Home Blog Page 538

शालेय बसचे ऑडिट होणे गरजेचे -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसचे ऑडिट त्वरीत व्हावे आणि शालेय कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज नागपूर येथे विधानसभेत बोलताना केली.

औचित्याचा मुद्दा उपस्थित करून आमदार शिरोळे यांनी पुण्यातील शालेय बसचा विषय सरकारसमोर मांडला. विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या बसला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना पाहता शालेय बस आणि व्हॅनच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे, असे शिरोळे यांनी बोलताना सांगितले.

पुण्यात ८ हजारहून अधिक शालेय बस आणि व्हॅन आहेत. या सर्व बसगाड्यांचे आणि व्हॅन्स चे ऑडिट होणे गरजेचे आहे, असे आ.शिरोळे यांनी सांगितले.

शालेय बस गाडीला आग लागल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या? याचे प्रशिक्षण पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दिले जावे. तसेच बस गाडीमध्ये आग विझवणारी यंत्रणा किती असावी? कुठे बसवली जावी? त्याचा वापर कसा केला जावा? विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे? याचे प्रशिक्षण शालेय कर्मचाऱ्यांना देण्यात यावे याकरिता सरकारने महापालिकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी शिरोळे यांनी केली.

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून, जनतेच्या भावनांशी सरकारला देणेघेणे नाही: नाना पटोले

ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक.

‘वन नेशन, नो इलेक्शन’ हे विधेयक लोकशाही व्यवस्था संपवण्यासाठी.

नागपूर, दि. १७ डिसेंबर २०२४
ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणी सरकारविरोधात विधान भवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खुन्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

सभागृहाचे कामकाज सुरु होताच नाना पटोले यांनी परभणीतील पोलीस अत्याचाराचा व दलित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी परभणीत जे कोंबिग ऑपरेशन केले ते शासन निर्मित होते का, यासह या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे त्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. या विषयावर बुधवारी चर्चा करु असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम विधानसभेला वापरल्या नाहीत, त्यासाठी गुजरातमधून ईव्हीएम मागवण्यात आल्या. ईव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. ईव्हीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत भाजपाचे लोक संचालक मंडळावर आहेत. निवडणूक आयोगाला असलेले संवैधानिक अधिकाराचा वापरही ते करू शकत नाहीत सर्व कारभार भाजपाच्या इशाऱ्यावर सुरु आहे यातून भाजपाची मानसिकता स्पष्ट होते. लोकशाही व्यवस्था संपवण्याची आरएसएसची जी मानसिकता आहे त्यासाठीच वन नेशन नो इलेक्शन विधेयक आणले जात आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

या गुरुवारी KBC 16 मध्ये: 1 करोडचा प्रश्न

अमिताभ बच्चन यांचा ‘कभी कभी’ पोशाखाचा किस्सा आणि प्रशांत त्रिपाठी साठी 1 करोडचा प्रश्न

(Sharad Lonkar)
या बुधवारी आणि गुरुवारी कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समक्ष लखनौहून आलेले प्रशांत त्रिपाठी असतील, जे महसूल विभागात लँड रेकॉर्डर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. त्यांचे वाक्चातुर्य आणि स्थिर बुद्धी यामुळे हा भाग रोमांचक असणार आहे. याच भागात श्री. त्रिपाठी 1 करोड रु. च्या प्रश्नाला तोंड देतील!
श्री. त्रिपाठी यांच्याशी गप्पा मारताना बिग बींना त्यांच्या दीवार आणि कभी कभी या त्यांच्या आवडत्या चित्रपटांची आठवण झाली. ते म्हणाले, “’दीवार’मधील एका अॅक्शन दृश्याचे शूटिंग उरकून श्री. बच्चन यांना ‘कभी कभी’चित्रपटातील एका रोमॅंटिक दृश्याच्या शूटिंगसाठी काश्मीरला जायचे होते. ते फार विचित्र वाटायचे, अचानक गियर बदलल्यासारखे! मी यश चोप्रा जींना म्हटले की ‘हे फार विचित्र वाटते. अॅक्शनवरून एकदम रोमान्स!’ त्यावर ते म्हणाले, ‘नाही नाही, सारे काही ठीक होईल.’ म्हणून मी सहज विचारले, ‘माझा पोशाख कसा असेल?’ मला अगदी 2 दिवसात निघायचे होते, त्यामुळे त्यांनी सांगितले, ‘तुझ्या घरी असेल, त्यापैकी काहीही चालेल’. त्यामुळे चित्रपटात जे काही कपडे तुम्हाला दिसतात, ते माझे स्वतःचेच आहेत.” पुढे बिग बीं मिश्किल सुरात म्हणाले, “आणि अजून ते कपडे मला परत केलेले नाहीत.”
गुरुवारी, प्रशांत त्रिपाठी यांच्यासमोर एक रोमांचक आव्हान असणार आहे – ते 15 व्या प्रश्नावर पोहोचणार आहेत. म्हणजे 1 करोडच्या प्रश्नाचा सामना करताना दिसणार आहेत. त्यामुळे बघत रहा, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन रात्री 9 वाजता आणि जाणून घ्या की ते या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार का, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये!

