जोधपूर:राजस्थान उच्च न्यायलयाने मंगळवारी अल्पवयीन अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला ३१ मार्चपर्यंत तात्पुरता सशर्त जामीन दिला. त्यानंतर जोधपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आसारामची रात्री उशिरा सुटका झाली.एक आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उपचारासाठी ३१ मार्चपर्यंत जामीन दिला होता. त्यानंतर आसाराम यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात शिक्षा निलंबित करण्यासंबंधी याचिका दाखल केली होती. न्या.दिनेश मेहता आणि न्या.विनीतकुमार माथूर यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेतील समानता पाहून आसारामला तात्पुरता जामीन मंजूर केला. आसारामचा जामीन सर्वोच्च न्यायालयातील ७ जानेवारी रोजीच्या निर्धारित अटी-शर्तीनुसारच आहे. एप्रिल २०१८ मध्ये आसारामला जोधपूर आश्रमात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.आता ११ वर्षांनंतर प्रथमच तुरुंगातून बाहेर आले आहेत.
दिग्गज जामीन मिळवून देऊ शकले नाही : यापूर्वी आसारामला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी दिग्गज विधिज्ञ राम जेठमलानी, सलमान खुर्शिद, केटीएस तुलसी, के.के.मेनन,पॉस पोले, सुब्रम्हण्यम स्वामी यांनी प्रयत्न केले होते. परंतु १२ वेळा त्यांची याचिका फेटाळली गेली होती.
शिष्यांना भेटता येणार नाही. मुलाखत अथवा साधकांसाठी प्रवचन करता येणार नाही. तीन सुरक्षा रक्षकांचा खर्चही उचलावा लागेल. मंगळवारी रात्री रुग्णालयातून बाहेर पडताच आसारामला अनुयायांनी गराडा घातला
नवी दिल्ली-कोविड-१९ नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह विविध देशातील सरकारे निवडणुकीत पराभूत झाली होत,असे वक्तव्य मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये केले होते. यावर संसदीय समितीने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप खासदार तथा माहिती व प्रसारण संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले, मेटाला या चुकीच्या माहितीबद्दल माफी मागावी लागेल. या चुकीच्या माहितीबद्दल मेटाला पाचारण करणार आहे.
लोकशाही देशाबद्दल चुकीची माहिती दिल्याने देशाची प्रतिमा मलिन होते. या चुकीबद्दल त्या संघटनेला भारतीय संसद आणि जनतेची माफी मागावी लागेल. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही चुकीच्या माहितीबद्दल झुकेरबर्ग यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाॅटस्अॅपसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पालक कंपनी मेटाने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुंबई,- आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून.अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात.ऑनर किलिंग राेखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.आज लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किर्लीगच्या घटनाबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनांचा आढावा घेण्यात आला. याविषयी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,”राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) अंमलबजावणी करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल दि. ३० जानेवारी २०२५ पर्यंत सादर करावा.ऑनर किलिंग च्या घटनेमधील पीडित मुलींचे समुपदेशन व्हावे तसेच मनोधैर्य योजनेतून पीडित महिलेला काही मदत म्हणून लाभ देता येईल का पाहावे, त्यामुळे अशा मुलींना मदत होईल. तसेच, या पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करावा अशा सूचनाही यावेळी दिल्या. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे सामाजिक मानहानी, कौटुंबिक त्रास आणि ऑनर किलिंगपासून संरक्षण कण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’च्या धर्तीवर ‘आंतरजातीय विवाह कायद्या’ची निर्मिती करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीचे पुनर्गठन करावे. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाइन आणि विविध समित्यांची राज्यस्तरीय प्रचार प्रसिद्धी करावी, ज्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि कायदेशीर मदत वेळेत उपलब्ध होईल आणि या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळेल,”असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या काही तक्रार प्राप्त झाल्यास अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याने त्याचा तपास करून अहवाल सादर करावा. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करावी आणि अशा जोडप्यांच्या संरक्षणाकरिता विशेष कक्ष आरक्षित करावेत किंवा वसतीगृह द्यावे, अशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.यावेळी, बैठकीला सामाजिक न्याय आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त महिला व बालविकास राहुल मोरे, संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे,संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर,लातूर निवासी जिल्हाधिकारी संगीता टकले, सोमय मुंडे,पोलीस आयुक्त,आयुक्तालय पुणे संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात २३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन
पुणे – पुणे शहर परिसरात १७ टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. टेकड्यांवरील अनाधिकृत बांधकामावरही कारवाई करावी, असे निर्देश देत महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात २३ जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुणे शहरातील टेकड्यांची सुरक्षा, त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वनभवन येथे आयोजित आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या तीन घटनांनतर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा मंत्री पाटील यांनी घेतला.
