पुणे- शरद पवार यांच्या समवेत बोपदेव घाटाची पाहणी केल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि येथील अनेक कमतरतांकडे लक्ष वेधले त्याच सोबत क्राईम का वाढलेय ? असा सवाल करत त्याबत आपले मत मांडले पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटलेय ….
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण: आरोपी सापडेनात… पत्रकारांवर काढला राग
पुणे- सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यात मागील चार-पाच दिवसांत सपशेल अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आता आपले नैराश्य पत्रकारांवर काढण्यास सुरुवात केली आहे. आपले तपासाचे ‘कौशल्य’ उघडे पडल्याने पोलिसांनी पत्रकारांनाच दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र मंगळवारी बोपदेव घाट परिसरात पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरण घडलेल्या घटनास्थळाला भेट दिली. यावेळी, वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. तसेच, काही प्रसार माध्यमांना भेदभावाची वागणूक केली. पोलिसांनी प्रसार मध्यमांबाबत घेतेलेली भूमिका निषेधार्ह असून संबंधित पोलिसांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद
- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन
सांगली, दि. 8 : दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केला आहे. साहित्यप्रेमी म्हणून डॉ. भवाळकर यांच्या निवडीचा आपणास व्यक्तिशः आनंद झाला असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांच्या निवासस्थानी भेटून डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
माणसाचं मन आणि स्त्रीचं हृदय जाणवून देणारे असं वेगळंच रसायन म्हणजे डॉ. भवाळकर आहेत. संतसाहित्य, स्त्री संतांचे मनोगत, सीतेचे मनोगत त्यांनी समर्थपणे मांडले आहे, असे सांगून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, विचारांची बीजं रूजून परत आपल्यापर्यंत पोहोचायला हवीत. स्त्रियांच्या समुहाबरोबर साहित्य पुढे नेणे, विचार पुढे नेणे, प्रश्न समजून घेण्याची क्षमता तयार होणे आणि अश्रूंच्या पलीकडे पोहोचून अश्रू बदलण्याचे सामर्थ्य मिळण्याचे काम साहित्यातून होत असतं. तारा भवाळकर यांच्या रूपाने झालेली ही निवड आनंददायी असल्याचे त्या म्हणाल्या.
मराठी पाऊल पडते पुढे…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, या माध्यमातून मराठी पाऊल पडते पुढे, अशी आनंदाची प्रतिक्रिया विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी 2013 पासून प्रयत्न सुरू होते. राज्य शासनाने सातत्याने मांडणी केल्याने आपले स्थान, शक्ती समोर आली. दर वेळीच्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत ठराव असायचा. मात्र, आगामी साहित्य संमेलनात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, आता पुढील नियोजन करायचे आहे. ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांचे तसेच राज्य शासन आणि केंद्र शासनाचे त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.
कॅब दरवाढीसाठी आरटीओ समोर ठिय्या आंदोलनमाँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य ; बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करा
पुणे : कॅब दरवाढीसाठी मागील एका वर्षापासून दिनांक ९ सप्टेंबर २०२३ पासून सातत्याने पाठपुरावा करुनही कोणतीही कार्यवाही झाली नसून आरटीए, पुणे यांनी निश्चित केलेले टॅक्सीचे दर पत्रक आजपर्यंत अंमलात आणलेले नाही. ते त्वरीत अंमलात आणावे, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी मॉं साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वर्षा शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येने कॅब चालक उपस्थित होते.
वर्षा शिंदे पाटील म्हणाल्या, पुणे आरटीए ने निश्चित केलेले दर पत्रक सर्व कंपन्यांना लागू करावे, ज्या मुजोर कंपन्या आरटीए प्रमाणे दर लागू करणार नाहीत, त्या कंपन्यांचे अॅप मोबाईल प्ले स्टोअर वरुन काढून टाकावे, गोवा राज्यासारखे पुण्यात देखील टॅक्सी मीटर द्यावे, एव्हरेस्ट प्लीट ई-कॅब बंद कराव्या आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणा-या पांढ-या प्लेट च्या गाडया बंद कराव्या, अशा मागण्या आम्ही आरटीओ यांच्याकडे करीत आहोत.
