Home Blog Page 432

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु

0

पुणे, दि. 5: भारतातील युवा वर्गाला आंतरवासितेच्या (इंटर्नशीप) माध्यमातून रोजगारक्षम बनण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गतवर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर १२ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षी ऑक्टोबर २०२४ मधील सदर योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एचडीएफसी बँक, आयशर, एनटीपीसी, मारुती सुझकी, आयसीआयसीआय बँक, पावरग्रीड, मणप्पुरम फायनान्स लिमिटेड, मुथूट फायनान्स, ज्युबिलन्ट अॅग्री अॅन्ड कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, इंडियन ऑइल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशा भारतातील विविध मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. याद्वारे एक लाखाहून अधिक इंटर्नशीपच्या संधी उमेदवारांना उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेचा लाभ घेण्याकरिता कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाहून कमी असणारे २१ ते २४ वयोगटातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. तथापि, पदव्युत्तर पदवीधारक, सध्या पूर्णवेळ शिक्षण घेणारे, कौशल्य प्रशिक्षण, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशीप) प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशीप) प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले अथवा नोकरी करणारे उमेदवार याकरिता पात्र असणार नाहीत.

उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन कमाल ३ कंपन्यांमधील इंटर्नशीपकरिता अर्ज सादर करावा. पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये १२ महिन्यांच्या इंटर्नशीपची संधी उपलब्ध होणार आहे. याकरिता प्रशिक्षणार्थींना दरमहा ५ हजार रुपये आर्थिक साहाय्य तसेच ६ हजार रुपये एकरकमी प्रदान करण्यात येणार आहेत.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी कळविले आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ५ : सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गाव, पाड्यांतील इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह  अर्ज दि. ३१ मे २०२५ आहे पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कस्तुरबा महानगरपालिकेचे मराठी शाळा क्र.२ सभागृह हॉल तळमजला बोरिवली पूर्व, मुंबई येथे संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

महापॉवरपे वॅलेटसाठी महावितरणला पुरस्कार

ग्रामीण भागातील डिजिटल बिल भरणा सुविधा

मुंबई दिनांक ५ मार्च २०२५ : छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून वीज ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा करण्यासाठी विकसित केलेल्या महापॉवरपे वॅलेट या सुविधेसाठी महावितरणला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अचिव्हमेंट पुरस्कार मंगळवारी मुंबईत देण्यात आला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. महापॉवरपे वॅलेटचा वापर करून ग्रामीण भागातील दुकानदार अथवा बचत गट बिल भरणा केंद्राची सेवा वीज ग्राहकांना देऊ शकतात. त्यातून त्यांना कमिशनच्या स्वरुपात उत्पन्नही मिळते. राज्यात प्रामुख्याने ग्रामीण व निमशहरी भागात ४,८७८ महापॉवरपे केंद्रे आहेत. त्याद्वारे दरमहा १३ लाखापेक्षा अधिक ग्राहक वीजबिल भरणा करतात व दरमहा सरासरी १४७ कोटी रुपयांचा भरणा होतो.

महावितरणच्या कार्यकारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) श्वेता जानोरकर, उप महाव्यवस्थापक सायली जव्हेरी आणि प्रणाली विश्लेषक (माहिती तंत्रज्ञान) स्नेहल चव्हाण यांनी पेमेंट सिक्युरिटी समिट अँड ॲवॉर्ड्स इंडिया २०२५ या पुरस्कार सोहळ्यात महावितरणतर्फे हा पुरस्कार स्वीकारला. 

महापॉवरपे वॅलेट ही सुविधा वापरून गावातील किराणा दुकानदार, मेडिकल दुकानदार, दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणारे दुकानदार असे व्यावसायिक वीज ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देऊ शकतात. बचत गटही अशी सुविधा वीज ग्राहकांना उपलब्ध करू शकतात. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या सोईनुसार जवळच्या महापॉवरपे सुविधा असलेल्या दुकानातून वीजबिल भरता येते. ही अत्यंत सोपी पण सुरक्षित बिलभरणा सुविधा आहे.

 जनमित्र हे महावितरणचा कणा – राजेंद्र पवार

‘लाइनमन दिन’ उत्साहात साजरा

पुणे, दि०५ मार्च २०२५: अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रात २४ तास वीजपुरवठ्यासह तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी सज्ज असलेल्या पुणे परिमंडलातील जनमित्रांसाठी मंगळवारी (दि. ४) आयोजित ‘लाइनमन दिन’ ऊर्जा देणारा ठरला. पुणेकर वीजग्राहक व कौटुंबिक सदस्यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून लाइनमन व लाइनवूमन यांना शाबासकीची थाप देत, वीजसुरक्षेचा आग्रह करीत शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या या आत्मियतेने जनमित्रांसह उपस्थित देखील भारावले.

