Home Blog Page 540

तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

0

नवी दिल्ली-जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी याला दुजोरा दिला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हुसेन हे इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसने ग्रस्त होते.गेल्या दोन आठवड्यांपासून ते सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

झाकीर यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लारखा कुरेशी आणि आईचे नाव बावी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्लारखा हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले.

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केले. हुसेन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला.हुसेन यांना 2009 मध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. 2024 मध्ये त्यांनी 3 वेगवेगळ्या अल्बमसाठी 3 ग्रॅमी जिंकले. अशा प्रकारे झाकीर हुसेन यांनी एकूण 4 ग्रॅमी पुरस्कार जिंकले.

जमिनीची पत सुधारण्याकरिता गो आधारित शेती गरजेची : गोपाल सुतारिया

राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन आणि प्रशिक्षण नियोजन बैठक संपन्न ; महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने आयोजन
पुणे : देशी गोवंश वाचला, तर शेतकरी वाचेल आणि तरच देश वाचेल. रासायनिक खते किंवा कीटक नियंत्रक यांच्यापेक्षा अधिक गुणवत्तापूर्वक उत्पादन देशी गो वंश आधारित नैसर्गिक शेती मधून येते. गरज आहे ती याविषयी डोळसपणे प्रयत्न करण्याची. शेती वरील वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी, जमिनीची पत सुधारण्यासाठी आज लाखो शेतकरी यांनी गोकृपामृत वापरून शेती पर्यायाचा वापर केला आहे, असे बन्सी गीर गो शाळेचे प्रमुख गोपाल सुतारिया यांनी सांगितले. 

महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन व महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण नियोजन बैठकीचे आयोजन पशुसंवर्धन आयुक्तालय येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशु संवर्धन विभागाचे आयुक्त डॉ प्रवीणकुमार देवरे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्राचे मुख्य संयोजक विजय वरुडकर, गोसेवा आयोगाच्या सदस्य सचिव मंजुषा पुंडलिक, गोसेवा आयोग सदस्य उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, मनीष वर्मा, गो कृषी तज्ञ तात्या मगर,ज्योत्स्ना वरुडकर, संजय भोसले, डॉ नितिन मार्कंडय, सनत गुप्ता आदी उपस्थित होते.

गो सेवा आयोग माध्यमातून गोमाता आधारित अशा १० वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रात काम सुरु आहे. गो आधारित शेती व गोपालन हे त्यातील महत्वाचे विषय आहेत. जमिनीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, ती सुधाकरण्याकरिता गो आधारित शेती करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले.

विजय वरुडकर म्हणाले, गो आधारित शेती किंवा नैसर्गिक शेती प्रशिक्षण, रासायनिक शेती आणि देशी गोवंश आधारित शेती याचा तुलनात्मक अभ्यास प्रशिक्षण, कामधेनु कृषी तंत्र, गोआधारित शेतीमधील विविध पद्धती, महाराष्ट्र गोहत्या बंदी अधिनियम माहिती यांसह गो आधारित कृषीतून सर्वांगीण ग्रामविकास, देशी गो वंशाचे नैसर्गिक शेतीतील आवश्यकता व महत्त्व गो आधारित शेतीतील यशोगाथा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील अनेक तालुक्यात नैसर्गिक शेती प्रशिक्षण नियोजन करण्यात येणार आहे. गो सेवा आयोग माध्यमातून डॉ. सुनील सूर्यवंशी जिल्हा निहाय गोशाळा यांचे प्रशिक्षण व नैसर्गिक शेती उत्पादन प्रशिक्षण विषयी आयोग सदस्य उद्धव नेरकर व विजय वरूडकर हे तालुका निहाय प्रशिक्षण सत्रांचे नियोजन करीत आहेत. या कार्यशाळा नोंदणी साठी ८४४६००४५८० या क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक समिती द्वारे करण्यात आले आहे. सारिका शेठ, संतोष  सुरवसे,  पौर्णिमा इनामदार, राहुल जगताप, विशाल वरूडकर, विक्रमादित्य शिंदे, गौरी शिलोनीकर, यांनी कार्यक्रम व्यवस्थापन केले

‌‘बखर ललितादित्याची‌’मुळे काश्मीरचा दडलेला इतिहास जगासमोर येईल : संजय सोनवणी

डॉ. लिली जोशी लिखित काश्मीर नरेश ललितादित्य मुक्तापीड यांच्या जीवनावर आधारित कादंबरीचे प्रकाशन

पुणे : दंतकथांनाच इतिहास समजण्याची सवय लागली असल्यामुळे खऱ्या इतिहासाला जाणून घेण्याचा, पाहण्याचा दृष्टीकोनच समाजाकडे नाही. त्यामुळे खरा इतिहास समाजासमोर येत नाही. ‌‘बखर ललितादित्याची‌’ या कादंबरीच्या माध्यमातून काश्मीरच्या दडलेल्या इतिहासाला समाजासमोर आणण्याचे कार्य घडत आहे. इतिहासाचे भान ठेवून डॉ. लिली जोशी यांनी तथ्यात्मकता राखत कल्पनाशक्तीला ठराविक प्रमाणातच संधी देत, चिकित्सक वृत्तीने इतिहासाकडे पाहिले आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक, लेखक संजय सोनवणी यांनी केले.

काश्मीर नरेश ललितादित्य मुक्तापीड यांच्या जीवनावर आधारित ‌‘बखर ललितादित्याची‌’ या डॉ. लिली जोशी लिखित ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशन रविवारी (दि. 15) ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संजय सोनवणी बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वकर्मा प्रकाशनचे सीईओ विशाल सोनी, संदीप तापकीर मंचावर होते.

