Home Blog Page 631

सामनाच्या अग्रलेखाने सरन्यायाधीशांना घेरले …

यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले, पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? शिवसेना हे नाव, धनुष्यबाणासारखे चिन्ह हीसुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होतीच. संविधानाच्या दहाव्या शेड्यूलचा मान राखून न्यायदान करा, असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर तेराव्या अवताराचे आदेश भारी पडले? यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याचे वकील व्हावे. बोला, आहे तयारी? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून सरन्यायाधीशांवर टीका केली आहे.

सामना अग्रलेख – जसाच्या तसा ….

यमाईच्या नावानं चांगभलं!

यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले, पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले?
शिवसेना हे नाव, धनुष्यबाणासारखे चिन्ह हीसुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होतीच. संविधानाच्या दहाव्या शेड्यूलचा मान राखून न्यायदान करा, असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर तेराव्या अवताराचे आदेश भारी पडले? यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याचे वकील व्हावे. बोला, आहे तयारी?
देशाचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे, पण मोदी-शहांचे राज्य आल्यापासून संविधान धर्मनिरपेक्ष राहिलेले नाही याचा खुलासा स्वतः मावळत्या सरन्यायाधीशांनी केला. मागची दहा वर्षे न्यायव्यवस्थेच्या बाबतीत गोंधळाची गेली व या गोंधळात डफ-तुणतुणे वाजवण्याचे काम याच क्षेत्रातील मोठ्या लोकांनी केले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुणे जिह्यातील त्यांच्या कन्हेरसर गावी जाऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतले व सांगितले, ”गावातील यमाई देवीच्या कृपेमुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो.” चंद्रचूड यांनी एक प्रकारे कायदा व न्यायदान क्षेत्रातील कर्तबगार लोकांवर व त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली. अनुभव, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील त्यांची वरिष्ठता यामुळेच चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले असे कायदा क्षेत्रातील त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होते, पण त्यांच्या गावातील देवीच्या श्रद्धेमुळे ते सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले, अशी वेगळी माहिती देशासमोर आली. चंद्रचूड साहेब रोज पूजा करतात व त्यात चुकीचे काहीच नाही. काही न्यायाधीश कपाळास गंध, टिळा लावून न्यायासनावर बसत असल्याचे अलीकडे दिसून आले. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची मेगाभरती न्यायदान क्षेत्रात मागच्या काही वर्षांत झाली. त्यामुळे आमची न्यायालयेही अनेक धार्मिक राष्ट्रांतील न्यायव्यवस्थेप्रमाणे वर्तन करीत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री राज्य चालवताना हिंदू-मुसलमान असा भेद उघडपणे करतात. बलात्कार करणारे हिंदू असतील व पीडिता मुसलमान असेल तर ही पीडिता सरकारची लाडकी बहीण ठरत नाही, तर बलात्कार करणाऱ्या झुंड टोळय़ांची सजा माफ करून त्यांचे सत्कार ठेवले जातात, अशी अनेक उदाहरणे गेल्या दहा वर्षांत घडली. कायद्याने, घटनेतील कलमानुसार न्यायदान होते का? याबाबतचा कौल आता न्यायाधीशांनी

आपापल्या देवांनाच
लावायला हवा. चंद्रचूड साहेबांनीच तो मार्ग दाखवला आहे. सरन्यायाधीश म्हणतात, ”बाबरी खटल्याचे, अयोध्येतील राममंदिराचे प्रकरण माझ्या समोर आले तेव्हा मी देवासमोर बसलो. हा खटला सोडवण्यासाठी देवाला प्रार्थना केली. मी देवाला म्हटले, आता तुम्हालाच कोणता तरी तोडगा काढावा लागेल.” सरन्यायाधीश कोणत्या देवासमोर प्रार्थनेसाठी बसले? विष्णूच्या तेराव्या अवतारासमोर बसले की चौदाव्या? पण तोडगा निघून अयोध्येत राममंदिर उभे राहिले, मात्र मंदिरातील प्रभू श्रीराम हे लोकसभा निवडणुकीत तेराव्या अवताराला प्रसन्न झाले नाहीत हे नक्की. श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने पडू नये. येथे कायद्याची कलमे कुचकामी ठरतात. अयोध्येतील राममंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. शरयू रक्ताने लाल झाली. ज्यांनी ती लाल केली, त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले. हा भाजपच्याच श्रद्धेचा भाग आहे. या सगळ्या चर्चेचा सारांश किंवा ‘जजमेंट’ असे की, देवाच्या कृपेने भारताचे न्यायदान सुरू आहे. एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात न्यायाधीश ध्यानस्थ होऊन देवासमोर बसतात व देव कौल देईल त्याप्रमाणे मार्ग निघतात. बहुधा त्यामुळेच न्यायाधीशांच्या टेबलावरील संविधानाचे पुस्तक आता न्यायदेवतेची डोळ्यांची पट्टी उघडून तिच्या हाती देण्यात आले. न्यायदेवता निर्जीव आहे व तिच्या हाती संविधान देऊन काय मिळवले? न्यायदेवतेच्या हाती तलवार होती. ती आता सरन्यायाधीशांनी काढून घेतली. त्या हातात मशाल अधिक शोभून दिसली असती. न्याय क्षेत्रात जो अंधकार पसरला आहे, तो जाळण्याचे काम या मशालीने केले असते. सरन्यायाधीशांनी आपल्या श्रद्धेने हे बदल घडवले. जग हे श्रद्धेवर चालते, पण न्यायदान श्रद्धेवर चालू शकते काय? आमची

