू समाजाला कळत नाही. आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणे केली. अजूनही ते आपला पाठलाग करत आहेत. असंख्य आक्रमणे झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान, असे विधान संभाजी भिडे यांनी केले.
संभाजी भिडे यांनी यावेळी सध्या सुरू असलेल्या राजकारणही भाष्य करत टीका केली आहे. आज सगळे सामाजिक कार्यक्रम करमणूक, मिरवणूक आणि निवडणूक यासाठी राबवले जातात. राजकारण, अर्थकारण, शुद्र हे सर्व थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. महामुर्ख जमात म्हणले हिंदू जात आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे संभाजी भिडे म्हणाले.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी याआधीही अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी महिलांच्या कपड्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते.

दुर्गा माता दौडीसंदर्भात भिडेंच्या संघटनेकडून दिली जाणारी माहिती ….
दुर्गा माता दौडीचा अर्थ काय ? ती का आयोजित केली जाते ? आपण त्यात का सामील व्हावे?गेल्या कित्येक वर्षांपासून आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, त्यांचे संघटन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संघटित हिंदू समाजासाठी सतत कार्यरत आहे. लाखो धारकरी देशाच्या आणि धर्माच्या कार्यात आपले मोलाचे योगदान देत आहेत.दरवर्षी शारदीय नवरात्रात गावागावात आणि शहरातही पूर्ण शिस्तबद्ध स्वरूपात दुर्गा माता दौडीत धारकरी सहभाग घेतात. ही परंपरा गेली अनेक वर्षे सातत्याने चालू आहे. दुर्गा माता दौड म्हणजे सर्व शिवभक्त एकत्रितपणे शिस्तबद्ध पद्धतीने चालणे किंवा धावणे. दुर्गामाता, कालीमाता, चंडीमाता, भारतमाता, गोमाता, हे सर्व एकच आहेत आणि हिंदू तरुण या मातांच्या चरणी धावत जाऊन देव, देश आणि धर्म यांच्या प्रति शपथ घेतात.हिंदूंवर येणाऱ्या कोणत्याही आपत्तीत हिंदू ऐक्य आणि संघटनचे प्रतिक म्हणून ही दौड एकत्र येऊन त्या संकटास तोंड देण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे सैन्याचे संचलन त्यांच्या ऐक्याच्या अनुशासनाचे प्रतिक आहे, तशाच प्रकारे सर्व हिंदू समाज सर्व प्रकारचे मतभेद, फरक आणि विविधता विसरून संघटितपणे एकत्र काम करण्यासाठीचे प्रतिक म्हणजे ही *श्रीदुर्गामाता दौड* आहे. म्हणूनच, सर्व देव, देश – धर्मप्रेमी हिंदूंना विनंती आहे की त्यांनी या दुर्गामाता दौडीत सहभाग घ्यावा आणि या धर्म आणि देशाच्या कार्यात योगदान द्यावे ! दुर्गामाता भारतमाता एक है, एक है कालीमाता भारतमाता एक है, एक है गंगामाता भारतमाता एक है, एक है गो माता भारतमाता एक है, एक है जिजामाता भारतमाता एक है, एक है |
स्वराज ट्रॅक्टर्सतर्फे २५ एचपी विभागात टार्गेट ६२५ लाँच करत टार्गेट श्रेणीचा विस्तार
२५ एचपी विभागाची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी वैविध्य आणि सोइस्करपणाचा समावेश
मोहाली, ३ ऑक्टोबर २०२४ – स्वराज ट्रॅक्टर्स या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ट्रॅक्टर ब्रँडने टार्गेट ६२५ लाँच करत आपल्या लोकप्रिय ‘स्वराज टार्गेट श्रेणीचा’ विस्तार केला आहे. ४डब्यूडी आणि २डब्ल्यूडी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेला स्वराज टार्गेट ६२५ आटोपशीर, हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर श्रेणीची समीकरणे आपली अमर्याद ताकद, तंत्रज्ञान व वैविध्यतेसह बदलण्यासाठी सज्ज आहे.
