काश्मिरी साहित्यिक प्राण किशोर कौल यांचा साहित्य अकादमीतर्फे सर्वोच्च फेलोशिपने पुण्यात गौरव
पुणे : वयाच्या 99व्या वर्षी साहित्य अकादमीने सर्वोच्च फेलोशिप प्रदान करून केलेला हा गौरव फक्त माझा एकट्याचा नसून काश्मिरी जनता, काश्मिरमधील साहित्यिक आणि काश्मिरी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे, अशा भावना काश्मिरी लेखक, दिग्दर्शक, नाटककार आणि चित्रकार प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केल्या.
दिल्लीस्थित साहित्य अकादमीतर्फे प्राण किशोर कौल यांचा नुकताच पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह देशातील निवडक साहित्यिकांना या पूर्वी ही फेलोशिप देऊन गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळविणारे कौल हे दुसरे काश्मिरी साहित्यिक आहेत. पहिला पुरस्कार प्रो. रहमान राही यांना मिळाला होता. कुटुबियांच्या उपस्थितीत प्राण किशोर कौल यांचा शाल आणि ताम्रपट देऊन साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक आणि सचिस डॉ. के. श्रीनिवास राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरहदचे अध्यक्ष संजय नहार, लेशपाल जवळगे उपस्थित होते.
प्राण किशोर कौल म्हणाले, आयुष्यात साहित्य अकादमी फेलोशिप मिळण्याचा क्षण येईल अशी मी कल्पनाही केली नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रादेशिक भाषांचा विस्तार साहित्य अकादमीच्या प्रयत्नांमुळे होऊ शकला. 1998 साली माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरही मी विपुल लेखन करीत असताना साहित्य अकादमीशी जोडलेला होतो. माझ्या कारकिर्दीवर चित्रपट बनविला गेला हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. ज्या सुमारास माझा जन्म झाला त्या काळात काश्मीर पूर्णत: अंधारात होते. वीज, पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. त्या काळातही काश्मिरी जनतेचे एकमेकांशी प्रेमपूर्ण संबंध होते. काश्मीरला ऋषीमुनी, संतांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसारही साहित्य अकादमीच्या प्रयत्नाने झाला. जो पर्यंत या देशात सांस्कृतिक एकात्मता, अनुबंध निर्माण होत नाहीत तो पर्यंत देशपातळीवर एकात्मता साधली जाणार नाही. विविध भाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकांना एका धाग्यात बांधण्याचे काम साहित्य अकादमी करीत आहे. यातूनच भाषेच्या सीमा ओलांडणाऱ्या साहित्यिकांचा गौरव या अकादमीतर्फे करण्यात येतो, हे कार्य मोलाचे आहे.
प्राण किशोर कौल यांच्या कार्याचा गौरव करून साहित्यिक डॉ. माधव कौशिक म्हणाले, प्राण किशोर कौल यांनी विविध माध्यमांमधून आपली अभिव्यक्ती प्रदर्शित केली. साहित्यकृती साकारताना चित्रपट निर्मिती, चित्रकृतींच्या माध्यमातूनही ते व्यक्त झाले आहेत. प्राण किशोर कौल हे काश्मिरी संस्कृतीचे प्राणतत्त्वच सिद्ध झाले आहेत. प्राण किशोर कौल यांच्या साहित्यकृती हिमालयासारख्या उंच तर आहेतच त्याच वेळेला त्या नदीच्या खळखळाटासारख्याही भासतात. पद्यरूपी गद्याची लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.सुरुवातीस डॉ. के. श्रीनिवास राव यांनी प्राण किशोर कौल यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाविषयी माहिती दिली.
हा गौरव काश्मिरी भाषा, संस्कृती आणि लोकांचा : प्राण किशोर कौल
तुम्हाला मंत्रीपद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मोर्चात नेत्यांचा आक्रोश
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तर या घटनेचा निषेध करण्यासाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला आहे. याप्रसंगी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सर्वपक्षीय व्यासपीठावरुन मुंडे बहीण भावावर ताशेरे ओढले आहेत. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्य़वस्थेवरुन सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. ‘बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. २०१९ पासून सलग पाच वर्षे पाहतोय कुठे कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. एक सोज्वळ आणि एक तरुण सरपंच संतोष अण्णाला घालवायचं पाप आज या परळीवाल्यांनी केलंय हे उघड आहे.’ असे सोनावणे म्हणाले.
