Home Blog Page 429

“होय, मी लेखक होणारच! –नवोदित लेखकांसाठी विशेष कार्यशाळा

पुणे – नवोदित लेखकांना प्रेरणा व दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि समर्थ युवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होय, मी लेखक होणारच!’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठात येत्या १५ ते १८ मार्चदरम्यान ही कार्यशाळा होणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यशाळेच्या आयोजनाची माहिती देण्यात आली. ‘मीडिया नेक्स्ट’चे संचालक श्री. अभय कुलकर्णी, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री. प्रसेनजीत फडणवीस, विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, माध्यम सल्लागार व मुक्त आशयनिर्माते श्री. प्रसाद मिरासदार यांनी या उपक्रमांच्या आयोजनाविषयीची माहिती दिली.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशानंतर वाचकांचा वाढता प्रतिसाद आणि नव्या लेखकनिर्मितीची गरज लक्षात घेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे आयोजक, पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक श्री. राजेश पांडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात जरी माहिती सहजगत्या उपलब्ध होत असली, तरी वैचारिक लेखन आणि दर्जेदार सर्जनशीलतेला मोठे महत्व आहे. नवोदित लेखक, विद्यार्थी आणि युवा साहित्यप्रेमींना लेखनाची सखोल समज, तांत्रिक दृष्टिकोन आणि सृजनशीलतेचा विकास करण्याची संधी मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

कार्यशाळेची प्रमुख वैशिष्ट्ये –
दिनांक: १५ ते १८ मार्च २०२५
स्थळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
निवड प्रक्रिया: ३०० निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश
साहित्य प्रकार: कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, पटकथा लेखन इत्यादी.

उद्घाटन समारंभ आणि विशेष उपस्थिती:
कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ १५ मार्च रोजी दुपारी ४:०० वाजता होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक श्री. प्रवीण तरडे व राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक श्री. युवराज मलिक व उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेतून साध्य होणाऱ्या बाबी –
● दर्जेदार लेखनाचे तंत्र आत्मसात करणे.
● कथा, कविता, निबंध, समीक्षा, पटकथा यांसारख्या विविध लेखनप्रकारांची ओळख होणे.
● संपादन आणि प्रकाशन प्रक्रियेची माहिती घेणे.
● अनुभवी लेखक आणि संपादकांचे मार्गदर्शन.

● स्वलेखनासाठी प्रेरणा आणि दिशा मिळणे.

अधिक माहितीसाठी संपर्क – प्राचार्य डॉ. संजय चाकणे (9890171857), अमोघ वैद्य (7972050765)

मी तुलना केली नाही, माफी मागणार नाही:अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळले;कोरटकर,सोलापूरकरला वाचवण्यासाठी हे षडयंत्र

मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहेत. दैवतासोबत कोणीही स्वतःची तुलना करत नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्याला आता परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे.महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कडक अशी शिक्षा मिळायला पाहिजे. त्यामुळे पुन्हा अशी कोणाचीच हिम्मत होणार नाही. अशी मागणी मी कालच सभागृहात केली असल्याचा दावा देखील अनिल परब यांनी केला आहे. इतकेच नाही तर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी हे पुढे आणलेले षडयंत्र असल्याचा आरोप देखील परब यांनी केला आहे.

या संदर्भात अनिल परब म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना मी राज्यपालांविषयी काहीही चुकीचे बोललेलो नाही. मी हाडाचा शिवसैनिक आहे. संभाजी महाराजांचा मी अपमान केलेला नाही. त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच येत नसल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहेत. दैवतासोबत कोणीही स्वतःची तुलना करत नाही. हे त्यांना कळायला हवे. ज्यांची आम्ही पूजा करतो, ज्यांना आम्ही देव म्हणतो, अशा सर्व दैवतांसोबत आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत माझी तुलना केलीच नाही. मी केवळ एवढेच म्हणालो होतो की, छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला होता. तर माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला आहे. मी एवढेच म्हणालो होतो. यात तुलना कुठे होते? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मात्र, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना वाचवण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी सत्ताधारी आमदारांवर केला आहे.

शासकीय रुग्णालयात सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या पोस्ट्स तयार कराव्या,आऊटसोर्सिंगचाही विचार करावा-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : सरकारी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या पोस्ट्स निर्माण कराव्या, तसेच त्यांची भरती आऊटसोर्सिंग मार्फतही करण्याचा विचार करून, त्याबाबतही धोरण ठरवावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत गुरुवारी अंदाजपत्रकावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना केली.