लिला पुनावाला फाउंडेशनचे २९ वर्षे: शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचा सशक्तीकरण प्रवास साजरा

पुणे : लिला पुनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) आपल्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त ६ शहरांतील १,५०० हून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित पण गुणवान मुलींना गुणवत्ता सह गरजू आधारित शिष्यवृत्त्या प्रदान केल्या. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर तसेच तेलंगणातील हैदराबाद आणि कर्नाटकमधील बेंगळुरू यांचा समावेश आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात, एलपीएफने अभियांत्रिकी, नर्सिंग आणि विज्ञान क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १,२०० हून अधिक मुलींना त्यांच्या संपूर्ण शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या. याशिवाय, ‘टूमॉरो टुगेदर’ या शालेय प्रकल्पाअंतर्गत पुणे विभागातील ७वी पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जवळपास ३०० मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आल्या.
या शिष्यवृत्ती प्रदान समारंभाचे आयोजन १३ वेगवेगळ्या कार्यक्रमांत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये एलपीएफच्या अध्यक्षा श्रीमती लिला पुनावाला – अध्यक्ष , श्री. फिरोज पुनावाला – संस्थापक विश्वस्त, कॉर्पोरेट भागीदार, दाते आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या.

संस्थेच्या स्थापनेपासून आजवर एलपीएफने १७,३०० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती प्रदान केल्या असून त्यामुळे सशक्त महिलांचे एक विस्तारित समुदाय निर्माण झाले आहे. पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे उपस्थित असलेल्या या संस्थेने शिक्षण आणि सशक्तीकरणाचा प्रवास सुरू ठेवला आहे.
एलपीएफ पुढील वर्षी आपला ३०वा वर्धापन दिन साजरा करणार असून या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त संस्थेने २०,००० मुलींना सशक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून तरुण आयुष्ये बदलण्याच्या आपल्या ध्येयाशी एलपीएफ दृढपणे बांधिल आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट; दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा

नागपूर-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आज नागपूर येथे पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. वास्तविक परंपरेप्रमाणेच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा देखील झाली. मात्र या चर्चेमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाचा कोणताही मुद्दा चर्चेत आला नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली. या भेटीत देखील विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूंत्रानी दिली आहे. राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन वर्षानंतर ही भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.

उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनीत बालन यांच्यासह मान्यवरांकडून फ्लॅग ऑफ

बारामती : बारामतीची प्रसन्न गुलाबी थंडीने सजलेली पहाट, हिरवाई नटलेले सुंदर रस्ते , एसआरपीएफ च्या शिस्तबद्ध बँड पथकाने रनर्सचे फिनिश पॉईंटवर केलेले अविस्मरणीय स्वागत आणि बारामतीचा विकास पॅटर्न न्याहाळत रनर्सने विक्रमी वेळेत साधलेली दौड यांमुळे पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, युवा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन, जान्हवी पुनीत बालन-धारिवाल, युवा नेते पार्थ पवार, अभिनेता जॅकी भगनानी यांनी पहाटे चार वाजता झेंडा दाखवून या मेरोथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला. वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनची मान्यतेने आणि तालुका स्तरावर आंतरराष्ट्रीय मानकांच्या दृष्टीने संपन्न होणारी बारामती पॉवर मॅरेथॉन ही कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅरॅथॉनसाठी पात्रता निकष गणली जाते. त्यामुळे देशभरातून अनेक ख्यातनाम रनर्स या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत असतात. सलग दुसऱ्या वर्षी पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्कृष्ट नियोजन , ट्रॅक वर असणारी हायड्रेशनची आणि एनर्जी पॉईंटची उत्तम व्यवस्था , मैदानावर जागोजागी उभारलेले सेल्फी पॉईंट आणि फोटोसेशन बूथ , चिंकाराच्या ब्रँडिंगने साधलेले वातावरण यांमुळे प्रोफेशनल रनर्ससोबतच यंदा बारामती आणि परिसरातील आरोग्यस्पर्धकांची संख्या वाढलेली बघायला मिळाली. एकूण २८०० हुन अधिक रनर्स मॅरेथॉन मध्ये विविध रनिंग कॅटेगरीसाठी सहभागी झाले होते. बारामती रेल्वे स्टेशन ग्राउंड येथे विविध पाच गटांमध्ये ही मॅरेथॉन पार पडली. खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी त्यांनी मॅरेथॉन आणि त्याचे आयोजन करणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे. बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्यांनी हे आव्हान लीलया पेलले असल्याचे सांगितले. तर बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष सतिश ननवरे म्हणाले , “पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱ्या पर्वाला रनर्सने दिलेला प्रतिसाद आम्हा सर्व आयोजकांचा उत्साह वाढविणारा आहे. मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी ज्यांचे पाठबळ लाभलेल्या युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह सर्वच प्रमुख प्रायोजकांचे आभार व्यक्त केले.

