Home Blog Page 422

महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा डाव:नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?,नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक, मंत्रीच चुकीची व खोटी माहिती पसरवतो.

मुंबई, दि. १२ मार्च २५
महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याचाच भाग म्हणून नितेश राणेंना पुढे करून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव असून तो जनतेने ओळखावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

राज्याचे मत्स्यपालन व बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज प्रक्षोभक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत, त्याचा समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा मंत्री मटन कोणाकडून घ्यायचे व कोणाकडून घ्यायचे नाही हे जाहीरपणे सांगत आहे. कोणी काय खावे व कोणाकडून काय विकत घ्यावे हे सांगण्याचा अधिकार ह्या मंत्र्याला कोणी दिला. हलाल, झटका, किंवा आणखी काय हे जनतेला ठरवण्याचा अधिकार आहे, हे मंत्र्यांचे काम नाही. नितेश राणे यांचा कोणताही अभ्यास नाही, कोणताही विचार नाही, केवळ माझा बॉस सागर बंगल्यावर आहे व माझे कोणी काही करू शकत नाही अशी जाहीर विधाने करून समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. याआधीही नितेश राणेंच्या गुंडांनी कणकवली मध्ये शेख अशरफ या तरुणाला “जय श्रीराम बोल” म्हणत मारहाण केली, याप्रकरणी कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश देऊनही कारवाई केली जात नाही. नितेश राणे उघडपणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून दंगली भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस विभाग काय झोपा काढत आहे का? असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लीम नव्हता असे विधान करून या नितेश राणेंनी आपल्या अकलेच तारे तोडले आहेत. या महाशयाचे विधाने पाहता त्यांना कशाचाही अभ्यास नाही, इतिहासाचा तर अजिबात गंध नाही, असे स्पष्ट दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सरनोबत नूरखान बेग तर तोफखाना प्रमुख इब्राहीम खान होता, महाराजांचा अंगरक्षक इब्राहीम सिद्दी तर वकील काझी हैदर होता. अफजल खान भेटीच्यावेळी १० अंगरक्षकांमध्ये हा इब्राहिम सिद्दी होता. तर महाराज आग्र्याच्या कैदेत असताना हिरोजी फर्जत बरोबर मदारी मेहतर ह्या मुस्लीम सेवकाने महत्वाची जबाबदारी पार पाडली होती, यांच्यासह असंख्य मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यदलात होते पण ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि गरळच ओकायची ठरवले असेल तर त्यांच्यावर जालीम इलाज केला पाहिजे. बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज संविधान आणि कायद्याला पायदळी तुडवून सातत्याने प्रक्षोभक, भडकाऊ व हिंदू मुस्लीम अशी गरळ ओकत आहेत, त्याला मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे का? आणि नसेल तर राणेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

शिवरायांच्या सैन्यात मुसलमान नव्हतेच:नीतेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – औरंग्याची निशाणी नष्ट केली, आता कबरही उखडून काढू

मुंबई-आमच्यातील काही कारटे सांगतात की शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम होते, कोण मुसलमान शिवरायांच्या सैन्यात नव्हते. ही लोकं उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू-विरुद्ध मुसलमान होती, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या नावापुढे जी हिंदू अडनावे दिसत आहे, ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे दिसत आहे. नाही तर आपल्या नावापुढे वेगळीच अडनावे दिसली असती. कुणी शेख असता तर कुणी खान असता. हिंदवी स्वराज्यांची लढाई ही इस्लामी करणाच्या विरोधातच झाली आह

नीतेश राणे म्हणाले की, औरंगजेबची कबर उखडून काढू. सरकारने काढली नाही, तर आम्ही काढू. कबर काढण्यासाठी लाँग मार्च काढू. आम्ही हिंदू म्हणून व्यासपीठावर एकत्र आहोत. कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने संभाजी महाराज धर्मरक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री नीतेश राणे बोलत होते.