यावेळी उपवसंरक्षक महादेव मोहिते, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ, नागरिक उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर सुमारे ६ हजार ५०० वृक्षांची लागवड केली होती. त्यांना आग लावून सुमारे २ हजार ५०० वृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.टेकड्यावरील झाडांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी तणांची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. संरक्षक भिंतीची जलदगतीने कामे पूर्ण करावे. वन क्षेत्र संरक्षित करावेत, प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. टेकड्यांवरील झाडांच्या देखभालीसाठी टेकड्यावरील ठिकाणे निश्चित करुन उच्चक्षमतेचे सोलारयुक्त सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकाची संख्या २ वरुन ८ करावी. त्यांना गस्त घालण्यासाठी लागणाऱ्या दुचाकी, सौर दिवे आदी बाबींकरीता लागणारा निधी उपलब्ध करुन देण्याचा येईल, असे पाटील म्हणाले. मोहिते यांनी टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच काही विषय महापालिकेशी संबंधित असल्याने महानगर पालिका आयुक्तांसोबत बैठक लावण्याची त्यांनी विनंती केली.
पुणे:ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून पुणे ते अयोध्या सायकल वारी सुरू असून, ‘मिशन रस्ते सुरक्षा’ उपक्रम अंतर्गत सायकलस्वार आणि स्थानिक नागरिक रस्ते सुरक्षा संबंधी जनजागृती करत आहेत. सायकल वारीत सहभागी झालेले सायकलस्वार नारायण पवार आणि सुयोग शहा हे विविध गावांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांचा प्रचार करत आहेत.
वारीत विविध ठिकाणी नागरिकांनी सायकलस्वारांचे जल्लोषात स्वागत केले आहे. सायकलस्वारांनी रस्ते सुरक्षा नियमांचे फलक हातात घेऊन नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी, वाहन चालवताना खबरदारी घेण्याचे महत्त्व, हेल्मेट वापरणे, तसेच वाहने योग्य वेगात चालवणे यासंबंधी नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत.
स्थानिक नागरिक, विशेषतः युवक आणि विद्यार्थी, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रस्ते सुरक्षा मोहिमेत सहभागी होऊन रस्ते सुरक्षेचे महत्त्व सांगत आहेत आणि नियम पाळण्याचा निर्धार करीत आहेत . ‘मिशन रस्ते सुरक्षा’ उपक्रमाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली असून, या उपक्रमाला सतत पाठिंबा मिळत आहे.
सायकल वारी ज्या गावांमधून जात आहे, तेथे स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर, या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढत असून, स्थानिकांनी रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे वचन दिले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून रस्ता अपघात कमी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. ‘मिशन रस्ते सुरक्षा’ उपक्रम आपल्या कार्यास आकार देत आहे, आणि भविष्यातही या प्रकारच्या उपक्रमांना पुढे चालवण्याचा निर्धार नारायण पवार आणि शहा यांनी व्यक्त केला आहे.
