Home Blog Page 561

सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे संविधान दिन साजरा

पुणे: आम्ही भारताचे लोक म्हणून एक नागरिक म्हणून आपल्याला संविधानने दिलेल्या जबाबदारीबाबत तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांबाबत अभंग, पोवाडा, कविता, गाणी अशा विविध सांस्कृतिक कलांचं सादरीकरण तरुणाईने केलं. निमित्त होत संविधान दिनाचं;  संविधान प्रेमी आयोजित जश्न-ए-संविधान या ओपन माईक उपक्रमाचे. हा उपक्रम 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वा. कलाकार कट्टा, गुडलक चौक, डेक्कन, पुणे येथे झाला.
संविधानाची मूल्ये जर प्रत्येक व्यक्तीला समजली आणि जर प्रत्येकाने आपले जीवन त्या मूल्यांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशात लोकशाही चिरंतन राहील या उद्देशाने हा उपक्रम राबविला, असे कार्यक्रमाच्या समन्वयक ॲड. मोनाली अपर्णा यांनी सांगितले.
मातंग एकता आंदोलन अविनाश बागवे, ऑल मेडिको पॅथि फेडरेशनचे डॉ. सुनील जगताप, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुक्ता कदम, सेवासदन संस्थेचे डॉ. फादर डिक्रूज, पर्यावरणावर काम करणारे डॉ. सोनाली तळावलीकर आणि प्रदीप घुमरे व मुव्हमेन्ट फॉर पीस अँड जस्टीसचे साजिद शेख यांनी संविधानानी दिलेली कर्तव्ये याबाबत मनोगत व्यक्त केले.  
संविधानात असलेल्या मूल्यांचे बुकमार्क यावेळी उपस्थित सर्वांना देण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकपणे वाचन करून उपक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन विशाल बागुल यांनी केले. 

अयोध्या राम मंदिरात पुणेकरांची १३ लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती

पुण्यातील विविध शाळांतील बालचमूंचे गीत रामायण सादरीकरण ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजन 
पुणे : श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः असे म्हणत तब्बल ४०० पुणेकरांसह बालचमूंनी देखील आपल्या भावपूर्ण आवाजात अयोध्या राम मंदिरात रामरक्षा पठण केले. विश्वकल्याणासाठी प्रार्थना करीत  रामलल्लाचे डोळ्याचे पारणे फेडणारे रुप पुणेकरांनी डोळ्यात साठवले. रामजन्मभूमीचा इतिहास जाणून घेत प्रभू रामचंद्रांच्या पावन अयोध्येत १३ लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती एका आगळ्यावेगळ्या सोहळ्यात यावेळी झाली
ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने अयोध्या राम मंदिरात भव्य रामरक्षा पठण आणि गीत रामायण सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.  स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे चंपतरायजी, गाेपाळजी, डाॅ.अनिल मिश्रा, तसेच विनीत गाडगीळ, वृंदा जोशी,  ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे, नंदकुमार देव,अलका विंझे, ऊर्मिला आपटे व भक्ती सुधा फाऊंडेशनचे आशिष केसकर उपस्थित होते.
वीरेंद्र कुंटे म्हणाले, अयोध्या राम मंदिरात विश्वकल्याण्यासाठी विविध ५ संकल्प करीत विविध शाळांमधील मुलांनी आणि पुणेकरांनी रामरक्षा पठण आणि गीतरामायण सादर केले. राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर,अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याण असे संकल्प उपस्थितांनी केले. गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात मुलांनी गीतरामायण सादर केले.. प्रथमच हिंदी व मराठी भाषेतून गीत रामायण सादरीकरण झाले. हिंदीतून गीत रामायण सादरीकरण करण्यासाठी गोव्यातील दत्तप्रसाद जोग आणि सहकलाकार आले होते.
गोजिरी चित्राव, मिहीर चित्रा, लास्यवी कोंडो (गोळवलकर गुरुजी विद्यालय), अरीयाना नातू (विखे पाटील मेमोरियल स्कूल), अयान पत्की,निखिल दामले, आरुष खानझोडे (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल प्रायमरी), मुक्ता विधाते (ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल), राधा धर्माधिकारी, ओम धर्माधिकारी, अरिया संघवी (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल), दिव्या केळकर, वेद अकोलकर (बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), कौमुदी देशपांडे (द स्कूल केएफआय, तामिळनाडू), जिया लोढा (सेंट मेरीज स्कूल), स्पृहा जोशी (वापी पब्लिक स्कूल), देवश्री करमरकर (अहिल्यादेवी हायस्कूल) यांनी गायन केले. सिद्धार्थ कुंभोजकर, मनोहर अत्रे, अदिती केसकर, आशिष केसकर यांनी वादन केले.याचे सुत्र संचालन डॉ प्रचीती सुरू कुलकर्णी यांनी केले.
चितळे बंधू मिठाईवाले, एम. व्ही. टिळे, शालगर होजिअरी, महालक्ष्मी सिल्क, डॉ. प्रशांत सुरु यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य केले.

विधानसभा निवडणूक निकालाबद्दल चिंता व आश्चर्य-तीन स्तरावर देणार लढा

पुणे-आज पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडी पराभूत उमेदवार सभा पुण्यात राष्ट्रवादी भवन येथे पार पडली.या बैठकीत विधानसभा निवडणूक निकलाबद्दल चिंता व आश्चर्य व्यक्त केले.
या बैठकीत ज्येष्ठविधीज्ञ असीम सरोदे, ई. व्ही.एम. मशीन तज्ञ माधव देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. या निकालाबाबत तीन स्तरावर लढा देण्याचे निश्चित केले.
1) वी.वी. पैट मोजणीसाठी तत्काळ अर्ज देण्यात यावा. 2) निवडणुकीच्या निकालासंदर्भात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करण्यात यावी.3) या निकाला विरोधामध्ये न्यायालयात याचीका दाखल करण्यात यावी.
यावेळी श्री प्रशांत जगताप, श्री रमेश बागवे, श्री अशोक पवार श्री दत्ता बहीरट, रमेश थोरात अंकुश काकडे, अभय छाजेड संजय मोरे त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील, अजित गव्हाणे, संग्राम थोपटे, संजय जगताप,सौ. अश्विनी कदम यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम: नाना पटोले

0

लोकशाही वाचवण्यासाठी जनभावनेचा आवाज उठवत रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेसचा निर्णय.