नीतेश राणे म्हणाले की, आपल्या नावापुढे जी हिंदू अडनावे दिसत आहे, ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे दिसत आहे. नाही तर आपल्या नावापुढे वेगळीच अडनावे दिसली असती. कुणी शेख असता तर कुणी खान असता. हिंदवी स्वराज्यांची लढाई ही इस्लामी करणाच्या विरोधातच झाली आहे. मुघलांनी जे इस्लामिक आक्रमन सुरू केले होते, त्या कारट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमची हिंदू मंदिरे तोडली. हिंदू माता-भगिणीचा छळ सुरू करत धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. आमचा धर्म संपवण्याची शपथ त्याने घेतली होती. त्या औरंग्याला थांबवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे.

नीतेश राणे म्हणाले की, आमच्यातील काही कारटे सांगतात की शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम होते, कोण मुसलमान शिवरायांच्या सैन्यात नव्हते. ही लोकं उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू-विरुद्ध मुसलमान होती. औरंग्याची निशाणी नष्ट केली आहे, आता कबरही उखडून काढू. तर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे असे स्मारक उभारू की, जगभरातील सर्वजण या ठिकाणी येऊन नतमस्तक होतील, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी तारीख किंवा वेळ घोषित केली जाणार नाही, लॉंग मार्च काढू. आपल्या नावापुढे जी हिंदू नावे दिसत आहे ही फक्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळेच लागली आहेत.

एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याची मुजोरी,मराठी येत नाही आणि बोलणारही नाही:मराठी आली पाहिजे हे कुठे लिहिलंय?

मुंबई-मुंबईतील एअरटेलच्या एका कार्यालयातील हिंदी भाषिक महिला कर्मचाऱ्याने मराठीच्या मुद्यावरून मराठी तरुणाशी हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सदर कर्मचारी मराठी का आली पाहिजे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असे कुठे लिहिले आहे का? असे विविध प्रश्न विचारत मला मराठी येत नाही व मी बोलणारही नाही अशी उद्दाम भाषा वापरताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी एअरटेलला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

गत काही महिन्यांपासून परप्रांतीयाच्या मुजोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एअरटेलच्या कार्यालयातील ही घटना समोर आली आहे. सदर व्हिडिओत मराठी तरुण एअरटेलच्या गॅलरीत उभा असल्याचे दिसत आहे. तो आपल्या व्हिडिओ म्हणतो, मी मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो आहे. पण माझी तक्रार सोडवली जात नाही. येथील कर्मचारी मराठीत संवाद साधण्यासही नकार देत आहेत. माझ्याशी ते उद्धटपणे बोलत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, महिला कर्मचारी सदर तरुणाशी हिंदीतून मोठ्या आवाजात बोलत आहे.

यावेळी मराठी तरुण तिला हळू आवाजात नीट बोलून आपली समस्या सोडवण्याचा आग्रह धरतो. पण ती उडवाउडवीची उत्तरे देते. ती आपल्या वरिष्ठांना सांगते की, ही व्यक्ती मला महाराष्ट्रात आहात तर मराठीत बोलले पाहिजे असे सांगत आहे. महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी आली पाहिजे, असे कुठे लिहिले आहे. मला मराठी समजत नाही. त्यामुळे मी हिंदीतच बोलेन. आपण हिंदुस्तानात राहतो. त्यामुळे कुणी कोणतीही भाषा बोलू शकतो. या प्रकरणी मराठी महत्त्वाची आहे असे मला वाटत नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?:अदिती तटकरे म्हणाल्या – फडणवीस, पवार अन् शिंदे निर्णय घेतील; विरोधकांचा सभात्याग

आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहेवरुण सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर देताना अदिती तटकरे म्हणाल्या, ऑक्टोबर 2024 मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटी 33 लाख 64 हजार लाभार्थी महिला होत्या. फेब्रुवारीत आपण हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा 2 कोटी 47 लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.

मुंबई- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 करण्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही. यावरून आज सभागृहात विरोधकांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न विचारले. त्यासंदर्भात अदिती तटकरे विधानसभेत निवेदन केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्या म्हणाल्या.

