Home Blog Page 647

15 हजार 710 कोटींचा प्रकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी

सिन्नरकारांच्या कपाळावरचा अवर्षणग्रस्ताचा कलंक पुसणार;
सिन्नरकरांनी मानले उपुमख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

मुंबई, दि. 14 :- उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी उपयुक्त ठरणारा ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’सह ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पाला आज मंत्रीमंडळाने मान्यता दिली. हे दोन्ही नदीजोड प्रकल्प 15 हजार 710 कोटी रुपयांचे असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे. या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याला होणार असून सिन्नर तालुक्याच्या कपाळावरचा अवर्षणग्रस्ताचा कलंक पुसला जाणार आहे. सिन्नर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल सिन्नरचे आमदार माणिकराव काकाटे यांच्यासह सिन्नरकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

याबाबत अधिक माहिती अशी, आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’सह ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदी जोड प्रकल्पासाठी 13 हजार 497 कोटी 24 लाख रुपये प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 160.97 दलघमी पाणी उपलब्ध होणार असून 33 हजार 110 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पासाठी 2 हजार 213 कोटी 53 लाख रुपये प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 100 दलघमी पाणी उपलब्ध होणार असून 12 हजार 998 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्याचे चित्रपूर्णपणे बदलणार असून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

या ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’सह ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन सातत्याने याबाबचा पाठपुरावा केला होता. सातत्याने या बाबतच्या बैठका मंत्रालयस्तरावर घेण्यात आल्या होत्या. हे नदीजोड प्रकल्पमार्गी लागल्यामुळे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह सिन्नरकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

मुंबईतल्या ५ टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोल माफ.आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

मुंबई–विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. हलक्या मोटर वाहनांना ही टोल माफी असून आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळाची शेवटची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. आनंदनगर, दहिसर, मॉडेला, वाशी, ऐरोली या टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही.

मंत्रिमंडळ_निर्णय…

✅ मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.✅आगरी समाजासाठी महामंडळ✅समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम✅दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता✅आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता✅वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता✅राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित✅पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी✅खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य✅राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार✅पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता✅किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ✅अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ✅मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे✅खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना✅मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा✅अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट✅‘उमेद’साठी अभ्यासगट✅कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

भाजप उमेदवारांची नावे निश्चित:भाजप 150 ते 160 जागा लढवणार- फडणवीस, बावनकुळें दिल्लीला रवाना

पूर्वी भाजप आणि सेनेतच जागावाटप असल्याने जास्त जागा वाट्याला यायच्या. मात्र आता अजितदादा गट आणि मित्रपक्षही सोबत असल्याने जागा कमी झाल्या आहे. 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 105 उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 56 निवडून आले. राष्ट्रवादीने 121 लढवून त्यांचे 54 आणि काँग्रेसने 147 जागा लढवून 44 उमेदवार निवडून आले.

भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटी बैठक

मुंबई-भाजपच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या यादीवर भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वासह चर्चा होणार आहे. यासाठी फडणीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत.असे सूत्रांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतरच भाजपची पहिली यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता आहे.

महायुतीमध्ये जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. भाजप 160 जागा लढवणार आहे. उरलेल्या 128 पैकी शिंदे सेनेला 80 जागा तर राष्ट्रवादी दादा गटाला 48 जागा जवळपास निश्चित आहेत. यातून तिन्ही पक्षांना मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मात्र, कोणती जागा, काेणत्या पक्षाला सुटली हे जाहीर केले जाणार नाही. कारण ते माहिती झाले तर बाहेरून आलेले बंडखोरी करीत इतर पक्षात जाऊ शकतात. म्हणून आचारसंहिता जाहीर झाली तरी यादी जाहीर करण्याची घाई महायुती करणार नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपने 150 ते 160 जागा लढवल्यास 90 ते 95 जागा निवडून येऊ शकतात, असा प्राथमिक अहवाल असल्याचा दावा केला जातोय.

शिवाजीनगर येथे नवरात्री निमित्त ‘भक्तिरंग शारदीय भजन स्पर्धा’ उत्साहात संपन्न ;

सनी निम्हण यांच्या अभिनव उपक्रमामुळे महिला वर्गाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पुणे: सोमेश्वर फाउंडेशन व स्व. आ. विनायक (आबा) निम्हण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक सनी निम्हण यांचा संकल्पनेतून भव्य भक्तिरंग शारदीय महिला भजन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात रंगलेल्या या भक्तिरंग स्पर्धेत खडकी येथील अंजली भजनी मंडळाने आपल्या गायनाने सर्वाना मंत्रमुग्ध करत प्रथम क्रमांक मिळवला.

स्व. आमदार विनायक आबा निम्हण यांच्या सामाजिक, धार्मिक कार्याचा वारसाच आपला वसा म्हणून पुढे घेऊन जाणारे माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवानिमित्त सोमेश्वर फाउंडेशन व स्व. आ. विनायक (आबा) निम्हण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शारदीय महिला भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. श्री रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथे घेण्यात आलेल्या या शारदीय भजन स्पर्धेला पुणे शहरातील महिला भजनी मंडळांनी उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला होता. या भक्तीमय सोहळा अनुभवण्यासाठी महिलावर्गाने मोठी गर्दी केली होती.

