Home Blog Page 500

रंगत-संगत प्रतिष्ठान, काव्यशिल्पतर्फेज्येष्ठ कवी जयंत भिडे यांचा रविवारी कृतज्ञता सन्मान


पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य विभाग आणि काव्यशिल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी जयंत भिडे यांचा रविवारी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ कवी जयंत भिडे यांच्या काव्य लेखन प्रवासाची 50 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, काव्यशिल्पच्या अध्यक्षा स्वाती यादव यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम रविवार, दि. 19 रोजी सकाळी 10:30 वाजता भारत स्काऊट ग्राऊंड, उद्यान प्रसाद कार्यालयासमोर, सदाशिव पेठ येथे आयेजित करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सन्मान सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात अश्विनी पिंगळे, भारती पांडे, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, प्रतिभा जोशी, सुधीर कुबेर, सीताराम नरके, तनुजा चव्हाण, डॉ. अनिता जठार, स्वप्नील पोरे, कर्नल वसंत बल्लेवार, अजय जोशी, नूतन शेटे, जयश्री श्रोत्रिय, शिरीष सुमंत, मकरंद कुलकर्णी, रवींद्र गाडगीळ, सुरेश शेठ, चंचल काळे, डॉ. नयना कुलकर्णी, अपर्णा आंबेडकर, मनिषा सराफ, आनंद महाजन, साजन पिलानी यांचा सहभाग असणार आहे, असे रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर, काव्यशिल्पच्या सचिव राजश्री सोले यांनी सांगितले.

परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तडीएम फाउंडेशनतर्फे १९ ते २५ जानेवारी दरम्यान गुरुनाम सप्ताह

पुणे: परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री देशमुख महाराज फाउंडेशन व डीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सामाजिक बांधिलकीचे व्रत, धार्मिक व अध्यात्मिक उपक्रमांतून रविवार, दि. १९ जानेवारी ते शनिवार, दि. २५ जानेवारी २०२५ या कालावधीत हा सप्ताह होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक विजय महाराज देशमुख व उपाध्यक्ष कुमारी सुवर्णा बालेघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नरहर शिदोरे, जयमाला अनारसे, प्रतिभा साखरे, संजय देशमुख, धनश्री लोणकर, गणेश अनारसे, किरण खरात, शुभम अनारसे, मृणाल सरडे, ऋग्वेदी साखरे, अनुष्का सरडे आदी उपस्थित होते.

विजय महाराज देशमुख म्हणाले, “सद्गुरु श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा हा सप्ताह यंदा साधनाश्रम, गिवशी गाव, पानशेत पुणे येथे होणार आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, जप संकल्पाचे शतांश हवन, लघुरुद्र अभिषेक, संजीवनी पादुका पालखी सोहळा, पायी दिंडी, ग्रामदैवत शिरकाई देवी भेट, गुरुचरित्र पारायण, महाभोज आदी कार्यक्रम या सप्ताहात होणार आहेत. समारोपाच्या दिवशी पहाटे ६ वाजता संजीवनी पादुकांवर लघुरुद्र अभिषेक, सकाळी ७ वाजता परमपूज्य श्री गंगाधर स्वामी महाराज संजीवन पादुका पालखी सोहळा प्रारंभ होऊन ग्रामदैवत शिरकाई देवीच्या भेटीला जाईल. सकाळी ९ वाजता शिरकोली गावात भजन, रिंगण, अभिषेक व प्रसाद होईल. चूल बंद गाव जेवण महाप्रसादाने सप्ताह सोहळ्याची सांगता होईल.”
सुवर्णा बालेघाटे म्हणाल्या, “पहिल्या दिवशी ५१ लाख जप संकल्पाचे शतांश हवन होईल. त्यानंतर हभप गुरूश्री प्रिया मालवणकर यांचे गुरुचरित्रावर प्रवचन होईल. हभप वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी यांचे सोमवारी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नामसंकीर्तन होईल. बुधवारी सायंकाळी हभप गुरुदास श्री देशमुख महाराज यांचे ‘सद्गुरुवीण सापडेना सोय’ यावर प्रवचन होईल. भागवताचार्य हभप चंद्रकलाताई आळंदीकर, पासलकर शिक्षण संस्था दासवे येथील हभप शाम पासलकर, फलटण येथील हभप देविदास महाराज शिळीमकर यांची कीर्तनसेवा, तर गव्यसिद्ध चंद्रकांत विचारे यांचे गोमातेवर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. अखेरच्या दिवशी दत्तधाम सिंदगाव येथील बाळकृष्ण महाराज, मठाधीश महेश महाराज व प्रख्यात भविष्यवेत्ता निशांत भारद्वाज ‘देश आणि सनातन धर्म’ यावर मार्गदर्शन करतील.”

लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल झाले पण, प्रवासी अद्याप सुविधांपासून वंचितच-माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

पुणे – भाजपचे नेते आणि प्रसिद्धी यंत्रणा लोहगाव विमानतळ टर्मिनल च्या निमित्ताने प्रसिद्धीचा सोस भागवून घेत आहेत. परंतु प्रवाशांना अद्यापही सुविधांपासून वंचितच रहावे लागत आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

विमानतळावरील गर्दी टाळणे आणि प्रवाशांना प्रवासासाठी सुलभ व्यवस्था करून देणे यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर मोहोळ यांनी टर्मिनल ची पहाणी करून मोठा गाजावाजा केला. ऑगस्टमध्ये टर्मिनल कार्यान्वित झाले. अद्यापही प्रवाशांसाठी सुविधाच उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

विमानतळ टर्मिनलवर ॲपद्वारे नोंदणी केल्यावरही रांग न लावता प्रवेश करण्यासाठी डिजीयात्रा काउंटरची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. अन्य आऊटलेटचे काम झालेले नाही. सिक्युरिटी काउंटर्स आहेत. पण, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी प्रत्येकी फक्त दोन काउंटर्स उपलब्ध असल्याने रांगेत थांबावे लागते. हे टर्मिनल अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे. भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धीचा सोस न करता प्रवाशांना सुविधा मिळतील याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

शरद पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टर प्रवास घडवला:अमित शहा यांच्यावरील टीकेवर विनोद तावडेंचा पलटवार

मुंबई-दाऊदच्या हस्तकांना प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दहशतवादी याच्या एन्काऊंटर प्रकरणी तडीपारी बरी असा टोला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तडीपारीवरुन टीका केली होती.

अमित शहांनी शिर्डीच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलास होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शहा यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही. देशात आजपर्यंत अनेक गृहमंत्री झाले ज्यांनी पदाची प्रतिष्ठा वाढवली, असे ते देशभक्त होते. आपण तडीपार असा गृहमंत्री पाहिलेला नाही असा टोला त्यांनी शहांना लगावला. गुजरातमध्येही अनेक प्रशासक होऊन गेले. या सगळ्या प्रशासकांचे वैशिष्ट्य होते, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नव्हते.भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले की, दाउदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवार साहेब विसरले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विजयाने 1978 पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचे जे राजकारण होते ते 20 फूट गाडण्याचे काम केले. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, 2019 ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. 1978 ते 2024 पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचे राजकारण सुरु होते. ते जनतेने संपवून दाखवले.

प्रयागराजसाठी दररोज विमानसेवा

एअर इंडिया महा कुंभ २०२५ साठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजसाठी दररोज विमानसेवा देणार

  • २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिल्लीप्रयागराज विमानसेवा
  • दिल्लीभारतातील इतर शहरे आणि जगातील इतर भागांमधून प्रयागराजसाठी सुविधाजनक विमानसेवा

गुरुग्राम १४ जानेवारी २०२५:  एअर इंडियाने आज घोषणा केली आहे कीजगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मिळावा महा कुंभ मेळा २०२५ साठी दिल्ली आणि प्रयागराज दरम्यान दररोज विमानसेवा चालवली जाणार आहेही दैनंदिन विमानसेवा महा कुंभ मेळा २०२५ साठी तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.

महा कुंभ मेळा २०२५ साठी प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहेही मोठ्या प्रमाणावर वाढलेली मागणी सक्षमपणे पूर्ण करता यावी यासाठी एअर इंडिया २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रयागराजसाठी विशेष विमानसेवा चालवणार आहेत्यामुळे आता एअर इंडिया ही दिल्ली ते प्रयागराज सर्व सेवांसहित विमान प्रवास सुविधा देणारी एकमेव कंपनी बनली आहेएअर इंडियाने आपल्या प्रवाशांना इकॉनॉमी क्लासबरोबरीने प्रीमियम केबिनचा देखील पर्याय उपलब्ध करवून दिला आहे.

