Home Blog Page 64

सियाचीनमध्ये भारतीय सैन्याला पोहोचला ‘मायेच्या फराळाचा घास’

0

आधार सोशल ट्रस्टच्या ११ व्या दिवाळी उपक्रमातून सीमावर्ती भागात फराळ, शुभेच्छा संदेशांचे वाटप

पुणे: भारतीय सैन्याला दिवाळीचा रुचकर फराळ, विद्यार्थ्यांनी बनवलेली शुभेच्छा पत्रे, सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय व खेळाचे साहित्य, तसेच सायकली पोहोचल्या. ‘मायेच्या फराळाचा घास’ या उपक्रमातून गेल्या ११ वर्षांपासून आधार सोशल ट्रस्टच्या वतीने सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी सियाचीन बेस कॅम्पवर हा फराळ वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आगामी काळात या कामामध्ये संस्थेला मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर मुंबईतून हा फराळ सीमावर्ती भागात पाठवण्यात आला. राज्यभरातून १५ ते १७ जिल्ह्यांतील सुमारे १८० ते १९० शाळा या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेच्या माध्यमातून हजारो शुभेच्छा पत्रे तयार केली होती. आजवर १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे संदेश सीमावर्ती भागातील जवानांपर्यंत पोहोचले आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पुणे जिल्हा सरचिटणीस भाजपा गंगाराम जगदाळे, पुरंदर तालुका भाजपा सरचिटणीस विशाल कुदळे यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.

२०१४ पासून या उपक्रमाने पठाणकोट, पुगल (राजस्थान), सिक्कीम-नथुला, जैसलमेर, पंजाब, डलहौसी, जम्मू-श्रीनगर-नागरोटा, सुंदरबनी, अखनूर, चुरणवाला (राजस्थान) आणि कारगिल-रंधावा अशा दुर्गम सीमाक्षेत्रांपर्यंत पोहोचून हजारो जवानांपर्यंत महाराष्ट्राचा स्नेह व कृतज्ञतेचा संदेश पोहोचवला आहे. गेली ११ वर्ष अविरतपणे हा उपक्रम आधार सोशल ट्रस्टचे सर्वेसर्वा संतोष चाकणकर आणि त्यांचे सहकारी यांच्यातर्फे चालू आहे. फराळामध्ये मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रव्याचे लाडू, शंकरपाळी, चकली, चिवडा, अनारसे, लसूण शेव, काजूबर्फी, कापणी, शेव याचा समावेश होता. 

आधार सोशल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चाकणकर म्हणाले की, सियाचिनमधील हाडे गोठवणारी थंडी, प्रतिकूल वातावरणात भारतीय जवान देशाची, या मायभूमीची रक्षा करण्यासाठी अहोरात्र तैनात आहेत. बर्फवृष्टीमुळे लँडस्लाइड होतात, ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे शारीरिक, मानसिक हानी होते. अशा या देशप्रेमी, निःस्वार्थी जवानांना मायेचा घास सियाचीन बेस कॅम्पला पोहोचवला. अतिशय आनंदाने त्यांनी हा दिवाळी फराळ आणि मुलांचे शुभेच्छा संदेशाचा स्वीकार केला. सियाचीनसह नुब्रा व्हॅली, लेह येथे वरिष्ठ सेनाधिकारी, सैन्यदलातील जवानांच्या उपस्थितीत हे अभियान पार पडले.

भारतीय सेनेने दाखविलेल्या विश्वासामुळे, या उपक्रमातून सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, क्रीडासाहित्य आणि सायकली देऊन त्यांच्याशी सांस्कृतिक बंध निर्माण करण्याचे काम आधार सोशल ट्रस्ट करत आहे. हा उपक्रम केवळ दिवाळी फराळापुरता मर्यादित नसून, भारतीय संस्कृती आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणारा एक राष्ट्रीय संदेशवाहक उपक्रम ठरत आहे.

संतोष चाकणकर, अध्यक्ष, आधार सोशल ट्रस्ट

३६ वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बुधवारपासून बोपखेलमध्ये- अण्णा बनसोडे

0

पिंपरी चिंचवडला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद!

