Home Blog Page 435

रसिकलाल एम धारिवाल यांचा जन्मदिन रक्तदान शिबिराने साजरा

पुणे-आर एम डी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा रसिकलाल एम धारीवाल यांचा जन्मदिन सलग ८ वर्षांपासून रक्तदान शिबिराने साजरा करण्यात येतो . या वर्षी त्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले . या कार्यक्रमासाठी श्री हरिहरन सुब्रमणी प्रसिद्ध गायक यांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली व शुभेच्छा दिल्या. श्री रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने फाउंडेशनच्या माध्यमातून “ १०० मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया” एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे पार पडली. यापुढे प्रत्येक महिन्यात १०० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आर एम डी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल अशी माहिती शोभाताई यांनी दिली.
माढा वेल्फेअर फाउंडेशन निमगाव सोलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या “सौ शोभाताई धारीवाल मुक्तांगण शेतकरी प्रशिक्षण केंद्राद्वारे” शेतीवर व बिगर शेतीवर आधारित वर्षभर विविध प्रशिक्षण आयोजित केल्या जाणार आहे अशी माहिती संस्थेचे उपस्थित पदाधिकारी यांनी दिली . यावेळी त्यांच्यासह आलेल्या २५ सदस्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी कुडची बेळगांव कर्नाटक येथे आर एम डी फाउंडेशन च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या “सौ शोभाताई इंग्रजी माध्यमिक शाळेच्या” पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी शोभाताईंचे आभार मानले व त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या २० कर्मचाऱ्यांनी यावेळी रक्तदान केले
पुणे रिंग रोड प्रकल्पातील कापल्या जाणाऱ्या शेकडो वृक्षांना “ट्री ट्रान्सप्लान्टेशन ” च्या माध्यमातून वाचविण्याचे कार्य फाऊंडेशन द्वारा सुरु केलेले आहे अशी माहिती जान्हवी धारीवाल बालन यांनी दिली व या उपक्रमासाठी समाजातील प्रत्येकाने यथायोग्य सहकार्य करून वृक्षवाचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी केले.
त्याच प्रमाणे वृद्धेश्वर सिद्धेश्वर या प्राचीन मंदिराचे जीर्णोध्दार केल्या बद्दल मंदिराच्या वतीने शोभाताईंचे आभार मानण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळी आठ वाजता सुरू झालेले रक्तदान शिबिर सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू होते.

पुणे शहर भाजपची पाच लाख सदस्यांची नोंदणी

शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

पुणे शहर भाजपने पाच लाख प्राथमिक सदस्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.घाटे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी या कामांना पसंती देऊन शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केले. त्याचेच प्रत्यंतर सभासद नोंदणीत येत आहे.”घाटे म्हणाले, “समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा सदस्यता नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काही दिवसात सहा लाख प्राथमिक सदस्य आणि दहा हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”घाटे पुढे म्हणाले, “पक्षाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती पासून (25 सप्टेंबर) सदस्यता नोंदणीचे अभियान सुरू केले. मिस्ड कॉल, नमो ॲप, वेबसाईट, क्यूआर कोड या माध्यमांतून सदस्य होता येते. दर पाच वर्षांनी ही प्रक्रिया केली जाते. प्राथमिक सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे इतकी असते.”

विधानसभा मतदारसंघनिहाय सदस्यता संख्या

वडगाव शेरी : 53,599
शिवाजीनगर : 49,725
कोथरूड : 1,16,004
खडकवासला : 72,754
पर्वती : 54,610
हडपसर : 39,828
पुणे छावणी : 64,469
कसबा : 54,018

एकूण : 5,04997

कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा केव्हा घेणार?:अंबादास दानवे यांनी सभागृहात मागितला खुलासा; कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर निर्णय -CM

मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री कोट्यातील घर लाटल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा झालेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा केव्हा घेणार? असा सरकारला प्रश्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाचा आदेश आल्यानंतर या प्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याचे स्पष्टीकरण दिले. पण या प्रकरणी दिरंगाई होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोठा घणाघात केला.

नाशिक कोर्टाने गत 20 फेब्रुवारी रोजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका खोटी माहिती देऊन लाटल्याप्रकरणी 2 वर्षांची कैद व 50 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेमुळे त्यांच्या आमदारकीवर तथा पर्यायाने मंत्रिपदावर गडांतर येणार आहे. पण निकाल येऊन 11 दिवस लोटले तरी अद्याप त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली नाही. यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.

आज अधिवेशनाला सुरुवात होताच शोकप्रस्तावापूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. राज्याच्या कृषिमंत्र्यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला अद्याप कोणतीही स्थगिती मिळाली नाही. नियमाप्रमाणे सदर मंत्र्यावर अपात्रततेची कारवाई झाली पाहिजे. पण या प्रकरणी अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. सरकारची या प्रकरणी आपली काय भूमिका आहे हे सांगावे, असे ते म्हणाले. यावेळी सभापती राम शिंदे यांनी शोकप्रस्तावाच्यवेळी अशी मागणी करता येत नसल्याचे सांगितले.