दोन्ही बाजूंनी दिवसाच्या सुविधाजनक वेळी सुटणार असलेल्या या विमानसेवांमुळे भारतातील विविध शहरे तसेच उत्तर अमेरिकायुरोपऑस्ट्रेलिया आणि दक्षिणपूर्व आशियातील विविध देशांमधून तसेच या देशांमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ही खूप मोठी सोय आहे.

दिल्ली आणि प्रयागराज दरम्यान विमानसेवेचे वेळापत्रक
कालावधीविमान#फ्रिक्वेन्सीक्षेत्रप्रस्थानआगमन
२५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५एआय२८४३दररोजदिल्ली-प्रयागराज१४:१०१५:२०
एआय२८४४दररोजप्रयागराज-दिल्ली१६:००१७:१०
 फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५एआय८४३दररोजदिल्ली-प्रयागराज१३:००१४:१०
एआय८४४दररोजप्रयागराज-दिल्ली१४:५०१६:००

या विमानसेवांची बुकिंग्स सर्व चॅनेल्सवर खुली करवून देण्यात येत आहेत, 

सत्तेचा वापर लोक कल्याणासाठी – ना. चंद्रकांतदादा पाटील.

ग्लोबल ग्रूप तर्फे वाघजाई देवीला 5 किलो चांदीचे दागिने समर्पित – संदीप खर्डेकर

पुणे:

सत्तेचा किंवा मिळालेल्या पदाचा वापर हा लोककल्याणासाठी केला पाहिजे या भावनेने मी राजकारणात कार्यरत असतो अशी भावना ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.मला कोथरूडकरांनी विक्रमी मतांनी विजयी केले आणि माझ्यावर विश्वास दाखविला याबद्दल मी कृतज्ञ तर आहेच पण कोथरूड मतदारसंघातीलच नव्हे तर पुण्यातील सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचेही मा. ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
ग्लोबल ग्रूप च्या वतीने संचालक श्री. संजीव अरोरा यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान संचालित कोथरूड नवरात्र उत्सवाच्या श्री वाघजाई देवीस 5 किलो चांदीचे दागिने समर्पित करताना मा. चंद्रकांतदादा व संजीव अरोरा यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ह्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी ग्लोबल ग्रुपचे संचालक संजीव अरोरा,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, विश्वस्त उमेश भेलके, सौ. श्वेताली भेलके,सौ. अक्षदा भेलके, मा. नगरसेविका वासंती जाधव, शहराचे भाजपा उपाध्यक्ष प्रशांत हरसूले,शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे, कामगार आघाडी चे राज्य सरचिटणीस बाळासाहेब टेमकर,नवनाथ जाधव,उद्योजक सारंग राडकर, अक्षय मोरे, सुरेश जपे, संदीप मोकाटे, किरण उभे यासह समीर ताडे,गजानन माजिरे, मोहित भेलके व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नवरात्र उत्सव साजरा करत असतानाच वर्षभर समजपयोगी उपक्रम राबवत असते व संस्थेस मिळालेला सर्व निधी गरजू व्यक्तींच्या साठी मदतकार्यात खर्च करत असते असे संदीप खर्डेकर म्हणाले.मात्र हे करत असताना देवीच्या साज शृंगाराकडे आम्ही कधीच लक्ष दिले नाही असेही संदीप खर्डेकर म्हणाले. मात्र ग्लोबल ग्रूप चे संचालक आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे हितचिंतक संजीव अरोरा यांच्या लक्षात ही बाब आली व त्यांनी देवीच्या चरणी 5 किलो चांदीचे दागिने समर्पित केले व त्यायोगे देवीच्या सुबक मूर्तीचे तेज शतपटीने वाढल्याचे ही खर्डेकर म्हणाले.
संजीव आरोरांसारखे उद्योगपती जे आपल्या कडे असलेले अतिरिक्त पैसे हे समाजासाठी खर्च करतात हे कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संजीव अरोरा यांना पुणेरी पगडी, शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. भविष्यात ही आपण समाजोपयोगी कार्य करत राहू असे संजीव अरोरा म्हणाले.
यावेळी दागिने घडविणारे कलाकार नितीन कर्डे यांना ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले तर वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योगपती सारंग राडकर व मा. नगरसेविका वासंती जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
देवीच्या आरतीने ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ. आनंद गोविंदालुरी

पीसीईटी आणि सिंगापूर येथील गोविंद होल्डिंग्स यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