अजित पवारांकडून पुनीत बालन यांचे कौतुक स्पर्धकांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , “बारामतीची प्रगती चहुबाजूंनी होत असताना, त्याला क्रीडा क्षेत्र देखील अपवाद नाही. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धा महत्वाच्या ठरतात आणि या प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनात पुनीत बालन आणि त्यांच्या सौभाग्यवती जान्हवी या नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी रित्या सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. सतिश ननवरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेऊन ही मॅरेथॉन यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून विविध खेळाना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करत आहोत. बारामती पॉवर मॅरोथॉन स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि निटनेटके असे होते. या स्पर्धेत हजारो नागरिक-तरुण भल्या पहाटे उपस्थित राहून सहभागी झाले. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

मॅरोथॉन स्पर्धेतील विजेते
ही मॅरोथॉन तीन गटात झाली. ४५ किमी, २१ किमी, १० किमी, या रनिंग कॅटेगरी मधील , प्रथम तीन विजेते आणि मॅरेथॉन मध्ये सहभागी टॉप ५ क्लब्स आणि स्कुल रन मध्ये जास्तीत जास्त संख्येने स्पर्धक देणाऱ्या टॉप ०३ स्कुलला सुद्धा रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये ४२ किमी पुरुष (प्रथम -लते चांदेव , द्वितीय – गायकवाड दयाराम , तृतीय – पंकज सिंग ) ४२ किमी स्त्री (प्रथम -मनीषा जोशी , द्वितीय – उर्मिला बने , तृतीय – सिंधू उमेश) २१ किमी पुरुष (प्रथम -धोंडिबा गिरदवा , द्वितीय – आबासाहेब राऊत , तृतीय -डॉ.मयूर फरांदे ) २१ किमी स्त्री (प्रथम -शीतल तांबे , द्वितीय – शिवानी चौरसिया , तृतीय – स्मिता शिंदे ) १० किमी पुरुष (प्रथम -अमूल अमुने , द्वितीय -सुजल सावंत , तृतीय – आर्यन पवार ) १० किमी स्त्री (प्रथम -आरती बाबर , द्वितीय – सोनाली मटने , तृतीय -रोशनी निषाद )

‘पीडी’ ग्राहकांच्या वीजबिल थकबाकीमुक्ती ‘अभय’ योजनेला उरले आता १४ दिवस

पुणे विभागात आतापर्यंत २३ हजार ७७९ वीजग्राहक सहभागी

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२४: वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित (पर्मनंट डिस्कनेक्टेड) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ १४ दिवस उरले असून आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागातील २३ हजार ७७९ लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकीत वीजबिलांमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरु केली आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित लघु व उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. महावितरण अभय योजनेची मुदत येत्या दि. ३१ डिसेंबरला संपणार आहे. 

अभय योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभागात आतापर्यंत सहभागी २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात ८६२६ ग्राहकांनी १८ कोटी ७६ लाख, सातारा जिल्ह्यात ९९४ ग्राहकांनी १ कोटी ५१ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३३२८ ग्राहकांनी २ कोटी ८८ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ४०४३ ग्राहकांनी ४ कोटी ७४ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ३५५५ ग्राहकांनी २ कोटी ३१ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, पण त्या जागेवर वीजबिलांची थकबाकी राहणार असल्यामुळे या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी आहे. त्यामुळेच सध्या विजेची गरज नसतानाही ११ हजार ६५७ ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे तर ७९२० ग्राहकांनी पुनर्विजजोडणी आणि ४२०२ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या इतरही ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळांने चालविलेला बेकायदा कारभार थांबवा -सहधर्मादाय आयुक्तांकडे मागणी

पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळांने चालविलेला बेकायदा कारभार तातडीने थांबवा आणि निवडणुका घ्या अशी मागणी पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीने आज सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्याकडे केली आहे.

पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीचे धनंजय कुलकर्णी आणि शशांक महाजन यांनी यासंदर्भात सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांना दिलेले पत्र जसेच्या तसे वाचा ….

रजनी क्षीरसागर-सह धर्मादाय आयुक्त

विषय : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळांने घेतलेली घटनाबाह्य मुदतवाढ आणि मुळ घटना दुरूस्तीचा होऊ घातलेला बेकायदेशीर प्रकार.
सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था महाराष्ट्रातील एक अत्यंत नावाजलेली ऐतिहासिक परंपरा असलेली आणि समाजातील मान्यवर बंदनीय अशा लोकांमुळे सर्व समाजात प्रसिद्धीस आलेली आहे. या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार सध्याचे कार्यकारी मंडळ मुळ घटनेच्या विरोधात जाऊन बेकायदेशीर पद्धतीने करत आहेत. हे बेकायदेशीर पद्धतीने चालू असलेले कामकाज त्वरेने रोखण्याची गरज आहे, ते रोखले जावे या अपेक्षेने हे निवेदन आम्ही आपणांस देत आहोत.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था १०० वर्षाहून अधिक काळ साहित्य क्षेत्रात कार्य करणारी समाजमान्य संस्था आहे. या संस्थेत लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे यांच्यासह मराठीतील अनेक मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी आपले योगदान दिले आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेचा कारभार मूळ घटनेच्या विरोधात जाऊन लोकशाही विरोधी पद्धतीने चालू आहे. सदर संस्थेचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात महत्वाचा सहभाग असतो. त्यामुळे हा कारभार घटनेनुसारच व्हावा असे आम्हांस वाटते. थोडक्यात मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे :-
१) महाराष्ट्र साहित्य परिषदेची विद्यमान कार्यकारणी २०१६ साली संस्थेच्या घटनेनुसार ५ वर्षाच्या कालावधीसाठी निवडून आली. हा अधिकृत कालावधी २०२१ सालीच संपला. २०२०-२१ या कालावधीत देशात करोना साथीचे संकट होते. त्या बातावरणात संस्थेच्या निवडणूका घेणे शक्य नव्हते. हे कारण पुढे करून आत्ताच्या कार्यकारीणीने बेकायदेशीररित्या आपला स्वतःचा कार्यकाल सुरूवातीला ३ वर्षासाठी बाढवून घेत आहोत असे सांगून ५ वर्षासाठी तो बाढवून घेतला. हा प्रकार मुळ घटनेच्या निवड तरतुदीच्या विरोधातच आहे.
२) करोनाचा प्रादुर्भाव २०२२ मध्येच संपला. २०२२ नंतर देशात विविध राज्यात लोकसभा, विधानसभा यांच्या सार्वत्रिक निवडणूका जनसहभागाने पार पडल्या. पण महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक मात्र झाली नाही. हा विरोधाभास संस्थेच्या लौकिकास अप्रतिष्ठित करणारा आहे.
३) या संदर्भात संस्थेचे एक सभासद श्री. विजय शेंडगे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नियमित तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची सुनावणी तेथील न्यायपद्धतीप्रमाणे सुरू आहे. त्याचा निकाल केव्हा लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. उलटपक्षी श्री. विजय शेंडगे यांचे सभासदत्व कोणत्याही प्रकारे रद्द कसे करता येईल याचे विविध मार्ग संस्थेच्या कार्यकारी मंडळाने अवलंबवण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांच्याबर बदनामीचा स्वटला टाकण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. एकदा विजय शेंडगे यांचे सभासदत्व रद्द केले की धर्मादाय आयुक्तांकडची याचिका रह होईल असा प्रयत्न सध्याचे कार्यकारी मंडळ करत आहेत.
४) ही बेकायदेशीर कार्यकारणी मुळ घटनेतच आता बदल करून कायम स्वरूपी ही संस्था आपल्या ताब्यात राहील यासाठी प्रयत्नशील आहे. त्या संदर्भात घटना दुरूस्तीसाठी एक सर्व साधारण सभाही अत्यंत अयोग्य आणि बेकायदेशिररित्या बोलवण्यात आली आहे. साधारणपणे २०,००० आजीव सभासद असणाऱ्या या संस्थेच्या या बैठकीचे स्थान फक्त १०० आसन क्षमता असणाऱ्या सभागृहात केली आहे. सर्व सभासदांना या सभेची सूचना मिळालेली नाही. त्यामुळे ही सभाही बेकायदेशीर ठरते.
५) आपण आपल्या अधिकारात बरील दोन गोष्टींबर तातडीने योग्य ती उपाय योजना करावी. आपल्या अधिकारात ही सभा तातडीने स्थगीत करावी आणि संस्थेच्या निवडणूका लवकरात लवकर होतील या साठी संस्थेस योग्य ते आदेश द्यावेत ही आपणांस नम्र विनंती.

