Home Blog Page 511

नवीन ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’ सादर करून ‘टाटा न्यू’ने बचतीला दिली गती

• डिजिटल पद्धतीने दहा मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत मुदत ठेवीत गुंतवा किमान १००० रुपयांची रक्कम आणि मिळवा ९.१ टक्क्यांपर्यंतचा व्याजदर.

•विविध बॅंका आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकश्रीराम फायनान्सबजाज फायनान्स यांसारख्या एनबीएफसी या दोन्हींमधून विविध प्रकारच्या वित्तपुरवठा पर्यायांची उपलब्धता.

• बँकांच्या ठेवींमधील गुंतवणूक असते सुरक्षित; या ठेवींना डीआयसीजीसीतर्फे मिळते ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण.

भारत, 08 जानेवारी २०२५ : टाटा डिजिटल कंपनीने आपल्या टाटा न्यू या प्लॅटफॉर्मवर फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस ही सुविधा सादर केली असून या माध्यमातून किरकोळ गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना ९.१ टक्क्यांपर्यंतच्या व्याजदराने आघाडीच्या वित्तीय संस्थांमध्ये मुदत ठेवींत गुंतवणूक करता येईल. त्याकरीता त्यांना बॅंकेच्या बचत खात्याची गरज लागणार नाही.

गुंतवणूक करणे आता पूर्वीपेक्षा सोपे आणि अधिक सुलभ झाले आहे. ‘टाटा न्यू’चे ग्राहक आता कमीतकमी १००० रुपयांची गुंतवणूक अखंड डिजिटल प्रक्रियेद्वारे अवघ्या १० मिनिटांत करू शकतात. ग्राहकांची सुरुवातीच्या भांडवलाची रक्कम कितीही असली, तरी या सुविधेमुळे प्रत्येक ग्राहकासाठी आर्थिक सक्षमीकरणाचे दरवाजे उघडले जातील. थेट बॅंकांमध्ये होणाऱ्या या गुंतवणुकीवर ‘डिपॉझिट इन्शुरन्स अॅंड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) या संस्थेद्वारे ५ लाख रुपयांचा विमा मिळतो. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षितता आणि संपूर्ण मानसिक शांती मिळते.

टाटा डिजिटलचे वित्तीय सेवा विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी गौरव हजरती म्हणाले, “मुदत ठेव हा सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठीचा एक विश्वासार्ह पर्याय आहे. आमच्या ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’मध्ये आम्ही ग्राहकांना निश्चित परतावा व उच्च व्याजदर देणाऱ्या विश्वसनीय वित्तसंस्थांच्या सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. बाजारातील स्पर्धात्मक व्याजदर मिळवून देण्यासाठी हा साधा, सुरक्षित प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे. त्याचा लाभ नवोदित आणि अनुभवी अशा दोन्ही गुंतवणूकदारांना होईल आणि त्यांना आपली संपत्ती सहजतेने वाढविण्याचा आत्मविश्वासही यातून मिळेल.”

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे डिजिटल बॅंकिंग विभागाचे प्रमुख विशाल सिंग या संदर्भात म्हणाले, “सूर्योदय’ने नेहमीच आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींसाठी स्पर्धात्मक व्याजदर दिलेले आहेत. आमच्याकडे मुदत ठेवींची योजना डिजिटल स्वरुपात आहे. ग्राहकांना ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू करता येते, तिचे व्यवस्थापन करता येते आणि ती ऑनलाईन पद्धतीनेच बंद करता येते. ‘टाटा डिजिटल’शी भागीदारी केल्याने आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास आणि नाविन्यपूर्ण योजना त्यांच्यापर्यंत नेण्यात मोठी मदत होणार आहे.”

श्रीराम फायनान्सचे सीएफओ आणि व्यवस्थापकीय संचालक पराग शर्मा म्हणाले, “टाटा न्यू प्लॅटफॉर्मवर आमच्या मुदत ठेवी सादर करण्याकरीता आम्ही ‘टाटा डिजिटल’सोबत भागीदारी केली आहे. आम्ही महिला ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ व चांगला परतावा देत असतो. आमच्या या भागीदारीमुळे ग्राहकांना मुदत ठेवी ठेवण्याचा अखंडीत व सुरळीत अनुभव मिळेल.”

‘टाटा न्यू’च्या ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’मध्ये आणखी अधिक बँका सहभागी होणार असल्याने ग्राहकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. त्यांना नियमित व पद्धतशीर गुंतवणूक करता यावी, यासाठी टाटा न्यू आवर्ती ठेवी (रिकरिंग डिपॉझिट) योजनादेखील सुरू करणार आहे.