परंतु अदिती तटकरेंनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? हे आधी सांगा, अशी भूमिका घेत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, केवळ मतांसाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच, लाडक्या बहिणींना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? या प्रश्नावरून आज सभागृहात गोंधळ झाला. विरोधकांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारले. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अदिती तटकरेंची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? या प्रश्नासाठी त्यांनी अखेर फडणवीस, अजित पवार आणि शिंदे यांच्याकडे बोट दाखवून तूर्तास वेळ मारून नेली. अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केलाआज विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आले होते की 1500 हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना 1000 रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान 1500 रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून 1000 रुपये तर वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले नाही. 20 ते 25 लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या योजनेसंदर्भात तीन प्रश्न विचारले. निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते? निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केले गेले? आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना 2100 रुपये देणार आहात की नाहीत? असे प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केले. याला महिला व बालकल्याण मंत्री आदिती यांनी सविस्तर उत्तर दिले.

2100 रुपयांसंदर्भात CM व दोन्ही DCM निर्णय घेतील-दरम्यान, यावेळी आदिती तटकरेंनी यावेळी सन्माननिधीचा हप्ता 2100 रुपये होण्यासंदर्भात उत्तर दिले. महायुती सरकारने ही योजना आणली आहे. महिलांना 1500 रुपयांचा लाभ देणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. 2100 रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील. पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, असे आदिती तटकरे म्हणाल्या.

ट्रान्सयुनियन सिबिल आणि फेस यांचे  ग्राहक शिक्षण उपक्रम सुरू करण्यासाठी सहकार्य 

या सहकार्याचे उद्दिष्ट आर्थिक साक्षरता वाढवणे आणि विविध माध्यमांवर कस्टमाइज्ड कंटेंटद्वारे ग्राहकांना कर्जाची सहज उपलब्धता करणे हे आहे

मुंबई, 12 मार्च 2025: ट्रान्सयुनियन सिबिल आणि फिनटेक असोसिएशन फॉर कंझ्युमर एम्पॉवरमेंट (FACE) हे भारतात आर्थिक साक्षरता आणि क्रेडिट जागरूकता वाढवण्यासाठी एकत्र येत आहेत. सिबिल जागरण नावाचा हा उपक्रम क्रेडिट शिक्षण सुधारण्याचा आणि फिनटेक सोल्यूशन्सद्वारे ग्राहकांना क्रेडिटची सहज उपलब्धता सुलभ करण्याचा प्रयत्न करतो.

या करारांतर्गत, ट्रान्सयुनियन सिबिल ज्ञान आणि कौशल्य प्रदान करेल, सह-ब्रँडेड आणि कस्टमाइज्ड शैक्षणिक सामग्री विकसित करेल. फिनटेक क्षेत्रातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त स्व-नियामक संघटना (SRO) FACE, ग्राहकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि क्रेडिट जागरूकता वाढवण्यासाठी 165 हून अधिक फिनटेक सदस्यांच्या नेटवर्कसह काम करेल.

ट्रान्सयुनियन सीबीआयएलचे माहिती भांडार, डेटा क्षमता आणि विश्लेषणात्मक अंतर्दृष्टी आर्थिक साक्षरतेबद्दल संबंधित सामग्री देण्यासाठी चांगली स्थिती निर्माण करते. या सामग्रीमध्ये ईमेल, लेख, व्हिडिओ, वेबिनार आणि पॉडकास्टचा समावेश असेल, आणि ते FACE द्वारे प्रसारित केले जातील. या मोहिमेचा विस्तार आणि प्रभाव जास्तीत जास्त वाढवण्यासाठी FACE स्वतःचे आणि त्याच्या सदस्यांच्या डिजिटल चॅनेलचा वापर करेल.

FACE सोबतच्या भागीदारीची घोषणा करताना, ट्रान्सयुनियन CIBIL चे MD आणि CEO भावेश जैन म्हणाले: “ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आर्थिक उत्पादनांचा ऍक्सेस मिळाला आहे. त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी या उत्पादनांचा वापर कसा करायचा याची त्यांना समज नसण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२४ मध्ये फिनटेकच्या 28% ग्राहक न्यू-टू-क्रेडिट (NTC) 1 होते हे लक्षात घेता, ग्राहकांना त्यांचे क्रेडिट सकारात्मक पद्धतीने व्यवस्थापित करायचे असेल तर फिनटेकसाठी ग्राहक साक्षरता आणि शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रान्सयुनियन CIBIL आणि FACE च्या प्रयत्नांमुळे ग्राहक आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि स्वावलंबी होईल.