त्यावर अंबादास दानवे यांनी शोकप्रस्तावानंतर असे करता येत नसल्यामुळे मी हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच तशी विनंती केल्याची बाब सभापतींच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच गरमागरमी झाली. त्यानंतर सभापतींनी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा खालच्या सभागृहाचा (विधानसभा) असल्याचे नमूद करत हे प्रकरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी मंत्री कोणत्याही एका नव्हे तर दोन्ही सभागृहांचे असतात असे अधोरेखित करत त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप करत कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ नेते, ज्यांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोकप्रस्तावावेळी असा गोंधळ होईल असे वाटले नव्हते. तथापि माननीय विरोधी पक्षनेत्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण मंत्रिमहोदयांविषयी जे काही मांडले आहे, त्यावर कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवली आहे. कोर्टाची ही ऑर्डर आल्यानंतर सभागृह किंवा राज्यपाल या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

वीज होणार स्वस्त..पण महावितरणचा आर्थिक डोलारा वीजग्राहकांवरच अवलंबून!

वीज दिवसेंदिवस महाग होत जाणार या समजाला विराम देत यंदा प्रथमच महावितरणकडून येत्या पाच वर्षांसाठी वीजदर वाढीचा नव्हे, तर दर कमी करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. वीजग्राहकांना आर्थिक दिलासा देणाऱ्या अनेक वैशिष्ट्यांचा हा प्रस्ताव आहे. यात दरमहा १०० युनिट वीजवापर करणाऱ्या राज्यातील ७५ टक्के घरगुती वीजग्राहकांसाठी येत्या पाच वर्षांत २३ टक्के वीजदर कमी करण्यात येणार आहे. तर १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी पुढील वर्षाचा अपवाद वगळता त्यापुढे सलग चार वर्ष वीज दर १२ टक्क्यांनी कमी होणार आहे. सोबतच घरगुती ग्राहकांना ‘टीओडी’ मीटरच्या माध्यमातून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वीजवापरात प्रतियुनिट ८० ते १ रुपयांपर्यंत सवलत प्रस्तावित केली आहे. यासह उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा हटविण्यात येणार असल्याने वीजदर स्वस्त होत जाणार आहेत.

सन २०२५-२६ ते सन २०२९-३० पर्यंत बहुवार्षिक वीजदर निश्चितीकरणाच्या प्रस्तावातून वीजग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे सरकारच्या मालकीची कंपनी असलेल्या महावितरणला देखील वीजग्राहकांनी आर्थिक दिलासा देणे आवश्यक आहे. त्यासाठी वीजग्राहकांचे एकच आद्यकर्तव्य म्हणजे दरमहा नियमितपणे वीजबिलांचा भरणा करणे. महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा हा वीजबिलांच्या वसूलीवरच अवलंबून आहे. विजेशिवाय जगणे हा विचारच आजमितीस कोणी करु शकत नाही. २४ तास विजेची गरज आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यास देखील अधिक प्राधान्य देणे अपेक्षित आहे.

ग्राहकांनी दरमहा वीजबिलांचा नियमित भरणा करणे का आवश्यक आहे तर मुख्य म्हणजे महावितरण स्वतः वीजनिर्मिती करीत नाही. विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ती मागणीनुसार सर्व वर्गवारीतील ग्राहकांना पुरवठा करते. वीजपुरवठा व ग्राहकसेवा देणारी महावितरण कंपनी ही स्वतःच एक ग्राहक आहे. महावितरणतर्फे महानिर्मिती तसेच इतर खासगी वीजकंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. ही वीज उपकेंद्रांपर्यंत आणण्यासाठी महापारेषणला वहन आकार द्यावा लागतो. वीजबिलांमधील सुमारे ८० ते ८५ टक्के रक्कम ही वीजखरेदी, पारेषण खर्च आदींवर खर्च होते. त्यानंतर कंत्राटदारांची देणी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, विविध कर, दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचे कामे आणि व्याजासह कर्जांचे हप्ते अशा दरमहा देणी द्यावी लागतात. या सर्वांचे पैसे वीजग्राहकांनी भरलेल्या वीजबिलांच्या रकमेतून दिले जातात.

महावितरण ही जनतेच्या मालकीची कंपनी आहे. त्यामुळे ‘ना नफा, ना तोटा’ (रेव्हेन्यू न्यूट्रल) तत्त्वाने वीजपुरवठा व ग्राहकसेवा देण्यात येते. परंतु एक ग्राहक म्हणून महावितरणवर वीजखरेदीचा, पारेषणचा खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे कोट्यवधी रूपयांचे दायित्व आहे. मात्र वीजबिलांची थकबाकी वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. महत्वाचे म्हणजे विजेचे दर निश्चित करण्याचा महावितरण किंवा अन्य कोणत्याही वीज कंपनीला अधिकार नाही. तर दाखल केलेल्या प्रस्तावांवर जनसुनावणी घेऊन मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून वीजदर निश्चित केले जातात. सर्व घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांनी वापरलेल्या विजेसाठी मा. आयोगाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे महावितरणकडून बिलांची आकारणी केली जाते. मात्र वीजबिलांची थकबाकी वाढल्यास महावितरणला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. एक समजून घेतले पाहिजे की, वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीज बिल म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्कच आहे. वीजजोडणी घेतलीच नाही तर वीजबिल किंवा विजेचे शुल्क भरण्याचा प्रश्नच नाही. तसेच वीजजोडणी घेतल्यानंतरही विजेचा वापर केला नाही तर केवळ स्थिर आकारच भरावा लागतो. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या विजेचा वापर ग्राहकांकडून झाल्यावरच त्यापोटी आलेले विजेचे शुल्क म्हणजेच वीजबिल आहे.  