बजरंग सोनावणे म्हणाले, संतोषचं अपहरण झाल्यापासून न्यायासाठी आपण झटतोय. पण अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. फक्त आश्वासन मिळत आलं आहे. ज्यादिवशी मी अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा कुठे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आकाचा मास्टरमाइंड कोण आहे? हे समोर आलं पाहिजे.’ पुढे धनंजय मुंडेंवर निशाणा साधत सोनावणे म्हणाले, ‘मुंडेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला बीडला न्याय द्यायाच असेल आणि या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही बीडच्या जनतेला सांगा फेकतो राजीनामा… तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे. फक्त आमचे पाडायला?’ असा खडा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.सोनावणे पुढे म्हणाले, ‘ते (धनंजय मुंडे) काय म्हणतात जाती धर्माचा विषय ताणला जातो. कोणीतरी मला या प्रकरणात म्हटलं जात आणू नका जातीचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार आहे. आमचे पाटीलसाहेब सुद्धा येतात आणि आमच्या पक्षाचे सुद्धा दोन आमदार आणि खासदार येथे आहेत. आमचे पराजित झालेले दोन्ही उमेदवार असे सर्वपक्षीय आहेत. सर्व जाती धर्माचे आमदार आहेत. ओबीसी आहे जातींचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचे नाव काढता. तुम्हाला जातीच्याशिवाय राजकारण करता येत नाही. तुम्हाला पक्षीय राजकारण करायचं आहे, आम्हाला नाही. आम्हाला संतोष अण्णाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचंय, असा हुंकार सुद्धा सोनावणेंनी भरला आहे.तर ‘प्रशासनाला दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून सांगायच्या आहेत की, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या, त्यांना न्याय द्या. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा. ३०२ मध्ये कराडला आरोपी म्हणून सामावेश करा. २ तारखेपर्यंत यावर कारवाई झाली नाही तर उपोषणाला मी बसणार आहे. अशी मागणी देखील बजरंग सोनावणेंनी केली आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मुंबईत 2 मजुरांना उडवले.. एकाचा मृत्यू
उर्मिला थोडक्यात वाचली, कार चालकावर गुन्हा
मुंबई-अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मुंबईत 2 मजुरांना उडवले असून, त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत स्वतः उर्मिला व तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याची माहिती आहे. शूटिंगवरून घरी परत येताना मुंबईतीत ही घटना घडली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पण ती आज समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, उर्मिला कोठारे शुक्रवारी रात्री उशिरा आपली शूटिंग आटोपून घरी परत जात होती. त्यावेळी तिच्या कारने रस्त्याच्या कडेलो मेट्रोचे काम करणाऱ्या 2 मजुरांना धडक दिली. या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला.
या अपघातात उर्मिला कोठारे व तिचा ड्रायव्हरही जखमी झाला आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. गाडीची एअरबॅग योग्य वेळी उघडल्यामुळे उर्मिलाचा जीव वाचला. पण तिच्या कारचा या घटनेत पूर्णतः चेंदामेंदा झाला. दुसरीकडे, एका मजुराचा बळी गेल्यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. समतानगर पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मनमोहनसिंग पंचतत्वात विलीन:मुलीने मुखाग्नी दिला, तिन्ही सैन्याने सलामी दिली

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी निगम बोधघाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या तोफखाना गाडीमधून त्यांचे पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे तिन्ही सैन्याने त्यांना सलामी दिली. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचे विधी पार पडले.मनमोहन यांच्या पत्नी गुरशरण कौर, मोठी मुलगी उपिंदर सिंग (६५), दुसरी मुलगी दमन सिंग (६१) आणि तिसरी मुलगी अमृत सिंग (५८) निगम घाटावर उपस्थित होते. या कुटुंबाने पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. मुलीने मुखाग्नी दिला.
अंत्यसंस्काराच्या वेळीही मनमोहन सिंग यांना निळी पगडी घालण्यात आली होती. फेंट निळा हा मनमोहन यांचा आवडता रंग आहे आणि त्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या दिवसांची आठवण करून द्यायचा, म्हणूनच ते नेहमी निळा पगडी घालत असत.लष्कराच्या तोफखाना वाहनातून त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर आणण्यात आले होते. राहुल गांधी मृतदेहासोबत गाडीत बसले होते. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घाटावर उपस्थित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मनमोहन यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.

