Home Blog Page 544

येरवड्यातून जन्मठेप झालेला कैदी पळाला…

पुणे- – येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावलेला एक कैदी कारागृह रक्षकांची नजर चुकवून पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या अनिल मेघदास पटोनिया (वय 35) या कैद्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराेपी अनिल पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावा मधील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा, तसेच 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली होती. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृाहत करण्यात आलेली होती. येरवडा खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था असून त्याची चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते.बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील कैद्यांची हजेरी घेण्यात आलेली हाेती. त्यावेळी पटोनिया आढळून आला नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत लेखी तक्रार देण्यात आली. खुल्या कारागृहातील कर्मचारी राजेंद्र मरळे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली असून, पसार झालेल्या पटोनियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी खुल्या कारागृहास भेट देवून पाहणी केली. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस टकले (मोबाईल 9922995911)करत आहेत.

ग्राम ऊर्जा स्वराज राष्ट्रीय पुरस्काराबद्दल मान्याचीवाडीचे महावितरणतर्फे अभिनंदन

0

मुंबई – केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावाचे सरपंच रविंद्र माने यांचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले.
नवी दिल्ली येथे बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सरपंच रविंद्र माने यांनी हा पुरस्कार व एक कोटी रुपयांचा निधी स्वीकारला. देशभरातील १ लाख ९४ हजार ग्राम पंचायतींनी केंद्र सरकारच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ४५ ग्रामपंचायतींची  पुरस्कारांच्या विविध वर्गवारीसाठी निवड करण्यात आली. शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) स्थानिक पातळीवर गाठण्यासाठी केलेल्या कामगिरीचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेल्या मान्याचीवाडीमध्ये विजेची संपूर्ण गरज सौर ऊर्जेद्वारे अर्थात हरित ऊर्जेद्वारे भागवली जाते. 
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे गाव राज्यातील पहिले सौरग्राम आहे. गावातील घरांची तसेच ग्राम पंचायत कार्यालय, शाळा, पथदिवे, पाणी पुरवठा योजना इत्यादींची विजेची गरज गावातच सौरऊर्जा निर्मिती करून भागविली जाते. मान्याचीवाडीतील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण ऑगस्ट महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
महावितरणने राज्यात शंभर गावे सौर ग्राम करण्याची मोहीम हाती घेतली असून तिचे काम चालू आहे. यामध्ये गावातील सर्व घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्या घरांना वीज पुरवठा केला जाईल. त्यासोबत गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, रस्त्यावरील दिवे, पाणी पुरवठा यासाठीचा वीजपुरवठाही सौरऊर्जेद्वारे केला जाईल. 
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना तीन किलोवॅट क्षमतेपर्यंत ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. यामुळे घरगुती ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविणे सुलभ होते. यामध्ये घराच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यामुळे ग्राहकांचे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळते. सौर ग्राम योजनेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसोबत अन्य सरकारी योजनांचा व उपलब्ध निधीचा कल्पकतेने वापर केला जातो.
मान्याचीवाडी पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे राज्यातील दुसरे सौरग्राम ठरले आहे. या गावातही सर्व घरांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा होतो. या गावाच्या सौर उर्जीकरण प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने केले होते.
राज्यात प्रधान मंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत ७३,७९० घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आले आहेत. त्यांची एकत्रित क्षमता २९२ मेगावॅट असून ५९२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे होणारे खाजगीकरण तात्काळ थांबवा- शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