शिवाजीनगर भागातील जंगली महाराज भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवला. सुतारवाडी येथील जोगेश्वरी महिला मंडळ व शिवाजीनगर भागातील काशी विश्वनाथ महिला मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी उत्कृष्ठ हार्मोनियम वादक, उत्कृष्ठ मृदंग वादक व उत्कृष्ठ महिला मृदंग वादक अशी पुरस्कार देत वयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

या भक्तिमय स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्या महिला मंडळांचा सन्मान करण्यासाठी मधुराताई सनी दादा निम्हण, ह. भ. प. शांताराम महाराज निम्हण , ह.भ.प. पांडुरंग अप्पा दातार, ह. भ. प. मारुती कोकाटे , ह. भ. प. बबनराव हेगडे, ह. भ. प. बाळासाहेब सुतार , ह. भ. प. तोलबा सुतार, ह. भ. प. हरिभाऊ गुजर इ. मान्यवर उपस्थित होते.

भक्तिमय स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून धनंजय वसवे, धनंजय भोंडे, नितीन निम्हण यांनी काम पाहिले. अशी भक्तिमय स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सर्व महिला वर्गाने समाधान व्यक्त केले.

बाबा सिद्दिकी हत्येचं पुणे कनेक्शन, प्रविण लोणकरला अटक

दोन अटक आरोपींची नावे

1) धर्मराज कश्यप (यूपी) 2) गुरमेल बलजितसिंग (हरियाणा)

फरार शूटरचे नाव

3)शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा (यूपी) 4) मोहम्मद झीशान अख्तर


पुणे : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून एकाला अटक केली आहे. फेसबुक पोस्ट करून हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शुभम लोणकर याचा भाऊ प्रविण लोणकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.प्रविण हा शुभम लोणकर सह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना कटात सामील करून घेणाऱ्यांपैकी एक असल्याचा संशय पोलिसांना आहे.

शुभम लोणकर याने सोशल मीडियावर एक पोस्ट करून बिष्णोई गँगचं नाव घेत बाबा सिद्दिकींवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ” सलमान खान आम्हाला हे युद्ध नको हवे होते. मात्र, तू आमच्या भावाचे नुकसान केले. आज बाबा सिद्दिकीच्या कौतुकाचे गोडवे गात आहेत, हा बाबा सिद्दिकीवर दाऊद सोबत मोक्का कायदा लावण्यात आला होता. अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, मालमत्ता डीलसोबत जोडणे होते. आमचे कोणाशीही वैर नाही, पण जे सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतात त्यांना आता हिशोब द्यावा लागेल. आमच्या भावांचे कोणी नुकसान केले तर आम्ही त्याची भरपाई केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये देण्यात आला.

बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे पूर्वमधल्या ऑफिसबाहेर गोळीबार केला गेला. यानंतर लगेचच त्यांना वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुरमेल बलजीत सिंग उर्फ कर्नैल सिंग आणि धर्मराज सिंह उर्फ धर्मराज राजेश कश्यप अशी आरोपींची नावं आहेत. हल्ला करण्याआधी हल्लेखोर 25-30 दिवस आसपासच्या परिसराची रेकी करत होते, असंही तपासात समोर आलं आहे.

शनिवारी दसऱ्यानिमित्त वांद्र पश्चिम इथल्या राम मंदिर परिसरात फटाके फोडले जात होते, त्याचवेळी 9.15 वाजण्याच्या सुमारास निर्मल नगर भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांच्यावर 6 राऊंड फायर केले गेले, यातली एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत घुसली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

कॅन्टोंन्मेट,पर्वती,कसबा,शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसला विजयाची संधी

आज मुंबईत राज्य निवड समितीची बैठक

पुणे-योग्य उमेदवार दिले तर कॅन्टोंन्मेट,शिवाजीनगर,कसबा आणि पर्वती विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसला विजयाची संधी असल्याचा दावा करत काल कॉंग्रेस भवनात इच्छुक उमेदवारांनी मुलाखती तर दिल्या पण शहर कॉंग्रेसच्या अंतर्गत पाडापाडीच्या राजकारणाची झलकही याचवेळी दिसून आली.ज्यांनी मोठे केले अशा ज्येष्ठांच्या विरोधात षड्यंत्र रचणारे कॉंग्रेसजनच विजयी होणाऱ्या जागांना धोका पोहोचवतील असे चित्र येथे दिसून आले आहे. कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी काळ कॉंग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.कॅन्टोंन्मेट विधानसभा मतदार संघातून ११ जणांनी मुलाखती दिल्या तर शिवाजीनगर मधून १२ इच्छुकांनी मुलखाती दिल्या.पर्वतीतून अवघ्या तिघांनी मुलाखती दिल्या,कसब्यातून ६ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.कोथरूड मधून फक्त १ इच्छुक उमेदवार तर खडकवासल्यातून एक हि उमेदवार नाही अशीही स्थिती यावेळी दिसून आली.

दिग्गज इच्छुक -आबा बागुल,रमेश बागवे,रवींद्र धंगेकर,बाळासाहेब दाभेकर,दीप्ती चवधरी,कमल व्यवहारे,सनी निम्हण,मनीष आनंद आणि बाळासाहेब शिवरकर

(सूत्रांच्या अंदाजानुसार )निवडून येण्याची शक्यता असलेले दिग्गज आबा बागुल,रमेश बागवे,रवींद्र धंगेकर,सनी निम्हण,बाळासाहेब दाभेकर,दिप्ती चवधरी.

