Home Blog Page 529

विकास प्रकल्पांमध्ये दस्तावेजीकरण, सुरक्षेला अधिक प्राधान्य हवे-अविनाश पाटील

बिल्डर्स असोसिएशनतर्फे रमेश धूत यांना ‘निर्माणरत्न २०२४’ जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : “बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञान, कलात्मकतेचा अंतर्भाव होत असल्याने दिवसेंदिवस बांधकामाची गुणवत्ता वाढली आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत विकासकांनी दस्तावेजीकरण व सुरक्षेकडे अधिक प्राधान्याने पाहायला हवे. नगरनियोजन विभागाकडून ग्रामीण भागातही अनेक प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याच्या बांधणीत शहरी भागातील चांगल्या विकासकांनी पुढाकार घ्यायला हवा,” असे प्रतिपादन राज्याच्या नगर नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित २८ व्या ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२४’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात अविनाश पाटील बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ऑल इंडिया ‘बीएआय’चे अध्यक्ष के. विश्वनाथन, ‘बीएआय’ पश्चिमचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता, बी. जी. शिर्के कंपनीचे उपाध्यक्ष बिपीन कुलकर्णी, डब्ल्यूबीएससीचे अध्यक्ष धैर्यशील खैरेपाटील, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष सुनील मते, उपाध्यक्ष अजय गुजर, महेश मायदेव, सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार’ (निर्माणरत्न २०२४) धूत उद्योग समूहाचे रमेश धूत यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. धूत यांनी पुरस्काराची रक्कम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी ‘बीएआय’कडे सुपूर्द केली. यावेळी ‘बीएआय’च्या इंजिनीअरिंग डायरीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. जीआरआयटी-एन्व्हायरॉन्मेंटल डिझाईन प्लस रिसर्च स्टुडियो, प्राईड बिल्डर्स, निर्माण डेव्हलपर्स, कव्हलकेड प्रॉपर्टीज यांना निवासी श्रेणीत, प्राईड बिल्डर्स एलएलपी, विलास जावडेकर इको शेल्टर्स, फिनिक्स ग्रुप हैद्राबाद यांना कमर्शियल श्रेणीत, पुण्याबाहेरील उद्धव गावडे बारामती यांना निवासी व कमर्शियल श्रेणीत, एस्कॉन प्रोजेक्ट्स, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना औद्योगिक, रोहन बिल्डर्स इंडिया, ए. एस. देसाई इन्फ्रास्ट्रक्चर यांना पायाभूत सुविधा उभारणी, हर्ष कंस्ट्रक्शन्स यांना सरकारी प्रकल्प उभारणीत, मिलेनियम इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टु बेअर शेल श्रेणीत, अक्रॉस नोड्स ट्रान्सीट सोल्युशन्स यांना बेस्ट ब्राऊनफिल्ड प्रोजेक्ट, वृक्ष लँडस्केप्स यांना लँडस्केप या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रमेश धूत म्हणाले, “या पुरस्काराची सुरुवात झाली, तेव्हा निवड समितीचा अध्यक्ष होतो. आज बीएआयच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतो आहे. अभियंता झाल्यावर बांधकाम क्षेत्रात एक छोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरु केले. आज याचे उद्योग समूहात रूपांतर झाले आहे. माझ्या वाटचालीत घरच्यांचा सहभाग मोलाचा आहे. स्थापत्य अभियंत्यांकडे कठोर मेहनत, प्रामाणिकपणा जपावा. अभियंत्यांचे काम हे सैन्यासारखे आहे. स्थापत्य अभियंत्याला कुठेही जाऊन काम करावे लागते.”

के. विश्वनाथन म्हणाले, “बीएआय पुणे सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहे. उच्च दर्जाची ही स्पर्धा घेऊन बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व समूहांना सन्मानित करण्याचे काम प्रेरक आहे. यातून बांधकाम विभागातील नावीन्यता सर्वांसमोर येत आहे.”

आनंद गुप्ता यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुनील मते यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. राजाराम हजारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आपटे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्‍य केल्याबद्दल माफी मागावी-खा. रजनीताई पाटील

पुणे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्‍य केल्याबद्दल माफी मागावी व पंतप्रधानांनी तोबडतोब त्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी आज काँग्रेस भवन येथे खासदार मा. रजनीताई पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून केली. यावेळी खासदार मा. रजनीताई पाटील पत्रकारांना संबोधित करताना म्हणाल्या की, ‘‘भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. सत्ताधारी भाजपाने लोकसभेला आखाडा बनवले आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे. भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होत आहेत. तरीही पंतप्रधान मूग गिळून गप्प कसे काय आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून पंतप्रधानांनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.’’ यावेळी प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, देवीदास भन्साळी, कैलास गायकवाड,, राज अंबिके, प्राची दुधाने, अर्चना शहा, प्रा. वाल्मिक जगताप, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख,आदी उपस्थित होते.