पिंपरी, पुणे (दि. ३ नोव्हेंबर २०२५) : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने होणारी ३६वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ५ नोव्हेंबरपासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल गावठाण येथे सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
दरम्यान स्पर्धेचा समारोप २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्ता भरणे राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार असल्याचेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
सोमवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल बेनके, कार्याध्यक्ष दत्तात्रेय कळमकर, सहकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे, राजेंद्र ढमढेरे, खजिनदार प्रकाश पवार, राष्ट्रीय पंचप्रमुख गजानन मोकल, माजी नगरसेवक अविनाश काटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष शशिकांत घुले तसेच सतीश लांडगे, संजय अवसरमल आदी उपस्थित होते. दरम्यान स्पर्धेचे परीक्षण विविध जिल्ह्यातून येणारे ४० हून अधिक राष्ट्रीय पंच करणार आहेत.
स्पर्धेची माहिती देताना बाबुराव चांदेरे म्हणाले, यांना निवड चाचणी स्पर्धा बोपखेल येथील श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडा नगरी येथे पार पडणार आहे. यजमानपद पिंपरी चिंचवड शहराला प्राप्त झाले आहे. स्पर्धेचा शुभारंभ किशोर गटातील परभणी विरुद्ध बीड, पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड आणि रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व या सामन्यांनी होणार आहे. किशोरी गटात नाशिक शहर विरुद्ध ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड विरुद्ध नांदेड आणि परभणी विरुद्ध जळगाव हे सामने पहिल्या दिवशी रंगतील.
विशेष म्हणजे गतवर्षी मनमाड येथे झालेल्या या स्पर्धेत किशोर गटात परभणीने आणि किशोरी गटात नाशिक शहरने विजेतेपद पटकावले होते. पिंपरी चिंचवड संघाला दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा स्पर्धा शहरातच होत असल्याने पिंपरी चिंचवड संघाला घरच्या मैदानाचा लाभ घेता येतो का याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अशी असेल स्पर्धेची गटवारी : किशोर गटात एकूण आठ गटांची विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात परभणी, जळगाव आणि बीड, “ब” गटात पिंपरी चिंचवड, पुणे शहर, रायगड आणि सोलापूर, “क” गटात रत्नागिरी, नांदेड, मुंबई उपनगर पूर्व आणि सिंधुदुर्ग, “ड” गटात जालना, पालघर, नाशिक शहर आणि हिंगोली या संघांचा समावेश आहे. “इ” गटात ठाणे ग्रामीण, उस्मानाबाद, नाशिक ग्रामीण आणि सातारा, “फ” गटात कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे आणि मुंबई शहर पूर्व, “ग” गटात मुंबई उपनगर पश्चिम, अहमदनगर, लातूर आणि ठाणे शहर तर “ह” गटात नंदुरबार, सांगली, मुंबई शहर पश्चिम आणि पुणे ग्रामीण संघ स्पर्धेत उतरतील.

किशोरी गटात “अ” गटात नाशिक शहर, मुंबई उपनगर पश्चिम आणि ठाणे ग्रामीण, “ब” गटात पिंपरी-चिंचवड, नंदुरबार, नांदेड आणि बीड, “क” गटात परभणी, रत्नागिरी, जळगाव आणि सोलापूर, “ड” गटात सांगली, ठाणे शहर, सातारा आणि औरंगाबाद, “इ” गटात पुणे ग्रामीण, अहमदनगर, पालघर आणि धुळे, “फ” गटात नाशिक ग्रामीण, कोल्हापूर, लातूर आणि हिंगोली, “ग” गटात जालना, पुणे शहर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग तर “ह” गटात मुंबई उपनगर पूर्व, रायगड, मुंबई शहर पश्चिम आणि मुंबई शहर पूर्व संघ सहभागी झाले आहेत.


“कबड्डीचा धुरळा उडवण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे,”
राज्यभरातून प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळवून देणारी ही किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगतदार होणार असून कबड्डी प्रेमींसाठी रोमांचक लढतींचा आनंद घेण्याची पर्वणी ठरणार आहे. :बाबुराव चांदेरे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन

कबड्डी हा आपल्या परंपरेचा खेळ आहे. आजच्या डिजिटल युगात अशा स्पर्धांमुळे तरुण वर्ग पुन्हा मैदानावर येतो, हे आनंददायी आहे,”पिंपरी चिंचवडला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, स्थानिक खेळाडूंना यातून प्रोत्साहन मिळते.
अण्णा बनसोडे
उपाध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र राज्य.

आयएफएससी आशियाई के चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कोरियाचे वर्चस्व

0

पिंपरी चिंचवडवासियांनी अनुभवला बालवीरांचा थरार

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयएफएससी आशियाई के चॅम्पियनशिप २०२५’ सध्या पिंपळे सौदागर येथे सुरू आहे. या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड वासियांनी लहान मुलांचा चढाईचा थरारक खेळ अनुभवला. ही अवघड चढाई करताना प्रत्येक खेळाडूंचा कस लागत होता. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कोरिया व जपानच्या मुलांनी आपले वर्चस्व सिद्ध करत बाजी मारली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पीसीएमसी क्लाइंबिंग वॉलवर होत असलेल्या या स्पर्धेत आशियातील १३ देशांतील २०० हून अधिक खेळाडूंनी सहभागी झाले आहेत. दरम्यान ही स्पर्धा ४ नोव्हेंबर पर्यंत योगा पार्क, पिंपळे सौदागर येथे सुरू आहे.