इच्छुक उमेदवारांची यादी –

१) २१० कोथरूड विधानसभा मतदार संघ – १ श्री. संदीप सुरेश मोकाटे

२) २०८ वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ १ श्री. संजय मुरलीधर पाटील .२ रमेश विश्वनाथ सकट ३ श्री. राजु पांडु ठोंबरे ४श्री. सुनिल तात्यासिंग मलके ५ श्री. जोसेफ डिसुझा

३) २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ १ दिप्ती चवधरी,२ अनिल पवार ३ चंद्रशेखन उर्फ सनी विनायक निम्हण ४. जावेद राजासाब निलगर ५ कैलास मारूतराव गायकवाड ६ दत्तात्रय रंगनाथ बहिरट ७मनीष सुरेंद्र आनंद ८ सौ. पुजा मनीष आनंद ९ श्री. राज शंकरराव निकम १० महेंद्र बळीराम सावंत ११ अॅड. रमेश खंडूजी पवळे १२ संजय अगरवाल

४) २१५ कसबा विधानसभा मतदार संघ
१ रविंद्र हेमराज धंगेकर
२सौ. कमल ज्ञानराज व्यवहारे
३ मुख्तार गफुर शेख
४ संगीता तिवारी
५बाळासाहेबर राघोबा दाभेकर
६ शिवानंद हुल्याळकर
५) २१४ पुणे कॅन्टोंन्मेट विधानसभा मतदार संघ
१रमेश आनंदराव बागवे
२अविनाश रमेश बागवे
३मुकेश मधुकर धिवार
४अॅड. अविनाश साळवे
५ भीमराव बाळासाहेब पाटोळे
६ राजाभाऊ उर्फ सुनिल तात्याराम भोसले
७सौ. छाया बाळकृष्ण जाधव
८ रविंद्र रंगनाथ आरडे
९लताबाई दयाराम राजगुरू
१०सुजीत लक्ष्मण यादव
११मिलिंद दत्ता अहिरे
६) २१२ पर्वती विधानसभा मतदार संघ
१ उल्हास उर्फ आबा वसंतराव बागुल
२ संभाजी उर्फ आबा पांडुरंग जगताप
३संतोष बाबासाहेब पाटोळे
७) २१३ हडपसर विधानसभा मतदार संघ
१ डॉ. सुदर्शन मुरलीधर घेराडे
२ हाजी उस्मान हाशमोद्दिन तांबोळी
३बाळासाहेब उर्फ चंद्रकांत विठ्ठलराव शिवरकर

पुणे शहर, पिपंरी चिचंवड आणि पुणे जिल्हयातील २१ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतल्या. पिपंरी, भोसरी, चिचंवड या तीन विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती झाल्या.त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आणि दुपारीनंतर पुणे शहरातील विधासभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. काँग्रेसभवन येथे इच्छुकांचे वाजत गाजत आणि समर्थक जोरदार घोषणा देत होते.

काँग्रेसभवनाच्या पहिल्या मजल्यावर मुलाखती घेण्यात आल्या. तेथे केवळ इच्छुकाला सोडण्यात येत होते. त्यामुळे समर्थक काँग्रेसभवनाबाहेर होते. त्यामुळे कॉग्रेस भवनचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या मुलाखतींच्या आधारे राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केंद्रातील नेते उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. यात पुणे शहरातील शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसने जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघाबरोबरच खेड, शिरूर आणि दौंड या मतदारसंघांवरही दावा केला आहे.

सभा आटपून निघाले, पोलिसांच्या ताफ्यात दिसला जुना मित्र, गाडी थांबवली अन्… मोहोळ यांच्या आनंदाला उधाण

काळ वेगाने पुढे सरकतो , शाळेतल्या घटना प्रसंग, मित्र , बालपण , कॉलेज , आणि सारे काही मागे सुटते .. सारे का बदलते , साऱ्यांच्या आपआपल्या जगही बदलतात पण पुन्हा ते दिवस कधी येत नाहीत , वेगाने सरकणाऱ्या काळात माणूसही वेगाने पुढे जातो पण असा कधी क्षण येतो जुन्या काळातला एखादा मित्र समोर येतो … तेव्हा .. आपण कोण .. तो कोण याचा विचार न करता एखाद्या चांगल्या भाऊक माणसाच्या आनंदाला पारावर उरत नाही आणि तो आनद व्यक्त देखील होतो अगदी तसाच प्रसंग केंद्रीय मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या जीवनात नुकताच आला .

पुण्यात ते एका कार्यक्रमावरून परतत असताना त्यांच्या संरक्षणासाठी आलेल्या पोलिसांच्या ताफ्यात मुरळीधर मोहोळ यांना त्यांचा एक मित्र दिसला. त्यांनी लगेच गाडी थांबवून मित्राची भेट घेतली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मुरळीधर मोहोळ हे पुण्यातील चंदगड येथे एका कार्यक्रमाला गेले होते. शिवाजी पाटील यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे सभा घेण्यात आली. ही सभा आटपल्यानंतर मुरळीधर मोहोळ पुन्हा परतत होते. यावेळी एका ट्रॅफिक पोलिसाला पाहून त्यांनी गाडी अचानक थांबवली. त्यानंतर गाडीतून उतरून त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेतली. यावेळी सगळे त्यांच्या या कृतीकडे पाहत राहिले. हा पोलीस कर्मचारी दुसरे कुणी नसून मुरळीधर मोहोळ यांचे मित्र शहाजी पाटील होते.