गंधर्व लॉजमध्ये… तीन पत्ती जुगार-व्यापारी पकडले

पुणे–शिवाजीनगर येथील गंधर्व लॉजमध्ये बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून जुगार खेळणार्‍या ६ प्रतिष्ठितांना पकडले. त्यांच्याकडून पौंड, डॉलर या परदेशी चलनासह ६ लाख ३७ हजार २९० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याचवेळी जुगार खेळण्यासाठी खोली उपलब्ध करुन देणारे हॉटेल मालक शेट्टी व चालक सचिन मेश्राम यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

गौरव संपत राठोड (वय २९, रा. गंगाधाम मार्केटयार्ड), हरिश फुटरमल सोलंकी (वय ५४, रा. कोर्णाक प्लस, सोपान बाग), रितेश जयंतीलाल ओसवाल (वय ३४, रा. राजलक्ष्मी सोसायटी, मार्केटयार्ड), पराग आनंदराव मुथा (वय ४१, रा. गगनविहार, मार्केटयार्ड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस अंमलदार सचिन चंद्रकांत जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सचिन चंद्रकांत जाधव यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, शिवाजीनगर येथील गंधर्व लॉज येथे जुगार चालू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, हवालदार चव्हाण, मोहिते, पवार, पोलीस अंमलदार दडस, सांगवे, तायडे यांनी गंधर्व लॉजमधील पहिल्या मजल्यावरील खोलीवर छापा टाकला. तेव्हा तेथे सहा जण पत्ते खेळत होते. गौरव राठोड याला विचारल्याने त्यांनी आम्ही सर्व जण तिर्रट नावाचा तीन पत्ती जुगार पैशांवर खेळत असल्याचे सांगितले.

त्यांच्यासमोर वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या कॉईन होत्या. त्यातील हिरव्या रंगाच्या कॉईनची किंमत २० रुपये, लाल रंगाचे कॉईनची किंमत १०० रुपये व काळ्या रंगाच्या कॉईनची किंमत १ हजार रुपये असल्याचे सांगितले. या सर्वांची झडती घेऊन त्यांचे मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा ६ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे अधिक तपास करीत आहेत.

विश्वास कुलकर्णी,जयंत इनामदार यांना जीवन गौरव पुरस्कार

‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ कडून घोषणा 

पुणे:‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए) तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी (संस्थापक,व्हीके ग्रुप) आणि ज्येष्ठ अभियंता जयंत इनामदार(संस्थापक,स्टर्डकॉम कन्सल्टंट्स) यांना जाहीर झाला आहे.आर. बी. सुर्यवंशी (उपाध्यक्ष व संचालक मंडळ सदस्य, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. स्मिता पाटील (अध्यक्ष, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल) उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम शुक्रवार, १० जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, रॉयल हॉल, गार्डन कोर्ट, एनडीए  रस्ता  येथे आयोजित केला आहे.या वार्षिक पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे. 

‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए)   चे प्रेसिडेंट आर्किटेक्ट राजीव राजे, उपाध्यक्ष आर्किटेक्ट संजय तासगांवकर, चेअरमन आर्किटेक्ट महेश बांंगड आणि  सचिव आर्किटेक्ट निनाद जोग यांनी ही माहिती दिली. ‘सॉलिटेअर ग्रुप’ च्या सहकार्याने हा सोहळा होत आहे.हा पुरस्कार सोहळा १८ व्या वर्षात पदार्पण करत असून, पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि विशेष प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए)   दरवर्षी  एका ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एका ज्येष्ठ अभियंत्याचा त्यांच्या क्षेत्रातील तसेच  विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करते.

५४ वर्षांचे गौरवशाली योगदान पुण्यातील ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (AESA) ची स्थापना १९७० साली झाली. बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी हातभार लावावा, या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. स्वयंसेवी आणि ना-नफा तत्त्वावर आधारित ही संस्था आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्ससाठी उत्कृष्ट व नैतिक कार्यपद्धतीला  प्रोत्साहन देत असून, पुणे शहराच्या सामाजिक व नागरी प्रश्नांमध्ये सक्रीय सहभाग घेत आहे.संस्थेच्या उपक्रमांचे आयोजन मुख्यतः सदस्यांच्या वर्गणीतून आणि उदार देणगीदारांकडून मिळणाऱ्या प्रायोजकत्वातून केले जाते. शहराच्या कल्याणासाठी उत्पादक, वितरक आणि औद्योगिक संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या मदतीतून हे उपक्रम राबवले जातात.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या वतीने नव्याने पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान”