दलित आहे म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या:राहुल गांधी यांचा पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आरोप; फडणवीस खोटे बोलल्याचा दावा

0

परभणी- येथे गत 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेच्या 12 दिवसांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज परभणीत येऊन या घटनेत बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सोमनाथ यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच या प्रकरणी न्यायाचीही मागणी केली. राहुल यांनी पीडित कुटुंबीयांशी चटईवर बसून संवाद साधला.

दरम्यान, राहुल गांधी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्याही कुटुंबीयांची भेट घेतली. वाकोडे यांचे हिंसाचारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे येथील हिंसाचार रोखण्यात मोठे योगदान होते.
मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. मी मारहाण झालेल्या लोकांचीही भेट घेतली. त्यांनी मला शवविच्छेदन अहवाल दाखवला, व्हिडिओ व फोटो दाखवले. हा 99 टक्के नव्हे तर 100 टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना संदेश देण्यासाठी खोटे निवेदन केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता व तो संविधानाचे संरक्षण करत होता म्हणून त्याला मारण्यात आले आहे, असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत उत्तर देताना सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही, असे न्यायाधीशांसमोर सांगितल्याचे फडणवीसांनी म्हटलं होतं. आता, राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर थेट देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष्य केलं आहे, तसेच फडणवीस खोटं बोलत असल्याचंही ते म्हणाले.

मी आज सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली, ज्यांना मारहाण झाली त्यांचीही भेट घेतली. मला त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टंस दाखवले, व्हिडिओ दाखवले, त्यावरुन ही 100 टक्के न्यायालयीन मृत्यू आहे, पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे. मुख्यमंत्री विधानसभेच्या सभागृहात पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी खोटं बोललेय, असे म्हणत राहुल गांधींनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित आहेत, ते संविधानाचे रक्षण करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. ज्या लोकांनी हे केलंय, त्यांना शिक्षा व्हावी, अद्यापपर्यंतच्या कारवाईवर मी संतुष्ट नाही. हे कुठलंही राजकारण नाही, मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सलाबाई सूर्यवंशी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, सोमनाथ सोमवंशी यांना दम्याची बिमारी होती आणि त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. पण, मुख्यमंत्री खोटं बोलले आहेत, विधानसभेची त्यांनी दिशाभूल केली. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री यांच्यावर आम्ही प्रिविलेज मोशन आणू, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले. इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचं पितळ उघड करतील. ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना आणि बौद्धांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचं काम बीजेपी करत आहे, ते या ठिकाणी दिसलं आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. न्यायालयीन चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

पुण्यात मध्यरात्री:मद्यधुंद डम्पर चालकाने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले,तिघे ठार

पुणे- काल रात्री 12.30 च्या सुमारास पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.वाघोली परिसरात केसनंद फाट्यावर डंपर चालकाने हा अपघात केला आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातात 9 जणांना चिरडले आहे. यामध्ये दोन लहान मुले असल्याची माहिती मिळाली आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या तिघांचा मृत्यू

  1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
  2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
  3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष

हे 6 जण जखमी

  1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
  2. रिनिशा विनोद पवार 18
  3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
  4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
  5. दर्शन संजय वैराळ, वय 18
  6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे

आरोपी – डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला ताब्यात घेतला असून मेडिकल करण्यासाठी रुग्णालयात नेले आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालयात रवाना केले आहे. मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटलमधून ससून येथे पाठवले आहेत.

अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले.

प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला.

दुसरा प्रत्यक्षदर्शीं म्हणाला की, आम्ही कालच अमरावती वरून पुण्याला आलो होतो. आम्ही सर्व जण झोपलेले असताना बारा एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो डंपरचालकाने मुलांना चिरडले होते. तसाच तो पुढे गेला. तर तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले की, जर तो डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता. तिथे असलेल्या अनेकांनी आरडा-ओरड केली त्यामुळे अनेक जण वाचले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. डंपरचालकाने दारू पिलेली होती. त्यांनी मुलांच्या अंगावरून वाहन घातलं.