शहाजी पाटील हे मुरळीधर मोहोळ यांच्या कोल्हापुरातील तालमीतील मित्र आहेत. शहाजी पाटील दिसताच त्यांनी लगेच गाडी थांबवली. त्यानंतर दोन जुन्या मित्रांची रस्त्यातच भेट झाली. यातून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा आला आहे. दोन्ही मित्र वेगवेगळ्या प्रकारे देशाची सेवा करत आहेत. मात्र तेव्हा दोघांनीही आपलं पद बाजूला ठेऊन जुनी मैत्री आठवत एकमेकांची गळाभेट घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

तर दुसरीकडे ज्यावेळी एखाद्या मंत्र्यांच्या बंदोबस्ताला पोलीस दलातील एक हवालदार सॅल्यूट मारण्यासाठी उभा असतो. मात्र तोच मंत्री जेव्हा काच खाली घेतो आणि नंतर गाडीतून उतरून या हवालदाराचा सॅल्यूट बाजूला ठेऊन त्याची गळाभेट घेतो, हे दृश्य दुर्मिळ पाहायला मिळतं. तसाच हा प्रसंग होता. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच या दोघांच्या भेटीत त्यांनी फोटो काढले आहेत. तसेच हसत हसत एकमेकांचा निरोप घेतला आहे.

माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या समर्थकांचे पुन्हा शक्तिप्रदर्शन

काँग्रेस कार्यकर्ते आग्रही, ‘पर्वती ‘त आता बदलाचे संकेत !

पुणे :
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा महाविकास आघाडीत जागा वाटपात पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला घ्यावा आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर करावा यासाठी रविवारी बागुल समर्थकांनी पुन्हा काँग्रेस भवनात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.विशेष म्हणजे यावेळी मतदारसंघातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिकही सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.

काँग्रेस भवन येथे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या सुरू असलेल्या मुलाखती दरम्यान माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या समर्थकांनी वाजत गाजत येवून घोषणांनी काँग्रेस भवन दणाणून सोडले.
यावेळी मुलाखतीसाठी आलेल्या माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यात ठाम विश्वास दिसून आला.यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ परत घ्या परत घ्या,पर्वती काँग्रेसकडे घ्या ‘, ‘आबांचे काम दमदार, आता ‘ आबा’च पर्वतीचे आमदार’ अशा घोषणा देत पर्वती मतदारसंघासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यापूर्वीही आबा बागुल समर्थकांनी पर्वतीसाठी आग्रही मागणी केली होती. काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असल्याने आबा बागुल यांनी दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा असे साकडेही घातले होते.तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यंदा आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला घेतला जाईल असे जाहीर केले होते. प्रभाग असो अथवा वॉर्ड आबा बागुल हे सलग सहावेळा म्हणजे ३० वर्षे महापालिकेत लोकप्रतिनिधित्व करत आलेले आहे.काँग्रेसचे निष्ठावंत आणि पुणेकरांचे श्रावणबाळ,व्यक्ती एक प्रकल्प अनेक हीच त्यांची ओळख आहे.मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली मात्र पक्ष श्रेष्ठींनी समजूत काढताना विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे घेतला जाईल.असा शब्द दिला होता.त्यात आजवर अंतर्गत राजकारणात हा मतदारसंघ भाजपलाच पोषक ठरत असल्याचे आबा बागुल यांनी काँग्रेसचे पक्षश्रेठी तसेच लोकनेते शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते.उमेदवारी कुणालाही द्या; पण पर्वती मतदारसंघ काँग्रेसलाच घ्या. अशी आग्रही मागणी त्यांनी आजवर सातत्याने लावून धरली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत इलेक्टिव मेरिट तपासले जाणार आहे. त्यात आतापर्यंतच्या सर्व्हेमध्ये आबा बागुल यांचेच नाव अग्रभागी असल्याने यंदा त्यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी मुलाखतीदरम्यान आबा बागुल यांचा ठाम विश्वास आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहता यंदा पर्वती मतदारसंघात परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत.

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमिपूजन संपन्न

ठाणे,दि.13: राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले.सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड , सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राजेश पाटील, मुख्य अभियंता श्री.राजेश निघोट , मुख्य अभियंता श्री.एस.के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते

ठाणे खाडी पूल क्र.3 च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर रेवस – रेडी सागरी महामार्गावरील धरमतर , कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पूलांचे भूमिपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले.स्थानिक स्तरावर प्रत्येक खाडी पूलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमिपूजन स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.या सात खाडी पूलांची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7 हजार 851 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे .मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती.ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे . या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलच, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून  राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात पोहोचता येईल. पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल .

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री.दादाजी भुसे ठाणे खाडी पूल क्र.3 ची उत्तर वाहिनी या तीन पदरी पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईल, असा विश्वास व्यक्त करून म्हणाले की, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. आज दुग्धशर्करा योग म्हणजे रेवस-रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांचे भूमीपूजन एकाच वेळी होत आहे. या परिसरातील  निसर्गाला अनुरूप असे केबल स्टे व इतर प्रकारांच्या पूलांची निर्मिती रस्ते विकास महामंडळ अत्यंत कल्पकतेने करणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवार, दि.14 ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

प्रकल्पांची माहिती :

  1. सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र.३ प्रकल्पामधील कामाचा वाव :

प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पूल बांधणे (मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर)

  • प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.
  • पूलाची लांबी : 3180 मी. ( पोहोच रस्त्यासह )
  • सद्य:स्थितीत उत्तर वाहिनी पूलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी सोमवार, दि.14 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम 80 % पूर्ण झाले आहे.
  • रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची एकूण लांबी : 498 किमी.
  • पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प.