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या वतीने आज शहराध्यक्ष दीपक मानकर आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालय गुप्ते मंगल कार्यालयात पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग विभागा चे वतीने पुणे शहरातील व वाई महाबळेश्वर या तालुक्यातील महिला व पुरुष प्रतिनिधी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी दीपक मानकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात उद्योग विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे राज्यातील व पुण्यातील युवक युवतींना तसेच महिलांना स्वयंरोजगार मिळावा याकरिता प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शक व मदत केली जाणार आहे. याकरिता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे काही सहकार्य व मदत लागेल की पूर्णपणे देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपणी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील जास्तीत जास्त तरुण पिढींना स्वयंरोजगाराची माहिती त्याचबरोबर शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य पोहोचवण्याकरिता पक्ष संघटनेच्या वतीने उद्योग विभाग सक्रिय काम करत आहे व उद्योग विभागाच्या वतीने महिला बचत गट व इतर तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावे याकरिता औद्योगिक प्रशिक्षण तसेच कृषी विभागाच्या वतीने विविध मार्गदर्शक मेळावे लवकरच घेणार आहोत व त्यामधून जास्तीत जास्त तरुण मुले मुली यांना स्वतःचा व्यवसाय करणेबाबत मार्गदर्शक केली जाणार आहे.
सदर नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चैतन्य नरेंद्र जोशी यांनी पुढाकार घेतला होता. प्रशांत कुस्पे पाटील त्याचबरोबर इतर पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आज नियुक्तीपत्र संजय आनंद बावळेकर- पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष, संजना अभिजीत जाधव – पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष, उमा संतोष सोंडकर – वाई तालुका अध्यक्ष, दत्तात्रय हरिभाऊ बावळेकर – महाबळेश्वर तालुका अध्यक्ष, प्रशांत अशोक कुमावत – पुणे शहर उपाध्यक्ष, सागर रमेश उपासनी – पुणे शहर उपाध्यक्ष, हेमंत भगवान फरीदखाने ( गवळी ) या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, प्रदेश उपाध्यक्ष संजय बावळेकर, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चैतन्य जोशी, मेहबूब शेख, अजय मिमनपल्ली, कविता गायकवाड,आमीर खाटिक,साक्षी सोंडकर,ऐश्वर्या वनारसे,शुभम सोंडकर,शाम शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा शिवसैनिकांचा निर्धार.

पुणे-विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच महापालिकेच्या निवडणुकांसाठी विविध पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असून विविध विकासकामे घेऊन नागरिकांपर्यंत पोचण्याच प्रयत्न प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे. अशातच हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांची आढावा बैठक शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुकांसाठी संघटन बांधणी, पक्षाचे धेय्य धोरणे, पक्षाची कामे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी तन मन लाऊन काम करणे आवश्यक असल्याचे नाना भानगिरे यांनी या बैठकीत सांगितले. त्याचबरोबर पुणे शहरात विविध ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या जोरावर नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतरुपी आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून दिले तसेच यामध्ये शिवसैनिकांनी देखील अथक परिश्रम घेतले त्याबद्दल नाना भानगिरे यांनी सर्वांचे आभार मानले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला.
तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीने विधानसभा निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. लाडकी बहिण योजनेसह विविध योजना जनतेसाठी राबवल्या गेल्या त्याचा लाभही अनेकांना झाला. आगामी महापालिका निवडणुकीत या सर्व योजना आणखी प्रभावीपणे जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर पुणे शहरात शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील.

  • प्रमोद नाना भानगिरे
    (शहरप्रमुख, शिवसेना पुणे शहर)

एमआयटी-एडीटी विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा

0

पुणे ः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे येथे नवीन वर्षाची सुरुवात एकात्मता आणि प्रेरणादायी ऊर्जेसह माजी विद्यार्थी मेळाव्याने करण्यात आली. या मेळाव्याच्या निमित्ताने 100 हून अधिक माजी विद्यार्थी आपल्या मातृसंस्थेत परतले. एलुमनाई असोसिएशन(एमएए) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश “विकसित भारत 2047” या संकल्पनेवर आधारित होता. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या मेळाव्याचे उद्घाटन एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ. सुनीता कराड, प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. वीरेंद्र व्ही. शेटे, डाॅ.सुराज भोयर, प्रा. हर्षित देसाई, डॉ. संकेत बापट, डॉ. संदीप गायकवाड आणि डॉ. रीना पगारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

एमआयटी-एडीटी माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख डॉ. सुराज भोयर हे सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना म्हणाले, “एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे अभिमानी प्रतिनिधी म्हणून आमचे माजी विद्यार्थी संस्थेच्या परंपरेचे आणि प्रगतीचे खरे आधारस्तंभ आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, भारताला 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करताना आपण नवकल्पनांवर भर देत, सातत्यपूर्ण कृतीने सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले पाहिजे.”

विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबद्दल आपले अनुभव शेअर केले आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठाने त्यांच्या यशाचा पाया कसा घातला हे सांगितले. तसेच, अनेक विद्यार्थ्यांनी “विकसित भारत” मिशन अंतर्गत सामाजिक प्रगती व नवकल्पनांसाठी योजना सादर केल्या.

माजी विद्यार्थी आमच्या मुल्यांचे प्रतीक
कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. कराड म्हणाल्या, “आमचे माजी विद्यार्थी एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या मुख्य मूल्यांचे प्रतीक आहेत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा आहेत. त्यांच्या यशामुळे हे सिद्ध होते की, आमचे विद्यापीठ समाजात बदल घडवून आणनारे व राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणारे नेतृत्व घडवत आहे.” कार्यक्रमात माजी विद्यार्थी व सध्याचे विद्यार्थी यांच्यात संवाद झाला, ज्यामुळे भविष्यात प्रभावी प्रकल्पांसाठी सहकार्याचा मार्ग तयार झाला. या मेळाव्याच्या अखेरीस सर्व माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीसाठी समर्पणाची शपथ घेतली आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी आपली सामूहिक बांधिलकी पुन्हा जाहीर केली.

‘कपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले’

ज्ञानज्योती सावित्रीबाईंना भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांचे कवितेतून अभिवादन

पुणे : ‘तिला संपवायला निघालेले, स्वतःच संपून गेले, कपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले’, ‘मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडे वाडा बोलला’, ‘मी भिडेवाडा बोलतोय’, ‘सावित्रीमाय तुले कविता करस’, ‘जाली सुरु चलयाची शाळा भिडेवाड्यान’, ‘शिक्षणाचा सूर्य उगवला वाड्यात भिडेच्या पुण्याला’, ‘माय सावित्री तुला वंदन विजयचे’, ‘उन्हायान ऊन झेल पावसायन पाणी झेल’ अशा मराठी, अहिराणी, कोकणी, गुजराती, मारवाडी, कन्नड भाषेत सादर झालेल्या काव्यरचनांतून सावित्री-जोती, भिडेवाड्याची महती उलगडली.
भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले. चार दिवसांच्या या फेस्टिवलमध्ये जवळपास १५०० रसिकांनी उपस्थिती लावली. सहभागी ६०० कवींना भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह, फुलेप्रेमी लेखणी व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. संविधानाबाबत जागृती, प्रचार करण्याच्या उद्देशाने संविधान जागर अभियान राबविण्यात आले.

संयोजक विजय वडवेराव म्हणाले, “देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले होते. देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाड्यावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये झाले. ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, दुबई या देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी झाले. यापुढे पुण्यात दरवर्षी भव्य आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.”

भिडेवाडा अभियानात विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील २५ फुलेप्रेमी कवी, कवयित्री व कार्यकर्त्यांना फेस्टिव्हलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये क्रांती वेंदे (धुळे), पूनम पाटील (जळगाव), नंदा मघाडे (जळगाव), कांचन मून (पुणे), प्रतिभा कीर्तीकर्वे (पुणे), सरिता कलढोणे (पुणे), वनिता जाधव (बारामती), सुनिता नाईक (खेड), बा. ह. मगदूम (सांगली), एम. डी. कदम (सांगली), आनंद चोपडे (बेळगाव कर्नाटक), मनोज भार शंकर (अबुधाबी), अरविंद बनसोडे (पुणे), विशाल बोरे (अकोला), प्रा. माया मुळे (धाराशिव), डॉ. दिलीप नेवसे (सातारा), सुमनताई मनवर (यवतमाळ), संगिता कानिंदे (यवतमाळ), वर्षा शिंदे (पुणे), उमेश शिरगुप्पे (गोवा), विमल वाणी (जळगाव), ओवी काळे (श्रीरामपूर), सुगलाबाई वडवेराव (पुणे), छाया बैसाणे (चाळीसगाव), राजू जाधव (चिंचवड) यांना सन्मानित करण्यात आले.

ठाकरे गटाच्या त्या ५ माजी नगरसेवकांचे भाजपमध्ये स्वागत

पुणे-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण सुनील कांबळे राजेश पांडे शहराध्यक्ष धीरज घाटे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर या सर्वानी मार्गक्रमण केले याचा मनस्वी आनंद आहे भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे तो समर्पित कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आज प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणे समाजापपर्यत पोहोचवावी.