21 डिसेंबरची रात्र ही श्रीनगरमधील 50 वर्षांतील सर्वात थंड रात्र- तापमान उणे 8 अंश

0

21 डिसेंबरची रात्र ही श्रीनगरमधील 50 वर्षांतील सर्वात थंड रात्र होती. येथील तापमान उणे 8 अंश होते. 22 डिसेंबरला तापमान 4 अंशांच्या जवळ नोंदवले गेले.उत्तराखंडच्या उंच हिमालयीन भागात बर्फवृष्टी आणि पावसामुळे कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमान उणे 10 अंशांच्या खाली पोहोचले आहे.

आज २३ डिसेम्बर -Kashmir Region:

Srinagar = -3.6°C

Qazigund = -4.8°C

Pahalgam = -5.0°C

Kupwara = -4.3°C

Kokernag = -4.0°C

Gulmarg = -4.8°C

Sonamarg = -5.1°C

Bandipora = -4.4°C

Baramulla = -3.4°C

Budgam = -4.8°C

Ganderbal = -4.2°C

IMD ने आज हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागांमध्ये #कोल्डवेव्ह स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. हरियाणा, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान आणि मणिपूरमध्ये आज रात्री उशिरा आणि पहाटे दाट धुके राहण्याची शक्यता आहे, असे IMD म्हणते. पुढील २-३ दिवस मेघालय, नागालँड, मिझोराम आणि आसाममध्येही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

चिल्लई कलानच्या तिसऱ्या दिवशी दल सरोवरही गोठले. येथे तलावाच्या पृष्ठभागावर बर्फाचा अर्धा इंच जाडीचा थर दिसतो.

बद्रीनाथ धामाजवळील उर्वशी धाराचा धबधबा सततच्या बर्फवृष्टीमुळे वाहत असताना पूर्णपणे गोठला आहे.

हवामान खात्याने 23 ते 28 डिसेंबरदरम्यान मध्य प्रदेशात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. राजस्थानमध्येही आज पावसाची शक्यता आहे.जम्मू-काश्मीरमधील चिल्लई कलान दरम्यान, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान उणे आहे. सोमवारी सकाळी श्रीनगर पारा -3.6°, पहलगाम -5.0°, गुलमर्ग -4.8°, सोनमर्ग -5.1°, झोजिला -25.0°, अनंतनाग -6.1°, शोपियान -7.3°, लेह -9.2°, कारगिल -9.5° सेल्सिअस नोंदवले गेले .

पुढील ३ दिवसांचे हवामान…

24 डिसेंबर : 4 राज्यांमध्ये दाट धुके, 2 राज्यात पाऊस

पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालयमध्ये दाट धुके असेल.
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये (रायलसीमा, आंध्र प्रदेश) मुसळधार पाऊस पडू शकतो.
हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचलमध्ये दंव पडण्याची शक्यता.
25 डिसेंबर : 2 राज्यांमध्ये तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा

पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात धुक्याचा इशारा.
जम्मू-काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा, इतर राज्यांमध्ये सामान्य हवामान.
हिमाचल प्रदेशात थंडीची लाट आणि दंव (जमीन दंव स्थिती) येण्याची शक्यता.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये (रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी) मुसळधार पाऊस.
26 डिसेंबर : 4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा, इतर राज्यांमध्ये सामान्य हवामान.
हिमाचल प्रदेशात थंडीची लाट आणि दंव (जमीन दंव स्थिती) येण्याची शक्यता.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये (रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी) मुसळधार पाऊस.
जम्मू-काश्मीरमधील चिल्लई कलान, 27 डिसेंबरपासून महाविद्यालये बंद

21 डिसेंबरपासून जम्मू-काश्मीरमध्ये चिल्लई कलान सुरू झाले. म्हणजे खूप थंडी. अनंतनाग, शोपियान, पहलगाम, गुलमर्ग आणि काश्मीर खोऱ्यात पारा उणे १० अंशांच्या खाली पोहोचू शकतो.
जम्मू-काश्मीर सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने शुक्रवारी महाविद्यालयांना हिवाळी सुट्टी जाहीर केली. काश्मीर विभागातील सरकारी पदवी महाविद्यालये आणि जम्मू विभागातील हिवाळी विभागातील महाविद्यालये 27 डिसेंबर ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हिवाळी सुट्टी पाळतील.
जम्मू विभागातील उन्हाळी विभागातील महाविद्यालये 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 पर्यंत सुट्टी साजरी करतील. सरकारने यापूर्वीच काश्मीर झोन आणि जम्मू विभागातील हिवाळी विभागातील शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे.

‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

दिमाखदार सोहळ्यात पहिली झलक आली समोर

एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स आॅफिसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली.

२०१३ मध्ये ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर ‘किस किस को प्यार करूं’, ‘नाम शबाना’, ‘पोस्टर बॅाईज’, ‘बाझार’, ‘मलंग’, ‘कोई जाने ना’, ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण हि व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं आणि आत्मविश्वासानं साकारल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल.

मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर ‘इलू इलू’ च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांपेक्षा खूप वेगळं आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्यानं होकार दिल्याचंही एली म्हणाली’.

मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांसोबतच तिचे चाहतेही आतुरले आहेत.

एलीसोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

‘इलू इलू’ ३१ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

नाताळ उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील. 

पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ची स्थापना 1944 साली झाली असून, हे भारतातील कॅथलिक समाजासोबत काम करणारी संस्था आहे. 

पुण्यात १२५० मृदंगांच्या एकत्रित वादनातून स्वरब्रम्हाची अनुभूती

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या मृदंग वादकांनी केले मृदंग वादन

पुणे : जय जय विठोबा रखुमाई चा गजर, तब्बल १२५० मृदंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ… अशा भारलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या १२५० हून अधिक मृदंग वादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेल आविष्कार सादर केला. मृदंगांचा स्वर टिपेला पोहोचताना पुणेकर देखील टाळ्यांच्या माध्यमातून या भक्तीरसात न्हाहून निघाले आणि प्रत्यक्षपणे हा स्वरब्रह्माची अनुभूती घेतली.

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये एकत्रितपणे १२५० मृदंगांचे वादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ह.भ.प.चिदंबरम महाराज साखरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नमन आणि त्यानंतर पंचपदीने झाली. रूप पाहता लोचनी… सुंदरते ध्यान उभे विटेवरी… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल … तुमच्या नामघोषासह मृदंग आणि टाळांचा गजर झाला. वादनाची सांगता सांगता आरतीने ने झाली. यावेळी जेष्ठ वादकांसह युवक-युवती आणि बाल वादक देखील सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात कुंभाची तयारी सुरूआहे मात्र इथे देखील एक कुंभच पाहायला मिळत आहे. उपासना आणि आराधनेचे बळ वाढवणे, हा यामागील उद्देश आहे. मंदिरांनी सामाजिक काम करावे आणि माणसात परमेश्वर ओळखावा, ही मूळ कल्पना आहे. हिंदू धर्म पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ आक्रमणे होऊन देखील टिकला. धर्म टिकून ठेवण्याची प्रेरणा मंदिरांनी दिली. त्यामुळे त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे.

अशोक गुंदेचा म्हणाले, चार दिवसीय महोत्सव विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधील १२५० मृदुंग वादकांनी एकत्रित मृदंग वादनाचा केलेला कार्यक्रम हा सर्वोच्च बिंदू होता. महोत्सवात १२६ मठ मंदिरांनी सहभाग घेत १८० स्टॉल द्वारे आपल्या सेवा कार्याची माहिती दिली.

कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..नीलमताई गोऱ्हे

महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..

ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन.

पुणे : चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत होत असलेल्या ती या बहुविध चर्चा सत्र कार्यक्रमास शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे या उपस्थित होत्या हा कार्यक्रम महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेचे प्रांगण कर्वेनगर येथे पार पडला.

याप्रसंगी बोलताना नीलम ताई गोर्हे म्हणाल्या ‘उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण देशात मुलींची संख्या अग्रगण्य आहे त्यासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील संपूर्ण देशात मुलींचे विशेष योगदान दिसून येते .
स्त्री- पुरुष समानता या विषयावर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज असून मुलींचा जन्मदर राज्यात चिंतेचा विषय आहे मात्र कोकणात मुलींचा जन्मदर हा बरोबरीने दिसून येतो.

महायुती सरकारच्या वतीने गेल्या अडीच वर्षात महिलांविषयी लहान मुलीं विषयी लेक लाडकी योजना असो,बालसंगोपन योजना असो,लाडकी बहीण योजना असो या योजनानमुळे महिलांचा आर्थिक विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात प्रगती झालेली निश्चितच दिसून येते लाडकी बहिण योजनेमुळे गरीब घरातील मुलींच्या शिक्षणात निश्चितच प्रगती झाल्याचं भविष्यात आपल्याला दिसून येईल, तसेच या योजनांमध्ये अनेक संस्थांकडून जनजागृती होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
मुलींच्या विषयी बोलताना उपसभापती नीलम ताई म्हणाल्या लैंगिक छळाचा घटनेमध्ये मुलींनी हिम्मत दाखवणे आवश्यक आहे मुलींनी हिम्मत दाखवल्यास निश्चितच न्याय मिळवायला अधिक मदत होईल असे सांगत त्यांनी अशा घटनात प्रतिकाराच्या प्रसंगांची ऊदाहरणे दिली.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील संस्थाचालकांचा विशेष करून मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता तसेच योगिता आपटे अनुराधा सहस्रबुद्धे या सहभागी होत्या . या कार्यक्रमाचे आयोजन श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे यांच्या नेतृत्वात रेनबो फाऊंडेशन तर्फे करण्यात आले होते .

शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात पाच ठराव संमत

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे तसेच याविषयी पाठपुरावा केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करीत ऑक्सर्ड शब्दकोषाच्या धर्तीवर मराठी बोलीभाषेतील नवनवीन शब्दांचा संग्रह वाढीस लागावा याकरिता अभ्यास समिती नेमावी, शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतीला शासनातर्फे पुरस्कार दिले जावेत, सामान्यांना समजतील अशा सुलभ मराठी भाषेत शासन निर्णय, कायद्यांची माहिती दिली जावी, शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाला राज्य शासनाने अनुदान द्यावे, असे ठराव पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात संमत करण्यात आले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचा रविवारी (दि. 22) समारोप झाला. समारोप समारंभात पाच ठरावांना एकमुखी मान्यता देण्यात आली. संमेलनाध्यक्ष शेखर गायकवाड यांच्या वतीने जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी ठराव मांडले.
समारोप समारंभास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तहसीलदार आबा महाजन, महापालिका शिक्षण विभागातील अधिकारी आशा राऊत, जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी, सचिन ईटकर, केंद्र सरकारमधील अतिरिक्त सचिव अनंत पाटील, महापालिका उपायुक्त राजीव नंदकर आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन मंचावर होते.
समारोप समारंभात संवाद साधताना भारत सासणे म्हणाले, लेखन करू इच्छिणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ देणे गरजचे आहे. त्याचप्रमाणे वाचनात आणि लिखाणात सातत्य सांभाळावे. आपल्यातील लेखकावर कधी अन्याय करू नये. महाराष्ट्रात अनेक साहित्य संमेलने होत असतात; परंतु शासकीय अधिकाऱ्यांचे विशेष संमेलन आयोजित केल्यामुळे साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, प्रशासकीय सेवेतील अधिकारी हे लोकसेवक, समाजसेवक आहेत. अनेक अधिकाऱ्यांकडे लेखन वृत्ती असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याने विविध प्रसंगांमधून या लेखकांमार्फत कथाबीजे रुजली जातील. त्यातूनच अनेक साहित्यकृती उलगडू शकतील. याकरिता लेखकांनी व्यक्त होणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. तीन दिवस आयोजित केलेल्या संमेलनाचा दस्तावेज शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे आनंद भंडारी यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले तर राजीव नंदकर यांनी आभार मानले.

