मुंबई – कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स इमारतीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला व त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह 6 आरोपींना शनिवारी 6 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.प्रस्तुत प्रकरणात 2 परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या धीरज देशमुख व त्यांच्या कुटुंबाला अखिलेश शुक्ला यांनी बोलावलेल्या गुंडांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह 6 जणांना अटक केली होती. या सर्वांना आज न्यायमूर्ती एन. पी. वासादे यांच्या कोर्टापुढे हजर करण्यात आले. त्यात त्यांना 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बाळकडू ३ – वस्त्रहरण” पोस्टर चे खा. संजय राऊतांच्या हस्ते अनावरण.
पुणे:- महाराष्ट्रात झालेली राजकीय गद्दारी, चालू सामाजिक व राजकीय परिस्थिती वर भाष्य करणारे व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांच्या आयोजनातून हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ जानेवारी रोजी बाळकडू ३ वस्त्रहरण” प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर उपक्रमाच्या पोस्टर चे अनावरण आज पुण्यात सामनाचे संपादक,शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रदेश संघटक वसंत मोरे तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .
यावेळी बोलताना अनंत घरत म्हणाले लोकांनी दिलेल्या मतांशी गद्दारी करणारे , ईव्हीएम स्थापित सरकार, फसव्या योजना, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या ह्या राजकारण्यांचे जनतेकडून वस्त्रहरण करणे गरजेचे झाले आहे ह्यासाठी च हे बाळकडू ३ वस्त्रहरण” हे व्यंगचित्रांचे प्रदर्शन आहे.
परराज्यात मराठी अधिकाऱ्यांना उत्तम वागणूक
‘इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती व अनुभव’ विषयावर परिसंवाद
पुणे : आपण राहतो त्या राज्यात पोस्टींग मिळावे यासाठी अधिकाऱ्यांचा सतत प्रयत्न असतो. मात्र इतर राज्यांमध्ये काम केल्याने आपण नक्कीच समृद्ध होतो आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा संपूर्ण देशात सन्मान केला जातो, त्यामुळे इतर राज्यात जाऊन काम करताना मराठी अधिकाऱ्यांना उत्तम वागणूक दिली जाते, असे मत प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‘इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती व अनुभव’ या विषयावर परिसंवादाचे आज (दि. 21) आयोजन करण्यात आले होते. आसाम आणि मेघालय येथे 15-16 वर्षे काम केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आयएएस अधिकारी विशाल सोळंकी, तसेच 15 वर्षांपासून राजस्थानमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी संतोष चाळके आणि 39 वर्षे सेवेत असलेले अरुण उन्हाळे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रशासनातील गमतीशीर गोष्टी..
इतर राज्यात काम करताना तेथील भाषा, संस्कृती यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. त्यावेळेला काही मजेशीर प्रसंग घडतात. याविषयी चाळके म्हणाले, माझी राजस्थानात नियुक्ती झाली तेव्हा मी पोलिस स्टेशनमध्ये 5 जणांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना मी त्यांचे काम, पद या गोष्टी विचारात घेतल्या. मात्र त्याठिकाणी मिना ही प्रमुख जात असल्याने मी सुद्धा मिना जातीचा आहे आणि त्यामुळे मी 3 मिना जातीच्या लोकांची नियुक्ती केल्याचे बोलले जायला लागले. मी राजस्थानी नाही तर महाराष्ट्रातून आलो आहे हे समजल्यावर माझ्या पत्नीचे नाव मिनल आहे तर ती तरी मिना जातीची असेल असेही त्या लोकांना वाटले. मला तोपर्यंत याविषयी अजिबातच कल्पना नव्हती. पण नंतर मात्र हा सगळा गैरसमज दूर झाला आणि काम सुरळीतपणे सुरू झाले.
प्रशासनातही विविधेत एकता..
भारतात विविधतेत एकता आहे असे आपण म्हणतो किंवा ऐकतो. पण प्रशासनात काम करत असताना आम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. इतर राज्यांमध्ये काम करताना भाषा, संस्कृती, अन्न वेगळे असले तरी प्रेम, दु:ख, निसर्ग, जवळीक या गोष्टी सगळीकडे सारख्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवते. निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्राबरोबरच इतर राज्येही बरीच प्रगत असल्याचे जाणवले, असे उन्हाळे म्हणाले.
राजकीय अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक..
प्रशासकीय अधिकारी आणि पुढारी यांचा अतिशय जवळचा संबंध असतो हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पण महाराष्ट्राबाहेर पुढाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना किंवा अगदी वाहनचालकांनाही अतिशय आदराची वागणूक दिली जाते. महाराष्ट्रात हे चित्र अभावानेच पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी आमदार, नगरसेवक असे सगळेच जण आसाम किंवा राजस्थानसारख्या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा आदर करतात असे सोळंकी म्हणाले.
पुणे शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वात अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन
पुणे-पुणे शहर आणि ग्रामीण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू छिब यांना आसाम पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा देखील पुणे शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला .
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात जमून रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
महाराष्ट्र युवक काँग्रेस सहप्रभारी एहसान खान म्हणाले, “अमित शहा यांचे वक्तव्य अतिशय लज्जास्पद आहे. हे त्यांच्याच मनातील विचार आहेत, जे त्यांच्या तोंडून बाहेर आले. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.”
युवक काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “गौतम अदानींवर कारवाई करण्याऐवजी आणि संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडून (JPC) चौकशी करविण्याऐवजी सरकार विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावत आहे. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना आसाम पोलिसांनी अटक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.”
पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे म्हणाले, “सरकारची ही चाल फक्त मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे आणि त्यांना या गोष्टींत अडकवून ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून या अन्यायाविरुद्ध लढा देत आहोत.” या रास्तारोको आंदोलनात पुणे शहर युवक कॉंग्रेंसचे अध्यक्ष सौरभ अमराळे , ग्रामीण अध्यक्ष उमेश पवार ,प्रथमेश आबनावे ,मेघश्याम दर्मवत ,आनंद दुबे , ऋषीकेशवीरकर ,अभिजित चव्हाण ,सद्दाम शेख ,मुरलीधर बुधराम ,धनराज माने , मारुती तलवारे ,हर्षद हांडे पवन खरात आणि युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रो. आर. के. मुटाटकर लिखित ‘रामायण’ पुस्तकाचे प्रकाशन, चर्चासत्र,व्याख्यान संपन्न
पुणे, 21 डिसेंबर 2024
येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN) च्या निसर्ग ग्राम कॅम्पसमध्ये पहिला जागतिक ध्यानधारणा दिन मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी साधकांनी चिंतन, चिंतन आणि उपक्रमातून ध्यानाचे महत्त्व अनुभवले तसेच ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ व प्रतिष्ठित गांधीवादी प्रा. आर. के. मुटाटकर लिखित ‘रामायण’ पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने निसर्ग ग्राम कॅम्पस येथे चर्चासत्र तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.भूषण पटवर्धन व सन्माननीय अतिथी पद्मश्री प्रा.कत्रागड्डा पद्द्या हे उपस्थित होते.
प्रा. आर. के. मुटाटकर यांनी ‘रामायण’ या ग्रंथाचा सारांश आणि सद्यस्थितीत त्याचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. प्रभू रामाचे जीवन आणि आदर्श आजच्या समाजाशी जोडून त्यांनी विशद केले. तर डॉ. भूषण पटवर्धन यांनी रामायण या ग्रंथावर आपले मनोगत व्यक्त करताना ते आजच्या काळात समर्पक असल्याचे सांगून ध्यान दिनाचा रामायणाशी संबंध सांगितला.
दरम्यान, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आणि चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला.
***
समकालीन साम्यवादी लेखकांचे मिथक आणि वरिष्ठांची सापत्न वागणूक लेखनातील अडथळे
‘अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने’ परिसंवादातील सूर
शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन
पुणे : शासनात कार्यरत असताना सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारी सापत्न भावाची वागणूक, असूया, तांत्रिक धोरणात्मक अडचणी, समाजाशी संवाद तुटणे, गैरसमज, तिरस्कार, आत्मगौरव अथवा आत्मवंचनेत येऊ शकणारे अडकलेपण, अशा आव्हानांना सामोरे जावे लागल्याची भावना शासकीय सेवेत राहून लिखाण करणाऱ्या सिद्ध हस्त लेखकांनी व्यक्त केली.
मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनातील ‘अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. माजी प्रशासकीय अधिकारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, माजी प्रशासकीय अधिकारी, पानिपतकार विश्वास पाटील, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त किरण कुलकर्णी मंचावर होते. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांनी संवाद साधला. बालगंधर्व रंगमंदिरात संमेलन सुरू आहे.
भारत सासणे म्हणाले, उत्तम साहित्यकृती निर्माण करण्याकरीता सतत वैविध्यपूर्ण वाचन होणे आवश्यक आहे. आजूबाजूला घडत असलेल्या घटना, माणसे, सामान्यांच्या आयुष्यातील वस्तुस्थिती रूपत्माकपद्धतीने मांडणे, वास्तववाद साहित्यकृतीतून दर्शविणे गरजेचे असते. समकालीन साम्यवादी लेखकांच्या रोषाला तसेच त्यांच्याकडून पसरविलेल्या मिथकला, कारस्थानांनाही अनेकदा सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत सर्व आघाड्यांवर लढत राहत संयम आणि अस्सलपणाची उपासना केल्यास उत्तम दर्जाची साहित्यकृती निर्माण होते.
विश्वास पाटील म्हणाले, आपल्याजवळ असलेल्या कलेविषयी श्रद्धा ठेवणे, माध्यमावर उत्तम पकड असणे, शब्दांची आराधना करणे, अनुभूती जाणीवपूर्वक समजून घेणे या गोष्टी साहित्यकृतीची निर्मिती करताना अत्यंत उपयोगी ठरतात. मनन-चिंतन करत अभ्यासपूर्ण लेखानातून जीवनातील अनेक अनुभव मांडताना ते आपल्यामध्ये रुजावे लागतात, त्यांचा मंद सुगंध सुटला की त्या अनुभूतींशी तन-मनाने एकरूप व्हावे लागते आणि त्यातूनच अजरामर कलाकृती निर्माण होते.