‘मतपत्रिकेवर निवडणुका’ घेण्यासाठी भारत जोडो यात्रेप्रमाणे राहुल गांधी यांची लवकरच देशव्यापी यात्रा.

युतीकडे पाशवी बहुमत असतानाही सरकार स्थापण्यास उशीर, ‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच मुख्यमंत्री ठरेल व सरकार बनेल.

काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेता, गटनेता व प्रतोद ठरवण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा प्रस्ताव बैठकीत एकमताने मंजूर

मुंबई, दि. २७ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, मुजफ्फर हुसेन, कुणाल पाटील, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, अस्लम शेख, अमिन पटेल, नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार रविंद्र चव्हाण,कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांच्यासह आमदार उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासीक प्रतिसाद मिळाला होता आता पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी यात्रा काढली जाणार आहे, या यात्रेलाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळेल. लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढलेली आहे, जनभावना तीव्र झाल्यानंतर १५० वर्षांची ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली हा इतिहास आहे. लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च असून जनभावनेचा आवाज काँग्रेस उठवत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
भारतीय जनता पक्ष युतीला पाशवी बहुमत मिळाले असूनही चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही आणि सरकारही स्थापन होत नाही. राज्यात शेतकऱ्यांचा समस्या आहेत, बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न आहेत पण भाजपा युतीला जनतेची चिंता नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे, यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल असे पटोले म्हणाले.
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेता, गट नेता व प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना देण्याचा ठराव एकमताने या बैठकीत करण्यात आल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला विजय वडेट्टीवार यांनी अनुमोदन दिले. डॉ. नितीन राऊत व अमित देशमुख यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. सर्व आमदारांनी एकमताने हा ठराव मंजूर केला.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे, असे मत मांडता येते का हा प्रश्न आहे. निकाल देताना कायद्यात काय तरतूद आहे. त्यावर स्पष्टता असायला हवी होती. परंतु न्यायाधीश व न्यायालयाच्या निकालावर जास्त काही बोलणे उचित नाही असेही पटोले म्हणाले.
उद्या गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हा जनमताचा कौल नाही,EVM मध्ये फेरफार करून मिळविलेला विजय -हायकोर्टात दाखल करणार याचिका

पिडीत आणि अन्यायग्रस्तच कोर्टाकडे न्याय मागायला जातात -अन्याय करणारे,गफला करणारे कोर्टात कशाला जातील

पुणे-महाविकास आघाडीचे पुणे शहरातील पराभूत उमेदवार ईव्हीएममधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षांनी बुधवारी दिली.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या कथित गडबडीबाबत पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व पराभूत उमेदवारांनी बुधवारी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी शिरूरचे माजी आमदार अशोक पवार,माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, प्रशांत जगताप,सचिन दोडके, दत्ता बहिरट, प्रवक्ते अंकुश काकडे, अभय छाजेड, संजय मोरे उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम हॅकिंग कशा प्रकारे झाली, याविषयी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनमधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
प्रशांत जगताप म्हणाले, निवडणूक काळातील आमचा अनुभव पाहता यावेळी जो निकाल आहे तो जनतेचा कौल नाही. हा पडद्यामागे ईव्हीएम मशीनमध्ये झालेला घोळ आहे. मतदान यंत्रे १५ ते २० टक्के आधीच सेट करण्यात आली होती. ईव्हीएम मशीनमध्ये तीन युनिट असतात. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात येईपर्यंत एकदा इंटरनेटशी जोडून चिन्ह जोडले जाते. पूर्वी बॅलेट पेपरमध्ये सर्व पारदर्शकता होती. पण ईव्हीएम मशीन २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंतचा एका दिवसाचा प्रोग्राम आधीच सेट केला होता.
त्यामुळे आम्ही व्हीव्हीपॅटमधील मते आम्ही मोजणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडण्याची जबाबदारी ज्या पडद्या मागील एका नेत्याला दिली. त्याच नेत्याच्या मदतीने आता इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड करून गैरप्रकार करण्यात आला. मतदान सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड करण्यासाठी काही यंत्रणा पडद्यामागे कार्यरत होत्या.
महायुतीने जयंत पाटील व रोहित पवार यांच्यासारखे आमचे नेते पाडण्यासाठी रडीचा डाव केला. आमची विनंती ईव्हीएम मशीन अधिक चांगले करा आणि जर ते हॅक होत असेल तर पुन्हा बॅलेट पेपरकडे वळावे अशी आहे. निवडणूक आयोगाने आम्ही उपस्थित करत असलेल्या प्रश्नावर खुलासा करावा, अन्यथा देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. देशातील आघाडीच्या नेत्यांनीही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे, असे जगताप यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचा (ICA) रोशडेल पायोनियर्स पुरस्कार इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस. अवस्थी यांना प्रदान

0

डॉ. वर्गीस कुरियन यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे डॉ. यू.एस. अवस्थी हे दुसरे भारतीय आहेत.

नवी दिल्ली,२७ नोव्हेंबर,२०२४:इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को)चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस. अवस्थी यांना २०२४ साठीचा रोशडेल पायोनियर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. डॉ. कुरियन यांना २००१ साली हा सन्मान देण्यात आला होता. हा पुरस्कार २००० साली सुरू करण्यात आला असून, तो आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. सहकारी चळवळीत नावीन्यपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत उपक्रम राबवून सदस्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तीला किंवा विशेष परिस्थिती, संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.