त्या पुढे म्हणाल्या, सर्व मागण्यांकरिता दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यातील ९ हजार कॅब चालकांनी व मालकांनी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी आठ दिवसात निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. मात्र, आजपर्यंत कॅब चालक व मालकांना न्याय मिळालेला नाही. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास संघटनेचे ५ हजार सभासद रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील. काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही वर्षा शिंदे पाटील यांनी दिला.
- सीएनजी चे दर वाढले तरी देखील गाडी भाडे तेवढेच
ड्रायव्हर हा एक दुर्लक्षित घटक आहे. सन २०१४ ला सीएनजी चा दर हा ४३ रुपये होता आणि गाडी भाडे हे ९ ते १० रुपये किलोमीटर होते. आज २०२४ मध्ये सीएनजी चा दर ९९ रुपये आहे. तरी देखील गाडी भाडे हे ९ ते १० रुपये किलोमीटर आहे. बाजारामध्ये वस्तूंचे दर वाढत आहेत. मात्र, चालक-मालकांच्या गाडीभाड्यामध्ये कधीच वाढ होत नाही. यांच्याकडे सरकारचे का दुर्लक्ष होत आहे ? हे या देशाचे नागरिक नाहीत का ? असा प्रश्नही वर्षा शिंदे पाटील यांनी उपस्थित केला.
आजी आजोबांनी लुटला गरबा आणि दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद
निसर्ग छाया यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवरात्रीनिमित्त विशेष आयोजन
पुणे : आयुष्यभर मुलांसाठी जगताना ते स्वत: मात्र जगणे विसरुन जातात. आयुष्याच्या उत्तरार्धात येता येता स्वत:साठी जगायला वेळ तर मिळतो, परंतु शारीरीक मर्यादा ही येतात. अशा वेळी विविध व्याधींमुळे सगळ्यांसोबत बाहेर गर्दीमध्ये जाऊन उत्सवाचा आनंद घेता येत नाही. अशा समवयस्क ज्येष्ठ नागरीकांसाठी नवरात्रीनिमित्त विशेष गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्याची सायंकाळ आनंदाने जगू पाहणाऱ्या ज्येष्ठांनी कार्यक्रमात दांडिया मनमुराद आनंद लुटला.
निसर्ग छाया संस्थेच्या वतीने भूगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर, मंदार देवगावकर, जयंत दशपुत्रे, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.
नगाड़ा संग ढोल बाजे…सबसे बडा तेरा नाम शेरोवाली… ढोलीडा… ‘उड़ी उड़ी जाए’… पंखीडा… सनेडो…पंखिडा ओ पंखिडा… रंगीलो म्हारो ढोलना या गाण्यांवर दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद ज्येष्ठ नागरिकांनी लुटला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पोटानंतर, मनाची आणि त्यानंतर बुद्धीचा भूक असते. या सगळ्यानंतर आत्म्याची भूक निर्माण होते. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ नागरिकांनी हताश होऊन न बसता, बाहेर पडून आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यायला हवा.
