Home Blog Page 66

खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

खड्डयामुळे मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे भरपाईबाबत दावा दाखल करता येणार-सोनल पाटील

खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन

पुणे, दि. ११: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी महत्वपूर्ण निकाल दिला आहे; नागरिकांच्या जीवन आणि सुरक्षिततेच्या अधिकाराचे रक्षण करणाऱ्या ऐतिहासिक निकालामध्ये नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य दिले असून नागरिकांनी खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबतची तात्काळ संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी केले आहे तसेच मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध उच्च न्यायालयात स्वतःच्या याचिकेवर निकाल देताना भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत रस्ते सुरक्षित स्थितीत ठेवणे ही नागरी आणि रस्ते निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संवैधानिक कर्तव्य आहे. खड्ड्यामुळे होणारे मृत्यू आणि अपघात, विशेषतः पावसाळ्यात, ‘एक वारंवार होणारी दुर्घटना’ बनली असून जी सहन केली जाऊ शकत नाही. राज्यातील खड्डे, उघडे मॅनहोल आणि असुरक्षित रस्त्यांच्या परिस्थितीमुळे होणाऱ्या मृत्यू आणि दुखापतीसाठी जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने पुढीलप्रमाणे व्यापक निर्देश निर्देश दिले आहेत.

पीडितांसाठी भरपाईः खड्डयांमुळे होणारे नागरिकांचे मृत्यू झाल्यास मृतांच्या कायदेशीर वारसांना ६ लाख भरपाई देण्यात यावी. जखमी झाल्यासः दुखापतीच्या तीव्रतेनुसार ५० हजार ते २ लाख ५० हजार रुपयादरम्यान भरपाई द्यावी. सदरची भरपाई दावा केल्यापासून सहा ते आठ आठवड्यांच्या आत देण्यात यावी. दिवाणी किंवा फौजदारी कायद्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही कायदेशीर उपायांव्यतिरिक्त पैसे दिले जातात.

तक्रार कुठे दाखल करावीः कोणताही नागरिक खड्डे, उघडे मॅनहोल किंवा असुरक्षित रस्त्याबाबत संबंधित महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत ऑनलाईन किंवा हेल्पलाइन तक्रार संकेतस्थळावर (पोर्टल) करावी. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता (रस्ते), तक्रार दाखल करावी तसेच जिल्हा विधी सेवा सेवा प्राधिकरणाकडे पीडितांना किंवा कुटुबिंयाना थेट दावे दाखल केल्यास त्यांना भरपाई किंवा उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यास मदत करण्यात येईल.

कारवाईकरिता जबाबदार अधिकारी : शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महामार्ग आणि आतरजिल्हा रस्त्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ग्रामीण भागातील रसत्याबाबत जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

देखरेख आणि अनुपालनः प्रत्येक प्राधिकरणाने तक्रारीबाबत त्वरित प्रतिसाद आणि समन्वयासाठी जबाबदार असलेल्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. जिल्हाधिकारी जिल्ह्यातील अनुपालनाचे पर्यवेक्षण करणार आहेत तसेच राज्य सरकार उच्च न्यायालयात नियतकालिक अनुपालन अहवाल सादर करणार आहे.

कारवाईचे स्वरूप : खड्डे आणि असुरक्षित रस्त्यांवरील सर्व तक्रारी ४८ तासाच्या आत निकाली काढाव्यात. कारवाई केल्याबाबतचे पुर्वीचे तसेच दुरुस्ती केल्यानंतरच्या कामाचे छायाचित्रित पुरावे सार्वजनिकरित्या अपलोड करावे. सदोष रस्त्याच्या कामासाठी जबाबदार असलेल्या निष्काळजी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांना पुढील गोष्टींना सामोरे जावे लागेल. यामध्ये विभागीय कारवाई आणि पीडितांना दिलेली भरपाई वसूल करणे आणि निष्काळजीपणामूळे मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास फौजदारी खटला चालविणे, वेळेत भरपाई देण्यास किंवा कृती करण्यास अयशस्वी झाल्यास महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा विभाग प्रमुख वैयक्तिकरित्या जबाबदार असतील.

सोनल पाटील, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण: ‘मृत्यू किंवा जखमी झाल्याबाबतच भरपाई मिळण्याकरिता साध्या कागदावर दावा दाखल करावा. त्यासोबत वैद्यकीय अहवाल, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याबाबतचा अहवाल जोडल्यास सुविधा देणे सोईचे होईल. विधी सेवा प्राधिकरणच्या जलदगतीने भरपाई मिळण्याकरिता स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिडीतांना न्याय आणि मदत सुनिश्चित करण्यासाठी मोफत कायदेशीर मदत करण्यात येईल. खड्ड्यांमुळे किंवा असुरक्षित रस्त्यांमुळे जीव गमावलेल्या किंवा जखमी झालेल्या पीडित किंवा त्यांच्या कुटुबियांना मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आवार, नवीन इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे, ईमेल dlsapune2@gmail.com, दूरध्वनी क्र. ०२०-२५५३४८८१, भ्रमणध्वनी क्र-८५९१९०३६१२ येथे संपर्क साधवा.’

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५-काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील ४ नोव्हेंबर २०२५ च्या आदेशान्वये पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२५ जाहीर करण्यात आला असून या कालावधीत काय करावे व काय करु नये ? याबाबतची मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केली आहे. काय आहेत मार्गदर्शक सूचना जाणून घेवू या लेखातून…

काय करावे व काय करू नये…

काय करावे… चालू असलेले कार्यक्रम, योजना पुढे सुरु ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण, मान्यता प्राप्त करण्यात यावी. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील नागरिकाकरिता सहाय्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील आणि यासंदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील.

मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समूचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना, निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडच्या वापर निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे. विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरे बाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत.

इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात देणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी अर्ज केले पाहिजेत व वेळीच अशी सवलत मिळविली पाहिजे. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिक्षेपक किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी योग्य परवानगी मिळविली पाहिजे. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचे सहाय्य मिळविण्यात यावे. कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची वेळ व जागा, मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरवणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणूक ज्या वस्तीमधून जात असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्या विषयी खात्री करुन त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधांचे अनुपालन करण्यात यावे.

मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू मिरवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत. मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पडावे यासाठी सर्वतोपरी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य देण्यात यावे. उमेदवार व त्याच्या अधिकृत कार्यकत्यांनी विहित परवानगी घेऊन योग्य असे बिल्ले व ओळखपत्रे, निवडणूक प्रशासनाकडून मिळवावीत व ती निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ती दर्शनी भागावर लावावीत.

मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या कागदावर देण्यात येतील य त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा निर्देश असणार नाही. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. राज्य निवडणूक आयोगाचे, महानगरपालिका आयुक्त यांचे अथवा जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा त्यांनी प्रधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याहीवेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रभाग दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. राज्य निवडणूक आयोग, आयुक्त, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबींविषयीचे निर्देश, आदेश, अनुदेश यांचे पालन करण्यात यावे.

काय करु नये….

शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनात पुढील कार्यालयाच्या वाहनाचा समावेश असेल, केंद्र शासन, राज्य शासन, केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगर परिषदा,नगर पंचायती, पणन मंडळ (कोणत्याही नावाचे), सहकारी संस्था, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या, ग्रामपंचायती, ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतवण्यात आला आहे अशी कोणतीही संस्था व संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य शासन, केंद्रीय पोलीस संघटना इत्यादीच्या मालकीची असलेली पुढील वाहने-मालमोटारी, लॉरी, टेंपो, जीपगाड्या, मोटारगाड्या, ऑटोरिक्षा, बसगाड्या, विमाने, हेलिकॉप्टर, जहाजे, बोटी, हॉवर क्रॉफ्ट व इतर सर्व वाहने. सत्तेमध्ये असलेला पक्ष, शासन यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये.

कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते आदी बांधण्याचे वचन देणे इत्यादी गोष्टी करु नयेत. शासन, सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करु नयेत. मंत्री (राज्यमंत्री व उपमंत्रीसहित) हे उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाहीत. निवडणूक मोहिम, प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये.

मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये. मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये. विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ज्यांचा खरेखोटेपणा पडताळून पाहिलेला नाही असे आरोप ठेवून किंवा त्यास विकृत स्वरुप देऊन इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका करण्यात येऊ नये. निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी साठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करण्यात येऊ नये. लाच देणे, आवजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहेत.

व्यक्तींची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नये. कोणत्याही व्यक्तीला, अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत आवारभिंत इत्यादींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवानगीखेरीज करणे, ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे इत्यादी करता येणार नाही. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खाजगी जागांचा समावेश असेल. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये किंवा मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये.

एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मिरवणूक काढण्यात येऊ नये. दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भित्तीपत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत. मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिसांच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षाजवळ प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये. ध्वनिक्षेपकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी 6 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 10 वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये. तसेच याबाबत असलेले The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मिरवणुकीत किंवा प्रचारफेरीत ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये. अशा सभा/ प्रचारफेरी रात्री 10 वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच घालून दिलेल्या अटींचे पालन करावे. याखेरीज, ती स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवश्यकतेचा स्थानिक दृष्टीकोन आणि हवामान, सणासुदीचे दिवस, परिक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असतील. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पैशाचे, मद्याचे, वस्तूंचे वाटप करण्यात येऊ नये.

संकलन:- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले:ब्रीच कँडीचे डॉक्टर म्हणाले- पुढील 72 तास खूप क्रिटिकल, मुलींना अमेरिकेतून बोलावले

0

मुंबई-सोमवारी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पुढील ७२ तास धर्मेंद्र यांच्यासाठी अत्यंत कठीण असतील.धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत, तर त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आले आहे.अलिकडेच त्यांच्या आगामी “इक्किस” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये त्यांनी दमदार अभिनय केला आहे.

आमिर खान यांना बोमन इराणी यांच्या हस्ते पहिला आर. के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार

0

ए. आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट २३ नोव्हेंबर २०२५ रोजी

पुणे – सुप्रसिद्ध संगीतकार–गायक ए.आर. रहमान ‘गहुंजे’ येथील एम. सी.ए स्टेडियममध्ये त्यांचा पहिलावहिला स्टेडियम कॉन्सर्ट घेऊन येत आहेत.ह्या कार्यक्रमात ए.आर. रहमान ह्यांच्या सोबतीला भारतातील सर्वश्रुत  प्रतिष्ठित गायक- हरिहरन, सुखविंदर सिंग आणि चिन्मयी- ह्यांच्या गाण्यांचा रसिक प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे.

ह्या कार्यक्रमात यावर्षीपासून सुरू होणारा “आर.के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार” चा पहिला मान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आमिर खान ह्यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.आर. के. लक्ष्मण यांच्या नावाने नव्याने सुरू होणारा हा पुरस्कार म्हणजे, कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा केला जाणार गौरव असणार आहे.

तसेच या पुरस्कारामुळे  हे अधोरेखित होणार आहे की, आर के लक्ष्मण यांच्यासारखी सर्जनशीलता, जिद्द, चिकाटी ज्या, कलाकारांमध्ये असणार आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या पुरस्कारामुळे लक्ष्मण यांचा सन्मान वर्षागणिक वाढत राहणार आहे.

ह्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन आर. के. लक्ष्मण ह्यांच्या कुटुंबाने केलेले आहे.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला, संस्कृती आणि संगीत एकत्र येत आहेत.