स्वराज टार्गेट श्रेणी आटोपशीर व हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर विभागात नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी ओळखली जात असून, स्वराज टार्गेट ६२५ च्या लाँचने, विशेषतः २ डब्ल्यूडी व्हेरिएंट लाँच करत, कंपनीने शेतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उत्सुक असलेल्या आधुनिक शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या केल्या आहेत. दमदार कामगिरी व ऑपरेटरला मिळणारा आरामदायीपणा यामुळे शेतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रगत शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या केल्या आहेत.
स्वराज टार्गेट ६२५ देशांतर्गत ट्रॅक्टर क्षेत्रातील प्रवर्तकीय उत्पादन असून, ते प्रगतिशील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या हेतून डिझाइन करण्यात आले आहे. ताकद, तंत्रज्ञान आणि वाट काढण्याची क्षमता यांचा असामान्य मेळ घालण्यात आलेले हे ट्रॅक्टर्स शेतीच्या विविध कामांसाठी उत्तम असून, त्यात स्प्रेईंग आणि इंटरकल्चर कामकाजाचा समावेश आहे. याचे आटोपशीर डिझाइन आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये आधुनिक यंत्रणा, सुधारित उत्पादनक्षमता व पिकांचे कमीतकमी नुकसान हवे असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे.
या विभागातील सर्वात अरुंद ट्रॅक रुंदी व कमी टर्निंग रेडियससह स्वराज टार्गेट शेतकऱ्यांना लहान जागेत सहजपणे वाट काढता येईल, उत्पादनक्षमता वाढविता येईल, याची खात्री करतो. याचे इंधनक्षम डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये उदा. सफाईदार गीयरशिफ्टसाठी सिंक्रेश गीयरबॉक्स, कारप्रमाणे आरामदायीपणा व नियंत्रण शेतीचा एकंदर अनुभव उंचावतात.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि टार्गेट ६२५ चे लाभ
जबरदस्त ताकद व कामगिरी
· दमदार डीआय इंजिन – आकर्षक ८१.३ टॉर्कमुळे हा ट्रॅक्टर ६०० लीटर्सपर्यंतचे ट्रेल्ड स्प्रेयर्स चिखलयुक्त भागातही सहजपणे हाताळता येतो.
· ॲडजस्ट करता येण्यासारखी फ्लेक्सी ट्रॅकची रुंदी – या विभागात सर्वात अरुंद जागा देणारा ट्रॅक्टर असून, त्यात २८, ३२ किंवा ३६ इंचीचे ॲडजस्ट करता येण्यासारखे पर्याय देण्यात आले आहेत, जे वेगवेगळ्या पिकांसाठी योग्य ठरतात.
· सर्वोच्च लिफ्ट क्षमता – याची लिफ्टिंगची क्षमता ९८० किलो असून, त्यामुळे अवजड उत्पादनेही सहजपणे उचलता येतात.
· एडीडीसी हायड्रॉलिक्स – डक फूट कल्टिव्हेटर्स, एमबी नांर या व अशा ड्राफ्ट उपकरणांसह अचूक खोली मिळते.
· या विभागातील सर्वाधिक पीटीओ ताकद – यात १४.०९ केडब्ल्यू (१८.९ एचपी) पीटीओ ताकद देण्यात आली असून, त्यामुळे एकसारखे आणि टेल्ड स्प्रेइंग असतानाही धुक्याप्रमाणे स्प्रेइंग मिळते.
आधुनिक तंत्रज्ञान
· मॅक्स- कूल रेडिएटर – अधिक चांगल्या प्रमाणात उष्णतेचे विभाजन होण्यासाठी आणि दीर्घकाळ वापरानंतर ओव्हरहीटिंग होऊ नये, यासाठी २० टक्क्यांनी मोठे डिझाइन देण्यात आले आहे.