अमृता देवगावकर म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांना नवरात्रीमध्ये बाहेर गर्दीत जाऊन दांडिया खेळण्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने मनसोक्त आनंद घेत आपल्याच वयाच्या मित्रमैत्रिणींसोबत दांडिया गरबा खेळता यावा यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आंधळे समाजकारण आणि दिशा चुकलेला धर्म ही भारताची अवस्था
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस ; श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे लेखिका-कवयित्री यांचा सन्मान सोहळा
पुणे : भारतातील वातावरण अशुद्ध झाले आहे. धर्म व्यवस्था विस्कळीत झाली आहे. राजकारण भ्रष्ट, समाजकारण आंधळे आणि दिशा चुकलेला धर्म अशी समाजव्यवस्था झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर नारीशक्ती ने घरापुरते राहून चालणार नाही. त्यांना विश्वाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवावा लागेल. आज विश्व आणि विश्वाची मानवता धोक्यात आहे. युद्धाच्या संघर्षाच्या वातावरणात मानवता भयभीत झाली आहे. धर्म तर माणसाला जगवतो परंतु आज धर्म हा माणसाच्या मरणासाठी कारणीभूत ठरतो आहे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अगरवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात लेखिका-कवयित्री यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अगरवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अगरवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अगरवाल, डॉ. तृप्ती अगरवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर उपस्थित होते. इंदुमती जोंधळे, सुनीताराजे पवार, प्रा. नीला कदम, डॉ. ज्योती देशमुख, संगीता पुराणिक, डॉ. श्रुती पानसे, अश्विनी साने, ॲड. आकांक्षा पुराणिक, नताशा शर्मा यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, जगातील अर्धी जनता नारीशक्ती आहे. तिला देवीचे रूप आपण दिले आहे. नारीला ग्रंथामध्ये गोंजारले, मंदिरामध्ये गोंजारले परंतु घरामध्ये मात्र तिला अत्यंत दुर्दैवी करून ठेवलेले आहे. रस्त्यावरती तिची लक्तरे काढलली आहेत ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अजूनही माणसांमध्ये पशुत्व कायम असेल आणि अजूनही रानटी माणूसच शिल्लक असेल तर मग पुन्हा एकदा आपल्याला सर्व संस्कृतीची सुरुवात करावी लागेल. यासाठी साहित्य, विज्ञान, शिक्षण, धर्म आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले. घर आणि शाळा या संस्काराचे केंद्र झाले पाहिजेत. मुलांच्या संस्काराची जबाबदारी शेवटपर्यंत आई-वडिलांचीच असते. ज्या समाजाचे चारित्र्य अव्वल असते त्या देशाचे भवितव्य अव्वल असते.
कालीमातेचा फारसा उल्लेख आपण करत नाही पण स्त्रीमध्ये हे रुप आवश्यक आहे. आजच्या काळात तर कालीमातेचे रुप हे नारीने धारण करणे हे आवश्यकच आहे. छोट्या मुली पासून वयस्कर बायकांपर्यंत लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेला न शोभणारी ही गोष्ट आहे.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नारीशक्तीचा सन्मान करून खऱ्या अर्थाने महालक्ष्मी, सरस्वती मातेची पूजा बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जी सामग्री जमते ती सर्व स्वच्छ करून कुष्ठरोग संस्था, अनाथ आश्रम, अंधशाळा यांना देण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संदीप तापकीर यांनी केले. तर आभार सीईओ विशाल सोनी यांनी मानले.
ग्रामपंचायतपरवानग्या असलेल्या बेकायदा बांधकामाच्या दस्तांची केली नोंदणी: दस्तांची सहदुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मधील वादग्रस्त दस्तनोंदणीची चौकशी करा
जिल्हा निबंधकांना निवेदन
पुणे :
सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मध्ये रेरा कायद्याची पायमल्ली करून झालेल्या दस्त नोंदणीची चौकशी करण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांनी आज,दि.८ ऑक्टोबर रोजी सह जिल्हा निबंधक (मुद्रांक जिल्हाधिकारी) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.बांधकामाच्या ग्रामपंचायत परवानग्या असलेल्या दस्तांची सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -२० मध्ये नोंदणी करण्यात आल्या.त्यातून महा रेरा कायद्याची पायमल्ली करण्यात आली.१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आणि नंतरही येथील अधिकाऱ्याने दस्त नोंदणी चालू ठेवली.हे दस्त सर्व आवश्यक बांधकाम परवानग्या घेऊन केलेले आहेत का आणि कबुली जबाबासाठी राखून ठेवले आहेत का याची चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उपनिबंधकाचा पदभार काढून घेण्यात यावा,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकारी यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींना बैठ्या घरांना परवानगी देता येते , १/ २ /३ माजली घरांच्या , इमारतींच्या बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार नाहीत तरीही अशा पद्धतीचे परवाना पत्रे देऊन , महापालिकेचा अभिप्राय न घेता किंवा गुंठेवारी झालेली नसताना दस्त नोंदणी करण्यास मनाई असताना दस्त नोंदणी करून बेकायदा कामे केली जात असल्याचे सांगितले जातेय .
मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये मतदान जागृतीवर भर द्यावा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे, दि. 8: जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मतदार जागृती करावी; विशेषत: शहरी मतदार संघात मतदान टक्केवारीत मोठी वाढ होण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृतीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त (करमणूक शुल्क) निलीमा धायगुडे, स्वीप व्यवस्थापन उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित उपस्थित होते.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याने मतदार नोंदणी, मतदान टक्केवारी वाढीसाठी चांगली कामगिरी बजावल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, मतदान जागृतीवर चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरी मतदार संघातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली होती. या कामात सातत्य ठेऊन आगामी निवडणुकीत अधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात सर्व मतदार संघात मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमातून जनजागृती केल्यामुळे मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभला असून जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 86 लाख 47 हजारावर पोहोचली झाली आहे. पुणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला जिल्हा ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याहीवेळी मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांची पुर्नरचना करताना, नवीन मतदान केंद्रे स्थापन करताना एका मतदान केंद्रावर बाराशेच्या दरम्यान मतदार संख्या असेल याची दक्षता घेण्यात आली आहे. जेणेकरुन मतदान केंद्रावर रांगा लागू नयेत. याशिवाय मतदारांची नावे जवळच्या मतदान केंद्रावर समाविष्ट करणे, एकाच कुटुंबातील मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर येतील यादृष्टीने काळजी घेण्यात आली आहे.
नामनिर्देशन दाखल करण्यास सुरूवात झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याची माहिती गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सभासदांना द्यावी आणि ते अर्ज क्र. 6 भरतील यादृष्टीने प्रयत्न करावेत. संस्थेत नव्याने स्थलांतरीत झालेले भाडेकरू, नव्याने विवाह होऊन आलेल्या विवाहिता आदींसह कोणीही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
मतदारांना आपल्या मतदान केंद्रांची माहिती व्हावी यासाठी ‘नो युवर पोलींग स्टेशन’ हा उपक्रम लोकसभा निवडणुकीवेळी राबविला होता. या उपक्रमाची यावेळी प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर, गृह निर्माण संस्था स्तरावर तसेच अन्य ठिकाणी जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सदस्यांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मदत करावी, त्यांचे मतदान केंद्राची माहिती त्यांना द्यावी. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शहरातील सहकारी संस्थांचे सर्व उपनिबंधक तसेच त्यांच्याअंतर्गत अधिकारी, कर्मचारी, पॅनेलवरील लेखापरीक्षक यांनी याकामी गृहनिर्माण संस्थांसोबत समन्वयाने काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदार संघांत मतदान वाढीसाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत. त्यासाठी गटविकास अधिकारी आणि त्यांच्याअंतर्गत पंचायत समित्यांची यंत्रणा तसेच विविध विभागांच्या समन्वयाने मतदार जागृती करावी. सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांचे मतदानाचे संकल्पपत्र भरुन घ्यावे.
लोकसभा निवडणुकीवेळी 80 वर्षावरील ज्येष्ठ मतदारांसाठी राबविलेल्या ‘आजी आजोबा चला मतदानाला…!’ या नाविन्यपूर्ण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही मोहिम अधिक चांगल्या प्रकारे राबवायची असून गृहनिर्माण संस्थांनी आपल्या संस्थातील वृद्ध मतदारांची माहिती दिल्यास त्याप्रमाणे व्हीलचेअरची व्यवस्था करता येईल. यावेळी वृद्धाश्रमातही मतदान केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक आस्थापनांसोबत बैठक घेऊन त्यांच्या कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन करण्यात येईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीत आपली भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा मतदार संघांचे स्वीप नोडल अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
0000
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे होणार रवाना-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे, दि. ८ : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून रेल्वेने श्रीराम मंदिर आयोध्या कडे रवाना होणार असून त्यांचा १० ते १४ ऑक्टोबर असा हा प्रवास असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाज कल्याण आयुक्त यांच्या उपस्थितीत पुणे रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ होणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातून ही पहिली भाविकांची रेल्वे अयोध्येसाठी रवाना होत आहे. ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असून या यात्रेत ७२९ नागरिक आणि ७१ सहायक असे ८०० यात्रेकरू असणार आहेत. या योजनेअंतर्गत सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यात आली असल्याचेही कळविण्यात आले आहे.