डॉ. अवस्थी हे केमिकल इंजिनीअर असून ते १९७६ मध्ये इफ्कोमध्ये रुजू झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या सहकारी संस्थेची उत्पादनक्षमता २९२% वाढली आणि निव्वळ मालमत्तेत ६८८% वाढ झाली त्यांच्या दूरदृष्टीने इफ्कोने विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आणि व्यवसायाचे यशस्वी विविधीकरण केले. तसेच, भारतीय शेतकऱ्यांसाठी नॅनो खतांचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले.

आयसीएचे अध्यक्ष एरियल ग्वार्को यांनी २५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली, भारत येथे आयोजित आयसीए ग्लोबल कॉन्फरन्समध्ये एका विशेष समारंभादरम्यान डॉ. अवस्थी यांना हा पुरस्कार प्रदान केला. इफ्को लिमिटेड आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयसीए महासभा आणि जागतिक सहकार परिषद २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिल्लीतल्या भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला असून, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.

डॉ. अवस्थी म्हणाले, “आयसीएचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारणे हा माझा बहुमान आहे. हा पुरस्कार म्हणजे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या व्हिजनचे द्योतक आहे आणि यातून सन्माननीय सहकार मंत्री श्री. अमित शाह यांच्या मार्गदर्शनालाखाली आणि अष्टपैलू नेतृत्वाखाली इफ्कोने केलेले असामान्य प्रयत्न अधोरेखित होतात. जागतिक पातळीवर भारतातील सहकारी चळवळ वाढविण्याच्या त्यांच्या व्हिजनसाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. हा पुरस्कार दिल्याबद्दल मी इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स आणि जागतिक पातळीवरील सहकार क्षेत्राचे मी आभार मानतो. या पुरस्कारामुळे आपल्याला सहकाराची वृत्ती जागतिक पातळीवर जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते.”

डॉ. अवस्थी पुढे म्हणाले, “नॅनो डॅप व नॅनो युरिया लिक्विडसारख्या नॅनो खतांच्या माध्यमातून इफ्कोने शाश्वत शेतीला प्रोत्साहन दिले आहे, शेती करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवेल आहे आणि पर्यावरणस्नेही मागण्यांची पूर्तता केली आहे. स्थानिक पातळीवर नॅनो खतनिर्मिती होत असल्याने लॉजिस्टिकसंदर्भातील समस्या हाताळल्या गेल्या आहेत, आयातीवरचे अवलंबित्व कमी झाले आहे आणि अवजड पॅकेजिंगऐवजी कॉम्पॅक्ट बाटल्यांचा वापर होऊ लागला आहे. या नवकल्पनांमुळे मातीचा कस सुधारला आहे, शेतकऱ्यांचा नफा वाढला आहे आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन मिळाले आहे.” इफ्कोने स्थानिक पातळीवर विकसित केलेली नॅनो युरिया व नॅनो डॅप यांचा वापर भारतभरातील शेतकरी करत आहेत आणि भारतातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी तसेच परदेशात, विशेषतः भारताच्या शेजारी राष्ट्रांनीही ही उत्पादने स्वीकारली आहेत आणि नॅनो खतांचा पुरवठा करण्यासाठी इतर राष्ट्रांनीही इफ्कोशी संपर्क साधला आहे. नजीकच्या भविष्यकाळात नॅनो खते 25 देशांमध्ये निर्यात करण्याची आमची योजना आहे.

भारतीय ज्ञान मानव कल्याणाचे-प्रो.सुखदेव द्विवेदी

२९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम सत्र

पुणे, दि.२७ नोव्हेंबर: “भारत देशातील कल्याणात्मक व मानव सुखकर ज्ञान कसे निर्माण झाले याचा सखोल अभ्यास होणे महत्वपूर्ण आहे. १४ विद्या आणि चार वेदांचा अभ्यासातूून असे आढळते की यातील ज्ञान हे मानवाला सुख, शांती आणि आध्यात्मिक दृष्या उन्नत करण्यासाठी आहे. जेव्हा मानवाचे मन शांत होईल तेव्हाच संपूर्ण विश्वात शांती नांदेल.” असे विचार बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे महामहोपाध्याय प्रो. सुखदेव द्विवेदी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम दिवसाच्या सत्रात ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि वर्ल्ड पीस’ या विषयावर ते बोलत होते.
सत्राच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, प्रा.डॉ. प्रियंकर उपाध्याय व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रो.सुखदेव द्विवेदी म्हणाले,” संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला, परंतू जातांना त्यांनी जे ज्ञान दिले ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे आहे. वेदांचे ज्ञान, वैदीक ब्राम्हण, मीमांसा शास्त्र, न्याय शास्त्र, ब्रह्म शास्त्राचे ज्ञान वेळेनुसार आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ऋषि मुनींच्या ज्ञानानुसार समाजात शांती स्थापन करण्याचे कार्य केले. नंतर चार वेदांचे ज्ञान समोर आले. चाणक्य निती मधील १७ अध्यक्ष आणि ५७२ सूत्र हे मानवाच्या सुखाचे आहेत. तसेच महाभारत आणि रामायणाचा मुख्य उद्देश्य शांतीचाच आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाल सुरू केली आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात डॉ. मुकेश शर्मा यांनी ‘मिडिया आणि विश्वशांती’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, आजच्या युगात मोबाईल, फोन, टिव्हीची वाढती संख्या, सोशल मिडिया वाढत आहे. या माध्यमांना नियंत्रित करणे अतिशय अवघड झाले आहे. पुर्वीच्या काळात बदल घडून आता कार्यक्रम नंतर आणि मार्केट प्रथम आले आहे. अशावेळेस समाजाला काय दाखवायचे हे माध्यमांच्या हातात राहिले नाही. त्यामुळे मानसिक शांती आवश्यक आहे.
त्यानंतर हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी ‘योग आणि अध्यात्म’ या विषयावर भाष्य केले. स्वतःला शोधणे म्हणजे योग असतो. ज्ञान आणि विज्ञान हे प्रात्यक्षित आहे आणि आत्मज्ञान हे अनुभूतीचे आहे. प्रामाणिकपणे जगणे म्हणजे अध्यात्म होय.
सूत्रसंचालन पराग खानविलकर आणि डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.