· सातत्यपूर्ण मेश ट्रान्समिशन – सफाईदार गीयर शिफ्टिंगची खात्री
· इंजिन की स्टॉप – किल्लीने इंजिन चालू/बंद करण्याची सोय
· समतोल पॉवर स्टिअरिंग – पिकांच्या रांगांमध्ये वाट काढताना कमी थकवा येतो व ऑपरेटरचा आरामदायीपणा वाढतो
· स्टायलिश डिजिटल क्लस्टर – कमी प्रकाश असतानाही दृश्यमानता आणि वापरातील सोपेपणा वाढतो
· दुहेरी पीटीओ – ५४० आणि ५४० ई इकॉनॉमी पीटीओ मोड्सचा समावेश, अल्टरनेटर्स आणि वॉटर पंप्ससारखी हलकी उपकरणे वापरल्यास इंधन बचत शक्य होते.
भोर-वेल्हा-मुळशीतील घराणेशाही हटवा,मुळशीत लागले आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात बॅनर
थोपटेच्या विरोधात झळकलेल्या बॅनर मधून विचारला कामाचा लेखाजोखा
मुळशी – मुळशी तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या कामाचा लेखाजोखा विचारणाऱ्या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरच्या माध्यमातून मतदार संघातील घराणेशाही हटवा, असा ही उल्लेख करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा मुळशी या मतदार संघात गेली १५ वर्ष काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे नेतृत्व करत आहेत. त्या अगोदर त्यांचे वडील अनंत थोपटे यांनी या मतदार संघातून नेतृत्व केलं. मात्र, मुळशी तालुक्यात म्हणावं असा विकास झालेला नाही.
त्यामुळे या भागात येत्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार थोपटे यांच्या विरोधात हे बॅनर लावण्यात आलेत. मुळशीत लवळे फाटा, घोटावडे, घोटावडे फाटा, भरे, भुकुम, भुगाव या गावात हे बॅनर लावण्यात आले आहेत.
या बॅनरच्या माध्यमातून ट्राफिक आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी मिटणार? निवडणूकीच्या वेळी तोंड दाखवणाऱ्यांना तोंडावर पाडा, मुळशी तालुक्यासाठी आमदारांनी काय केलं? गेली १५ वर्ष मुळशी तालुक्याचा विकास का झाला नाही, असा जाब विचारण्यात आलाय.
पुण्यात 6 वर्षीय 2 शाळकरी मुलीवर स्कूलबसमध्येच लैंगिक अत्याचार:पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी स्कूल बस चालक अटकेत
पुणे-विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाकडून 6 वर्षांच्या मुलीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पालकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) आणि विनयभंग गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय जेटींग रेड्डी (वय- 45, रा. वैदुवाडी, हडपसर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने हडपसर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पीडीत मुलगी एका शाळेत शिकत आहे.तीन ते चार दिवसांपासून मुलगी शाळेतून घरी आल्यावर बम दुखत असल्याचे सांगितले. पालकांनी तिची तपासणी केली असता त्यांना लालसर भाग दिसून आल्यावर मुलीने आई वडिलांकडे वाहन चालक विरोधात तक्रार केली. आईने विश्वासात घेऊन प्रेमाने मुलीकडे चौकशी केली. तेव्हा विद्यार्थी वाहतूक करणारे संजय अंकल यांन शाळेतून येताना जवळ घेऊन अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, अशी माहिती तिने आईला दिली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलीला दुचाकीवरुन शाळेत सोडले. मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन पालकांना याबाबतची माहिती दिली. पालकांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा आरोपी संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक आयुक्त गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी व्हॅन चालक रेड्डीला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक एस देवधर पुढील तपास करत आहेत.
अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे गीत रामायणावर सर्वांची श्रद्धा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार
गीतरामायणाच्या हिंदी भावानुवादाचा पहिला प्रयोग कोथरुड मध्ये संपन्न
हिंदी भावानुवादाला कोथरुडकरांचे भरभरून आशीर्वाद
पुणे-७० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आजही गीतरामायणाची गोडी सर्वांना असून, अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या राम मंदिरावर सर्वांची श्रद्धा आहे. तशीच श्रद्धा गदिमा लिखित आणि सुधीरबाबू फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणावर आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. कोथरूडचा लोकप्रतिनिधी पदाच्या कार्यकाळात गदिमा स्मारकाच्या कामाला मूर्त रूप मिळाले, असेही ते यावेळी म्हणाले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आधुनिक वाल्मिकी, महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कोथरुड मध्ये समग्र गदिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर, गायक हृषिकेश रानडे, दत्तप्रसाद जोग, बाबूजींना साथ देणारे पंडित रमाकांत परांजपे, संयोजिका ॲड. वर्षाताई डहाळे, विनीत गाडगीळ, सुनील देवभानकर यांच्या सह कोथरुडकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आधुनिक वाल्मिकी महाकवी गदिमा माडगूळकर लिखित आणि संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणाची ७० वर्षांनंतर आजही सर्वांना गोडी आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिरावर सर्व देशवासियांची श्रद्धा आहे. तशीच श्रद्धा गदिमा लिखित आणि सुधीरबाबूंनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणावर श्रद्धा आहे.

ते पुढे म्हणाले की, पुणे सारख्या सांस्कृतिक शहरात गदिमांचे स्मारक व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती. अनेकांनी यासाठी प्रयत्न करुनही ते पूर्णत्वास येऊ शकले नाही. कोथरूडचा लोकप्रतिनिधी पदाच्या कार्यकाळात हे स्मारक मूर्त स्वरूपात साकार होत आहे, याचा विशेष आनंद आहे, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर म्हणाले की, गदिमांनी आपल्या ५८ वर्षाच्या आयु:काळात या काळात त्यांनी १५७ मराठी चित्रपट, २५ हिंदी चित्रपट, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम यासोबतच १२ वर्षे ते आमदार होते. तरीही गदिमांच्या स्मारकासाठी आम्हाला ४० वर्षे झगडावं लागलं. मात्र, २०१९ मध्ये मुक्ताताई टिळक, मुरलीधर मोहोळ, माधुरी सहस्रबुद्धे आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या काळात स्मारकाचे काम कोथरूड मध्ये गतीने सुरू आहे, याचा आनंद होतो आहे. त्यामुळे कोथरुड मतदारसंघाचा आम्हा सर्वांना हेवा वाटतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, आधुनिक काळातील वाल्मिकी, महाकवी गदिमांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त गदिमांची अजरामर काव्यरचना गीतरामायणाचा दत्तप्रसाद जोग यांनी शब्दबद्ध केलेला हिंदी भावानुवादाचा पहिला प्रयोग कोथरुड मध्ये झाला. या प्रयोगाला कोथरूडकरांनी या उदंड प्रतिसाद देत, कलाकारांनी सादर केलेल्या गितांना भरभरुन दाद दिली.
आमदार देवेंद्र भुयारांना अजित पवारांची समज:म्हणाले – भुयार यांचे विधान महिलांना वेदना देणारे, त्यांना माफी मागण्याची सूचना केली
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे आपले आमदार देवेंद्र भुयार यांना कडक शब्दांत समज दिली आहे. देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य महिला व मुलींना वेदना देणारे आहे. ते चुकीचे बोललेत. त्यांना काल रात्रीच मी समज दिली असून, महिलांची माफी मागण्याचेही निर्देश दिलेत, असे ते म्हणालेत.बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य हे शेतकऱ्यांना अपमान वाटणारे होते, मी त्यासंदर्भात भुयारांशी बोललो. त्यांची चूक ती चूकच आहे. मी काल रात्री त्यांना बोललो तेव्हा देवेंद्र भुयारांनी मला सांगितले की दादा माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता, मला ऐवढंच सांगायचे होते की मुली शेतकऱ्यांना लग्नासाठी प्राधान्य देत नाही त्या नोकरी असलेल्या मुलाला प्राधान्य देतात.
महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.मधल्या काळात अतिशय दुर्दैवी घटना घडली . मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने काही पावलं उचलण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शक्ती अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंचशक्ती आहे
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, गुन्हेगारी, अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या रोखण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. शक्ती बॉक्स तक्रार पेटी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, ऑफीसमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये काही तक्रार असेल तर टाकतील. त्या तक्रारदारांचं नाव गुपित ठेवण्यात येईल.