वीज आता एक मूलभूत गरज झालेली आहे. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देखील वीज महत्वाची आहे. घरातील टीव्ही, फ्रिज, मोबाईल, मुलांचे शिक्षण, नोकरदारांचे ऑनलाईन काम, घरातील उपकरणे इत्यादी सर्व विजेवरच अवलंबून आहेत. महिनाभर वीज वापरल्यानंतर बिलाचा दरमहा भरणा करणे अपेक्षीत आहे व आवश्यकही आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे अतिशय मूलभूत गरज बनलेल्या विजेचे बील भरण्यास इतर खर्चाच्या तुलनेत फारसे प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे वीजबिलांची थकबाकी कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

अनेक ग्राहकांना असेही वाटत असेल की, या महिन्याचे केवळ चारशे-पाचशे रुपयांचे वीजबिल आहे. पुढील महिन्यात भरू. पण चारशे-पाचशे रुपयांचे वीजबिल असलेले ग्राहक हजारोंच्या संख्येत असतात. त्यांनी बिल भरले नाहीतर थकबाकी कोट्यवधींच्या घरात जाते. पुणे परिमंडलात तब्बल ३८ लाख २५ हजार वीजग्राहक आहेत. मात्र महिन्याअखेर सरासरी ७ लाख १५ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्गिक ग्राहकांकडे २०५ ते २१० कोटी रुपयांची सरासरी थकबाकी दिसून येते. यात घरगुती थकबाकीदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे ६ लाखांवर आणि थकबाकी सुमारे १३५ कोटींवर असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रामुख्याने घरगुतीसह इतर वीजग्राहकांनी वीज बिलांचा नियमित भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याची खरी गरज आहे.

–    निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे

पोलिस उपायुक्तांसह एपीआयवर कोयत्याने हल्ला; आरोपी गोळी लागून जखमी

उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जऱ्हाड जखमी

पुणे-दरोडेखोरांना जरेबंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेतपोलिस उपायुक्त यांच्यासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.दरम्यान आपल्या बचावासाठी पोलिस उपायुक्तांनी गोळीबार केला असून त्यात एक आरोपी जखमी झाला आहे. दरोडेखोरांच्या हल्यात उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड हे जखमी झाले आहेत.जवळपास वीस मिनिटे पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. उपायुक्तांच्या छातीवर पाच टाके पडलेत. ते थोडक्यात बचवल्याचं डॉक्टरांनी सांगितले. जराड यांना ही मोठा इजा झालेली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.दरम्यान, स्व संरक्षणार्थ उपायुक्त पवार यांनी प्रत्युत्तरादाखल एक गोळी झाडली. यामध्ये एका आरोपीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला घटनास्थळीच अटक करण्यात आले आहे. इतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आले.

बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत काल रात्री 12 . 15 च्या सुमारास बहुळ गावच्या दरोडा प्रकरणातील आरोपी सचिन चंदर भोसले याला सापळा लावून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने जीवघेणा हल्ला केला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यात उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले आहेत.बहुळ येथील दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले हे पोलिसांच्या रडारवर होते. सचिन भोसले हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत

सचिन भाेसले याने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पोलिसांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले व त्यला अटक करण्याचे पोलिसांचा शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस वाघ करत आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे चौथे पर्व ४ मार्चपासून !

पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या २४ संघांचा समावेश !

पुणे, 3 मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथे पर्व ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ४ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होणार असून स्पर्धेत विविध मंडळांचे २४ संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, सार्वजनिक गणपती, नवरात्र मंडळे तसेच ढोल-ताशा पथकांचा समावेश असलेली ही नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेचे हे सलग चौथे पर्व आहे. गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांचे २४ निमंत्रित संघ एकत्रितपणे या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतात आणि हेच या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या वर्षी स्पर्धेमध्ये आठ नवीन संघांना खेळण्याची संधी देण्यात आली असून स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी अधिक चुरस दिसणार आहे.

पुण्यातील गणपती मंडळातील कसबा गणपती मडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरूजी तालिम मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, गरूड गणपती मंडळ या मानाच्या गणपती मंडळांसह श्री साई मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदिर, युवा वाद्य पथक, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक या नवरात्री आणि वादक पथकांच्या क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे.

या स्पर्धेचे सामने सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर होणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या स्पर्धेत २४ संघांपैकी अव्वल ८ संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत.

रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, मंडई मास्टर्स, साई पॉवर हिटर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, कसबा सुपरकिंग्ज्, गरूड स्ट्रायकर्स, तुळशीबाग टस्कर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, शिवमुद्रा ब्लास्टर्स, नादब्रम्ह ड्रमर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, युवा योद्धाज्, सुर्योदय राईझर्स, जनादर्न जायंट्स, नुमवी स्टॅलियन्स्, भगतसिंग लिजंड्स, विश्रामबाग नाईट्स, समर्थ चॅलेंजर्स, एच.टी.एम. टायगर्स, गजर सुपरनोव्हाज्, रमणबाग फायटर्स असे २४ निमंत्रित संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

विजेत्या संघाला २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला ५१ हजार रूपये आणि इलेक्ट्रिक बाईक देण्यात येणार आहे. ‘फेअर प्ले’ पुरस्कार जिंकणार्‍या संघाला २५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार्‍या खेळाडूला रोख पाच हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

गतवर्षी (२०२४) साई पॉवर हिटर्स संघाने विजेतेपद तर, शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाने उपविजेतेपद पटकावले होते.

लोहगाव टँकरमुक्त करण्याच्या वचनपूर्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; आमदार पठारे यांचे मोठे योगदान

लोहगाव, पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या वचनाला अनुसरून, लोहगावमधील पाणीपुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वचनपूर्ती बैठक रविवारी (ता. ३) प्राईड एशियाना सोसायटी येथे पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरिक, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते

गेली अनेक वर्षे लोहगाव भागात पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न नागरिकांची डोकेदुखी ठरला आहे. महानगरपालिकेत समावेश होऊनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यावर आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सातत्याने या भागाची पाहणी व पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

या वचनपूर्ती बैठकीत नागरिकांनी रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, कर संकलन, पोलीस सुरक्षा, अवैध व्यवसाय आदी समस्याही पठारे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर तात्काळ कार्यवाही करत आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच, लोहगावमध्ये सहा ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राजेंद्र खांदवे म्हणाले, “लोहगावचा सात वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश झाला, मात्र अजूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. नागरिकांना पाण्यासाठी व इतर मूलभूत सुविधांसाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आजपर्यंत नागरिकांनी पाण्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत हे मोठे दुर्दैव आहे. परंतु बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्यामुळे एक एक करून विविध समस्या मार्गी लागत आहेत.”

लोहगावातील पाणीपुरवठा समस्येवर बोलताना कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी “न्याती, उत्तरेश्वर-निंबाळकर रस्ता, बी यु भंडारी टाकी ते प्राईड एशियाना आणि प्राईड एशियाना ते स्पार्क स्प्रिंग या चार झोनमध्ये रोज पाणीपुरवठा करू”, असे सांगितले. यावर पठारे यांनी ज्या सोसायटींना पाण्यासाठी महापालिकडे अर्ज करा, जेणेकरून लवकरात लवकर पाण्याच्या लाईन जोडून देता येतील, असे सुचवले.

तसेच, खराडी बायपास श्री पार्क पासून ते महालक्ष्मी लॉन्स दरम्यान २५० व्यासाची व ११०० मीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच, ५००० लीटर प्राथमिक पाण्याच्या टाकीचे उद्घाटन व लोहगाव-संतनगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारील रस्ता तसेच प्राईड एशियाना सोसायटी जवळील रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी प्राईड एशियाना सोसायटीचे चेअरमन गिरीश जयवाल यांच्या हस्ते आमदार पठारे यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी आमदारांच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करत लोहगावच्या विकासासाठी अशाच सातत्यपूर्ण कार्याची अपेक्षा व्यक्त केली.

वचनपूर्ती बैठक व इतर प्रसंगी कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, शाखा अभियंता सुधीर आलोरकर, राजेंद्र खांदवे, सुनील खांदवे, प्रीतम खांदवे, अन्वर मुल्ला, नितीन जाधव, शिंदे, तसेच सोसायटी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
प्रचारादरम्यान लोहगावकरांना दिलेल्या प्रत्येक वचनांची पूर्ती करण्यासाठी मी विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे, यात नागरिकांसोबत अधिकारी वर्गाचेही चांगले सहकार्य लाभत आहे. लोहगाव भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्नाला प्राधान्य देऊन टॅंकमुक्त लोहगाव हे उदिष्ट साध्य होताना दिसेलच सोबत इतरही प्रश्न मार्गी लावून लोहगावचा सर्वांगीण विकास साकार करण्याचा संकल्प पूर्ण करणार आहे.