चांगले साहित्यिक सक्षम अधिकारीही असतात : राजीव नंदकर

.पुणे : लेखनाच्या माध्यमातून लेखकाला आत्मिक समाधान मिळते. प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज करताना जे अनुभव येतात ते साहित्यकृतीच्या मांडण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे चांगले अधिकारी हे चांगले साहित्यिक असतात तसेच चांगले सहित्यिक सक्षम अधिकारीही असतात, असे प्रतिपादन पुणे महापालिका उपायुक्त राजीव नंदकर केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात आज (दि. 23) ‌‘चांगला साहित्यिक कार्यक्षम अधिकारी नसतो का?‌’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त (जीएसटी) वैशाली पतंगे यांनी चर्चासत्राचे संचालन केले.
नंदकर पुढे म्हणाले की, आजच्या काळात या विषयावर टीका टिप्पणी केली जाते. पण साहित्यिक अधिकारी कधीच काम टाळत नाही. तर त्याच्या मनातल्या साहित्यकृती समाजासमोर याव्यात असा त्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक अधिकाऱ्यांनी तीन वर्षातील कामकाजाचा आढावा शासनास सादर करावा. ज्यायोगे अधिकाऱ्यातील साहित्यिकाची लेखनाची आवड वाढण्यास मदत होऊ शकते.
मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपसंचालक अंजली ढमाळ म्हणाल्या, चांगला अधिकारी साहित्यिक असणे हा मानाचा तुरा आहे; कारण आपण आधी माणूस नंतर अधिकारी असतो. त्यातून सेवेची भावना गतिमान होते. समाजातील बारिक-सारिक बदल, अनुभव अधिकाऱ्याच्या मनात दडलेल्या साहित्यिकाला टिप कागदप्रमाणे टिपता आले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील वेदना समजल्यास प्रश्नातून मार्ग काढता येणे शक्य होते.
मानवी मनाचे विविध कंगोरे समजावून घेऊन लेखनाच्या माध्यमातून मांडता आले पाहिजेत. म्हणजे मानवी अवस्थेला शब्दातून व्यक्त करता आले पाहिजे, असे मत आयकर विभागाचे उपायुक्त महेश लोंढे यांनी व्यक्त केले.
विद्या पोळ-जगताप म्हणाल्या, अधिकारी आणि साहित्यिक या दोन स्वतंत्र भूमिका आहेत. असे असले तरीही शासकीय काम आणि साहित्य निर्मित यामध्ये फारकत करता येत नाही; कारण चांगला अधिकारी आणि साहित्यिक परस्परांना पूरक असतात. यासाठीच विविध साहित्यिक उपक्रम ठिकठिकाणी घेण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समाजातील प्रत्येक घटकाने साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून समाजातील विविध प्रश्नांची मांडणी समजापुढे येऊ शकेल, असे विचार वैशाली पतंगे यांनी व्यक्त केले.
उल्का नाईक-निंबाळकर म्हणाल्या, संवेदनशील, साहित्यिक हळवे मन कठोर निर्णय घेणार का असा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो; पण दोनही विषय वेगवेगळे असतात.

प्रतिभा मतकरी बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानित

बालरंगभूमी संमेलन सन्मान समारोप सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे बालरंगभूमी परिषदेचे बालरंगभूमी संमेलन बालकलाकारांच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणाने रंगले. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी (दि. 22) सायंकाळी आयोजित समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत बालरंगभूमीवरील अतुलनीय कार्य केल्याबद्दल प्रतिभा मतकरी यांचा बालरंगभूमी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिभा मतकरी बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिभा मतकरी:सन्मानाला उत्तर देतांना, प्रतिभा मतकरी यांनी सांगितले की, बालरंगभूमी ही नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. बालरंगभूमी यशस्वी होण्यासाठी मी सदोदित प्रयत्न केले. बालरंगभूमी परिषदेने माझ्या कार्याची दखल घेऊन, हा सन्मान मला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून आता बालरंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी खंबीर पाठबळ मिळाले आहे. त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा.


या पुरस्कार सन्मान सोहळ्याला संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर, डॉ. मोहन आगाशे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, गंगाराम गवाणकर, शैलेश दातार, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार आदी उपस्थित होते. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी शेख, कार्यकारिणी सदस्य धनंजय जोशी, दीपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, आनंद जाधव, त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.
या सन्मानसोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमीवरील कार्यासाठी बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच लहान मुलांमुलींसाठी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्री उदय देशपांडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, संगीतकार सलील कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासह भार्गव जगताप, खुशी हजारे, आरुष बेडेकर, मायरा वायकुळ, माऊली व शौर्य घोरपडे, स्वरा जोशी या बालकलाकारांचाही विशेष बालकलाकार गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सन्मान सोहळ्यादरम्यान सिनेनाट्य बाल युवा कलाकारांनी केलेल्या बहारदार सादरीकरणाने बालक व पालक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सन्मान व समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी तर आभार बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर यांनी मानले.
बालरंगभूमी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात बालरंगभूमी परिषदेच्या सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, परभणी, नागपूर, धुळे, कल्याण, बीड, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या शाखेच्या बालकलावंत व दिव्यांग कलावंतांनी सुधा करमरकर मुख्य रंगमंच व सुलभा देशपांडे मुक्त मंचावर सादरीकरण केले. सादरीकरणानंतर या शाखांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दुपारच्या सत्रात मला काही बोलायचंय या बालक, पालक, शिक्षक आणि बालरंगभूमी परिषद प्रतिनिधींच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात अभ्यास महत्वाचा, पालकांच्या अपेक्षा आणि मुले, वाचनसंस्कृती, बालपण हरवलं आहे का, मातृभाषा संवर्धन, मोबाईल चांगला की वाईट, शाळेतील शिक्षा, बालनाट्य कसे असावे, होमवर्कचं टेन्शन, मुले हुशार की मुली हुशार,संवाद लुप्त होतो आहे का या विषयांवर मुलामुलींचे, पालक, शिक्षक यांच्याशी बालरंगभूमी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी केले..