आस्था शुक्ला यांचे ठुमरी, दादरा, गझल गायन शुक्रवारी

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे शोभा गुर्टू स्मृती मैफलीचे आयोजन

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे सुप्रसिद्ध गायिका, ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले असून यात प्रसिद्ध गायिका आस्था शुक्ला यांचे ठुमरी, दादरा, गझल गायन होणार आहे.
कार्यक्रम शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गांधर्व महाविद्यालय, पुणे येथील विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. आस्था शुक्ला यांना पार्थ ताराबादकर (तबला) आणि शुभदा आठवले (संवादिनी) साथसंगत करणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
आस्था शुक्ला यांना त्यांच्या आई वीणा पाणी यांनी संगीत विश्वाची ओळख करून दिली. त्यानंतर आस्था यांनी कानपूर येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित काशिनाथ शंकर बोडस यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. गुरुंच्या अकाली निधनानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे पुढील शिक्षणास सुरुवात केली. आस्था यांची उपशास्त्रीय संगीतातील रुची पाहून वीणा पाणी यांनी त्यांना ठुमरी गायनाची विशेष तालिम दिली.

सांगीतिक संस्कार प्रवाहित ठेवणारी यात्रा

अभिषेकी बुवांच्या पावलांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न : पंडित हेमंत पेंडसे

पुणे : गायक-संगीतकार म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्थान खूप उच्च आहे. त्यांच्या सांगीतिक संस्कारांचा-शिकवणुकीचा-स्वभावाचा प्रभाव माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर पडला आहे. अभिषेकीबुवांकडून मिळालेले संस्कार प्रवाहित करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, अशा भावना पंडित हेमंत पेंडसे यांनी व्यक्त केल्या. अभिषेकीबुवांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांसह पंडित पेंडसे यांनी स्वत:ही स्वरबद्ध केलेल्या रचना सादर करून त्यांनी रसिकांसमोर गुरूकृपेचा सांगीतिक ठेवा खुला केला.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत संस्कारात वाढलेल्या प्रसिद्ध गायक संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत रचना आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या रचनांवर आधारित ‌‘संस्कार यात्रा‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांनी प्रभावीपणे रचना सादर केल्या. डॉ. मानसी अरकडी यांनी सुमधूर वाणीत आणि ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. तर यश कोल्हापूरे (सहगायन), अभिजित बारटक्के (तबला) उद्धव गोळे (पखवाज), ऋचा देशपांडे (संवादिनी), तुषार दीक्षित (की-बोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत केली.
बुवांकडून मिळालेले संस्कार सांगीतिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पंडित अभिषेकी हे अत्यंत प्रेमळ, सर्वांना सामावून घेणारे होते त्याचबरोबर कडक शिस्तीचे आणि वक्तशीरही होते. त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तम कलाकारच नव्हे तर उत्तम माणूस म्हणून घडविले. माझ्या सांगीतिक रचनांवर बुवांच्या संस्कारांचा प्रभाव आहेच पण संगीतकार म्हणून अभिषेकी बुवांच्या पावलांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे पंडित पेंडसे म्हणाले.
संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मीरा बाई यांच्यासह कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, गिरीश, बालकवी, सुधीर मोघे, अशोक परांजपे, डॉ. राहुल देशपांडे आणि रमण रणदिवे यांच्या रचना या वेळी सादर करण्यात आल्या.
अविरत बरसत, गर्द सभोती रान साजणी, राम बरवा, अनंता तुला कोण पाहू शके, व्यथा सांगण्यास ज्ञाना, काळजाला कोण हाका देत आहे, मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले, नाही पुण्याची मोजणी, अंधाराचे धागे वारा विणतो आकाशी, अवघे गर्जे पंढरपूर, संत भार पंढरीत, मै गोविंद आदी गीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
मतिमंद व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असलेल्या सावली ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर निर्मिती पंडित हेमंत पेंडसे यांची होती.

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावते हीच इच्छा-धीरज घाटे

पुणे:- २७-“विधानसभा निवडणुकीत भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी,हीच सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे” असे प्रतिपादन पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मतदारांनी भरभरून प्रेम दिले या मध्ये सर्वात मोठी कामगिरी ही भारतीय जनता पार्टीने केली आहे ह्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणविस यांचे नाव अग्रस्थानी आहे मागील सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले तसाच मनाचा मोठेपणा या वेळी शिंदे दाखवतील अशी आशा आहे असे घाटे म्हणाले
देवेंद्र फडणवीस यांची राज्यच्या मुख्यमंत्री व्हावेत या करता आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन तसेच महारतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोथरुडचे आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर, युवा मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे,शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षा तापकीर, राहुल भंडारे, महेश पुंडे, सुशील मेंगडे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

सुप्रीम कोर्ट म्हणाले- आरक्षणासाठी धर्म परिवर्तन ही घटनेची फसवणूक- बाप्तिस्मानंतर हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही

0

नवी दिल्ली- केवळ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी केले जाणारे धर्मांतर म्हणजे संविधानाचा विश्वासघात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने हा निर्णय 26 नोव्हेंबर रोजी एका प्रकरणात दिला ज्यामध्ये एका महिलेने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, परंतु नंतर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ती हिंदू असल्याचा दावा केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याचे अपील फेटाळून लावले आणि ते स्वीकारले जाऊ शकत नाही, असे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या 3 टिप्पण्या

  1. तुमचा खरोखर विश्वास असेल तेव्हा धर्म परिवर्तन करा

न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांनी मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. खंडपीठाने म्हटले की, “एखाद्याने त्या धर्मातील मूल्ये, कल्पना आणि श्रद्धा यांना खऱ्या अर्थाने प्रेरित केल्यावरच धर्म स्वीकारावा.”