पिंपरी, पुणे – भारतातील स्टार्टअप्स, एमएसएमई उद्योगांना जागतिक पातळीवरती प्रचंड संधी आहेत. याचा फायदा घेण्यासाठी युवकांनी औद्योगिक विकासाची कास धरावी. यामुळे अनेक रोजगार निर्माण होतील. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर होण्यासाठी चाकोरी बाहेरच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देत रोजगार निर्मिती करावी. त्यामुळेच देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन गोविंद होल्डिंग्स सिंगापूरचे संस्थापक संचालक आणि समूह कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद गोविंदालुरी यांनी केले‌.
आधुनिक विज्ञान – तंत्रज्ञानाचा वापर औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात वाढत आहे. महाराष्ट्रातील नव उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स यांना जागतिक पातळीवरील नव्या बदलांची माहिती व्हावी. तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा, संवाद साधता यावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि गोविंद होल्डिंग्स, सिंगापूर यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. पीसीईटीच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आणि या करारावर गोविंद होल्डिंग च्या वतीने डॉ. गोविंदालुरी यांनी सह्या केल्या. यावेळी ॲक्शन अगेन्स हंगर फ्रान्सचे ग्लोबल चेअरमन अश्विनी कक्कर, स्टॅटर्जी अँड डेव्हलपमेंट फिनलँडचे हेरंब कुलकर्णी, ट्रेड इंडिया डॉट कॉम चे सीईओ संदीप छेत्री, डीआयसीसीआयचे मिलिंद कांबळे, फाईव्ह एफ डिजिटलचे अध्यक्ष गणेश नटराजन, बीव्हीजीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड, राजेंद्र जगदाळे, मकरंद फडके सी.ए. वृषभ पारक, दुबई वीज आणि जल प्राधिकरण चे व्यवस्थापक सोमनाथ पाटील, समीर वाघ, डॉ. सानिध पाटील, गर्जे मराठी ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, एमएडीसीचे उपाध्यक्ष सचिन इटकर, गर्जे मराठी ग्लोबलचे संचालक विनय तळेले, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आदी उपस्थित होते.
या शैक्षणिक करारामुळे विद्यार्थी, प्राध्यापकांना जागतिक स्तरावरील उच्च दर्जाचे शिक्षण तसेच उद्योग जगतातील तांत्रिक आणि आर्थिक विषयक माहिती मिळणार आहे. पीसीईटी गुणवत्तापूर्ण दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रमामध्ये करत आहे. अल्पावधीतच पीसीईटीने आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला असून जगातील ३३ पेक्षा अधिक विद्यापीठे, संस्था यांच्याबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले.

मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारचा नवीन कायदा.

भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, सरसकट सर्व बहिणींना २१०० रुपये द्या.

मुंबई
राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकार कडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

भंडारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षाच झाली पाहिजे. बीड व परभणीच्या घटनेने महाष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. दोन्ही घटनांवर भाजपा युती सरकारचा जो तमाशा सुरु आहे, त्याबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपा सरकारला माफ करणार नाही.

मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठी नवा कायदा…
विधानभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने पाप केले आहे. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते वाढली कशी? याचे समाधानकारक उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मतदारांच्या रांगा असल्याचे व्हिडीओ दाखवावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण आयोगाने ते पुरावे दिलेच नाहीत. तर विधानसभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली केली. मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठी केंद्र सरकारने आता कायदा केला आहे, या नव्या कायद्यानुसार निवडणूक आयोग कोणतीही माहिती देत नाही. मतांवर दरोडा घालण्याचे काम भाजपा व निवडणूक आयोगाने केले आहे. मतांची चोरी करून सरकार आल्याने जनता या सरकारला आपले सरकार मानत नाही, असे पटोले म्हणाले.

भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात…
विधानभा निवडणुकीत माता भगिनींची मते घेण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरु करून सरसकट सर्व भगिनींना दीड हजार रुपये दिले आता या सरकार स्थापन झाल्याने भाजपाला बहिणींची गरज राहिलेली नाही म्हणूनच बहिणींना धमक्या देऊन पैसे परत घेण्याची भाषा केली जात आहे हा विश्वासघात आहे. भाजप युती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत सरसकट सर्व बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावेत, असेही नाना पटोले म्हणाले.