मनमोहन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले होते. डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि मुलगी दमन सिंग यांनी काँग्रेस मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी, सोनिया आणि प्रियंका यांच्याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मनमोहन यांना अखेरचा निरोप दिला.
निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार
काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. “अटल बिहारी वाजपेयी यांचं १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झालं. तेव्हा मोदीच पंतप्रधान होते. तेव्हा वाजपेयींचे अंत्यसंस्कार राष्ट्रीय स्मृतीस्थळावर झाले. जिथे याआधी दिवंगत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार झाले. पण मोदी पंतप्रधान असतानाच आता मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मात्र निगम बोध घाटावर झाले. ते भाजपाचे नसून काँग्रेसचे नेते होते म्हणून हे झालं का?”

डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. घरीच बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रात्री ८.०६ वाजता दिल्ली एम्समध्ये आणण्यात आले. रुग्णालयाच्या बुलेटिननुसार त्यांनी रात्री ९.५१ वाजता अखेरचा श्वास घेतला.

देशातील पहिले शीख पंतप्रधान, सर्वाधिक काळ हे पद भूषवणारे चौथे नेते
मनमोहन सिंग 2004 मध्ये देशाचे 14 वे पंतप्रधान बनले. या पदावर त्यांनी मे 2014 पर्यंत दोन टर्म पूर्ण केल्या होत्या. ते देशातील पहिले शीख आणि सर्वाधिक काळ सेवा करणारे चौथे पंतप्रधान होते.
त्यांच्या निधनाबद्दल केंद्राने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. बेळगावीहून गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे थेट मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी गेले. काँग्रेसने ३ जानेवारीपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
स्वरगंध सांगीतिक मैफलित मंत्रमुग्ध करणारे सतार वादन आणि सुरेल गायन
पुणे : शाकीर खान यांचे पहिल्या झंकारापासूनच मंत्रमुग्ध करणारे सतार वादन आणि भुवनेश कोमकली यांचे भारदस्त, सुरेल गायन ऐकून पुणेकर रसिकांची सायंकाळ स्वरमय झाली. निमित्त होते ते कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित स्वरगंध या सांगीतिक मैफलीचे.
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासणऱ्या कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांचे चिरंजीव मंदार देशपांडे व केदार देशपांडे यांनी या मैफलीचे आयोजन केले होते. मैफल एमईएसचे बालशिक्षण मंदिर सभागृहात झाली.
मैफलीची सुरुवात शाकीर खान यांच्या सुमधुर सतार वादनाने झाली. त्यांनी चारुकेशी रागातील बारकावे आपल्या नजाकतदार वादनाने उलगडून दाखविताना सतार या वाद्यावरील आपली पकड, अतिशय वेगाने चालणारी बोटे त्यातून निर्माण होणारे सतारीचे झंकार अशा प्रभावी सादरीकरणाने रसिकांना विस्मयचकीत केले. शाकिर खान यांच्या जादुई बोटातून उमटलेल्या या रागाने संपूणे वातावरण भारित झाले होते. त्यानंतर शाकिर खान यांनी राग पिलू अमधील रचना सादर केली. खान यांना अमित कवठेकर यांनी परिपूर्ण व समर्पक तबला साथ केली. उमंग ताडफळे यांनी तानपुरा साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांनी गायनाची सुरुवात राग शुद्ध कल्याणमधील बडाख्यालातील ‘ बोलन लागी’ या पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून छोटाख्याल सादर करताना आपले आजोबा व ख्यातनाम गायक पं. कुमार गंधर्व यांची ‘ये मोरा रे मोरा’ ही बंदिश ऐकविली. सुरांवरील पकड, तंत्रशुद्ध-स्पष्ट गायन, दमदार ताना हे गायन प्रभुत्व ऐकून रसिकांनी कोमकली यांना खुली दाद दिली. ‘दिल दा मालक साई’ ही पारंपरिक बंदिश तसेच ‘रूप धरे’ ही कुमार गंधर्व रचित बंदिश सादर करताना कोमकली यांनी आजोबांच्या गायन वैशिष्ट्याची छाप रसिकांच्या मनावर सोडली. रसिक श्रोते व साथसंगतकारांच्या आग्रहपूर्वक विनंतीला मान देऊन भुवनेश कोमकली यांनी राग सोहनी मधील ‘ये द्रुम द्रुम लता’ ही सुंदर रचना मोठ्या आवडीने ऐकविली. रसिक श्रोते कोमकली यांच्या गायनाने इतके प्रभावित झाले की कोणीही मैफल सोडून जायला तयार नव्हते. रसिकांच्या या असीम प्रेमामुळे कोमकली देखील भावविभोर झाले. कोमकली यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), संजय देशपांडे (तबला) यांनी दमदार साथ केली.