ग्राहक शिक्षणात संपूर्ण आर्थिक परिसंस्थेच्या सहभागावर भर देताना, FACE चे सीईओ सुगंध सक्सेना म्हणाले: “FACE आणि TransUnion CIBIL सारख्या संस्था आर्थिक उत्पादने आणि ग्राहकांमधील दरी भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा संयुक्त उपक्रम व्यक्तींना सुजाण आणि जबाबदार आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यावर भर देतो. जबाबदार क्रेडिट वर्तन आणि कर्ज घेण्याच्या पद्धतींबद्दल ग्राहकांशी सतत संवाद साधणे हे क्रेडिट आणि वित्तीय परिसंस्थेच्या मजबूततेची खात्री करण्यासाठी अविभाज्य आहे. एक माहितीपूर्ण आणि जबाबदार ग्राहक हा आर्थिक परिसंस्थेची एक मालमत्ता आहे आणि राष्ट्राच्या आर्थिक कल्याण आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचा आहे.

बालाजीनगरच्या आयुर्वेदिक उपचार केंद्रातील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून मागितली खंडणी तिघांना बेड्या

0

तोतया पत्रकारांचा एक ग्रुप शहरातील विविध ब्युटी पार्लर, स्पा मधे घुसून ब्लॅकमेल करत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि पत्रकार असल्याचे सांगत त्यांनी सहकार नगर मधील एका महिलेस टाँर्चर करून खंडणी मागितली आणि तिचे व्हीडीओ काढले. या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रोहीत वाघमारे, शुभम धनवटे आणि राहुल वाघमारे यांच्याविरुद्ध विनयभंग, Robbery , extortion आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या ग्रुप मधे काही महिला देखील आहेत.

पुणे-आयुर्वेदिक उपचार केंद्रात येणाऱ्या महिलांचे व्हिडिओ चित्रित करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार पुण्यात उजेडात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हा गुन्हा पुण्यातील वेगवेगळ्या 7- 8 ठिकाणी केल्याची कबुली केली आहे.राेहित गुरुदत्त वाघमारे (वय-29,रा. वारजे माळवाडी,पुणे), शुभम चांगदेव धनवटे (20,रा. उत्तमनगर, पुणे) व राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (36,रा. काेथरुड,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सदर आराेपींना न्यायालयात हजर केले असता 12 मार्च पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तीन फेब्रुवारी राेजी दुपारी एक वाजता धनकवडीतील पुण्याईनगर क्लासिक हाईटस तिसरा मजला येथील तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्रात दोन आरोपी आले. त्यांनी आयुर्वेदिक उपचाराची माहिती विचारली. केंद्र चालक महिलेने त्यांना ती दिली. त्यावर संबंधितांना उपचारासाठी काेणते तेल वापरायचे आहे अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तिळाचे तेल वापरण्याचे सांगितले. त्या ग्राहकाने त्याचे नाव राेहित वाघमारे सांगून एक तास उपचार घ्यायचा असे सांगितले.

दरम्यान, त्याने महिलेस धमकावून तिच्या अंगावरील टाॅप काढण्यास सांगितले. त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू जर मी सांगेल तसे उपचार केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन असे सांगून जबरदस्तीने उपचार करुन घेतले. त्यानंतर थाेड्या वेळाने आणखी 2 ते 3 जण राेहित वाघमारे याचे साेबत आले व आम्हाला 20 हजार रुपये दे नाहीतर तुझे उपचार करत असताना, नकळत काढलेले व्हिडिओ दाखवून हा व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावेळी उपचार केंद्र चालक महिलेकडे पैसे नसल्याने आराेपींनी काऊंटर मधील 800 रुपये जबरदस्तीने नेले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राहुल गाैड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकातील सपाेनि सागर पाटील व पाेलिस अंमलदार करत आहेत. त्यांनी तांत्रिक विश्लेषण करुन संशयित आराेपींचा माग काढला. त्यांनी वारजे माळवाडी पाेलिसांच्या मदतीने तीन आराेपींना ताब्यात घेऊन त्यांची सखाेल चाैकशी केली. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारे पुणे शहरात वेगवेगळया 7 ते 8 ठिकाणी गुन्हा केल्याची माहिती दिली. आराेपी राेहित वाघमारे विराेधात वारजे पाेलिस ठाण्यात यापूर्वी विनयभंगचा गुन्हा दाखल आहे. तर, वाघमारे आणि धनवटे याच्यावर बीड जिल्ह्यातील अंभाेरा पाेलिस ठाण्यात कलम 304 (4) नुसार आणि अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी येथे कलम 309 (6)नुसार गुन्हे दाखल आहेत.