दुसऱ्या दिवसाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे

१५ वर्षांखालील मुलींची – बौल्डर स्पर्धा
या गटात जपान आणि कोरिया यांच्या खेळाडूंनी  वर्चस्व गाजवले.

सुवर्णपदक – हारू माकिता (जपान) हिने ८४.९ गुणांसह पटकावले.

रौप्य पदक – नाना किमुरा (जपान)

कांस्य पदक – नो युन सिओ (कोरिया)

तर भारताच्या अमियरा खोसल्ला हिने १२ वे स्थान मिळवले. तसेच शरयू हांडे (२२ वे) आणि सांगिता तियु (२५ वे) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.

१५ वर्षांखालील मुलं – बौल्डर स्पर्धा
या गटातही कोरियन आणि जपानी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

सुवर्णपदक – जुंगयून चोई (कोरिया)

रौप्यपदक – को ह्विचान (कोरिया)

कांस्यपदक – कोटारो कावामोटो (जपान)

भारताच्या सुकू सिंग याने आठव्या क्रमांकासह टॉप-१० मध्ये स्थान मिळवले. देबाशीष महतो (१५ वे) आणि इतर भारतीय खेळाडूंनीही उत्तम प्रदर्शन केले.

१३ वर्षांखालील मुलं – लीड स्पर्धा
या गटात कोरियन खेळाडूंनी सर्व पदके जिंकत वर्चस्व राखले.

सुवर्णपदक – जुनह्योक को (कोरिया)

रौप्यपदक – लिम सिह्युन (कोरिया)

कांस्यपदक – वाँग युएत शिंग राफेल (हाँगकाँग)
भारतीय मोरा बुरियुली (७ वे) आणि शंकर सिंह कुंतिया (८ वे) यांनी दमदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले.

१३ वर्षांखालील मुली – लीड स्पर्धा
या गटात कोरियन मुलींनी शानदार कामगिरी केली.

सुवर्णपदक – किम हायउन (कोरिया)  सुवर्णपदक

रौप्यपदक – पार्क हायुल (कोरिया)

कांस्यपदक – ली जियुन (कोरिया)
भारताची ध्रुवी पदवाल हिने ८ वे स्थान मिळवून विशेष लक्ष वेधले. मनीषा हांसदा आणि मीरा चौधरी यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत चांगले स्कोअर मिळवले.

आकाश दडमल ठरला खासदार श्रीचा मानकरी

खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, ता. ३ – एबीएस जिमच्या आकाश दडमल याने केंद्रिय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधऱ मोहोळ यांच्या पुढाकाराने होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवातील शरीरसौष्ठव स्पर्धेतील मा ना खासदार श्रीचा किताब मिळवला.
खासदार क्रीडा महोत्सवात एकूण ३५ क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. त्याचा एक भाग म्हणजे महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न, पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी-चिंचवड शरीर सौष्ठव संघना, फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गणेश कला क्रीडा येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण १४५ स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. सर्व गटातील पहिल्या सहा स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात आले. प्रत्येक गटातील विजेत्यास पाच हजार, उपविजेत्यास तीन हजार रुपये आणि तिस-या क्रमांकास दोन हजार रुपये देण्यात आले. चौथ्या ते सहाव्या क्रमांकावरील प्रत्येकास एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट देण्यात आला. त्याचबरोबर इतरही रोख वैयक्तिक पारितोषिके होती.
यात खासदार श्री किताबाचा मानकरी ठरलेल्या आकाश दडमल याला २१ हजार रुपये, मानाचा बेल्ट, मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देण्यात आले. उद्योन्मुख बॉडिबिल्डर विजेत्याचा पुरस्कार बी. बी. फिटनेसच्या पांडुरंग भोसलेने पटकावला. त्याला दोन हजार रुपये रोख, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बेस्ट पोझर पुरस्कार यूएफसी जिमच्या विनोद कागडेने मिळवला. त्याला तीन हजार रुपये आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले. मोस्ट इम्प्रूव्हड बॉडिबिल्डर हा किताब खालसा जिमच्या भरत चव्हाणने मिळवला. त्यालाही तीन हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.
शरीर सौष्ठव स्पर्धेत जास्त करून सर्वसामान्य घरातील मुले असतात. तरुण तंदुरुस्त राहिला, तर देश तंदुरुस्त राहील. त्यासाठीच या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूने आपल्या आजूबाजूला असलेल्या मुला-मुलींनाही खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. जेणेकरून पुण्यातील क्रीडा संस्कृतीचा विकास होईल, असे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले. त्यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
या वेळी विनोद नायडू, सागर येवले, प्रशांत जगताप, दिलीप धुमाळ, सलीम सय्यद, श्रीकांत टकले, मयूर मेहेर, गौतम तांबे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
मेन्स फिजिक्स श्री विजेता निखिल चांदगुडे
गल्यास्की फिटनेस जिमचा निखिल चांदगुडे हा स्पर्धेतील मेन्स फिजिक्स श्री या किताबाचा विजेता ठरला. त्याला रोख अकरा हजार रुपये, ट्रॉफी, मानाचा बेल्ट, प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंदार चावरकर अनिल शिंदे, राजेश इरले, महादेव सपकाळ आणि राजेश सावंत, मनीष पोकळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