‘लाइनमन दिना’निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. ४) सायंकाळी आयोजित कार्यक्रम मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा ठरला. या कार्यक्रमात ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते श्री. नाना पाटेकर, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनील रासने यांच्यासह घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वीजग्राहक तसेच कर्मचारी कुटुंबातील पती, पत्नी, आईवडील, सासूसासरे व मुलेमुली अशा ७८ जणांनी शाबासकीची थाप देत सर्व लाइनमन व लाइनवूमन यांचा गुणगौरव केला. काहींनी कोविड काळातील सेवा कार्याचे खडतर प्रसंगही सांगितले. यासह वादळवारा, पावसाळा, रात्रीबेरात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरी व ग्रामीण दऱ्याडोंगरात कर्तव्य बजावणाऱ्या जनमित्रांच्या वीजसुरक्षेची काळजी व्यक्त केली. ‘वीजयंत्रणेत काम करताना आमची आठवण ठेऊन सुरक्षा साधनांचा प्रत्येकवेळी वापर करा’ असे गलबलून सांगणाऱ्या मुलामुलींचे आवाहन सर्वांच्या मनात घर करून गेले.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, मानवी मूलभूत गरजेसह सर्वांगिण विकासासाठी वीज आवश्यक आहे. विजेशिवाय सर्वच काही ठप्प अशी स्थिती आहे. अशा क्षेत्रात वीजग्राहकांना तत्पर सेवा देणारे लाइनमन व लाइनवूमन खऱ्या अर्थाने महावितरणचा कणा आहेत. मात्र, वीजयंत्रणेत काम करताना कायम सजग राहा. कोणताही धोका पत्करू नका. सुरक्षा साधनांचा प्रत्येकवेळी वापर करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी वीजसुरक्षेची शपथ घेतली. तसेच महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले व त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. 

‘लाइनमन दिना’निमित्त आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच वीजसुरक्षा, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आदींबाबत उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी प्रबोधन केले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त) व सौ. शितल निकम (प्रभारी, मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी यांनी केले. कार्यक्रमाला तांत्रिक कर्मचाऱ्यांसह अभियंते व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैद्यकीय उपक्रमांसाठी पुरंदर ब्लड बॅंक, केके आय इन्स्टिट्यूट यांनी सहकार्य केले.

महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचे राजकारण सुरूच

पालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच:,‘सुप्रीम’ सुनावणी दोन महिने लांबली; वकिलांवर कोर्ट संतापले
मुबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन – तीन महिन्यांत होण्याची शक्यता मावळली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी आणखी दोन महिने लांबल्याने आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होणार, हे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (४ मार्च) झालेल्या सुनावणीवेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी या प्रकरणाच्या सद्य:स्थितीबाबत नेमकी माहिती न दिल्याने संतापलेल्या कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. ती आता थेट ६ मे रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणासंदर्भात राहुल वाघ यांनी या प्रकरणाची पुढची सुनावणी लांबणीवर पडल्याने येत्या काही दिवसांत दोन्ही बाजूंनी कोर्टापुढे हे प्रकरण मेन्शन करून लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली तर कोर्ट कदाचित त्यावर विचार करू शकते. पण, तसे न झाल्यास ६ मे रोजी सुनावणी होईल. त्या दिवशीच अंतिम निकाल लागला तरी निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील. कारण राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकांच्या तयारीसाठी किमान ४५ दिवसांचा अवधी लागतो. त्या स्थितीत जूनच्या मध्यानंतर म्हणजे ऐन पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जाणे अवघड आहे.

तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. दुपारी एकच्या सुमारास राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणाचा उल्लेख केला आणि ही सुनावणी आणखी दोन दिवसांनी घेण्याची मागणी केली. त्यावर अॅड. इंदिरा जयसिंग, अॅड. देवदत्त पालोदकर यांच्यासह याचिकाकर्त्यांच्या अन्य वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला आणि आजच सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यावर कोर्टाने, या प्रकरणाची सद्य:स्थिती काय आहे, असे विचारल्यावर दोन्हीकडील वकिलांनी एकाच वेळी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त करत सुनावणी पुढे ढकलत असल्याचे सांगून कामकाज थांबवले.