कार्यक्रमाची माहिती

दिनांक, रविवार,  २३ नोव्हेंबर, २०२५

प्रवेश – दुपारी ३:०० वाजता

कार्यक्रम सुरु – संध्याकाळी ५:०० वाजता

स्थळ – एम सी ए स्टेडियम, गहुंजे, पुणे

तिकीट विक्री – District by Zomato

आयोजक: R.K. IPR Management Pvt. Ltd.

‘सर्वधर्मीय स्नेहमेळावा’ उत्साहात 

क्रीडा,सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार होप मेडिकेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजन 

पुणे: होप मेडिकेअर फाऊंडेशनच्या वतीने होणारा “सर्वधर्मीय स्नेहमेळावा” ९ नोव्हेंबर २०२५ रोजी एडी कॅम्प चौक नाना पेठ येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय नहार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले तर डॅा.अमोल देवळेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुषमा अंधारे यांच्या हस्ते पार पडले.विविध क्रिडास्पर्धेतील विजेते संजय शर्मा,श्याम सहानी,स्वाती प्रसाद खोपकर,शब्बीर शेख,निलेश शिंदे,पूर्वा पाटील,अर्चना नायर,रोहित शर्मा तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे राजू पराड,प्रविण येवले, राजू सावंत,मिना भालशंकर,निवास लादे,डॉ.श्रीकांत कांबळे,अतुल भालेराव,शांतीनाथ चव्हाण,संजय रणपिसे,नाना कांबळे,रमेश तेलावडे,रियाज खान,सुरेश भालेराव,संजय शिरोळे,दत्ता भिसे,संजय सोनवणे,महेंद्र रोकडे,बाळासाहेब शिंदे,गिरिधारी शहानी,दत्तू कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मोहन जोशी,सुनिल कांबळे,रमेश बागवे,प्रशांत जगताप,रविंद्र माळवदकर,संजय मोरे,रफिक शेख,निलेश नवलाखा,ॲड.वैशाली चांदणे,डॅा.नित्यानंद ठाकूर,अमरनाथ सिंग,विकी फर्नांडिस,रामभाऊ पारिख,मायकल साठे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरानी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला सर्वधर्मिय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कौटुंबिक वातावरणात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत,आपलेपणाची भावना जपली.सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात सर्वधर्म समभावाचे महत्व यावेळीअधोरेखित केले.’सार्वजनिक कार्यक्रम केवळ औपचारिकता न ठरता  कौटुंबिक आपुलकीची संमेलने व्हावीत’,अशी अपेक्षा संजय नहार यांनी व्यक्त केली. वक्त्यांनी यावेळी पूर्व पुण्यातील सर्वधर्मीय सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या .डॉ.अमोल देवळेकर,डॉ.दीपा देवळेकर,डॉ.प्रज्ञावंत देवळेकर,डॉ.दीक्षा देवळेकर आणि  मित्र परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.

मोहन जोशी,सुनिल कांबळे,प्रशांतजगताप,रविंद्र माळवदकर,रफिक शेख,विशाल धनवडे,गजानन थरकुडे,प्रशांत बधे,तेजेंद्र कोंढरे,मेहबूब नदाफ,निकिता मारटकर,संदिप लडकत,प्रदिप गायकवाड,बाबा नलगे,सरहदचे संजय नहार,रविंद्र धंगेकर,रमेश बागवे,अरविंद शिंदे,शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे,शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे,रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण,चित्रपट निर्माते निलेश नवलाखा,ॲड.वैशाली चांदणे,डॅा.नित्यानंद ठाकूर,डॅा.योगेश असावा,डॅा.अरविंद जगताप,डॅा.प्रकाश वायकर,डॅा.गुरू टकले,डॅा.सिद्धार्थ शिंदे,अंकल सोनवणे,श्वेता-संग्राम होनराव,भाई जगताप,रमेश राक्षे,सुनिल निकुंभ,दया येसणे,सोनाली देवरे,संजय खोबरे,अमरनाथ सिंग,बाळासाहेब दरेकर,किशन सावतकर,शरद अष्टेकर,प्रतिक कालेकर,रवी शिंदे,संदिप पोळ,राजेश पाडळे,ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ पारिख,उत्तम भुजबळ,चंदन साळुंखे,रुपेश पवार,सनी गवते,पृथ्वीराज पंडीत,अपर्णा साठे यासोबतच मायकल साठे,कपिल गायकवाड,भारत चकाले,आशीष खरात,मारुती उदागे,विकास सोनताटे,रामदास सोनवणे,विकी फर्नांडिस,रामदास सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते

कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख पदी नियुक्ती अन बदली बनली वादग्रस्त

पुणे- पुणे महानगरपालिकेतील कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख तथा उपायुक्त या पदावरून अविनाश सकपाळ यांची केलेली बदली आणि त्यांच्या जागेवर रवी पवार यांची केलेली निवड वादग्रस्त ठरली असून अवघ्या ५ महिन्यात सकपाळ यांची बदली का केली ? असा सवाल करत नव्या नियुक्ती वर देखील काही प्रश्न आता आपले पुणे,आपला परिसर या संस्थेने उपस्थित केले आहेत.महापालिकेती माजी विरोधीपक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देऊन सकपाळ यांना त्यांची कारकीर्द पूर्ण होईपर्यंत कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख पदावरून दूर करू नये अशी मागणी केली आहे. आणि रवी पवार यांच्या नियुक्तीला हरकत घेतली आहे. सकपाळ यांची अवघ्या ५ महिन्यापूर्वीच या पदावर नियुक्ती झाली होती आणि गेल्या वर्षी ३९ हजार नव्या मिळकतींचा शोध घेतले गेला आणि त्यावर मिळकत कर आकारणी केली गेली,मात्र यंदा पाच महिन्यातच सकपाळ आल्यावर त्यांनी पाच महिन्यांमध्ये 43 हजार 566 इतक्या नवीन मिळकती या आपल्या कराच्या रचनेमध्ये आणल्या म्हणजेच या पाच महिन्यातच त्यांच्या कामाचे कौशल्य दिसले तरीही त्यांची बदली करण्याचे काहीही कारण दिसत नाही आणि ज्या रवी पवारांना या पदावर आणले आहे ते शासकीय अधिकारी आहेत.त्यांना हे खाते समजून घेता घेता ३ महिने जातील.मुळात सरकारकडून डेपुटेशनवर जे अधिकारी येतात ते मुंबई प्रांतिक अधिनियम कलम 45 B या अंतर्गत विशिष्ट पदावर नियुक्ती म्हणूनच येणे अपेक्षित आहे.तसे मात्र झालेले नाही ते इथे आल्यावर त्यांना महापालिकेत कर आकारणी खाते दिले गेले या बाबी वर केसकर,कुलकर्णी आणि बधे यांनी आक्षेप घेतला आहे.