कलाकारांचा सत्कार कै. अरविंद देशपांडे यांच्या पत्नी अनुराधा देशपांडे व पुतण्या हेमंत देशपांडे यांनी केला. प्रास्ताविकात मंदार देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करून मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व कलाकार परिचय आरती पटवर्धन यांनी करून दिला.
ज्येष्ठ पत्रकार डॅा. किरण ठाकूर यांचे निधन
पुणे, ता. २८: ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे (रानडे) निवृत्त विभागप्रमुख डॅा. किरण ठाकूर (वय ७७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नर्मदालयाच्या संस्थापक भारतीताई ठाकूर या त्यांच्या भगिनी होत.
गेल्या आठवडाभरापासून डॉ. ठाकूर आजारी होते. थकवा जाणवत असल्याने त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
एमआयटी महाविद्यालयाचे प्राध्यापक नचिकेत ठाकूर व दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांचे निर्माते पार्थ हे त्यांचे पुत्र होत.
डॅा. ठाकूर यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.
अल्पपरिचय
डॉ. ठाकूर यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (यूएनआय) या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले.
डॉ. ठाकूर यांनी २००१ मध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २००१ ते २००७ या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. डॉ. ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केले. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.
विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च, तसेच फ्लेम आणि विश्वकर्मा विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले. भारतीय विद्याभवनच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे कामही त्यांनी काही काळ केले.
जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग आणि तनमर्गमध्ये बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ६८ पर्यटकांची लष्कराने शुक्रवारी रात्री केली सुटका .
बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह महामार्ग बंद:श्रीनगर विमानतळावरील 5 उड्डाणेही रद्द
श्रीनगर-अचानक मुसळधार बर्फवृष्टी आणि रस्ते बंद झाल्यामुळे 30 पुरुष 30 महिला आणि 8 मुले अशी 68 लोक खोऱ्यात अडकले असल्याचे लष्कराने सांगितले. त्यांची सुटका करून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्यांना निवारा आणि औषधेही देण्यात आली.बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह महामार्ग आणि मुघल रोड बंद करण्यात आला आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर दोन हजार वाहने अडकली. श्रीनगर विमानतळावरील 5 उड्डाणेही रद्द करण्यात आली. बनिहाल-बारामुल्ला मार्गावरील रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.
येथे थंडीबरोबरच मैदानी भागातही पाऊस होताना दिसत आहे. शुक्रवारी दिल्लीत २४ तासांत ९.१ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या 15 वर्षांतील डिसेंबर महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस होता.
त्याच वेळी, राजस्थानमधील अजमेरमध्ये डिसेंबर महिन्यात गेल्या 24 तासांमध्ये 21.4 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 14 वर्षांतील डिसेंबरमधील हा सर्वाधिक पाऊस आहे.
मुजफ्फरपूर, यूपीमध्ये मुसळधार पावसामुळे एक घर कोसळले, परिणामी एका महिलेचा मृत्यू झाला. पाऊस आणि थंडीमुळे गाझियाबाद-मेरठमध्ये आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.शुक्रवारी मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. पावसासोबतच रतलाम, मंदसौर, बैतूल, अलीराजपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही झाली. शनिवारीही असेच वातावरण राहील.
देशमुख प्रकरणातील फरार आरोपींचा खून:अंजली दमानियांचा मोठा दावा
288 पैकी 118 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. अशावेळी हे गुन्हेगार विधानसभेत जाऊन काय करणार?
धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी
अंजली दमानिया देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला-अंजली दमानिया या देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्या. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे देखील या वेळी त्या म्हणाल्या. या प्रकरणात फरार आरोपींचा खून झाला असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्या संबंधी त्यांना आलेल्या कॉलची माहिती देखील त्यांनी दिली.