किरण कुलकर्णी म्हणाले, लेखन करणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचविणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आजच्या सामाजिक अवस्थेत अचूकतेपेक्षा वेगाला नको इतके महत्त्व दिले गेले आहे. यातूनच सुमारीकरणाची लाट अंगावर आली आहे. यातून वाचण्यासाठी सवंगतेच्या आहारी न जाता, खोटेपणाची भर न घालता आशयपूर्ण लेखन होणे आवश्यक आहे.
6अनधिकृत इमारतींवर महापालिकेकडून हातोडा, 1 लाख 25 हजार स्केअर फूट बांधकाम जमीनदोस्त
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील अंबाईदरा भागातील सर्व्हे नंबर ३१ मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या सहा इमारतींवर महापालिकेच्या शहर बांधकाम विभाग झोन क्रमांक २ च्या वतीने कारवाई करत सव्वालाख स्केअर फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिकेच्या जॉ कटरच्या साहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले. जेसीबी, अतिक्रमण पोलिस कर्मचारी, तसेच बिगारी सेवकांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या अनधिकृत इमारतींवर गुरुवारी महापालिकेच्या वतीने कारवाईस सुरुवात केली.यावेळी सुरुवातीला स्थानिक नागरिक व जागा मालकांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, या विरोधाला न जुमानता महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मदतही घेण्यात आली होती.
पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजून तयार व्हायचा आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी, तसेच बांधकाम व्यावसायिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
काल दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी डीप क्लीनिंग ड्राईव्ह अंतर्गत औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय व बांधकाम विकास विभाग झोन-तीन यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ही बाणेर पॅन कार्ड क्लब रस्त्यावरील फ्रंट मार्जिन व पत्रा शेड वर करण्यात आली.सुमारे 16 मिळकतींवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 13500 चौरस फूट क्षेत्र करण्यात आले.सदर कारवाई ही क्षत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त , अतिक्रमण निरीक्षक, पोलीस स्टाफ तसेच बांधकाम विकास विभागातील कार्यकारी अभियंता,उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या कडून करण्यात आली.
शासकीय सेवेतही विवेकी वृत्तीने साहित्यनिर्मिती शक्य
यशदाचे अतिरिक्त महासंचालक व प्रसिद्ध लेखक शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन
पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
पुणे : प्रत्येक शासकीय कार्यालय हा अतरंगी जनसामान्यांच्या चित्रविचित्र अनुभवांचा खजिना असतो. संवेदनशील अधिकारी या अनुभवांतून विवेकी वृत्तीने साहित्यनिर्मिती करू शकतात. असे अनुभव लेखन वाचकांसह त्या लेखकाला मोठ्या आनंदाचा ठेवा देते, हा स्वानुभव आहे. त्यामुळे सरकारी सेवेतील बंधनांची सबब न सांगता अधिकारी कर्मचारी यांनी लेखन करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी आज (दि. 21) येथे केले.
मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 20 ते 22 डिसेंबर दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्ोळी राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, निवडणूक आयोग अधिकारी किरण कुलकर्णी, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, वसंत म्हस्के, सचिन ईटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अजानवृक्षाला जलार्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
गायकवाड म्हणाले, प्रशासकीय अधिकारी अनेकदा सरकारी सेवेची सबब सांगतात. पण शासकीय सेवेत असूनही उत्कृष्ट साहित्य निर्माण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. त्यांचे आदर्श ठेवून लेखन केले जावे. शासकीय कार्यालयात कुठलेही काम घेऊन येणारा माणूस अधिकाऱ्याला इरसाल अनुभवांचा खजिना देऊन जातो. आपण संवेदनशील मनाने ते अनुभव कच्चा माल म्हणून वापरावेत आणि लेखनाला गती द्यावी. मात्र लिहिताना शासकीय परिपत्रकांची बोजड, नीरस भाषा टाळावी. सोपे, सुगम आणि सुस्पष्ट लिहावे. सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हे सांगताना गायकवाड यांनी कथन केलेल्या अनुभवांनी सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
सकारात्मक बाजू पहावी : डॉ. नितीन करीर
डॉ. नितीन करीर म्हणाले, मी लेखक म्हणून नाही तर वाचक या भूमिकेतून संमेलनात सहभागी झालो आहे. अलीकडे बरेच लेखन ग्राहकाभिमुख होत आहे, असे माझे निरीक्षण आहे. वेदनेतून, दु:खातून निर्माण होणारे लेखन कमी होत आहे. शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपावी आणि न्यून शोधण्याऐवजी सकारात्मक बाजू पहावी. यातून अधिकाऱ्यांच्या हातून चांगले लेखन होण्याची शक्यता वाढेल. तसेच शासकीय अधिकाऱ्यांविषयीची जनमानसातील प्रतिमा बदलण्यास मदत होईल,.
भारत सासणे म्हणाले, ‘शासकीय नोकरी ही जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची विशाल खिडकी आहे. अधिकाऱ्यासमोर येणारा प्रत्येक अर्ज, प्रत्येक फाईल एखादे दु:ख, वेदना असू शकते. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे’.