बारामती पोलिसांसह बैठकीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांचं प्रबोधन आणि महिलांची सुरक्षा हा यामागचा उद्देश आहे. मुली, महिला यांच्याकडून ज्या तक्रारी येतील त्याची दखल घेतली जाईल. तर ज्या महिलेने, मुलीने तक्रार केली आहे त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.शक्ती बॉक्स अशी पेटीही आपण ठेवली आहे. मुलींचा होणारा पाठलाग, छेडछाड, आयडी लपवून फोन करणं या सगळ्या गोष्टी मुलींना सांगता येईल. खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, पोलिसस्टेशन, रेल्वे स्टेशन या आणि अशा सार्वजनिक ठिकाणी शक्ती बॉक्स ठेवण्यात येतील.
अजित पवार म्हणाले की, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावं ज्यांना वाटतं त्यासाठीच हा बॉक्स ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं स्लोगन आपण त्याला दिल्याचे अजितदादांनी यावेळी बोलताना सांगितले. तर 920939497 हा तो नंबर आहे. यावर एक कॉल केला तर मुली, महिलांना होणारा त्रास सांगता येईल. हा क्रमांक 24/7 तत्त्वावर सुरु असेल. या क्रमांकावर फोन किंवा मेसेज केल्यास त्या तक्रारीचं निवारण करण्याबाबत आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, 17 वर्षांच्यांना माहीत आहे आपण गुन्ह्यात अडकत नाही. त्यामुळे आता हे वय 14 वर वय आणता येईल याचा विचार सुरू आहे. बारामतीला काळिमा फासणारी घटना घडली, कोयत्याने एकाचा खून करण्यात आला. दोघेही 17 वर्षाचे आहेत.आताच्या काळात मूल स्मार्ट आहे. आपल्या काळात पाचवीत असताना विचारलेले प्रश्न लहान मूल आता विचारतो. ज्यांच्याकडे हत्यार सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सोशल मिडियावर जे लोक हत्यारे, कोयता, पिस्तूल घेऊन फोटो टाकतील त्यांच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.
पाच कोटींच्या खंडणीसाठी सात जणांचे अपहरण,कर्नाटकातून तीन आरोपी जेरबंद
पुणे-मुर्ती प्रतिष्ठापणेच्या बहाण्याने कर्नाटकात नेऊन७ जणांना डांबून ठेवून तब्बल ५ कोटींची खंडणी मागणार्या टोळीतील तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. कर्नाटक स्थानिक पोलिस आणि बिबवेवाडी पोलिसांनी कामगिरी केली असून, आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. रामु अप्पाराय वळुन (२९, रा. त्रिकुंडी, ता. जत, सांगली), दत्ता शिवाजी करे (२०) आणि हर्षद सुरेश पाटील (२२, रा. आसंगी ता. जत, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.बजरंग तुळशीराम लांडे (५१, रा. पीएमटी कॉलनी, समर्थनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
बजरंग लांडे हे पुजारी असून दि. २९ जुलैला सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा स्वप्निलला आरोपी घरी येऊन भेटले. त्यांनी विजापूरात हर्षद पाटीलच्या घराची पुजा करायची आहे. मुर्तीष्ठापना करायची आहे, असे सांगून कर्नाटकात त्यांना बोलावले. त्यानुसार लांडे हे ७ शिष्य घेऊन कर्नाटकमध्ये गेले. तिथे घराची पुजा अथवा मुर्ती प्रतिष्ठापनेची तयारी दिसली नाही. आरोपींनी त्यांना खोलीत डांबून ठेवले. त्यांच्या फोनवरून त्यांच्या घरी फोन लाऊन ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी लांडेच्या कुटूंबियांनी बिबवेवाडी पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, ज्योतिष काळे, सुमीत ताकपेरे यांच्या पथकाने आरोपींना कर्नाटकातून अटक केली.
बदलापूर अत्याचार प्रकरण:शाळेचे फरार ट्रस्टी तुषार आपटे, उदय कोतवाल दीड महिन्यानंतर अटकेत
बदलापूर चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार प्रकरण तापल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते.आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरांगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरेही ओढले होते. अखेर या दोन्ही आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतले आहे. दोघांनाही आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे. बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पुढील चौकशीसाठी एसआयटी टीमकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.या दोघांना राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप केले गेले होते. शाळेत घडलेला प्रकार पोलिसांना न कळवणे, पुरावे नष्ट करणे असे या दोघांवर आरोप होते. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास सव्वा महिना हे दोघे फरार होते. सहआरोपी भाजपशी संबंधित असल्याचा विरोधक आरोप करत होते. तर मुख्य आरोपी शिंदे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. शिंदे हा पोलिस चकमकीत मारला गेला. तरीही कोतवाल व आपटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना याच प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपींना वाचवले जात असून पोलिसांकडून संस्थाचलकांना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला आहे. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावे देखील नष्ट केले असल्याचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलांनी देखील पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. शाळेमध्ये घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनाने पोहोचवली नाही तसेच सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आलेले नाहीत. तसेच पोलिसांनी अद्याप फरार शाळा व्यवस्थापनातील आरोपींना पकलडे नाही, असा आरोप वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे.
लेबनॉनमध्ये 2 किमीपर्यंत आत घुसले इस्रायली सैनिक, हिजबुल्लाहशी चकमक
लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या भू-युद्धात बुधवारी (2 ऑक्टोबर) इस्त्रायली सैन्य मरून अल-रस गावाच्या 2 किमीच्या आत पोहोचले. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली सैनिकांची येथे हिजबुल्लाहच्या सैनिकांशी चकमकही झाली होती.
⭕️Recap of the IDF’s targeted operations in southern Lebanon:
— Israel Defense Forces (@IDF) October 2, 2024
150+ terrorist infrastructure sites have been destroyed in air strikes, including Hezbollah’s HQ, weapon storage facilities and rocket launchers.
In cooperation with the IAF, our troops have eliminated terrorists and… pic.twitter.com/koNQyEuQJ9
समोरासमोर झालेल्या या लढाईत आतापर्यंत 2 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण जखमी झाले आहेत. इस्रायलचा पेजर हल्ला, वॉकी-टॉकी हल्ला आणि हवाई हल्ल्यानंतर आता हिजबुल्लाहच्या विरोधात जमीनीवरील कारवाई आहे.
इस्रायल लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, गाझामध्ये हमास, इराण आणि येमेनमध्ये हुथीशी लढत आहे. मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर 180 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) सांगितले की हा हल्ला मोसाद मुख्यालय, नेवाटीम एअर बेस आणि टेल नोफ एअर बेसला लक्ष्य करण्यात आला. इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने नष्ट केली.
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला नाही, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
बालेवाडी येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बँड स्पर्धा उत्साहात संपन्न
पुणे, दिनांक २ : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय बँड स्पर्धा संपन्न झाल्या.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, उपविभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता संघ प्रिया वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.काठमोरे म्हणाले, शालेय जीवनामध्ये उत्तम नागरिक घडविण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धा आवश्यक आहे. बँड स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सांघिक भावना, राष्ट्रप्रेम आदी भावना वाढीस लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा केल्यास मिळणारे यश शाश्वत असते.
डॉ.आवटे म्हणाल्या, राज्यस्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यापूर्वीच यश संपादन केले आहे. हे कौतुकास्पद आहे. बँड स्पर्धेमधून खिलाडूवृत्ती वाढीस लागते. स्पर्धेमध्ये यश किंवा अपयश हे महत्त्वाचे नसून स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्वतः आनंद घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असते.
डॉ. सावरकर म्हणाल्या, राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघांना मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील विभागांतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्तरावर महाराष्ट्रातील संघानी यश मिळविल्यास राष्ट्रीय स्तरावर विजेते संघांचे सादरीकरण होईल. संघाना शुभेच्छा देवून त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या.

या बँड स्पर्धेमध्ये पाईप बँड व ब्रास बँड या प्रकारामध्ये मुलांच्या गटातून सहा संघानी व मुलींच्या गटातून सहा संघांनी सादरीकरण केले. राज्यस्तरावरील या स्पर्धेमध्ये ३५० विद्यार्थी व २४ शिक्षक सहभागी झाले.
राज्यस्तरीय बँड स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
ब्रास बँड-मुले (प्रथम) – संजीवनी सैनिकी विद्यालय, कोपरगाव. मुली ( प्रथम ) – सेंट एलॉयसिस कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, भुसावळ.
पाईप बँड-मुले (प्रथम)-राजाराम बापू पाटील सैनिकी विद्यालय, इस्लामपूर. मुली (प्रथम)-भोसला सैनिकी विद्यालय, नाशिक.
श्रीनिवास राव रावुरी हे बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून रुजू
पुणे: भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने श्रीनिवास राव रावुरी (मित्र आणि सहयोगींसाठी श्रीनी) यांची मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) म्हणून नियुक्ती केली आहे. ते कंपनीच्या गुंतवणूक संघाचे नेतृत्व करण्यासोबतच गुंतवणुकीच्या कामगिरीला अनुकूल पोर्टफोलिओ करण्यासाठी त्याचे व्यवस्थापन करतील. लीडर म्हणून श्रीनिवास जोखीम व्यवस्थापित करतानाच नियामक मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने ग्राहकांसाठी संपत्ती आणि सर्व भागधारकांसाठी नफा निर्माण करण्यासाठी कंपनीच्या मालमत्तेचे वाटप करण्यावर लक्ष केंद्रित करतील.
श्रीनिवास हे एक अनुभवी गुंतवणूक व्यावसायिक आहेत, ज्यांना भारतीय वित्तीय बाजारपेठांमध्ये इक्विटी संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा जवळपास तीन दशकांचा अनुभव आहे. भारतातील पहिल्या बुटीक इक्विटी रिसर्च फर्ममध्ये विश्लेषक म्हणून सुरुवात करून, त्यांनी रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियल, टेलिकॉम आणि पॉवर यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन दशकांहून अधिक काळ घालविला. गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून श्रीनिवास यांचे इतर कार्य PGIM इंडिया ॲसेट मॅनेजमेंट आणि HDFC ॲसेट मॅनेजमेंट सारख्या संस्थांमध्ये होते, जिथे वाढ आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या संबंधित गुंतवणूक धोरणांना आकार दिला. ते पीजीआयएम इंडिया ॲसेट मॅनेजमेंटमधून बजाज अलियान्झ लाइफमध्ये सहभागी झाले, जिथे त्यांनी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला उद्योगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपनीमध्ये बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नियुक्तीबद्दल बोलताना, तरुण चुघ, बजाज अलियान्झ लाइफचे एमडी आणि सीईओ म्हणाले, “आमच्या परिवर्तनीय प्रवासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर श्रीनिवास आमच्यासोबत आले आहेत. आमचे नियामक वातावरण आणि मजबूत भारतीय अर्थव्यवस्था गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना आणखी मूल्य प्रदान करण्यासाठी एकत्र येत आहेत. लाइफ इन्शुरन्समध्ये त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी त्यांचा भारतीय वित्तीय बाजारातील व्यापक अनुभव खूप मोलाचा ठरेल, कारण आम्ही आमच्या क्षमता मजबूत करत आहोत.”
बजाज अलियान्झ लाइफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल श्रीनिवास म्हणाले, “शिस्तबद्ध गुंतवणूक आणि ऑफरमधील फायद्यांमुळे ग्राहकांना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करण्यासाठी जीवन विमा, आज सर्वात मजबूत आर्थिक साधनांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीसाठी ही एक सुरक्षा आहे. बजाज अलियान्झ लाइफसह ग्राहकांच्या या प्रवासात आता महत्त्वाची भूमिका बजावता येणार असल्याने मी उत्साहित आहे. कंपनीची उत्कृष्टता आणि नवोन्मेषाची प्रतिष्ठा सुस्थापित आहे. अशा चलित आणि केंद्रित संघात सहभागी होण्यास उत्सुक आहे.”
श्रीनिवास हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून, हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे. त्यांना टेनिस आणि घराबाहेर वेळ घालविण्याची आवड आहे. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतातही रुची आहे.