न्यायव्यवस्था निष्पक्ष
आहे ही श्रद्धा भारतीयांच्या मनात होती, ती श्रद्धा आता नष्ट झाली आहे. आपण ज्ञानवादी व विज्ञानवादी आहोत हे न्यायालयाने समजून घेतले पाहिजे. महान शास्त्रज्ञ आइनस्टाईनने म्हटले आहे, ”हे जग आपण चालवीत नाही. ते स्वतःच चालविले जात असते आणि त्या चालविण्यामधील आपण एक भाग असतो.” परमेश्वर या विश्वाशी जुगार खेळत नाही अशी आइनस्टाईनची धारणा होती. त्याचबरोबर तो परमेश्वर मानवजातीलाही या भूतलाशी जुगार खेळायला परवानगी देणार नाही असे आइनस्टाईनचे ठाम मत होते, पण आमची सर्वोच्च न्यायालये आइनस्टाईनच्या मार्गाने न जाता तेराव्या अवताराच्या इच्छेने काम करतात. यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले, पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? अडीच वर्षे हा खटला फक्त तारखांच्या घोटाळ्यात अडकवून ठेवला गेला. शिवसेना हे नाव, धनुष्यबाणासारखे चिन्ह हीसुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होतीच. संविधानाच्या दहाव्या शेडय़ूलचा मान राखून न्यायदान करा, असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर तेराव्या अवताराचे आदेश भारी पडले? ईश्वराचे न्यायदान गद्दार, बेइमानांच्या बाजूने असेल तर महाभारतातील धर्म-अधर्माचे युद्ध, रामायणातील राम-रावणाचे युद्ध यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याचे वकील व्हावे. बोला, आहे तयारी?

नाना पटोलेंबाबत संजय राऊतांनी राहुल गांधींकडे केली तक्रार: आता बाळासाहेब थोरातांवर राहुल यांनी सोपविली जबाबदारी म्हणाले, उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी समन्वय साधून मार्ग काढा

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेल्या असहकाराच्या भूमिकेची दखल घेऊन काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.संजय राउत यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे पटोलेंची तक्रार केली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबाबत राज्यातील नेत्यांशी चर्चा केली. यावेळीदेखील पतोलेंचा हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी प्रामुख्याने उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी समन्वय साधून मार्ग काढण्याची जबाबदारी आता काँग्रेस कार्यकारी समितीचे (सीडब्ल्यूसी) सदस्य बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज मातोश्रीवर जाणार असून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या राजकीय वादावर ते चर्चा करणार आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र चर्चेत सहभागी होणार नाहीत.

गेल्या शनिवारी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पटोले यांच्याविरोधात भूमिका मांडली होती. पटोले यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. यावर पटोले यांनी प्रत्युत्तरादाखल खासदार राऊत हे उद्धव ठाकरे यांना न विचारता परस्परमत मांडत असल्याचा आरोप केला होता. यावर भडकलेल्या राऊत यांनी आता पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला होता
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उद्या (ता. २२) मातोश्रीवर जाणार असून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या राजकीय वादावर ते चर्चा करणार आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र चर्चेत सहभागी होणार नाहीत.

नाराजांचा प्राण तळमळला, ‘सागर’वर उसळल्या लाटा…

मुंबई-विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि दुसऱ्याच दिवशी सोमवारी उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेत्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर धाव घेतली. आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांना भंडावून सोडले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप नेत्यांनी अनेकांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानुसार तिकिटांचे वाटप झाले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये रोष वाढला होता.उमेदवारीबाबत फेरविचार केला नाही तर बंडखोरी करण्याचा इशाराही काही नेत्यांनी दिला.

फडणवीस व गिरीश महाजन यांच्याकडे नाराजांना समजावण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र आता यादी बदलणार नसल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले.

बबनराव पाचपुते-श्रीगोंद्यातून आमदार बबनराव पाचपुते यांच्याएेवजी पत्नी प्रतिभा यांना तिकीट दिले आहे. मात्र हे दोघेही आपला मुलगा विक्रमसिंह यांना तिकीट मिळावे यासाठी साकडे घालण्यास गेले होते. पण फडणवीसांनी त्यांना परत पाठवले.

भारती लव्हेकर/ मंदा म्हात्रे-यादीत नाव नसल्याने वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर आल्या होत्या. तर यादीत नाव असूनही गणेश नाईकांच्या मुलाकडून बंडखोरीचा धोका असल्याने मंदा म्हात्रे यांनीही फडणवीस यांना भेटून नाराजी व्यक्त केली.