प्रत्येकाचे आयुष्य सात-बाराचा उतारा : विश्वास पाटील
विश्वास पाटील यांनी स्वतःच्या कार्यकालातील महसूल विभागातील अनेक किस्से सांगितले. महसूल विभाग हा लेखनासाठी उत्तम खुराक किंवा कडबा आहे, असे ते म्हणाले. प्रत्येकाचे आयुष्य हा जणू सात बाराचा उतारा आहे, याचा प्रत्यय शासकीय सेवेत असताना मिळाला. सध्याच्या काळात साहित्य, संस्कृती, भाषेला मोबाईल नावाचा शत्रू निर्माण झाला आहे. त्याचा योग्य तेवढाच वापर केला जावा आणि अधिकारी मंडळींनी व्ोळेत लेखणी हाती घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.
लेखन समाजासाठी दिशादर्शक ठरेल : चंद्रकांत पुलकुंडवार
चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, शासकीय सेवेत असतानाही अनुभवांचे संकलन, कथन, लेखन या पद्धतीने दस्तऐवजीकरण हे आपल्याप्रती समाजाचे देणे आहे, ही भावना महत्त्वाची आहे. बहुतेक अधिकारी चरितार्थ या हेतूने सरकारी नोकरीकडे पाहतात. त्यातील सेवाभाव लुप्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरणाचे प्रतिबिंब अधिक उठावदार दिसते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती केल्याची अनेक उदाहरणे आहेत, जे लेखन समाजाला दिशादर्शक, मार्गदर्शक ठरणारे आहे.
तरुणांचा सहभाग वाढावा : अविनाश धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, शासन या नावाचे एक विश्वकुटुंब आहे, असाव्ो. शासकीय अधिकारी हे एखाद्या कुटंबप्रमुखासारखी जबाबदारी निभावणारे असावेत. शासकीय पदांवर कामासाठी निवड ही सेवेची संधी मानावी. आपल्या भारतीय व महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतविचार आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याची गुणसूत्रे वाहात आली आहेत. शासकीय सेवेत मानवी मनाचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते. त्या दर्शनाची अभिव्यक्ती कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन अशा विविध स्वरुपात घडू शकते. शासकीय अधिकाऱ्यांच्या या संमेलनात यापुढे तरुणाईचा सहभाग वाढावा आणि या क्षेत्रातील प्रतिभा बहरून यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या संमेलनाच्या निमित्ताने परस्पर देवाणघेवाण होईल आणि सोहार्दाचे वातावऱण निर्माण होईल. प्रशासनातील अधिकारीही लक्षवेधक साहित्यनिर्मिती करू शकतात, हे या संमेलनाच्या प्रतिसादावरून लक्षात येत आहे. पुणे मनपाने यासाठी पुढाकार घेतला. अधिकाऱ्यांनाही आत्मपरिक्षणाची संधी मिळेल, त्यांच्यातील सुप्त कलागुण समोर येतील आणि पुनर्मूल्यांकनाचा अवकाश प्राप्त होईल, असे ते म्हणाले.
निमंत्रक सुनील महाजन यांनी शासकीय अधिकाऱ्यांमधील सुप्त लेखनगुणांना अवकाश मिळावा तसेच व्यासपीठ मिळावे, म्हणून हे संमेलन आयोजित केल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले तर आभार राजीव नंदकर यांनी मानले.
पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे थाटात उद्घाटन; मान्यवरांच्या उपस्थितीने लहानग्यांचा उत्साह द्विगुणित
पुणे – टीव्ही, मोबाईलमुळे बालनाट्य बघायला गर्दी होत नाही, हा विचार खरा नाही. चांगलं बालनाट्य असेल तर ते चालतं, चालणारच. रत्नाकर मतकरी यांचे अलबत्या गलबत्या नाटक आजही का चालतं? चांगल्या नाटकांना प्रेक्षक आहे, मुलांना सकस आहार, अन्न मिळावं म्हणून आपण जसे दक्ष असतो तसेच मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांनी केले. बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते.
उदघाटन सोहळ्याला व्यासपीठावर उदघाटक डॉ. मोहन आगाशे, संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, सुबोध भावे, सुशांत शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ निर्माता अजीत भुरे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. दिपा क्षिरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ शेख अन्सारी, कार्यकारिणी सदस्य दिपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, धनंजय जोशी, त्र्यंबक वडूसकर, नागेसन पेंढारकर, आनंद जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील शाखांचे अध्यक्ष आबा मेघे, सुमती सोमवंशी, सीमा येलगुलवार, डॉ. अदिती मोराणकर, निलेश माने, तेजस्वीनी कदम, वैशाली दाभाडे, राजेश जाधव, उर्मिला लोटके, आबा ढोले, डॉ. निलेश माने, मनीषा पटेल, सुजाता कांबळे, अतुल अमळनेरकर आदी उपस्थित होते.
सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर, प्रास्ताविक करताना अध्यक्ष ॲड.नीलम शिर्के सामंत यांनी गेल्या वर्षभरात बालरंगभूमी परिषदेतर्फे झालेल्या महोत्सव व कार्यक्रमांचा आढावा घेतला. यात जल्लोष लोककलेचा व खास दिव्यांग बालकांसाठी घेतलेल्या यहाँ के हम सिकंदर या महोत्सवांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या महोत्सवांनी बालरंगभूमीचे कार्य महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात पोहचले. बालप्रेक्षक सभासद योजनेत आजवर हजारो बालप्रेक्षकांनी केलेली नोंदणी ही त्याची पावती असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर मान्यवरांच्या मनोगतात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले की, जसे प्रशिक्षणातून तानसेन निर्माण होत असतील तर कानसेनही निर्माण व्हायला हवेत. कारण प्रेक्षक असतील तर रंगमंचावर काम करण्यास मजा येते. बालवयातच हे कलेचे बालकडू मिळाल्यास निश्चितच बालरंगभूमी परिषदेच्या कार्यातून उद्याची रंगभूमी अधिक समृध्द होईल. तालात एक ताकद आहे आणि या ताकदीला अधिक ऊर्जा मिळण्यासाठी बालरंगभूमीचे कार्य गरजेचे आहे. अ.भा.मराठी नाट्य परिषद त्यांच्या कार्यामागे निश्चितच उभी राहील. अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांच्या नेतृत्वाखाली बालरंगभूमी प्रगती करेल ह्या सदिच्छा.
स्मरणिका, दिनदर्शिका व वेबसाईटचे प्रकाशन
बालरंगभूमी परिषदेचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे. यासाठी गेल्या वर्षभरात झालेल्या महोत्सवाची माहिती देणारी स्मरणिका तसेच वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. याव्ोळी महाराष्ट्रातील सर्व कार्यकारिणींच्या छायाचित्रांचा समाव्ोश असणा-या दिनदर्शिकेचेही प्रकाशन याव्ोळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अभिनेते सुबोध भावे यांनी मनोगतात, प्रकाश पारखीं यांच्यासोबत बालनाट्यात घेतलेल्या पहिल्या सहभागाचा उल्लेख करत. मी अभिनेता म्हणून घडण्याचे बालकडू मला बालरंगभूमीवरच मिळाले आहे. त्या काळातील अनेक स्वप्ने साकारण्याची उर्मी मला तिथेच मिळाली. नाटकात कामं करणे म्हणजे केवळ अभिनय करणे नाही. तर त्यासाठी मदत करणारे तंत्रज्ञही गरजेचे आहे. बालरंगभूमीच्या माध्यमातून त्यांची कला अधिकाधिक ऋध्दिंगत व्हावे. बालरंगभूमीने एक बालनाट्य महोत्सव घ्यावा, जिथे आमच्यासारख्या कलावंतांना अभिनय करण्याची संधी द्यावी. कारण बालप्रेक्षकांसमोर अभिनय करणे हे खरच कस लावणारे असेल.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात बालरंगभूमीने हाती घेतलेल्या या कार्याला निश्चित गती मिळेल. लहानपणी खोड्या करणारी मुलं पुढे मोठी जावून सर्जनशील म्हणून ओळखली जातात. त्यामुळे खोड्या करण्याच्या या वयात निश्चितच खोड्या करा. त्यातूनच कल्पनाशक्तीचा विकास होता. याव्ोळी लहानपणीची आठवण सांगतांना त्यांनी सादर केलेल्या कवितांच्या ओळींना बालप्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
उदघाटक डॉ. मोहन आगाशे यांनी बालप्रेक्षकांशी गप्पा मारत आपले मनोगत व्यक्त केले. याव्ोळी ते म्हणाले की, तुमच्याप्रमाणेच मी लहानपण अनुभवतो आहे. आपल्या लहानपणाची सगळ्यात मोठी देणगी आहे ती म्हणजे भांडण करुन विसरायची. भांडण विसरायला पाहिजे पण त्यासाठी आधी ते करावं लागतं. प्रत्यक्षात भांडण केलं तर रट्टा मिळतो पण नाटकात केलं तर कौतुक होतं. त्यामुळे ही निरागसता जपा. लहानपणीच उत्तम नाटक बघण्याची सवय लागली तर उद्याचा उत्तम प्रेक्षक घडेल. बालरंगभूमीने दिव्यांगाविषयी कार्य केले, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. दिव्यांग नसलेला एकही मुलगा मला आज दिसला नाही. अंतरीच्या नाना कळा असणारे हे दिव्यांग आपल्या बुध्दांकामुळे आपल्याला काही बोलत आहेत.
संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात, माझी अभिनयाची सुरुवातही बालरंगभूमीवरुनच झाली आहे. 1968 मध्ये जयंत तारी यांच्या टूनटूननगरी, खणखण राजा या बालनाट्यातून केली आहे. 60 वर्षानंतरही बालनाट्य रंगभूमी बदलली आहे. ती हौशी नाही तर व्यावसायिक व स्पर्धार्त्मक झाली आहे. नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक अभ्यास म्हणून शिकवला जावा. नाट्यशिक्षण ऐच्छित असाव्ो. विद्यार्थ्यांनी नट बनविण्याचा प्रयत्न करावे. बालनाट्य मुलांना भावेल असे हवं. पैसे भरुन झटपट, छोट्या किंवा मोठ्या पडद्यावरचा नायक बनत नसतो. शॉर्टकटने हवं ते मिळविण्याची पालकांची प्रवृत्ती धंदेवाईक प्रशिक्षण संस्थांना जन्म देते. बालरंगभूमीने हे थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नृत्य, गायन, वादन, जादू, चित्र, शिल्प अशा अनेक कलांच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी बालरंगभूमी परिषद कार्य करत असल्याचा मला आनंद आहे. हे संमेलन सर्व कलांचे समावेशक आहे. बालकांनो बालरंगभूमी ही तुमची हक्काची आहे. ही बालरंगभूमी तुम्हांला घडवेल हा विश्वास बाळगा. तिचा हात आणि बोट सोडू नका, धरुन ठेवा, तुमचं अवघं जगणं आनंदाचं होवून जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजय भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांनी मानले.
ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी राज्य सरकारकडून पूर्ण
पुणे: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ताम्हिणी घाटात वडगावशेरी मतदारसंघातील एक कुटुंब व त्यांचे नातेवाईक लग्नासाठी जात असताना त्यांच्या खाजगी बसचा अपघात होऊन अपघातात ६ व्यक्ती मृत पावल्या असून २७ जण जखमी झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अपघातातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी व जखमी वर मोफत उपचार व्हावेत अशी मागणी विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्फत सरकारकडे केली. अध्यक्ष यांनी ताबडतोब सरकारला तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले
आमदार बापूसाहेब पठारे यांनी या अपघातात प्राण गमावलेल्या नागरिक बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अपघातात ६ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २७ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नगरिंकावर उपचार सुरू आहेत अशी माहिती दिली.
शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे – शहरातील पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी वाढत आहेत. तरी, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शनिवारी) विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली.
शहरात तसेच माझ्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात पाण्याच्या तक्रारी वाढण्यास सुरूवात झाली आहे. अचानक कमी दाबाने तसेच अपुरे पाणी येत असल्याने नागरिक तक्रारी करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून याबाबत बोलण्यास नकार दिला जात आहे, असे शिरोळे यांनी सभागृहात सांगितले.
शहर-उपनगरांतून सध्या अचानकपणे पाण्याची मागणी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. साधारपणे हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असते. मात्र, दुसरीकडे मागणी वाढत असल्याचे प्रशासन सांगत आहे. यातून स्पष्ट होते की, शहरात पाणी पुरवठा कमी होत आहे, असे शिरोळे म्हणाले.
पाणीपुरवठ्याची स्थिती गंभीर असून शासनाने पुणे शहरातील तसेच माझ्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी त्वरित उपाय योजना करणे गरजेचे आहे. शासनाने सदर प्रकरणाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
धनकवडीच्या २ भावांकडून पोलिसांनी केला साडेआठ लाखांचा गुटखा जप्त
पुणे-स्वारगेट पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे परिमंडळ २ यांच्या कार्यालयातील पोलिसांनी गुटख्याची बेकायदा वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले. साडेआठ लाखांचा विमल गुटखा तसेच दोन टेम्पो असा साडेअठरा लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.सौरभ ऊर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (वय २४) आणि संग्राम रामकृष्ण निंबाळकर (वय २६, रा. श्रीराम सोसायटी, थोरवे शाळेसमोर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संजय भापकर यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फालेनगर येथे टेम्पोतून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना दिली. परिमंडळ २ यांच्या कार्यालयाकडील पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, अंमलदार पंकज माने, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार राहुल तांबे, कुंदन शिंदे, सागर केकाण तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी निलेश मोकाशी, अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करुन कोठे गुटख्याची वाहतूक होत आहे, याची खात्री केली. तेव्हा फालेनगर येथील लेन नंबर ५ येथील राजक प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानाचे समोरील बाजुला दोन टेम्पो आढळून आले. त्यातील दोघा चालकांना ताब्यात घेतले. दोन टेम्पोमध्ये साडेआठ लाख रुपयांचा विमल पान मसाला, गुटखा जप्त करण्यात आला. त्याबरोबर १० लाख रुपयांचे दोन टेम्पो जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, परिमंडळ २ कार्यालयाकडील सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, स्वारगेट पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.
आम्हाला POK मध्ये सोडण्याची सोय करा:कुणाच्या तरी पायातील बूट काढा अन् माझ्या तोंडात मारा, सुरेश धस विधानसभेत पुन्हा कडाडले
नागपूर-भाजप आमदार सुरेश धस शनिवारी पीक विमा योजनेतील अनागोंदी कारभारावरून मागील सरकारच्या कृषीमंत्र्यांना म्हणजे धनंजय मुंडे यांना चांगलेच धारेवर धरले. यासंबंधी त्यांनी ‘पीक विम्याचा परळी पॅटर्न’ असा उल्लेख केला. बीड जिल्ह्यातील रामापूर तांड्यावरून 4 हजार हेक्टरचा विमा भरला गेला. मला सांगा तांड्याचे क्षेत्रफळ 4 हजार हेक्टर असते का? कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडावर मारा, असे ते यासंबंधी संतप्त सूर आळवत म्हणाले.