सरकारी रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये सुसज्ज पद्धतीने उभी केली जातात. तपासण्या, प्रयोगशाळा यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविली जाते. मात्र, त्याच पद्धतीने ही रुग्णालये चालविण्यासाठी सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सची आवश्यकता आहे. अशा पोस्ट्स सार्वजनिक आरोग्य विभागाकडे भरल्या जात नाहीत, वैद्यकीय अधिकारीच रुग्णालये चालवतात. वास्तविक सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या पोस्ट्स निर्माण करायला हव्यात आणि त्या तातडीने भरल्याही जायला हव्यात तरच उत्कृष्ट दर्जाची सार्वजनिक आरोग्य सेवा महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत पुरविली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी चर्चेत बोलताना सांगितले.

सरकारी रुग्णालयांत सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता आऊटसोर्सिंग करावे लागले, तरी त्याही पर्यायाचा विचार व्हावा. सरकारने सुसज्ज पद्धतीने उभ्या केलेल्या हॉस्पिटल्समध्ये सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा मिळावी, असा उद्देश आहे. याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरण ठरवावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

अनधिकृत होर्डिंगमुळे अपघात झाल्यास मंत्री जबाबदारी घेणार का?

दरवर्षी राज्यातील होर्डिंग्जचे ऑडिट केले जाणार, मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

मुंबई-मुंबईत अपघात झाल्यानंतर महायुती सरकार जागे झाले. पण फक्त मुंबईत होर्डिंग्ज प्रश्न नाही तर राज्यातही अनधिकृत होर्डिंग्ज वाढलेले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नागभिड तालुक्यात मोठे होर्डिंग असून ते कोसळले तर मोठा अपघात होईल. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील होर्डिंग्ज ऑडिट होणार का, आणि एखादी घटना घडल्यास मंत्री जबाबदार असतील का असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी विधानसभेत उपस्थित केला.

राज्यात ९०२६ ठिकाणी होर्डिंगचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात एकूण १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आली आहे. विधान सभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. राज्यात एकूण ९०२६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले. १८८ ठिकाणी ऑडिट झाले नाही.राज्यात १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहे, याप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहे. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एकूणच अनधिकृत होर्डिंग्ज बाबत दरवर्षी राज्यात ऑडिट केले जाणार असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. यावर्षीचे होर्डींग्जचे ऑडिट अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर सुरू केले जाईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी सभागृहाला दिली.

महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचे दर सर्वात कमी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत दावा

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी HSRP नंबरप्लेटसाठी महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत तिप्पट दर आकारण्यात येत असल्याची विरोधकांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली. विरोधक या प्रकरणी जनतेची दिशाभूल करत असून, राज्यात हे दर इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी आहेत असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी इतर राज्यामध्ये या नंबरप्लेटसाठी आकारण्यात येणाऱ्या पैशांची आकडेवारीही सादर केली.देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले की, विरोधकांनी सरकारवर टीका करताना गुजरातची प्रशंसा करणे सोडून द्यावे. त्यांनी सरकारला उद्योगांना पुरक असणारी टीका करावी. आपल्या राज्याच्या अचिव्हमेंटचा स्वाभिमान हा सर्वांमध्ये दिसला पाहिजे अशी माझी विनंती आहे. ते म्हणाले, विरोधक एचएसआरपी नंबरप्लेटचे दर महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा नरेटिव्ह पसरवत आहेत.

खरे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार आपल्याला हे यापूर्वीच करायचे होते. पण शेवटी कंटेम्प्ट झाला आणि त्यानंतर आपण हे केले. या प्रकरणी आपण मुख्य सचिवांच्या नेतृत्वात एक हायपॉवर समिती तयार केली होती. त्यात काही सचिवही होते. या सर्वांनी मिळून जे काही रेट आले होते, त्यात निगोशिएट तथा इतर राज्यांच्या रेटशी तुलना करून आपले रेट फायनल केले.