देवयानी फरांदे/ राम सातपुते-नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे पहिल्या यादीत नाही नाही. त्यांनी २४ नगरसेवकांसह शक्तिप्रदर्शन केले. तर सोलापूर मध्यचे आ. राम सातपुते यांना स्थानिक पातळीवर विरोध असल्याने ते फडणवीसांना भेटले.

डॉ. राहुल आहेर-देवळा-चांदवडमधून उमेदवारी मला नको, चुलतभाऊ केदा यांना द्या, असे साकडे आमदार राहुल आहेर यांनी घातले. मात्र पक्षाचा सर्व्हे केदा यांना अनुकूल नसल्याचे सांगत डॉ. राहुल यांनाच तिसऱ्यांदा लढण्याचे आदेश देण्यात आले

राज पुरोहित/ गोपाळ शेट्टी-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाब्यातील उमेदवारीस विरोध करत माजी मंत्री राज के. पुरोहित फडणवीसांना भेटले. माजी खासदार गोपाळ शेट्टी बोरिवलीचे आमदार सुनील राणेंविरोधात मोर्चेबांधणीसाठी आले होते.

सर्वांनाच उमेदवारी मिळेल असे नाही, नाराजांची समजूत काढू : गिरीश महाजन

पहिल्या उमेदवार यादीत नाव नाही म्हणजे नंतरच्या यादीत येणारच नाही असे नाही. पक्षनेतृत्व प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करत आहे. एका जागेवर एकालाच तिकीट मिळू शकते. पण काही जागांवर जास्त जण इच्छुक अाहेत. तिथे इतरांना समजावून सांगत आहोत. यातून मार्ग निघेल. कल्याण पूर्वसारख्या काही जागा आहेत जिथे वाद आहेत. तिथे भाजपलाच उमेदवारी मिळावी असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. काही ठिकाणी स्थानिक वाद आहेत. अशा ठिकाणी महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून लवकरच मार्ग काढतील. कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सिंगापूर-पुणेसह विस्ताराच्या 6 विमानांना बॉम्बची धमकी

आतापर्यंत मिळालेल्या धमक्या १००पुणे विमानाला तिसऱ्यांदा धमकी-

पुणे -सिंगापूर ते पुणे विमानासह विस्तारा कंपनीच्या एकूण ६ अांतरराष्ट्रीय विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने पुणे विमानतळावर रविवारी सिंगापूर-पुणे विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात कोणतीही संशयास्पद बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. ६ विमानांमध्ये १२ जण बॉम्बसह बसले आहेत, विमानातील प्रत्येकाचा शेवट होईल, असे या संदेशात म्हटले होते. तसेच त्या सहा विमानांचे क्रमांकही देण्यात आले होते. गेल्या ६ दिवसांत विमानात बाॅम्बची धमकी मिळाल्याची पुण्यातील ही तिसरी घटना आहे. देशभरात एकूण १०० पेक्षा अधिक घटना घडल्या असून याप्रकरणी कडक कायदा करण्याचे केंद्र सरकारने सांगितले. दरम्यान, या महिन्यात विमानात बाॅम्ब ठेवल्याच्या एकापाठोपाठ एक अशा १०० पेक्षा अधिक घटना घडल्यानंतर सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.

रविवारी दुपारी विस्तारा कंपनीच्या सिंगापूर-पुणे विमानात बाॅम्ब ठेवल्याचा एक संदेश ‘स्किझोफ्रेनिया १११’या सोशल मीडिया साइट ‘एक्स’वरून पुणे पोलिसांना देण्यात आला.त्या संदेशात एकूण विस्तारा कंपनीच्या ६ आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या विमानांचे क्रमांक होते. त्यापैकी यूके ११० क्रमांकाचे विमान सिंगापूर ते पुणे असे होते. हे विमान पुण्यात धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पोलिसांचे बाॅम्बशोधक-नाशक पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले.

प्रवाशांची त्यांच्याजवळील लगेजची तसेच विमानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात श्वान पथकाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. या तपासणीत बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळली नाही. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. दरम्यान, या तपासणीमुळे विमानसेवा वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नाही, पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले. या धमकी प्रकरणी स्क्रिझोफ्रेनिया १११ या एक्सवरील खात्याच्या युजरविरोधात विमानतळ प्रशासनाकडून मुनीष कोतवाल यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विमानात बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १९८२ च्या हवाई वाहतूक कायदा तसेच विमान सुरक्षा नियमावलीत सुधारणा करुन कडक कायदा करण्यात येणार अाहे. अशा धमक्यांचे कट कारस्थान करणाऱ्यांना विमान प्रवास बंदी ( नो फ्लाय लिस्ट) करण्यात येईल,अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के.राममोहन नायडू यांनी दिली.

हवाई वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (बीआयएसएफ) चे महासंचालक राजविंदर सिंह यांनी सोमवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांची भेट घेऊन त्यांना बॉम्ब धमक्यांच्या घटनांच्या तपासात आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. ही या तिन्ही अधिकाऱ्यांनी अर्धातास बंदव्दार चर्चा झाली.