या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले असल्याने आता अंतिम युक्तिवाद ऐकून कोर्टाकडून निकाल येण्याची प्रतीक्षा आहे. कोर्टाने स्थगिती उठवली तर निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. विशेष म्हणजे, २५ फेब्रुवारीच्या सुनावणीवेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनीच चार मार्चला पुढची सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, तुषार मेहता यांनी ऐनवेळी आणखी २ दिवस मागितल्याने याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. येत्या ८ ते १६ तारखेपर्यंत कोर्टाला होळीची सुटी आहे व त्याआधी कोर्ट या सुनावणीसाठी तारीख देऊ शकणार नाही, हे स्पष्ट असल्याने याचिकाकर्त्यांचे वकील आक्रमक झाले होते.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे चार दिवसीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात २४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजिलेल्या ‘पेस २०२५’, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या उत्साह व प्रतिभेचे दर्शन पाहायला मिळाले. ३० पेक्षा अधिक महाविद्यालयातून १८२ संघांतून जवळपास २४०० खेळाडूंनी महोत्सवात सहभागी घेतला. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२५ या कालावधीत दिघी येथे एआयटी कॅम्पसमध्ये झाल्या. ‘पेस २०२५’ क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, स्क्वॅश आदी स्पर्धा झाल्या.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या बॉक्सर जैस्मिन लांबोरिया यांच्या हस्ते ‘पेस’ महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसंगी आरजे संग्राम खोपडे यांची विशेष उपस्थिती होती. भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अर्निका गुजर पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. प्रसंगी ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (नि.) अभय भट, सहसंचालक कर्नल (नि.) एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांच्यासह स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

क्रिकेट (मुले) – भारती विद्यापीठ, कबड्डी – एआयएसएसएमएस सीओई पुणे, बॅडमिंटन (मुले व संमिश्र) – एआयटी पुणे, बॅडमिंटन (मुली) – अमृता गाडेकर (एमआयटी), व्हॉलीबॉल (मुले) – एआयटी पुणे, व्हॉलीबॉल (मुली) – एएफएमसी पुणे, बास्केटबॉल (मुले) – एआयटी पुणे, बास्केटबॉल (मुली) – इंदिरा कॉलेज पुणे, फ़ुटबॉल ११अ (मुले) – एआयटी पुणे, फुटबॉल ६अ (मुले) – व्हीआयआयटी पुणे, फुटबॉल (मुली) सिंहगड कॉलेज, स्क्वॅश (मुले-एकेरी) – बॉबी, लॉन टेनिस (मुले) – आशुतोष (सीओईपी), लॉन टेनिस (मुली) – एमआयटी पुणे, टेबल टेनिस (मुली) – आयआयसीएमआर, टेबल टेनिस (मुले) – जेएसपीएम पुणे, बुद्धिबळ (मुली) – एआयटी पुणे, बुद्धिबळ (मुले) – व्हीआयटी पुणे यांनी विजय मिळवला.

अर्निका गुजर पाटील म्हणाल्या, “महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ असते. त्यामुळे सहभाग घेत अधिकाधिक चांगला खेळ करणे महत्वाचे आहे. आवडीच्या खेळातील कौशल्ये आत्मसात करीत स्वतःला सक्षम बनवावे, तंदुरुस्तीवर व सरावावर भर द्यावा. त्यातूनच खेळाडू घडतात. महाविद्यालयाचे, राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आकांक्षा उराशी बाळगावी.”

जैस्मिन लांबोरिया यांनी क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये नवोन्मेषी अभियांत्रिकी उपाययोजना समाविष्ट करण्याच्या महत्त्वावर भर दिला. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुयोग्य रचना केवळ खेळाडूंच्या कामगिरी आणि सुरक्षिततेस मदत करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या अनुभवातही मोठी भर घालतात, ज्यामुळे क्रीडा स्पर्धा सर्वांसाठी अधिक सुलभ आणि रोमांचक बनतात, असे त्यांनी नमूद केले. 

आरजे संग्राम खोपडे यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य यामध्ये खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. तरुण पिढी आपल्या देशाचे भविष्य घडवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिगेडियर अभय भट यांनी विद्यार्थ्यांतील खेळभावना वृद्धिंगत होण्यासाठी ‘पेस’सारखे उपक्रम वाढायला हवेत. खेळांमुळे तरुण पिढी अधिक उत्साही, सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय विद्या भवन सुरू करणार मराठी माध्यमाची शाळा !

पुणे:मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्या भवन या नामवंत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेने पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील केंद्रात येत्या जून २०२५ पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त,नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे केंद्राचे संचालक व मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पूर्व प्राथमिक ची मराठी शाळा खेळ गट म्हणजे नर्सरी व बालवाडी छोटा गट म्हणजे ज्युनिअर केजी अशी सुरू केली जात आहे.