0

येत्या आठ दिवसांत प्रस्ताव रद्द न केल्यास शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे- पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या काही डेपोचे संपूर्णतः खाजगीकरण करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला असून पीएमपीएमएलचे होणारे खाजगीकरण तात्काळ थांबवण्यासंदर्भातील पत्र पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तसेच पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे. या संदर्भात पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की,पीएमपीएमएल कर्मचारी हे संपूर्ण प्रशासनाच्या वेतनश्रेणीनुसार कार्यरत असून नियमानुसार पीएमपीएमएलचे स्वतःच्या मालकीच्या 60% बसेस संख्या असून 40% खाजगी ठेकेदारांना निविदा पद्धतीने बसेस संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र खाजगी ठेकेदारांच्या दबावामुळे पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या पूर्णतः कमी करून काही डेपोच्या संपूर्ण बसेसची संख्या ही खाजगी ठेकेदारांच्या अखत्यारित देण्यासंदर्भातील प्रस्ताव पीएमपीएमएल प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात पीएमपीएल प्रशासन तसेच पीएमपीएल बचाव समिती व शिवसेना पदाधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयोजित करून पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची होणारी दिशाभूल तातडीने थांबवण्यात यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या खाजगीकरणाच्या संदर्भात कोणताही प्रस्ता असल्यास तो तातडीने रद्करण्यात यावा, शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या तसेच मराठी माणसांच्या सदैव पाठीशी उभी राहिली असून संपूर्णतः काही डेपोंच्या बसेसची संख्या ही खाजगी कंपन्यांच्या ठेकेदाराकडे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जाऊ देणार नाही यासंदर्भात येत्या आठ दिवसांत तातडीने महानगरपालिका प्रशासन तसेच पीएमपीएमएल प्रशासनाने बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

एक देश-एक निवडणूक विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी,पुढच्या आठवड्यात संसदेत ..आणि नंतर देशभरात एकदाच निवडणुक

0

नवी दिल्ली – ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. आता सरकार पुढच्याच आठवड्यात हे विधेयक सभागृहात आणण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जेपीसी स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातीयानंतर हे विधेयक संसदेत सादर करून पास केले जाईल. तत्पूर्वी, रामनाथ कोविंद यांच्या समितीने सरकारला यासंदर्भात अहवाल सादर केला होता.

सध्या देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात. मात्र हे विधेयक पास झाल्यानंतर, एकाच वेळी सर्वत्र निवडणुका घेण्याची तयारी आहे.यापूर्वी सप्टेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन-वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, ‘पहिल्या टप्प्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. त्यानंतर 100 दिवसांत दुसऱ्या टप्प्यात नागरी निवडणुका होणार आहेत.

विधेयक मंजूर झाल्यास 2029 पर्यंत एक राष्ट्र-एक निवडणूक, 3 पॉइंट

समितीच्या अहवालानुसार, एक देश, एक निवडणूक लागू करण्यासाठी अनेक राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ कमी केला जाईल.
ज्या राज्यांमध्ये 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.
विधी आयोगाच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यास, 2029 पासूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत 25 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अहवाल सादर केला

वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023 रोजी एक पॅनेल तयार करण्यात आले. या पॅनलने भागधारक-तज्ञांशी चर्चा केल्यानंतर आणि 191 दिवसांच्या संशोधनानंतर 14 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल सादर केला होता.

कोविंद पॅनलच्या 5 सूचना…

सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवण्यात यावा.
त्रिशंकू विधानसभेत (कोणाकडेही बहुमत नाही) आणि अविश्वास प्रस्ताव आल्यास, उरलेल्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.
पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसांत होऊ शकतात.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निवडणूक आयोग एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करेल.
कोविंद पॅनेलने एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी उपकरणे, मनुष्यबळ आणि सुरक्षा दलांचे आगाऊ नियोजन करण्याची शिफारस केली आहे.
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय?

सध्या भारतात, राज्यातील विधानसभा निवडणुका आणि देशातील लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी, एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान करतील.

स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या, परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे एक देश, एक निवडणुकीची परंपरा खंडित झाली.

सुनेत्रा पवारांना दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या शेजारी:फर्स्ट टर्ममध्येच परंपरेला फाटा देत दिला प्रचंड मोठा बंगला

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदा खासदार होणाऱ्यांना मोठा बंगला मिळत नाही एवढा मोठ्ठा दिल्लीत बंगला मिळाला आहे. तोही सोनिया गांधींच्या शेजारी… महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या यशामुळे हा बंगला देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. .सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव करूनही त्यांना राज्यसभेवर घेणे आणि आता सोनिया गांधींच्या शेजारी एवढा मोठ्ठा बंगला देणे याचा याचा संबंध अजित पवारांच्या दिल्लीत वाढलेल्या दबदब्याशीही जोडला जात आहे

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुनेत्रा पवार यांना दिल्लीच्या लुटियन्सच्या 11 जनपथवरील टाईप -7 बंगला देण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे हा बंगला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ स्थित टाईप -8 बंगल्याला अगदी चिकटून आहे. शरद पवार तिथे आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहतात. सीनिअर पवार हे अजित पवार यांचे चुलते आहेत.