नेमके त्यांनी दिलेल्या पत्रात काय म्हटले आहे वाचा जसेच्या तसे………


मा. नवल किशोर राम IAS
आयुक्त,
पुणे मनपा
यांसी सप्रेम नमस्कार
विषय: – पुणे महानगरपालिकेतील कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख तथा उपायुक्त या बदलीचा फेरविचार करणे बाबत.
माननीय महोदय,
श्री.अविनाश सकपाळ कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांची खात्याच्या अंतर्गत आपल्या अधिकारामध्ये बदली केली, तो आपला अधिकार आहे त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही.
मुळात सरकारकडून डेपुटेशनवर जे अधिकारी येतात ते मुंबई प्रांतिक अधिनियम कलम 45 B या अंतर्गत येणे अपेक्षित आहे. तशी नेमणूक आणि पाठवणूक होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
माहिती जाणून घेतल्यानंतर असे लक्षात आले गतवर्षीच्या मालमत्ता मूल्यमापन वर्षभरात 39 हजार इतके झाले तर गेल्या पाच महिन्यांमध्ये 43 हजार 566 इतक्या नवीन मिळकती या आपल्या कराच्या रचनेमध्ये आल्या.
अभय योजना असू नये ही आमची भूमिका परंतु आपण विकासासाठी पैसे कमी पडतात म्हणून जाहीर केली आम्ही जी सूचना केली होती की ज्यांनी एकदा अभय योजनेमध्ये लाभ घेतला आहे त्यांना पुन्हा सवलत देऊ नये हे देखील आपण मान्य केले. यापूर्वीच्या सर्व अभय योजनांना आम्ही विरोध केला होता. महानगरपालिकेचे भय हवे अभय नको ही आमची भूमिका होती आणि आहे.
अविनाश सकपाळ यांनी पाच महिन्यापूर्वीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
त्यांचे काम देखील चालू होते. अभय योजनेचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता.
नवीन नियुक्त रवी पवार यांना खाते समजून घेण्यासाठी पुढची दोन-तीन महिने नक्की जातील.
आमची विनंती आहे की आपण 31 मार्च 2026 पर्यंत विद्यमान उपायुक्त यांना त्यांच्या जागेवर कायम ठेवून त्यांच्याकडून योजना राबवून नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल 2026 नंतर नवीन रचना करावी.
ही विनंती
धन्यवाद.
आपले पुणे
आपला परिसर

उज्ज्वल केसकर
माजी विरोधी पक्षनेते

सुहास कुलकर्णी
माजी विरोधी पक्षनेते

प्रशांत बधे
माजी नगरसेवक
ukeskar@gmail.com
१०/११/२५

माध्यमांनी कायम विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे

गांधी दर्शन शिबिर गांधी भवन येथे संपन्न

पुणे:आपल्या देशात लोकशाहीचे अंधार युग सुरू आहे. लोकशाही आयसीयु मध्ये आहे. १९५२ ते २०२५ पर्यंत निवडणूक आयोगावर गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप कधीच झाला नव्हता. तो आता होतोय. लोकप्रतिनिधी, न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, पोलिस, यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडत असताना मिडीयाची भूमिका महत्वाची आहे. लोकशाही आयसीयू त जायला लोक देखील जबाबदार आहेत.
अशावेळी माध्यमांनी कायम विरोधीपक्षाची भूमिका बजावली पाहिजे. असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे रविवारी २५ वे ‘गांधी दर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी ‘माध्यम आणि सद्यपरिस्थिती’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपले विचार मांडले.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर यांनी ‘निवडणूक सुधारणेतील गैरप्रकार आणि अपेक्षित सुधारणा यावर विचार मांडले. तर ‘गांधी विचार आणि मी’ याबद्दल मनसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांचे व्याखाने झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अन्वर राजन होते. व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते.
निखिल वागळे म्हणाले की, प्रश्न विचारायला शिका हे आम्हाला पत्रकारितेतील गुरुंनी सांगितले. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश लढले. पत्रकारांना भारतीय घटना शिकवण्याची गरज आहे. धर्मांधता, जातीयता याला पत्रकारांनी विरोध करायला हवा. सर्व समाज निद्रिस्त होतो तेव्हा कोणीतरी जागा होतो व सर्व देशाला जागा करतो त्यावर माझा विश्वास आहे. आपल्या देशात नेपाळ, बांगलादेश प्रमाणे हिंसक आंदोलने व्हावे असे मला वाटत नाही. मात्र लोकशाही आंदोलन व्हावे असे वाटते. चुकीच्या निर्णयांविरोधात मंत्री, अधिकारी यांच्या गाड्या आडवणे, उपोषण करणे अशी आंदोलने झाली पाहिजेत.

जयंत माईणकर – आपण पंतप्रधानांना प्रश्न विचारु शकत नाही. ही हुकुमशाही कडे वाटचाल आहे. पण नेहरुंनी या देशाच्या लोकशाहीचा पाया इतका मजबूत घातला आहे की, तो कोणालाही संपवता येणार नाही.

चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे असतो. यंत्रणेचा योग्य वापर केला तर निवडणूक निःपक्षपाती होवू शकते.

डॉ. रुपेश पाटकर म्हणाले की, भावनिक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी माणसाने माणसाशी बोलले पाहिजे. गांधीजीकडुन मला हे समजले की, तुमच्या गरजा संपून जे उरते ते समाजाला द्या. गरजे पेक्षा जास्त साठवणे म्हणजे चोरी असे गांधी म्हणत. माझ्या कृतीतून तुम्ही पाहिलेल्या सर्वात गरजू माणसाला काय मदत होईल असा विचार करा. आणि त्याचे उत्तर होकारार्थी असेल तर ती कृती करा.

अन्वर राजन – कोणीतरी अवतार येईल व सुटका करेल यावर आमचा विश्वास नाही. बदल आपोआप होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपण लोकशाही वाचवणारे सैनिक आहेत. लढत राहिले पाहिजे. आमचा प्रयत्न लोकांना सहभागी करून घेणे हा आहे. लोकशाही ही जीवन प्रणाली आहे. ती प्रगल्भ व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम त्याचाच भाग आहे.तेजस भालेराव यांनी सुत्रसंचालन केले.

फडणवीसांचे मोठे घोटाळे अजित पवारांकडे..त्यामुळे ते पार्थना वाचवणार : सपकाळ

मुंबई–अजित पवार यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे घोटाळे आहेत. त्यामुळेच सरकार पार्थ पवारांना वाचवणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यात दलाल हे सरकार चालवत आहेत. अजित पवारांनी पुणे जमीन घोटाळा प्रकरणी तत्काळ राजीनामा द्यावा. पण हे बेशरम सरकार आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. ते बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलत होते.

सपकाळ म्हणाले, पुणे, मुंबईच नव्हे तर तालुका पातळीवरसुद्धा जमीन घोटाळ्याचे रॅकेट सक्रिय आहे. पुण्यातील व्यवहारांमागे मोठ्या नेत्यांचा हात आहे. अजित पवारांकडे देवेंद्र फडणवीस यांचे अनेक मोठे घोटाळे आहेत. त्यांनी स्वतः ज्या जमिनी लाटल्या आहेत, त्याचे किस्से अजित पवारांकडे आहेत. झोटिंग कमिटीचे अहवाल दुर्लक्षित केले जातात, पण दोषींना क्लीन चिट दिली जाते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी ईडीकडे जावी आण सर्वोच्च न्यायालयानेही दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही सपकाळांनी तीव्र शब्दांत टीका केली. शंभर वर्षांनंतरसुद्धा संघाने ठरवून घ्यावे की त्यांचे उद्दिष्ट नेमके काय आहे? मोहन भागवत नेहमी संभ्रमात असतात. आज त्यांचा प्रभाव ना भाजपवर राहिलेला आहे, ना महाराष्ट्राच्या राजकारणावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संघाचं ऐकत नाहीत. ७५ वर्षांनंतरच्या रिटायरमेंटचा सल्लाही त्यांनी फेटाळला. फडणवीस यांना अजित पवारांना सोबत घेऊ नका, असे सांगितले, तरी त्यांनी घेतले. त्यामुळे आज संघ आणि मोहन भागवत रबर स्टॅम्पपेक्षाही कमी किंमतीचे ठरले आहेत, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

राज्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना सपकाळ म्हणाले, महाविकास आघाडी युतीबाबत राज्यस्तरावर अजून निर्णय नाही. स्थानिक नेतृत्वाला अधिकार देण्यात आले आहेत. १२ नोव्हेंबरला सर्व निर्णय जाहीर होतील. मनसेसोबत युतीच्या चर्चांबाबत त्यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही प्रस्तावाची धुसर शक्यताही नाही. प्रस्ताव आला, तर तो राष्ट्रीय पातळीवर चर्चा करूनच ठरवला जाईल. ते म्हणाले, इंडिया आघाडी ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अनेक पक्ष या आघाडीत सहभागी आहेत आणि एकत्रितपणे निर्णय घेत आहेत.

पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी महिलांनी बांधले गळ्यात खिळ्यांचे पट्टे!

पुणे- पुणे जिल्हा, विशेषतः शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. बिबट्यांच्या हॉटस्पॉटमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने शेतात जाणे त्यांना अनिवार्य आहे. मात्र, बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यातून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ आता अनोख्या आणि प्रभावी उपाययोजना करत आहेत. बिबट्या सहसा मानेवर हल्ला करून शिकार करत असल्याने, महिलांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या जिवाचे रक्षण करण्यासाठी एक विचित्र पण गरजेचा मार्ग निवडला आहे.

या संकटकाळात पिंपरखेड येथील महिलांनी थेट टोकदार खिळे असलेला पट्टा आपल्या गळ्यामध्ये घातला आहे. जसे पाळीव कुत्र्यांना बिबट्यांपासून वाचवण्यासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांनी आणि महिलांनी हा उपाय अवलंबला आहे. शेतात काम करताना बिबट्याने अचानक हल्ला केल्यास, मानेवर असलेल्या या खिळ्यांच्या पट्ट्यामुळे बिबट्याला गंभीर दुखापत होईल आणि त्याची पकड ढिली होऊन जीव वाचू शकेल, अशी त्यांची धारणा आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून जीव वाचवण्याचा हा अगतिक आणि धाडसी निर्णय पुणे जिल्ह्यातील वाढत्या वन्यजीव-मानव संघर्षाची तीव्रता दर्शवतो.