यासंबंधी आपण पाहिले तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस व प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवलेत. पण महाराष्ट्रात आपण हे सर्व एकत्रित दाखवले आहे. त्यानुसार दुचाकीच्या नंबरप्लेटसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये 420 पासून 480 रुपयांचे शुल्क आहे. पण महाराष्ट्रात ते केवळ 450 एवढे आहे. तीनचाकींसाठी इतर राज्यांत 450 ते 550 रुपये शुल्क द्यावे लागते. पण महाराष्ट्रात ते केवळ 500 रुपये आहे. इतर राज्यांत चारचाकीच्या नंबरप्लेटसाठी 800 रुपये मोजावे लागता. पण आपल्याकडे हे दर 745 रुपये आहेत. जड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी इतर राज्यांत 690 ते 800 रुपये दर आहे. पण आपल्याकडे तो केवळ 745 एवढा आहे, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी मुद्दाम काही राज्यांच्या पावत्या आणल्या आहेत. त्यानुसार गोव्यामध्ये मूळ किंमत 315 रुपये, फिटमेंट चार्जेस 100 रुपये, कन्व्हेएन्स फी 50 रुपये व जीएसटी 83 रुपये असे एकूण 548 रुपये मोजावे लागतात. चंदीगडमध्येही मूळ किंमत 315 व इतर चार्जेस धरून 549 रुपये होतात. पण महाराष्ट्राचे एकूण चार्जेस 531 रुपये होतात. त्यामुळे महाराष्ट्रात जास्त दर आकारण्यात आल्याची टीका व्यर्थ आहे.

या प्रकरणी एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवले. त्यात त्यांनी 1200 ते 1300 रुपये दर असल्याचे दाखवले. पण संबंधितांवर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट नसल्याचे निष्पन्न झाले. सदर व्यक्ती एचएसआरपीचा डिलरही नव्हता. तो जुनी नंबरप्लेट विकणारा होता. त्यानंतर आम्ही संबंधित वाहिनीला चारवेळा हे सत्य दाखवण्याची विनंती केली. पण त्यांनी ते दाखवले नाही, असे फडणवीस म्हणाले.

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, आर्थिक संकटात वाढ; लाडक्या बहिणींवर 17,505 कोटींचा खर्च

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शुक्रवारी विधिमंडळाच्या पटलावर आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यात राज्याचा विकासदार व महत्त्वाच्या योजनांची महत्त्वपूर्ण आकडेवारी मांडण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यापुढील आर्थिक संकट वाढले असून, खर्च हा महसुली उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. कर्ज व व्याजापोटी एक मोठी रक्कम खर्च होत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेंतर्गत जून 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्यातील 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहितीही या अहवालाद्वारे देण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.त्यानुसार, त्यात 2024-25 साठी वित्तीय तूट 2.4 टक्के तर महसुली तूट 0.4 टक्के इतकी अंदाजित करण्यात आली आहे. तर भांडवली उत्पन्नाचा वाटा 24.1 टक्के तर भांडवली खर्चाचा हिस्सा 22.4 टक्के इतका आहे. महसुली जमा 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये अपेक्षित तर महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी अपेक्षित आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, राज्याचे 2024-25 चे स्थूल उत्पन्न 45 लाख 31 हजार 518 कोटी इतके आहे. स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी 17.3 टक्के रक्कम खर्च होत आहे. महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर 7.3 टक्के राहील. कृषी क्षेत्राचा विकास 8.7 टक्के, उद्योग क्षेत्राचा विकास 4.9 टक्के तर सेवा क्षेत्राचा विकास 7.8 टक्के असणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. प्रस्तुत अहवालानुसार, महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 पर्यंत 1884 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. 2024-25 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 3.97 कोटी शिवभोजन थाळींचा लाभ लोकांनी घेतला आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ठळक मुद्दे

१. राज्याचा अर्थव्यवस्था आणि उत्पन्न

२०२४-२५ साठी नाममात्र GSDP (सध्याच्या किंमतीत) ₹४५.३१ लाख कोटी तर स्थिर किंमतीत ₹२६.१२ लाख कोटी असण्याचा अंदाज.
२०२३-२४ मध्ये महाराष्ट्राचा नाममात्र GSDP ₹४०.५५ लाख कोटी होता, तर २०२२-२३ मध्ये तो ₹३६.४१ लाख कोटी होता.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय GDP मधील वाटा १३.५% असून, हा सर्वाधिक आहे.
२०२४-२५ मध्ये प्रति व्यक्ति उत्पन्न ₹३,०९,३४० पर्यंत पोहोचणार, जो २०२३-२४ मध्ये ₹२,७८,६८१ होता.
२. महागाई आणि उपभोग्यता निर्देशांक (CPI)

एप्रिल-डिसेंबर २०२४ मध्ये राज्यातील सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) ग्रामीण भागात ३९४.१ आणि शहरी भागात ३७१.१ होता.
ग्रामीण भागातील महागाई दर ६%, तर शहरी भागात ४.५% नोंदवला गेला.
३. अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण प्रणाली