निकाल : ५५ किलो गट – १) अभिषेक खरात २) नीलेश गजमल ३) मंगेश गावडे ४) रेहमान नालबंद ५) मयूर गायकवाड ६) समीर साठे.
६० किलो गट – १) ओंकार माने २) प्रकाश मिंडे ३) रोशन विश्वकर्मा ४) विशाल खुडे ५) साहिल वाड ६) हूजेज अंसारी.
६५ किलो गट – १) पांडुरंग भोसले २) अक्षय खोमणे ३) हर्षल काटे ४) प्रतिक पाटील ५) विनय पांचाळ ६) अमित चौगुले.
७० किलो गट – १) सचिन सावंत २) अक्षय वाडीकर ३) अजय रक्ताटे ४) अभिषेक पाटील ५) महेश चौधरी ६) सलिम शेख
७५ किलो गट – १) आकाश दडमल २) विजय सरोज ३) श्रीनाथ गडदे ४) मुस्तकीन ढालाइत ५) ऋषिकेश बेलमकर ६) धीरज लेकावळे
८० किलो गट – १) तुषार चोरगे २) शुभम गिरी ३) प्रशांत धोंडे ४) विनोद कागडे ५) शिवम वडार ६) अजिंक्य सुपेकर
८० किलो वरील – १) भारत चव्हाण २) फिरोज शेख ३) ऋषिकेश बिरेदार ४) साईनाथ सूर्यवंशी ५) संतोष मोहिते ६) सूरज जुगेल
………

वुमेन्स – २०२५ – १) यशोदा भोर २) प्रतिमा कांबळे ३) प्राजक्ता पाटील ४) ज्योस्त्ना डाळिंबकर
मेन्स फिजिक्स (१७० सेमीपर्यंत) १) निखिल चांदगुडे २) अभिषेक सणस ३) अक्षय कोंढरे ४) किरण कोरे ५) प्रतिक पाटील ६) मयूर गायकवाड
मेन्स फिजिक्स (१७० सेमीवरील) १) रुपेश कसबे २) सुशांत जाधव ३) निलेश कलंगगोट ४) श्रीनाथ गदादे ५) सूरज पाटील ६) मुस्तकीन धलाईत

जय शहा यांच्या सुधारक दृष्टिकोनामुळे क्रिकेटमध्ये सुवर्णयुगाची सुरुवात

भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा म्हणाले, “शेवटी भारताने विश्वचषक जिंकलाच! कालची रात्र महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. एखाद्या भारतीय कर्णधाराने प्रथमच आयसीसी महिला विश्वचषक उचलला ही अभिमानास्पद घटना आहे. खेळामधील वाढती गुंतवणूक, पुरुष क्रिकेटपटूंसम समान वेतन धोरण, ‘डब्ल्यूपीएल’मधील स्पर्धात्मक वातावरणातून घडलेली मोठ्या सामन्याची मानसिक तयारी आणि भारतीय संघाचा निर्धार व कौशल्य या सर्वांचा संगम या असामान्य विजयामागे आहे.”

श्री. जय शहा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली क्रिकेट जगतात भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही आमूलाग्र परिवर्तन घडले आहे.

प्रथम ‘बीसीसीआय’चे सचिव आणि आता ‘आयसीसी’चे अध्यक्ष म्हणून, श्री. शहा यांनी सर्वसमावेशकता, आर्थिक समता आणि जागतिक विस्तार यांवर भर देणाऱ्या सुधारवादी धोरणांमधून खेळाच्या प्रशासनाला नवे स्वरूप दिले आहे.

‘आयसीसी’मध्ये जय शहा यांनी परिवर्तनकारी नेतृत्व दिले आहे. सुरुवातीला ते फायनान्स आणि कमर्शियल अफेअर्स कमिटीचे अध्यक्ष होते आणि आता ते ‘आयसीसी’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये आयसीसीने पुरुष आणि महिला स्पर्धांसाठी पारितोषिकांची समान रक्कम जाहीर केली. क्रिकेटमधील लैंगिक समतेकडे जाणारे हे ऐतिहासिक पाऊल आहे.

त्यांनी कोविडनंतर ‘आयसीसी’च्या आर्थिक व व्यापारी आराखड्याला अधिक सक्षम केले, जागतिक महसूल टिकवून ठेवला आणि नवोदित देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करणाऱ्या प्रशासकीय सुधारणांना चालना दिली. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे ऐतिहासिक पुनरागमन होणार आहे, या निर्णयातही शहा यांची मध्यवर्ती भूमिका आहे. त्यांनी स्वतः ‘आयसीसी’च्या वतीने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे केलेले सादरीकरण यशस्वी ठरले.