गेल्या आठवडाभरात आतापर्यंत १०० विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. रविवारी ३० विमानांना धमक्यांचे संदेश मिळाले होते तत्पूर्वी शनिवारी ३० विमानांना धमक्या मिळाल्या होत्या. सुदैवाने या सर्व अफवा ठरल्या आहेत.

विमानात बॉम्ब ठेवल्याचे मेसेज येण्याच्या घटना पूर्वी तुरळक प्रमाणात होत्या. मात्र, आता यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करून व्हर्च्युअल आयपी नेटवर्कच्या माध्यमातून संबंधितांचा शोध घेणे तपासी यंत्रणांना अवघड बनते. प्रामुख्याने अशा प्रकारच्या धमक्या या परदेशातून येत असल्याचे दिसून आले आहे. देशाची मजबूत अर्थव्यवस्था आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील आर्थिक भरभराटीवर विपरीत परिणाम करण्यासाठी या घटना वारंवार घडत असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या धमक्या अफवाच असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचे धोके निर्माण करणाऱ्यांसंदर्भात नवे कायदे बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ते योग्यच आहे.

पुणे विमानाला तिसऱ्यांदा धमकी-१५ आॅक्टोबर : लखनऊहून पुण्याकडे निघालेल्या विमानात बाॅम्ब ठेवला असल्याची धमकी. पुण्यात विमानतळ प्रशासन, पोलिसांनी विमानाची तपासणी केली. तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.
१९ ऑक्टोबर : पुणे -जोधपूर इंडिगो ६ ई आय ३३ या विमानात बॉम्ब ठेवल्याचा संदेश. जोधपूरमध्ये विमान उतरल्यानंतर तपासणी. अफवा असल्याचे निष्पन्न

अज्ञात व्यक्तीने स्किझोफ्रेनिया १११ अकाउंटवरून फ्लाइट यूके २५, फ्लाइट यूके १०६, फ्लाइट १४६,फ्लाइट यूके ११६,फ्लाइट यूके ११० आणि फ्लाइट यूके १०७ या सहा विमानांमध्ये प्रत्येकी २ असे १२ जण बॉम्बसह बसले आहेत. विमानातील प्रत्येक जणाची अखेर धुळीत होईल.

धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सेकंडरी लॅॅडर पॉइंट तपासणी सुरू करण्यात आली आहे. सेकंडरी लॅडर पाइंट तपासणी म्हणजे सीआयएसएफच्या सुरक्षा तपासणीनंतर प्रत्यक्ष विमानात बसण्यापूर्वी विमानतळावरील कर्मचारी पुन्हा प्रवाशांची तपासणी करतात. केंद्रीय विमान सुरक्षा ब्युरोच्या आदेशानुसार ही दुसऱ्या पातळीवरची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे विमानतळावर मॉकड्रीलदेखील घेण्यात येऊन सुरक्षा यंत्रणांची तपासणी करण्यात आली आहे.

नाच्या आजाराची लक्षणे जाणून घ्यायला हवीत: डॉ. विद्याधर बोरकर

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘मनाच्या कथा आणि व्यथा’ विशेष कार्यक्रम
पुणे: “मन म्हणजे मेंदूच्या क्षमतेचा आपली वर्तणूक, आकलन, स्मरणशक्ती, भावना यांच्यावर असलेला प्रभाव होय. मेंदू हा शरीराचाच भाग असल्याने मनोविकरांची लक्षणे आपल्या वर्तणुकीतल्या बदलांनी किंवा अन्य शारिरीक व्यथांद्वारे प्रकट होतात. रक्तदाब, छातीतली धडधड, निद्रानाश अशी ही लक्षणे असू शकतात. ही लक्षणे मानसिक आजारांमुळेच दिसत आहेत का, हे तज्ञांकडून तपासून घ्यावे लागते. मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्यात कसलाही कमीपणा मानू नये. किंवा संकोच करू नये. मनाच्या आजारांचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच उपचार घेणे महत्वाचे असते,” असे मत विज्ञान अभ्यासक व आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद व भावार्थ यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘मनाच्या कथा आणि व्यथा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्वे रस्त्यावरील भावार्थच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मनोवैज्ञानिक भूषण सुकेशिनी वामनराव,  आणि मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष विनय र. र. आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बोरकर यांनी मानसिक स्वास्थ्यावरील आपल्या ‘त्या बुधवारी’ या कथेचे अभिवाचन केले. भूषण यांनी मनोविकारापासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? यावर भाष्य केले.