येत्या जून पासून या पूर्व प्राथमिक शाळेचे खेळ गट (नर्सरी) व बालवाडी (ज्युनिअर केजी) हे वर्ग दुपारच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेऊन प्रारंभी केवळ एक वर्ग सुरू करणार असून त्यामध्ये कमाल तीस पटसंख्या राहील असे ठरवण्यात आले आहे. हे विद्यार्थी दोन वर्षानंतर पहिली इयत्तेमध्ये जातील. त्यावेळी सक्तीच्या मोफत कायद्यातील तरतुदीनुसार (आरटीई ) प्रवेशांसाठी आवश्यक जागांवरील प्रवेश नियमानुसार केले जातील.

  भारतीय विद्या  भवनच्या पुणे केंद्राची स्थापना १९८३  मध्ये पुण्यात झाली. शिवाजीनगर येथे छाब्रिया नर्सरी स्कूल व सुलोचना नातू विद्या मंदिर या दोन इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. गेली तीन दशके या शाळांचा कारभार  सुरू असून मोफत सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसारही २५ टक्के प्रवेश  इंग्रजी शाळेमध्ये गेली नऊ वर्षे देण्यात आलेले आहेत. या दोन्ही शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर,मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी भाषा वृद्धिंगत व समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून  मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे  प्रा.नंदकुमार  काकिर्डे यांनी कळवले आहे

बृहन्मुंबई महापालिकेच्या 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

  • प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा
  • हाजीअली येथे 1200 क्षमतेचे वाहनतळ उभारा
  • नालेसफाईच्या कामात एआयचा वापर करा
  • प्रस्तावित प्रकल्पांची निविदा कामे महिन्याभरात पूर्ण करा

मुंबई, 4 मार्च
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे 1 लाख 41 हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित 25 हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देश दिले.

विधानभवनात झालेल्या या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे सुद्धा उपस्थित होते. मुंबईत महापालिकेच्या वतीने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे सुमारे 1 लाख 41 हजार 356 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये सुमारे 700 किमी किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरणाची कामे, वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, बेलासिस पूल, महालक्ष्मी पूल, मढ-वर्सोवा पूल आदी पुलांची कामे, दहीसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्प, यासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवा, मालाड, भांडूप, घाटकोपर येथील मलजल उदचन केंद्र, वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या वतीने सायन केईएम, सायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणी, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

निक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज 5, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणी पुरवठा प्रकल्प या सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

हाजीअली येथे 1200 वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारा : मुख्यमंत्री
छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे 1200 वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत. प्रस्तावित प्रकल्पांसाठीचे टेंडर कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. भविष्यात मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्तांच्या कामाचा वेग वाढवा : एकनाथ शिंदे
सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने 700 किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सुमारे 2 हजार किमी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. मुंबईच्या एकूण रस्त्यांपैकी 80 टक्के मुंबई खड्डेमुक्त होईल. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

वाल्मीक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दया- प्रमोद नाना भानगिरे

पुणे-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून अ मानवीय पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने डेक्कन येथील अलका चौकात तीव्र निदर्शने करत मारेकऱ्यांच्या फाशीची मागणी करण्यात आली. पुणे शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी वाल्मीक कराडचा पुतळा जाळून तातडीने त्यास फाशी देण्याची प्रमुख मागणी केली

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यांपूर्वी अपहरण करून अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली होती. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून या या हत्येच्या निषेधार्थ अलका चौक येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराड याचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये दाखल झाले असून शिवसैनिकांनी वाल्मीक कराडचा पुतळा जाळून तीव्र निदर्शने करत आंदोलन केले.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हस्ते चा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच असून न्यायालयाने विशेष खटला दाखल करीत सर्व आरोपींना ताबडतोब फासावर लटकवायला हवे संपूर्ण महाराष्ट्रात या हत्येच्या निषेधार्थ
जनभावनेचा मोठा आक्रोश निर्माण होत असून मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फासावर लटकवा तरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल असे शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी म्हटले आहे.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझिरे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत, महिला आघाडी शहर प्रमुख श्रुती नाझीरकर, सुरेखा पाटील,उपशहर प्रमुख संतोष राजपूत, प्रमोद प्रभुणे सुधीर कुरुमकर, सचिन थोरात, शहर संघटक आकाश रेणुसे,समीर नाईक, गौरव साइनकर, जितेंद्र जंगम,राजाभाऊ भिलारे, अक्षय आवटे, आकाश माझिरे, शिव कामगार सेना शहर प्रमुख संदीप शिंदे, नितीन लगस नवनाथ निवंगुणे, राजू परदेशी निलेश जगताप, दीपक कुलाळ, प्रणव थोरात शंकर संगम,शितल गाडे, स्मिता कांबळे, सुरेखाताई पाटील, अक्षय तारू व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील महापालिकांमधील ‘प्रशासनराज’ मुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष.