पीसीईटी, पीसीयू ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ नवकल्पना व आर्थिक विकासाला चालना देणारा उपक्रम
पिंपरी, पुणे (दि. १३ जानेवारी २०२५) विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला शेती व उद्योजकतेच्या माध्यमातून चालना देणे आवश्यक आहे. विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्रात तरुणांबरोबरच महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये उद्घाटनाच्या द्वितीय सत्रामध्ये चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते. “विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांमध्ये भागीदारीद्वारे उद्योजकता, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे” या चर्चासत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी मंत्री व पीसीयूचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, डॉ. अभय जेरे (उपाध्यक्ष, एआयसीटीई), डॉ. विनोद मोहितकर (संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र शासन), डॉ. शैलेंद्र देवळणकर (संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र शासन), डॉ. समीर मित्रगोत्री (हार्वर्ड विद्यापीठ), डॉ. नील फिलीप (ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज, न्यूयॉर्क), डॉ. परनिता सेन आणि डॉ. मुकुंद कर्वे (रटगर्स विद्यापीठ, यूएसए) आदींनी सहभाग घेतला. उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष सचिन इटकर, उपकुलगुरू डॉ. मणिमाला पुरी आणि प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे आदी उपस्थित होते. या ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये शंभर पेक्षा जास्त एनआरआय मराठी उद्योजक, वक्ते, संशोधक, शास्त्रज्ञ, १२० स्टार्टअपचे नवउद्योजक, गुंतवणूकदार अशा बाराशे पेक्षा जास्त व्यक्तींनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आजच्या तरुणांना नवीन कौशल्ये शिकण्याची, उद्योजकता स्विकारण्याची आणि राष्ट्रीय विकासात योगदान देण्याची अधिक आवड आहे. यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाने उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा युवक युवतींनी आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोग करून घ्यावा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. उद्योजक होण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी युवकांनी आवश्यक कौशल्य आणि मानसिक दृष्ट्या सुसज्ज असले पाहिजे. यासाठी उच्च विचारसरणी आणि नवउपक्रमाचा ध्यास असणे आवश्यक आहे असे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी सांगितले. हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक डॉ. समीर मित्रगोत्री यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सक्षमपणे उभे राहण्यासाठी जागतिक स्तरावरील कौशल्य आत्मसात करावी लागतील. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे. जागतिक दर्जाचे शैक्षणिक, व्यावसायिक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. भारतीय शिक्षण प्रणाली यूएसए, युके अशा प्रगत राष्ट्रांबरोबर स्पर्धा करू शकते. त्यासाठी आपल्या अभियंत्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करून आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करीत स्पर्धेत उतरले पाहिजे, यासाठी शासनाने देखील प्रोत्साहन पर योजना राबवल्या तर आपण निश्चितच विकसित भारतचे स्वप्न पूर्ण करू असेही डॉ. मित्रगोत्री यांनी सांगितले. तसेच विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांमधील भागीदारीवर लक्ष केंद्रित करून उद्योजकता, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी व्यावसायिक संस्थांमधील भागीदारीच्या महत्त्वावर या चर्चासत्रात भर देण्यात आला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे यांच्यावतीने राजमाता जिजाबाई जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन पुणे ः धन्य धन्य मातोश्री जिजाई, अंबिका माई, झाली उतराई, हिंदूपदपातशहाची माई, हिंदुधर्माची झाली आई, त्रैलोक्यात दुसरी नाही… अशा शब्दांत राजमाता जिजाबाईंच्या शौर्याचे वर्णन करीत महिला शाहिरांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी च्या सेवाव्रती महिलांनी पारंपरिक