  1. श्रद्धेशिवाय धर्म बदलण्याची परवानगी नाही

न्यायालयाने म्हटले की, “जर धर्मांतराचा उद्देश आरक्षणाचा फायदा घेणे हा असेल, परंतु त्या व्यक्तीची त्या धर्मावर श्रद्धा नसेल, तर त्याला परवानगी देता येणार नाही. अशा स्थितीत आरक्षण धोरण आणि सामाजिक आचारसंहिता यांनाच हानी पोहोचेल.”

  1. बाप्तिस्मानंतर हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही

खंडपीठाने सांगितले की, “आमच्यासमोर ठेवलेल्या पुराव्यांच्या आधारे, खंडपीठाने म्हटले की याचिकाकर्त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे आणि ती नियमितपणे चर्चमध्ये जाते, म्हणजेच ती धर्माचे पालनही करत आहे, परंतु दुसरीकडे ती दावा करत आहे. ती एक हिंदू आहे की ती बाप्तिस्मा घेऊन हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही.”

8 वकिलांनी याचिकाकर्त्या महिलेची उलटतपासणी घेतली

याचिकाकर्त्या महिला सेलवरानी यांच्या वतीने वकील एनएस नप्पिनाई, व्ही बालाजी, असैथांबी एमएसएम, अतुल शर्मा, सी कन्नन, निजामुद्दीन, बी धनंजय आणि राकेश शर्मा यांची उलटतपासणी झाली. त्याचवेळी वकील अरविंद एस, अक्षय गुप्ता, अब्बास बी आणि थराने एस यांनी तामिळनाडू सरकारची बाजू मांडली.

PM मोदी, अमित शहा यांचा निर्णय आम्हाला मान्य – एकनाथ शिंदे; CM पदावरील दावा सोडला

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद मोठी घोषणा केली

मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला आणि शिवसेनेला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.एकनाथ शिंदे म्हणाले, अडीच वर्षांत मी स्वत:ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. मी स्वत:ला कॉमन मॅन समजून जनतेसाठी काम केले. महायुतीने सर्व घटकांसाठी काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे.
शिंदे म्हणाले- लोकांना वाटते की मुख्यमंत्री आपल्यातलाच आहेत. घर असो, मंत्रालय असो, लोक येतात, भेटतात. मी प्रत्येकाला भेटतो. मला जी ओळख मिळाली ती तुमच्यामुळेच. मी लोकप्रियतेसाठी काम केले नाही, महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. अडीच वर्षे केंद्र सरकार पाठीशी उभे राहिले. राज्याला पुढे न्यायचे असेल, तर केंद्र सरकारचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले- निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल आले, आमच्या कामामुळे ऐतिहासिक निकाल लागला. मी सर्वांचा लाडका भाऊ आहे. बहिणींनी मला लक्षात ठेवले आणि माझे रक्षण केले. मला सगळं माहीत आहे. कोणाला राग आला, किंवा कोण कुठे गेला, याबाबत विचारू नका. हा एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. आम्ही एकत्र काम करणारे लोक आहोत, आम्ही खूप मेहनत घेतली. आम्ही जे काही काम केले, ते मनापासून केले. माझे काम महाराष्ट्रातील जनतेसाठी असेल.
एकनाथ शिंदे म्हणाले- राज्याच्या प्रगतीचा स्तर आम्ही वाढवला. यावेळीही राज्याच्या विकासाचा वेग वेगवान आहे. मोदीजी, शाहजींनी खूप साथ दिली. इतके निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेले नाहीत. आम्ही जनतेसाठी 124 निर्णय घेतले. मागील सरकारच्या काळात राज्य मागे पडले होते ते आम्ही पुन्हा पुढे आणले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. सरकारचे काम लोकांसाठी काहीतरी करणे आहे. प्रत्येक घटकाला आम्ही काही ना काही दिले. अमित शहा यांचा मला भक्कम पाठिंबा होता. ते माझ्या मागे कायम उभे राहिले. तुम्ही जनतेसाठी काम करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे शहांनी सांगितले. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. मी प्रत्येक क्षणी जनतेसाठी काम केले.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही पुढे नेली, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. केंद्रातून त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला, असे ते म्हणाले.
एक साधा कार्यकर्ता म्हणून मी करतो. सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्यांना गरिबांच्या वेदना कशा कळणार. त्यामुळे महायुतीने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांसाठी आम्ही काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी नाराज नाही, तसेच नाराज होऊन रडणाऱ्यांमधला मी नाही. मी नरेंद्र मोदींना माझ्या भावना कळवल्या आहेत. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, माझ्यामुळे अडचण होईल हे मनात आणू नका, असे मी मोदींशी फोनवर बोलून सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषद घेण्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली याचा अर्थ त्यामध्ये निश्चित काहीतरी बातमी असणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातून ऑफर कोणाला आली? या सर्व प्रश्नांची उत्तर आज कदाचीत मुख्यमंत्री देतील. एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री जेव्हा त्यांच्या दाढीवरून हात फिरवतात, त्यावेळी निश्चित काही तरी घडते, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे.