मुंबई, दि. ४ मार्च २५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीचे काम करत असून जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महानगरातील जनतेच्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात आज आंदोलन केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरुद्ध नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढून महानगरपालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोग्य, पाणी, रस्ते, शैक्षणिक व सुरक्षा मुलभूत हक्कांसाठी तसेच महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्या कारभार विरुद्ध पनवेल तालुका व पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, प्रदेश सचिव मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस प्रभारी राणी अग्रवाल, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर विविध नागरी समस्यांबाबत आंदोलन करून आयुक्त अनिलकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस जो जो थॉमस, प्रदेश सचिव धनराज राठोड, वसई विरार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ओनिल अल्मेडा आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर धरणे आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, वीरेंद्र जगताप, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकरेत उपस्थित होते. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन शेतकरी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. डॉ. कल्याणराव काळे, जिल्हा पक्ष प्रभारी माजी.आ.नामदेवराव पवार, माजी आ. कैलास गोरंट्याल, मा. आ. राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रातही आंदोलन करून भाजपा युती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

पुणे दि. ४ मार्च २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

ही घटना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. पीडित मुलगी आपल्या राहत्या घरी असताना आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ००९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी मागील आठ वर्षांपासून मुलीच्या घरीच कामाला होता आणि त्याने याच विश्वासाचा गैरफायदा घेत हा घृणास्पद कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम १३७(२) तसेच बाल संरक्षण कायदा (POCSO Act) आणि इतर अनुषंगिक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात तसेच राजगुरूनगर व आसपासच्या परिसरात परप्रांतीयांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामध्ये अनेक सामान्य मजूर कार्यरत असले तरी समाजकंटक आणि बेकायदेशीर धंद्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचाही समावेश असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई व्हावी. तसेच, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची नोंदणी करण्यात यावी आणि त्यांचा सविस्तर डेटाबेस तयार करावा. या डेटाबेसमध्ये आधार क्रमांक, स्थानिक व्यवस्थापनामध्ये नोकरीस असल्यास त्यासंबंधित सर्व माहिती, निवासी पत्ता इत्यादी आवश्यक माहिती संकलित करावी. परप्रांतीय नागरिकांवर प्राधान्याने लक्ष ठेवण्याचे आणि त्यांच्या प्रत्येक हालचालींची नोंद ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय, या घटनेच्या अनुषंगाने संपूर्ण परिस्थितीजन्य दस्तऐवज एकत्र करून न्यायालयासमोर सादर करावेत आणि आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. त्यासाठी शासनातर्फे विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पीडित मुलगी आणि तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे आणि त्यांना ‘मनोधैर्य’ योजनेतून शक्य तितकी मदत देण्यात यावी, असेही निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेवर तातडीने कार्यवाही करून सविस्तर अहवाल त्यांच्या कार्यालयाला सादर करावा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

एप्रिल पासून घ्या पाणी विकत .. मीटर लावून महापालिका देणार बिल..अन तुम्ही भरणार ?

१२ हजार ६१८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर

पुणे-पुणेकरावर कोणतीही कर वाढ न करणारे पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ६१८ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीला सादर केला.यामध्ये स्वछता, आरोग्य आणि पायाभुत सुविधावर भर देण्यात आला आहे.महापालिका प्रशासनाने मंगळवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये करवाढ न करता पुणेकरांना एकीकडे दिलासा दिला. त्याचवेळी यंदाच्या आर्थिक वर्षापासुन मीटरप्रमाणे पाणी वापराचे बिल भरण्याची व्यवस्था मात्र केली.त्यामुळे नागरीकांना आता वीज बिलाप्रमाणेच पाणीपट्टी बिलासासाठीही खिशाला कात्री लागणार आहे.महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी महापालिकेचे २०२५-२६ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. डॉ. भोसले यांनी तब्बल १२ हजार ६१८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून त्यास मंजुरी दिली.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्पीराज बी.पी., अप्पर आयुक्त महेश पाटील, वित्त व लेखाधिकारी उल्का कळसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, नगरसचिव योगिता भोसले आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावासाठी तब्बल ६२३ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे समाविष्ट गावामध्ये पायाभुत सविधा निर्माण होणार आहे.

यावेळी आयुक्त यांनी करवाढीसंदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि हे अंदाजपत्रक सर्वसामान्य नागरीकांसाठी आहे. या अंदाजपत्रकामध्ये पाणी पुरवठा, रस्ते सुधारणा व आरोग्य सेवेसाठी मोठी तरतूद केल्याचेही सांगितले. त्यामुळे नागरीकांना चांगलाच दिलासा मिळण्याची चिन्हे होती.दरम्यान, महापालिका आयुक्तांनी समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या सद्यःस्थितीची माहिती देऊन पाणी मीटर प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.मीटरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुले दरवर्षी अंदाजे १२५ कोटी रुपये जमा होतात.२०२३-२४ या आर्थिक वर्षात १३० कोटी ९८ लाख रुपये, तर २०२४-२५ मध्ये ३१ जानेवारी अखेरपर्यंत १०२ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत. ३१ जानेवारी अखेरपर्यंत शहरात ४७ हजार ७० इतके नळजोडची संख्या आहे. तर ७२७ कोटी ९६ लाख रुपये थकबाकी आहे. दुबार पाणीपट्टी, नादुरुस्ती मीटर, नळजोड बंद, घोषीत झोपडपट्टीमधील पाणीपट्टी अशा विविध कारणांमुळे मीटर पाणीपट्टीची थकबाकी आहे.पाणी मीटर बसविण्याची जबाबदारी संबंधित ग्राहकांचीच असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. नादुरुस्तीच्या काळात सरासरी वापरापेक्षा जादा वापर गृहीत थरुण बिल आकारणी केली जाते. मीटर दुरुस्त केल्यानंतर वसुली होणारी रक्कम ही २० ते २५ टक्के इतकी आहे. ही थकबाकी वसुली करण्याचे काम महापालिकेकडुन सुरु असल्याचे अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.नागरीकांकडे मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिकेकडुन विविध प्रयत्न सुरु आहे. महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन वेळा लोक अदालत भरविली. त्याद्वारे एक कोटी १३ लाख रुपये इतकी थकबाकी वसुल करण्यात आली असल्याचे महापालिकेने अंदाजपत्रकात म्हंटले आहे.

पुणे महापालिकेनं समान पाणीपुरवठ्याची योजना राबवली आहे. त्याचे काम जवळपास पुर्ण होत आले आहे त्यामुळे आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचं बील मीटर प्रमाणे द्यावे लागणार आहे ⁠पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी मधील घरांचे पुनर्वसन महापालिका करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आता उपायुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या यांचे निराकरण केले जाणार आहे.
पुणेबजेट २०२५-२६ (Pune Budget 2025-26)
असा येणार रुपया (जमा)
वस्तू व सेवा कर : २६ टक्के
मिळकत कर : २३ टक्के
पाणी पट्टी : ५ टक्के
शासकीय अनुदान : १३ टक्के
शहर विकास चार्जेस : २३ टक्के
अमृत, स्मार्ट सिटी : २ टक्के
इतर जमा : ६ टक्के
कर्ज रोखे :२ टक्के

असा जाणार रुपया (खर्च)
विकासकामे व प्रकल्प : ४१ टक्के
सेवक वर्ग खर्च : २९ टक्के
वीजखर्च व दुरूस्ती : ३ टक्के
पाणी खर्च : १ टक्के
कर्ज परतफेड व व्याज : १ टक्के
वॉर्ड स्तरीय कामे : १ टक्के
पेट्रोल, देखभाल दुरूस्ती खर्च, औषधे : २१ टक्के
क्षेत्रीय कार्यालयाने करावयाची कामे : १ टक्के
अमृत, स्मार्ट सिटी : २ टक्के

प्रशासक काळातील हा तिसरा अर्थसंकल्प असताना आगामी वर्षासाठी मिळकतकरात कोणतीही वाढ सुचविलेली नाही. तसेच २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात दिलेले २७२७ कोटीचे उद्दिष्ट गाठताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. त्याचा विचार करता आगामी वर्षात मिळकतकर विभागाकडून २८४७.२३ कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.
त्याच बरोबर जीएसटीचे २७०१. ७७ कोटी, एलबीटी ५४५. ३२ कोटी, बांधकाम विकास शुल्कातून २८९९.९९ कोटी, शासकीय अनुदानातून १६३३ .४४ कोटी, पाणी पट्टीतून ६१८.७२ कोटी आणि इतर जमा मधून ९७५.५० रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये महापालिका स्वतःच्या ताकदीवर ६३६५.९४ कोटी रुपये जमा करणार आहे, तर उर्वरित ६२५२.१५ कोटी रुपये केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून मिळणार आहेत.
अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन करताना चिकन, मटणाची विल्हेवाट लावण्यासाठी दैनंदिन २५ टनाचा प्रक्रिया प्रकल्प, नाकारलेल्या कचऱ्यासाठी २० टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प तीन महिन्यात सुरु होणार. रामटेकडी येथे नावीन्यपूर्ण पद्धतीने ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभा करणार. शहरातील ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाची कामे पूर्ण करणार, सेंट्रल स्काडा सिस्टीम, जीआयएस, एमआयएस प्रणालीबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार.
यासाठी अर्थसंकल्पात ५४० कोटीची तरतूद केली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ७ कोटीची यंत्रसामग्री खरेदी केली जाणार. मुंढवा येथील महात्मा पुले चौकातील समतल विगलक बांधण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली आहे. हडपसर येथे रेल्वे गेट क्रमांक ७ येथे भुयारी मार्ग बांधणे, पुणे मेट्रोसाठी ४० कोटी रुपये, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बिंदू माधव ठाकरे चौकातील उड्डाणपुलासाठी ८ कोटीची तरतूद केली आहे यासाठी भांडवली तरतुदीतून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