लुटियन्समधील सुनेत्रा पवार यांचा टाईप -7 बंगला सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण, सुनेत्रा या यंदा प्रथमच खासदार बनल्या आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचलेल्या व्यक्तीला दुसऱ्या सर्वोच्च श्रेणीचा बंगला दिला जात नाही. पण सुनेत्रांना तो देण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. हा घटनानंतर लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच घडला होता.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली होती. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला तब्बल 41 जागा मिळाल्या. याऊलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे अजित पवारांची दिल्लीतील ताकद वाढली आहे. यामुळेच सुनेत्रा पवार यांना दिल्लीत मोठा बंगल्याचे वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या शेजाऱ्यांत शरद पवारच नव्हे तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे.

संजय राऊत यांची बंगल्यावर हरकत-शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या बंगल्यावर हरकत नोंदवली आहे. ते म्हणाले, मी अनेक वर्षांपासून खासदार आहे. मी पहिल्यांदा खासदार झालो होतो, तेव्हा आम्हाला साधे घर दिले गेले. पण सुनेत्रा पवार यांना टाईप-7 दर्जाचा बंगला देऊन भाजपने अजित पवार यांची सोय केली. कदाचित त्यांना दिल्लीत येता – जाता यावे यासाठी हे केले असावे. भाजप हे मुद्दामहून करते. नेत्यांना कमी लेखण्यासाठी हे कारस्थान केले जाते. दिल्ली ही कपट कारस्थानांची राजधानी आहे. दिल्लीत जितके कारस्थान रचले जाते, तेवढे जगात कुठेही दिसून येत नाही.

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रमात सहभाग,

पुणे-राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकारण, सामाजिक, साहित्य, कला, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ पुण्यातच नाही, तर राज्य, देशभरातून आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाअंतर्गत भव्य पुस्तक प्रदर्शनासह विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम, बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने वाचन चळवळ वृद्घिंगत करण्यासाठी बुधवारी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम राबवण्यात आला. सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, गणेश मंडळे, शासकीय कार्यालये, ग्रंथालये अशा विविध ठिकाणी दुपारी १२ ते १ या वेळेत पुस्तकांचे वाचन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमात सहभागी होऊन वाचन करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांत पोस्ट केली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कोथरूडचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सिद्धार्थ शिरोळे,उद्योजक पुनीत बालन, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, आमदार हेमंत रासने,अभिनेत्री विभावरी देशपांडे, लेखक किरण यज्ञोपवीत, ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक अशा अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच समता भूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले मंडई, अंधशाळा, मेट्रो स्थानक, पुणे महापालिका अशा ठिकाणी पुस्तक वाचन करण्यात आले.

पुण्यातील ऐतिहासिक अप्पा बळवंत चौक येथे झालेल्या उपक्रमात आमदार चंद्रकांत पाटील सहभागी झाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, की ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत, हा उपक्रम महत्त्वाचा आहे. आयुष्यात वाचनाला फार महत्त्व आहे. वाचनामुळे आयुष्याला दिशा मिळते, दृष्टी मिळते, मन मोठे होते. राजकारण्यांनीही मन मोठे करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. अनेक राजकारणी उत्तम वाचक, लेखक आहेत. वाचनासाठी एकाग्रता लागते. आजच्या काळात वाचनाच्या पद्धती बदलल्या आहेत. ऑडिओ बुक्स उपलब्ध झाली आहेत. पुस्तके मोबाईलवर मिळतात. महाराष्ट्रातील ११ हजार सार्वजनिक वाचनालयांमुळे वाचनाची चांगली संस्कृती आहे. या ग्रंथालयांना राज्य सरकारकडून ४०० कोटी रुपये अनुदान दिले जाते.

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. २७ हजारांहून अधिक छायाचित्रे पाठवण्यात आली आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता पुणे पुस्तक महोत्सव अधिक व्यापक होईल असा विश्वास वाटतो, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

बॉलीवूडची कपूर फॅमिली अन पंतप्रधान नरेंद्र मोदी .. सारेच रमले, एका रम्य भेटीत …

राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवासाठी कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. पीएम मोदींसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, करिश्मा आणि रिद्धिमा यांच्यासह कपूर कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत.

करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये करिनाने लिहिले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज कपूर यांच्या 100व्या जयंतीसाठी आम्ही आमंत्रित केले. त्यांना भेटून खूप छान वाटतं. यासाठी आपले मनःपूर्वक आभार.”राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या काळात राज कपूर यांचे चित्रपट 40 शहरे आणि 135 चित्रपटगृहांमध्ये दाखवले जातील.

वीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने कर्नाटकचा केला महाराष्ट्राने निषेध !

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटक विधान परिषदेच्या सभापतींना दिले पत्र

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या सीमा भागातील मराठी भाषिक रहिवाशांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. त्याचबरोबर, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही नाराजी व्यक्त केली.सभागृहाच्या भावना लक्षातच घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरत्ती यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय हा अत्यंत निषेधार्थ प्रकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आहेत त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची जाणीव कर्नाटक सरकारनेही ठेवायला हवी”, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तसेच, या महत्त्वाच्या मुद्द्याची तत्काळ दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटक विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरत्ती यांना केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “अलीकडेच माझ्या निदर्शनास आले की, कर्नाटक सरकार विधानसभेच्या सभागृहातून थोर स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा विचार करत आहे. असे झाले तर नक्कीच या देशातील प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या मनात तीव्र संताप निर्माण होईल. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे आणि ते कधीही कमी करता येणार नाही हे वेगळे सांगायला नको.

स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि देशाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीतून देशाला मुक्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न जगभरात ओळखले जातात. विधिमंडळ हे लोकांच्या मनाचे प्रतिबिंब आणि प्रतिनिधित्व करते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पिठासीन अधिकारी या नात्याने मी लोकांच्या भावना जाणते त्यामुळे, वस्तुस्थिती आणि भावना समोर आणल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही या निर्णयावर पूर्ण विचार कराल आणि वीर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कायम कर्नाटक विधानसभा सभागृहाच्या भिंतीवर राहील याची खात्री केली जाईल.”

बेळगावमध्ये सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महाराष्ट्रातलं सरकार आणि महाराष्ट्राचे विधिमंडळ हे एकमताने आणि पूर्ण शक्तीने सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी आहे. ज्याप्रकारे कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर अत्याचार होतोय त्याचा निश्चितपणे आम्ही सर्व निषेध करतो महाराष्ट्राची जनता आणि जगभरातले मराठी माणसं हे त्यांच्या पाठीशी आहेत.सीमाभागातील जनतेच्या शिक्षण, रोजगार, मराठी शाळा, सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत जी अवहेलना होते त्याबाबत तुम्ही सरकारची जबाबदारी पार पाडायला हवी.

पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद शनिवारपासून

महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन : नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन यावर सखोल चर्चा ; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद ‘स्पेक्ट्रम २०२४’ महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. दिनांक १४ आणि १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता औंधमधील भारतीय विज्ञान व संशोधन संस्था येथे ही परिषद होणार आहे, अशी माहिती पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ.राधिका परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. नितीन कोलते, डॉ. आश्विनी मिसाळ, डॉ. वृषाली वरद उपस्थित होते. 
परिषदेच्या उद््घाटन सोहळ्यास आॅल इंडिया आॅप्थलोमोलॉजिकल  सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समर बसक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राधिका परांजपे म्हणाल्या, या परिषदेत नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन उपाययोजना यांवर  सखोल चर्चा केली जाणार आहे. परिषदेत भारतातील आणि परदेशातील आघाडीचे नेत्र तज्ञ, संशोधक आणि नेत्रचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
परिषदेत ब्रिटन, ओमान सह कलकत्ता, बंगळुरु, ओडिसा, जोधपूर, नवी दिल्ली, केरळ तामिळनाडू, गुजरात येथील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, महाराष्ट्रातून पुण्यासह मुंबई, नागपूर येथील तज्ञ देखील सहभागी होणार आहेत. नेत्र विज्ञान क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे पुण्यात प्रथमच आयोजन

उद्योग-व्यवसाय विस्तार आणि परदेशी गुंतवणुकीच्या संधींविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नव उद्योजकांनाही संकल्पना मांडण्यासाठी मिळणार व्यासपीठ