सागरी महामार्गावरील सात पूलांची माहिती-

  • सर्व 7 पूलांची एकूण लांबी 26.70 किमी आणि एकूण प्रशासकीय मान्यता रु. 7 हजार 851 कोटी इतकी आहे.

प्रत्येक पूलाच्या कामाची मुदत तीन वर्ष आहे .

1)  रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडीवरील पूल

  • एकूण लांबी : 10.20 किमी.
  • प्रशासकीय मान्यता : रु. 3 हजार 57 कोटी
  • पूलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पूल)

2) रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडीवरील पूल:

  • एकूण लांबी : 3.82 कि मी
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : 1 हजार 736 कोटी
  • पूलाचा प्रकार : केबल स्टे

3) दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी वरील पूल:

  • एकूण लांबी : 4.31 किमी.
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : 1 हजार 315 कोटी.
  • पूलाचा प्रकार : केबल स्टे

4) बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पूल :

एकूण लांबी : 1.711 किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी

पूलाचा प्रकार : केबल स्टे

5) केळशी भागातील केळशी खाडीवरील पूल :

  • एकूण लांबी : 670 मी.
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी
  • पूलाचा प्रकार: बॉक्स गर्डर

6) जयगड खाडीवरील पूल:

एकूण लांबी : 4.40 किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी

पूलाचा प्रकार : केबल स्टे

7) कुणकेश्वर येथील पूलाचे बांधकाम

  • एकूण लांबी : 1580 मी.
  • प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी
  • पूलाचा प्रकार :  केबल स्टे

मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी भाषा भवन सह बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

मुंबई, दि. 13 :- माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र वाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) येथे उभारण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना यातून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन / लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार तथा सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठी भाषा भवनासाठी चांगली जागा उपलब्ध झाली असून भवनाचे भूमिपूजन आज सागराच्या साक्षीने होत आहे याचा आपणास आनंद होत आहे. भाषा भवनाचे काम अतिशय दर्जेदार व्हावे असे सांगून या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धन, संशोधन आणि प्रसारासाठी अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाषा भवनसाठी साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांचा आदर केला जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दोन हजार वर्षांपेक्षा अधिक जुनी माझी माय मराठी भाषा असल्याचे सिद्ध झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांचे योगदान मिळाले आहे. सर्वांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

संतांनी अभंग, गवळण, भारुड यातून मराठी भाषेचे सौंदर्य समोर आणले. मराठी भाषेच्या वैभवात भर घातली. ज्ञानपीठकारांनी आणि सर्व साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे असे सांगून मराठी भाषेच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करत असताना जनकल्याणाच्या योजनेतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, वयोश्री अशा योजनांच्या माध्यमातून सामान्यांना आधार मिळत आहे. जनकल्याणाच्या योजना राबवताना राज्याचा विकासही तितक्याच गतीने केला जात आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, समृद्धी महामार्ग असे विकासाचे मोठे प्रकल्प राबवून राज्य विकासात अग्रेसर ठेवले आहे.

मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी बोलताना मराठी भाषकांना आणि साहित्यिकांना अभिमानास्पद वाटेल असे भाषा भवन उभारले जाईल, अशी ग्वाही दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या वैभवात आणखी भर पडली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांसाठी व राहण्याची सोय व्हावी यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साहित्य भवन बांधणार असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबईच्या ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या मराठी साहित्य भवन इमारत बांधकामाच्या भूमिपूजनासह बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (2024-25) यातून भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलेले विकास प्रकल्प –

  • सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • जवाहर बालभवन, मुंबई या इमारतीमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रेक्षागृह, संगीत कक्ष, ग्रंथालय व इतर अनुषंगिक कामांचा शुभारंभ
  • सर ज.जी. कला संस्था वसतिगृह व सर ज.जी. वास्तुशास्त्र वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन
  • शासकीय तंत्रविज्ञान महाविद्यालये मुले व मुलींचे वसतिगृह, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • महाराष्ट्र राज्य तंत्र निकेतन मंडळ, प्रशासकीय इमारत, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • वरळी, मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
  • नायगाव, दादर, भायखळा, शिवडी, शीव (सायन), वरळी पोलीस वसाहत लोकार्पण/भूमिपूजन
  • उमरखाडी, डोंगरी, डेव्हिड ससून येथील बालसुधारगृह बांधकामांचे लोकार्पण
  • नागरिक, देशी व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी भारतीय औषधी पद्धतीच्या प्रचार व प्रसारासाठी पोद्दार रुग्णालय, वरळी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पंचकर्म सुविधांचा शुभारंभ.
  • सेंट्रल बस स्टॅण्ड व मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहक/ चालक यांच्याकरिता वातानुकूलित विश्रामगृहाचे लोकार्पण
  • नूतनीकरण केलेल्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार भवन व विविध क्रीडा सुविधा संकुलाचे लोकार्पण
  • मत्स्य व्यवसाय विकास कार्यक्रम भूमिपूजन
  • मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर परिसर विकास कामाचे भूमिपूजन
  • बाबुलनाथ मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ
  • कै. श्री. जगन्नाथ शंकरशेट यांचे स्मारक व कै. श्री. भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
  • जे. जे. उडाणपुलाखालील हो- हो बेस्ट बसेसमध्ये तयार करण्यात आलेले कलादालन व वाचनालय लोकार्पण
  • ए विभाग, मुंबई येथील बधवार पार्क येथे फूड प्लाझाचा शुभारंभ
  • ए ते डी वॉर्ड येथे पिंक टॉयलेटचे लोकार्पण
  • मुंबई शहरामध्ये 14 ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ व ७ ठिकाणी भूमिपूजन
  • फॅशन स्ट्रीटच्या कायापालटाचा शुभारंभ व भूमिपूजन
  • मुंबई शहरातील दलित वस्तीमध्ये दहा ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका उपक्रमाचा शुभारंभ
  • ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयी सुविधा उपक्रमाचा शुभारंभ
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 103 शाळांमधील टेरेसवरील किचन गार्डनचे लोकार्पण
  • मुंबई शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण
  • श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या मंजूर प्रकल्पाचे सादरीकरण
  • दादर चौपाटी किनारा पुनर्भरणी
  • मुंबई शहरातील जुन्या म्हाडा इमारतींमध्ये उद्वाहन (लिफ्ट) सुविधा निर्माण करणे
  • सर ज. जी. रुग्णालयातील वॉर्ड नूतनीकरण व यंत्र सामग्री लोकार्पण
  • वरळी दुग्धशाळा येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण अशा बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या विविध विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पुण्यात जनजागृती फेरी संपन्न