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले पुणे शहरात भारतीय जनता पार्टीचा मोठा परिवार आहे या कुटुंबात नवीन सदस्यांचे सहर्ष स्वागत करतो. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले नव्या जुन्यांची सांगड घालून पक्ष वाढी साठी तुम्ही प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे.

योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा …८ ते १६ जानेवारी

हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : चैतन्य खरात, अस्मिता शेडगे यांना योनेक्स सनराईज  पीवायसी एचटीबीए-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत अग्र मानांकन मिळाले आहे. हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने ८ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर स्पर्धा होणार आहे. 
मानांकन यादी – पुरुष एकेरी – १. चैतन्य खरात २. वसीम शेख ३. जयंत कुलकर्णी ४. अथर्व खिस्ती ५. सुजल लखारी ६. ओंकार लिंगेगौडा ७. अथर्व चव्हाण ८. आदित्य ओक ९. निनाद कुलकर्णी १०. सिद्धेश पालवे.
महिला एकेरी – १. अस्मिता शेडगे २. श्रुती कुलकर्णी ३. गायत्री केंजळे ४. पायल पाटील.
पुरुष दुहेरी – १. अक्षय सासे – रोहन जाधव २. नरेंद्र पाटील – वरद गजभिये ३. देबाद्युती डे – शशी सावळे
महिला दुहेरी – १. अस्मित शेडगे – योगिता साळवे २. आरती चौगले – सानिया तापकीर
मिश्र दुहेरी – १. नरेंद्र पाटील – सानिया तापकीर २. राजू ओव्हळ – मृदुला कांबळे ३. हकिमोद्दीन अन्सारी – योगिता साळवे.
११ वर्षांखालील मुले – १. अर्चित खांदेशे २. वेदांत मोरे ३. कृष्णा सावंत ४. अर्हम अचलिया ५. कबीर देसाई ६. श्रीयळ सोनावणे ७. कबीर कुलकर्णी ८. आगम अचलिया ९. अर्णव गद्रे १०. आर्यंश लोंढे
११ वर्षांखालील मुली – १. अग्रिमा राणा २. निधी गायकवाड ३. केयारा साखरे ४. राजलक्ष्मी थेऊरकर

१३ वर्षांखालील मुले – १. जतिन सराफ २. खुशी दीक्षित ३. दिविक गर्ग ४. वेदांत मोरे ५. आनंद खरचे ६. रितेष सावरला ७. प्रथमेश जगदाळे ८. पार्थ शिंदे ९. ईशान ठकार १०. अभिनव भोंडवे

१३ वर्षांखालील मुली – १. कायरा रैना २. गार्गी कामठेकर ३. ध्रुवी कुंबेफाळकर ४. शौर्यतेजा पवार ५. निधी गायकवाड ६. अग्रिमा राणा ७. अवनी हार्डे

१५ वर्षांखालील मुले – १. माधव कामत २. चिन्मय फणसे ३. समीहन देशपांडे ४. सिबटेनरझा सोमजी ५. विहान कोल्हाडे.

१५ वर्षांखालील मुली – १. शरयू रांजणे २. सोयरा शेलार ३. शर्वरी सुरवसे ४. ख्याती कत्रे ५. सान्वी पाटील.

१७ वर्षांखालील मुले – १. देवांश सकपाळ २. तनिष्क डे ३. ओजस जोशी ४. विहान मूर्ती ५. श्रेयस मासळेकर

१७ वर्षांखालील मुली – १. शरयू रांजणे २. मनीषाकुमार ३. सफा शेख ४. एस. डाखणे ५. नाव्या रांका

१९ वर्षांखालील मुले – १. सुदीप खोराटे २. कोनार्क इंचेकर ३. कृष्णा जसूजा ४. ओजस जोशी ५. निक्षेप कात्रे
१९ वर्षांखालील मुली – १. युतिका चव्हाण २. जिया उत्तेकर ३. यशस्वी काळे ४. सफा शेख

श्री दशानेमा गोपाल कृष्ण मंदिरातर्फे ८१ कलश प्रदक्षिणा व ८१ सत्यनारायण महापूजा 

सहस्त्रचंद्र वर्ष निमित्ताने आयोजन 
पुणे : शुक्रवार पेठ भाऊ महाराज बोळ येथील श्री दशानेमा मंगल कार्यालय गोपाळ कृष्ण मंदिराच्या सहस्त्रचंद्रवर्ष निमित्त भव्य कलश यात्रा काढण्यात आली. सर्व पुरुष, महिलांनी व लहान मुलांनी पारंपारिक वेश परिधान केलेला होता. तब्बल ८१ महिलांनी कलश डोक्यावर घेतला होता तसेच पुरुषांनी पगडी घातली होती.