डिसेंबर २०२४ पर्यंत राज्यात २६५.२० लाख रेशन कार्ड धारक (यलो – ५८.९ लाख, सफरचंद – १८४.२४ लाख, पांढरे – २२.०७ लाख).
५२,८१३ रास्तभाव दुकाने ePoS मशीनद्वारे जोडली गेली असून, डिसेंबर २०२४ मध्ये १.५१ कोटी कुटुंबांनी आधार प्रमाणीकरणाद्वारे रेशन घेतले.
एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेत महाराष्ट्रातील १.०५ लाख रेशन कार्डधारकांनी इतर राज्यांतून अन्नधान्य घेतले, तर इतर राज्यांतील ११.९३ लाख लाभार्थ्यांनी महाराष्ट्रातून अन्नधान्य उचलले.
४. राज्याचा महसूल आणि खर्च

२०२४-२५ मध्ये राज्याचा अपेक्षित महसूल ₹४,९९,४६३ कोटी असून, यापैकी कर महसूल ₹४,१९,९७२ कोटी आणि बिगर-कर महसूल ₹७९,४९१ कोटी राहण्याचा अंदाज.
२०२४-२५ मध्ये महसुली खर्च ₹५,१९,५१४ कोटी राहणार, जो २०२३-२४ मधील ₹५,०५,६४७ कोटींपेक्षा अधिक आहे.
राज्याचे वार्षिक नियोजन २०२४-२५ साठी ₹१,९२,००० कोटी तर जिल्हास्तरीय योजना ₹२३,५२८ कोटी असेल.
५. शेती आणि सिंचन

२०२४-२५ च्या खरीप हंगामात १५७.५९ लाख हेक्टरवर पेरणी, तृणधान्य उत्पादन ४९.२%, कडधान्य ४८.१%, तेलबिया २६.९% वाढली, मात्र ऊस उत्पादन ६.६% घटले.
२०२४-२५ च्या रब्बी हंगामात ६२.८१ लाख हेक्टरवर पेरणी, तृणधान्य २३%, कडधान्य २५% वाढली, मात्र तेलबिया उत्पादन २२.७% घटले.
२०२३-२४ मध्ये बागायती क्षेत्र २१.७४ लाख हेक्टर, उत्पादन ३२६.८८ लाख टन.
महानदी प्रकल्पांतर्गत ५६.३३ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र ३९.२७ लाख हेक्टर.

६. ऊर्जा आणि पायाभूत सुविधा

२०२४ मध्ये राज्याची वीज निर्मिती क्षमता ३८,६०१ मेगावॅट, यातील ५२.८% थर्मल, ३२% नवीकरणीय ऊर्जा.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा काही भाग सुरु झाला.
‘महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण २०२४’ आणि ‘महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४’ लागू.

७. शिक्षण आणि आरोग्य

१०४,४९९ प्राथमिक शाळा आणि २८,९८६ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत २.३८ कोटी महिलांना ₹१७,५०५ कोटींची मदत वितरित.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत २९ शहरे ODF, ८९ ODF+, २६४ ODF++ घोषित.

८. उद्योग आणि गुंतवणूक

महाराष्ट्राने FDI मध्ये ३१% वाटा राखत भारतात अव्वल स्थान मिळवले.
४६.७४ लाख MSME उद्योग नोंदणीकृत, यामुळे २.०१ कोटी रोजगार निर्मिती.

९) पर्यटन आणि वाहतूक

२०२२ मध्ये महाराष्ट्रात १११३ लाख देशांतर्गत आणि १५.१ लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक.
मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्प वेगाने सुरु.

१०. जलसंधारण आणि पर्यावरण

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ८८% घरांना नळजोडणी.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ९९.३% घनकचरा संकलन, ८८% कचरा प्रक्रिया.
निष्कर्ष:
महाराष्ट्र राज्याने २०२४-२५ मध्ये आर्थिक प्रगती, शेती सुधारणा, ऊर्जा क्षमता, वाहतूक सुधारणा, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाच्या दिशेने भरीव कामगिरी केली आहे. राज्याचा GSDP वाढ, प्रति व्यक्ति उत्पन्न वृद्धी, औद्योगिक गुंतवणूक आणि नागरी विकासाचे दर वाढत आहेत, हे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संकेत आहेत.