अवैध दारू निर्मीती:राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात सव्वासतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि. ८: राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने दारूबंदी सप्ताह निमित्त अवैध दारू निर्मीती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टिने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ लाख २७ हजार १६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दारूबंदी सप्ताह राबविण्यात आला. या कालावधीत भरारी पथकाने विशेष मोहिम आखून जिल्ह्यातील अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अवैधरित्या मद्य विक्री होत असलेल्या ढाब्यांवर सातत्याने छापे टाकून एकूण २२ गुन्हे नोंदविले.
या गुन्ह्यामध्ये १८ वारस व ४ बेवारस गुन्ह्यांचा समावेश असून एकूण १४ आरोपींच्या विरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १४ हजार ४०० लिटर रसायन, २ हजार ११५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ४० ब. लि. देशी दारू, १० ब. लि. विदेशी मद्य, १६ ब. लि. बिअर तसेच अवैद्यरित्या दारू वाहतूक करणारी १ चारचाकी, १ तीन चाकी व ४ दुचाकी अशा ६ वाहनांसह अंदाजे १७ लाख २७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे पथकाचे दुय्यम निरीक्षक अतुल पाटील, विराज माने, धीरज सस्ते, जवान पी.टी. कदम, आर.जे. चव्हाण, ए.आर थोरात, एस.एस. पोंधे, एस.सी. भाट, आर. टी. ताराळकर व ए. आर. दळवी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
अजित पवारच बारामती विधानसभा लढवणार:NCP नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहेअजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जनतेला बारामती विधानसभा मतदार संघात मी देईल त्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विधानामुळे ते यंदा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळत होते. याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी अजित पवार हेच बारामतीतून निवडणूक लढवणार असे स्पष्ट केले.तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा नाही. असं अजित पवारांनी स्वत: जाहीर केले होते. अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा देखील देखील रंगली होती.
यामुळे अजित पवार नेमकं कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. अशातच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे.
बारामती आणि अजित पवार हे जणू समीकरणच…1991पासून सलग सातव्यांदा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार झालेत. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळेंनी त्यांची नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचा बालेकिल्ला कुणाचा ? याचं उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळालं. सुनेत्रा यांचा पराभव अजित पवारांसाठी हा फार मोठा धक्का होता.. तसेच अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. या पराभवाचा आगामी विधानसभा निवडणुकांवर परिणाम होण्याची असल्यानं बारामतीमध्ये अजित पवारांनी या पराभवाबाबत खंत व्यक्त केलीय.
विधानसभा निवडणुकीत काका-पुतण्या सामना टाळण्यासाठी अजित पवारांनी जय पवारांचं नाव पुढं केल्याची चर्चा रंगली. अजित पवारांनी पहिल्यांदा जेव्हा जय पवारांचं नाव पुढं केलं तेव्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही त्यांच्या या प्रस्तावाला विरोध केला होता. एवढंच नव्हे तर बारामतीतून एक लाख सह्याही गोळा केल्या होत्या. बारामतीतून अजित पवारच उमेदवार असतील असं पक्षातून सांगण्यात आलं असतानाही अजित पवारांनी पुन्हा बारामतीतून मी जो उमेदवार देईन तो निवडून द्या असं भावनिक आवाहन केले होते.
मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा बारामतीऐवजी शिरूरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेरीस अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढणार अशी घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.
पुण्यात 10 ऑक्टोबरला जन आक्रोश मोर्चा:महिला व दलित अत्याचाराच्या निषेधार्थ निघणार मोर्चा, अविनाश बागवे यांची माहिती
पुणे–राज्यात महिलावरील अत्याचार राजरोसपणे चालू आहेत ,दलित समाजावर गावगावात आत्याचार होत आहेत.राज्यात कायदाचा धाक अजिबात राहिला नाही. या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्यावतीने पुण्यात 10 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मातंग एकता आंदोलनाचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी दिली. या मोर्चाचे नेतृत्त्व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे करणार आहेत. या मोर्चात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून शेकडो लोक सहभागी होणार आहेत.