डॉ. विद्याधर बोरकर म्हणाले, “आपल्याला आलेले अनुभव, भेटलेली माणसे सतत काही तरी शिकवत असतात. त्यातून आपण अधिक सक्षम बनत असतो. मन आजारी पडू शकते, या गोष्टीचा स्वीकार करायला हवा. मानसिक तणावाचे गांभीर्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक तणाव जाणवत असेल, तर लवकरात लवकर उपचार घ्यावेत. ध्यान हे मनाचे खाद्य आहे. ध्यान म्हणजे कोणतीही गोष्ट सजगपणे करणे. जाणीवपूर्वक एखाद्या चांगल्या कृतीत मन रमवणे. मनाला शांत करणारी ध्यान ही एकमेव गोष्ट आहे”

ताप आला, अंग दुखले, अशा शारीरिक आजारांसाठी आपण औषधोपचार करतो. कारण शारीरिक आजारांबद्दल समाजात माहिती आणि जागरुकता आहे. मात्र मानसिक अस्वास्थ्याबद्दल समाजात जागरुकता नाही. सत्यजित बेडेकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मन मनास उमगत नाही’ हे  गीत सादर केले. तर कार्यक्रमाचा समारोप कबीरांच्या भजनाने केला. आभार अंजली साठे यांनी मानले.

या पूर्वी एका गाडीवर ५ कोटीचा दरोडा आता पोलिसांनीच गाडी पकडली , संजय राऊत म्हणाले,’ प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले

पुणे- यापूर्वी हवालाची ५ कोटीची रक्कम घेऊन मुंबईतून निघालेल्या एका मोटारीवर कराड -सातारा जवळ दरोडा टाकून पळविलेल्या ५ कोटीच्या रकमेचा तपास लागतो ना लागतो तोच आता पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान तब्बल पाच कोटी कॅश असलेली इनोव्हा क्रिस्टा पकडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी थेट शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा सहडला आहे.

संजय राऊत यांनी एक्स या समाज माध्यमावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय गाडी.. काय डोंगर.. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू किती हे खोके? अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

पुणे -सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोलनाक्यावर कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या एका इनोव्हा गाडीतून मोठी रोकड पकडण्यात पोलिसांना नाकाबंदी दरम्यान यश आले आहे. जवळपास पाच कोटी रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

खेड शिवापूर टोलनाका परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांनी चेक पोस्ट दरम्यान विविध वाहनांची तपासणी सोमवारी सुरू केली. यावेळी एमएच ४५ एएस 2526 या क्रमांकाची एक इनोवा क्रिस्टा पांढऱ्या रंगाची गाडी सदर ठिकाणी आली. सदर गाडीतील वाहन चालकाकडे कागदपत्रांची मागणी करून गाडी तपासणी केली असता, गाडीत मोठ्या प्रमाणात पैसे मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी सदर वाहन खेड शिवापूर पोलीस ठाण्यात नेले. संबंधित गाडी ही सांगोला येथील एका नलावडे नावाच्या व्यक्तीवर असल्याची माहिती मिळाली आहे. सदर रक्कम नेमकी किती आहे हे समजण्यासाठी याबाबत पोलिसांनी नोटा मोजण्यास सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना आणि आयकर विभागास देखील देण्यात आली आहे.नेमके हे पैसे कशाचे आहे, कुठे चालले याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की ,खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांना एक संशयित इनोव्हा कार पोलिसांना मिळून आली आहे. सदर गाडीमध्ये पोलिसांना पैसे मिळाले असून त्याबाबतची मोजणी करण्यात येत आहे .सांगोला येथील नलावडे नावाच्या व्यक्तीवर संबंधित गाडी असल्याचे दिसून आले आहे याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.

खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून पाच कोटी रुपये पोलिसांनी केले जप्त

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. अजून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात झालेली नाही अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यातून ५ कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. पुणे ते कोल्हापूर ह्या या दिशेने गाडी प्रवास करत होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता नियमानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे, दि. २१: विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये. सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतील २१०, बारामती तालुका १४९, माळेगाव १४७, वडगांव निंबाळकर १४७, सुपा २९, वालचंदनगर २३५, इंदापूर २४४, भिगवण ७४, दौंड १३०, यवत हद्दीतील २८८, उरुळी कांचन ११७, शिरुर २७३, रांजणगाव ५०, शिक्रापूर ११९,सासवड ११४, जेजुरी ९२, भोर ११२, राजगड १०६, हवेली ६७, वेल्हा हद्दीतील १७९, पौड पोलीस ठाणे हद्दीतील २७८, लोणावळा ग्रामीण ३५, लोणावळा शहर ६७, वडगांव मावळ ३७, कामशेत ४६, खेड ९२, मंचर पोलीस ठाणे हद्दीतील ४८, पारगांव पोलीस ठाणे हद्दीतील ३०, घोडेगाव २९, जुन्नर ४१, नारायणगाव ३९, आळेफाटा ३०, ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील २३ शस्त्र परवान्यांच्या समावेश आहे.