’वेंक्या’, ‘भूतपोरी’ आणि ‘आर्टिकल 370’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून 55 व्या इफ्फी मध्ये दमदार कथांचे सादरीकरण


#IFFIWood, 26 नोव्‍हेंबर 2024

गोवा येथे आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘भारतीय दालन – फिचर फिल्म्स’ विभागात, ’वेंक्या हा कन्नड चित्रपट’, ‘भूतपोरी’ हा बंगाली चित्रपट आणि ‘आर्टिकल 370’ हा हिंदी चित्रपट असे तीन उत्कृष्ट चित्रपट सादर झाले. द्रष्ट्या चित्रपटकर्त्यांनी त्यांच्या या कलाकृतींद्वारे केवळ कथाकथनाच्या पलीकडे जात स्वयंशोध, वचनपूर्ती, देशभक्ती, त्याग आणि प्रेम, जीवन तसेच मृत्यूनंतरच्या स्थितीमधील गुंतागुंतीचा भावनिक प्रवास यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

55व्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित माध्यम संवाद कार्यक्रमात ‘वेंक्या’ चे दिग्दर्शक सागर पुराणिक यांनी चित्रपट निर्मितीसर्म्यान समोर उभ्या राहिलेल्या आव्हानांची  चर्चा केली. वेंक्या या भूमिकेतील गुंतागुंतीवर अधिक भर देत त्यांनी या पात्राचे वर्णन अंधाराकडून उजेडाकडे उत्क्रांत होत जाणारा असे केले. चित्रीकरणाच्या बाबतीतील वाहतुकीच्या बाबतीत आलेल्या अडचणींबाबत विचारल्यावर पुराणिक म्हणाले की, हा चित्रपट धोकादायक ठिकाणांवर चित्रित झाला आणि त्यात पुराच्या संकटाची भर पडली. मात्र अशा स्थितीत स्थानिक सरकारकडून मिळालेल्या मदतीची त्यांनी प्रशंसा केली. चित्रीकरणासाठी स्थळांची निवड करण्याबाबत ते म्हणाले की वेंक्याच्या शोधामुळे विविध ठिकाणांच्या निवडीसह एक जैविक दृष्टीकोण वापरण्यात आला. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेमध्ये व्यक्तींचे, अगदी गुन्हेगारांचे देखील परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे यावर अधिक भर देत पुराणिक यांनी त्यांच्या संवादाचा समारोप केला.

‘वेंक्या’ चे निर्माते पवन वाडेयार यांनी सांगितले की भारताच्या चैतन्यमय सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवत या चित्रपटाचे चित्रीकरण 12 विविध राज्यांमध्ये करण्यात आले. ही ठिकाणे चित्रपटाच्या अंतःप्रेरणेला अनुसरून असलेल्या त्यांच्या चैतन्याने रसरसलेल्या, रंगीबेरंगी असण्यामुळे आणि त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे निवडली असे त्यांनी स्पष्ट केले.

‘भूतपोरी’चे दिग्दर्शक सौकर्य घोशाल यांनी सांगितले की हा चित्रपट नेहमीच्या साच्यातील भयपटापेक्षा वेगळा आहे. हा चित्रपट मानवी कृतींमुळे खोलवर प्रभावित झालेल्या एका भुताची आत्मकथा सांगतो, आणि तो मृत्यूनंतरच्या स्थितीवर आधारित आहे. अनेक भारतीय भयपट हॉलिवूडच्या चित्रपटांमुळे प्रभावित होत असताना, एक अस्सल भारतीय भूत कथा निर्माण करणे हा या चित्रपटाच्या निर्मितीमागील उद्देश असल्याचे घोशाल यांनी नमूद केले.

‘भूतपोरी’ या चित्रपटाच्या पोशाख रचनाकार पूजा चॅटर्जी यांनी सांगितले की बंगाली साहित्यामध्ये आढळणाऱ्या पोषाखांच्या तपशीलवार वर्णनापासून चित्रपटातील पात्रांच्या पोशाखासाठी प्रेरणा मिळाली. पडद्यावर वास्तववादी पात्रे उभी करण्यासाठी ते संदर्भ वापरल्याची माहिती त्यांनी दिली.

‘आर्टिकल 370’ चे दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांनी त्यांच्या चित्रपटाच्या राजकीय घटनेवरील  कथेबद्दल माहिती दिली.  याविषयावर अगदी विस्तृत संशोधना केल्यानंतरच हा चित्रपट तयार करण्‍यात आला.  प्रेक्षकांना राजकीय व्यवस्थेशी जोडण्‍याबरोबरच  आगामी पिढीला प्रेरणा देण्याचा उद्देश्य  हा चित्रपट तयार करण्‍यामागे   असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जांभळे यांनी  चित्रपटाच्या  संकल्पनेकडे  लक्ष वेधले. ही संकल्पना काही जबरदस्तीने राष्ट्रवादाला प्रोत्साहन देत नाही, परंतु पात्रांचे वास्तववादी पद्धतीने चित्रण करत आहे,असे सुहास जांभळे म्हणाले. तरुण चित्रपट निर्मात्यांना  आपला ठसा उमटवता आला पाहिजे, यासाठी भारतातील सर्व प्रदेशांमध्ये चित्रपट संस्कृती वाढवण्याच्या महत्त्वावर जांभळे यांनी भर दिला.  

‘आर्टिकल 370’ च्या लेखिका मोनल ठाकूर यांनी संशोधन प्रक्रियेतील अंतर्दृष्टी सामायिक केली. आपण या सिनेमसिनेमासाठी माहिती गोळा करण्यासाठी शोध पत्रकारांचा सल्ला घेतल्याचे सांगितले. चित्रपटातील राजकीय आणि संसदीय घटक माहितीपूर्ण आणि मनोरंजक अशा दोन्ही प्रकारे कसे डिझाइन केले आहेत याचे त्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली. ठाकूर यांनी काश्मीरमध्ये  चित्रीकरण करताना आलेल्‍या  आव्हानांबद्दलही सांगितले.  स्थानिक पोलिसांनी दिलेल्या  पाठिंब्याचे  अनुभव  खरोखर जादुई असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटांविषयी:

वेंक्या: हुब्बळ्ळीसारख्‍या  भरपूर  गोंधळ असलेल्‍या  शहरात, संघर्ष करत असलेला गुंड व्यंक्या मालमत्तेचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी आणि आर्थिकदृष्‍ट्या कंगाल  होण्यापासून वाचण्‍यासाठी आपला परागंदा झालेला भाऊ गन्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. समाज माध्‍यमाचा वापर करून, वेंक्या भारतभर प्रवासाला निघतो, तेथील वैविध्यपूर्ण संस्कृती, केले जाणारे  घोटाळे आणि अनोळखी लोकांनी दाखवलेला दयाळूपणा  त्याला दिसून येतो.  या प्रवासात त्याचा  वैयक्तिक  विचार प्रक्रियेत विकास होतो.  त्‍याला आलेल्या  अनुभवातून अखेर कुटुंबाविषयी ममत्‍व आणि त्‍याच्या मनातील मानवता जागृत होते.  