पुस्तक लेखनामागील भूमिका मांडताना डॉ. लिली जोशी म्हणाल्या, काश्मीर नरेश ललितादित्य हा अज्ञाताच्या पडद्याआड गेलेला महान नायक आहे. या राजाविषयी फारशी कुणाला माहिती नाही. समाकालीन राजांच्या मांदियाळीत ललितादित्य हा स्वयंप्रकाशित राजा होता. तो फक्त रणवीरच नव्हे तर अत्यंत मुत्सद्दी होता. त्याला हिंदवी स्वराज्याची, लोककल्याणाची ओढ होती. हिमालयात वारंवार गेल्याने कादंबरी वर्णनात्मक लिहिण्यासाठी त्याचा उपयोग झाला. घटनाक्रम आणि कल्पनाशक्ती या दोन्हीची सांगड घालत, साधलेले ललित लेखन इतिहासातील सोनेरी पान ठरावे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मंगला गोडबोले म्हणाल्या, डॉ. जोशी यांनी कादंबरीची मांडणी करताना खूप तपशीलाने विचारपूर्वक चतुराईने लेखन करत आठवे शतक आणि एकविसावे शतक यातील नाते जोडले आहे. रुळलेली वाट सोडून त्यांनी केलेल्या लेखनातून प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास समाजासमोर येत आहे. दोन शतकांची सांगड घालताना लेखिकेने योगे ते दुवे साधत लेखनाचा तोल यशस्वीरित्या सांभाळला आहे. डॉ. जोशी यांनी मानवी संबंधांचे ताण-तणाव विवेकाने सांभाळले असून शब्दसंपदेचा उत्तम रितीने वापर करत भाषेचे तारतम्यही राखले आहे.

संजय सोनवणी पुढे म्हणाले, काश्मीर नरेश ललितादित्य हा अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी राजा होता. त्याने आठव्या शतकात अनेक व्यापारी मार्ग मुक्त केले, भारताच्या सीमांचे रक्षण केले अशा सम्राटाची महती या कादंबरीतून कळणार आहे.

भारताचा इतिहास वाचकांसमोर यावा यासाठी ऐतिहासिक पुस्तकांची निर्मिती करत असल्याचे विशाल सोनी यांनी सांगितले. तर पुस्तकाच्या निर्मितीविषयी संदीप तापकीर यांनी माहिती दिली. डॉ. नरेंद्र जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संगीता पुराणिक यांनी केले. मान्यवरांचा सत्कार डॉ. लिली जोशी यांनी केला.

महायुतीच्या ३९ आमदारांनी आज मंत्रिपदाची घेतली शपथ, तिन्ही पक्षांनी मिळून २५ दिले नवे चेहरे,

नागपूर: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार आज संपन्न झाला. नागपुरातील राजभवनात दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याच्या एक दिवस आधी महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर १० दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला.महायुतीच्या ३९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १९ जणांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांचा समावेश आहे. गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मिळून २५ नवे चेहरे दिले आहेत.

शपथ घेतलेल्या आमदारांची संपूर्ण यादी-
१. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
२. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
३. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
४. चंद्रकांत पाटील (भाजप)
५. गिरीश महाजन (भाजप)
६. गुलाबराव पाटील (शिवसेना)
७. गणेश नाईक (भाजप)
८. दादा भुसे (शिवसेना)
९. संजय राठोड (शिवसेना)
१०. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
११. मंगलप्रभात लोढा (भाजप)
१२. उदय सामंत (शिवसेना)
१३. जयकुमार रावल (भाजप)
१४. पंकजा मुंडे (भाजप)
१५. अतुल सावे (भाजप)
१६. अशोक उईके (भाजप)
१७. शंभुराज देसाई (शिवसेना)
१८. आशिष शेलार (भाजप)
१९. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
२०. अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
२१. शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
२२. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
२३. जयकुमार गोरे (भाजप)
२४. नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
२५. संजय सावकारे (भाजप)
२६. संजय शिरसाट (शिवसेना)
२७. प्रताप सरनाईक (शिवसेना)
२८. भरत गोगावले (शिवसेना)
२९. मकरंद पाटील (राष्ट्रवादी)
३०. नितेश राणे (भाजप)
३१. आकाश फुंडकर (भाजप)
३२. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
३३. प्रकाश आबिटकर (शिवसेना)
३४. माधुरी मिसाळ (भाजप)
३५. आशिष जैस्वाल (शिवसेना)
३६. पंकज भोयर (भाजप)
३७. मेघना बोर्डीकर (भाजप)
३८. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
३९. योगेश कदम (शिवसेना)
नवे चेहरे -चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अशोक उईके, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक.

राजकीय गुंडांना आश्रय देणाऱ्या सरकारच्या चहापाण्याला जाण्यात अर्थ नाही, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

नागपुर- उद्यापासून हिवाळी अधिवशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी सत्ताधाऱ्यांकडून चहापाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. परंतु या चहापाण्यावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज नागपुरात एक बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. गुंड आणि गुन्हेगारांना मंत्रिपदे देऊन राजकीय वर्चस्व वाढविणाऱ्या सरकारच्या चहापाण्याला जायचे काय ? असा सवाल या बैठकीतून करण्यात आला

राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णत: उद्ध्वस्त झालेली आहे. एका सरपंचाचा उचलून नेऊन खून केला जातो. त्या प्रकरणात राजकीय आरोपी आहेत. सरपंचांचा खून करण्याऱ्यांना पाठबळ असणाऱ्या नेत्याला मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राजकीय गुंडांना आश्रय देणारे सरकार असेल, तर चहापाण्याला जाण्यात काय अर्थ आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्राची अधोगती झाली आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी रोज आत्महत्या करतोय, महाराष्ट्रातील बेरोजगावर रस्त्यावर नागडे फिरण्याची वेळ आली आहे. उद्योगधंदे बाहेर पळाले. राज्यात गुंतवणूक येत नाही. गुंतवणुकदारांमध्ये महाराष्ट्राबाबत अनास्थ निर्माण झाली आहे. असे असताना दुसरीकडे पाठ थोपटण्याचे काम सुरू झाले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात शेतकरी रडतोय. त्याच्या माला भाव मिळत नाही. धान खरेदीचे केंद्र सुरू नाही, तसेच धानाचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. अशा स्थितीत पीकविम्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा व्हावी, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, यासाठी हे अधिवेशन अपेक्षित आहे. सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला चहापाण्याचे निमंत्रण मिळाले होते, परंतु आम्ही त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांवर खुलेआम अत्याचार, बलात्कार होत आहेत. त्यासंदर्भात सरकारला गांभीर्य नाही. या राज्यातील सामान्य माणूस, शेतकरी यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची सरकारची भूमिका अधिवेशनाच्या अल्पावधीत दिसून येत नाही. म्हणूनच आम्ही चहापाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवण्याची मागणी केल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल-देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

नागपूर -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर निवड झाल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात दाखल झाले आहेत. विविध चौकात त्यांचे स्वागत होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपुरात मेळावा पार पडला. या मेळाव्या अजित पवार यांनी मंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले. आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ ही अडीच वर्षांचा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले. नागपूर येथील देशपांडे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित होते.विधानसभा निवडणूक निकालानंतर बहुप्रतीक्षित असलेला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी दुपारी 3 वाजता नागपुरात होत आहे. यासाठी राजभवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र महायुतीच्या तिन्ही पक्षांतून कोण कोण मंत्री होणार याबाबत रात्री उशिरापर्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील व हसन मुश्रीफ यांचा पत्ता कट होणार आहे. मात्र जुने इतर सर्व कॅबिनेट मंत्री कायम राहणार आहेत. तर सना नवाब मलिक, नरहरी झिरवाळ व सुनील शेळके यांना राज्यमंत्रिपदासाठी फोन गेले आहेत

मुखमंत्री झाल्यानंतर प्रथमच मी माझ्या कर्मभूमी आणि पुण्यभूमीत येतोय. त्याचा अतिशय आनंद असून साहजिकच नागपूर माझा परिवार आहे. त्यामुळे माझ्या परिवाराकडून होणारे हे स्वागत आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तार संदर्भातील सगळी नावं समोर आली आहेत. त्याअनुषंगाने आज 4 वाजता शपथविधी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे..

पुण्यातील माधुरी मिसाळांनाही मंत्रीपदाची मिळाली संधी

पुणे-पर्वती विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा निवडून आलेल्या कै. सतीश मिसाळ यांच्या पत्नी आणि स्व. केशवराव देशपांडे यांची नात आमदार माधुरी मिसाळ यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. आज सकाळी साडेदहा वाजता त्यांना मंत्रिपदासाठी शपथ घ्यायला या म्हणून फोन आला आहे.

नाव: श्रीमती. माधुरी मिसाळ
जन्मतारीख : 19. 04. 1964
शिक्षण : बी. कॉम.

~ कै. सतीश मिसाळ यांच्या पत्नी

~स्वातंत्र्य सेनानी केशवराव देशपांडे यांची नात.

~2007- कसबा मतदारसंघ, पुणे येथे नगरसेविका म्हणून निवड
~2009 ते आत्तापर्यंत – आमदार म्हणून निवड, पर्वती मतदारसंघात सलग 4 वेळा, 2009, 2014, 2019 आणि 2024.
~ सतीश मिसाळ एक समर्पित, विश्वासू आणि सर्वांचे लाडके, सामाजिक कार्यकर्ते, पुण्यात भाजपचे 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1986 पासून कार्यरत.

राजकीय कारकीर्द
विधानसभा सदस्य (आमदार), पर्वती मतदारसंघ, पुणे
कार्यकाळ: 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग. सलग चौथ्या टर्मसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला.
पुणे महापालिकेत 22 भाजप नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता येण्यास मदत झाली, त्याच भागातील मागील 3 भाजप नगरसेवकांपेक्षा ऐतिहासिक वाढ

प्रमुख प्रकल्प:
•स्वारगेट येथील मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब
•(ESIC) 500 खाटांचे रुग्णालय
स्थानिक कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी
. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम.
. स्वारगेट ते कात्रज मेट्रो,
खडकवासला ते खराडी मेट्रो
. सिंहगड रोड उड्डाणपूल

  • गंगाधाम फ्लायओव्हर
    •स्वारगेट उड्डाणपूल
    . तळजाई वन नियोजन
    . पर्वती टेकडी संवर्धन आणि वारसा नियोजन
    . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चळवळ सुरू करणे.

इतर राजकीय भूमिका
-सचिव, महाराष्ट्र प्रदेश भाजप
-सदस्य, लोकलेखा समिती, महाराष्ट्र
-पुणे शहर भाजप अध्यक्ष
-माजी सदस्य, पुणे महानगरपालिका

-विधानसभा प्रतोद

भूषवलेली पदे
संचालिका, तीर्थ रिअल इस्टेट (शहरी विकास, बांधकाम आणि पायाभूत सुविधा)
अध्यक्षा, सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (शिक्षण)
. संचालिका, उद्यम को-ऑप बँक लिमिटेड (बँकिंग)
. अध्यक्षा, सतीश मिसाळ फाउंडेशन (चॅरिटी) (सामाजिक कार्य)
. माजी अध्यक्षा,विद्या को-ऑप बँक लि. (बँकिंग)
. माजी विश्वस्त, शिक्षण प्रसारक मंडळी (शिक्षण)
.1989 पासून संचालक आणि अध्यक्ष म्हणून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
. 22 वर्षांपासून पायाभूत सुविधा विकास आणि बांधकाम क्षेत्रात काम करत आहे.