पुणे: कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासह मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी रविवारी वॉकेथॉनचे आयोजन केले होते. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी पार्कपासून निघून जंगली महाराज रोड, गुडलक चौक, फर्गसन महाविद्यालय, शिरोळे रस्तामार्गे संभाजी पार्क अशी ही वॉकेथॉन झाली. जागतिक मानसिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य’ अशी आहे. 
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे आयोजित वॉकेथॉनला कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालक अर्णवाज दमानिया यांच्या हस्ते ध्वज दाखवून सुरुवात झाली. प्रसंगी सहसंस्थापक सँडी डायस, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर, शिल्पा तांबे आदी उपस्थित होते. जागरूक पुणेकरांसह दोनशेपेक्षा अधिक स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले. जनजागृतीपर विविध फलक हातात घेऊन, मानसिक आरोग्य जपण्याच्या घोषणा देत स्वयंसेवकांनी जनजागृती केली.
प्रसंगी अर्णवाज दमानिया म्हणाल्या, “कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून कनेक्टिंग ट्रस्टने या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन केले आहे. प्रत्येकाने आपल्या मानसिक आरोग्याविषयी सजग राहायला हवे. आत्महत्या प्रतिबंध आणि आत्महत्येला कलंकमुक्त करण्यासाठी कनेक्टींग ट्रस्ट गेली २० वर्षे समर्पित भावनेने कार्यरत आहे.”
प्रणिता मडकईकर म्हणाल्या, “मानसिक आरोग्याविषयी अभ्यासातून कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी अधोरेखित झाली आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर होत असलेला परिणाम अभ्यासकांनी मांडला आहे. ‘आयपीएसओएस’च्या अभ्यासात दोनपैकी एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका आढळला आहे. ३५-४५ वयोगटातील लोक, महिला आणि उच्च पदावरील कर्मचारी यांचा समावेश सर्वाधिक धोका असलेल्यांमध्ये होतो. आठवड्याला ४५ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही या गटात समावेश आहे. या अभ्यासात ९० टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी व व्यक्तिगत जीवन यांचे संतुलन हा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा सर्वोच्च घटक असल्याचे नमूद केले आहे. ४२ टक्के लोकांनी त्यांच्या नोकरीमुळे तणावग्रस्त असल्याचे मान्य केले. जवळजवळ ४५ टक्के लोकांनी कामाच्या ताणामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम झाला आहे, असे सांगितले. ८० टक्के लोकांनी गेल्या वर्षी तणाव, चिंता, बिघडलेले मानसिक आरोग्य यामुळे कामावरून दोन आठवड्यांची रजा घेतल्याचे कबुल केले. ९० टक्के लोकांच्या मते प्रत्येकवेळी रजेवर असताना त्यांच्याकडून कामाची अपेक्षा केली जात असून, हे चिंताजनक आहे.”

कनेक्टिंग ट्रस्ट विविध कार्यक्रमांद्वारे हजारो लोकांना मदत करत आहे. यात हायस्कूल-काॅलेजेसमध्ये पीअर सपोर्ट तयार करणे, मोफत हेल्पलाइन, ईमेल सपोर्ट, सुसाईड सर्व्हायव्हर सपोर्ट आणि  कनेक्टिंग संस्थेमध्ये प्रत्यक्ष भेटूनही संवाद साधता येतो ह्या विनामूल्य सेवांचा समावेश आहे, असे शिल्पा तांबे यांनी सांगितले.