  • बापूसाहेब पठारे (विद्यमान आमदार, वडगावशेरी मतदारसंघ)

बहुजनांवरील अन्यायाविरोधात सर्वसामान्यांना जागरूक करा- मायावती

बसपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न
दिनांक २ मार्च २०२५, पुणे:-उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, शोषित, वंचित, उपेक्षितांचा बुलंद आवाज, मायावती जी यांच्या अध्यक्षतेखाली बहूजन समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक २ मार्च २०२५ रोजी लखनऊ येथे संपन्न झाली. देशभरातील प्रमुख राष्ट्रीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य बैठकीला हजर होते. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव मुकुंददादा सोनवने, प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी, प्रदेश कार्यकारणी सदस्य रामचंद्र जाधव बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीतून मायावती यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करत सर्व प्रदेश कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा घेतला. बैठकीत पक्ष नेते आकाश आनंद यांना पक्षाच्या सर्व पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय मायावती यांनी जाहिर केले.कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय समन्वयक म्हणून आनंद कुमार साहेब आणि माजी खासदार इंजिनियर रामजी गौतम यांची निवड करण्यात आल्याची माहिती डॉ.चलवादी यांनी रविवारी (ता.२) दिली.

उपस्थितांना संबोधित करताना मायावती जी म्हणाल्या की, “अन्नदात्यांच्या शेतमालाला हमीभाव  मिळत नाही, शिक्षण-आरोग्य सेवा, अन्नधान्यावर सरकारने वस्तू आणि सेवा कर लादून सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जनसामान्यांमध्ये जावून प्रस्थापिक सत्ताधारी पक्ष बहुजनांवर अन्याय करतोय, कशाप्रकारे त्यांचे शोषण केले जात आहे, यासंबंधी जागरूक करा’. केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेले दावे फोल ठरत आहेत. कोट्यवधी गरीब, दलित, बेरोजगार, आदिवासी, मागासवर्गीय वर्ग तसेच मजूरांच्या स्थितीत कुठलीही सुधारणा झाली नसल्याची खंत बहजनींनी व्यक्त केली.विकासापासून वंचित असलेल्यांसाठी कार्य करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी पक्षनिष्ठेने काम करीत बहूजन आंदोलन आणखी बळकट करण्याचे आवाहन यानिमित्ताने मायावतींनी केले, असे डॉ.चलवादी म्हणाले. सुश्री बहनजी जिवंत असेपर्यंत पक्षाचा कुणीही उत्तराधिकारी राहणार नाही, यासंदर्भातही बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मान्यवर कांशीराम साहेबांना अपेक्षित चळवळ उभारण्याच्या दिशेने झोकून देत कार्य करण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आल्याचे डॉ.चलवादी यांनी सांगितले. महाराष्ट्र बहुजन समाज पार्टीच्या वतीने नवनियुक्त राष्ट्रीय समन्वयक आनंद कुमार साहेब आणि माजी खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेबांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– आर्थिक शिस्त पाळतानाच कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही

– छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांवर कारवाई होणारच

– राज्यात यंदा सर्वाधिक सोयाबीन खरेदी

– १०० दिवस उपक्रमाचे त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन करणार

– अधिवेशनात संविधान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यावर विशेष चर्चा होणार

मुंबई, दि. २ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगले व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नव्या सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असून हे अधिवेशन चार आठवड्याचे असणार आहे. या अधिवेशनात दोन विषयांवर महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत. 8 मार्चला महिला दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने विशेष चर्चा होणार आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन दिवस संविधानावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात पाच विधेयकांवर चर्चा होईल. विधिमंडळात सर्व विषयांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या नवीन सदस्यांना चर्चेत सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आरोग्य विभागाच्या एका फाईलवर स्थिगिती दिल्याच्या बातमीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारची कोणतीही फाईल माझ्याकडे आली नाही व मी स्थगिती दिलेली नाही. आरोग्य विभागाच्या संबंधित विषयात केंद्र शासनाला सुचविलेल्या कामातील 9 टक्के निधी हा भांडवली खर्चावर खर्च करणार होते. मात्र, केंद्र शासनाने भांडवली खर्चावर 5 टक्के निधी खर्च करण्याची सूचना केली. त्यानुसार, प्राधान्यक्रम ठरवून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, सचिवांनी प्राधान्य ठरविण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे ही फाईल माझ्याकडे आली नाही. तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भातही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर कमी आहेत. इतर राज्यात या नंबर प्लेटची किंमत ही जीएसटी व ती प्लेट बसविण्याचा खर्च वगळून आहे तर महाराष्ट्रातील दर हे जीएसटी व प्लेट बसविण्याच्या खर्चासह आहे. गेल्या पंधरा वर्षातील सोयाबीनच्या सर्वाधिक खरेदीपेक्षा दहापट खरेदी यंदाच्या वर्षी सोयाबीनची झाली आहे. खरेदी केलेले सोयाबीन ठेवण्यास गोदामातही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे माध्यमांनी एखादी बातमी प्रसिद्ध करताना शासनाचीही बाजू मांडल्यास त्यातून होणारे गैरसमज पसरणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचे बोलले तर खपवून घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणारच असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून त्यांच्याबद्दल आम्हाला पुरेपूर माहिती आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आम्ही काम करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने राबविलेल्या 100 दिवसांच्या कामास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात मी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून आढावा घेतला. अनेक विभागांनी चांगली कामे केली आहेत. अनेक कार्यालये स्वच्छ झाली असून रेकॉर्ड रुम तयार झाले आहेत.  दूरदृश्य प्रणालीद्वारे नुकत्याच घेतलेल्या बैठकीस राज्यातील सुमारे ७ हजार अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमाचे केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यातून उत्तम काम करणाऱ्यांना निवडण्यात येणार आहे. तसेच नेमून दिलेल्या कामांसाठी बेंचमार्क ठरविण्यात येणार असून त्या खाली कामगिरी असणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सर्वसामान्यांसाठी व राज्य पुढे नेण्यासाठी काम करत आहोत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासन हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. विकास कामांबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी व राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. राज्याच्या विकासाची वाटचाल दुप्पट तर वेग चौपट होईल. याचे प्रतिबिंब येणाऱ्या अर्थसंकल्पात दिसेल. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहभाग घेऊन नागरिकांची, मतदारसंघाची प्रश्ने मांडावीत. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, या दृष्टीने कामकाज करण्यात येणार आहे. या अधिवेशनात राज्यपाल महोदयांचे अभिभाषण तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. तसेच दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी राज्य शासनाची आहे.