डीजे लाईटमध्ये लपविण्यात आलेले 12 किलो सोने अन २ स्मगलर पकडले.

0

मुंबई-डीजे लाईटमध्ये लपवून चोरट्या मार्गाने नेण्यात येत असलेले 9.6 कोटी रुपये किमतीचे 12 किलो सोने मुंबईच्या  महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय  ), मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून जप्त केले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी  गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे  कारवाई करत, मालाची तपासणी केली असता प्रत्येक डीजे लाईटमधून सुमारे 3 किलो सोने हस्तगत करण्यात आले. त्यानंतरच्या तपासात एका गोदामाची झडती घेतली असता, त्याच पद्धतीचा वापर करून त्यासाठी केलेल्या खाचांमध्ये सोने लपवून तस्करीसाठी वापरण्यात येत असलेले,  68 डीजे लाईट्स आढळले. संबंधित टोळीने  या पूर्वी देखील देशात  मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली असल्याचा संशय आहे. सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआय, मुंबईने  गेल्या एका आठवड्यात तस्करी केलेले सुमारे 48 किलो सोने जप्त केले असून, सोने तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धच्या कारवाईत उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे यातून दिसून येते.

अतिरिक्त तारण मुक्त कृषी कर्ज रकमेची मर्यादा 1 लाख 60 हजार रुपयांवरुन 2 लाखांपर्यंत वाढवली

0

मुंबई- कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. सध्याची प्रत्येक शेतकऱ्यासाठीची 1 लाख 60 हजार रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून 2 लाख रुपये करण्यात आली आहे.

वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचा लागवडीवरील वाढता खर्च यांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामकाजासाठी आणि शेतीचा विकास करण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने त्यांना कोणतेही अतिरिक्त तारण न ठेवता जास्तीची आर्थिक मदत पुरविणे हा या निर्णयामागील हेतू आहे.

देशभरातल्या बँकांसाठी 1 जानेवारी 2025 पासून अमलात येणाऱ्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे – 

  • कृषी कर्ज, शेतीपूरक कामकाजासाठी लागणारे कर्ज यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्याही अधिकच्या तारणाशिवाय आणि स्वयंयोगदानाशिवाय 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे.
  • शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी म्हणून या सुधारित मार्गदर्शक सूचनांची त्वरेने अंमलबजावणी करावी. 
  • बँकांनी या सुधारित कर्जमर्यादेबाबतच्या निर्णयाची माहिती  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि शेतकरी तसेच शेतीशी संलग्न क्षेत्रातील संबंधितांमध्ये जनजागृती करावी. 

या निर्णयामुळे कर्जाची उपलब्धता वाढेल, विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी (यांची संख्या 86 टक्क्यांपेक्षा अधिक आहे) या निर्णयामुळे कर्जावरील खर्च कमी होईल व कोणत्याही जास्तीच्या तारणाची गरज राहणार नाही. या निर्णयाअंतर्गत कर्जवितरण सुरू झाल्यानंतर किसान क्रेडीट कार्ड (KCC) कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांमधील गुंतवणूक वाढवता येईल आणि त्यांचे राहणीमान सुधारेल अशी अपेक्षा आहे. 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी सुधारित व्याज सवलत योजना आणि या धोरणाच्या संयुक्त अंमलबजावणीमुळे आर्थिक समावेशनाचे दृढीकरण होईल, कृषी क्षेत्राला पाठिंबा मिळेल आणि कर्ज आधारित अर्थव्यवस्थेला बळ मिळेल तसेच याद्वारे सरकारचे दीर्घ काळापासूनचे उद्दीष्ट असलेले शाश्वत शेतीचे स्वप्न साकारण्यातही मदत मिळेल.

एकनाथ शिंदेंकडून कोणाला संधी आणि कोणाचा पत्ता कट

मुंबई-शिवसेनेकडून माजुई मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात समतोल राखताना 5 जुन्या तर 6 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात दोन-दोन मंत्रिपदे देण्यात आली आहेत. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला एक-एक मंत्रिमंडळ येणार आहे.

त्यांच्याकडून पहा कोणाला मिळतेय संधी –

1) उदय सामंत, कोकण

2) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र

3) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र

4) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र

5) संजय राठोड, विदर्भ

या नव्या चेहऱ्यांना संधी

1) संजय शिरसाट, मराठवाडा

2) भरतशेठ गोगावले, रायगड

3) प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र

4) योगेश कदम, कोकण

5) आशिष जैस्वाल, विदर्भ

6) प्रताप सरनाईक, ठाणे

मंत्रिमंडळातून यांचा पत्ता कट

1) दीपक केसरकर
2) तानाजी सावंत
3) अब्दुल सत्तार

मंत्रिपदासाठी भाजपच्या “या” नेत्यांना फोन

मुंबई- कोथरूड चे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील,पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ  तसेच नीतेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, जयकुमार गोरे, पंकजा मुंडे,शिवेंद्रराजे भोसले, गिरीश महाजन, जयकुमार रावलमेघना बोर्डीकर, यांना भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आले आहे.

नागपूर विमानतळावर उतरताच शिवेंद्रराजेंना देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राजे शपथ घ्यायला या असे म्हटले आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 1998 – 99 सालात महसूल राज्यमंत्री होते. त्यानंतर 26 वर्षांनी सातारा तालुक्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे.