वेशात ऐतिहासिक लालमहालात जिजाबाईंना अभिवादन केले. राजमाता जिजाबाई जयंती निमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे च्यावतीने ऐतिहासिक लालमहाल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्याख्यात्या सायली गोडबोले, प्रबोधिनीच्या प्रा. संगीता मावळे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, सिद्धार्थ नवरे, प्रशालेच्या शिक्षिका धनश्री ढावरे, सीमा डोईफोडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स प्रशालेच्या विद्यार्थींनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी स्वराली उन्हाळे आणि प्रबोधिनीच्या युवा सेवाव्रती यांनी राजमाता जिजाबाई यांच्या जीवनावरील पोवाड्याचे सादरीकरण केले. सायली गोडबोले म्हणाल्या, आज एकविसाव्या शतकात छोट्या छोट्या गोष्टींवरून नैराश्य येण्याचे प्रमाण वाढले आहे. जिजाऊंचे जीवन चरित्र पाहिले तर लक्षात येईल की त्यांच्यासमोर क्षणाक्षणाला येणारी आव्हाने किती मोठी होती. जिद्द, जाणतेपणा, बाणेदारपणा आणि ईश्वराप्रती निष्ठा म्हणजे जिजाबाई. महिलांनी त्यांचे जीवनचरित्र समोर ठेवले तर कधी नैराश्यच येणार नाही, असे ही त्यांनी सांगितले. संगीता मावळे म्हणाल्या, प्रबोधिनीच्या वतीने लालमहाल येथे दरवर्षी जिजामाता यांची जयंती साजरा केली जाते. यावेळी शाळेतील विद्यार्थीनींना येथे आणले जाते. जिजाऊंचे जीवन चरित्र त्यांच्या पराक्रमाच्या कथा मुलींना कळाव्यात व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले. डाॅ. मृणालिनी दुसाने यांनी सूत्रसंचालन केले. अक्षदा इनामदार यांनी आभार मानले.
पुणे:- पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक जागी अनधिकृतपणे नाल्यांवर अतिक्रमण, बांधकामे झाल्याच्या घटना आहेत त्यावर महानगरपालिकेने अनेकवेळा कारवाई केली आहे. पण कोथरूड परिसरात कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदीराशेजारील चालू विकास आराखड्यातील तसेच प्रायमुव्ह संस्थेच्या अहवालात दिसणार्या नैसर्गिक नाल्यावर महानगरपालिकेच्या वतीनेच अनधिकृतपणे टेंडर काढून अतिक्रमण करण्यात येत आहे अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांकडे करण्यात आली.तर सदर नाला बुजविण्याचे काम ज्या भागात चालू आहे तिथे समोरच पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यालय आहे त्यांनी सदर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे का ? कोथरुडकरांच्या सुरक्षेचा विचार त्यांना नाही का असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.पुणे पालिका प्रशासनाने तत्परतेने सदर अनधिकृत बांधकाम थांबवावे आणि नाल्याला मुक्त करावे तसेच पुण्यातील सर्व नाल्यांचा अभ्यास करून त्यांना अतिक्रमण मुक्त करावे. अन्यथा आम्ही पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच पर्यावरण रक्षणार्थ पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करू असे आयुक्तांना सांगण्यात आले . ४० फुटाहून अधिक मोठा नाला बुजवून तो पाईपलाइन मधे टाकण्यात आला आहे, हे कोणासाठी आणि कश्यासाठी हे प्रशासनाने स्पष्ट करावे, प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव आहे का ? की कोणा विकासकासाठी हा प्रकार चालू आहे ? हा प्रश्न पुणेकर म्हणून आम्हास पडला आहे , पुणे महपालिकेला पुन्हा आंबिल ओढा घटना कोथरूड मधे घडवायची आहे का ? कि ज्याप्रमाणे नदीपात्रालगत अतिक्रमण झाल्याने सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यामधे पावसाच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेकांना अगदि पहिल्या मजल्यावरील राहती घर सोडून स्थलांतरीत व्हाव लागल. हिच परिस्थिती कोथरूडकरांवर ओढवून आणायची आहे का ? ओढे नाले बुजवल्याने आगामी पावसाळ्यात पाणी साचून पूराचा फटका कर्वेनगर कोथरूडकरांना नक्की बसणार यात शंका नाही असे प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनात मांडण्यात आले . यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना आयुक्तांनी सदर विभागाशी निगडीत अधिकारी यांस तत्पर माहिती घेऊन कळविण्याचे निर्देश दिले.यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, संघटक पराग थोरात, उपविभाग प्रमुख कोथरूड पुरुषोत्तम विटेकर, शैलेश जगताप, संजय साळवी, गणेश पोकळे आणि शिवसैनिक उपस्थित होते .