भूतपोरी: 

या भयपटात, एका मृत महिलेचा अस्वस्थ आत्मा तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी एका लहान मुलामध्‍ये वास करण्‍यासाठी  येतो. त्यांच्यामध्‍ये  फरक असूनही, ते जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन शोधत भावनिक प्रवास  करत असताना त्यांच्यात एक संभाव्य बंध निर्माण होतात. उत्कंठावर्धक वळणांसह हृदयस्पर्शी क्षणांचे मिश्रण करून, हा चित्रपट जिवंत आणि मृत व्यक्तींच्या अनोख्या अन्वेषणाने मोहित करतो.

आर्टिकल 370: “2016 मधील  काश्मीरातील अशांततेनंतर, तरुण एजंट झूनी हक्सरला राजेश्वरी स्वामीनाथन यांना पंतप्रधान कार्यालयातून दहशतवादाशी लढा देण्यासाठी आणि आर्टिकल  370 रद्द करून प्रदेशातील संघर्षाची अर्थव्यवस्था मोडून काढण्याच्या गुप्त मोहिमेसाठी नियुक्त केले जाते. दहशतवादी लढाईत झुनीला पदावनत व्हावे लागते. तिच्‍यावर टिकेची झोड उठते. यांनतर झूनी काश्मीरला  परत येते.  जिथे तिने ‘नेटवर्क फंडिंग’ मधून दगडफेकीची घटना ती सर्वांसमोर आणते. भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धच्या गुंतागुंतीच्या लढ्यात झूनी लक्षवेधी काम करते.

‘अमेरिकन वॉरियर’ ने 55व्या इफ्फीमध्ये दाखवली चमक


“एका चित्रपटापेक्षाही ती अधिक काही आहे- माझ्या सहनशीलतेची ती कहाणी आहे”- अभिनेता विशी अय्यर

जीवनातील प्रेमाचे आणि दुसऱ्या संधीचे सामर्थ्य दाखवतो ‘अमेरिकन वॉरियर’- अभिनेत्री टेलर ट्रेडवेल

‘अमेरिकन वॉरियर’ घेतो स्थलांतरितांच्या अनुभवाचा; भारतीय अमेरिकन्सचा संघर्ष आणि आकांक्षांचा वेध- निर्मात्य रिशाना

#IFFIWood, 25 नोव्‍हेंबर 2024

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने जागतिक सिने समुदायाचे खुल्या दिलाने स्वागत केले, ज्यामध्ये बहुप्रतिक्षित अमेरिकन वॉरियर प्रकाशाच्या झोतात राहिला. गुस्तावो मार्टिन दिग्दर्शित, अमेरिकेतील या प्रेरणादायी चित्रपटात एका भारतीय अमेरिकी स्थलांतरितांचा परिवर्तनकारी प्रवास दाखवण्यात आला आहे. जय नावाच्या माजी हौशी एमएमए फायटर आणि पूर्वाश्रमीच्या गुन्हेगाराची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळते. एका दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडल्यावर तो प्रायश्चित्ताच्या मार्गावर चालू लागतो. त्याच्या साहसामुळे नकळत तो एक नायक बनतो, ज्यामुळे लोकांच्या नजरेत येतो आणि नव्या आव्हानांना सामोरा जाऊ लागतो. या चित्रपटाने केवळ चाकोरीबद्धपणाच्या चौकटीलाच आव्हान दिलेले नाही तर प्रेक्षक आणि समुदायाच्या हृदयाला भिडणारा एक संदेश देखील दिला आहे. विशी अय्यर या प्रमुख अभिनेत्याचा करिष्मा आणि निर्धार यांना देखील हा चित्रपट अधोरेखित करतो, ज्याने या भूमिकेत एक सच्चेपणा आणला आहे आणि भूमिकेला खोली प्राप्त करून दिली आहे.  

या चित्रपटाच्या वार्ताहर परिषदेत या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते विशी अय्यर, अभिनेत्री टेलर ट्रेडवेल आणि निर्माते क्रिस्टी कूर्स बिस्ली आणि रशाना यांच्यासह चित्रपटाशी संबंधित असलेल्या प्रतिनिधींची ओळख करून देण्यात आली. हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या प्रतिनिधींनी या कथानकाचा उगम आणि त्याचा प्रभाव याविषयी आपापला दृष्टीकोण मांडला. यावेळी या चित्रपटाचा एक आकर्षक ट्रेलर दाखवण्यात आला, ज्यामुळे प्रेक्षकांना या कथेचा सच्चेपणा जाणवून देणारे, भावनात्मक गहनतेमध्ये घेऊन जाणारे एक रोमांचक वातावरण तयार केले.

या प्रवासाविषयी बोलताना विशी अय्यर यांनी या चित्रपटामागील त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांमध्ये खोलवर रुजलेल्या अतिशय सखोल वैयक्तिक प्रेरणेचा खुलासा केला.  आर्थिक संकटाच्या काळात कोट्यवधी डॉलरचा व्यवसाय गमावल्यावर आणि बहिष्काराला तोंड दिल्यावर अय्यर यांनी आध्यात्मिकता आणि आत्मशोधाचा मार्ग पत्करला.  भग्वदगीतेतील शिकवणीपासून, विशेषतः अर्जुनाच्या कथेपासून धडा घेत त्यांनी दृढसंकल्प आणि मुक्तीची संकल्पना तयार केली.