मुख्य कलश तसेच मुख्य यजमान रविराज शेठ हे सजविलेल्या रथामध्ये बसले होते. फुगड्या, गरबा तसेच गोपाल कृष्णाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सुरुवातीला बँड, पुष्पवृष्टी तसेच आकर्षक फटाक्यांनी यामध्ये अधिकच भर पडली. सर्वांच्या गळ्यामध्ये राधाकृष्ण लिहिलेले भगवे उपरणे होते. त्यामुळे प्रदक्षिणेला एक वेगळीच शोभा आली.

मंदिर कलश प्रदक्षिणेनंतर ८१ यजमानांच्या हस्ते लवकरच मंदिराची वास्तू नवीन स्वरूपात व्हावी, याकरता संकल्प सोडण्यात आला व त्यानंतर सत्यनारायण महापूजेला सुरुवात झाली. सत्यनारायण कथेनंतर गुरुजी जयप्रकाशजी गोर शुक्ला यांनी  महाआरतीला प्रारंभ केला व नंतर सर्व ज्ञाती बांधवांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषात उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नरसोबावाडीमध्ये श्री दत्तगुरूंचे घेतले दर्शन

कोल्हापूर : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवार, दि. ०६ जानेवारी रोजी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे, अशी प्रार्थना श्री दत्तगुरूंच्या चरणी केली. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

विश्वस्त मंडळाच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांचा महावस्त्र आणि दत्तगुरूंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही दत्तगुरुंना पुष्पहार आणि नैवेद्य अर्पण करून आशीर्वाद घेतले. विश्वस्त मंडळीकडून मंदिरामार्फ़त हाती घेण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेत त्यांनी त्याबाबत समाधानही व्यक्त केले.

दर्शन घेत असताना नागरिकही उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांना आवर्जून भेटत होते. यावेळी त्यांनीही सर्व भक्तमंडळींची भेट घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली.

पत्रकारांच्या निवास संकुल आणि पेन्शनबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मोलाचे वक्तव्य

इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…

कोल्हापूर, : पत्रकार दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, “पत्रकारांकडून समाजातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान केला जातो हा आदर्शवत उपक्रम आहे. इचलकरंजीत दूषित पाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होतो, ही बाब भूषणावह नाही. याबाबत पुढील काळात राज्य शासनाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.’

इचलकरंजीकरांचे पुढे कौतुक करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “हे शहर कला, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून या शहराला भारताचे मँचेस्टर असे संबोधले जाते, हे या शहराने औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.”

यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. यापुढेही इचलकरंजी शहरातील इतर व्यक्ती क्रीडा, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर शहराचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास अस्तित्वात असलेले कायदे व नियमात बदल केले जातील तसेच, जीएसटी परताव्याच्या थकबाकीचा विषय असो अथवा इतर कोणताही कायदेशीर विषय असो त्याकरिता गरज पडल्यास नवीन अध्यादेश काढण्यास शासन कचरणार नाही”, असेही यावेळी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी स्पष्ट केले व त्याची ग्वाही दिली.

आज पत्रकार दिनानिमित्त जो पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे याचे त्यांनी कौतुक केले. तसेच लोकशाहीमध्ये पत्रकारिता व पत्रकार हा स्वतंत्र चौथा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले.

यावेळी पत्रकारांसंदर्भात मोलाचे वक्तव्य करताना उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “पत्रकारांसाठी नवीन निवासी संकुलांची उभारणी करणे अथवा अस्तित्वात असलेल्या निवासी संकुलांचा पुनर्विकास करणे व अशा प्रकारे या संकुलामध्ये पत्रकारांचा समावेश करणे हा शासनाच्या ध्येय धोरणात अंतर्भूत असून, याकरिता मी स्वतः मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करेन.

त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शनबाबत एक सुटसुटीत नियमावली तयार केली जावी याकरिता सर्व पत्रकार बंधूंनी वित्त विभागाशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे व योग्य ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन कशी मिळेल याकरिता सर्व पर्यायांची खातरजमा करावी. तसेच, सर्व वृत्तसमूहांनी आपल्याकडील ज्येष्ठ पत्रकारांची यादी शासनाकडे सादर करावी जेणेकरून पत्रकारांना पेन्शन मिळणे व त्यांची शासन स्तरावर ओळख होणे सोपे जाईल. यासर्व बाबींवर मी स्वतः शासन व्यवस्थेतील सर्व संबंधित अधिकारी व पत्रकारांचे प्रतिनिधी यांच्यासोबत लवकरच एक बैठक घेईन.”