मुंबई-अलिकडच्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. यावरून मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. नेत्यांमध्ये विचाराधारांबाबत मतभेद आहेत. त्यामुळे एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो, मग परत शत्रू होते, अशी कितीतरी उदाहरणे असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी त्यांनी शरद पवारांनी संघाच्या कामाबद्दल केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीसांनी सूचक विधान केले.
उद्धव ठाकरे यांची भूमिका बदलत आहे का? असा सवाल अमृता फडणवीस यांना विचारला असता, नेत्यांमध्ये असणारे मतभेद हे विचारधारांबाबत आहेत. त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ते मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्याने राजकारणात एकेकाळचा शत्रू असणारा हा मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे प्रगतीचे राजकारण करतात, असे मला वाटते. जातीय राजकारण आपण आणतो, आपण ते करायला नको. लोकांच्या हातात ही बाब आहे, माध्यमांच्या हातात आहे.अमृता फडणवीस यांनी शरद पवार यांनी संघाच्या कामाच्या केलेल्या कौतुकावरही आपले मत मांडले. शरद पवार हे दिग्गज नेते आहेत. त्यांचे विश्लेषण खूप चांगले असते. आरएसएस बाबत ते जे बोलले ते चांगलेच विश्लेषण त्यांनी केले. त्याबद्दल मला त्याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले.
पुणे : नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकास कामांची आखणी करत पीएमआरडीएच्या गृह प्रकल्पातील अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. पीएमआरडीएअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांसह भूखंडाची पाहणी करत त्यांनी सदनिकाधारकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प फेस १ आणि फेस २ उभारण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांना महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी भेट देत नुकतीच कामाची पाहणी केली. यादरम्यान पूर्वीच्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांच्या अडचणी लक्षात घेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात त्या राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी यांच्यासह ठेकेदार यांना दिले. यादरम्यान पहिल्या प्रकल्पातील पेठ क्रमांक १२ येथील सदनिकांधारकांशी संवाद साधला. येथील सदनिकांधारकांच्या प्राप्त झालेल्या बहुतांश अडचणी यंत्रणेच्या माध्यमातून दूर करण्यात आल्या आहे.
नागरिकांच्या भेटी आयोजित करा पीएमआरडीएअंतर्गत सध्या पेठ क्रमांक 12 येथे गृहप्रकल्प फेज १ आणि फेज २ यांचे काम सुरू आहे. या ठिकाणची कामे अपेक्षित गतीसह दर्जेदार होत असल्यामुळे नागरिकांना ते पाहता यावे, यासाठी त्यांच्या भेटी आयोजित करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यासाठी विविध भागातील नागरिकांना संबंधित गृहप्रकल्प पाहता यावा, यासाठी आगामी काही दिवसात विशेष बसची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासह नागरिकांच्या सूचनांची नोंद घेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे निर्देश महानगर आयुक्त यांनी दिले.
पुणे : प्रत्येकाला उत्तम बोलता आले पाहिजे. निरीक्षण, स्मरण आणि लोकांशी उत्तम संपर्क हवा. तुमचे कार्यक्षेत्र बळकट करण्यासाठी माणसांना जोडा. स्वतःचा आत्मविश्वास बळकट करा. तुमची वेगळी छटा दाखवली तर कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती तुम्हाला जवळ करते, असे मत प्रख्यात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
वल्लरी प्रकाशनाच्यावतीने ‘महाराष्ट्राचे महावक्ते’ म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. डॉ. सुनिल धनगर यांच्या जीवन संघर्षावर व्यंकटेश कल्याणकर लिखित ‘शब्दजादूगार सुनिल’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु प्रा.पराग काळकर, लेखिका दिग्दर्शिका प्रतिमा पंकज, वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ म्हणाले, उत्तम बोलण्यासाठी नियमित डायरी लिहायला हवी. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तमोत्तम वक्त्यांना ऐकायला पाहिजे.