नव भारतासाठी स्त्रीयांना सक्षम करावे -पद्मविभूषण डॉ. माशेलकर

‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा शुभारंभ
‘हिरकणी’ योजनेत तीन मुलींचे स्वीकारलं पालकत्व

पुणे, १६ डिसेंबरः “नव भारत एका पायावर धावू शकत नाही, तर तो दोन पायावरच चालवायला लागेल. त्यासाठी स्त्रीयांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रीयां व मुलींना केवळ शिक्षण नाही तर भरपूर शिक्षण द्या पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे.” असा सल्ला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या संस्थेच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम सीओईपी च्या किर्लोस्कर सभागृहात संपन्न झाला.
यावेळी द एम्पॉवर हर फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष संदीप नुलकर, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपूण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे-आगाशे उपस्थित होते.
संस्थेच्या हिरकणी योजने अंतर्गत या वर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पियुषा पांडव या तीन मुलींना कायम स्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार असून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होई पर्यंत त्यांच्या सर्वांगीण विकासावर काम केले जाणार आहे. या मुलींना डॉ.माशेलकर यांच्या हस्ते स्वीकृती देण्यात आली.
बासमती तांदूळ व हळद पेटंट करू पहाणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या विरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्यासाठी याप्रसंगी डॉ. माशेलकर यांना बासमती तांदूळ आणि हळदीची प्रतीकात्मक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. माशेलकर म्हणाले, “वस्तूस्थिती पाहता भारताच्या वर्कफोर्स मध्ये केवळ २४ टक्केच महिला आहेत. ही टक्केवारी चीनमध्ये ६० टक्के, व्हिएतनामा ७० टक्के आणि बांग्लादेश ही आपल्यापेक्षा अधिक पुढे आहे. चीनने कित्येक वर्षापुर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणार्‍या नोकर्‍या महिलांना दिल्या आहेत. आपल्या देशात बेटी बचाव बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, सेविंग स्कीम, कन्या श्री प्रकल्प व शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे. देशात आजही अंधश्रध्दा दिसून येते. चंद्रावर मंगळ यान पोहोचले परंतु देशात अजून मंगळ असल्या कारणेने मुलींची लग्न ठरत नाहीत. ही विचारणीय बाब आहे.”
“सृष्टीवरील सर्वात मोठे सूत्र एज्यूकेशन इक्वल टू फ्यूचर हे आहे. आज भविष्याचा वेध घेतांना पुण्यात असे कार्य सुरू होणे हे महत्वाचे आहे. या कार्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि अनुभवा बरोबरच पैसा आणि वेळ ही महत्वाची आहे. ज्या प्रकारे सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांनी क्रांती आणली, त्याचप्रमाणे हिरकणी योजना ही मोठी चळवळ म्हणून पुढे येईल. ”
संदीप नुलकर म्हणाले, “महिलांची व्यथा जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. वंचित मुलींना दर्जात्मक शिक्षणाबरोबरच योग्य रोजगार मिळावा आणि त्यांचे व कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. यातील हिरकणी योजने अंतर्गत मुलींना कायम स्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संहिता चांदोरकर यांनी केले.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औचित्याने ‘सरहद’कडून “गौरव महाराष्ट्राचा