बिबट्याच्या हल्ल्यांमुळे होणारे वाढते मृत्यू पाहता, राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. बिबट्याच्या दहशतीतून जीव वाचवण्यासाठी आणि शेतीचे काम सुरू ठेवण्यासाठी, हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर आता पाळीव कुत्र्यांप्रमाणे टोकदार खिळ्यांचे पट्टे गळ्यात घालण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी असे धोकादायक आणि जुजबी उपाय करावे लागणे, हे लोकशाहीतील मूलभूत संरक्षणाच्या अपयशाचे प्रतीक आहे.

बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती घोषित करावा- अमोल कोल्हे

यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, कबूतरांच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेतली होती. पण इकडे बिबट्याने 57 बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली. आम्हाला त्यासाठी रास्तारोको करावे लागले. आमची मागणी आहे की बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती घोषित करावा. तसे जर केरळ सरकार घोषित करत असेल मग आपल्या मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे? असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ग्रामस्थांच्या त्रासाला कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना, वन विभागाच्या पथकाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला. बिबट्याला पकडण्यासाठी प्रथम त्याला डार्ट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो निशाणा चुकला. या अयशस्वी प्रयत्नामुळे बिबट्या अधिक सावध झाला आणि त्याने थेट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली.

कर्मचाऱ्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी, शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावर तीन राऊंड गोळीबार केला, ज्यात तो बिबट्या जागीच ठार झाला. हा बिबट्या अंदाजे 6 वर्षे वयाचा नर जातीचा होता आणि त्याच्या नमुन्यांवरून व ठशांवरून हाच बिबट्या 13 वर्षीय रोहनचा जीव घेणारा नरभक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहनचा जीव घेतला होता त्या ठिकाणापासून केवळ 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आले. वन विभागाच्या या कारवाईमुळे पिंपरखेड परिसरातील दहशत काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

फडणवीसांच्या खात्यावर पैसेच नसतात…: अमृता फडणवीस

मुंबई-राज्यात शेकडो कोटींच्या उलाढाली राजकारणी करतात , हजारो कोटींचे प्रकल्प उभारतात ,जमीन घोटाळे बाहेर येतात असे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी तर .. चक्क देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर पैसे नसतात , आमदार म्हणून मिळणारा पगार कुठे जातो तेही समजत नसल्याचे म्हटले आहे .आणि आपल्याला ,’ जे लोक पाठित खंजीर खुपसतात अशांचा जास्त राग येतो. जे लोक धोका देतात त्यांचा राग येतो.असेही म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कर्ली टेल्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. वर्षा बंगल्यात दिवसाची सुरुवात कशी होते इथंपासून ते घरात कोण कोण असतं? कुणाच्या सवयी कशा आहेत यांसारख्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.
फडणवीस यांना मध्यरात्री उठून किचनमध्ये जाऊन कायतरी खायची सवय आहे. त्यांच्या आवडीचे चॉकलेट खातात असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.मोदींना की फडणवीसना मत देणार असं विचारलं असता अमृता फडणवीस यांनी मोदीजींना मत देईन असं सांगितलं. मी फक्त एकाच व्यक्तीची फॅन आहे, ते म्हणजे मोदीजी. मोदीजी आवडते व्यक्ती आहेत असं त्या म्हणाल्या. सर्वाधिक राग कशाचा येतो या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, पाठित खंजीर खुपसणाऱ्यांचा जास्त राग येतो. जे लोक धोका देतात त्यांचा राग येतो.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? लग्नानंतर प्रत्येकाचं आयुष्य बदलतं, तुमचंही बदललं का? कसं? या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, दिविजाचा जन्म झाल्यानंतर तिच्यासाठीच सगळं असं ठरलं. पण देवेंद्रजींनी त्यावेळी नोकरी न सोडता तिच्यासोबत वेळ घालव असं सांगितलं. तिनं पहिली पावलं टाकली तेव्हा मी ते मोबाईलवर पाहिलं.

लग्नानंतरही काम करता आलं. फडणवीसजी आमदार होते तरी मी काम करत होते. स्वत:च्या पैशांची गुंतवणूक कशी करायची हे मला यामुळे शिकायला मिळालं असंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं. बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव असल्यानं फडणवीस आर्थिक बाबतीत सल्ला घेतात का? असं अमता फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या की, माझ्या पैशांचं नियोजन मीच करते, घरच्या पैशांचंही नियोजन करते. देवेंद्र यांच्याकडे खात्यावर पैसेच नसतात. मीच पैसे वाचवते आणि गुंतवणूक करते. आमदार म्हणून फडणवीसजींना जे पैसे मिळतात तेही कुठे जातात माहिती नाही. मी कधी त्याबाबत विचारलंही नाही.

फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा काय वाटलं? कशी प्रतिक्रिया होती? असा प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, फडणवीस पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा दिविजाचा जन्म झालेला. त्यावेळी लोक म्हणायचे की ते मुख्यमंत्री होणार आहेत. मी बोलायचे की काय बोलत आहात, असं बोलू नका, अशा अफवा पसरवू नका. गंमतीने बोलतायत असं वाटायचं. पण खरंच बनले तेव्हा सरप्राइज होतं. मोदींनी तो निर्णय घेतला होता.

राज्यातील महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या-माजी आमदार मोहन जोशी

भाजपला बॅलेट पेपर
का नकोत ?

पुणे : राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (मत पत्रिका) घ्याव्यात, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (रविवारी) निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.

ईव्हीएम मशिन्स नादुरुस्त आहेत, अपुरी आहेत, अशा बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. निवडणूक यंत्रांमधील ही त्रुटी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या वेळी तसेच महापालिका निवडणुकीच्या वेळीही रहाण्याची शक्यता आहे. व्हिव्हिपॅट मशीनबाबतही मतदारांच्या मनात शंका आहेत. मतदान पारदर्शी होण्यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरच वापरावा, असे मोहन जोशी यांनी निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणूक जिंकू, अशा डरकाळ्या आत्तापासूनच फोडत आहेत. सत्तेतील मित्रपक्षांनाही बाजूला ठेवून स्वबळावर निवडणूक लढण्याची खुमखुमी भाजपला आहे. मग ते बॅलेट पेपरवर निवडणुका नकोत, असे का म्हणत आहेत? त्यांना कशाची भीती वाटते? असा सवाल मोहन जोशी यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

साधारणपणे अडीच वर्षानंतर महापालिका निवडणुका होत आहेत. त्या निःपक्ष आणि पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे.

