Home Blog Page 438

प्रेमविवाहानंतर आरोपीस सात वर्षांचा मुलगा:तरीही समलैंगिक संबंध ठेवून कमवायचा पैसे, आराेपी गाडेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

पुणे-स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून सुखाने संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे सातत्याने वाद सुरू होते. त्याचा भाऊ शेती करतो. मात्र, आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.घटनेच्या दिवशी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे एक पथक थेट त्याच्या घरी चौकशीस आल्यानंतर त्यांनी आरोपीसारखे साधर्म्य असलेल्या भावाला उचलून तपास सुरू केला. ही माहिती आरोपीलादेखील समजली. कधीही न बोलणाऱ्या चुलत भावाचा त्याला फोन आला. या वेळी त्याने घरी आई पडल्याचे सांगितल्याने आरोपीला संशय आला व त्याने त्याचा फोनच बंद करून पलायन केले. याचदरम्यान गुन्हे शाखेचे पथक व स्वारगेट पोलिसांनी आरोपीच्या गावाच्या परिसरातील शेताकडे तो गेल्याची माहिती मिळाल्याने शोध सुरू केला. पोलिसांची १६ ते १७ पथके, ग्रामस्थ, पोलिस पाटील, गावातील तरुणांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्याचसोबत जवळपासच्या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनाही बोलावून पोलिसांनी साडेतीन हजार लोकांची बैठक घेत त्यांना शोधमोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले

श्रीगोंदा, दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागात तो बसस्थानक, रेल्वेस्थानक येथेदेखील यापूर्वी फिरल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्याचे मित्र, नातेवाइकांची मुक्काम ठिकाणेदेखील पोलिसांनी शोधून काढली होती.आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत वर्षभरात तो नेमका कुठे कुठे फिरलेला आहे, त्याने कुणाला अधिक प्रमाणात संपर्क केला, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्याची स्वभाववैशिष्ट्ये काय आहेत, यावरून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला होता. पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी तो मागील काही काळात गेल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी या ठिकाणी पोलिस पथके पाठवण्याची तयारी केली होती.

गुनाट गावाच्या परिसरातील १०० ते १५० एकर परिसरात घनदाट ऊस क्षेत्र असल्याने पोलिसांना तपासकामात अडचणी येत होत्या. याचा फायदा घेऊन आरोपी सुरुवातीला उसाच्या शेतात मळकट कपडे, अनवाणी पायाने आतल्या भागात फिरत राहिल्याने पोलिसांना तो सापडला नाही. या कालावधीत तो शेतातील ऊस व टोमॅटो खाऊन राहत होता. परंतु पाणी व भूक अधिक लागल्याने तो शेतातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला दोन ग्रामस्थांना दिसला.

मानाच्या “ पुणे श्री २०२५” चा कमलेश आचरा ” मानकरी.

पुणे. लोकमान्य नगर.. द हिंदू फाउंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव मित्र परिवाराच्या वतीने पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना आणि पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने लोकमान्य नगर. सदाशिव पेठ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बॉडी बिल्डिंग जिमचा कमलेश आचरा हा मानाच्या “पुणे श्री २०२५ चा मानकरी ठरला.
वुमेन्स फिजिक श्री २०२५.”ची मानकरी माय टी फिटनेस जिमची यशोदा भोर ठरली. तर “आमदार हेमंतभाऊ रासने श्री २०२५” चा किताब ए बी एस जिमचा आकाश दडमल” याने पटकावला.
देशात एका जिल्हास्तरीय स्पर्धेत पाच टायटल देणारी, स्पर्धेत पाच लाख रुपयांची पारितोषिके देणारी, सर्वात जास्त स्पर्धक सहभागी असणारी देशातील हि एकमेव शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली.
पुणे श्री २०२५ चा मानकरी ठरलेल्या कमलेश आचरा यास मानाची आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम २५५५५/- (पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
“ना. चंद्रकांतदादा पाटील द हिंदू श्री २०२५ चा मानकरी जी एस फिटनेस जिमचा विशाल सुरवसे” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
ना. मुरलीधर मोहोळ मेन्स फिजिक्स श्री २०२५ रोहन गोगावले ” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र.
“ना. माधुरीताई मिसाळ वुमेन्स फिजिक श्री २०२५.
ची मानकरी ठरलेल्या यशोदा भोर हिस आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा रुपये ) चा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र. आणि “आमदार हेमंतभाऊ रासने श्री २०२५ चा मानकरी ठरलेल्या ए बी एस जिमचा आकाश दडमल” यास आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम १११११/- (अकरा हजार एकशे अकरा) रुपयाचा धनादेश, मानाचा बेल्ट आणि प्रमाणपत्र आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले.
स्पर्धेत एकूण पाच लाख रुपयाची वेगवेगळी बक्षीसे धनादेशा द्वारे देण्यात आली.
बॉडी बिल्डरचे ५५ किलो ते ८० किलो वरील असे सात गट. मेन्स फिजिक चे दोन गट आणि वूमेन्स फिजिक चा एक अशा १० गटात अनुक्रमे १ ते १० क्रमांक विजेत्यातील प्रथम क्रमांक विजेत्यास ५५५५/- (पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ) पासून ते दहाव्या क्रमांक विजेत्यास १३३३/-
( एक हजार तीनशे तेहतीस ) रुपयाचा धनादेश, अप्पर ट्रॅक, टीशर्ट
प्रोटीन आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