मेलिसा या एकट्या मातेची भूमिका साकारणाऱ्या टेलर ट्रेडवेल यांनी आपली भूमिका अतिशय खोलवर अर्थ सांगणारी होती असे सांगितले. “अमेरिकन वॉरियर प्रेम आणि दुसऱ्यांदा मिळणाऱ्या संधीचे सामर्थ्य प्रदर्शित करतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या चित्रपटातील ऍक्शन आणि भावनात्मक खोली यामधील संतुलन त्यांनी अधोरेखित केले. हा चित्रपट केवळ शारीरिक लढायांविषयीच नाही तर मानवी दृढतेची व्याख्या करणार्या अंतर्गत संघर्षाविषयी देखील असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रपटाचा सच्चेपणा त्याच्या यथार्थवादाविषयीच्या बांधिलकीमुळे आणखी जास्त वाढतो, याकडे टेलर ट्रेडवेल यांनी लक्ष वेधले. या चित्रपटातील हाणामारीच्या दृश्यांमध्ये वास्तविकता आणण्यासाठी अय्यर यांनी एका यूएफसी फायटरच्या हाताखाली कठोर प्रशिक्षण घेतले. विशी अय्यर यांनी भावनात्मक आणि शारीरिक या दोन्ही प्रकारच्या आव्हानांना निर्धाराने तोंड दिले, ज्यामुळे चित्रपटाच्या दृढसंकल्पाच्या संदेशाला जास्त वजन प्राप्त झाले.  

भारतीय-अमेरिकन लोकांचा संघर्ष आणि आकांक्षा यावर प्रकाश टाकत निर्मात्या राशाना यांनी स्थलांतरितांच्या अनुभवावर या चित्रपटाचा भर दिला. लवचिकता आणि आशा या सार्वत्रिक संकल्पनांना अधोरेखित करत त्यांनी अमेरिकन आणि भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटातून केलेल्या आवाहनाकडे लक्ष वेधले. आणखी एक निर्माते, क्रिस्टी कूर्स बीसले यांनी, अधिक प्रामाणिक कथा सादर करण्यासाठी ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन, अमेरिकन जीवनातील गंभीर बाजू प्रदर्शित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

निर्मात्यांच्या चमूने महिला पात्रांना प्रकाशझोतात आणून नेहमीच्या चाकोरीतील कथनाला बदलण्याविषयी अभिमान व्यक्त केला. एका महिलेला फाईट डॉक्टर दाखवण्यापासून ते संतुलित लैंगिक सादरीकरणापर्यंत या चित्रपटाने उद्योगाच्या मानकांना आव्हान दिले आहे आणि महिला पात्रांच्या नव्या शक्यतांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा दिली आहे.

या चित्रपटाला अनेक महोत्सवांमध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षक या चित्रपटाच्या विषयामध्ये खोलवर सामावून गेले. या पत्रकार परिषदेदरम्यान, या चमूने स्क्रीनिंगच्या वेळी अनेक प्रेक्षकांकडून त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांसोबत या चित्रपटाची तुलना करून दिलेल्या भावनोत्कट प्रतिसादांची माहिती सामाईक केली.

अनुभवी साहसी दृश्य समन्वयक आणि एमएमए प्रोफेशनल फायटर्स यांच्या योगदानासह या चित्रपटाच्या चमूचे सर्जनशील सहकार्य या चित्रपटाच्या यशातील महत्त्वाचा घटक ठरल्याचे अधोरेखित करण्यात आले. परिवर्तन, साहस आणि सांस्कृतिक सेतू बांधणीचा समावेश असलेले एक प्रभावी कथानक म्हणून अमेरिकन वॉरियर उदयाला आला आहे. चित्रपटाची संकल्पना सर्व सीमा ओलांडून आशा आणि दृढतेच्या सार्वत्रिक संदेशासोबत अतिशय गहनतेने जोडले जाण्याची संधी प्रेक्षकांना प्रदान करत  आहे.

मुख्यमंत्र्यांचे नाव ठरेना…आता भाजप निरीक्षक पाठवणार:आमदारांकडून ओपिनियन पोल घेऊन नावे जाहीर करणार


मुंबई-एकीकडे नव निर्वाचित आमदारांच्या शपथविधीची विधिमंडळात तयारी करण्यात येत आहे. राज्यातील सर्व 288 नवे आमदार विधिमंडळ परिसरात आमदारकीची शपथ घेतील. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरु करण्यात आली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होऊ शकला नाही. त्यासाठी भाजप निरीक्षक पाठवणार असून, ते आमदारांचे मत जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविली हा दावा शिंदे समर्थकांचा आहे तर भाजपच्या देवेंद्र समर्थकांचा दावा देवेंद्र यांच्या समर्थ आणि चाणाक्ष नेतृत्वाचा आहे. या दोलायमान स्थितीत शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण होतोय आणि अजित पवार सामंजस्य निर्माण करताहेत अशा बातम्या देखील माध्यमातून येत आहेत .

दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी हा एक डिसेंबर रोजी होणार असल्याचा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. सरकार स्थापन करण्याची कोणतीच घाई नाही. त्यामुळे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता एक डिसेंबरलाच सरकार अस्थित्त्वात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरपर्यंत होता. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अद्याप ठरलेली नाही. तोपर्यंत शिंदे हेच हंगामी मुख्यमंत्री राहतील. शिंदे 28 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री होते.एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात फडणवीस यांची नेतेपदी निवड होणार आहे. यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेऊ शकतात.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. आजच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास पूर्वीप्रमाणेच नव्या सरकारमध्येही दोन उपमुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि शिवसेनेकडून शिंदे नव्या आमदाराचे नाव पुढे करू शकतात.