मागील काही महिन्यांन पासून दलित समाजांवर त्यातही प्रामुख्याने मातंग समाजातील आई बहिणींवर, शाळा कॉलेज मधील तरुणींवर, १२ वर्षाच्या, २ वर्षाच्या चिमुकलीवरच नव्हे तर ८५ वर्षाच्या वृध्द महिलेवर देखील बलात्कार केले जात आहेत. महिलेची गावामध्ये नग्न धिंड काढली जाते, दिवसेंदिवस हा अन्याय, अत्याचार वाढतच चालला असून वेळीच त्याला रोखले नाही, तर आपल्या दारापर्यंत येण्यास वेळ लागणार नाही. बदलापूर येथील घटना ताजी असतानाच दलित समाजावर सातत्याने अत्याचार घडत आहे.
अत्याचाराच्या असंख्य घटना दलित समाजावर, युवतींवर वरदहस्त असलेले नराधम सर्रासपणे, निर्भिडपणे अत्याचार करीत आहेत. राजकीय दबावापोटी प्रशासनातील काही अधिकारी आपल्या पिडित कुटुंबांची हेळसांड, अरेरावी करून उलटपक्षी पिडित कुटुंबालाच कायदयाची भिती दाखवून, त्यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवतात. भविष्यात या नराधमांची हि प्रवृत्ती रोखण्याकरिता प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन त्यांच्यावर करडी जरब बसविण्याकरिता समाजाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. पत्रकार परिषदेस मातंग एकता आंदोलनाच्या पुणे अध्यक्षा राजश्री अडसूळ, मातंग एकता आंदोलांचे विठ्ठल थोरात उपस्थित होते.
बागवे यावेळीअसेही म्हणाले मागील काही महिन्यांन पासून दलित समाजांवर त्यातही प्रामुख्याने मातंग समाजातील आई बहिणींवर, शाळा कॉलेज मधील तरुणींवर, १२ वर्षाच्या, २ वर्षाच्या चिमुकलीवरच नव्हे तर ८५ वर्षाच्या वृध्द महिलेवर देखील बलात्कार केले जात आहेत. महिलेची गावामध्ये नग्न धिंड काढली जाते, दिवसेंदिवस हा अन्याय, अत्याचार वाढतच चालला असून वेळीच त्याला रोखले नाही, तर आपल्या दारापर्यंत येण्यास वेळ लागणार नाही. बदलापूर येथील घटना ताजी असतानाच दलित समाजावर घडलेले अत्याचार व त्यातील काही घटना खालीलप्रमाणे :
१) दिनांक ६/९/२०२४ रोजी सहकारनगर पुणे येथे ७ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले परंतु
६ दिवसानंतर १२/९/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
२) दिनांक १७/९/२०२४ रोजी भोर मधील वर्वे गावामध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार
३) दिनांक २४/९/२०२४ रोजी पुणे स्टेशन परिसरातील एका नामांकित कॉलेज मधील प्राध्यापकांच्या मुलीवर ४ नराधमाकडून वारवांर लैंगिक अत्याचार करण्यात आला ही गंभीर बाब पोलिसांनी ५ दिवसानंतर गुन्हा नोंद.केला परंतु त्यातील काही आरोपींची नावे वगळण्यात आली आहेत.
४) दिनांक २९/९/२०२४ रोजी ससाणेनगर हडपसर येथे एका लहान मुलीवर बलात्कार
५) दिनांक ३०/९/२००४ रोजी कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव १२ वर्षाच्या मुलावर बलात्कार
६) दिनांक २/१०/२०२४ रोजी वानवडी भागात ६ वर्षाच्या २ शाळकरी मुलींवर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४५ वर्षाच्या बसचालकाने लैंगिक अत्याचार केला आहे.
७) दिनांक ३/१०/२०२४ रोजी बापदेव घाटात अल्पवयीन मुलीवर ३ नराधमांनी सामुहिक बलात्कार केला आहे.
अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भक्त सदनाचे भूमिपूजन संपन्न
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई दि. ८ – अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन उभारण्यासाठी राज्य शासनाने जूनमध्ये जमीन घेतली होती. या जागेवर पर्यावरण पूरक हरित इमारत (environmental friendly green building) बांधण्यात येणार आहे. या इमारत बांधणीचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.