जागतिक क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी जय शहा यांनी बीसीसीआयचे सचिव या पदावरून भारतीय क्रिकेटमध्ये व्यावसायिकता, समता आणि प्रगतीचे नवे युग आरंभले. त्यांनी प्रशासन मजबूत करणारे, कामकाज सुटसुटीत करणारे आणि मंडळ अधिक पारदर्शक व माहिती-आधारित बनवणारे व्यापक सुधार कार्यक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जागतिक क्रीडा क्षेत्रातील एक प्रभावी ब्रॅंड म्हणून उभा राहिला. या लीगने विक्रमी माध्यमाधिकार करार मिळवले. त्यानंतर त्यांनी महिला प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) सुरुवात केली. ही आज जगातील सर्वात मोठी महिलांची क्रीडा लीग बनली आहे.

श्री. शहा यांनी खेळाडूंच्या समान वेतनाचा ऐतिहासिक निर्णय लागू केला. त्यामुळे पुरुष व महिला क्रिकेटपटूंना समान मानधन मिळू लागले. तसेच, देशांतर्गत स्पर्धांमधील बक्षीसांच्या रकमेत आणि मानधनात मोठी वाढ केली. त्यांनी कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘टेस्ट क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू केली आणि बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमीचे (एनसीए) जागतिक दर्जाचे उच्च-कार्यक्षमता व पुनर्वसन केंद्र म्हणून आधुनिकीकरण केले. शहा यांच्या दूरदृष्टीचा परिपाक म्हणून भारताने २०२३ मध्ये विक्रमी यशस्वी आयसीसी विश्वचषकाचे आयोजन केले. त्यातून जय शहा हे भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक प्रभावशाली प्रशासकांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.

‘बीसीसीआय’च्या सचिव पदावरील कार्यकाळात जय शहा यांनी राबवलेल्या उपक्रमांचे भारतीय क्रिकेटला समृद्ध फळ मिळाले. फक्त तीन वर्षांत भारताने पुरुष आणि महिला गटांमध्ये मिळवलेली पाच आयसीसी विजेतेपदे ही त्याची ठळक उदाहरणे आहेत :

·         आयसीसी १९ वर्षांखालील महिला विश्वचषक – २०२३ आणि २०२५

·         आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ – १७ वर्षांनंतर मिळवलेले विजेतेपद

·         आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ – १२ वर्षांनंतरचा गौरवशाली विजय

·         आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ – भारतीय महिलांचा ऐतिहासिक पहिला विश्वविजय!

भारतीय महिलांनी प्रथमच जिंकलेले हे विश्वचषक विजेतेपद शहा यांच्या सर्वसमावेशक आणि सशक्त क्रिकेट व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण ठरले आहे.

दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि धाडसी सुधारणांद्वारे जय शहा हे केवळ आशा निर्माण करत नाहीत, तर ती प्रत्यक्षात उतरवतात. ते असा बदल घडवतात जो सर्वांना एकत्र आणतो आणि प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची व ती साकार करण्याची समान संधी देतो.

पुणे पीपल्स बँकेची विजयी सलामी 

सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात ; पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन

पुणे : पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर ३७ धावांनी मात केली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही लढत झाली. पुणे पीपल्स बँकेने निर्धारित ८ षटकांत सहा बाद ८१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ७ बाद ४४ धावाच करता आल्या. यात मंगेश वाडकरने अष्टपैलू कामगिरी केली.

दुस-या लढतीत साधना सहकारी को-ऑपरेटिव्ह बँकेने धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर ८० धावांनी मात केली. साधना सहकारी बँकेने २ बाद ११६ धावा केल्या. धर्मवीर बँकेला ५ बाद ३६ धावाच करता आल्या.

‘सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५’ चे उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (२०२५) निमित्ताने आयोजित स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पंडित नेहरू स्टेडियम येथे पार पडला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅ’ड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, संचालक प्रल्हाद कोकरे, राजेश कवडे, सय्यद मोहम्मद गौस शेर अहमद, संजय शेवाळे, कांतीलाल गुजर, बाबुराव शितोळे, प्रिया महिंद्रे, नंदा लोणकर, युवराज वारघडे आणि इतर बँकेचे वंदना काळभोर, कमल व्यवहारे, गौतम कोतवाल, अनिरुद्ध देसाई, दीपक घाडगे, अजय रजपूत, जितेंद्र पायगुडे आदी उपस्थित होते. 

धावफलक : १) पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ६ बाद ८१ (मंगेश वाडकर २५, किशोर तुपे नाबाद २१, उमेश कोतकर २१, मोरेश्वर ढमढेरे २-०-११-२, किरण चौबोरे २-०-१९-१, तुषार साबळे १-०-१५-१) वि. वि. पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ७ बाद ४४ (आदित्य ढमढेरे ५, मंगशे वाडकर २-०-६-२, संतोष साबळे २-०-११-१, चंद्रकांत पवार २-०-४-१, प्रतिक गुजराती १-०-१०-१).