तर..:आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल, भाजप नेत्याचा शरद पवारांना इशारा

मुंबई-अमित शहांचे भाषण आणि भापजचे अधिवेशन शरद पवारांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. शरद पवारांचा कुठेतरी तोल जाऊ लागलाय याची चिंता वाटते. शरद पवारांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा अमित शहांच्या तडीपारीची भाषा केली. हीच भाषा आणि अशाच वक्तव्यांमुळे शरद पवारांना, त्यांच्या पक्षाला, मित्रपक्षाला आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केले आहे, असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. तुम्ही जुन्या प्रकरणांवरून बोलत असाल, तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अमित शहांच्या टीकेवर पलटवार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद आहे. देशाच्या इतिहासात अनेक जण गृहमंत्री झाले पण आतापर्यंत कुणालाही तडीपार करण्यात आले नाही, असे म्हणत शरद पवार यांनी शहा यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.

न्यायालयात निर्दोषत्व मिळालेल्या अमित भाईंबद्दल वारंवार अशाप्रकारे उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून नाही. तरीही याबाबत तुम्ही विधान करणार असाल, तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल. ती वेळ तुम्ही आणू देऊ नका. लवासाबाबत कोर्टाने दिलेले निर्देश, त्यातील शंका आणि वलय ही चार बोटे कोणाकडे येतात हे लक्षात ठेवा, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला. लवासापासून बऱ्याच प्रकरणाचे संकेत कोणाकडे जातात हे बोलायची वेळ आणू नका, असेही शेलार यांनी म्हटले.

तुमची जनसंघ आणि भाजपशी जवळीक होती, हे आज तुम्हीच मान्य केले. कधी कधी सत्य समोर येते. जनसंघाच्या जीवावर तुम्ही सरकार बनवले, हे तुम्ही मान्य केले. जरा आणखी खरे बोला. ते सरकार बनवण्यापूर्वी विश्वासघाताचे कुठले बीजारोपण तुम्ही केले होते? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. कुठल्या नेत्याच्याविरोधात तुम्ही काय केले होते. विश्वासघातकी संस्कृतीचे जनक 45 वर्षापूर्वी कोण होते? ते सत्यही समोर आणा. स्वत: महाराष्ट्रातून हद्दपार झालेल्यांनी तडीपारीची भाषा करू नये, अशी टीका शेलार यांनी केली.

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. विश्वासघातकी राजकारणाचे ट्रेनिंग उद्धव ठाकरे घेत आहेत हे 2019 ला महाराष्ट्राने पाहिले. महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. महाविकास आघाडी फुटणार असे आधीच सांगितले होते. स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकत्र आले ते आता बाजूला होत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मविआतील लोक एकत्र आले नव्हते. आता त्यांचा स्वार्थ संपल्यामुळे ते दूर जात आहेत, असा टोलाही आशिष शेलार यांनी मविआ नेत्यांना लगावला.

’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणारे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा करत आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांतून प्रेमाच्या अनेक छटा दाखवणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे आता ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ची कथा केवळ तरुण तरुणी भोवती फिरणारी होती. तर ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ कोणत्याही सिक्वेलसारखा नसलेला कथा पुढे नेणारा एक चित्रपट होता आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ यातही एक अनोखा दृष्टीकोन पाहायला मिळाला. सतीश राजवाडे यांच्या ’प्रेमाची गोष्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली. दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची ही भावनिक कहाणी होती. तर ‘ती सध्या काय करते’ मध्ये बालपणाच्या प्रेमाची आठवण करून देणारी गोड गोष्ट होती. या सगळ्या चित्रपटांनंतर आता ‘प्रेमाची गोष्ट २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे नाविन्य म्हणजे यात व्हीएफएक्स आणि प्रेमकथेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. मात्र यातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असल्याने हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रेमाचे नशीब, नशीबातील प्रेम बदलणारी एक नवीन गोष्ट ‘प्रेमाची गोष्ट २’ मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेम कधी-कधी नशिबाशी खेळतं आणि कधी नशीब प्रेमाला नव्या वाटेवर घेऊन जातं, या संकल्पनेवर आधारित ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांचा रंजक प्रवास पाहायला मिळेल.

चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही नेहमीच नव्या धाटणीचे चित्रपट घेऊन येतो. प्रेमकथांमध्ये नेहमीच वेगळं आणि हटके कथानक देऊन प्रेक्षकांचे मन जिंकणारा दिग्दर्शक पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी नव्या पिढीची प्रेमकथा घेऊन येत आहे. ही केवळ एक प्रेमकथा नसून व्हीएफएक्सच्या थक्क करणाऱ्या दृश्यांसह एक अप्रतिम अनुभव असेल. प्रेक्षकांना ही नवी संकल्पना नक्कीच आवडेल. यात अशी भावना आहे, जी प्रत्येक पिढीला, वयाला आपल्या जवळची वाटेल.”

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “प्रेक्षकांनी आमच्या आधीच्या चित्रपटांना खूप प्रेम दिले. आता एक अशीच नवी प्रेमकथा ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटात पाहायला मिळेल. काळाबरोबर पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे कथानकाचे सादरीकरणही त्याला साजेसं हवं. यात प्रेमकथाच नाही तर ती सादर करायची पद्धतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घडवली आहे. त्यामुळे ही प्रेमकथा काळाच्या पुढे जाणारी नवीन युगाची प्रेमकथा ठरणार आहे. प्रेमाची एक वेगळी बाजू यात दिसेल. प्रेम आणि नशीब जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम फार वेगळा असतो. प्रेम आणि नशिबाचा हा मनोरंजनात्मक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांनी नेहमीच प्रेक्षकांना पैसा वसूल करणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी एक खास भेट ठरणार आहे. येत्या जून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील संस्थेचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी तातडीने वितरित

मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी 1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन केलेल्या या कार्यवाहीमुळे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी 75 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली आहे. संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. डॉ. विकास आमटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेस 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत हा निधी संस्थेस तात्काळ वितरीत करण्यात आला आहे.

थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 75 वर्षे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कुष्ठरुग्णांचे उपचार, पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत आहे. संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित दिड हजार कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार ,वृद्ध, अनाथ, परित्यक्ता, मानसिकदृष्ट्या अपंग बांधवांची आणि त्यांची मुलांची काळजी घेतली जाते. विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात निवासी तीनशे दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थींना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य साडेतीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोयही संस्थेमार्फत केली जात आहे. संस्थेच्या या सामाजिक बांधलकी आणि सेवाकार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाकडून देय 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी संस्थेस तात्काळ वितरीत केला आहे.

‘शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजेच हनुमान’‘हुप्पा हुय्या २’ येणार !

‘हुप्पा हुय्या’ म्हटलं की ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून निघते. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या २’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

पहिल्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मारुतीरायाने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे आणि हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड  यांचा ‘हुप्पा हुय्या २’ रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने  सज्ज होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले, ‘‘हुप्पा हुय्या २’ हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल, असा विश्वास मला आहे. आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कटतेने आणि भव्यदिव्य पद्धतीने साकारणार आहोत’.   

रानटी, हाफ तिकीट, धारावी बँक, इंदोरी इश्क, आयना का बायना, आश्चर्यचकीत, ३६ गुण या सारख्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचे  दिग्दर्शन करणाऱ्या समित कक्कड यांच्यासारखा कल्पक आणि सिनेमाच्या तंत्रावर भक्कम पकड असलेला दिग्दर्शक याही चित्रपटाला कलात्मकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेईल यात शंका नाही.  समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या २’ ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड हे करीत असून, संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे तर लेखन हृषिकेश कोळी यांचे आहे.

‘संकटात धैर्य, संघर्षात साहस आणि विजयात विनम्रता शिका’ अशी मारुतीरायाची शिकवण मानणाऱ्या ‘हुप्पा हुय्या २’च्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

कृषी पणन मंडळाच्या मिलेट (तृणधान्य) महोत्सवाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद

0

पुणे- महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत 8 ते 12 जानेवारी, 2025 या कालावधीत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘मिलेट महोत्सव-2025’ महोत्सवाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. महोत्सवाद्वारे सुमारे 35 लाखांची उलाढाल झाली असून यापुढील काळातही विविध महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात आले. यामुळे मोठ्याप्रमाणात नवऊद्योजक तयार झाले. त्यामुळे त्यांना विक्रीसाठी व्यासपीठ देण्यासाठी कृषी पणन मंडळामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्स्वाचे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी पणन मंडळाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या मिलेट बाईक रॅलीद्वारे पुणे शहरातील प्रमुख मार्गावरून मिलेटबाबतची जन-जागृती करण्यात आली.

महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांना 50 दालने (स्टॉल) उपलब्ध करून देण्यात आले होते. ग्राहकांना अस्सल मालदांडी – दगडी ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व त्यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली – मिक्स, रागीचा डोसा मिक्स, वरईचे दूध, वरईचे श्रीखंड, बाजरीची बर्फी अशी विविध नाविण्यपूर्ण उत्पादनांसोबतच नागपूरची संत्री व त्याचा रस थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून बनविलेल्या 20 प्रकारच्या चवींची आईस्क्रीम हे या महोत्सवाचे आकर्षण ठरले.

महोत्सवामध्ये मिलेट उत्पादन, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व या विषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूरचे प्रमुख, डॉ. योगेश बन यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या महोत्सवात पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी महोत्सवातील मिलेट उत्पादकांशी मिलेटच्या विक्रीव्यवस्थेबाबतच्या (मार्केटिंग) अडचणींविषयी चर्चा केली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री. कदम तसेच श्री. कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशांतर्गत व्यापार विकास विभागाचे मंगेश कदम, सहाय्यक सरव्यवस्थापक सुहास काळे, सचिन माने, उमाकांत वाघ, साक्षी गायकवाड व आनंद शुक्ल यांनी परीश्रम घेतले.

महोत्सवास विविध क्षेत्रातील साधारणत: 12 ते 15 हजार व्यक्तींनी समक्ष भेट देऊन तृणधान्याची उत्पादने खरेदी केली, अशीही माहिती कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संजय कदम यांनी दिली.

पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी

नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्ताचे आवाहन

पुणे: गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहे.
बाणेर कडुन शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक :- बाणेरकडून येणारी वाहतुक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चर मधून युटर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर इच्छितस्थळी जातील.
शिवाजीनगरकडून औंध कडे जाणारी वाहतुक:- शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरोड मार्गे इच्छितस्थळी जातील.
औंधकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक:- औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विदयापीठ मुख्य प्रवेशव्दारातून बाहेरपडून इच्छितस्थळी जातील. नागरीकांनी वाहतूक बदल मार्गाचा वापर करुन वाहतूक शाखेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. झेंडे यांनी केले आहे.

अनुग्रह फौंडेशन आयोजित शिबिरात 110 दिव्यांगांची तपासणी

पुणे : पुण्यातील अनुग्रह फौंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील उत्सव हॉलमध्ये आयोजित शिबिरात 110 पेक्षा जास्त दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.
अनुग्रह फौंडेशन गेल्या 11 वर्षांपासून दिव्यांगांसाठी कार्यरत आहेत. संस्थेतर्फे प्रथमच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे संस्थेच्या संचालक मंडळ सदस्या सीमा पाटील यांनी सांगितले. या शिबिरात मतिमंद मुलांचा जास्त सहभाग होता. शिबिरात बालरोगतज्ज्ञ डॉ. ईशा देशमुख, विशेष मुलांच्या तज्ज्ञ डॉ. जाई जोशी, हृदय विकार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र पाटील, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा देवधर, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चिन्मय कुंभार, दंतचिकित्सक डॉ. रणजीत फाळके, डॉ. प्रतिभा पंडित, फिजिशियन डॉ. वृषाली नाईक, नेत्र विकार तज्ज्ञ डॉ. अरविंद भावे, डॉ. शिल्पा पाटील, डॉ. जयेश पाटील यांनी दिव्यांगांची तपासणी केली.
वैशाली भीमपुरे, दिपाली विद्वांस, माधुरी पटवर्धन व बबिता शुक्ल यांनी दिव्यांग मुलांच्या थेरपी, शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. पालक समुपदेशक पल्लवी इनामदार व आनंद कुलकर्णी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सर्व मुलांना मोफत औषधे, काही वस्तू व पालकांसाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तसेच आयुष गुरव या मुलाला व्हिलचेअर देण्यात आली. दिव्यांगांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती या वेळी देण्यात आली.
यूडीआयडी कार्ड, निरामय विमा योजना, महापालिकेकडून मिळणारे पेंशन, कायदेशिर पालकत्व याचे अर्ज या वेळी भरून घेण्यात आले. एका छताखाली 18 विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अशा पद्धतीचा शहरात पहिल्यांचा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाल्याने भविष्यात शहराच्या विविध भागात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे रुपाली परांजपे आणि डॉ. वृषाली देहाडराय यांनी सांगितले.