(आज सकाळी पावणेदहा वाजे पर्यंत )

चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे- खासदार संजय राऊत

ज्यांच्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच मोदींनी उपमुख्यमंत्राची शपथ दिली,हे कोणत्या संविधानात लिहिले आहे?

मुंबई- दहाव्या शेड्युल्डनुसार ज्या पद्धतीने आमदार फोडले, ते अपात्र ठरायला पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नरेंद्र मोदींच्या दबावाखाली तसा निर्णय दिला नाही. चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. मोदी ज्या पद्धतीने हे राज्य चालवत आहेत, ते संविधानात विरोधात आहे. संविधान देशाचा आधार असून तो नरेंद्र मोदी यांनी उद्ध्वस्त केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान आहे. परंतु, विधानसभा किंवा लोकसभेत विरोधीपक्ष राहू नये, विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा, तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधीपक्षांच्या मागे चौकशीच ससेमिरा लावावा, त्यांना तुरुंगात टाकावे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणे हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिले आहे? विरोधी पक्ष राहू नये, अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. ईडी-सीबीआय भाजपच्या घरी कधी गेली हे दाखवावे, असाही हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.आमच्याकडे असणाऱ्या लोकांकडे ईडी-सीबीआय गेली होती, ते आज मोदींच्या मांडीवर बसले आहेत. मोदी त्यांची आईच्या ममतेने काळजी घेत आहेत. मोदींनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच मोदींच्या उपमुख्यमंत्राची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानात लिहिले आहे? असा सवाल करत संजय राऊत यांनी जोरदार टीका केली

मोदी देशाला लाभलेले 65 वर्षांतील असत्य बोलणारे सगळ्यात महान पंतप्रधान आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. सत्यमेव जयते हा संविधानाचा नारा आहे. पण गेल्या 10 वर्षांत फक्त असत्याचा विजय करण्याचे काम मोदी काळात झाले आहे. गौतम अदानी नरेंद्र मोदींचा नवीन संविधानकर्ता असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली. अदानीला विरोध करणारे संविधान विरोधी असल्याचे मोदींना सांगायचे आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून काय दिवे लावलेत? असा सवालही संजय राऊत यांनी केला. 370 हटवून त्यांनी उपकार केले का? आजही तिथे जवानांच्या हत्या होत आहेत. तिथला तरुण बेरोजगार आहे. नवीन उद्योग आला नाही. आजही सैन्याच्या ताकदीवर राज्य सुरू आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. 370 कलम हटवले, आता पुढे काय? असा सवालही राऊत यांनी केला.

काश्मीरचा विषय संपलाय, हिंमत असेल मणिपूरला जाऊन दाखवा, असे आव्हानी संजय राऊत यांनी मोदींना केले. गौतम अदानीला मणिपूरमध्ये सरकारची एखादी प्रॉपर्टी घ्यायला सांगा आणि तिथे उद्योग काढा. गौतम अदानीची हिंमत आहे का? असेही संजय राऊत म्हणाले.

इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी उघडपणे आणली होती. तुम्ही आणीबाणीपासून धडा घ्या, असा सल्ला राऊत यांनी भाजपला दिला. नागरिकांचे हक्क संपुष्टात आणल्यावर जनता उद्रेक करते. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत दाखवली. पराभव पत्करला, पण लोकशाहीचे रक्षण केल्याचा दावा राऊत यांनी केला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. मोदींची इंदिरा गांधींप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत आहे का? असा सवालही राऊत यांनी केला. देशात झालेल्या निवडणुकांवर लोकांचा विश्वास नाही, हीच संविधानाची हत्या आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

” कामापासून विभक्त” होण्याचा मानवी अधिकार आवश्यक !

भारतामध्ये खासगी क्षेत्रात 24/7 म्हणजे दिवसाचे 24 तास व आठवड्याचे सातही दिवस कंपनीशी बांधील असण्याची कुप्रथा आहे. जगभरातील अनेक देशात “राईट टू डिस्कनेक्ट” नावाचा म्हणजे कामापासून विभक्त होण्याचा कायदा संमत होण्यास प्रारंभ झाला आहे. भारतात त्याबाबत फार काही प्रगती झालेली नाही. सध्या तरी ते मृगजळ आहे. दुसरीकडे कामाच्या प्रचंड ताणामुळे जीव गमवावा लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यानिमित्ताने ‘राईट टू डिस्कनेक्ट’ या संकल्पनेचा केलेला उहापोह.

जगभरातील प्रगत देशांमध्ये कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून नवनवीन कायदे तयार केले जात आहेत. यामध्ये प्रत्येक कामगाराचे कामाचे दिवस किंवा दररोजचे तास हेही निश्चित करण्यात येत आहेत. काही महिन्यापूर्वीच बेल्जियममध्ये याबाबतचा एक महत्त्वपूर्ण कायदा संमत करण्यात आला. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील फक्त चार दिवस कामाचे निश्चित केलेले आहेत. त्यामुळे या कायद्यानुसार बेल्जियम मधील नागरी सेवकांना कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता कार्यालयीन वेळेनंतर त्यांचे अधिकृत कामाचे ईमेल, भ्रमण दूरध्वनी बंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की अधिकृत कार्यालयीन वेळेनंतर कोणत्याही संवादाची देवाण-घेवाण करण्याचा त्यांच्यावर कोणताही दबाव राहणार नाही. एवढेच नाही तर असे त्याने केल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची नोकरी ही जाणार नाही. या अधिकाराला “राईट टू डिस्कनेक्ट ( Right to Disconnect) म्हणजे कामापासून विभक्त होण्याचा अधिकार असे संबोधले जाते.