बीड-आजचा मोर्चा म्हणजे राजकीय ड्रामा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे त्या मोर्चात सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. या वेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट देखील घेतली. या प्रकरणातील आरोपींचा खून झाल्यासंदर्भात माहिती देणारा आपल्याला कॉल आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
पोलिस असो किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असेल, ते केवळ जी हुजुरी करत आहेत. ही सर्व यंत्रणा राजकीय लोकांनी सांगतले तेवढेच काम करत आहेत. हे आता थांबायला हवे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्यांना धनंजय मुंडे कसे आहेत, हे माहिती आहे. त्यांचे अनेक कारनामे आम्हाला पाठिशी घालावे लागले असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी न होता, ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. आपल्याला आलेल्या कॉलचा हवाला देत या प्रकरणातील आरोंपींचा खून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील माहिती आपण बीडच्या एसपींना दिली आहे. त्यामुळे पुढील चौकशी करण्याचे त्यांचे काम आहे. मात्र, या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
महाराष्ट्रामध्ये 288 आमदार निवडून आले आहेत. त्यातील 118 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. अशावेळी हे गुन्हेगार विधानसभेत जाऊन काय करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे लोक आपल्यासाठी कायदे बनवणार, हे बुद्धीला पटत नसल्याचे देखील दमानिया यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्याने मंत्री पदाची शपथ घेतली, तो व्यक्ती आम्हाला विधानसभेतच नको. त्यामुळेच आम्ही त्यांच्या राजीनामाची मागणी करत असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
पदार्पणताच मलेशिया चॅम्पियनशिप रॅली विजेती ठरली निकिता टकले खडसरे
आंतरराष्ट्रीय स्तरावर रॅली जिंकणारी निकिता पहिलीच युवती स्पर्धक
पुणे-मलेशिया मध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले. तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदविलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता. राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली. स्पर्धेच्या चार विभागात निकिताने ट्रॉफी मिळविली आहे.
एम.आय.आर.सी रॅली ऑफ आशान, मलेशिया मध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, चायना देशातील सुमारे 22स्पर्धक सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय, राष्ट्रीय, पातळीवर स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचनींना निकिताला सामोरे जावे लागले, त्यात भाषा, तंत्रज्ञान, नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले, रॅली सूरु झाल्यावर पहिल्याच स्टेजमध्ये एक किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली, कार दुरुस्त केली पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली, यामध्ये नऊ स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत
चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली, सुमारे 365 रॅली त्यातील 86 आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्याने सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याचे निकिता आवर्जून सांगते.
दोन दिवसीय रॅलीमध्ये पाऊस असल्याने खूप उष्ण वातावरण निर्माण झाले होते, उष्माघात चा त्रास अनेकांना सहन करावा लागला, वातावरण रॅलीसाठी उपयुक्त नव्हते, अशा परिस्थिती मध्ये नवखी आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या निकिताने यश मिळविले, मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते, या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात, त्यामुळे या रॅलीला अधिक महत्व आहे.
पामच्या झाडांमधून कार चालविताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्याने निकिता टकले खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीत भारताचा झेंडा फडकविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळविणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे.
आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केलेले संजय टकले, गौरव गिल, अरोर अर्जुन राव, कर्णाकदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसरेने मिळविला आहे.
राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचे निकिता आवर्जून सांगते. तसेच आंतरराष्ट्रीय डब्ल्यू आर सी रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला २ लाखांचा टप्पा
राज्यात पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक ४० टक्के प्रतिसाद
पुणे, दि. २७ डिसेंबर २०२४: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे प्रादेशिक विभागातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये तब्बल दोन लाखांचा टप्पा गाठला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ११३ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. तसेच ‘गो-ग्रीन’ योजनेमुळे या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागात मिळाला असून राज्यात महावितरणच्या १६ परिमंडलांमध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलामध्ये १ लाख ३४ हजार वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.
पर्यावरणात दिवसेंदिवस प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज झाली आहे. पुणे प्रादेशिक विभागातील वीजग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे. ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन ऑनलाइनद्वारे त्वरित वीज बिल भरणा करणे आणखी शक्य झाले आहे. लघुदाब वीजग्राहकांनी कागदी बिलांचा वापर बंद करून ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर सातारा जिल्ह्यातील १३ हजार १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.
‘गो-ग्रीन’ योजनेतून कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ मधील ग्राहकांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. त्याची गरजेनुसार केव्हाही प्रिंट काढता येईल. सोबतच वेबसाईटवर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in वेबसाईट येथे सुविधा उपलब्ध आहे.