गठीत करणेत आलेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांचेकडे असलेल्या शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच गावातील विशिष्ट समाजातील प्रभावशाली व्यक्ती, ज्या निवडणुकीचे प्रक्रियेमध्ये ऐनकेनप्रकारे संमिलीत होण्याची शक्यता आहे अशा व्यक्ती राजकीय पक्षाचे प्रचारात अथवा राजकीय सभेमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यक्ती प्रचारात अथवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी झाल्यास ते शस्त्रपरवानाधारक असल्याने या बाबींचा गावात, त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणात अथवा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पडू शकत असलेने, अशा परवानाधारकांची तसेच मयत परवानाधारकांची शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश शस्त्र परवाना धारकांना पोलीस विभागाने तात्काळ बजवावेत. शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील याची दक्षता घ्यावी.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता मधील कलम २२३ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील.
000

लोकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था पद्धती महत्वाची :प्रा.अविनाश कोल्हे

‘संविधान अभ्यास वर्ग’ ला चांगला प्रतिसाद

पुणे :

भारत जोडो अभियान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने सोमवार,दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता ,एस.एम.जोशी फाउंडेशनचा कॉन्फरन्स हॉल येथे संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्था- उगम आणि विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.’हा अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य होता. भारत जोडो अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आणि संविधान प्रचारक संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले .हा चौदावा संविधान अभ्यास वर्ग होता .

प्रारंभी प्रा.कोल्हे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. इब्राहिम खान, नितिन पाटील, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रा.कोल्हे म्हणाले,’स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाही च्या शाळा आहेत.त्या मधून प्रशिक्षण होते. सर्व यशस्वी नेत्यांची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थातून झालेली आहे.भारताला ही संस्था नवी नाही, गावाच्या पातळीवर पंचायती कार्यरत होत्या. जगात स्थानिक स्वराज्य संस्थांचा किमान अडीचशे वर्षांचा इतिहास आहे.

लोकसहभाग वाढवणे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण होण्याचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासामागे होता. स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय लोकशाहीचा कणा आहे,असे महात्मा गांधींचे मत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशी त्रि- स्तरीय रचना अस्तित्वात आली.पुढे मेहता समिती, राव समिती यांनी सुधारणा सुचवल्या.७३ व्या घटनादुरुस्तीने महिला आरक्षणासह बदल झाले. ग्रामसभा अस्तित्वात आली. शहरी भागात नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा ३ प्रकारच्या म्युनिसिपालिटी अस्तित्वात आल्या. कँटोन्मेंट बोर्ड, पोर्ट ट्रस्ट हेही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, अशी माहिती प्रा.अविनाश कोल्हे यांनी यावेळी दिली.

‘रयत’ने घडवले; ‘रयते’साठी योगदान देता आल्याचे समाधान

  • चंद्रकांत दळवी यांची भावना; विचारवेध संमेलनात ‘रयतेपासून रयतेपर्यंत’वर प्रकट मुलाखत

पुणे: “कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी खेडोपाडी उभारलेल्या शाळांमुळे गोरगरीब घरातील मुलामुलींना शिकता आले. माझेही शिक्षण अण्णांनी उभारलेल्या ‘रयत’मध्येच झाले. तिथेच माझी जडणघडण झाली. रयतेच्या कल्याणासाठी जगण्याचा संस्कार घेऊन प्रशासकीय सेवेत असताना, तसेच सेवापूर्तीनंतर ‘रयते’साठी योगदान देता येतेय, याचे समाधान आहे,” अशी भावना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली.

बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयत विचारवेध संमेलनात चंद्रकांत दळवी यांची प्रकट मुलाखत झाली. साहित्यिक प्रा. शंकर आथरे व कवयित्री संगीता झिंजुरके यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अरुण आंधळे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, “आजोबा वारकरी संप्रदायात, तर वडील लष्करात असल्याने समाजाप्रती बांधील राहण्याचे संस्कार मिळाले. ‘रयत’मध्ये असताना समता, बंधुता, स्वावलंबन आणि समर्पण आत्मसात केले. प्रशासकीय सेवेत आल्यावर रयतेच्या हिताचे निर्णय घेण्यावर भर दिला. सामान्यांचे, वंचितांचे व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी, स्वच्छ प्रशासन व वेळेत सेवा देण्यासाठी काम केले. लोकांचे कल्याण हाच विचार मनात असायचा. कारण तो रयत शिक्षण संस्थेत असताना खोलवर रुजलेला होता. ‘झिरो पेंडन्सी’सारखे उपक्रम राज्यातील जनतेच्या हिताचे ठरले. सेवेत असताना सर्वांशी बंधुभाव जोपासल्यानेच आजही लोकांचे प्रेम मिळते. बंधुता परिवाराशी जोडल्याने बंधुतेचा विचार आणि अण्णांनी दिलेला समतेचा विचार घेऊन सुदृढ समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे.”