         "बेस्ट पोझर" ठरलेल्या ऋषिकेश भोसले आणि मोस्ट इंप्रूव्हड चा मानकरी ठरलेल्या वर्ल्ड ऑफ फिटनेस जिमचा निलेश धोंडे या दोघा पारितोषिक विजेत्यास ५५५५/- (पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ) चा धनादेश, आकर्षक ट्रॉफी देउन गौरवण्यात आले. 
          स्पर्धेत सहभागी झालेल्या १९० शरीर सौष्ठव पटूस टी शर्ट आणि प्रमाणपत्र देण्यात आली. 
     स्पर्धेतील प्रमुख बक्षीस वितरण कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. तसेच माजीनगरसेवक राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिलीप काळोखे,  स्मिता वस्ते,   भाजप पदाधिकारी गणेश घोष, पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष झंजाड, प्रमोद कोंढरे, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे. उमेश शाह, उदय लेले, शैलेश लडकत, विशाल पवार, माधव साळुंके, संजय गावडे, महेंद्र चव्हाण, सुरज लोखंडे, राजेश धोत्रे, प्रशांत हरसुले, राजाभाऊ देशमुख, पृथ्वीराज भिंताडे, जयंत देशपांडे, श्रेयस रासने, सचिन जामगे, डॉ पराग नवलकर, बंडोपंत फडके, रामा एरंडे आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली. 
      स्पर्धेचे आयोजन मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी केले होते. 

स्पर्धेत सूत्रसंचालन राजेंद्र नांगरे आणि शंतनू खिलारे यांनी केले.
मुस्तफा पटेल, प्रशांत जगताप. नवनाथ शिंदे. सागर येवले. दिलीप धुमाळ यांनी पंच म्हणून काम पाहिले.
आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर व देसाई ब्रदर्स गु्रप ऑफ कंपनीज्‌‍ आयोजितअपंग, मूकबधीर विद्यार्थ्यांच्या जलतरण स्पर्धा उत्साहत

पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर व देसाई ब्रदर्स गु्रप ऑफ कंपनीज्‌‍ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 28) अपंग आणि मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजभवना जवळील बालकल्याण संस्थेत या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत 3234 डी-2 चे उपप्रांतपाल-1 राजेश अग्रवाल, माजी प्रांतपाल सी. डी. शेठ, लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरच्या अध्यक्षा श्रद्धा हाटे, ॲक्टिव्हिटी चेअरमन सतीश शहा, ॲक्टिव्हिटी को-ऑर्डिनेटर दीपक दोशी, सचिव मिलिंद तलाठी, कोषाध्यक्ष संयोगिता शहा, देसाई ब्रदर्स गु्रप ऑफ कंपनीज्‌‍चे संचालक उमेश पारेख, बालकल्याण संस्थेच्या प्रमुख अपर्णा पानसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. गेल्या 29 वर्षांपासून स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत महाराष्ट्राच्या अनेक शहरांमधून आणि ग्रामीण भागातून एकूण 150 स्पर्धक सहभागी झाले होते.
राजेश अग्रवाल यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून लायन्स क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रास्ताविकपर स्वागत लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरच्या अध्यक्षा श्रद्धा हाटे यांनी केले. स्पर्धेस देसाई ब्रदर्सचे चेअरमन नितीन देसाई यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रमेश विपट, अभिजीत तांबे, भूपेंद्र आचरेकर, शशांक कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. प्रकाश नारके आणि सुजाता दोशी यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद तलाठी यांनी आभार मानले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