सुरेश धस म्हणाले, अनेक शेतकऱ्यांना 2020, 2023 चा पीक विमा मिळाला नाही. आणि राज्यात काय चाललंय? मी आमदारीसोबतच ऊसतोड मजुरांचेही काम करतो. सभागृहात बंजारा समाजाचा एक आमदार बसलेला आहे. माझ्या माहितीनुसार, बंजारा समाजात चार – पाचच आडनावे आहेत. आमच्या रामापूर तांड्यावरून 4 हजार हेक्टरचा विमा भरण्यात आला. तांड्याचा एरिया 4 हजार हेक्टर असतो का? हे मला कुणीतरी सांगा. कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडावर मारा.
त्यांनी यासंबंधी ‘पीक विम्याचा परळी पॅटर्न’ असा उल्लेख करत महायुती सरकारच्या मागील कृषीमंत्र्यांवर (धनंजय मुंडे) गंभीर आरोप केले. ते म्हणाले, रामपूर तांड्यावरील विमा भरलेल्या लोकांची नावे सांगतो. गुट्टे, कुट्टे, होळंबे, कराड, दहिफळे, जयस्वाल. आता मला सांगा बंजारा समाजात जयस्वाल आडनाव कुठून आले? गुट्टे कसे आले? दहिफळे बंजारा कधी झाले? हे मला काही कळेना. आंधळे, मुंडे, लटपटे, चिखलबिडे, केंद्रे ही आडनावे बंजारा समाजात कधी आले? माझ्या माहितीनुसार बंजारा समाजात पाच आडनावच आहेत. एका गावात 2024 चा सुमारे 4 हजार हेक्टरचा विमा भरला गेला. आमच्या तालुक्यातील लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कसे काय भरू शकतात? माझे नाव खामगाव चिखलीला आल्यावर कसे जमेल?
सुरेश धस पुढे म्हणाले, पंतप्रधान पीक विमा योजनेत देशातील कोणत्याही सातबाऱ्यावर कुणाचेही नावे टाकण्यासाठी मला पंतप्रधान मोदींची भेट घेऊन विनंती करावी लागेल. एकट्या सोनपेठ तालुक्यात 13,190 हेक्टरचा बोगस पीक विमा भरला गेला आहे. परळीचा हा नवीन पॅटर्न आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न. हा पॅटर्न सगळीकडे लागू करावा अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करणार आहे. मी या प्रकरणी लवकरच अमित शहा व मोदींची वेळ घेतो. हा परळीचा पॅटर्न सर्वात आधी गुजरात व वाराणसीत लागू करा असे मी त्यांना सांगेन, असे नमूद करत त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
सरकारने 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली. वाजवा ढोल. एक रुपयात विमा, परळी पॅटर्न. राज्याचे कृषीमंत्री कोण, मला त्यांचे नाव माहिती नाही. मी नाव घेणार नाही. 2023-24 चे कृषीमंत्री. 2023 मध्ये थोडे साधले. बीड जिल्ह्याचा 2023 चा 7 हजार हेक्टरचा आकडा मी सांगितला. धाराशिव जिल्ह्यात 2 हजार हेक्टरवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे काय चाललंय? धाराशिव जिल्ह्यात भरण्यात आलेल्या 3 हजार हेक्टरच्या पीक विम्याचे शेतकरी परळी तालुक्यातील आहेत.
माझ्या मतदारसंघात कासेवाडी आंबेवाडी नामक गाव आहे. त्या गावाला महसुली दर्जाच नाही. तेथून 4 हजार हेक्टरचा विमा भरला गेला. आमच्या शेजारच्या परभणी जिल्ह्यातून 40 हजार हेक्टरचा बोगस विमा भरला गेला. आता जगावे की मरावे? की हे राज्य सोडून जावे? आम्हाला पीओकेमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) नेऊन सोडण्याची तरी व्यवस्था करा, असेही आष्टीचे आमदार सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.
मार्को – भारतीय सिनेमातील सर्वात हिंसक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिली खळबळ उडवून
मार्को: हिंसा आणि शैलीची पुनर्परिभाषित करणारा रेकॉर्ड-ब्रेकिंग मल्याळम चित्रपट
जेव्हा मार्कोचा टीझर आणि ट्रेलर लॉन्च झाला, तेव्हा त्याने प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात हिंसक चित्रपट म्हणून प्रचारित, टीझरनेच चित्रपटाच्या तीव्रतेसाठी टोन सेट केला, कच्चा हिंसा आणि स्टाईलिश चित्रपटनिर्मिती यांचे मिश्रण दाखवले.
प्रादेशिक सीमा तोडून, निर्मात्यांनी हिंदीमध्ये टीझर देखील रिलीज केला, ज्याने ऑनलाइन सकारात्मक टिप्पण्यांसह व्यापक प्रशंसा आणि महत्त्वपूर्ण दृश्ये मिळवली.