चहापान कार्यक्रम संपन्न

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्री, राज्यमंत्री तसेच आमदार उपस्थित होते.

मोदी,संघ राजवटीत देशाचे भवितव्य धोक्यात :डॉ.बाबा आढाव 

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित आगामी गांधी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाने तयार केलेल्या  विशेषांकाचे प्रकाशन रविवार,दि.२ मार्च २०२५ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव,राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर यांच्याहस्ते झाले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि 

‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.हा कार्यक्रम गांधी भवन,कोथरुड येथे दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.गांधी विचार साहित्य संमेलन विशेषांकाचे गांधी भवन येथे दि.७ ते ९ मार्च २०२५ रोजी होणार असून त्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या या  विशेषांकात गांधीजींच्या जीवन आणि संदेशाविषयी लेखन समाविष्ट करण्यात आले आहे.यावेळी लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, राजा कांदळकर आणि एड.राजेश तोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी आभार मानले. 

डॉ.बाबा आढाव म्हणाले,’सध्या लोकशाही प्रचंड प्रमाणात धोक्यात आली असून आता जर सामान्य जनता जागी होऊन संविधान रक्षण केले नाही ,तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.आजच्या मोदी आणि आर एस एस च्या विचाराने चाललेल्या देशात भारताची लोकशाहीच नव्हे तर देशाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी संविधान रक्षण करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा एवढेच कळकळीने सांगण्यासाठी मी या वयातही आवर्जून आलो. लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणली आहे आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत, त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत’, असेही बाबा आढाव म्हणाले.

‘महात्मा गांधी यांचे विचारच आजच्या देशातील परिस्थितीवर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतील,याचसाठी गांधी विचारांचा यज्ञ म्हणून हे तीन दिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे’,अशी माहिती कुमार सप्तर्षी यांनी यावेळी दिली.तरुणांनी या तीन दिवसीय साहित्य संमेलनाकडे खुल्या मनाने यावे,यासाठीची पूर्वतयारी म्हणून हा गांधी विचारांचा मागोवा घेणारा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. 

‘डॉ.कुमार सप्तर्षी यांचे विचार आणि कार्य पथदर्शक असून डॉ.सप्तर्षींमुळेच मी सामाजिक,राजकीय चळवळीत आलो,असे राजा कांदळकर यांनी सांगितले.आजच्या देशातील परिस्थितीवर मात करायची असेल तर साने गुरूजींचे विचार आठवावे लागतील .’देशातील जाती धर्मातील बंधुभाव जोवर जिवंत राहील तोवरच लोकशाही टिकेल’,असे साने गुरुजी म्हणाले होते. म्हणूनच देशातील बंधुभाव पूर्णतः नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. ते हाणून पाडण्यासाठी आपल्याला बंधुभाव एकात्मता आणि समता कायम ठेवावी लागेल’, असे मत कांदळकर यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्राची लावणी अभिजात, आता मात्र चिंता वाटते.

मिरजच्या “लावणी महोत्सवात” मान्यवरांचे मत..!

महाराष्ट्राची लावणी अभिजात असून तिला उत्तर पेशवाई काळापासून थोर वारसा लाभलेला आहे. मात्र अलीकडच्या काळात लावणी जिथे वाढली, मोठी झाली, शाता समुद्रा पलीकडे गेली, त्या लावणीला संगीतबारी कला केंद्रावर डीजेच्या धिंगाण्याचा सामना करावा लागत असून ही दुर्दैवी गोष्ट आहे. अशी चिंता मिरज (सांगली ) येथे तीन दिवस सुरू झालेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केली.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित केला जातो आणि त्यात पारंपरिक लावणीचे दर्शन घडविणाऱ्या किमान नऊ कला पथकांना कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाते यावर्षी चौफुला,मोडनिंब, वेळे कला केंद्रातील कला पथकांनी आपली कला सादर केली. या लावणी महोत्सवाचे उद्घाटन सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.

. त्यापूर्वी “पारंपरिक लावणीचे बदलते स्वरूप” या विषयावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या परिसंवादाचे अध्यक्ष पद लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ.प्रकाश खांडगे यांनी भूषविले, तर लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. गणेश चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड, प्रख्यात लावणी नर्तिका हेम सुवर्णा मिरजकर, लावणी सम्राज्ञायी प्रमिला लोदगेकर आणि किनवटचे लोकसाहित्याचे अभ्यासाक प्राध्यापक डॉ. रामप्रसाद तौर या मान्यवरांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. आज लावणी डीजेच्या विळख्यात सापडली आहे असे स्पष्ट मत खंडूराज गायकवाड आणि प्रमिला लोदगेकर यांनी व्यक्त केले. शासनाने संगीतबारी कला केंद्रासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणे गरजेचे आहे आणि केवळ गृह खात्यावर अवलंबून न राहता, सांस्कृतिक कार्य विभागाचा शिफारस असेल तरच त्या कला केंद्राना प्रयोग सादरी करण्याचा परवाना दिला जावा. असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.आज अभिजन वर्गातील चित्रपटाचे ग्लॅमर लाभलेल्या मुली लावणी सादर करू लागले आहेत. लावणीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर अभिजन वर्गाची नजर या कलेकडे गेली.
मात्र सत्यभामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर,विठाबाई नारायणगावकर, रोशन सातारकर यांची लावणी अभिजात होती आणि अभिजातच राहणार असे प्राध्यापक डॉ. खांडगे यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले. लावणी बदलली आहे हे सांगताना प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी बाजीराव मस्तानी मधील ‘नभातून आली अप्सरा’ हा कटाव सादर केला. हेमसुवर्णा मिरजकर यांनी यावेळी प्रत्यक्ष पारंपरिक लावणीचे दर्शन घडविले. प्रमिला लोदगेकर यांनी संगीतबारी कला केंद्रावर डीजे चा धुडगूस चालू असल्याने संगीतबारीतील पारंपारिक वाद्य मोडीत निघतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. डीजेमुळे कला केंद्रातील पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ येईल. अशी चिंता खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केली. या परिसंवादामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी संदीप बलखंडे यांनी सध्या कलावंतांकरिता शासन राबवित असलेल्या योजनाची सविस्तर माहिती दिली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय यशस्वीरित्या तीन दिवस राज्य लावणी महोत्सवाला सुरुवात झाली असून ही परंपरा टिकविण्यासाठी तमाशा आणि लावणी महोत्सवाचे आयोजन केले जाते. असे त्यांचे मत आहे. या महोत्सवाची संपूर्ण नियोजन स्थानिक नेते सुरेश आवटी यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनातून होत आहे.

मंगळवारी रंगणार ‘ नामदेव तुझा बाप … सेन्सॉर बोर्डाच्या  निषेधार्थ आंदोलन

  • नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ कार्यक्रम

पुणे : भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ. कवी, लेखक, कलाकार व आंबेडकरी चळवळीतील  कार्यकर्त्यांच्या वतिने अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ‘नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती सम्यक साहित्य संमेलन, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली. 

 ‘नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’  या अभिनव आंदोलनाबद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले,  मंगळवार दि . ४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात  दंगलकार नितीन चंदनशिवे,  सुमित गुणवंत, सागर काकडे, हृद‌मानव अशोक,  रमणी सोनवणे, अशोक घोडके, स्वप्नील चोधरी, हर्षनंद सोनवणे, रवी कांबळे,  जित्या जाली, देवा झिंजाड, विठ्ठल गायकवाड,  म.भा. चव्हाण, विजय बडेवार, अंजली कुलकर्णी,  सुरेश वैराळकर आकाश सोनवणे यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कवी, पत्रकार सहभागी होऊन नामदेव ढसाळ यांच्या कविता आणि लेखनांचे वाचन करणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.  

डॉ. बासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव  दिपक म्हस्के, डॉ. राजाभाऊ भैलुमे, प्रा. किरण सुरवसे, डॉ. निशा भंडारे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, डॉ. स्वप्निल गायकवाड, प्रा. रमा करोते-सुर्यवंशी आदि यं अभिनव आंदोलनाचे निमंत्रक आहेत.

परिवहन विभागाच्या 45 सेवा लवकरच व्हॉट्सअपवर मिळणार – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई – गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता यामध्ये परिवहन विभागाच्या 45 सेवांचादेखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. 

मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे आज परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पणही  फडणवीस यांच्या  हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगल प्रभात लोढा , आमदार मनिषा कायंदे, परिवहन विभागाचे संजय सेठी, विवेक भीमनवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, परिवहन विभाग सर्वात जास्त महसूल देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिवहन विभाग थेट नागरिकांशी आणि अन्य विभागांशी समन्वय करावा लागतो यामुळे या विभागाचे काम कौतुकास्पद आहे. आपघातचे प्रमाण कमी करण्यासाठी खासगी वाहन चालकांशी आणि संस्थाशी समन्वय साधणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘फ्लूट अँड फिडेल’ मधून बासरी आणि व्हायोलिन वादनाने पुणेकर मंत्रमुग्ध 

मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ :  अमर ओक आणि श्रुती भावे यांचा ‘फ्लूट अँड फिडेल’ सांगीतिक कार्यक्रम
पुणे : युही चला चल राही… जीव दंगला…याड लागलं...या गाण्याचे बोल नसतानाही केवळ वाद्यांच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांवर मोहिनी घातली. बासरी वादक अमर ओक आणि व्हायोलिन वादक श्रुती भावे यांनी त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दोघांनीही आपल्या वादन कौशल्यांनी रसिकांना संगीतमय सफर घडवली.

निमित्त होते, मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन च्या वतीने कर्वेनगर मधील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित फ्लूट अँड फिडेल या कार्यक्रमाचे. व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, या उद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणेकरांसाठी करण्यात आले होते.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुराडे, दीपक मानकर, दयानंद गावडे, गोपीचंद कदम, अमरसिंह पाटील या मान्यवरांसह कमिटीचे महेश भागवत, आश्रम काळे, सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव, सागर तुपे, तेजस चरवड, किशोर जगताप, भारती मुरकुटे, सई बहीरट, राजेश कुराडे, सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात देखा एक ख्वाब… जाने जा ढूंढता फिर रहा… चप्पा चप्पा यांसह डेस्पासितो.. पसूरी या गाण्यांच्या चालीवरील व्हायोलिन वादनाला रसिकांनी विशेष दाद दिली. बासरीवर सादर झालेल्या मोह मोह के धागे… या गीताच्या वादनात रसिक तल्लीन झाले. अमर ओक यांचे बासरीचे तर श्रुती भावे यांचे व्हायोलिनचे सूर आणि त्यांना रसिकांनी दिलेली दाद यामुळे कार्यक्रम रंगत गेला. त्यांच्या सुरेल जुगलबंदीने वातावरण भारावून गेले.

टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईतील BKC मध्ये:एप्रिलपासून ईव्ही विक्री

आयात धोरणानुसार, २१ लाख रुपयांची कार भारतीय बाजारात ३६ लाख रुपयांपर्यंत

३५ लाख रुपये दरमहा भाड्याने शोरूम साठी घेतली जागा

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी टेस्ला मुंबईत आपले पहिले भारतातील शोरूम उघडणार आहे. हे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे होईल. कंपनीने यासाठीचा करार अलीकडेच अंतिम केला आहे.प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांनुसार, टेस्ला बीकेसीमधील एका कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर ४,००० चौरस फूट जागा घेत आहे. येथे ते त्यांच्या कार मॉडेल्सचे प्रदर्शन आणि विक्री करेल. कंपनी या जागेसाठी मासिक भाडेपट्टा सुमारे ९०० रुपये प्रति चौरस फूट किंवा सुमारे ३५ लाख रुपये देईल. भाडेपट्टा करार पाच वर्षांसाठी आहे.

कंपनी दिल्ली आणि मुंबईत आपले स्टोअर्स उघडणार असल्याची बातमी होती. टेस्ला दिल्लीतील एरोसिटी कॉम्प्लेक्समध्ये दुसरे शोरूम उघडण्याची अपेक्षा आहे. सीईओ एलन मस्क यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींना त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भेट दिली. यानंतर, कंपनीने भारतातील १३ नोकऱ्यांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या.

मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम उघडल्यानंतर आणि भारतात नोकऱ्यांची संधी दिल्यानंतर, टेस्ला एप्रिलपर्यंत भारतात प्रवेश करेल आणि भारतात कार विकण्यास सुरुवात करेल अशी आशा वाढली आहे. टेस्ला सध्या भारतात उत्पादन युनिट उभारणार नाही. हे जर्मनीतील बर्लिन-ब्रँडनबर्ग येथील गिगाफॅक्टरीमध्ये उत्पादित कार भारतात आणेल. कंपनी येथे सर्वात किफायतशीर ईव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. त्याची किंमत २५ हजार डॉलर्स (२१.७१ लाख रुपये) असू शकते. हे कोणते मॉडेल असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, भारताच्या सध्याच्या ईव्ही कार आयात धोरणानुसार, २१ लाख रुपयांची कार भारतीय बाजारात ३६ लाख रुपयांपर्यंत महागू शकते.

सध्या, परदेशातून येणाऱ्या इलेक्ट्रिक कारवर ७५% बेसिक कस्टम ड्युटी आकारली जाते. तथापि, जर कंपन्यांनी सरकारसोबत सामंजस्य करार केला तर $३५,००० पेक्षा जास्त किमतीच्या कारवर १५% कस्टम ड्युटी आकारली जाईल. ही ड्युटी सूट वर्षातून फक्त ८ हजार कारांवर उपलब्ध असेल.

मॉडेल ३ आणि वाय लाँच करण्याबाबतही चर्चा-टेस्ला सुरुवातीला येथे मॉडेल ३ आणि मॉडेल वाय कार लाँच करू शकते. पण, जागतिक बाजारात दोन्ही मॉडेल्सची किंमत ४४ हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कंपनी ते कमी किमतीत लाँच करेल अशी अपेक्षा आहे.