प्रा. पराग काळकर म्हणाले, पुण्यात विविध ठिकाणाहून माणसे येतात आणि कायमचे पुणेकर होतात. परंतु जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्तृत्व दाखवत नाही, तोपर्यंत पुणे तुम्हाला स्वीकारत नाही. या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो, परंतु छोटे छोटे प्रयत्न करत राहणे आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तुमचे अस्तित्व दाखवून द्यावे लागते. आयुष्यात पुढे जाताना अनेक अडथळे येतात, परंतु जीवन प्रवाहित असणे आवश्यक आहे. डॉ. सुनिल धनगर म्हणाले, ग्रामीण भागातून येऊनही आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादांमुळे वॉचमनपासून सुरू झालेला माझा प्रवास आज माझ्यावरील पुस्तक प्रकाशनापर्यंत येऊन पोहोचला आहे. हा आयुष्यातील एक कृतार्थ ठेवा आहे.
व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, सुनील धनगर यांचे आयुष्य प्रेरणादायी आहे. तरुणांनी आदर्श ठेवावा असे यश त्यांनी मिळवले आहे. त्यामुळे ‘शब्द जादूगार सुनिल’ हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे. आपले वाचन झाल्यानंतर हे पुस्तक जवळच्या वाचनालयास किंवा इतरांना वाचायला द्यावे.
हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. किर्ती देसाई यांनी स्वागतगीत व पसायदान सादर केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमध्ये झेड मोड बोगद्याचे उद्घाटन केले. श्रीनगर-लेह महामार्ग NH-1 वर बांधलेला 6.4 किमी लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल. बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग 6 महिने बंद असतो. बोगद्याच्या बांधकामामुळे लोकांना सर्व ऋतुत कनेक्टिव्हिटी मिळेल.बोगद्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले – जम्मू आणि काश्मीरमधील लडाखची आणखी एक जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. तुम्ही खात्री बाळगा की हा मोदी आहे, वचन दिले तर ते ते पूर्ण करतो. प्रत्येक कामाची एक वेळ असते आणि योग्य काम योग्य वेळी होईल.
पूर्वी श्रीनगर-लेह महामार्गावरील गगनगीर ते सोनमर्ग दरम्यान 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असे. या बोगद्यामुळे हे अंतर आता 15 मिनिटांत कापता येणार आहे. याशिवाय, वाहनांचा वेग 30 किमी/तास वरून 70 किमी/ताशी वाढेल. पूर्वी हा दुर्गम डोंगराळ भाग पार करण्यासाठी 3 ते 4 तास लागत होते. आता हे अंतर अवघ्या 45 मिनिटांत कापले जाणार आहे.पर्यटनाबरोबरच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे लष्कराला लडाखपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. म्हणजेच बर्फवृष्टीदरम्यान लष्कराला हवाई दलाच्या विमानांमध्ये जे सामान वाहून नेणे आवश्यक होते, ते आता कमी खर्चात रस्त्याने वाहून नेणे शक्य होणार आहे.
Z मॉड बोगदा 2700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. 2018 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. हा बोगदा 434 किमी लांबीच्या श्रीनगर-कारगिल-लेह महामार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पांतर्गत 31 बोगदे बांधले जात आहेत, त्यापैकी 20 जम्मू-काश्मीर आणि 11 लडाखमध्ये आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले – जम्मू-काश्मीरमधील लडाखची आणखी एक जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. सोनमर्ग बोगद्याबद्दल बोलायचे झाले तर, ते सोनमर्ग तसेच कारगिल आणि लेहमधील लोकांचे जीवन खूप सोपे करेल. आता बर्फवृष्टीदरम्यान हिमस्खलन किंवा पावसाळ्यात भूस्खलनामुळे रस्ते बंद होण्याची समस्या कमी होईल. रस्ते बंद झाल्यावर लोकांनी रुग्णालयात जाणे बंद व्हायचे आणि जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण व्हायचे. या बोगद्यामुळे या समस्या सुटतील.