पुणे : उद्यमशील युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, बदलत्या काळानुरूप नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती गर्जे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गानू, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या महासंचालक शितल पांचाळ, नवउद्योजक सागर बाबर उपस्थित होते.
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) दि. 10 आणि दि. 11 जानेवारी 2025 या कालावधीत द ऑर्किड हॉटेल, बालेवाडी पुणे येथे होणार आहे. या परिषदेत भारतासह, अमेरिका, युनाटेड किंग्डम, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच जगभरातील विविध देशांमधून उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार यांचा सहभाग असणार आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 500 व्यावसायिक, नवउद्योजक, कल्पक उद्योजक तसेच गर्जे ग्लोबल संस्थेमार्फत परदेशातील शंभराहून अधिक व्यावसायिक, उद्योजक व मान्यवर सहभागी होणार असून त्यांना उद्योग-व्यवसायातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसायांच्या संधी, बदलत्या संकल्पना, निर्मिती क्षेत्रातील उद्योजकता याविषयीही तज्ज्ञ अनुभव कथन करणार आहेत.
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहित करत जागतिक पातळीवर व्यवसाय विस्तारासाठी नवनवीन संधींची उपलब्धता करून दिली जाणार असून महाराष्ट्राच्या व्यावसायिक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील उद्योग व व्यवसायात गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती होण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योजक व परदेशातील गुंतवणूकदार यांना एका मंचावर संवादाची संधी मिळणार असून युवा उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना गुंतवणूदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिला उद्योजकांसाठी देखील व्यवसायाच्या संधी आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून व्यवसायवाढीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
या परिषदेत देश-विदेशातून वक्ते, सरकारी आस्थापना, व्यावसायिक संघटना तसेच वाणिज्य दुतावासातील अधिकारी, व्यावसायिक धोरणकर्ते यांना आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स 2025चे संयोजक सचिन ईटकर असून नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार, व्हेरिस्मो नेटवर्क्सचे अध्यक्ष प्रकाश भालेराव (अमेरिका), पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, रवी बोरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉन्क्लेव्ह होत आहे.
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून त्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2024 आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध 5 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल

0

सातारा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध 5 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार ३, ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला आहे. तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी आनंद आणि किशोर यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.

जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रार देण्यात आली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन

0

मुंबई, दि. ११ :- जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’तर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणाशी संबंधित बाबींसंदर्भातील सखोल संशोधन, त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी आणि सक्रीय लोकसहभाग यांच्या माध्यमातून डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेले कार्य या पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पश्चिम घाटासंदर्भात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अहवालामुळे या क्षेत्राच्या संवर्धनासाठी शासनासह लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना उभारी मिळाली आहे. डॉ. गाडगीळ यांच्या पुरस्कारामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, क्षारपड जमिनींचे वाढतं प्रमाण यासारख्या समस्यांवर संशोधन, अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या जागतिक पुरस्काराबद्दल डॉ. माधव गाडगीळ यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. भविष्यातील त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस: नाना पटोले

नागपूर अधिवेशन किमान एका महिन्याचे हवे, चर्चेपासून पळ काढण्यासाठीच पाच दिवसांचे अधिवेशन.

रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून, निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा.

मुंबई, दि. ११ डिसेंबर २०२४
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरु आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ऑपेरेशन लोटस’, असा हल्लाबोल करत हा प्रकार निषेधार्ह आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना आहे. आपल्या मतावर दरोडा टाकल्याची जनतेच्या मनात शंका आहे. मारकडवाडीनंतर अशी भावना देशपातळीवर वाढीस लागली आहे. ग्रामसभा ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही. रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून केला असून निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ असे नाना पटोले म्हणाले.

भाजपा युती सरकारचे पहिले अधिवेशन नागपूरात होत आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. महागाई, बेरोजगारी, नोकरभरती, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला हमीभाव देणे अशा मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट ३ लाख रुपयांची कर्ज दिली पाहिजे, नोकरीभरती कशी करणार अशा विविध मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे, यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे अशी मागणी केली होती पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढत आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वाद नाही. तीनही पक्ष एकत्र बसून विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करतील व नागपूर अधिवेशनात सरकार यावर निर्णय घेईल. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता व गटनेता ठरवण्याचे सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना दिले आहेत, त्यावरही लवकरच निर्णय होईल असे पटोले म्हणाले.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी

पुणे, दि. 11: पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 1 जानेवारी 2025 रोजी मोठया प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय खासगी वाहनाने तसेच सार्वजनिक वाहनाने येत असतो. विजयस्तंभाजवळ मोठी गर्दी होऊ नये यासाठी लोणीकंद, पेरणे, वढू खुर्द हद्दीतील काही मोकळया जागांमध्ये येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. तसेच पीएमपीएमएलच्या बसेस थांबण्याकरिता तात्पुरते बसस्टॉप उभारण्यात येतात. या विविध ठिकाणच्या पार्किंगसाठी तसेच सदर कार्यक्रमाच्यावेळी जयस्तंभ परिसरात अनुचित प्रकार घडून आल्यास तात्काळ बाहेर जाण्याकरिता जयस्तंभाच्या बाजूला असलेली जागा अतितातडीची बाहेर पडण्याची (एमर्जन्सी एक्झिट) म्हणून तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष डॉ. दिवसे यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 65 अन्वये खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार लोणीकंद येथील गट क्र. 752, 760, 754, 763, 762, 753, 756, 757, 17, 18, 19, 21,28-2, 10, 1, 309, 125, 129, 130, 131, 132, 194, 197, 198, 183 तसेच वढू खुर्द गावातील गट क्र. 118/1, 119, 121, 122, 123, 128, 173, 174/1, फुलगाव येथील गट क्र. 200/1 ब आणि पेरणे येथील 933/2 अ, 934/2, 1226 या गट क्रमांकातील मोकळया जागा अनुयायांच्या वाहनांच्या पार्किंगकरिता अधिग्रहित करण्यात येणार आहेत. पीएमपीएमएल पार्किंगसाठी लोणीकंद येथील गट क्र. 2, 3, 4/1, 4/2 तर बुकस्टॉलकरिता पेरणे येथील गट क्र. 963/1, 950, 944, 967 या मोकळया जागा अधिग्रहित करण्यात येणार आहेत. याशिवाय पेरणे येथील गट क्र. 489 ही सरकारी गायरानाची जागा अतिरिक्त जमीन असेल.

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेरणे येथील गट क्र. 1040, 1042 मधील जागा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित करण्यात येणार आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था वक्फ बोर्ड पार्किंग, जीत ढाब्यासमोर, पुणे नगर हायवेवर, शिक्रापूर, तोरणा पार्किंग बजरंगवाडी, शिक्रापूर, टोरांटो गॅस, खालसा पंजाबी ढाबा, चौधरी ढाबा, जातेगाव खुर्द, शंभू महादेव तळेगाव ढमढेरे, कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी, कोरेगाव भिमा बाजारतळ, इनामदार पार्किंग कोरेगाव भिमा, क्रिशा होंडा शोरुम ड्रॉप पॉईंट कोरेगाव भिमा, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पॉईंट कोरेगाव भिमा, वढू बु, हॉटेल वहिनीसमोरील पार्किंग याप्रमाणे पार्किंग, पिकअप पॉईंट, ड्रॉप पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

महावितरणध्ये ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालयाचे उद्घाटन

पुणे: महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजावी यासाठी रास्तापेठ येथील पुणे परिमंडलाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालय सुरु करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.

धकाधकीच्या क्षेत्रामध्ये अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुस्तकाच्या रुपाने नवीन मित्र मिळावे, वाचनकला विकसित व्हावी तसेच जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने रास्तापेठ येथे स्वतंत्र दालनात ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालय उभारण्यात आले आहे. यामध्ये वीजक्षेत्रासह सामाजिक, ऐतिहासिक तसेच विविध क्षेत्रातील नामवंत लेखकांचे पुस्तके, कथासंग्रह, कादंबरी उपलब्ध आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पुस्तके वाचण्यासाठी घरी नेता येणार आहे. तसेच वाचनालयाशेजारी विरंगुळा कक्ष असून त्यात कॅरम व बुद्धीबळ खेळण्यासाठी उपलब्ध आहे. या शिवाय वाहन चालकांसाठी वाहक कक्ष उभारण्यात आला आहे.

या तिनही उपक्रमांचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, संजीव नेहेते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे, कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, विरेंद्र मुळे, रवींद्र बुंदेले, माणिक राठोड, चंद्रकांत दिघे, सहायक संचालक गजानन खेडेकर आदींची उपस्थिती होती.