हनीफ अदेनी दिग्दर्शित आणि शरीफ मुहम्मदच्या क्यूब्स एंटरटेनमेंट्स बॅनरखाली निर्मित, MARCO 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला, एक विलक्षण स्वागत.
जगभरातील पहिल्या दिवशी, चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर प्रभावी ₹10.8 कोटी कमावले, जे मल्याळम चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग रेकॉर्डपैकी एक आहे.
यामध्ये एकूण ₹4.21 कोटींचा समावेश आहे, ज्यात भारत बॉक्स ऑफिसवर मल्याळम पदार्पण केले आहे. या चित्रपटाने हिंदी प्रेक्षकांमध्ये आपले मोठे आकर्षण दाखवून चांगला व्यवसाय केला आहे.
समीक्षकांनी चित्रपटाच्या आकर्षक अंमलबजावणीसाठी आणि उन्नी मुकुंदनच्या चुंबकीय उपस्थितीबद्दल कौतुक केले आहे. एका पत्रकाराने समर्पकपणे टिप्पणी केली, “मार्को हा मल्याळममध्ये बनलेला आतापर्यंतचा सर्वात हिंसक चित्रपट आहे. उन्नी मुकुंदनचा स्वॅग आणि स्टायलिश चित्रपट निर्मिती हे अंदाज लावता येण्याजोग्या कथेसह चित्रपटाचे महत्त्व आहे.”
चित्रपटाच्या यशाबद्दल आपले विचार शेअर करताना, दिग्दर्शक हनीफ अदेनी म्हणाले, “मार्को हा माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा प्रकल्प आहे. तो केवळ हिंसाचाराबद्दल नाही – तो शैली, भावना आणि पात्रांच्या खोलीबद्दल आहे. मला खूप आनंद झाला आहे. प्रेक्षक कथा आणि परफॉर्मन्सने गुंजतात पहा.
हिंदी रिलीज तितकेच खास आहे, कारण मल्याळम सिनेमाला व्यापक प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
2019 च्या मिखाएल चित्रपटाचा स्पिन-ऑफ असलेला मार्को, उन्नी मुकुंदन, युक्ती थरेजा, सिद्दिकी, जगदीश, अँसन पॉल आणि राहुल देव यांच्यासह उत्कृष्ट कलाकारांना एकत्र आणतो. रवी बसरूर यांनी संगीतबद्ध केलेले संगीत, चंद्रू सेल्वाराज यांचे छायाचित्रण आणि शमीर मुहम्मद यांनी संपादन केल्याने चित्रपटाची तांत्रिक चमक दिसून येते.
चित्रपटाचे हिंसाचार-जड कथन, त्याच्या अनोख्या शैलीसह एकत्रितपणे, केवळ मल्याळम उद्योगावरच नव्हे तर हिंदी चित्रपटांच्या बाजारपेठेतही कायमची छाप सोडेल अशी अपेक्षा आहे. मार्कोसह, निर्मात्यांनी प्रादेशिक सिनेमा आणि अखिल भारतीय अपील यांना यशस्वीरित्या जोडले आहे, राष्ट्रीय क्षेत्रात मल्याळम चित्रपटांसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.
मार्को हा केवळ चित्रपटापेक्षा अधिक आहे; बॉक्स ऑफिसवर दीर्घकालीन प्रभाव पाडण्यासाठी आणि भारतीय सिनेमातील ॲक्शन थ्रिलर्सची मानके पुन्हा परिभाषित करण्यासाठी हा सिनेमाचा अनुभव आहे.
ट्रेलर लिंक :https://www.youtube.com/watch?v=AdwGOloQcAs
परमेश्वराचा जो भक्त नाही तो अस्पृश्य- राजन जी महाराज
श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळा
पुणे : साधूंची कोणतीही जात नसते आणि भक्तांची कोणतीही जात नसते. प्रत्यक्षात अस्पृश्य तोच आहे, जो माणसाचे शरीर प्राप्त करूनही परमेश्वराचा जो भक्त होऊ शकला नाही. याच्यापेक्षा जगामध्ये कोणताही मोठा अस्पृश्य नाही, असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात आठव्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, परमेश्वर आपल्याला भेटू शकतील, मात्र त्याकरिता भक्तीभाव असणे गरजेचे आहे. काहीही केले नाही तरी चालेल, परमेश्वराशी एक नाते निर्माण करायला हवे. परमेश्वर कोणतेही नाते जोडण्यास तयार असतो. फक्त माणसाने भगवंताशी कोणते ना कोणते नाते निर्माण करणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, प्रभू रामाचे आपण आहोत की नाही, हे रामाने ठरवायचे आहे. मात्र, आपण प्रभू श्रीरामांचे आहोत, हे प्रत्येकाने आपल्या भक्तीतून सिद्ध करायला हवे. अनेकजण म्हणतात की लोक आम्हाला समजून घेत नाहीत. पण आपण योग्य जागेवर उभे आहोत का? याचे परीक्षण आपण करायला हवे. आपली किंमत योग्य जागी आहोत की नाही, यावर ठरेल. परमेश्वराच्या शरणागतीमध्ये आलो तर आपण योग्य ठिकाणी आलो, असे म्हणता येईल.
कथा सोहळ्याचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