अभिनेत्री प्रणाली घोगरे चे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार “चल भावा सिटीत” शो मध्ये

अभिनेत्री प्रणाली घोगरे ही हिंदी, साउथ, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट मालिका आणि अल्बम सॉंग्स मध्ये दिसली आहे. मेरे रंग में रंगने वाली, चंद्रगुप्त मौर्य, राजा बेटा यांसारख्या हिंदी मालिकांमधून ती घरोघरी पोहोचली, यानंतर तिने रणांगण (मराठी), मंचूकुरुसेविलालो (तेलुगु), फस्ते फसाते (हिंदी), अरियावान (तमिळ), द केरला स्टोरीज (हिंदी) अशा विविध चित्रपटांमधून भूमिका केल्या असून हनुमान या वेब सिरीज मधील तिने साकारलेल्या मीना या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर तर्फे उत्कृष्ट अभिनेत्री साठी नामांकन मिळाले होते. नुकताच तिचा रांझा तेरा हिरीये हा हिंदी अल्बम प्रदर्शित झाला त्याला अल्पावधीतच एक मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिले, यानंतर तिचे चाहते तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लवकरच ती झी मराठीवरील चल भावा सिटीत या शोमध्ये सहभागी होणार असून या शोचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे, या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमी असणाऱ्या स्पर्धकांना एकत्र आणून प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दाखवली जाईल.

एम. जे. प्रदीप चंद्रन यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

पुणे- मुंबई येथील उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्तपदी कार्यरत असणारे एम. जे. प्रदीप चंद्रन यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदीप चंद्रन हे २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते उद्योग संचालनालयात कार्यरत होते. त्यापूर्वी ते अमरावती येथे आदिवासी विभाग विभागाचे अतिरिक्त आयुक्त, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वस्त्रउद्योग विभागाचे आयुक्त, गौन खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद गेल्या अकरा महिन्यापासून रिक्त होते. याठिकाणी अखेर राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे

पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ च्या बॅचचे डॉ. कुणाल खेमणार, रवींद्र बिनवडे या दोघांनी अतिरिक्त आयुक्तपदी काम केले आहे. त्यानंतर आता प्रदीप चंद्रन हे देखील त्यांच्याच बॅचचे आहेत.पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या तीन जागा आहेत, त्याठिकाणी खेमणार, बिनवडे आणि विकास ढाकणे हे तिघे कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण दोन जागा रिक्त असूनही मार्च २०२४ पासून तेथे कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती होत नव्हती. आता रिक्त असलेल्या एका जागेवर प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दीपक मानकरांना मिळणार विधानपरिषदेवर संधी …

पुणे-(Legislative Council Elections)राज्यात विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यात. ही निवडणूक विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भाजप तीन, शिवसेना एक आणि अजित पवार राष्ट्रवादी एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

पुण्यातील दोन नेते सुद्धा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार आहेत .अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावा केला आहे . मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सुद्धा मानकर यांनी संधी मिळावी, म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली होती. त्यांची संधी डावलल्यानंतर मानकरांनी थेट राजीनामा दिला होता. परंतु त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी मानकरांची समजूत काढली होती. त्यामुळे यावेळी मानकरांना संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना सु्द्धा विधान परिषदेची उमेदवारी मिळणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातेय. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी दिली जाण्याचा दाट अंदाज आहे. त्यामुळे आता पुण्याला दोन आमदार मिळणार काय ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.दीपक मानकर म्हणाले की, मी विधान परिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केलाय. अजित पवार हे योग्य निर्णय घेतील. काम करणाऱ्या माणसाच्या पक्ष हा उभा असतो. अजित पवार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असतो. त्यांनी संधी दिली नाही तरी मी अजित पवारांसोबतच राहणार, असं देखील दीपक मानकर यांनी स्पष्ट केलंय.