निसार शेख आणि योगेश राऊत या हडपसरमध्ये नशेसाठी टर्मिन इंजेक्शन विक्री करणारे दोघांना पकडून १९० बाटल्या जप्त

पुणे – नशेखोरी करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन)या इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍या दोन जणांना हडपसर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन)च्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.निसार चाँद शेख (वय २३, रा. घाडगे गल्ली, शेख चाळ, हडपसर) आणि योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. घुलेवस्ती, मांजरी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

हडपसर पोलिसांच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गस्त घालत असताना, विठ्ठलनगरचे पाठीमागील जिजामाता वसाहतचे मागील कॅनॉल येथे दोनजण संशयितरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांना पाहून अचानक ते पळून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड यांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगेत मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) या नावाची इन्जेक्शनच्या ६० बाटल्या मिळून आल्या. हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ५५० रुपयांना विकत असल्याचे आरोपिनी सांगितले. सखोल चौकशी दरम्यान त्यांच्याकडून मॅफेनटरमाइन सल्फेटच्या एकूण १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना देखील आणि संबंधित औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण त्यांनी घेतलेले नसल्याचे स्पष्ट झाले. हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी आरोपींनी जवळ बाळगल्याचे दिसून आले.नागरिकांना अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांबाबत माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस उपनिरीक्षक सत्यावान गेंड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. |

पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रूपयांची देणगी सुपूर्त !!

पुणे, ११ मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने सगल दुसर्‍या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजक श्री. पुनितदादा बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन आणि धारीवाल फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते ५ लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना देण्यात आला. यावेळी पुणे शहर पोलिस दलाचे डीसीपी मिलिंद मोहीते, डीसीपी हिम्मत जाधव, सिनेचित्रपट अभिनेता आकार ठोसर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरोत्सव निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस तास आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व सार्वजनिक उत्सवाचा आनंद घेता येत असतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुनित बालन ग्रुप संघाने पुने शहर पोलिस संघाचा ५५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १० षटकामध्ये १२३ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये पुनित बालन यांनी नाबाद २६ धावांची खेळी केली. याशिवाय राहूल साठे (३२ धावा), ऋतुराज वीरकर (२७ धावा) आणि आतिश कुंभार (नाबाद २१ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे शहर पोलिस संघाचा डाव ६८ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः
पुनित बालन ग्रुपः १० षटकात ४ गडी बाद १२३ धावा (पुनित बालन नाबाद २६, राहूल साठे ३२, ऋतुराज वीरकर २७, आतिश कुंभार नाबाद २१, प्रशांत गायकवाड २-१५) वि.वि. पुणे शहर पोलिसः १० षटकात ८ गडी बाद ६८ धावा (विपुल गायकवाड नाबाद १७, अभिजीत ढेरे ११, उल्हास कदम १०, कुणाल भिलारे २-८, आदित्य कर्जतकर २-८, अनिकेत कुंभार २-११); सामनावीरः राहूल साठे;

भाजपला साथ देणाऱ्यापुणेकरांच्या हातीअंदाजपत्रकात ‘भोपळा’च! – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

पुणे : राज्याच्या अंदाजपत्रकात पुण्याच्या विकासासाठी भरीव तरतूद केलेली नाही. एकंदरीतच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात मात्र, भोपळाच देण्यात आला आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