गुटखा: पानटपरीवाल्याकडून खंडणी वसुली-बंटी बबली वर गुन्हा दाखल

पुणे-पुणे शहर आणि परिसरात पान टपऱ्यांवर सुरु झालेली गुटखा विक्री आणि त्याबाबत होणाऱ्या हप्ता वसुलीला आता बहर आला असून येरवड्यातील गुंजन चौकात एका पान टपरी वाल्याला सुरुवातीला २ लाख रुपये मागून आणि महिना १० हजाराचा हप्ता मागून प्रत्यक्षात ३० हजार रुपये हिसकावून नेणाऱ्या बंटी आणि बबली विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’येरवडा पोलीस ठाण्यात ६५७/२०२४, मा.न्या. सं. कलम ३०८ (३),३०९ (४),३(५) अन्वये यापाराक्नी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३० वर्षीय, कामराजनगर मधील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीने याबाबत एक महिला आणि एक पुरुष यांच्फिया विरोधात फिर्याद नोंदविली आहे. दि.११/१०/२०२४ रोजी ११/१५ वा. भोला पानटपरी, ई-सेवा केंद्राच्या बाजूला, इंडियन पेट्रोलपंपारा मोर, गंजन चौक, पर्णकुटी चौक पुणे येथे येवून या जोडगळी ने फिर्यादीचा पुतण्या व मेहूणा यांना मारहाण व शिवीगाळ करुन, फिर्यादी तिथे आल्यानंतर तु गुटखा विकतो तु मला दोन लाख रुपये आता दे, नाही तर मी तुला पोलीसाच्याकडे घेवुन जाईन अशी धमकी देऊन दर महिन्याला १०,०००/- रुपये हफ्ता मागितला न दिल्यास तुझा धंदा बंद करण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या खिशामधील ३०,०००/- रुपये हिसकावून घेवून तिथून निघून गेले. फौजदार जयदिप पाटील मो. नं.८२०८८०९३५३ या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

वाहनांची तोडफोड करून धनकवडीतले भाई फरार

पुणे-धनकवडीतल्या गणेश चौकात ४ वाहनांची मोडतोड करून आम्ही इथले भाई आहोत असा आवाज टाकत धनकवडी तले ‘तथाकथित ‘ ५/६ भाई फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’सहकारनगर पोलीस ठाण्यात ३४४/२०२४, मा.न्या.सं. कलम १८९ (१), १९१ (२),१९०,३२४ (४), आर्म अॅक्ट ४ (२५), महा.पो.अधि. कलम ३७ (१) (२) (३) सह१३५, व क्रिमीनल लॉ अमेंडमेट अॅक्ट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१२/१०/२०२४ रोजी रात्री २१/१५ ते २१/३० वा शेलार चाळ, गणेश चौक धनकवडी पुणे यातील गणेश चौक शेलार चाळ या ठिकाणी या ‘भाई’ लोकांनी लोखंडी हत्यार हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणुन लोंकाचे मनात दहशत निर्माण करून तेथे रस्त्याचे कडेला उभी असलेली फिर्यादीची रिक्षाची काचा फोडून नुकसान करून तेथे बाजुला उभ्या केलेल्या एका चार चाकी वाहनाचे व दोन टू व्हिलर गाड्यावर वार करुन सदर गाड्याचे नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार मो नं.८६९१९१११२३ अधिक तपास करत आहेत.

एसटी’ आरक्षण अंमलबजावणीच्या ‘जीआर’साठी सकल धनगर समाजातर्फे ढोल वादन आंदोलन.


पुणे: धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे रविवारी पुण्यात ढोल वादन आंदोलन करण्यात आले. सारसबागजवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला अभिवादन करून धनगर समाजबांधवांनी एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय घेतला नाही, तर उग्र स्वभावाचा धनगर समाज महायुती सरकारचे दहन केल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारा समन्वयक ऍड. विजय गोफणे यांनी दिला.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील शेकडो धनगर बांधव, भगिनी यामध्ये सहभागी झाले होते. ऍड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, अनिकेत कवाने, डी. बी. नाईक, मधुसूदन बरकडे, योगेश खरात, महादेव वाघमोडे, विष्णुदास गावडेसुनंदा गडदे, पिंटू कोकरे, भरत गुरव, डॉ. सुधाकर न्हाळदे, खंडू तांबडे यासह अन्य धनगर बांधव उपस्थित होते.

ऍड. विजय गोफणे म्हणाले, “राज्यघटनेने धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण दिलेले आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आजवर अनेकदा धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीचे यासंदर्भातील शासन निर्णय काढून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द खरा करावा. तसे झाले, तर येत्या निवडणुकीत राज्यातील दोन कोटी धनगर समाज त्यांच्या पाठीशी राहील.”

“आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारने हा निर्णय घेतला नाही, तर विधानसभा निवडणुकीत धनगर समाज आपली ताकद दाखवून देईल. राज्यातील ८० ते ९० मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक भूमिका राहणार आहे. तर ७० ते ८० मतदारसंघात ५० ते ६० हजारांचे मतदान धनगर समाजाचे आहे. त्यामुळे महायुती सरकारने धनगर समाजाचा पाठिंबा मिळवायचा, की समाजाचा रोष ओढवून घ्यायचा, हे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाने ठरवावे,” असे गोफणे म्हणाले.

सुदर्शन केमिकल्स करणार जर्मनीच्या ह्यूबॅक ग्रुपचे अधिग्रहण

जागतिक स्तरावर सुदर्शनचा बहुविध सहकाऱ्यांच्या सोबतीने विस्तार; राजेश राठी करणार संयुक्त संस्थेचे नेतृत्व
पुणे, ता. १३: रंगद्रव्ये उत्पादनातील अग्रणी कंपनी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने जर्मनीतील ह्यूबॅक समूहासोबत मालमत्ता आणि शेअर डीलच्या अधिग्रहणाबाबत करार केला आहे. सुदर्शन केमिकल्सची ऑपरेशन्स आणि ह्युबॅचच्या तज्ज्ञ तांत्रिक क्षमतांना एकत्र करून हे धोरणात्मक अधिग्रहण जागतिक रंगद्रव्य कंपनी तयार करेल, अशी घोषणा सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांनी विजयादशनीच्या मुहूर्तावर केली.