16 वर्षाखालील मुले (ऑटिझम) – प्रथम : आदिराज उल्हे, द्वितीय : रुद्र पुराणिक, तृतीय : रुद्र चव्हाण
16 वर्षाखालील मुली (ऑटिझम) – प्रथम : आदिती गाडे, द्वितीय : नव्या शार्दुल
16 वर्षावरील मुले (मतिमंद) – प्रथम : आर्य दिवाण, द्वितीय : दर्शन खंडागळे, तृतीय : राहुल केदार
16 वर्षावरील मुली (मतिमंद) – प्रथम : साक्षी सुतार
16 वर्षाखालील मुली (मतिमंद) – प्रथम : वैदेही भाटवडेकर
16 वर्षाखालील मुली (अंध) – प्रथम : देवदास पारधी, द्वितीय : देवा शुक्रे, तृतीय : बाबासाहेब वाघमारे
16 वर्षाखालील मुले (कर्णबधीर) – प्रथम : राज गायकवाड, द्वितीय रुणीत शिगवण, तृतीय : जितू चौधरी
16 वर्षाखालील मुली (कर्णबधीर) – प्रथम : श्रुती जगदाळे, द्वितीय : संध्या सूर्यवंशी, तृतीय : आराध्या सूर्यवंशी
16 वर्षावरील मुले (कर्णबधीर) – प्रथम : संकेत तुळे, द्वितीय : रवी कुमार, तृतीय : श्रेयस खोडले
16 वर्षावरील मुली (कर्णबधीर) – प्रथम : गायत्री जगदाळे

सुरक्षित आणि अपराधमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. २८ : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाविषयी नाराजी आणि असंतोष दिसून येत आहे. घरफोडी, लुटमार, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, महिलांविरोधातील अत्याचार आणि किशोरवयीन गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवणे गरजेचे आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार , पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त श्री विनय चोबे आणि पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख यांना पत्राद्वारे निर्देश दिले असून, नागरिकांच्या मदतीने प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांसोबत अधिक समन्वय साधून कार्य करावे, तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सूचित केले आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसोबत नियमित बैठका घेऊन त्यांचे प्रश्न आणि सूचना ऐकाव्यात, स्थानिक दक्षता समित्यांना अधिक सक्रिय करून स्थानिकांचा पोलिसांच्या कामकाजात सहभाग वाढवावा तसेच शाळा, महाविद्यालये आणि समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षाविषयक जनजागृती शिबिरे आयोजित करावीत, युवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना पोलीस मित्र, होमगार्ड आणि सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करण्यासाठी प्रेरित करावे.

नागरिकांनी पोलिसांशी थेट संवाद साधता यावा यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, हेल्पलाईन आणि मोबाइल अॅप्सचा अधिक चांगला वापर करण्याची गरज असल्याचेही डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले. गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘वॉच डॉग’ प्रणाली सुरू करून नागरिकांना संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच, महिला आणि वृद्धांसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीसीटीव्ही नेटवर्क वाढवून सार्वजनिक ठिकाणी अधिक कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पारदर्शक प्रणाली विकसित करावी, असेही त्यांनी सुचवले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि संशयास्पद व्यक्तींबद्दल माहिती देण्यासाठी पुढे यावे, यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवावी, अशी सूचनाही डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

पोलीस प्रशासनाने तातडीने या उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आदेश डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. “सुरक्षित आणि अपराधमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या आदित्य-एल 1 ने सूर्याच्या प्रभावळीतील ‘कर्नेल’, म्हणजेच शक्तिशाली सौर ज्वाळांचे अभूतपूर्व दृश्य टिपले


आदित्य-एल 1 वरील एसयूव्हीने दिले सौर ज्वालांचे अभूतपूर्व तपशील

सौर भौतिकशास्त्रातील ही ऐतिहासिक झेप

पुणे/मुंबई, 28 फेब्रुवारी 2025

भारताची पहिली समर्पित सौर अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल 1 वरील ‘एसयूटी (SUIT)’, या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (दुर्बीण) सूर्याच्या प्रभावळीतील फोटोस्फीअर आणि क्रोमोस्फीअर या वातावरणात ‘कर्नेल’, म्हणजेच शक्तिशाली सौर ज्वाळांचे अभूतपूर्व दृश्य टिपले आहे. सौर भौतिकशास्त्रातील ही ऐतिहासिक झेप आहे.

एसयूटीने 22 फेब्रुवारी 2024 रोजी एक्स 6.3-क्लास ची सौर ज्वाला टिपली होती, ज्याची  अल्ट्राव्हायोलेट (एनयूव्ही) तरंगलांबी श्रेणी (200-400 एनएम) इतकी होती. सूर्याचा संपूर्ण पृष्ठभाग संपूर्ण तरंगलांबीच्या श्रेणीत एवढ्या बारीक तपशिलांसह प्रथमच चित्रित करण्यात आला आहे. ही निरीक्षणे सूर्याच्या पृष्ठभागावरील स्फोटक घडामोडी आणि सूर्याच्या वातावरणातील विविध थरांमध्ये ऊर्जा हस्तांतरण नियंत्रित करणाऱ्या जटील प्रक्रियांबद्दलचा नवा दृष्टीकोन देतात.