दाऊदी बोहरा समाजानं घेतला मोठा निर्णय- 15 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी
पुणे : सध्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलं ही मोबाईलचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. जेवण करताना मोबाईल, घरी असताना मोबाईल, तसंच झोपताना देखील मोबाईलचा वापर होतो. मोबाईल स्क्रीनचा वापर अधिक होत असल्यानं लहान मुलांवर याचा मोठा परिणाम होत आहे. हीच बाब लक्षात घेत दाऊदी बोहरा समाजानं मोठा निर्णय घेतला आहे. या समाजानं घातली आहे. या निर्णयाचं समजाकडून स्वागत करण्यात येत असून हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं बोललं जातय.
लहान मुलांना मोबाईल बंदी : जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या देशात शहरात दाऊदी बोहरा समाज हा आपल्याला पाहायला मिळतो. या समाजाची ओळख म्हणजे या समाजाचे लोक व्यवसाय करतात. अतिशय जागृत आणि एकमेकांना मदत करणारा, अशी या समाजाची ओळख आहे. या समाजाचे धर्मगुरू सय्यदना यांनी मुंबई येथे झालेल्या व्याख्यानात समाजातील लहान मुलांना मोबाईल बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोबाईल न वापरण्याबाबत जनजागृती : याबाबत दाऊदी बोहरा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते युसुफ डांबरवाले म्हणाले, “सध्या लहान मुलांमध्ये मोबाईल स्क्रीन बाबतचा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त आमच्या समजापुरता मर्यादित नाही. आजकाल प्रत्येकाच्या घरात ही समस्या निर्माण झाली आहे. लहान मुलं सध्या मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत असतात. मुलं रडली किंवा जेवत नसली की त्यांना पालकही मोबाईल देतात. हीच बाब लक्षात घेत धर्मगुरू सय्यदना यांनी प्रवचनात 15 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाचं आम्ही सर्वजण पालन करत आहोत. तसंच ठिकठिकाणी जाऊन मुलांमध्ये मोबाईल न वापरण्याबाबत जनजागृती करत आहोत.”
हा क्रांतिकारी निर्णय : यावेळी याच समाजाचे मुर्तुझा मॅनेजर म्हणाले, “जेव्हा आमच्या सय्यदना यांनी हा निर्णय घेतला तेव्हापासूनच आम्ही याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. आमच्यात धर्मगुरू सय्यदना जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असतो. आता त्यांचा हा निर्णय लहान मुले देखील मान्य करत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी मुलं मोबाईल वापरत नाहीत. हा क्रांतिकारी निर्णय असून मी तर सर्वांना आवाहन करेन की, याची अंमलबजावणी सर्वांनी करावी.”
पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला सुरुवात
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पुणे केंद्रात बाजी मारणाऱ्या म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘बस नं. 1532’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीला आज (दि. 27) सुरुवात झाली.
महाअंतिम फेरीत पाच विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळच्या सत्रात म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणेच्या ‘बस नं. 1532’चे आणि न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या ‘देखावा’ या एकांकिकांचे सादरीकरण झाले. तर सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन), संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (रंगवास्तू) यांचे सादरीकरण झाले.
दि. 28 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी 9 वाजता
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (यात्रा)
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी (होळयो नागरा)
सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड (समाप्त)
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पिंडग्रान)
वेळ : सायंकाळी 4 वाजता
शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर (कलम 375)
आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख (हिरो नंबर 1)
राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर (व्हाय नॉट?)
सरस्वती भुवन आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेज, छत्रपती संभाजीनगर (शहाजी)
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (तमसो मा ज्योतिर्गमय)
दि. 29 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी 9 वाजता
देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर (फाटा)
म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस (सखा)
प्रादर्शिक कला विभाग -1 (सं. गा. बा. अ. वि.), अमरावती (उत्खनन)
विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी)
अध्यापनात वैविध्यता आणण्यासाठी ‘आनंद पेरीत जाताना’ ललित लेखसंग्रह ठरेल वस्तुपाठ : प्रा. रवींद्र कोठावदे
दयानंद घोटकर लिखित ‘आनंद पेरीत जाताना’ ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : अध्यापनातील तोच-तोपणा टाळत वैविध्यता आणून ते अधिक प्रभावी कसे करता येईल याचा वस्तुपाठ ‘आनंद पेरीत जाताना’ या ललित लेखसंग्रहातून शिक्षकांना नक्कीच मिळेल. आपले चुकते कुठे, नेमके काय करावे आणि करू नये हे सुद्धा यातून कळेल, असे प्रतिपादन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले.