शासकीय कामात ए. आय. उपयुक्त ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य‌’ विषयावर चर्चासत्र

पुणे : शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच माहितीचे जतन करण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर प्रभावीपणे होत असून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वापरण्यास सोप्य आणि उत्तम ॲप्सचीही निर्मित होते. यामुळे प्रशासकीय कामकाजात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. माहितीचे (डेटाबेस) संकलन मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शासकीय कामे एका क्लिकवर होण्यास मदत होणार असे मत चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य‌’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश यादव, भूमापन उपसंचालक कमलाकार हट्टेकर, नगर भूमापन उपसंचालक डॉ. राजेंद्र गोळे, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी वरिष्ठ अधिव्याख्यात विकास गरड यांनी संवाद साधला.

डॉ. ओमप्रकाश यादव म्हणाले, स्पर्धा परिक्षांची तयारी करताना माहिती मिळविण्यासाठी खूप वाचन केले. परंतु प्रत्यक्ष काम करतेवळी वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. अनेक शासकीय विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. कार्यप्रणाली सहज सोपी व्हावी म्हणून स्वत: अनेक ॲप्स तयार केली आहेत आणि यशस्वीपणे या ॲप्सचा वापर करत आहे. डिजिटल धोके-तोटे ओळखण्यासाठी तंत्रस्नेही असणे तसेच जागरूक असणे आवश्यक आहे.

कमलाकर हट्टेकर म्हणाले, विविध विषयांचा अभ्यास करताना तंत्रस्नेही असण्याची गरज लक्षात आली. यातूनच विभागाच्या सुलभ कामकाजाच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. यातून इ-मॅपिंग, डिजिटल क्रॉप सर्व्हे अशा प्रणाली विकसित केल्या.

पुस्तकांचे गाव वसविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या डॉ. राजेंद्र गोळे यांनी कल्पन नजरेची गरज, ब्रँडिंग याची महती सांगितली. प्रशासनात काम करताना उत्तम साहित्यकृतींचा वापर करता येतो. शासनाच्या विविध खात्यांमध्ये माहिती संकलनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना भाषा आणि कलाकृतींची सांगड घालत अनेक ॲप्सचा प्रभावी वापर व्हावा, कामकाजातील अचूकता वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सतीश बद्धे म्हणाले, शासकीय कामकाजात विविध प्रकारच्या माहितींचे संकलन मोठ्या प्रमाणात करावे लागते या करिता तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास काम सुकर होते. हे लक्षात घेऊन कोरोना काळात महत्त्वाच्या माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणात केले. विविध शासकीय अभियान राबविताना माहिती एका क्लिक मिळत गेल्याने कामाची गती आणि अचूकता वाढीस लागली.

विश्वास गरड यांनीही प्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयी आपली मते मांडली. आताच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरामुळे प्रशासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणात सुलभता आली आहे. तंत्रज्ञानाच्या मोठ्या वापराबरोबरच विविध विभागांशी माहितीसाठा जोडला गेल्यास कार्यात अधिक प्रमाणात सुलभता येऊ शकते. परंतु माहिती सुरक्षित राहणे, तंत्रज्ञान वापरातील धोकेही ओळखणे आवश्यक आहे. सत्वर-सुशासनासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर उपयुक्त ठरू शकतो.
मान्यवरांचा सत्कार राजीव नंदकर यांनी केला..

दांडेकर पुलावर अमित शहांची प्रतिमा दहन,जोडे मारले…मुंडण केले..


पुणे :

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेपहार्य विधान केले आहे.त्या विरोधात समस्त आंबेडकर अनुयायांनी दांडेकर पूल येथे आंदोलन केले.
या मध्येदांडेकर पूल परिसरातील सर्व धार्मिय नागरिक,महिलांचा तसेच तृतीय पंथीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाले.आंदोलनामध्ये अमित शहा ची अंत्ययात्रा काढून तिचे चौकामध्ये दहनकरण्यात आले.यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी मुंडन करून बोंबा मारून निषेध केला. तसेच त्यांच्या फोटोला महिलांनी चपलांचा मारा केला सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामध्ये अनिल मास्तर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, सुरेखा ताई गायकवाड,, मच्छिन्द्र मामा गायकवाड हनुमंत फडके मामा भोसले, मधुकर काशीद दत्ता सुरते, ऍड किरण कदम किरण गायकवाड, मुकुंद गायकवाड, धुरंधर भालशंकर, मीनाक्षी बनसोडे, सोनिया ओव्हाळ, मीनाक्षी माने, सुवर्णा शिंदे, रजनी लांडगे, यशवंत भोसले, हृषी वाघमारे,राम कदम, दादा पायगुडे, मिलिंद बनसोडे, वसंत कांबळे नागेश भोसले तसेच राहुल अनिल गायकवाड आदी असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