या कायद्याची जागतिक पातळीवर काय व्याप्ती आहे याचा विचार केला तर फ्रान्सने याबाबतचा कायदा सर्वप्रथम 2001 मध्ये संमत केला. पोर्तुगाल, स्पेन व आयर्लंड, जपान यांनी कामापासून विभक्त होण्याचा कायदा केला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियामध्येही हा कायदा संमत झाला आहे. जर्मनीमध्ये हा कायदा जरी अधिकृतरित्या अस्तित्वात आलेला नसला तरी तेथील मोठ्या कंपन्यांमधून कामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांशी संपर्क न साधण्याचे धोरण अस्तित्वात आहे. अनेक युरोपियन देशांनी तेथील कर्मचाऱ्यांना कामापासून विभक्त होण्याचा अधिकार किंवा ‘राईट टू डिस्कनेक्ट’ चा अधिकार बहाल केलेला आहे. त्यांच्या कडे प्रत्येक कर्मचाऱ्याला कामापासून विभक्त करण्याचा, कामाशी संबंधित कोणत्याही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन पासून वेगळे व दूर राहण्याचा अधिकार दिलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या अधिकृत कामाच्या कालावधी व्यतिरिक्त ईमेल आणि इतर संदेशांशी कनेक्ट रहाण्याची आवश्यकता दूर होते. त्याच्या प्रकृतीवर आणि मानसिक स्वास्थ्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून हा अधिकार महत्त्वाचा असल्याने अनेक युरोपियन देशांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे जगणे अधिक आनंदाचे करण्यासाठी हा राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे कामावरून घरी गेल्यानंतर कोणतेही कार्यालयीन फोन दूरध्वनी न घेण्याचे किंवा कोणत्याही ई-मेल ला उत्तर न देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक कर्मचाऱ्याला कायद्यानुसार देण्यात आलेले आहे.

आजच्या घडीला सरकारी नोकर असो किंवा खाजगी सेवांमधील कर्मचारी असो त्यांना 24 तास म्हणजे अहोरात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीच्याद्वारे संपर्कात राहण्याचे किंवा सतत संभाषण करण्याचे मोठे दडपण असते. एखाद्या कर्मचार्‍याने अशा प्रकारचा अशा प्रकारचे संभाषण केले नाही किंवा वरिष्ठांना काही उत्तर दिले नाही तर त्यांची त्यांच्या नोकरीवर गदा येण्याचा मोठा धोका असतो. सरकारी क्षेत्रात नोकरी जाण्याचे दडपण नसले तरी खासगी क्षेत्रामध्ये अशा कर्मचाऱ्यांची तडकाफडकी नोकरी जाऊ शकते. तीनचार वर्षांपूर्वी करोना महामारीने जगभरामध्ये नवीन कार्य संस्कृती निर्माण केली आणि ती घरी बसल्या काम म्हणजे “वर्क फ्रॉम होम” होय. या संस्कृतीमुळे तर प्रत्येकाचे निवासस्थानातील जीवन व कार्यालयातील जीवन यांच्यातील सीमारेषा केवळ पुसट झाल्या नाहीत तर त्या जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोनला उत्तरे देण्यासाठी कर्मचाऱ्यांना अहोरात्र तयार राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर सतत दबाव निर्माण होऊन
त्यांच्या केवळ प्रकृतीवरच परिणाम होत नाही तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे आढळून आले आहे. 24 तास कामाचा दबाव, दडपण राहिल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे निष्कर्ष विविध पाहण्यांमध्ये काढण्यात आलेले आहेत. बुद्धीजीवी काम करणाऱ्या पांढरपेशा कर्मचाऱ्यांवर याचे इतके प्रचंड दडपण असते की त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाल्याचे किंवा काहींनी आत्महत्या केल्याची प्रकरणे दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत.

राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही महिन्यापूर्वी संसदेमध्ये या बाबतचे एक खाजगी विधेयक मांडलेले होते. तसेच खासदार शशी थरूर यांनीही त्याबाबत संसदेत आवाज उठवण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याबाबत अजूनही फार काही महत्त्वाची प्रगती झाल्याचे दिसत नाही. कार्यालयीन वेळेनंतर कामासंदर्भातील फोन नाकारणे तसेच ई-मेल्सला उत्तरे न देण्याचा अधिकार प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्याची तरतूद या विधेयकात आहे. हा विषय संसदेच्या पटलावर येऊन त्यानिमित्ताने उद्योग क्षेत्र व समाज माध्यमात सर्वांगीण चर्चा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याकडे घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा उल्लेख वेगळ्या प्रकारे आहे.प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करताना आरोग्यदायी योग्य वातावरण निर्माण केले पाहिजे असे यामध्ये म्हटले आहे. कल्याणकारी राज्य ही संकल्पना राज्यघटनेत आहे. विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार या गाजलेल्या खटल्यामध्ये कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याचा प्रत्येकाला अधिकार असून त्यांचे लैंगिक शोषण केले तर त्यांच्या मूलभूत हक्काची पायमल्ली आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच लिंगभेद समानता, समान वेतन समान काम ही भूमिका मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मान्य केलेली आहे. शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तींनाही समाविष्ट करून घेण्याचा अधिकार आहे.प्रत्येक व्यक्तीची क्षमता लक्षात घेऊनच मालक वर्गाने त्यांना काम दिले पाहिजे हा अधिकार मान्य करण्यात आलेला आहे. एका प्रकरणात तर केवळ प्रशासकीय कामातील किरकोळ चुकांसाठी अन्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष संबंधित कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झापणे किंवा पाणउतारा करणे हे अयोग्य असल्याचे स्पष्ट केलेले आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून प्रत्येकाची कामाच्या ठिकाणी योग्य ती प्रतिष्ठा जपली पाहिजे असे विविध उच्च व सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. कामाच्या तासांवर निश्चितपणे बंधने असली पाहिजेत व वेळप्रसंगी कंपन्यांनी या तरतुदींचा भंग केला तर त्यांच्यावर काही दंडात्मक कारवाई करण्याची कायद्यामध्ये गरज आहे.