दयानंद घोटकर लिखित ‘आनंद पेरीत जाताना’ या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अभिनव विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. कोठावदे बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापीका वंदना अणेकर यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षिका नयना सावंत मंचावर होत्या.
प्रा. कोठावदे पुढे म्हणाले, वास्तव स्वीकारून आपल्या पाल्याची जडणघडण कशी करावी याचे मार्गदर्शनही या ललित लेखसंग्रहातून होण्यास मदत होणार आहे. ललित लेखनाचा आधार घेऊन प्रहसनाद्वारे विषयांची मांडणीही चांगल्याप्रकारे होऊ शकेल.
मुख्याध्यापिका वंदना अणेकर म्हणाल्या, शाळेचे माजी शिक्षक असलेल्या घोटकर यांनी पुस्तक प्रकाशनाचा मान शाळेला दिला ही आनंदाची बाब आहे. या पुस्तकाचे वाचन विद्यार्थ्यांसह पालकांनीही करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
दयानंद घोटकर म्हणाले, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात वावरत असताना खूप काही शिकायला मिळाले. त्यातील काही अनुभवांमधून निवडक प्रसंग छोट्या-छोट्या ललित लेखांमधून मांडले आहेत. यातीलकाही लेख हलके-फुलके तर काही वैचारिक स्वरूपाचे आहेत. यात मातृभाषा, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाचा सन्मान तसेच प्रार्थना, छंद, शिक्षा याविषयांवरही लेखन केले आहे. शिक्षकांसह पालकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती जोशी यांनी केले. दिलीपराज प्रकाशनने पुस्तक निर्मिती केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार.
बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आदिवासी महोत्सव
आदिवासी उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड आयोजित धानोरी येथे शोभायात्रा
पिंपरी, पुणे (दि.२७ डिसेंबर २०२४) क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी उत्सव समिती पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि.२९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता, धानोरी पुणे येथील चैतन्य गगनगिरी कार्यालय येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता धानोरी येथील आदिवासी भीमाशंकर तरुण मित्र मंडळ, मुंजाबा वस्ती येथून चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजन समिती सदस्य विठ्ठल कोथेरे, पांडुरंग ढेंगळे, पांडुरंग तळपे, माजी नगरसेविका आशाताई सुपे, उषाताई मुंढे तसेच दीपक साबळे, निवृत्ती शेळकंदे, दत्तात्रय कोकाटे, गौरी लांघी, प्रतीक्षा जोशी, आनंद भवारी, ढवळा ढेंगळे, सतीश लेंभे, रूपाली डगळे, दीपक विरणक, संजय मांडवे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या सांस्कृतिक महोत्सवात आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड शहर सह समस्त आदिवासी समाज संघटना पुणे, सर्व आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
या शोभायात्रेचे उद्घाटन सीताताई किरवे यांच्या हस्ते आणि राजीव नंदकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्ष स्थानी विठ्ठल कोथेरे हे असणार आहेत.