महापालिकेची प्रशासकीय राजवट म्हणजे लोकशाहीवर हल्ला – कॉंग्रेस

पुणे महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर कॉंग्रेस आक्रमक

पुणे-पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर संपूर्णपणे राज्यशासनाचे नियंत्रण आहे. महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासन बिघडलेले असून सर्वसामान्य जनतेला सोयी – सुविधा मिळत नाहीत व त्यांना त्रास सहन करावा लागतो. भाजपा व महायुतीच्या मर्जीतले प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. तसेच दिवसेंदिवस शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेचा प्रश्न त्याचबरोबर पुण्यातील भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने महानगरपालिकेत होणारा  भ्रष्टाचाराचा प्रश्न भेडसावत आहे, म्हणून या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली  मराठे, सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन, संतोष हंगरगी, सदानंद शेट्टी, नीता रजपूत, सुनिल शिंदे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रविंद्र माझिरे, विशाल जाधव, हेमंत राजभोज, संतोष आरडे, रमेश सकट, दिलीप तुपे, रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संतोष पाटोळे, दिलीप तुपे, समीर शेख, सेल्वराज ॲन्थोनी, अश्विनी डॅनिलय लांडगे, विल्सन चंदवेल, संदिप मोकाटे, सचिन दुर्गाडे, प्रदिप परदेशी, गणेश गुगळे, इरफान शेख, मतीन शेख, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सीमा सावंत, प्रकाश पवार, मंदा जाधव, ज्योती परदेशी, शोभा आरूडे, प्रियंका मधाळे, कविता भागवत, कांचन बालनायक, शारदा वीर, वाल्मिक जगताप, गुलाब नेटके, हरिदास चव्‍हाण, नारायण पोटोळे, रवि आरडे, अविनाश अडसूळ, अनिल धिमधिमे, शिलार रतनगिरी, भगवान कडू, भुषण रानभरे, संदिप कांबळे, ॲड. नंदलाल धिवार, ॲड. रमेश पवळे, किशोर मारणे, मीना हुबळीकर आदींसह असंख्य काँग्रेसजन सदर मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘सत्तेत येण्या अगोदर ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे मोदी सरकारने जाहिर केले होते. परंतु आता महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश भ्रष्टाचाराचे कुरण झाला असून भेष्ट व आत्याचारी मंत्र्याच्या विरोधात हे भाजप सरकार कोणत्याही कारवाया करताना दिसत नसल्याचे महाराष्ट्रातील अनेक प्रकरणातून दिसून आले आहे. तीन महिने एका मंत्र्यांचा पुरावे असताना राजीनामा न घेणे तसेच कोर्टाने ताशेरे ओढलेल्या मंत्र्यांस अभय देणे हे त्याचे धोतक असल्याचे बी. एम. संदिप यांनी सांगितले.या पुढे काँग्रेस पक्ष निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार असे प्रतिपादन बी. एम. संदिप यांनी केले.’’

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यातील ज्वलंत प्रश्नांवरती भाष्य करताना सांगितले की, वाहतुक, पाणी, ड्रेनेज, खड्डे पडलेले रस्ते, निवडणुकी आगोदर लाडकी झालेली बहिण निवडणुकीनंतर तीची पात्रता तपासण्याचे काम या कुचकामी सरकारने केले आहे. तीन ते चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेतील अंध, अपंग, विधवा, निराधार, ज्येष्ठ नागरिक यांच्या पेन्शन्स गेल्या तीन महिन्यांपासून डीबीटी च्या नावाखाली थांबविण्यचे काम या भाजप सरकारने केले आहे.महानगरपालिकेतील अनेक प्रकरणात भ्रष्टाचार उघड झाला असून त्याच्यातील दोषींवर कोणतीही कारवाई होत नाही अशा सर्व भ्रष्टाचाराच्या विरोधात व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात यापुढे काँग्रेस पक्ष तीव्र लढा देणार आहे. पुणे शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्याच्या विरोधातही महिला सुरक्षेच्या बाबतीत काँग्रेस पक्ष कटिबध्द असणार आहे.’’

यानंतर माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक अविनाश बागवे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित दरेकर यांनी केले तर आभार भवानी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित यादव यांनी मानले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-आम आदमी पक्षाची मागणी


पुणे:
बीड येथील मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अत्यंत अमानवी हत्या करण्यात आली आहे यास गृहखाते जबाबदार आहे त्यामुळे या खात्याचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह देशभरात सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे पडसाद उमटत आहेत त्यामुळे सर्व समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
असे सांगून आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाहीत.संतोष देशमुख यांना अमानुषपणे लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करताना आनंदोत्सव साजरा करतानाचे छायाचित्र व्हिडिओ काढून ते व्हायरल करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोरांना व त्यांच्या सुत्रधारांना तसेच मदत करणाऱ्यांना तत्काळ फाशी देण्यात यावी

लंडनमध्ये रात्री पावसात ‘प्रेमाची शिट्टी’

राठी संगीतविश्वात आजकाल वेगवेगळ्या धाटणीची गाणी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव भारतात नव्हे तर परदेशातही पडताना दिसतोय. आपली मराठी गाणी परदेशातही चित्रीत होत आहेत. श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाण नुकतच प्रदर्शित झाल आहे. तर विशेष म्हणजे हे गाण यूनाइटेड किंगडम मधील लंडन या शहरात चित्रीत झाले आहे.

रोमँटिक गाणं ‘प्रेमाची शिट्टी’ निखिल रानडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं आहे शिवाय ते सिनेमॅटोग्राफर देखील होते. हे गाण आपल्या भावनिक कथानक आणि हृदयस्पर्शी सुरावटींमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहे. या गाण्यात अभिनेता चेतन मोहतुरे आणि अभिनेत्री सुप्रिया चव्हाण यांची नवीन आणि आकर्षक जोडी पाहायला मिळेल. गाण्याचे बोल आणि निर्मिती जय पालवकर यांनी केली आहे. तर या गाण्याच संगीत निहार शेंबेकर आणि रॅपर A.K.A शार्क (शार्दूल नितीन साखळे) याने केले आहे.

निर्माते जय पालवकर ‘प्रेमाची शिट्टी’ गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतात,”दिग्दर्शक निखिल रानडे यांनी लंडनमध्ये गाण चित्रीत करण्याची संकल्पना मांडली. आणि गाण सुद्धा थोड वेस्टर्न टाईपमध्ये होत. तसेच रॅपर A.K.A शार्क (शार्दूल नितीन साखळे) याचा या गाण्यात एक रॅप देखील सादर केला आहे. त्यामुळे हे गाण अजूनच आकर्षक दिसत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांचे असेच प्रेम कायम आम्हाला मिळो हीच सदिच्छा.”

मुसाफिरा फेम अभिनेता चेतन मोहतुरे गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना म्हणाला, ”आम्ही लंडनमध्ये रात्री शूट करत होतो त्यावेळेस खूप पाऊस होता. आम्ही एका लोकेशनवर २ तास ट्रॅव्हल करून गेलेलो तिथे शूट सुरू करणार तेवढ्यातच सिक्युरिटी गार्डस अचानक आले आणि त्यांनी तिथे शूट न करण्यास सांगितले. मग आम्ही दुसऱ्या लोकेशनवर जाऊन गाण शूट केल.”

अभिनेत्री सुप्रिया चव्हाण तिच्या पहिल्याच गाण्याविषयी सांगते, “नृत्यदिग्दर्शक म्हणून माझं करिअर आतापर्यंत अप्रतिम राहिलं आहे. १२ वर्षे मी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत आहे, मी जगभर नृत्य शिकवले आहे. “प्रेमाची शिट्टी” हे गाण माझ्यासाठी फारच स्पेशल आहे. अभिनेता चेतन मोहतुरे यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. या गाण्याच चित्रीकरण करताना आम्ही फार धम्माल केली.”

दिग्दर्शक निखिल रानडे गाण्याविषयी सांगतो,”मी गेली ३ वर्ष लंडनमध्ये राहत आहे. आणि मी ३० ते ४० गाण्यांचे दिग्दर्शन केले आहे. श्रीजय क्रिएशन सोबत मी याआधी स्पर्श माझा हे गाण चित्रीत केले आहे. त्या नंतर आता प्रेमाची शिट्टी हे गीत केले आहे. हे गाण आम्ही लंडनमध्ये रात्री पावसात शूट केल आहे.”

प्रेमाची शिट्टी या गाण्याचा ऑडिओ सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर ऐकता येईल.