पुण्यात महायुतीचे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे दोन कॅबिनेट मंत्री आहेत, माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत आणि मुरलीधर मोहोळ हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. पुणेकरांनी भाजप आणि महायुतीला भरभरून मते दिल्यामुळे या चौघांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मात्र, अंदाजपत्रकात पुणेकरांच्या पदरी निराशाच आहे. पुण्याच्या औद्योगिक आणि व्यापारी उलाढालीला चालना मिळावी, यासाठी पुरंदरचा विमानतळ आम्ही लवकरच करू, असे आश्वासन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन वारंवार दिले आहे. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदरच्या विमानतळाचा उल्लेख नाही, भूसंपादनासाठीची तरतूदही नाही, ही बाब धक्कादायक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्याची इच्छाशक्ती असती तर पीएमपीएमएलसाठी २ हजार बसगाड्या घेण्यासाठी तरतूद करण्यात आली असती. पण, तशी तरतूद करण्यात आलेली नाही. पुणे मेट्रो चा पहिला टप्पा अजून पुर्ण झाला नाही आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पुढील दहा वर्षांसाठीचा वायदा करून ९हजार कोटींच्या तरतुदी केल्या आहेत. खडकवासला-खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बाग अशा दोन मार्गांसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले आहे. या योजनांना पूर्ण होण्यासाठी १० वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. ही घोषणाही पोकळच आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५०कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीचा गाजावाजा सत्ताधारी पक्ष करीत आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना कागदोपत्रीच राहिली आहे, याचा उपमुख्य मंत्री अजित पवार यांना विसर पडला आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

‘लाडकी बहिण’ योजनेबाबतही महायुती सरकारने महिलांची फसवणूकच केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना अनुदान चालू केले आणि निवडणुकीनंतर २,१०० रुपये करू, असे आश्वासन दिले. यासाठी वारेमाप खर्च करून जाहिराती केल्या. महिलांनी भरवसा ठेवून महायुतीला मते दिली. मात्र, सत्ता आल्यानंतर त्या आश्वासनांना अंदाजपत्रकात हरताळ फासण्यात आला, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

“कोथरूड मध्ये राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात”

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितपवार,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या सुचनेनुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघात सभासद नोंदणी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १० मार्च रोजी कर्वेनगर येथील रत्ना हॉटेल येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोठ्या उत्साहात अभियानाचे संपूर्ण नियोजन करून सदस्य नोंदणी अभियानाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील फादर बॉडीचे पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांकडून सभासद नोंदणीसाठी करावयाची पूर्वतयारी म्हणून आढावा घेत माहिती घेण्यात आली.


सदर प्रसंगी कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर, महिला अध्यक्ष तेजल दुधाने, कोथरूड निरीक्षक माणिकशेठ दुधाने, विद्यार्थी शहराध्यक्ष शुभम माताळे, वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष विजय बाबर, शहर सरचिटणीस धनंजय पायगुडे, फादर बॉडी शहर उपाध्यक्ष आनंद बंडू तांबे, संतोष बराटे,कुमार बराटे,प्रशांत निम्हण,रजनी पाचंगे,संजय चव्हाण,संघटक सचिव ओमकार निम्हण, महिला शहर कार्याध्यक्ष संगीता बराटे,विधानसभा सरचिटणीस महिला दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष अपूर्वा तांबे,कांता खिलारे,विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर,युवक उपाध्यक्ष,सुरज गायकवाड,सागर चंदनशिवे कोथरूड विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत मोकर, कोथरूड सरचिटणीस नवनाथ खिलारे, सामाजिक न्याय अध्यक्ष अमित तुरुकमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यावी: नाना पटोले

  • मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?