पुणे-सरहद आयोजित दिल्ली येथे भरवल्या जाणाऱ्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद संस्थेकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरहद स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कात्रज येथे “गौरव महाराष्ट्राचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र येथे तज्ञ म्हणून कार्यभार पाहत असणारे डॉ. सुरेश ‌इसावे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. डॉ.सुरेश इसावे हे टिळक कॉलेजमध्ये कार्यरत असून वेगवेगळ्या संस्थांचे सभासद ही आहेत .सरांना २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच डॉ. इसावे यांना अभ्यासाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे त्यामुळे त्यांनी ट्रेकिंग ग्रुप सुरू करून शंभर पेक्षा जास्त किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली. असे पाहुणे कार्यक्रमाला लाभणे ही आनंदाची गोष्ट आहे.
“गौरव महाराष्ट्राचा “या कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीत ‌‌’जय जय महाराष्ट्र माझा’ने झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रंगांची जणू उधळणच झाली. त्यामध्ये वेगवेगळे लोकनृत्य ,गणेश वंदना ,लावणी, कोळीनृत्य, सवाल- जवाब, गोंधळ, धनगर नृत्य ,शेतकरी नृत्य, तसेच रामायण ,मराठी शोले, हास्यरस, नारीशक्ती अशा अनेक कार्यक्रमाने महाराष्ट्राचे वेगळेपण दिसून आले. महाराष्ट्राच्या कोसा कोसावर बदलणाऱ्या मराठी भाषेचे, संस्कृतीचे व अस्मितेचे प्रदर्शनच जणू मांडले होते. यामधून विविधतेतून एकता याचे जणू दर्शन झाले. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध आणि आकर्षक कार्यक्रमाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमासाठी सरहद संस्थेचे विश्वस्त श्री. शैलेश वाडेकर ,श्री.अनुज नहार , संस्थेतील विविध विभाग प्रमुख कविता वानखेडे, मनीषा वाडेकर , सुजाता गोळे, रुबीना देशमुख , तसेच सर्व विभागाचे पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ .सोनाली सहाने यांनी केले.

पुणे जिल्हा लोकअदालतमध्ये राज्यात पुन्हा अव्वल

366 कोटी तडजोड रक्कम जमा87 हजार 486 प्रकरणे निकाली
पुणे, 16 डिसेंबर:-
शनिवारी (14 डिसेंबर) रोजी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील ४थ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकअदालतमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकारणांपैकी सुमारे 87 हजार 486 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 366 कोटीहून तडजोड रक्कम जमा करण्यात आली.
विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांचे हस्ते लोकअदालतचे उद्धघाटन पार पडले.
याप्रसंगी न्यायालयातील अशोक हॉल येथे विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.के. महाजन म्हणाले की, लोकअदालत सर्वांसाठी जलद न्याय, सुलभता आणि न्याय विवाद निराकरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. लोकअदालतला आपल्या न्याय व्यवस्थेत नेहमीच एक अनन्यसाधारण आणि विशेष स्थान आहे. यामुळे विवादांचे जलद निराकरण करण्यासाठी आणि आपल्या न्यायालयांवरील ओझे कमी करण्यासाठी एक प्रगल्भ आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
लोकअदालतमध्ये एकूण 366 कोटीची 27 लाखाची तडजोड करण्यात आली. यावेळी 1 लाख 87 हजार 63 प्रकारणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 87 हजार 486 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे तडजोडीची प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश
लोकअदालतमध्ये दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश प्राप्त झाले असून एकूण 52 कोटी 3 लाख 27 हजार रक्कमेची तडजोड झाली आहे. यामध्ये दाखल पूर्व (प्रि-लिटिगेशन) 1 लाख 45 हजार 179 प्रकरणे तडजोडीची दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 51 हजार 328 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. याशिवाय एकूण दाखल दाव्यात (पोस्ट लिटिगेशन) 314 कोटी 24 लाख 58 हजार 502 तडजोड रक्कम प्राप्त झाली. यामध्ये एकूण 41 हजार 884 प्रकरणे तडजोसाठी हाती घेण्यात आली होती तर त्यापैकी 36 हजार 158 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत.
विधी सेवा प्राधिकरणाच्या व्हिजन अंतर्गत आयोजित राष्ट्रीय लोकअदालत हे सर्वांसाठी न्याय, कार्यक्षमता आणि निष्पक्षतेचे प्रतिक म्हणून कार्य करीत असताना उत्कृष्ट कामगिरी भविष्यासाठी भारतीय न्यादानातील आशेचा किरण आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरीका पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन न्यायाधीश डी जे पाटील यांनी केले.

सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू :सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करा.

माजी मंत्री रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तरुणाला किडनॅप करून अत्याचार.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्ष आक्रमक, ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी.

नागपूर, दि. १६ डिसेंबर २०२४
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत परभणी व बीडच्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष ज्या दिवशी चर्चा करण्यास सांगतील त्या दिवशी चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यानंतर विधीमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप केल्याची माहिती पोलिसांना होती पण देशमुख यांची अत्यंत निघृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर पोलीस सक्रीय झाले. भाजपा सरकार आल्यानंतर दलित व बहुजन समाजावर अत्याचार केले जात आहेत का? ईव्हीएम सरकारने राज्यात राजकीय हत्यासत्र सुरु केले आहे का? असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांना कोठडीत असताना पोलिसांनी प्रचंड हालहाल करून मारण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले असून ही सरकार प्रायोजीत हत्या आहे. याप्रकरणी सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

परभणीच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी पवार नावाच्या इसमाला पोलिसांनी अटक केली असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले जाते परंतु तो व्यक्ती बांग्ला देशातील हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाला होता. सरपंच संतोष देशमुख सुद्दा हिंदूच आहे, त्यांचे हातपाय कापले, मृत्यूनंतर त्यांच्या शरिरावर आरोपी नाचले, त्यांना काय म्हणणार. बांग्ला देशातील हिंदू सुरक्षित नाहीत म्हणता मग भारतातील हिंदुंच्या संरक्षणाचे काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परभणी व बीडचे प्रकरण मारकडवडीच्या ईव्हीएम विरोधातील मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका येते असेही नाना पटोले म्हणाले.

माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या मुलाला किडनॅप करून ठेवले आहे. ९ कोटी रुपयांसाठी त्याला किडनॅप केले असून त्याच्याकडून ४.५ कोटी रुपये वसून केले आहेत, बाकीच्या ४.५ कोटी रुपयाच्या वसुलीसाठी त्याच्यावर अत्याचार केले जात आहेत. ही कसली वसुली आहे ? एवढे पैसे चव्हाणांकडे आले कुठून, असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे.

विधानसभेच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. ईव्हीएम हटाव व परभणी तसेच बीडच्या मुदद्यांवर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

लाडकी बहिण- डिसेंबरचा हप्ता कधी, याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत :छाननीनंतर आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द

लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशना-, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

नागपूर – २१०० रूपये वाढीव हप्ता देण्याचा निर्णय मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल. हा निर्णय आता रँडमली एकदम करू शकत नाही. डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत ठरेल अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

ऑक्टोबर आणि नाेव्हेंबरचे दोन हप्ते ९ ऑक्टोबरला दिले. त्या नंतर आचारसंहीता लागल्यामुळे हप्ते जमा झाले नाही. या शिवाय आधार जोडणी विभाग स्तरावर सुरू होती. सप्टेंबरमध्ये शेवटी शेवटी नव्याने अर्ज करणाऱ्यांच्या अर्जाची छाननी अजून सुरू आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात २० लाख लाभार्थी असल्याचे तटकरे यांनी सांगितले. गेल्यावेळी जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकावेळी जमा केले होते. नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकावेळी जमा केले. आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा करायचा याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल असे त्या म्हणाल्या.

अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतरचा आकडा २ कोटी ३४ लाख होता. तो आता २ कोटी ४७ लाखांपर्यत गेला. या बाबतीत जे काही कमी जास्त ३४ ते ४७ लाखाच्या फारकत होईल असे त्या म्हणाल्या. मूळ टारगेटही साधारणत अडीच कोटींचे होते. यापुढचे कोणतेही निर्णय मंत्रिमंडळात होतील. नोंदणी करताना सगळ्यांची नोंदणी झाली. अनेक महिलांनी आधार जोडणी नसतांनाही लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे नोंदणीत लाभार्थी पात्र ठरली आहे. मात्र छाननीनंतर आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द होईल असे त्या म्हणाल्या.

दत्त जयंती सप्ताहसोहळ्यात वडगावशेरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांचा सत्कार

पुणे: श्री स्वामी सेवा (दिंडोरी प्रणीत) केंद्र व श्री हनुमान धर्मदाय ट्रस्ट, विश्रांतवाडी यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त वडगावशेरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा. बापूसाहेब पठारे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी स्वामी समर्थांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दत्त जयंती सप्ताहसोहळा ९ ते १६ डिसेंबर यादरम्यान साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये धार्मिक उपक्रमांसोबत समाजसेवेवरही विशेष भर देण्यात आले. समारोप सोहळ्यादरम्यान सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे यांनी महिलांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले. सत्कार स्वीकारताना आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, “स्वामी सेवा केंद्र व श्री हनुमान धर्मदाय ट्रस्ट यांनी महिलांना अधिकाधिक सहभागासाठी प्रोत्साहित केले आहे, जे की अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांचा सहभाग समाजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. याबरोबरच संपूर्ण सोहळ्याची एक खास बाब अशी की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के अध्यात्माचा समतोल साधला गेला जे बघून मी भारावून गेलो.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या सेवासप्ताहात संस्कृत आणि प्राकृत भाषांच्या माध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा उत्कृष्ट मेळ साधला आहे, ज्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.”