सध्याच्या धावपळीच्या दिवसांमध्ये स्पर्धेच्या नावाखाली सर्व कर्मचाऱ्यांना कनेक्टेड राहून कामाच्या स्वतःच्या वेळा सांभाळणे, स्वतःचे खासगी पण सांभाळणे आणि कुटुंबासाठी वेगळा वेळ देणे हे आवश्यक मानले जात असून त्याला योग्य महत्त्व लाभत आहे. त्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचा हा अधिकार मान्य करण्याची गरज आहे. एवढेच नाही तर अलीकडे ‘राईट टू डिस्कनेक्ट’ एक मानवी अधिकार असल्याचे मत जागतिक पातळीवर व्यक्त केले जात असून त्याबाबत चर्चा सुरू आहे.

आज भारतासह जगभरात प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यामध्ये अमुलाग्र बदल झालेले असून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना इंटरनेट किंवा मोबाईल यांनी अक्षरशः वेड लावलेले आहे. लहान मुले मोबाईल मध्ये व्यग्र झाल्याने त्यांचे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे एवढेच नव्हे तर त्यांच्या वर्तनामध्ये गंभीर बदल झालेले आहेत. आई-वडिलांचे किंवा वरीलधाऱ्यांचे न ऐकणे, उलट उत्तरे किंवा दुरुत्तरे करणे, स्वभाव चिडचिडा होणे याचा प्रादुर्भाव झालेला आहे. आज आपल्यापैकी अनेकांना मोबाईल हातात नसेल तर चैन पडत नाही. मोबाईल फोन हाती आल्यामुळे सगळे जग मुठीतआल्यासारखे वाटते. इंटरनेटचा वापर मर्यादेच्या पलीकडे वाढलेला असून मोबाईल, ईमेल किंवा अन्य समाज माध्यमांवर प्रत्येकाचा वेळ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक अधिकारी किंवा कर्मचारी यांना रात्री बे-रात्री उठून मोबाईल वरील व्हॉट्सअप तपासून पहाण्याची व निद्रानाशाला बळी गेल्याची उदाहरणे घराघरांमध्ये दिसत आहेत. कार्यालयीन वेळेनंतर किंवा सुट्टीवर असतानाही कर्मचारी मोबाईलवर उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही वरिष्ठ अधिकारी किंवा अन्य कर्मचारी यांना त्याच्याशी संपर्क साधने व कामासंदर्भात बोलणे सहज शक्य झालेले आहे. भारतात सर्वत्र मोबाईलचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून त्याबाबत पालकांना कधीही चिंता वाटत नाही व त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे. एखादा कर्मचारी कामावरून घरी आल्यानंतर जर तो त्याच्या खोलीतून किंवा घराबाहेर उभा राहून त्याच्या कार्यालयीन कामा संदर्भातच चर्चा करत राहिला म्हणजे ईमेल किंवा मोबाईल वर बोलत राहिला तर त्याच्या घरी जाण्याला काहीही अर्थ राहत नाही. त्याचे संपूर्ण जीवन कार्यालयीन कामासाठीच व्यापलेले दिसते. प्रत्येक व्यक्तीला त्याचे आयुष्य सुखा समाधानाने व्यतीत करण्याचा अधिकार असून आयुष्याचा दर्जा उंचावणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.एखादी व्यक्ती 24 तास कामाच्या विचारात घडून गेलेली असली किंवा त्याचा स्वतःसाठीचा किंवा कुटुंबीयांसाठीचा वेळ कमी होऊ लागला की ताण-तणाव निर्माण होतात व त्याचे प्रतिकूल परिणाम त्या कर्मचाऱ्यांच्या जगण्यावर होतात. पर्यायाने कार्यालयीन कामकाजावरही प्रतिकूल परिणाम होतो. कामातील लक्ष कमी होणे, कामाचा दर्जा घसरणे या गोष्टी निश्चितपणे अनुभवास येतात.

भारतामध्ये अनेक खासगी,शासकीय कार्यालयांमध्ये कामाच्या तासांवर कोणतेही बंधन नसते असे आढळले आहे. त्यांना कामापासून विभक्त होण्याचा अजून अधिकार देण्यात आलेला नाही. हॉर्वर्ड बिझीनेस रिव्ह्यू यांनी केलेल्या एका पाहणीत कामाच्या अतिरेकामुळे कर्मचारी प्रचंड तणावाखाली राहुन त्यांना हृदयविकार, रक्तदाब वाढण्याचे विकार जडतात असे आढळले आहे. जास्त काम म्हणजे जास्त कार्यक्षमता, उत्पादकता या कल्पना चुकीच्या आहेत असेही लक्षात आलेले आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचारी आनंदी असेल तरच उत्पादकतेमध्ये चांगली वाढ होते असेही आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये कामापासून विभक्त होण्याचा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार हा लवकरात लवकर मान्य करून एकूणच देशाची कार्यक्षमता वाढवणे काळाची गरज आहे. यामध्ये केवळ कर्मचाऱ्यांचेच नाही तर उद्योजक, मालक वर्ग यांचेही भले होईल यात शंका नाही.