यावेळी श्रीकांत कोळप, श्रीनिवास दांगट, मुकेश कोळप, आशादेवी दुरगुडे, हरी मोहन मीना साहेब, डॉ. पुनाजी गांडाळ, शकुंतलाताई धराडे, भाऊसाहेब सुपे, मारुती सांगडे, देवराम लांडे, रोहिणी चिमटे, संगीता केंगले आधी प्रमुख पाहुणे उपस्थिती राहणार आहेत. तसेच डॉ. संजय दाभाडे, डॉ. अमोल वाघमारे, डॉ. निर्मला झांजरे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या महोत्सवामध्ये भीमाशंकर आदिवासी तरुण मंडळ धानोरी, सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ धानोरी, सह्याद्री आदिवासी महिला प्रतिष्ठान पिंपळे गुरव, आदिवासी समाज कृती समिती पुणे, महाराष्ट्र आदिवासी सेवा संघ दिघी पुणे, भारत माता मित्र मंडळ दिघी, आदिवासी महासंघ पुणे, पिंपरी चिंचवड मनपा अनुजमाती शिक्षक कर्मचारी संघटना, सह्याद्री आदिवासी विकास व प्रबोधन संस्था पिंपळे गुरव, पीएमपीएमएल आदिवासी कर्मचारी संघटना पुणे, मागासवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पुणे, डॉ. एस. एम. सुपे मेमोरियल फाउंडेशन, सह्याद्री आदिवासी ठाकूर ठाकर उन्नती मंडळ महाराष्ट्र, सह्याद्री आदिवासी नोकरवर्ग ठाकूर ठाकर, सह्याद्री आदिवासी कोळी महादेव समाज संस्था महाराष्ट्र राज्य, आदिवासी गौंड समाज मंडळ पुणे, कोकणा कोकणी आदिवासी समाज सेवा संघ पुणे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन पुणे, ट्रायबल डॉक्टर फोरम महाराष्ट्र, ट्रायबल इंजिनियर फोरम महाराष्ट्र, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र, हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी संघटना पुणे, वीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना पुणे विद्यापीठ, एसटी कामगार संघटना दापोडी, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र, पुणे मनपा अनु जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, आदीम यंग ग्लॅडीएटर्स महाराष्ट्र, आदी शिवशक्ती युवक प्रतिष्ठान बोपखेल पुणे, ५१२ कमांड पतसंस्था खडकी पुणे, नवजीवन आदिवासी संस्था बोपखेल पुणे, आदिवासी सामाजिक विकास संस्था पुणे, बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा महाराष्ट्र पुणे, आदिवासी सेवा मंडळ पुणे, पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, भीमाशंकर मित्र मंडळ गणेश नगर बोपखेल, संगम मित्र मंडळ किवळे, आदिवासी सेवा प्रतिष्ठान पुणे, आदिवासी युवा मंच हडपसर, बिरसा क्रांती दल पुणे, उत्कर्ष संस्था महाराष्ट्र, पुणे शहर आदिवासी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आदी संस्था सहभागी होणार आहेत.
यामध्ये पालघर येथील कलापथक आदिवासी नृत्य सादर करणार आहे. तर तेजुर येथील कलापथक डांगी नृत्य, धानोरी येथील आदिवासी महिला पथक आदिवासी नृत्य सादर करतील आणि पालघर येथील विक्रम कवटे गायन सादर करणार आहेत. या महोत्सवात सर्व आदिवासी बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हडपसरमध्ये नशेच्या ड्रग्जची इंजेक्शन्स विकणाऱ्या अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुरला पकडले
पुणे-हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंन्जेक्शनची बेकायदेशिरपणे विक्री करणा-या महिलेस पकडून हडपसर पोलीस तपास पथकाकडून अंदाजे १लाख रुपये किंमतीच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) च्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.बिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर वय २६ वर्षे रा. माळवाडी हडपसर असे या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’मागील काही महिन्यांपासून हडपसर परिसरातील अल्पवयीन मुले मॅफेनटरमाइनचे इन्जेक्शन घेवून नशापाणी करून गुन्हेगारीकडे वळत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी या बाबत सक्त कारवाई करणेबाबत तपास पथकास सुचना दिल्या होत्या.
दिनांक २६/१२/२०२४ रोजी तपासपथक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना प्राप्त गुप्त बातमी वरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक,. संतोष पांढरे, यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक, अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, आणि तपासपथक अंमलदार सुशील लोणकर, प्रशांत दुधाळ, निखील पवार, कुंडलीक केसकर, निलेश किरवे, गायत्री पवार यांचे सह मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने छापा कारवाई करून संशयीत महिला अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर वय २६ वर्षे रा. माळवाडी हडपसर पुणे हिस ताब्यात घेवुन तिच्याकडून एकूण १६० MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. त्याबाबत तिचेकडे विचारणा केली असता, ती सदरचे औषध हे नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ४००/- ते ५००/- रुपयाला विक्री करत असल्याचे सांगितले.
आरोपी महिला अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर, हिचेकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणा-या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होवु शकते हे माहित असताना सुध्दा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता आपले कब्जात घेवुन मिळून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१९४१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२७५, २७८,१२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपीकडे केले कौशल्यपुर्ण तपासात तिचेकडून MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP च्या एकूण १६० बॉटल्स या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची बाजार भावानुसार अंदाजे किंमत १,००,०००/- इतकी आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. श्री. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, संतोष पांढरे, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे) श्री. अमर काळंगे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक