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. तुकाराम निकम, सचिव श्री. रमेश कदम, विद्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप पुरकर यांच्यासह स्वामी केंद्राचे सेवेकरी सौ. वैशालीताई गिते, शिंदेताई, श्री. गजानन क्षीरसागर, संतोष कराळे, शेखर वाल्हेकर, अनिल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

बँकिंगमधील स्त्री पुरुष समानतेला चालना देण्यासाठी महिला-विशेष यंग बँकर्स कोहोर्टची सुरूवात


बंगळुरू, 16 डिसेंबर २०२४: 
भारतातील BFSI क्षेत्रासाठी आघाडीची अध्ययन सुविधा पुरवणारी संस्था मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI (MABFSI) ने ॲक्सिस बँकसोबत भागीदारी करत ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्रामच्या खास महिलांसाठीच्या कोहोर्टची म्हणजेच संघटन सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या या कोहोर्टचे उद्घाटन बंगळुरू येथील MABFSI कॅम्पसमध्ये ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट अँड हेड – ह्युमन रिसोर्सेस राजकमल वेंपती यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाने बँकेच्या विविधता आणि सर्वसमावेशक कार्यशक्तीला चालना देण्याच्या बांधिलकीला बळ दिले आहे.
ॲक्सिस बँक आणि मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI यांच्यातील सहकार्याच्यायंग बँकर्स प्रोग्रामने  गेल्या 12 वर्षांत 16,000 पेक्षा अधिक पदवीधरांना यशस्वीपणे प्रशिक्षण दिले आहे. महिलांसाठीचे हे नवे, विशेष संघटन सुरू झाल्यामुळे महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. गेल्या वर्षीच्या कोहोर्टच्या तुलनेत आर्थिक वर्ष २४-२५ साठी महिलांची संख्या 700 पर्यंत वाढली असून लिंग गुणोत्तर 31% वरून 38% पर्यंत सुधारले आहे. कोहोर्ट्सच्या यशाचे मोजमाप करण्यासाठी MABFSI आणि ॲक्सिस बँक सातत्याने मूल्यमापन आणि विशिष्ट मूल्यांकन पद्धती राबवतात. याशिवाय पदवीधरांना कार्यशक्तीमध्ये सहजपणे सामावून घेता येईल हे सुनिश्चित करत स्त्री-पुरुष समानतेविषयी संवेदनशीलता, तणावव्यवस्थापन आणि करिअर विकासावरील कार्यशाळांद्वारे शिकण्याच्या अनुभवाला अधिक सुलभ केले जाते.मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI चे बिझनेस विभागाचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट अँड हेड आताश शाह म्हणाले,“बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तरुण महिलांना आवश्यक कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी ॲक्सिस बँकेसोबतची आमची भागीदारी सुरू ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम पदवीधरांना केवळ तयारच करत नाही, तर त्यांना बँकिंग करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सक्षम करतो.”
ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट अँड हेड – ह्युमन रिसोर्सेस राजकमल वेंपतीम्हणाल्या, “ॲक्सिस बँकेत, आम्ही महिलांना कार्यशक्तीमध्ये टिकून राहण्यास आणि बहुआयामी बँकर होण्यासाठी प्रोत्साहन देण्यास वचनबद्ध आहोत. ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्रामच्या वैविध्यपूर्णतुकडीमध्ये 24% विवाहित महिला आणि 44% महिला वयाच्या 25 पेक्षा जास्त वयाच्या आहेत. आमच्या कामकाजात नवा दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आणलेल्या अनेक तरुण महिलांना गेल्या काही वर्षांत आम्ही यशस्वीपणे समाविष्ट केले आहे आहे. पुढेवाटचालकरताना  आम्ही व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम, मेंटॉरशिप संधी आणि सहायक कामकाजाच्या वातावरणाद्वारे प्रतिभेत गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी बांधील आहोत.”
ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्राम हा एक व्यापक एक वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये बंगळुरू मधील MABFSI कॅम्पसवर बँकिंगच्या मूलतत्त्वांवरील चार महिन्यांचे क्लासरूम प्रशिक्षण, भारतातील ॲक्सिस बँक शाखांमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप आणि पाच महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पदवीधरांना मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE) कडून बँकिंग सेवा क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (पदव्युत्तर पदविका)प्रदान केला जातो. त्यामुळे त्यांना उद्योगाशी संबंधित ज्ञान व कौशल्य मिळते. ॲक्सिस बँक MABFSI सोबतच्या सहकार्याने आगामी बॅचेसमध्ये 50% विविधता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.