राहुल गांधी धारावीतील दलित, ओबीसींना भेटले:उद्धव ठाकरे, शरद पवारांना टाळले

मुंबई -काल राहुल गांधी गुरुवारी मुंबईच्या धावत्या दौऱ्यावर आले. त्यांनी या दौऱ्यात धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत जाऊन त्यांनी तेथील कामगार वर्ग विशेषत: दलित आणि ओबीसी समाजातील लोकांची भेट घेतली. मात्र, मुंबईत येऊनही राहुल यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणे टाळले. यातून त्यांनी मुंबई मनपा स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचे म्हटले जात आहे.धारावीतील ‘चामर स्टुडिओ’ला भेट देऊन राहुल यांनी मुंबई काँग्रेसची पुढील राजकीय रणनीती काय असणार आहे हे स्पष्ट केले आहे. धारावीत लहान-मोठी कामे करणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन याच परिसरातच व्हावे अशी काँग्रेसची मागणी आहे. पुनर्वसनाचे कंत्राट अदानी समूहाला ज्या पद्धतीने देण्यात आले त्याचाही काँग्रेस विरोध करत आहे. शरद पवार अदानींचे समर्थन करतात. तर दिल्ली विधानसभेनंतर उद्धव ठाकरे आणि राहुल यांच्यात दुरावा वाढला आहे. म्हणूनच त्यांनी पवार, ठाकरेंना भेटणे टाळले. विशेष म्हणजे, राहुल गुरुवारी रात्री ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यापासून काही अंतरावर असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबले होते.राहुल गांधी बहुचर्चित चामर स्टुडिओत शिलाई मशीनवर बसले. त्यांनी सुईत धागा ओवून पाहिला. लोकांशी बोलताना ते म्हणाले की, ही धारावी तुमची आहे. तुमचीच राहिली पाहिजे. तुमच्याकडे कौशल्य आहे. तुम्हाला केवळ थोडेसे साहाय्य हवे आहे. तुमच्यासाठी बँकांचे दरवाजे उघडले गेले पाहिजेत. धारावी हेच खरं मेक इन इंडिया आहे. दलाल नव्हे तर तुम्हीच राष्ट्र घडवता, असेही त्यांनी सांगितले.

भारतात सर्व्हर उत्पादनासाठी कल्याणी पॉवरट्रेनची तैवानच्या कॉमपल इलेक्ट्रॉनिक्स सोबत भागीदारी

पुणे, 06 मार्च 2025: भारत फोर्जची पूर्ण मालकीची उपकंपनी कल्याणी पॉवरट्रेनने COMPAL ELECTRONICS, INC सोबत भारतात X86 प्लॅटफॉर्म सर्व्हर उत्पादनासाठी कॉमपल इलेक्ट्रॉनिक्स, इंक सोबत तंत्रज्ञान परवाना करार (Technology Licensing Agreement) केला आहे. दोन्ही पक्षांनी भारतात स्थानिक पातळीवर उत्पादन सुविधांचा उपयोग करून सर्व्हर व्यवसाय विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (MOU) केला असून तो भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगत आहे. कॉमपल कडून KPTL ला सर्व्हरशी संबंधित तांत्रिक मदत पुरवली जाईल. त्यामध्ये स्थानिक उत्पादन, असेंब्ली, चाचणी प्रक्रिया आणि अंतिम विक्रीच्या देखरेखीचा समावेश असेल.

भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (Jt MD) श्री. अमित कल्याणी म्हणाले: “भारतामध्ये सर्व्हर उत्पादनासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कॉमपल कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या सहकार्यामुळे भारताच्या उत्पादनक्षमता वाढीस चालना मिळेल. या प्रस्तावित सहयोगाबाबत त्यांनी कल्याणी ग्रुपवर दाखवलेल्या विश्वासाने आम्ही आनंदी आणि प्रेरित झालो आहोत.”

कॉमपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी बोनाडेरो म्हणाले, “कल्याणी पॉवरट्रेन सोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कॉमपल सक्रियपणे सर्व्हर व्यवसायाचा विस्तार करत असून अनेक भागीदारी प्रस्थापित करत आहे. कल्याणी पॉवरट्रेनचा भारतीय बाजारपेठेतील व्यापक अनुभव आमच्या सहकार्याला अधिक गतिमान आणि प्रभावी बनवेल. आम्ही याला सुरुवात मानतो आणि भविष्यात एकत्रितपणे मोठे मूल्य निर्माण करता येतील अशा आणखी ICT संबंधित व्यवसाय संधी निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”

जोडीला, कल्याणी पॉवरट्रेनच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्रातील पुणे  येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्रातून ‘मेड इन इंडिया’ सर्व्हर सादर करण्याची घोषणा केली.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये नमूद केले की, “हा कारखाना स्थानिक व्यवसायांना चालना देईल, गुंतवणूक आकर्षित करेल आणि या प्रदेशाच्या उत्पादनक्षमता वाढीस महत्त्वपूर्ण योगदान देईल.”

भारताच्या AI, क्लाऊड आणि डेटा सेंटर इकोसिस्टमचा विकास

स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देऊन आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करत हा सहयोग भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सहकार्यातून उद्योग, क्लाऊड सेवा पुरवठादार, हायपरस्केलर्स आणि सरकारी संस्थांना उच्च-कार्यक्षमता, AI वर्कलोड्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि मोठ्या प्रमाणातील डेटा प्रक्रिया करण्यासाठी किफायतशीर सर्व्हर सोल्यूशन्सने सक्षम होतील.

ससुन रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत  – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती

पुणे : ससून सर्वोपचार  शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे  ही रिक्त आहेत. तसेच 156 नसिंगची पद रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची 50 टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती  टीसीएस  द्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेकवेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हलचाली केल्या जातील, तसेच वर्ग एक ची 44 आणि वर्ग दोन ची 110 रिक्त पदे तत्काळ भरली जातील अशी माहिती  वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 दरम्यान आज विधानसभेत आमदार सिद्धार्थ शिरोळे,आमदार भीमराव तापाकिर , आमदार हेमंत रासने, आमदार शरद सोनवणे, आणि आमदार विक्रम पाचपुते, सुनील कांबळे यांनी ससून सर्वोपचार  शासकीय रुग्णालया संबंधीत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे, पिंपरी-चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असतात. वर्षाला साडे पाच लाख बाह्यरुग्ण येथे येतात. तर पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे अॅडमिट असतात. येथे 155 खाटांचा आय सी यु  आहे. मात्र क्षमते पेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकाचा भार पडत आहे.

पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे. त्यासाठी एम एस आर डी सी   कडे जागेची मागणी देखील करण्यात आली आहे. ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली.

12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी

ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच  12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी येथे करण्यात आली आहे. तसेच उपकरणांची देखील खरेदी करण्यात आली. तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे.

कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीरांना बीओआय रक्षक सॅलरी पॅकेज देण्यासाठी बँक ऑफ इंडियाने भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार केला

मुंबई, 6 मार्च 2025: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या लष्करी कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीरांना बीओआय रक्षक वेतन पॅकेज देण्यासाठी भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याची घोषणा केली. या सामंजस्य करारात वाढीव मोफत व्यापक वैयक्तिक अपघात विमा कव्हर (पीएआय), डेबिट आणि क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर आणि इतर अनेक ऑफर्ससह विशेष फायद्यांचा समावेश आहे.

4 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयात सामंजस्य करारांच्या देवाणघेवाणीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारतीय लष्कराचे महासंचालक (एमपी आणि पीएस) लेफ्टनंट जनरल राजीव पुरी हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला मेजर जनरल व्ही.के.  पुरोहित, एडीजी पीएस, बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री.सुब्रत कुमार आणि दोन्ही संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय सैन्याला सेवा दिल्याबद्दल लेफ्टनंट जनरल राजीव पुरी यांनी बँक ऑफ इंडियाचे आभार मानले. लष्कराचे प्राबल्य असलेल्या भागात बँकेच्या काही संरक्षण अनुकूल शाखा सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.

बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. सुब्रत कुमार म्हणाले, “भारतीय सैन्याशी जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या रक्षक वेतन योजनेचे फायदे वाढवताना आम्हाला आनंद होत आहे. अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे त्यांनी सर्वोत्तम बँकिंग उत्पादने आणि ग्राहक सेवा देण्याची खात्री देतो.” लष्कराच्या निवृत्तीवेतनधारकांनी बीओआय डोअर स्टेप बँकिंगचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. बँक ऑफ इंडियाच्या वतीने त्यांनी भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बीओआयची रक्षक वेतन योजना ही संरक्षण दल, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास तयार केलेली वेतन योजना आहे. ती 100 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैयक्तिक अपघाती विमा कव्हर, 200 लाख रुपयांचे मोफत हवाई अपघाती विमा कव्हर, तसेच लागू अटी आणि शर्तींसह इतर अनेक विशेषाधिकार आणि सवलती देते.

