‘संविधान अभ्यास वर्ग’ ला चांगला प्रतिसाद
पुणे :
भारत जोडो अभियान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने सोमवार,दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता ,एस.एम.जोशी फाउंडेशनचा कॉन्फरन्स हॉल येथे संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्था- उगम आणि विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.’हा अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य होता. भारत जोडो अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आणि संविधान प्रचारक संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले .हा चौदावा संविधान अभ्यास वर्ग होता .
प्रारंभी प्रा.कोल्हे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. इब्राहिम खान, नितिन पाटील, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा.कोल्हे म्हणाले,’स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाही च्या शाळा आहेत.त्या मधून प्रशिक्षण होते. सर्व यशस्वी नेत्यांची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थातून झालेली आहे.भारताला ही संस्था नवी नाही, गावाच्या पातळीवर पंचायती कार्यरत होत्या. जगात स्थानिक स्वराज्य संस्थांचा किमान अडीचशे वर्षांचा इतिहास आहे.
लोकसहभाग वाढवणे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण होण्याचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासामागे होता. स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय लोकशाहीचा कणा आहे,असे महात्मा गांधींचे मत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशी त्रि- स्तरीय रचना अस्तित्वात आली.पुढे मेहता समिती, राव समिती यांनी सुधारणा सुचवल्या.७३ व्या घटनादुरुस्तीने महिला आरक्षणासह बदल झाले. ग्रामसभा अस्तित्वात आली. शहरी भागात नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा ३ प्रकारच्या म्युनिसिपालिटी अस्तित्वात आल्या. कँटोन्मेंट बोर्ड, पोर्ट ट्रस्ट हेही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, अशी माहिती प्रा.अविनाश कोल्हे यांनी यावेळी दिली.