या कार्यक्रमाला इचलकरंजीचे आ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे या सर्वांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती.

अभिजात साहित्याला ए. आय.चा धोका नाही

पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात रंगला परिसंवाद
पुणे : आपल्या जगण्यातील प्रत्येक क्षेत्रात ए.आय.चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रवेश झाला आहे. साहित्याक्षेत्रातही ए.आय.चा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे; पण तो मर्यादित कारणांसाठीच होतो आहे. जोपर्यंत अभिजात साहित्याची निर्मिती होत आहे आणि ए.आय.च्या क्षेत्रात भाव-भावनांचा प्रवेश होत नाही तोपर्यंत ए.आय.चा धोका साहित्य क्षेत्राला नाही. ए.आय.च्या अतिवापराने मानवाने उपजत बुद्धिमत्तेचा वापर कमी केला तर मात्र तो नैतिकता आणि अध्यात्मापासून दूर जाईल. साहित्यक्षेत्रात नैतिकता आणि आध्यात्मिकता याचे मोल खूप आहे, असा सूर परिसंवादात उमटला.
पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात ए.आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर रविवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर, ए.आय. तज्ज्ञ कुलदीप देशपांडे, महिती तंत्रज्ञान व ए.आय. तज्ज्ञ महेश बोंद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता, संगणक तंत्रज्ञ डॉ. आदित्य अभ्यंकर याचा सहभाग होता. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक दीपक शिकारपूर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दीपक शिकारपूर म्हणाले, साहित्य क्षेत्रात ए.आय.चा वापर जरूर करावा पण या तंत्रज्ञानाचा अतिवापर घातक ठरू शकतो. जो पर्यंत भावभावनांची मदत घेऊन ए.आय. तंत्र विकसित केले जात नाही तो पर्यंत साहित्य क्षेत्राला ए. आय. पासून धोका नाही.
कुलदीप देशपांडे म्हणाले, साहित्य क्षेत्रात सध्यातरी भाषांतरीत साहित्य, लघुकथा, प्रहसने आणि एखाद्या मूळ कादंबरीचा पुढील भाग या क्षेत्रात वापर होत आहे. साहित्याचा वापर आपण फक्त मनोरंजानासाठी करणार का? याचा वाचकाने विचार करणे आवश्यक आहे.
महेश बोंद्रे म्हणाले, आज तरी ए.आय.च्या क्षेत्रात कृत्रिमता आहे; परंतु या क्षेत्रात जसजशी क्रांती घडेल तसतसा साहित्य क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होईल. वाचकाचे स्वयंभू अनुभव याला साहित्य निर्मितीत खूप महत्त्व आहे. शब्दांकन करतानाही ए.आय.च्या माध्यमातून भावनेचा वापर होणे शक्य नाही. खरा लेखक कधीच ए.आय.च्या कुबड्यांचा वापर करणार नाही. कुठल्याही क्षेत्रात ए.आय.वापराची सवय लागू देऊ नका.
साहित्य क्षेत्र हे भावना प्रेरित गोष्टींनी भरलेले असल्याने या क्षेत्रात अजूनही या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला नाही. परंतु येत्या दहा वर्षांत साहित्यनिर्मिती क्षेत्रात ए.आय.चा वापर वाढीस लागू शकतो. नैसर्गिक सृजनशीलतेला पर्याय नाही. साहित्य आणि वाङ्मय यातील फरक समजणे आवश्यक आहे. उत्तम मदतनीस म्हणून ए.आय.चा वापर जरूर होऊ शकतो; पण आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत की तंत्रज्ञान आपला वापर करत आहे याची जाणिव ठेवणे आवश्यक आहे, असे मत डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
प्रदीप निफाडकर म्हणाले, अभिजात साहित्य परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या साहित्यिकांचीच आहे. आज साहित्य क्षेत्रात ए.आय. म्हणजे कागदी फूल आहे. या क्षेत्रात जोपर्यंत भावभावनांचा शिरकाव होत नाही तोपर्यंत साहित्यक्षेत्राला ए.आय.चा धोका नाही. ए.आय.कडे वाईट नजरेने पहायला नको कारण साहित्यिकांना त्याच्या माध्यमातून आपल्या साहित्यकृती सहजतेने इतर भाषांत रूपांतरित करता येतील. नव साहित्यिकांनी ए.आय.चा वापर डोळसपणे करावा.