संकटाला संधी माना; हृदयातील आगीला ‘कॅपिटल’ बनवा 

प्रतापराव पवार यांचे प्रतिपादन; विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे ‘अ‍ॅग्रीबिझ कनेक्ट २०२४’चे आयोजन
पुणे: “औद्योगिक क्षेत्रात यशासाठी आर्थिक व्यवस्थापन, कल्पकता, ध्येयासक्ती, आत्मविश्वास आणि मूल्यांची जपणूक महत्वाची आहे. कृषी क्षेत्रात उद्योगांच्या अमाप संधी आहेत. मराठी माणसाने उद्योगाभिमुख मानसिकता विकसित करून त्याला नावीन्यतेची, इच्छाशक्तीची जोड देत स्वतःसह राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे,” असे प्रतिपादन मोर्डे फुड्सचे हर्षल मोर्डे यांनी केले.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या शारदाबाई गोविंदराव पवार उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित समिती उद्योजक परिषद व ‘अ‍ॅग्रीबिझ कनेक्ट २०२४’च्या उद्घाटनप्रसंगी हर्षल मोर्डे बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील देवांग मेहता सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री प्रतापराव पवार होते. सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे गजानन राजूरकर, बारामती ऍग्रोचे निलेश नलावडे, सिंधफळे ऍग्रो फ्रुटचे व्यंकट सिंधफळे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, उद्योजकता केंद्राच्या प्रमुख डॉ. ज्योती गोगटे, कार्यकर्ते हेमंत राजहंस व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच युवा उद्योजिका कीर्ती हासे हिला एक लाखाचे बीज भांडवल देण्यात आले. तर सुरज कुलकर्णी या युवा उद्योजकाने गेल्या वर्षी समितीकडून घेतलेले बीज भांडवल परत केले. 
हर्षल मोर्डे म्हणाले, “तुम्ही सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहात. उद्योजक होण्यासाठी आवश्यक बऱ्याच गोष्टी तुम्हाला उपजतच मिळाल्या आहेत. समितीने मार्गदर्शनासाठी व्यासपीठ दिले आहे. उद्योजक होण्यासाठी एक स्पार्क लागतो, तो कुठून येईल सांगता येत नाही. तुमच्यात तो स्पार्क आहे; त्याला जागे करून कल्पकतेने उद्योग साकारावा. अवतीभवतीच्या नैसर्गिक गोष्टींचा लाभ करून घ्यावा. जोखीम पत्करण्याची तयारी ठेवावी.”
प्रतापराव पवार म्हणाले, “यशाचे गमक म्हणजे आपल्या हृदयातील आग आहे. ती आग हृदयात असेल, तर आपण कोणतेही धेय्य साध्य करू शकतो. संकट ही संधी असते. आपल्याला उच्च दर्जावर पोहोचण्यासाठी संकटे यायलाच हवीत. उद्योग करताना आर्थिक गोष्टीचे भान, जीवनातील प्राधान्यक्रम, वेळेचे महत्व, शिस्तीचे पालन आणि प्रामाणिकपणा जपला पाहिजे. सामाजिक बांधिलकीची भावना कायम मनात जपायला हवी.”
व्यंकट सिंधफळे म्हणाले, “भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहे. हे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपल्याला सर्वच क्षेत्रात पुनर्विचार (री-थिंक) व पुनर्रचना (री-डिझाईन) करण्याची गरज आहे. नेहमीपेक्षा काही वेगळी कल्पना दिली, तर तुमचा व्यवसाय वैश्विक झाल्याशिवाय राहत नाही. कल्पकतेला वाव देण्यासाठी अनेक गुंतवणूकदार सज्ज आहेत.”
गजानन राजूरकर यांनी कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग, संशोधन व इनोव्हेशन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात समितीचे माजी विद्यार्थी आणि कृषी उद्योजक डॉ. संभाजी सातपुते, दिनेश शेळके, निलेश रासकर, पवन दळवी यांनी त्यांचा औद्योगिक प्रवास उलगडला. 
तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्य, ‘अ‍ॅग्रीबिझ कनेक्ट २०२४’च्या आयोजनामागील भूमिका विशद केली. जीवन बोधले यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत राजहंस यांनी आभार मानले. या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी केले.