पंतप्रधान मोदी म्हणाले- देशाच्या प्रगतीसाठी, जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी, कष्टकरी बांधवांनी कठीण परिस्थितीत काम केले, आपले जीवन धोक्यात घालून काम केले, आपले प्राण गमावले, परंतु ते त्यांच्या संकल्पापासून डगमगले नाहीत. कामगार वर्गातील सोबती डगमगले नाहीत; कोणीही घरी परत जाण्याबद्दल बोलले नाही. प्रत्येक आव्हानावर मात करून त्याने हे काम पूर्ण केले आहे. आज, सर्वप्रथम, मला आपण गमावलेल्या 7 सहकाऱ्यांची आठवण येते.
आज भारत प्रगतीच्या नवीन उंचीवर वाटचाल करत आहे. देशातील प्रत्येक नागरिक 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या देशाचा कोणताही भाग किंवा कोणतेही कुटुंब प्रगती आणि विकासापासून मागे राहणार नाही. यासाठी आमचे सरकार “सबका साथ सबका विकास” या भावनेने पूर्ण समर्पणाने काम करत आहे. या बोगद्यामुळे या हिवाळ्यात सोनमर्गशी संपर्क कायम राहील. सोनमर्गसह संपूर्ण परिसरात पर्यटनाला नवीन पंख मिळणार आहेत. येत्या काळात रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण होतील. काश्मीर खोरे देखील रेल्वेने जोडले जाणार आहे.
येथे सर्वात उंच बोगदा, सर्वात उंच रेल्वे मार्ग, सर्वात उंच पूल बांधले जात आहेत. चिनाब पुलाचे अभियांत्रिकी पाहून जग थक्क झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथे प्रवासी ट्रेनची चाचणी घेण्यात आली. येथील प्रकल्प 42 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आहेत. यावर काम सुरू आहे. सोनमर्ग सारख्या 14 हून अधिक बोगद्यांवर काम सुरू आहे. या प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीर सर्वात जास्त जोडलेल्या राज्यांपैकी एक बनणार आहे. पूर्वीचे कठीण दिवस मागे टाकत, आपले काश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून आपली ओळख परत मिळवत आहे. आज लोक रात्री आईस्क्रीम खाण्यासाठी लाल चौकात जात आहेत.
पंतप्रधान म्हणाले – हे हवामान, बर्फ, बर्फाच्या चादरीने झाकलेले पर्वत पाहून मन आनंदित होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी येथून काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याला भेटण्यासाठी इथे येण्याची माझी अधीरता आणखी वाढली. जसे मुख्यमंत्रीजींनी सांगितले होते की माझे तुमच्याशी इतक्या काळापासूनचे संबंध आहेत. मी इथे आल्यावर मला खूप वर्षांपूर्वीचे दिवस आठवायला लागतात. जेव्हा मी भाजपचा संघटनात्मक कार्यकर्ता म्हणून काम करायचो, तेव्हा मी इथे अनेकदा येत असे. मी या क्षेत्रात बराच वेळ घालवला आहे.
काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमध्ये एक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्या मॅरेथॉनमध्ये मुख्यमंत्र्यांनीही भाग घेतला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. मी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले होते. दिल्लीतील बैठकीत मी त्याला प्रोत्साहन देत होतो. त्याने मला मॅरेथॉनबद्दल सांगितले. हे नवीन जम्मू आणि काश्मीरचे एक नवीन युग आहे. अलिकडेच, 40 वर्षांनंतर, काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले. त्याआधी, दाल सरोवराभोवती कार रेसिंगचे दृश्य पाहिले. एका अर्थाने, गुलमर्ग भारताची हिवाळी खेळांची राजधानी बनत आहे. 4 खेलो इंडिया हिवाळी खेळ आयोजित करण्यात आले आहेत. पाचवी पुढील महिन्यात सुरू होत आहे.
ओमर अब्दुल्ला म्हणाले- मोदीजी लवकरच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देतील
उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असलेले जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले- जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेची तक्रार नव्हती, सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार नव्हती. याचे श्रेय तुम्हाला (पंतप्रधान मोदी), तुमचे सहकारी आणि भारतीय निवडणूक आयोगाला जाते. माझे मन म्हणते की लवकरच तुम्ही (पंतप्रधान मोदी) राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्याचे तुमचे वचन पूर्ण कराल.