(लेखकप्रा नंदकुमार काकिर्डे :लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

पुण्यातून चंद्रकांतदादा पाटील पुन्हा मंत्री पदी

पुणे: पुण्यातून पुन्हा कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून आजच त्यांचा शपथविधी होणार आहे.त्यांना कोणते खाते देण्यात येणार आणि पुण्याचे पालक मंत्री पद त्यांच्याकडे ठेवणार काय ? याबाबतच आता उत्सुकता राहिली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांचा परिचय..

वैयक्तिक

जन्म १० जून १९५९; प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई,
आई-वडील दोघेही मिल कामगार,
राजा शिवाजी वि‌द्यालय, दादर, मुंबई येथे शालेय शिक्षण
सिद्धार्थ महावि‌द्यालय, फोर्ट, मुंबई येथे बी. कॉम. पदवी शिक्षण.
पत्नी सौ. अंजली चंद्रकांत पाटील, बी. कॉम., आयसीडब्ल्यूए (कॉस्ट ऑडिटर)

  • एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रो‌द्योग आणि संसदीय कार्य मंत्री पदाची जबाबदारी

-ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पुणे जिल्हा पालकमंत्री; ४ ऑक्टोबर २०२३ पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

१) मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय.
२) नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी.

वस्त्रोद्योग मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

राज्यात वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यासाठी योगदान.

राज्याचे कॅबिनेट मंत्री

२०१४ ते २०१९ महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन आणि वस्त्रो‌द्योग, मदत आणि पुनर्वसन, कृषी व फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी.

विधिमंडळ कार्य

जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०१९ विधान परिषद सभागृह नेता म्हणून जबाबदारी. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवड, २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. २०१९ आणि २०२४ साली कोथरूड, पुणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड. ऑगस्ट २०२२ पासून संसदीय कार्य मंत्री म्हणून प्रभावी कार्य.

भारतीय जनता पार्टी, प्रदेशाध्यक्ष दि. १६ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत

  • प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत १६१ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले.  प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात प्रभावी कार्य

संघ परिवार

अखिल भारतीय वि‌द्यार्थी परिषदेचे समर्पित कार्यकर्ता. महाराष्ट्र संघटन महामंत्री आणि राष्ट्रीय महासचिव पदांवर काम केले. १९८० ते १९९४ ऐन तारुण्यात संघटनेसाठी पूर्णवेळ संपूर्ण समर्पणाने काम. त्यानंतर १९९५- १९९९ या कालावधीत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून तर सन १९९९-२००४ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात योगदान.

सामाजिक बांधलकी

कोथरूड मध्ये समुत्कर्ष सोशल फाउंडेशन, मानसी उपक्रम यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळ. ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नववधूंना झाल, सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल मुलींचे पालकत्व, मोफत ई सेवा केंद्र, कोवीड काळातील सेवा कार्य, दिवाळी फराळ, एकांकिका स्पर्धा, गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून कोथरुड मधील प्रत्येक घटकाशी संपर्क स्थापन करण्यात यश.

गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांचा उलगडला काव्य प्रवास

संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणेतर्फे ‌‘मन का गीत‌’ कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे : ‌‘सम्बन्ध आएँ, आ-आ के बह जाएँ, छोड जाएँ आँखों में एकाध आँसू‌’, ‌‘मेरे आसपास खिची एक..‌’, ‌‘मनुष्य की टोली हो या मेला‌’, ‌‘जगत्‌‍ जननी‌’, ‌‘उत्सव‌’, ‌‘कारगिल‌’, ‌‘जिंदा दिल‌’, ‌‘भावमुद्रा बोले बसंत‌’, ‌‘अचानक‌’, ‌‘विस्मयकी सुबह‌’, ‌‘एकाध आँसू‌’ अशा विविध काव्यरचनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कविमनाची ओळख आज पुणेकर रसिकांना झाली.
निमित्त होते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‌‘आँख ये धन्य है‌’ आणि ‌‘साक्षी भाव‌’ या पुस्तकांमधील कवितांवर ‌‘मन का गीत‌’ या विशेष कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 14) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर झालेला कार्यक्रम पुणेकरांना विशेष भावला.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ, सुनील महाजन, निकिता मोघे, योगेश सोमण, डॉ. सलील कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, हरिदास चरवड, आदित्य माळवे, प्रकाशक सु. वा. जोशी मंचावर होते.
या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‌‘नयन हे धन्य हे‌’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी बोलताना मोनिका मोहोळ म्हणाल्या, पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा शुभारंभाचा कार्यक्रम असून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांची साहित्यिक, कवी म्हणून एक वेगळीच ओळख रसिकांसमोर येणार आहे.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
‌‘मन का गीत‌’ या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची होती तर संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे होते. दिग्दर्शनाची बाजू प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्यविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.
मोदीजी यांच्या शब्दांना संगीतबद्ध करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो. मोदीजींच्या कविता ध्यासातून, देशात केलेल्या भ्रमंतीतून प्रकट झालेल्या आहेत, हे प्रकर्षाने जाणवते, अशा भावना डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

संवेदनशील असल्याने मोदींजींकडून काव्यनिर्मिती : प्रकाश जावडेकर
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे अद्भुत किस्से या वेळी सांगितले. मोदीजी हे अत्यंत संवेदनशील व्यक्ती असल्याने त्यांच्याकडून काव्यनिर्मिती झाली आहे. ते संन्यस्त कर्मयोगी आहेत. समोरील व्यक्तीचे म्हणणे प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे. पंतप्रधान म्हणूनच नव्हे तर एक संवेदनशील कवी म्हणून मी त्यांना जवळून पाहिलेले आहे. देश प्रथम हे मोदीजींच्या कामाचे तत्त्व आहे.