“उपजिल्हाधिकारी झालो, त्याचवेळी माझ्या गावातील शाळेला नववीपासूनचे वर्ग बंद करण्याचे आदेश मिळाले होते. पण लोकांच्या सहभागाने आज ही शाळा सर्वोत्तम बनली आहे. महसूल खात्यात काम करताना ई-महाभूमी उपक्रमाने जागांच्या नोंदी सुलभ झाल्या. संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना अशा उपक्रमांतून समाजपरिवर्तन झाले. आपल्या कार्यकाळात रयतेसाठी अनेक योजना राबवल्या आणि त्याचा लाभ त्यांना झाला, याचे समाधान आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून रयत शिक्षण संस्थेशी जोडला गेलो. व्यवस्थापन सदस्य म्हणून सुरुवात करून विविध पदांवर काम केल्यानंतर आता संस्थेचा चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. जिथे शिकलो, त्याच संस्थेचा चेअरमन होणे, ही गोष्ट अभिमानास्पद आणि आनंद देणारी आहे,” असे चंद्रकांत दळवी यांनी नमूद केले.

प्रकाश रोकडे यांनी अध्यक्षीय समारोपात रयतेपासून रयतेपर्यंतचा प्रवास उलगडताना प्रशासकीय अधिकारी कसा, असावा याचे दर्शन चंद्रकांत दळवींच्या रूपात घडत असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेने कायमच समता आणि बंधुतेची शिकवण विद्यार्थ्यांना दिली आहे. आजच्या या अस्थिरतेच्या काळात स्वातंत्र्य, न्याय यासोबतच समता आणि बंधुतेची तीव्रतेने गरज आहे. हाच विचार घेऊन आपण पुढील वाटचाल करत राहायला हवे.

तत्पूर्वी, दुपारच्या सत्रात पल्लवी उमरे (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्यपंढरी काव्यसंमेलन झाले. ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोक‌कुमार पगारिया, मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी यांच्यांसह निमंत्रित कवींनी यात सहभाग घेतला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रभंजन चव्हाण, बंडोपंत कांबळे व प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनी आभार मानले.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांनी मतदानासाठी भरली संकल्पपत्रे

पुणे , दि २१: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघात (अ.जा.) मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वीप पथकामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत मतदारसंघाच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदानाचा हक्क बजावणेबाबत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्यात आली.

‘मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम’ अंतर्गत मतदारसंघातील वानवडी येथील हरीभाऊ गिरमे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महादजी शिंदे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महादजी शिंदे प्राथमिक विद्यालय, विठ्ठलराव शिवरकर विद्यालय, श्रीमती शांताबाई ढोले पाटील माध्यमिक विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय ( उर्दु, मराठी व इंग्रजी माध्यम), एस. एस. पी. एम. एस. सोसायटीची माध्यमिक शाळा, सेंट मिराज इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूल (इंग्रजी संकल्पपत्रे) अशा विविध शाळा तसेच महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना संकल्पपत्रांच्या जवळजवळ चार हजार प्रतींचे वाटप करण्यात आले. या संकल्पपत्रांद्वारे यांच्या घरामधील आई-वडिल, बहीण भाऊ आजी आजोबा तसेच कुटूंबातील इतर सदस्य मतदारांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले

या संकल्पपत्रांमार्फत शाळकरी मुलांना मतदानाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या घरामधील सर्व मतदारांकडून मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन भारतीय संविधानाने अनुच्छेद क्र. ३२६ अन्वये नागरीकांना दिलेला मतदानाचा हक्क बजावू या आशयाची संकल्प पत्रे भरून घेण्यात आली. या मोहिमेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाने पुढाकार घेतला.

अजित पवार गटाकडून यादी पूर्वीच सुनिल टिंगरे,चेतन तुपे यांच्यासह 17 जणांना दिले एबी फॉर्म, भाजपमधून आलेल्या गावितांनाही संधी

मुंबई-भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. आज शिंदे गट आणि अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सोमवारी 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. यामध्ये भरत गावित, सुनिल टिंगरे, संजय बनसोडे, चेतन तुपे यांसह 13 जणांना अर्ज देण्यात आले.

एबी फॉर्म मिळणाऱ्यांमध्ये चेतन तुपे, सुनील टिंगरे, राजेश विटेकर – परिषद आमदार (इच्छुक), संजय बनसोडे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, ⁠नरहरी झिरवळ, ⁠छगन भुजबळ, ⁠भरत गावित, ⁠बाबासाहेब पाटील, ⁠अतुल बेनके आदींचा समावेश आहे.

भरत गावित हे आधी भाजपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. भरत गावित यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. त्यावेळी त्यांचा काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांनी पराभव केला होता. आता भरत गावित यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणार आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असल्यामुळे अजित पवार यांनी ए बी फॉर्मचे वाटप सुरू केल्याचे दिसत आहे.

लोकसेवकांच्या भ्रष्टाचार विषयक तक्रारी करण्यासाठी सुविधा उपलब्ध

पुणे, दि. २१: लोकसेवकांच्या भ्रष्टाचारविषयक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करता याव्यात याकरिता तालुक्यातील विविध ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.