१० मार्च पासून ऊस तोडणी मशीन मालक करणार बेमुदत आंदोलनसाखर आयुक्तांना दिले निवेदन

 पुणे, ६ मार्च : ऊस तोडणी मशीनचा तोडणीदर ५० टक्यांनी वाढवून देणे, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत ३ वर्ष मुदत वाढ मिळावी आणि पाचट कपात १.५ टक्के असावी. या सारख्या अनेक महत्वपूर्ण मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे वसंतराव जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना दिले. या मागण्यांसाठी राज्यातील १३०० मशीन मालक १० मार्च पासून साखर संकुल समोर बेमुदत आंदोलनास बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सुद्धा देण्यात येणार आहे.
साखर आयुक्तांना निवेदन देतांना संघटनेचे अभय कोल्हे, राजाभाऊ लोमटे, धनंजय काळे, गणेश यादव, निलेश बागटे, कलीम शेख, शरद चव्हाण, राहुल इथापे आणि रजत नलावडे उपस्थित होते.
 महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटना, सातारा यांच्या वतीने ऊस मशीनचे तोडणीदार/वाहातूकदार वाढविणेबाबतची मागणी सुद्धा केली आहे. कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन पर योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास १३०० मशिन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळाले आहे. त्यातच २०१९ पासून जवळपास ९०० मशिनला अनुदान मिळालेले नाही. यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले पण त्यांना न्याय मिळाला नाही.
डिझेल वृद्धिमुळे एक टन ऊस तोडणीसाठी मशीनला जवळपास ३ लीटर डिझेल लागत असून २६० ते २८० रू. खर्च येतो. मशिन चालविण्यासाठी ऑपरेटर/इनफिल्डर ड्रायव्हर यांचे पगार, टनानूसार ऑपरेटिंग खर्च ८० रूपये येतो. दुरूस्ती, ग्रीस व स्पेअर पार्टससाठी प्रति टनानूसार १०० रूपये खर्च येतो. म्हणजेच एक टन ऊस तोडणीसाठी ४६० रूपये खर्च येतो. इकडे कारखाने आम्हाला ४५० ते ५०० रूपये देतात. आम्हाला आवक कमी असून बँकेचे हप्ते भरणे ही अवघड झाले आहे.
आयुक्तांच्या जी.आर नुसार ४.५ टक्के पाचट कपात ही शेतकर्‍यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एकूण १३.५ टक्के केली जात आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

एयर इंडियातर्फे इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी ‘झिपअहेड’ प्रायोरिटी चेक- इन आणि बॅगेज हँडलिंग सेवा

·         प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज हँडलिंगसाठी सशुल्क सेवा

·         सहा भारतीय विमानतळांवर डिर्पाचरसाठी नाममात्र शुल्कासह ही सेवा उपलब्ध

गुरुग्राम६ मार्च २०२५ – एयर इंडियाने आज ‘झिपअहेड’ ही सशुल्क सेवा लाँच केली असून त्याअंतर्गत भारतात प्रवास करणाऱ्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज सेवेचा लाभ घेता येईल.

एरवी अशाप्रकारची सुविधा उपलब्ध नसलेल्या, परंतु घाई असलेल्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना प्रायोरिटी सेवेचा लाभ घेऊन आपला वेळ वाचवता येण्यासाठी ही सेवा लाँच करण्यात आली आहे. प्रवाशांना ऑन- ग्राउंड टचपॉइंट्सद्वारे ही सेवा घेऊन विमानतळावर चिंतामुक्त राहाता येईल.

‘झिपअहेड’ सेवेचा लाभ घेणाऱ्या एयर इंडियाच्या प्रवाशांना एयरलाइनच्या प्रीमियम इकॉनॉमी चेक- इन काउंटर्सवर चेक इन करता येईल तसेच बॅगेज हँडलिंग सेवेचा वापर करता येईल. सध्या ही सेवा सहा भारतीय विमानतळावर डिपार्चरसाठी उपलब्ध असून त्यात दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता यांचा समावेश आहे. नाममात्र शुल्क भरून ही सेवा घेता येणार आहे.

·         रुपये ४९९ : डिपार्चरआधी सहा तास खरेदी केल्यास

·         रूपये ६९९ : डिपार्चरपासून सहा तासांच्या आत खरेदी केल्यास

‘झिपअहेड’ सेवा खरेदीसाठी एयर इंडियाची वेबसाइट, मोबाइल अप, एयरपोर्ट टिकिटिंग ऑफिस (एटीओ) यावर डिपार्चरआधी ७५ मिनिटे उपलब्ध असेल.

एयर इंडियाच्या महाराजा क्लब लॉयल्टी प्रोग्रॅमचे प्लॅटिनम आणि गोल्ड सदस्य असलेल्यांना त्यांच्या भाडेशुल्काचा प्रकार किंवा प्रवासाचा क्लास कोणताही असला, तरी या प्रायोरिटी सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे.

‘झिपअहेड’ विषयी अधिक माहिती www.airindia.com वर देण्यात आली आहे.