चुंबकीय ऊर्जा अचानक मुक्त झाल्यामुळे निर्माण होणार्‍या सौर ज्वालांचा अनेक प्रकारे  परिणाम होऊ शकतो, उपग्रह परिचालन, रेडिओ दळणवळण आणि पॉवर ग्रिडवर परिणाम होऊ शकतो, तसेच अंतराळवीर आणि विमान प्रवाशांसाठी ते धोकादायक ठरू शकते. इतिहासात एक शतकाहून अधिक काळ अशा घटनांची नोंद झाली आहे, परंतु समर्पित अंतराळ दुर्बिणींच्या कमतरतेमुळे एनयूव्ही बँडमधील डेटाची नोंद झाली नाही. एसयूआयटी उपकरण आता सूर्याच्या पृष्ठभागावरील घडामोडींबद्दल आपली समज वाढविणारी अशा प्रकारची पहिली निरीक्षणे देऊन ही मोठी पोकळी भरून काढत आहे.

एसयूटीच्या निरीक्षणांमधून झालेला मोठा खुलासा म्हणजे, सूर्याच्या पृष्ठभागावरील एकाच भागातील स्फोट.  सूर्याच्या प्रभावळीतील  प्लाझ्माच्या तापमान वाढीशी त्याचा थेट संबंध आहे. हे निष्कर्ष फ्लेअर एनर्जी डिपॉझिशन आणि हीटिंग मधील थेट दुवा सांगतात, जे सौर भौतिक शास्त्रीय संशोधनाचे नवे मार्ग खुले करतात आणि दीर्घ काळापासून केल्या जाणाऱ्या सैद्धांतिक भाकितांची पडताळणी करतात.

आयुकाचे  संचालक प्रा. श्रीआनंद, यांनी एसयूटीच्या योगदानाची ‘अभूतपूर्व’ अशा शब्दांत प्रशंसा केली असून, आदित्य-एल 1 च्या महत्वाच्या निष्कर्षांची ही सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एसयूआयटी आणि इतर उपकरणे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे, आदित्य-एल 1 सौर संशोधनात क्रांती घडवून आणेल, तसेच जागतिक अंतराळ विज्ञानात भारताला अव्वल स्थान मिळवून देईल.

पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील प्रा. दुर्गेश त्रिपाठी आणि प्रा. ए.एन.रामप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.ची विद्यार्थिनी सौम्या रॉय यांनी हे संशोधन केले असून, भारत आणि जर्मनीतील अग्रगण्य संस्थांचे यामध्ये योगदान आहे. हे निष्कर्ष द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स (डीओआय: 10.3847/2041-8213/एडीबी0बीई) मध्ये प्रकाशित झाले आहेत. हे यश प्रगत सौर निरीक्षणाच्या परिवर्तनशील क्षमतेवर प्रकाश टाकते, असे सौम्या रॉय म्हणाल्या. ही निरीक्षणे सूर्याची स्फोटक शक्ती बारीक तपशिलांसह उघड करतात, असे प्रा. दुर्गेश त्रिपाठी म्हणाले. हे प्रारंभिक निकाल नवीन उपकरणांची अफाट क्षमता दर्शवितात, जी यापुढेही असे अनेक शोध लावतील, असे प्रा. ए. एन. रामप्रकाश यांनी नमूद केले.

‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए सचिन मिणियार यांची निवड

  • उपाध्यक्षपदी सीए प्रणव आपटे, सचिवपदी सीए निलेश येवलेकर, खजिनदारपदी सीए नेहा फडके, विकासा-अध्यक्षपदी सीए प्रज्ञा बंब

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए सचिन मिणियार यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीए प्रणव आपटे, सचिवपदी सीए निलेश येवलेकर, खजिनदारपदी सीए नेहा फडके यांची, तर ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रज्ञा बंब यांची निवड झाली आहे. २०२५-२०२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी मावळत्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीए हृषीकेश बडवे, सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम काम पाहतील.

यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए रेखा धामणकर व सीए अभिषक धामणे, माजी अध्यक्ष सीए काशिनाथ पाठारे, सीए मोशमी शहा, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते. आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. विभागीय स्तरावर आयसीएआय पुणे शाखेला प्रथम, तर ‘विकासा’ विद्यार्थी शाखेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्व सहकारी व कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सीए सचिन मिणियार म्हणाले, “मला अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व सीए सदस्यांचे आभार मानतो. तंत्रज्ञान प्रशिक्षण, शाश्वत व पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर आणि पायाभूत सुविधांचा विस्तार या तीन गोष्टी प्रामुख्याने केंद्रस्थानी ठेवून पुढील वर्षभर काम करणार आहे. सीए सदस्य व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे उपक्रम वर्षभर राबवणार आहे. आज पुणे शाखेचे ११,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २५००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बूलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरीकांना त्रास देणा-या शायनर्स दुचाकीस्वारांच्यावर कोंढवा पोलीसांची धडाकेबाज कारवाई.

पुणे-मोटारसायकल ला सायलेन्सर फटका लाऊन मोठ्या आवाजाने बुलेट किंवा अन्य मोटार सायकली पळविणाऱ्या चमकू शायनर्स न पकडून त्यांच्यावर कारवाईची धडाका कोंढवा पोलिसांनी सुरु केला आहे.

दि.०१/०३/२०२५ रोजी पासून सुरू होणा-या रमजान महिन्याच्या अनुषंगाने कोढवा पोलीसां कडून कोढवा परिसरात दि.२८/०२/२०२५ रोजी बुलेट दुचाकी गाडीचा सायलेन्सर मॉडीफाईड करून फटाका वाजवून आजुबाजुच्या परिसरात राहणा-या जेष्ठ नागरीकांना, आजारी नागरीकांना तसेच १० वी १२ वी च्या विद्यार्थाना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. सदर मोहिमेदरम्यान कोंढवा पोलीसांनी अशा प्रकारच्या एकुण २० बुलेट दुचाकी गाड्यांवर कारवाई करून सदर गाड्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढून ते पुणे मनपाच्या रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहेत.
सदरची विशेष मोहिम हि पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे धन्यकुमार गोडसे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राऊफ शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली कोढवा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी

पुणे-
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हे आदेश दिले
.

स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. गेल्या चार दिवसांपासून आरोपी गाडे याचा पोलीस शोध घेत होते. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून त्याला आज (दि. 28 ) त्याला न्यायालयात हजर केले असता न्यालयाने आरोपी दत्ता गाडेने याला 12 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने यांनी पोलिस कोठडीत टाहो फोडला आहे. माझे चुकले, मी पापी आहे, असे म्हणत तो रडत असल्याचे पुढे आले आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही. असा दावाही आरोपीने यावेळी केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

महेश मोतेवारबाबत गोपनीयता कशासाठी तर पैसा, मालमत्ता वापरण्यासाठी?

देशभरातील २२ राज्यांमध्ये मोतेवारच्या विरोधात २८ गुन्हे नोंद अन पुण्यात मुक्त वावर

पुणे- सुमारे ५ हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेल्या आणि देशभरातील अनेक कारागृहात रवानगी झालेल्या महेश मोतेवारच्या पोलीस केसेसच्या तपासाप्रकरणी आणि न्यायालयीन कामकाजा संदर्भात, जप्तीच्या आणि वसुली व शिक्षेच्या संदर्भात शासकीय स्तरावरून प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत असून ओडीशा राज्यातील कटक कारागृहात आठ वर्षांपासून मोतेवार शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती काही माध्यमांनी दिलीय. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा घोटाळेबाज ‘समृद्ध जीवन’च्या महेश मोतेवारशी कनेक्शन असल्याचं उघड झाल्याने महेश मोतेवार पुन्हा चर्चेत आला असून आहे.विशेष म्हणजे एका रोल्स रॉयस कारमुळं हा प्रकार समोर आला आहे.

प्रशांत कोरटकर याच्याकडं आलिशान रोल्स रॉईस कार आहे. या कारमध्ये फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ त्यानं स्वतः सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. पण आश्चर्य म्हणजे ही रोल्स रॉईस कार चीट फंड घोटाळ्यात हजारो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारच्या मालकीची आहे. महेश मोतेवारच्या ‘समृद्ध जीवन फूडस इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या नावावर आरटीओमध्ये या रोल्सरॉईसची नोंद आहे.प्रशांत कोरटकर याच्याकडं आलिशान रोल्स रॉईस कार आहे. या कारमध्ये फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ त्यानं स्वतः सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. पण आश्चर्य म्हणजे ही रोल्स रॉईस कार चीट फंड घोटाळ्यात हजारो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारच्या मालकीची आहे. महेश मोतेवारच्या ‘समृद्ध जीवन फूडस इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या नावावर आरटीओमध्ये या रोल्सरॉईसची नोंद आहे.दरम्यान, देशभरातील साडेचार लाख गुंतवणूकदारांना ज्यादा परताव्याचं अमिष दाखवून तब्बल ४,७०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मोतेवारवर आरोप आहे. डिसेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी मोतेवारला अटक केली होती. त्यानंतर देशभरातील २२ वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोतेवारच्या विरोधात २८ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यानंतर मोतेवारच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि त्यांचे लिलाव करण्यात आले. मोतेवारच्या जमिनी आणि वाहनांचा देखील लिलाव करण्यात आला. मात्र, मोतेवारकडे असलेली रोल्स रॉईस कार प्रशांत कोरटकर चालवत असल्याचं दिसून आलं आहे. ही रोल्स रॉईस मोतेवारच्या ‘समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावे आहे.
‘WB 02 AB 0123’ असा या गाडीचा नंबर आहे. रोल्स रॉइसच्या या घोस्ट मॉडेलची किंमत ७ ते ८ कोटी आहे. महेश मोतेवारवर नंतर ‘सीबीआय’नं देखील कारवाई केली. असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

मतदान चोरी करून आलेले युतीचे फिक्सिंग सरकार; मतदारयाद्या घोटाळ्यावर काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान: हर्षवर्धन सपकाळ

मतदारयाद्या देण्यास निवडणूक आयोगाला सहा महिने का लागतात? केवळ कॉपी पेस्ट करण्याची गरज: गुरदिपसिंग सप्पल

लोकसभा निवडणुकीनंतर ४० लाख मतदार कसे वाढले: प्रविण चक्रवर्ती

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य गुरदीप सप्पल, डेटा अनालिटिक्स विभाग व प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सह प्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ व वाढवलेले मतदार यासंदर्भात राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधींची बैठक टिळक भवन येथे पार पडली.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदार याद्यातील घोटाळ्याची माहिती काँग्रेस शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला मागितली तरी ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली पण चोराच्या मनात चांदणे याप्रमाणे सरकार चौकशीपासून पळ काढत आहे. म्हणून हा मुद्दा आता जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे असे सपकाळ म्हणाले.
यावेळी बोलताना गुरुदीप सप्पल म्हणाले की, मतदार संख्या वाढीसंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी तीन महिन्यांची वेळ मागितली होती आणि आता पुन्हा तीन महिन्यांची वेळ न्यायालयाकडे मागितली आहे. सिस्टिम फुलप्रुफ आहे एवढेच निवडणूक आयोग सांगते पण माहिती मात्र देत नाही. निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती आहे, केवळ कॉपी पेस्ट करून ती द्यायची आहे, त्यासाठी सहा महिन्यांचा वेळ का लागतो? असा सवाल सप्पल यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी प्रविण चक्रवर्ती म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पाच महिन्याच्या काळात ४० लाख मतदार वाढले, ही संख्या मागील पाच वर्षांतील मतदारवाढीपेक्षा जास्त आहे. अनेक मतदारसंघात बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. विधानसभेला भाजपा युतीला लोकसभेपेक्षा ७० लाख मतदान जास्त झाले आणि तेवढेच मतदान भाजपा युतीला मविआपेक्षा जास्त झाले. मविआची लोकसभा व विधानसभेतील मते मात्र सारखीच आहेत. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असे चक्रवर्ती म्हणाले.

कुंभमेळ्यात राहुल गांधी गेले नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते त्यावर बोलताना सप्पल म्हणाले की, नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधान आहेत, त्याआधी १२ वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. या काळात झालेल्या कोणत्या कुंभमेळ्यात मोदी व शाह गेले होते, आणि सरसंघचालक मोहन भागवत प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात का गेले नाहीत. कुंभमेळ्यात गेले नाहीत तर मग त्यांच्या हिंदु असण्यावर प्रश्न का विचारला जात नाही, असा प्रतिप्रश्नही सप्पल यांनी केला.

एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर केलेले वक्तव्य अत्यंत बेताल, असंस्कृत व विकृत आहे. महिलेने प्रतिकार केला नाही असे विधान करून मंत्री गुन्हेगाराचे समर्थन करत आहेत का? असा संतप्त सवाल करून अशा मंत्र्यांचा राजीनामा घेण्यापेक्षा त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केले पहिजे, पण सरकारमध्ये नैतिकताच राहिलेली नाही असेही सपकाळ म्हणाले.

“वृक्ष लागवड आणि रक्तदान वाचवी मनुष्य जातीचे प्राण”. शोभाताई आर धारिवाल

पुणे-दरवर्षी 1 मार्च रोजी श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त “रक्तदान सोहळा” आयोजित केला जातो या आधीही त्यांच्या जन्मदिनानिमित्त पुण्यामध्ये विविध रक्तदान केंद्रांवर एकाच दिवशी २४,000 ब्लड बॅग्स संकलन करण्याचा विक्रम आर एम डी फाउंडेशनने केलेला आहे, हि परंपरा आजही नियमितपणे पाळल्या जाते.

तसेच आर एम डी फाउंडेशन द्वारा मागील 30 वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन कार्यक्रम निरंतर चालू आहे श्री रसिकलाल धारीवाल साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “एक लाख झाडं लावण्याची योजना” असेल किंवा “पुलकछाया योजने” अंतर्गत भारतभर वृक्ष लागवड असेल किंवा “एक झाड आईच्या नावाने” योजना असेल तेव्हा आर एम डी फाउंडेशन द्वारा शेकडो वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे आज काळाच्या बदलत्या गरजेनुसार फाउंडेशनने “ट्री ट्रान्सप्लांटेशन योजना” राबविण्यात सुरुवात केलेली असून पुणे रिंग रोड प्रकल्पात शेकडो वृक्षांना कापण्यापासून वाचवून उपलब्ध जागेत स्थानांतर करून अनेक वृक्षांचे प्राण वाचविण्याचे काम सुरु झालेले आहे.

आजच्या प्रसंगी ” वृक्ष लागवड आणि रक्तदान वाचवी मानवाचे प्राण” अशी भावना शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी व्यक्त केली.

दिनांक १ मार्च २०२५ शनिवार रोजी श्री रसिकलाल साहेबांच्या जन्मदिनानिमित्त जास्तीत जास्त पुणेकरांनी आर एम डी बंगला नंबर ६४, लेन नंबर ३ कोरेगाव पार्क-पुणे येथे उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी ७३५३३५४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हडपसर कोंढवा, मुंढवा,बिबवेवाडीतील एकूण ५ गुंडांना केले तडीपार

पुणे-परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे (DCP Dr Rajkumar Shinde) यांनी एकाच दिवशी ५ सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. आणखी १०० हून अधिक गुंड रडारवर असल्याचे सांगण्यात आले.किशोर अमर सोळंकी Kishore Amar Solanki (वय २१, रा. बिराजदारनगर, वैदुवाडी, हडपसर) याच्यावर जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकादेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अक्षय अनिल पवार Akshay Anil Pawar (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) याच्यावर दुखापत, जबरी चोरी यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत.कादीर ऊर्फ काजु आरीफ अन्सारी Qadeer alias Kaju Arif Ansari (वय २१, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकादेशीर शस्त्र बाळगणे यासारखे ७ गुन्हे दाखल आहेत.साहील रफीक कलादगी Sahil Rafiq Kaladgi (वय २१, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) याच्या विरुद्ध खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, मारहाण, धमकावणे, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत.करण हरीदास जाधव Karan Haridas Jadhav (वय २४, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा तयारी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.हे पाचही तडीपार गुंड हे २१ ते २५ वयोगटातील सराईत गुन्हेगार आहेत. २०२५ मध्ये यापूर्वी ६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिमंडळ ५ मधील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आमचे रडारवरील आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडीपारीची कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.हे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार पुढील २ वर्षांच्या काळात पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पत्र सृष्टीचे ईश्वर……श्री गुरुजीअभिवाचन कार्यक्रम संपन्न