जवळपास ९५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर १२ मजली भव्य भक्त निवास उभे राहणार असून त्या ठिकाणी ६५० पर्यटक राहू शकतील. भक्त निवासात एकूण ४ व्हीआयपी कक्ष, ९६ खोल्या असून ४० डॉर्मिटरी बांधण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षात हे बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. भक्तनिवास अयोध्येतील महत्त्वाच्या सर्व स्थळांपासून जवळ आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळ पासून ११.५ किमी, श्रीराम जन्मभूमी मंदिर पासून ७.५ किमी तर अयोध्या रेल्वे जंक्शनपासून ४.५ किमीवर आहे.
श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी तटाची आठवण झाली. त्यातूनच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक नाळ जुळली. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र हे समस्त भारतीयांसाठी धार्मिक आणि भावनिक असून महाराष्ट्रातील शेकडो स्वयंसेवक आणि करसेवक यांनी त्यासाठी प्रखर संघर्ष केला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यावर महाराष्ट्रातील भाविकांसाठी जून महिन्यात अयोध्येत महाराष्ट्र भक्त निवास बांधण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र भक्त सदन म्हणजे याच भावनिक नात्याचे पुढचे पाऊल आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
या भूमिपूजन सोहळयासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्या हनुमान गढीचे महंत राजू दासजी महाराज, अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर गिरीशपती त्रिपाठी, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.
जम्मू-काश्मीर मध्ये काँग्रेस- नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचे सरकार,ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करणार आहेत. आघाडीला 49 जागा मिळाल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सला 42 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या.भाजपने 29 जागा जिंकल्या. पीडीपीला 3 जागा मिळाल्या. प्रत्येकी एक जागा आम आदमी पार्टी, जेपीसी आणि माकपला गेली. 7 अपक्षही विजयी झाले. 90 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 46 आहे.
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले- ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील. ओमर अब्दुल्ला यांनी दोन जागांवर (बडगाम आणि गंदरबल) निवडणूक लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्या म्हणाल्या- लोकांचा निर्णय मला मान्य आहे. दुसरीकडे, नौशेरा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर रविंदर रैना यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 3 टप्प्यांत 63.88 टक्के मतदान झाले. 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 65% मतदान झाले होते. यावेळी 1.12% कमी मतदान झाले.
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. काँग्रेसने मतमोजणीच्या सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. मात्र तासातच चित्र उलटून भाजपने आघाडी घेतली. यावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाने ( डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला. आता यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाला थेट गुलाम म्हटले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप आघाडीवर असून काँग्रेस केवळ 34 मतदारसंघांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत तर तर लोक दल 2 जागांवर आघाडीवर आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. सध्याची परिस्थिती पाहता हरियाणात भाजप (BJP) सत्ता स्थापन करेल, अशी परिस्थिती आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. ज्या पद्धतीने हे सरकार वागते आणि कोणत्याही थराला जाऊन कोणतीही गोष्ट करू शकतो. याबद्दल लोकांच्या मनात विश्वास आहे. शेतकरी आंदोलनाबाबत हे सरकारच्या निर्दयीपणे वागलेलं त्याची चीड होती. चिड असूनही त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसत नाही. यामुळे खरं काय आणि खोटं काय हे संशयास्पद वाटत आहे. लोकांच्या मनात प्रश्न आहे की, हा निकाल असा कसा लागू शकतो, अशी टीका त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, निवडणूक निकाल ऐकून पूर्ण भाष्य करणे योग्य नाही. जयराम रमेश यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्याबद्दल गोष्टी उघडकीस येतील. निवडणुकीबाबत निश्चितच संशय निर्माण होत आहे. निवडणूक आयोग हा एक नंबरचा गुलाम आहे. त्या गुलामाकडून काय अपेक्षा करणार? असा घणाघात अरविंद सावंत यांनी केलाय. तर महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेत दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेला गाडा विश्वास आहे. विविध स्तरातील, विविध संस्थेतील लोक त्यांच्या सोबत उभी राहत आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