पुणे : संगीत प्रचार व प्रसाराचे अविरत कार्य करणाऱ्या गोपाळ गायन समाज या संस्थेतर्फे युवा कलाकारांसाठी घेण्यात आलेल्या पळणीटकर आणि चिंतामणी स्मृती चषक शास्त्रीय गायन स्पर्धेत सागर देशमुख याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यास पळणीटकर चषक व 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत 32 जणांचा सहभाग होता. स्पर्धा गोपाळ गायन समाज येथे झाली. द्वितीय क्रमांक वरद दलाल आणि सोजी जॉर्ज मॅथ्यू यांना विभागून देण्यात आला. त्यांना चिंतामणी चषक आणि पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. विशेष प्रस्तुतीसाठीचे पारितोषिक पियूषा भोसले हिला मिळाले. तिला पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. राजश्री महाजनी आणि डॉ. वीणा धामणगावकर यांनी केले. स्पर्धकांना दीपेन दास, गजानन इगवे, उदय शहापूरकर, आकांक्षा केळकर यांनी साथसंगत केली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर आणि पं. राजेंद्र कंदलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. संस्थेच्या विश्वस्त डॉ. अरुणा चाफेकर उपस्थित होत्या. स्पर्धकांशी संवाद साधताना पंडित विजय कोपरकर म्हणाले, तानपुऱ्याची साथ कधी सोडू नका. तपश्चर्या आणि मेहनतीशिवाय गाणे खुलत नाही. संगीत हा सुरांचा महासागर आहे. आपल्या गळ्याची क्षमता काय आहे हे जाणून घेऊन गायले पाहिजे. पंडित राजेंद्र कंदलगावकर म्हणाले, संगीताची साधना करताना गाणे ऐकणेही खूप महत्त्वाचे आहे. गायन क्षेत्रात चिंतन-मननही आवश्यक असते. गायनाची सौंदर्यपूर्ण मांडणी करणे व सतत बदल घडवत राहणे आवश्यक असते. प्रसिद्ध हार्मोनियम वादक उपेंद्र सहस्रबुद्धे यांना डॉक्टरेट मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार गोपाळ गायन समाजाचे विश्वस्त, गायक डॉ. विकास कशाळकर, डॉ. अरुणा चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे रविवार 12 जानेवारी 2025 रोजी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे मुलांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे 9000 ते 1000 मुलांनी सहभाग घेत चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धेचा आनंद लुटला .
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे दर वर्षी प्रमाणे यंदा हि चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा स्पर्धेचे आयोजन केले गेले असून या स्पर्धेत प्रवेश निशुल्क होते. 5-10 वर्षे मधील गटातील स्पर्धकांसाठी फ्लॉवर पॉट , घड्याळ, माझा आवडता प्राणी , तर 11-15 वर्षे गटातील स्पर्धकांसाठी डिफरेन्ट professions, sunrise /सनसेट , कलासरूम हा विषय देण्यात आला होता. पुणे शहरातील विविध भागातील ११ शाळेतील सुमारे 900 ते 1000 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सुरेश पिंगळे (मानद सचिव, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन), अनुपमा बर्वे (मानद सहसचिव) यशवंत खैरे उपस्थित होते, या स्पर्धेतील विजेत्यांना पुष्प प्रदर्शनाच्या समारोपाच्या म्हणजेच 27 जाने. 2025 रोजी बक्षिस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सुरेश पिंगळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी सुमारे 10.30 वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत,आय एन एस निलगिरी व आय एन एस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 3.30 वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील .
तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे. आयएनएस सूरत, P15B हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील 75% सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे. आयएनएस निलगिरी, हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात. आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून,पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.
भारताच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान उद्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर, खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन प्रकल्पाचेही उद्घाटन करतील. नऊ एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.