पुणे
केशव माधव न्यास व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सह्याद्री प्रभात शाखा कर्वेनगर आयोजित “पत्र सृष्टीचे ईश्वर श्री गुरुजी “हा अभिवाचन कार्यक्रम नुकताच कर्वेनगर येथील कांचन दाते यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त संपूर्ण देशभर त्यांच्या पत्र रुपी आठवणी व कार्याची माहिती व्हावी यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.श्रीगुरुजी यांनी हजारो पत्र लिहून अनेक कार्यकर्ते जोडले.समाजाला दिशा दिली.संपूर्ण भारतभर प्रवास केला व संघ कार्य अफाट वाढवले ह्याचे सादरीकरण अभिवाचन द्वारे करण्यात आले.प्रसिद्ध नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे,डॉ ओंकार धुमाळे व सेवा आरोग्य फाऊंडेशन चे संचालक डॉ सतीश जोशी यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये श्री गुरुजी यांच्या पत्रलेखन कार्य सादर केले.डॉ.ओंकार धुमाळे ह्यांनी “चाहिए आशिष माधव,नम्र गुरुवर्य प्रार्थना” हे गीत सादर केले.ह्या नाट्य संहितेचे लेखक,दिग्दर्शन कुलदीप धुमाळे हे आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समितीचे विनायक डंबीर यांनी श्री गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन केले.उद्घाटनपर भाषणात विनायक डंबीर म्हणाले” श्री गुरुजींनी पंतप्रधानापासून ते स्वयंसेवकांपर्यंत आपल्या अनेक पत्रलेखन द्वारे माणूस जोडण्याचे व समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.श्रीगुरुजी हे ज्ञानी होते पण त्याचा अहंकार कधी केला नाही.ते साधक होते पण कसलेही कर्मकांड त्यांनी केले नाही.ते अफाट बुद्धिवैभवाचे धनी होते पण त्याचे प्रदर्शन त्यांनी केले नाही.”असेही डंबीर यांनी प्रतिपादन केले.केशव माधव न्यासचे सचिव अरविंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले व उपस्थितांचे स्वागत केले.विश्वस्त प्रकाश देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.
कार्यक्रमास केशव माधव न्यास चे पदाधिकारी,संघ स्वयंसेवक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सेवा आरोग्य फाऊंडेशनतर्फे विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन

0

पुणे, २८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या समृद्धी वर्ग प्रकल्पाने विज्ञान प्रयोगांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दलची गोडी लागावी आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढावी,हा या विज्ञान प्रयोगांचा प्रदर्शन आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या १४ विद्यार्थ्यांच्या चमूने,सानिका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली, सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या समृद्धी वर्गातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून विविध प्रयोग तयार करण्यात मदत केली.
प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक विवेक मांडके उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे कौतुक केले तसेच सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.
मुलांना मार्गदर्शन करताना प्रा. विवेक मांडके म्हणाले, “भौतिकशास्त्राविषयी भीती बाळगण्याची गरज नाही.ज्यांना या विषयात आवड आहे त्यांनी आत्मविश्वासाने त्याचा अभ्यास करून संशोधनाच्या दिशेने वाटचाल करावी.विज्ञान क्षेत्रात योगदान देऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावावा.”
कर्वेनगर येथील सरस्वती शिशु विद्यामंदिर येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये समृद्धी वर्गातील १४ वस्त्यांमधील १०० विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी भाग घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समृद्धी वर्ग प्रकल्प समन्वयक निरंजनी शिरसट आणि प्रकल्पातील शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या संचालक डॉ. हर्षदा पाध्ये आणि डॉ सतीश जोशी उपस्थित होते.तसेच, कर्वेनगर परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या मुलांसह या प्रदर्शनाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रयोगांचे कौतुक केले.
विज्ञानाच्या प्रोत्साहनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल
सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे विज्ञानाच्या गोडीचा प्रसार होत असून,पुढील वर्षीही अधिक मोठ्या प्रमाणावर हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे.वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देणाऱ्या सेवा आरोग्य फाऊंडेशनचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मैत्रीचं रंगतदार सेलिब्रेशन ‘चिकी चिकी बुबूम बुम’

आपल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक दिवस खरंच कमालीचे असतात. तेव्हाचे क्षण, केलेली गंमत, मित्र-मैत्रिणींसोबत केलेली भांडणं या गोष्टी राहून राहून आठवतात. विचार करा बऱ्याच वर्षानंतर शाळेतल्या त्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत तुम्हाला धम्माल, मज्जा, मस्ती करण्याची संधी मिळाली तर? रियुनियन ची अशीच संधी साधत सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांची गोष्ट सांगणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल चित्रपट २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

पार्टीतली गंमत आणि धमाल हे सगळं अनुभवताना येणार काही गोष्टींचं वळण या रियुनियनच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झालेल्या मित्रांच्या आनंदाची रंगत वाढवणार की त्यांची पळता भुई थोडी होणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत.

‘इकडे आड तिकडे विहीर’ ‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून या बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख टीझर मधून करून देण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ‘बुम बुम बुम’ टायटल सॉंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यासोबत ‘मित्रा’ आणि ‘कारभारी’ या दोन्ही गाण्यांची मजा रसिकांना घेता येणार आहे.

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे.
चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे.प्रशांत मडपुवार, मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना रोहन प्रधान, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, कविता राम यांचा स्वरसाज आहे. रोहन-रोहन जोडीचे जबरदस्त संगीत चित्रपटाला लाभले आहे. राहुल ठोंबरे, सुजित कुमार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन गणेश उतेकर तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.