अधिग्रहणानंतर, एकत्रित कंपनीकडे उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांचा विस्तृत रंगद्रव्य पोर्टफोलिओ असेल. तसेच युरोप आणि अमेरिकेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये त्यांचे भक्कम स्थान असेल. या अधिग्रहणामुळे सुदर्शनचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढणार असून, ग्राहकांना याचा लाभ होण्यासह जागतिक स्तरावर १९ साइट्सवर आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचा ठसा मिळेल. या एकत्रित कंपनीचे नेतृत्व राजेश राठी करणार असून, त्यांच्यासोबत दर्जेदार अंमलबजावणी कौशल्ये आणि तांत्रिक क्षमता असलेली तज्ज्ञ व्यवस्थापन टीम असेल. क्रौफोर्ड बेली आणि नोएरर सुदर्शनसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून, तर डीसी ऍडवायझरी आर्थिक सल्लागार म्हणून काम करत आहेत.

ह्यूबॅक ग्रुपला २०० वर्षांचा इतिहास आहे. २०२२ मध्ये क्लॅरियंटसोबत एकीकरण केल्यानंतर तो जगातील दुसरा सर्वात मोठा पिगमेंट प्लेयर बनला होता. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ह्यूबॅकची उलाढाल एक अब्ज युरोपेक्षा जास्त होती. मात्र, युरोप, अमेरिका आणि एशिया-पॅसिफिक प्रदेशात वाढते खर्च आणि उच्च व्याजदरांमुळे गेल्या दोन वर्षांत समूहाला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यातून सुदर्शनने ह्यूबॅकचे अधिग्रहण केले असून, येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.

या कराराबाबत बोलताना राजेश राठी म्हणाले, “दोन व्यवसायांना एकत्र आणणाऱ्या या व्यवहारामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यातून जागतिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण होतील. फ्रैंकफर्ट हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असून, जागतिक रंगद्रव्य कंपनी तयार करण्यासाठी आम्ही या दोन कंपन्यांचे काळजीपूर्वक एकत्रीकरण करू. सुदर्शन केमिकल्स चपळता आणि कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते. ही संस्कृती आम्ही एकत्रित कंपनीमध्ये अंतर्भूत करू. त्यातून ग्राहक केंद्रित आणि फायदेशीर रंगद्रव्य कंपनी होण्यास मदत होईल.”

ह्यूबॅकचे ग्रॅम डीहोंड म्हणाले, “सुदर्शन केमिकल्सला सोबत घेऊन, ग्राहकांना उच्च दर्जाच्या उत्पादनांसह सेवा देण्यासह आमचा दोनशे वर्षांचा वारसा पुन्हा मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. एकत्रितपणे, आम्ही ग्राहक केंद्रित आणि उत्पादन उत्कृष्टतेच्या तत्त्वांवर आधारित रंगद्रव्य उद्योगाचे भविष्य घडवू. आमची एकत्रित क्षमता आमच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यास सक्षम करेल. या पुढील टप्प्यात प्रवेश करताना आम्ही सुदर्शनसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”

सुदर्शन-ह्यूबॅकच्या एकीकरणाचे फायदे:
– ग्राहक (सेवा) केंद्रस्थानी असलेली कंपनी बनेल
– ग्राहकांसाठी पसंतीचा पुरवठादार बनण्याची संधी
– जागतिक पुरवठा साखळी अधिक सक्षम होणार
– ग्राहकांना कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी कंपनी सज्ज होईल
– रंगद्रव्ये उत्पादनातील प्रमुख पुरवठादार होईल
– उत्तम आर्थिक सामर्थ्य आणि नफ्यासह जगातील सर्वात महत्त्वाची रंगद्रव्य कंपनी
– सुदर्शन केमिकल्सचा जागतिक बाजारपेठेतील उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार वाढेल
– युरोप, अमेरिकेत सेवेच्या संधीसह १९ जागतिक साइट्सवर ठसा निर्माण होईल
– एकात्मता, चपळता आणि कार्यक्षमतेची संस्कृती अधिक वाढेल
– भागधारकांना मूल्य वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती लागू होणार
– जागतिक दर्जाचे व्यवस्थापक आणि रंगद्रव्य तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वाटचाल

“ह्यूबॅककडे सानुकूलित उत्पादनांसह मोठ्या प्रमाणात विस्तृत आणि उच्च गुणवत्तेचे उत्पादन पोर्टफोलिओ आहे. हे कोटिंग, प्लास्टिक, इंक, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधील ऍप्लिकेशन्ससह जागतिक ब्लूचीप ग्राहकांच्या मजबूत ग्राहक आधाराची सेवा करते. ह्यूबॅककडे जागतिक स्तरावर १७ उत्पादन साइट्स आहेत जी कोणत्याही भू-राजकीय आणि पुरवठा साखळी आव्हानांमध्ये स्थिरता प्रदान करतात, पुरवठादार आणि ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध सुनिश्चित करतात. त्यामुळे येत्या तीनचार महिन्यात अधिग्रहणाची ही प्रक्रिया विनासायास पार पडेल.”
– राजेश राठी, व्यवस्थापकीय संचालक, सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड