पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे आपले आमदार देवेंद्र भुयार यांना कडक शब्दांत समज दिली आहे. देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य महिला व मुलींना वेदना देणारे आहे. ते चुकीचे बोललेत. त्यांना काल रात्रीच मी समज दिली असून, महिलांची माफी मागण्याचेही निर्देश दिलेत, असे ते म्हणालेत.बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य हे शेतकऱ्यांना अपमान वाटणारे होते, मी त्यासंदर्भात भुयारांशी बोललो. त्यांची चूक ती चूकच आहे. मी काल रात्री त्यांना बोललो तेव्हा देवेंद्र भुयारांनी मला सांगितले की दादा माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता, मला ऐवढंच सांगायचे होते की मुली शेतकऱ्यांना लग्नासाठी प्राधान्य देत नाही त्या नोकरी असलेल्या मुलाला प्राधान्य देतात.
महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.मधल्या काळात अतिशय दुर्दैवी घटना घडली . मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने काही पावलं उचलण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शक्ती अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंचशक्ती आहे
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, गुन्हेगारी, अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या रोखण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. शक्ती बॉक्स तक्रार पेटी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, ऑफीसमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये काही तक्रार असेल तर टाकतील. त्या तक्रारदारांचं नाव गुपित ठेवण्यात येईल.
बारामती पोलिसांसह बैठकीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांचं प्रबोधन आणि महिलांची सुरक्षा हा यामागचा उद्देश आहे. मुली, महिला यांच्याकडून ज्या तक्रारी येतील त्याची दखल घेतली जाईल. तर ज्या महिलेने, मुलीने तक्रार केली आहे त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.शक्ती बॉक्स अशी पेटीही आपण ठेवली आहे. मुलींचा होणारा पाठलाग, छेडछाड, आयडी लपवून फोन करणं या सगळ्या गोष्टी मुलींना सांगता येईल. खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, पोलिसस्टेशन, रेल्वे स्टेशन या आणि अशा सार्वजनिक ठिकाणी शक्ती बॉक्स ठेवण्यात येतील.
अजित पवार म्हणाले की, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावं ज्यांना वाटतं त्यासाठीच हा बॉक्स ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं स्लोगन आपण त्याला दिल्याचे अजितदादांनी यावेळी बोलताना सांगितले. तर 920939497 हा तो नंबर आहे. यावर एक कॉल केला तर मुली, महिलांना होणारा त्रास सांगता येईल. हा क्रमांक 24/7 तत्त्वावर सुरु असेल. या क्रमांकावर फोन किंवा मेसेज केल्यास त्या तक्रारीचं निवारण करण्याबाबत आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, 17 वर्षांच्यांना माहीत आहे आपण गुन्ह्यात अडकत नाही. त्यामुळे आता हे वय 14 वर वय आणता येईल याचा विचार सुरू आहे. बारामतीला काळिमा फासणारी घटना घडली, कोयत्याने एकाचा खून करण्यात आला. दोघेही 17 वर्षाचे आहेत.आताच्या काळात मूल स्मार्ट आहे. आपल्या काळात पाचवीत असताना विचारलेले प्रश्न लहान मूल आता विचारतो. ज्यांच्याकडे हत्यार सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सोशल मिडियावर जे लोक हत्यारे, कोयता, पिस्तूल घेऊन फोटो टाकतील त्यांच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.