२) साधना सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत २ बाद ११६ (रोहन तिखे ४५, सुमीत गावडे नाबाद ३४, गोपाळ मुंडे नाबाद २०) वि. वि. धर्मवीर संभाजी को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ५ बाद ३६ (सचिन कडू १२, गोपाळ मुंडे १-०-३-१, सागर माथवड १-०-२-१).

गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज

 राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५: दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राबविण्यात येणार आहे. महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्याच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल.

स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७,५०० रुपये अनुदान मिळेल. सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्वरित रक्कम भरून ग्राहक २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो.

शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे. 

एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदणी चौक ते पाषाण दरम्यान मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचे वेधले लक्ष

पुणे -अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदणी चौक ते पाषाण दरम्यान मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून येथे प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना पाचारण करून माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी नागरिकांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या . बावधन परिसरातील चांदणी चौक ते पाषाण दरम्यानचा 36 मीटर मुख्य रस्ता, ड्रेनेज व पावसाळी लाईनचे अनेक वर्षांपासून रखडलेले आहे या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या कामाच्या विलंबामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीची मोठी गैरसोय, साचलेल्या पाण्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या भेडसावत होत्या. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचल्याने वाहनचालक व पादचारी दोघांनाही त्रास सहन करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी अनेक वर्षांपासून या कामासाठी सातत्यपूर्ण आणि ठामपणे पाठपुरावा केला आहे. त्यांनी प्रशासनाच्या विविध स्तरांवर बैठक घेत कामाची गती वाढविण्याचा सातत्याने आग्रह धरला.या प्रयत्नानंतर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज स्थळ पाहणी करून संबंधित विभागांना काम तात्काळ सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान पथ विभागाचे अजित आंबेकर, भुताडा, सुनिल भोंगळे,मालमत्ता विभागाचे उपआयुक्त प्रशांत ठोंबरे, अभिषेक घोरपडे
बांधकाम विभागाचे बोबडे, महेश शेळके,भू संपादन विभागाचे मोरे,कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल, आरोग्य अधिकारी व अभियंता,ड्रेनेज विभागाचे सुभाष फावरा, अजिक्य वानखडे, रुचिता बावणकर अशी अधिकाऱ्यांची मोठी फौजच अवतरली होती त्यामुळे आता नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी हे अनेक वर्षांपासून रखडलेले मुख्य रस्ता, ड्रेनेज व पावसाळी लाईनचे काम आता लवकरच सुरू होणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे .

कविता माणसाला जगण्याचे बळ देते : राजन लाखे

कविसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद : पुणे बुक फेअरचा समारोप
पुणे : कविता माणसाला जगण्याचे बळ देते. सामाजिक जाणिवेच्या व वेदनांवर फुंकर घालणाऱ्या कविता सादर करून कवींनी आपल्यातील प्रतिभा सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
एक्सपो सेंटर, महाराष्ट्र साहित्य परिषद, आकाशवाणी, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे 23व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा येथे कविसेंमलन रंगले. पुणे बुक फेअरचे आयोजक पी. एन. आर. राजन, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस उपस्थित होते. कविसंमेलनाने पुणे बुक फेअरचा समारोप झाला.
कविसंमेलनामध्ये अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर, जोत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, माधव राजगुरू, सविता कुरुंदवाडे, रुद्रांश जगताप, डॉ क्षितिजा पंडित, रूपाली अवचरे, प्रशांत निकम, डॉ प्रेरणा उबाळे, शरयू पवार, डॉ. राहुल भोसले, विनोद अष्टूळ, रमेश जाधव, दशरथ दूनधव, डॉ मृणालिनी गायकवाड, डॉ. लता पाडेकर, डॉ. गोविंद सिंग राजपूत, ज्योत्स्ना बिडवे, आकांक्षा अग्रवाल आदी मान्यवर कवी सहभागी झाले होते. कवींनी सादर केलेल्या कवितांवर मार्मिक भाष्य करत राजन लाखे यांनी कार्यक्रम रंगवत नेला. आभारप्रदर्शन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. सुनील धनगर यांनी केले. कविसंमेलनास उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भाजपला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते, भाजपाच्या बुद्धीची किव करावी वाटते: हर्षवर्धन सपकाळ

डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित नाईक निंबाळकरला तात्काळ अटक करा.

डॉ. संपदा मुंडे प्रकरणी न्यायमूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन करा, अन्यथा १० नोव्हेंबरला ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालू: उदन भानू चिब

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न.

मुंबई, दि. ३ नोव्हेंबर २०२५.

राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केलं आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे प्रत्युतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी मुद्दा सर्वात आधी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी उघड केला. आता देशभरातील विरोधी पक्ष याप्रश्नी आवाज उठवत आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिंन्ह उभे राहिले आहे. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे काँग्रेस पक्षाने प्रचंड मोठे आंदोलनही केले. मुंबईत दोन दिवसापूर्वी निघालेल्या मोर्चातही काँग्रेस पक्षाने सहभाग घेतला होता. या मोर्चावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते व झेंडेही होते पण भाजपा त्यावरही टीका करत आहे, ते चुकीचे आहे. या मोर्चात मी सहभागी होण्याचा मुद्दा गौण असून मतचोरी हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यावेळी म्हणाले की, डॉ. संपदा मुंडे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न भाजपा महायुती सरकार करत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी हाय कोर्टाच्या न्यायमुर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन करावी. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी पक्षाचा एक नेताच या प्रकरणात सहभागी असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशीआधी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट दिल्याने राज्य सरकारचे अधिकारी निष्पक्ष तपास कसा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. संपदा मुंडे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने गांभिर्याने घेतले आहे. देश पातळीवर आंदोलन केले जात असून भाजपा महायुती सरकारने या प्रकरणी न्यायामूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन केली नाही तर १० नोव्हेंबला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस वर्षा बंगल्याला घेराव घालून तीव्र आंदोलन करणार आहे. या आंदोलनातील राज्यभरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व तरुण सहभागी होतील असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनिष शर्मा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, प्रभारी अजय चिकारा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस प्रविणकुमार बिरादार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

PSI प्रमोद चिंतामणीला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पिंपरी पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईची देशपातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमचे बघुन घेऊ. सीपी, डिसीपी यांना मॅनेज करु, असे म्हणाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला २ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पहिला हप्ता म्हणून ४६ लाख ५० हजार रुपये घेताना सापळा कारवाईत पकडण्यात आले.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या जामीन अर्जावर से देण्यासाठी अगोदर चिंतामणी याने २ लाख रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये केली. तसेच तक्रारदार वकील यांना संदिप सावंत व चिंतामणी यांनी त्यांच्या केबिनमध्ये अरेरावीची भाषा केली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

चिंतामणी याने मला एक कोटी व साहेबांना १ कोटी रुपये द्या, अशी मागणी केली. वर साहेबांना हा विषय बोलू नका, असे म्हणाले. त्यानंतर अशिलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी चिंतामणी हे तक्रारदार यांना ‘‘तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमच बघुन घेऊ, सीपी, डिसीपी यांना मॅनेज करु, असे म्हणाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर चिंतामणी याचे तक्रारदार वकीलांच्या अशिलाशी बोलणे झाले. त्यानंतर चिंतामणी हे तक्रारदार ‘‘ त्याला उदया दोन कोटी पोहोचवायला लावा’’असे म्हणाले.

त्यानंतर चिंतामणी याने पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांची भेट घडवून आणली तेव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पंच समवेत होते . तेव्हा पोलीस निरीक्षक सावंत तक्रारदार यांना म्हणाले, फिर्यादीचे पैसे मिळत असतील तर ठिक आहे, किती दिवसात पाठवताय सांगा, असे म्हणाले. त्यावर तक्रारदार यांनी त्यांना तीन चार दिवसात असे म्हणाले, त्यानंतर त्यांच्यात अशिलाच्या जामीन अर्जावरील सुनावणीबाबत चर्चा झाली. त्यावेळी चिंतामणी यांनी सावंत यांना आपण म्हणल्याप्रमाणे मी त्यांना १ सीआरचे बोललो, की एक कराच तुम्ही, असे म्हणाले. त्यावर पोलीस निरीक्षक सावंत तक्रारदार यांना ‘‘म्हटल्याप्रमाणे प्रश्नच नाही, त्यावरती काही विश्वास नाही’’ असे बोलले. तक्रारदार व पंच यांच्याबरोबर बोलताना पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केली नाही.

त्यानंतर तक्रारदार यांनी चिंतामणी याला अशिलाने ४५ लाख रुपयांची सोय केली आहे. माझ्याकडील दीड लाख रुपये असे ४६ लाख ५० हजार रुपये देतो, असे सांगितले. त्यानंतर दीड लाख रुपयांची रोकड आणि ४५ लाखांच्या बनावट नोटा असे ४६ लाख ५० हजार रुपयांचे बंडल तयार करण्यात आले. चिंतामणी याला रास्ता पेठेतील पुना कॅफेमध्ये वरील मजल्यावर बोलवले. ते तिथे आले व त्यांनी इथे नको, इथे कॅमेरे आहेत, असे म्हणाले. त्यानंतर तक्रारदार व पंच चालत उंटाड्या मारुती मंदिरासमोर पोहचले. तेथे चिंतामणी याने रिक्षा केली. रिक्षाच्या मागील बाजूला लाचेची रक्कम असलेली पिशवी ठेवली. चिंतामणी रिक्षामध्ये बसत असताना त्याने लाचेची रक्कम असलेली पिशवी एका हाताने उचलत असताना सापळा पथकाने त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईत चिंतामणी याने पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांचे नाव घेतले. तसेच पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये चर्चा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एखादा पीएसआय इतकी मोठी लाच कशी मागू शकतो, असा प्रश्न उपस्थित करुन सीबीआयने या कारवाईची दखल घेतली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दल रडारवर आले आहे.

जयपूरमध्ये डंपर ट्रकने 17 वाहनांना चिरडले, 13 ठार

जयपूर- एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रकने एकामागून एक १७ वाहनांना धडक दिली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. अनेकांचे हातपाय तुटले. रस्ता रक्ताने माखला होता. चालक मद्यधुंद अवस्थेत होता.अपघातात १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तिघांना गंभीर अवस्थेत एसएमएस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, हा अपघात सोमवारी दुपारी हरमारा येथील लोहा मंडी येथे झाला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डंपर महामार्गावर जाण्यासाठी रोड क्रमांक १४ वरून लोहा मंडी पेट्रोल पंपाकडे जात होता.या घटनेदरम्यान, तो वाहनांना धडकला. वाहतूक वळवण्यात आली आहे. घटनास्थळावरून डंपर हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जवळच्या लोकांच्या मदतीने जखमींना एसएमएस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत आहे. दरम्यान, हॉस्पिटल व्यवस्थापनाने ट्रॉमा सेंटरमध्ये तयारी केली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या टीमला सतर्क करण्यात आले आहे.अपघातादरम्यान अनेक लोकांचे कपडे फाटले होते. जवळच्या लोकांनी मृतदेह बाजूला हलवले. त्यानंतर ज्यांचे कपडे फाटले होते त्यांचे मृतदेह त्यांच्याकडे असलेल्या कपड्यांनी आणि रुमालाने झाकले.

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ३- जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी वा कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी तालुकास्तरावर मिशन मोडमध्ये नोंदणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यासाठी प्रांताधिकारी यांनी तात्काळ तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित नोंदणी पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देत, शिक्षकांनाही पदवीधर मतदार म्हणून नोंदविण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी आणि एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी सकाळी ६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरास परवानगी

पुणे, दि. ३ नोव्हेंबर : पुणे येथे होणाऱ्या ७१ व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव सन २०२५ या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी, त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) नुसार १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या कालावधीत ध्वनीची विहीत मर्यादा काटेकोरपणे पाळावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कात्रज- मंतरवाडी रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल – मागविल्या नागरिकांच्या सूचना

पुणे, दि. ३ : पुणे शहरातील काळेपडळ वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या आदेशानुसार (क्र. एम.व्ही.ए. ०११६/८७१/सीआर ३७/ठीआरए २, दिनांक २७ सप्टेंबर १९९६) आणि मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(२)(बी), ११६(४) व ११७ अन्वये पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) हिंमत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कात्रज मंतरवाडी रोड व हांडेवाडी चौक परिसरात प्रायोगिक स्वरूपात खालीलप्रमाणे तात्पुरते वाहतुकीचे बदल लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
काळेपडळ वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या या प्रायोगिक बदलांनुसार – श्रीराम चौक (जे.एस.पी.एम. कॉलेज) ते हांडेवाडी चौक मार्गावरून होळकरवाडी व कात्रजकडे जाणारी दुचाकी, चारचाकी व हलकी मोटार वाहने डावीकडे वळतील. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन जोगेश्वरी मिसळ हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन इच्छित स्थळी जाता येईल.
त्याच मार्गावरील जड व अवजड मोटार वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने २५० मीटर अंतरावर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील हॉनेस्टी स्टील दुकानाजवळून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घ्यावा.
होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणारी दुचाकी व हलकी वाहने हांडेवाडी चौकातून कात्रजच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन शिवेंद्र हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन श्रीराम चौक, सय्यदनगर, हडपसर या दिशेने जाता येईल.
होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणाऱ्या जड व अवजड वाहनांना कात्रजच्या दिशेने २५० मीटर पुढे जाऊन मयुरी वजनकाटा परिसरातून घृव शाळेसमोर उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
नागरिकांना कळविण्यात येते की, या तात्पुरत्या प्रायोगिक वाहतूक बदलांबाबत आपल्या सूचना व हरकती १६ नोव्हेंबर 2025 दरम्यान लेखी स्वरूपात पोलीस उपायुक्त (वाहतूक नियंत्रण शाखा), बंगला क्र. ६, एअरपोर्ट रोड, येरवडा पोस्ट ऑफिससमोर, पुणे येथे सादर करता येतील. प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम आदेश जाहीर करण्यात येतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना सूट देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकान्वये कळविले आहे.