बोगस मतदारांची नावे यादीत घुसवणे, मतदार वगळणे, असे अनेक गैरप्रकार करून भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुका जिंकल्या. ही मतचोरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघडकीस आणली. त्यानंतर मतदारांमध्ये जागृती झाली असून, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी मतदारांकडूनही जोरात होत आहे, असेही मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जीवनात सत्त्व, तत्त्व आणि ममत्वाची त्रिसूत्री महत्त्वाची-द्वारका जालान

– लायन्स क्लबतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आनंद मेळावा

पुणे: जीवनात कधीही निराश होऊ नका, कारण प्रत्येक समस्येला उत्तर असते. त्यासाठी आपल्या आहारात सत्त्व, जगण्यात तत्त्व आणि बोलण्यात ममत्व, या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असा सल्ला प्रसिद्ध वक्ते आणि लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल द्वारका जालान यांनी दिला. जीवनातील कुठल्याही समस्येचा सामना करताना, ‘गिव्ह अप’ न करता सातत्याने पाठपुरावा केल्यास मार्ग सापडतो, यावर विश्वास ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले.

लायन्स क्लबच्या ‘हाक दिव्यांगांची, साथ लायन्स’ची या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसाठी विशेष आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात द्वारका जालान यांनी ‘चलती रहे जिंदगी’ या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लायन रमेश शहा, लायन दीपक शहा, लायन सीमा दाबके हे मान्यवर व्यासपीठावर होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात हा आनंद मेळावा झाला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या पाच संस्थांचा प्रातिनिधिक सत्कार करताना त्यांना उपयुक्त वस्तूंच्या संचाचे वाटप करण्यात आले.

द्वारका जालान यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीतील भाषणाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. मोबाईलने उपयुक्ततेपलीकडे जात आपले जगणे निष्क्रीय केले आहे, असे सांगून ते म्हणाले, जीवन रोज नव्याने मिळते आणि मृत्यू एकदाच येतो, हे लक्षात ठेवून, रोज जीवनाचा नव्याने आनंद घ्यायला शिकले पाहिजे. जन्म आमि मृत्यू यांच्यामधले जीवन हसत, आनंदाने जगण्याचा पर्याय निवडला पाहिजे. जीवन वाया घालण्यापेक्षा आस्वाद घेणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही परिस्थितीत निराश होऊ नका, पाठपुरावा करत राहा. तक्रारी करण्यापेक्षा स्वीकार करा आणि जीवन आनंदी कसे होईल, इकडे लक्ष द्या. दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षक या मुलांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि गौरवाची भावना व्यक्त केली.

संदीप खर्डेकर म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना कधी कधी कुटुंबीयही नाकारतात, पण त्यांचे शिक्षक मात्र देवदूताप्रमाणे त्यांच्यासाठी काम करतात. एरवी दिव्यांगांचे शिक्षक दुर्लक्षित, उपेक्षित राहतात, पण लायन्स क्लबच्या या उपक्रमाच्या माध्यमातून या सेवाव्रती शिक्षकांना दिलासा देण्याचे कार्य सुरू आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

रमेश शहा म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षक अनेकदा उपेक्षित राहतात. प्रत्यक्षात ते सर्वांत महत्त्वाचे कार्य करतात. विशेष कौशल्याने ते अध्यापन करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळावी, यासाठी हा आनंद मेळावा आयोजित केला आहे.

सीमा दाबके यांनी प्रास्ताविकात आनंद मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. या समारंभात ५० पेक्षा अधिक संस्थांना उपयुक्त वस्तूंचा संच भेट देण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. नामदेव गरूड यांनी ब्रेल लिपीच्या माध्यमातून मान्यवरांचा परिचय करून दिला. मेघना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

मेळाव्याच्या उत्तरार्धात म्यूझिकल तंबोला सादर करण्यात आला. सुहास दाबके, पूनम अष्टेकर, प्रीतम गांधी, महेंद्र शर्मा, विजय रोडे, संगीता झंवर, अनघा शहा, प्रवीण खुळे, मिलिंद तलाठी, सुरेश मेहता, शेखर शेठ, अनिल मंद्रुपकर, सुवर्णा सांडभोर, हर्ष नायर आदी उपस्थित होते.

अमरावती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

१२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान होणार स्पर्धा : ११६० खेळाडूंचा सहभाग

मुंबई, : महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ परिमंडलातील ११६० खेळाडू आठ संघाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. 

वीज कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद अमरावती परिमंडलाकडे आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. १२) सकाळी ९.१५ वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे (कोकण प्रादेशिक विभाग) व श्री. आदित्य जीवने (छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग), संचालक श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य) व श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष व नागपूर प्रादेशिक संचालक श्री. परेश भागवत, स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, अॅथलेटिक्स, कॅरम आणि ब्रिज आदी २२ क्रीडा प्रकारांचा समावेश असून वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेते व उपविजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वसाधारण विजेत्या संघाला अजिंक्यपदाचा करंडक प्रदान करण्यात येईल. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. १५) दुपारी ५ वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडासंकुलात होणार आहे.  

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री. अशोक साळुंके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व आयोजन समितीचे सचिव श्री. मधुसूदन मराठे तसेच विविध समित्या पुढाकार घेत आहेत. 

वा रं पठ्ठ्या… आई-वडलांचं नाव काढलंस!

0

पुत्रं असावा ऐसा… ज्याचा तिन्ही लोकी झेंडा- ना. चंद्रकांतदादा पाटील

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे ना. चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पालकत्व

लोकसहभागातून घर आणि शिक्षणासह स्वतःच्या पगारातून दरमहा ५० हजार देण्याची घोषणा

पुणे- 9 नोव्हेंबर – घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहरिन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक कमावणाऱ्या सनी फुलमाळीचं आयुष्यच पालटलं आहे. लोहगाव मधील पालावर राहून कुस्तीमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतले आहे. लोकसहभागातून घर आणि सरावासाठी तालीम, शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आणि स्वतःच्या पगारातून दरमहा ५० हजार देण्याची घोषणा ना. पाटील यांनी केली.

ना. पाटील यांनी सुवर्ण पदक विजेत्या सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगाव मधील पालावर जाऊन भेट घेत अभिनंदन करुन त्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केलं. यावेळी सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॅाबी टिंगरे यांच्यासह भागातील नागरिक आणि पालावरील बांधव उपस्थित होते.

सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद आहे. आज त्याने आपल्या कामगिरीने आई-वडिलांचं नाव काढलं आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने ही कामगिरी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, सनीला लोकसहभागातून घर आणि कुस्तीच्या सर्वांसाठी तालीम बांधून देणार आहे. त्यासोबतच शिक्षणासाठी ही सर्वतोपरी मदत करणार असून, माझ्या आणि पत्नीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाहासाठी दरमहा ५० हजार रुपये देणार असल्याची घोषणा ना. पाटील यांनी यावेळी केली. तसेच, त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्यासोबतच कुस्तीकडे लक्ष केंद्रित करावे. आणि ॲालिम्पिक मध्येही सुवर्ण कामगिरी करावी, अशी इच्छा व्यक्त केली.

भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे स्वामी धनगर, शरद माकर, किशोर शिंदे, अरविंद देवकर यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधल्यामुळे सनी फुलमाळीचे कर्तुत्व आज सर्वांसमोर आलं आहे. त्याबद्दल भटके विमुक्त विकास परिषदेचे आभार मानतो व अशा सगळ्या विषयांमध्ये आम्ही संघटनेला सर्व प्रकारची मदत करू असे उद्गार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

१७ वर्षाखालील खेळाडुंनाही शासकीय नोकरीसाठी पाठपुरावा करणार- ना. पाटील

आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मा. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यापूर्वीच निर्णय झालेला असून, राज्यभरातील असंख्य खेळाडुंना त्याचा लाभ झालेला आहे. मात्र सदर निर्णय हा १७ वर्षांवरील खेळाडूंना लागू आहे. त्यामुळे सनीच्या निमित्ताने १७ वर्षा खालील खेळाडुंनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी मा. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

1 रुपयाचा व्यवहार न करता कागद कसा तयार झाला?:मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचा सवाल

बारामती- मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे माध्यमांसमोर आपल्यावरील आरोपांचे ‘शल्य’ बोलून दाखवले. निवडणुका सुरु झाल्या की आमच्यावर आरोप होतात. याआधी देखील माझ्यावर असेच आरोप झाले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र बदनामी झाली, असे अजित पवार म्हणालेत.मुंढवा प्रकरणातील कथित कागदपत्रांवर आश्चर्य व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, “1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो? हे आजपर्यंत मला कळलेले नाही. मी पण आश्चर्यचकित झालो. या प्रकरणातील नोंदणी प्रक्रियेवर त्यांनी थेट बोट ठेवत प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला. ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने ही नोंदणी केली, त्याने अशी नोंदणी कशामुळे केली? काय असे घडले की त्याने चुकीचे काम केले? असा सवाल त्यांनी केला. याविषयीची वस्तूस्थिती एका महिन्यात कळेल, असेही सूतोवाच त्यांनी केले.

मुंढवा आणि बोपोडी येथील कथित शासकीय जमीन खरेदी प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या जमिनीचा व्यवहार अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केला असून, १८०० कोटींची जमीन ३००कोटींत खरेदी केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झाला असला, तर पार्थ पवारांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना धारेवर धरले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व प्रकरणावर आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला .

विरोधकांकडून होणारे आरोप हे निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक केले जातात, असे शल्य अजित पवार यांनी बोलून दाखवले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तूस्थिती समोर येईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. कुठूनतरी, काहीतरी असे काहीतरी बाहेर आणले जाते.

यावेळी त्यांनी २२०८-०९ मधील ७० हजार कोटींच्या आरोपांची आठवण करून दिली. तुम्हाला आठवत असेल तर २००८ अथवा २००९ मध्ये असंच माझ्याविरोधात ७० हजार कोटींचा आरोप झाला. त्याला १५ /१६ वर्षे लोटली. त्यातून कुणीही काहीही पुरावे देऊ शकले नाही. पण आमची बदनामी झाली, असे अजित पवार म्हणालेत.आपण पारदर्शकपणे काम करत असताना, केवळ राजकीय हेतुने बदनामी केली जाते, याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची कामं करायची. पारदर्शकता कशी राहील ते बघायचे. नियमाला धरून सगळे करायचे… चूक होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि लगेच बारामतीतील कुठल्या कुठल्या जमिनीचे काहीही काढायला लागले,” असे ते म्हणाले. तसेच माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतही सांगितले, पुण्यातही आणि आता इथे ही सांगतो की माझ्या नावाचा वापर करून, मग माझे जवळचे नातेवाईक, कार्यकर्ते, अधिकारी असतील, त्यांनी जरी यदाकदाचित काही सांगितले, ते जर नियमाला धरून नसेल, तर संबंधित अधिकाऱ्याने ते काम करता कामा नये, असा सज्जड दम अजितदादांनी या पत्रकार परिषदेतून दिला. क्लास वन, टू आणि सर्व अधिकारी, आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांनी नियमात न बसणारे काम न करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.