पंचायत समिती कार्यालय सभागृह आणि आठवडा बाजार परिसर, पौड येथे मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी, चाकण पोलीस स्टेशन सभागृह, आठवडा बाजार परिसर आणि शासकीय कार्यालय, बसस्थानक चाकण येथे बुधवार २३ ऑक्टोबर रोजी, जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोशिएनचे सभागृह, आठवडा बाजार परिसर आणि बसस्थानक जेजुरी येथे गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी, पोलीस स्टेशन सभागृह, आठवडा बाजार परिसर आणि बसस्थानक, आळेफाटा येथे शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी, शासकीय विश्रामगृह आणि आठवडा बाजार परिसर, नारायणगाव येथे शनिवार २६ ऑक्टोबर रोजी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शासकीय विश्रामगृह आणि आठवडा बाजार परिसर, जुन्नर, शासकीय विश्रामगृह, आठवडा बाजार परिसर, बसस्थानक, शिक्रापूर, आठवडा बाजार परिसर, लोणीकंद, शासकीय विश्रामगृह, आठवडा बाजार परिसर, भिगवण आणि उरळी कांचन येथील शासकीय कार्यालय आणि आठवडा बाजार परिसर या ठिकाणी रविवार २७ ऑक्टोबर रोजी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून नागरिक त्यांच्याकडील माहिती, तक्रारी सादर करू शकतात, असे लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी कळविले आहे.

आज आईची जरा जास्तच आठवण येत आहे…पित्याचे आशीर्वाद घेऊन महर्षि वाल्मीकि प्रकट दिन सोहळ्यात आनंदाने सहभागी होत सिद्धार्थ शिरोळेंचा जनसंवाद सुरु

पुणे- आपले पिता माजी खासदार अनिल शिरोळे यांचे आशीर्वाद घेऊन आज आईची जरा जास्तच आठवण येत आहे…असे म्हणत भाऊक झालेले सिद्धार्थ शिरोळे खडकी येथील श्री राम समर्थ ग्रुप आयोजित जगद्गुरू महर्षि वाल्मीकि प्रकट दिन सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले आणि उत्साहाने नाचले देखील … आणि येथूनच त्यांनी आपल्या भाजपच्या शिवाजीनगर मतदार संघातील उमेदवार म्हणून जन्संवादास प्रारंभ केला .प्रचाराला सुरुवात करत असताना,त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यां सोबत आपल्या छत्रपती शिवाजीनगरातील स्मारकांना भेटी देऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिबा फुले,क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेयांचे आशीर्वाद घेतले.

दरम्यान शिरोळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले ,’ माझे वडील, माझे मार्गदर्शक आणि राजकीय गुरू, माजी खासदार अनिल शिरोळेजी यांच्याकडून आशीर्वाद घेत असताना, त्यांनी नेहमी जपलेल्या सचोटी आणि सेवेच्या मूल्यांची मला आठवण होते. त्यांचा वारसा मला दररोज प्रेरणा देतो. मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीनगरचे प्रतिनिधीत्व करण्याच्या मोहिमेला सुरुवात करत असताना, अनिलजी माझ्या पाठीशी आहेत हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे !!आज आईची जरा जास्तच आठवण येत आहे…

शिरोळे त्यानंतर खडकी येथील श्री राम समर्थ ग्रुप आयोजित जगद्गुरू महर्षि वाल्मीकि प्रकट दिन सोहळ्यास उपस्थित राहिले. .

या नंतर जनसेवा बँक, नागरस रोड, औंध शाखेच्या वतीने, गोपाळशेठ नागरस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला!आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी दत्ता खाडे, रवी साळेगावकर, आणि सर्व मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि राजाराम बेकर्स चे बेकरी उत्पादन देऊन सत्कार करण्यात आला.बँकेचे मॅनेजर जयंत जाधव , विनायक गायकवाड , योगेश पेडणेकर, रुपाली आढावा मॅडम, राजाराम बेकर्सचे प्रमुख सौ. सारिका गणेश कलापुरे, रोहिणी नागवणकर, विनिता गोरे, नंदकुमार खंडेलवाल, हेमंत पांचाळ, कुमार मजगे, निलेश कांबळे, व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते सज्ज

महायुतीच्या विजयाचा निर्धार

महायुतीची पुणे जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न

पुणे-राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी ही महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा विश्वास महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची समन्वय समितीची बैठक आज कोथरुड मधील अंबर हॉल येथे संपन्न झाली.‌

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ. राहुल कुल, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, वासुदेवनाना काळे, शिवसेनेचे किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीपदादा गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दिपक मानकर, रिपाइं आठवले गटाचे संजय सोनावणे, दिगंबर दुर्गाडे,दिपक मिसाळ, यमराज खरात, समन्वय समितीचे पुणे महानगर समन्वयक संदीप खर्डेकर यांच्या सह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार आणण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात महायुतीची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही ताकद एकवटून राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात युतीची ताकद मोठी असल्याने; महायुतीलाच जनतेचा कौल मिळेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा आरक्षणावर बोलताना नामदार पाटील म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाला माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या काळात आरक्षण मिळालं. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण गेलं. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आमची चुक काय झाली ते तरी सांगावं, असे आवाहन करुन मराठा समाज याचा सकारात्मक विचार करेल, असा विश्वास व्यक्त केला.