‘पुरंदर’च्या कामाचे लवकरच ‘टेक ऑफ’

  • भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार
  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारने प्रक्रियेला वेग
  • ⁠मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यात आढावा बैठक
  • भूसंपादन प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडून एमआयडीसीला भूसंपादनाचे निर्देश
  • मार्च २०२९ पर्यंत विमानतळ साकारण्याचे उद्दिष्ट

पुणे

गेली काही वर्षे प्रतिक्षेत असणाऱ्या पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती येणार असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार असून भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीला सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विमानतळाच्या कामाचे लवकरात ‘टेक ॲाफ’ होणार आहे. तसेच मार्च २०२९ पर्यंत हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकासकामांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरीक हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. विमानतळाच्या विकासकामांना आणखी वेग देण्यासंदर्भात आणि विमानसेवा आणखी सक्षम करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्य दल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे, सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून या क्षेत्रातील वाढ विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून विमानतळाचा डिपीआर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिवाय मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.’

‘पुणे आणि परिसराचा विकास झपाट्याने होत असून विमान प्रवाशांची आणि हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे सध्याचे विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक सोईसुविधांसह सज्ज केलेले आहे. तरीही पुणे शहर आणि परिसराच्या भवितव्याचा विचार करता पुरंदर विमानतळ पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी वाढवण्यासाठीचा OLS पूर्ण झाले असून भूसंपादन येत्या ६ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढवण्यात मदत होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बैठकीत चर्चा झालेले मुद्दे…

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम नियोजित वेळेत अर्थात मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे. मार्च २०२५ ला देशांतर्गत आणि एप्रिलला २०२५ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याते नियोजन
  • नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे रि-कार्पेटिंगचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे.
  • अमरावती विमानतळ येथे नाईट लॅडिंगची सुविधा वेगाने पूर्ण करुन दक्षिण आशियातील सर्वात मोठा FTO जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करणे.
  • सोलापूर विमानसेवा लवकर सुरु करणे आणि कोल्हापूर विमानतळ येथे धावपट्टी विस्तारिकरण करण्यासाठी लवकरात लवकर भू-संपादन करणे. तसेच दोन्ही विमानतळांवर नाईट लँडिंग सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करावी.
  • जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचा निर्णय
  • गडचिरोलीचे येथे विमानतळ साकारण्यासाठी भूसंपादन सुरु करणे
  • रत्नागिरी, गोंदिया, अकोला आणि संभाजीनगर विमानतळांच्या सुविधा आणि विमानसेवा संदर्भात सकारात्मक चर्चा
  • पवना, गंगापूर, खिंडसी आदी धरणात Water Aerodrome साठीचे सर्वेक्षण तातडीने करावे.
  • आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या वाढवण येथील प्रस्तावित विमानतळाबाबत लवकरत निर्णय घेण्यात येईल.

पर्यावरण विषयक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन

पुणे :’अलर्ट’ संस्थेच्या ‘पुणे क्लायमेट वॉरियर’ या उपक्रमांतर्गत दि.१८ जानेवारी २०२५ रोजी ‘द बिग ग्रीन फेस्ट ‘ या पर्यावरण विषयक महोत्सवाचे आयोजन पं.जवाहरलाल नेहरू सभागृह(घोले रस्ता) येथे करण्यात आले आहे.या महोत्सवात आठ ते अठराहून अधिक वयोगटातील विद्यार्थी,विद्यार्थिनी व व्यक्तींसाठी पर्यावरण विषयक विविध स्पर्धां घेण्यात येणार असून सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.८ ते १० या वयोगटासाठी ‘ पर्यावरण रक्षक ‘,११ ते १३ या वयोगटासाठी ‘कचऱ्यातून संपत्ती’, १४ ते १७ या वयोगटासाठी ‘हवामान बदलाचे पडसाद’,१८ वर्षावरील वयोगटासाठी ‘शाश्वत भविष्य’ या विषयांना अनुसरून केलेल्या वेषभूषेच्या माध्यमातून स्पर्धकांनी सादरीकरण करावयाचे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याच्या दृष्टीने वरील विषयांवर पोस्टर(भित्तीपत्रक) स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी ८३९०४९२८७८ या क्रमांकावर संपर्क साधावा. विजेत्यांना विजेत्यांना स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र आणि रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

महोत्सवात इतर अनेक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्यामुळे स्पर्धकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे .स्पर्धेतील सहभाग लवकरात लवकर नोंदवावा,असे आवाहन मुख्य संयोजक ऍड.दिव्या चव्हाण-जाचक यांनी केले आहे.पर्यावरण रक्षणासंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यसभेच्या माजी खासदार ऍड.वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘ पुणे क्लायमेट वॉरियर’ हा आहे. या उपक्रमांतर्गत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात पर्यावरण विषयक विविध कार्यक्रम सादर होणार आहेत .सर्वानी अधिकाधिक संख्येने यामधे सहभागी व्हावे,असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.