मुंबई – कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे भरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या मंत्र्याला तंबी द्यावी, असे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कायदे करणे हे सरकारचे काम आहे पण एखादा मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. हलाल मटन विकत घ्यायचे की आणखी कोणते व ते कोणाकडून घ्यायचे हे मंत्र्यांनी सांगू नये, हे काम त्यांचे नाही. महाराष्ट्रात धार्मिक मुद्दे उपस्थित करून सामाजिक शांतता भंग करण्याचा उद्योग काही लोक करत आहेत, त्याची दखल सरकार व मुख्यमंत्री यांनी घ्यावी. मंत्रीपदाची जी शपथ घेतली त्याचे पालन करावे. धर्माधर्मा मध्ये वाद निर्माण करुन महाराष्ट्राला तोडू नका, असेही पटोले यांनी बजावले आहे.

भोंग्यांसंदर्भात कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजवणी करा.

भोंग्याच्या आवाजासंदर्भात मा. सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे तो कोणत्या एका धर्मासाठी नसून भोंग्याच्या आवाजासंदर्भात आहे, त्याचे पालन केले पाहिजे. एकाच धर्मासाठी ते लागू केले जात असेल व त्यातून नवे वाद उभे राहतील. सुप्रीम कोर्टाच्या आदेशनाचे पालन जे अधिकारी करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. भोंग्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही, त्यामुळे गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही पटोले यांनी केले.

सरकारमध्ये शिंदे विरुद्ध फडणवीस वाद…
एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना फडणवीस सरकार बंद करत आहेत. शिंदे यांच्या आमदारांना दिलेली सुरक्षा फडणवीस सरकारने काढून घेतली आहे पण त्याचवेळी भाजपाच्या बगलबच्च्यांना मात्र वाय प्लसची सुरक्षा दिलेली आहे. आनंदाचा शिधा, शिवभोजन योजनेलाही कात्री लावण्याचे काम केले जात असून बजेटमध्ये या योजनांसाठी निधीची तरतूद केल्याचे दिसत नाही. शिंदे विरुद्ध फडणवीस या वादातून राज्यातील जनतेचे मात्र नुकसान होत आहे असेही नाना पटोले म्हणाले.

येत्या २३ मार्चपर्यंत वडगावशेरी मतदारसंघाचा पाणी पुरवठा सुरळीत करून अहवाल सादर करा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

  • विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आमदार बापूसाहेब पठारे यांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील दालन क्र. ४० मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार तसेच पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. श्री अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता पथ, नंदकिशोर जगताप मुख्य अभियंता पाणीपुरवठा, हांडे मुख्य अभियंता एमएसआयडीसी मुंबई,अमोल झेंडे पोलीस उपायुक्त वाहतूक व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, आमदार पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत विकासकामे पूर्ण करण्याची मागणी केली. विशेषतः रस्ते, उड्डाणपूल, बीआरटी प्रकल्प, भुयारी मार्ग, नदीवरील पूल व नियोजित मार्ग यासंदर्भात त्यांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या.

प्रामुख्याने, यात खराडी-शिवणे रस्त्याचे प्रलंबित कामे पूर्ण करणे, पुणे-नगर रस्त्यावरील हयात हॉटेल (विमाननगर) ते खराडी जकात नाका (खांदवे नगर) हा उड्डाणपूल (उन्नत मार्ग) लांबी कमी न करता हयात हॉटेल (विमाननगर) येथून पूर्ण करणे, पुणे-नगर महामार्ग व आळंदी रस्त्यावरील उर्वरित बीआरटी मार्ग काढणे, विमाननगर चौक व खराडी-हडपसर बायपास चौक येथे भुयारी मार्ग तयार करणे, विमाननगर, वडगावशेरी, मुंढवा, पिंगळे वस्ती व हडपसरला जोडणारा एचसीएमटीआर रस्त्यासाठी मुळा-मुठा नदीवरील पूल करणे, ५०९ चौक ते कलवड, धानोरी, लोहगाव रस्त्याला जोडणारा रस्ता विकसित करणे, धानोरी जकात नाका ते डी. वाय. पाटील कॉलेज (लोहगाव) व पुणे मनपा हद्दीपर्यंत रस्ता निर्माण करणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना कराव्यात. भूसंपादनाची प्रलंबित कामे मार्गी लावावी. तसेच खराडी जकात नाका (चूल मटण हॉटेल) येथून स. नं. १२३, १२४, १२५, १२०, ११९, ११८, ११७ मधून तालेरा यांच्या जमिनीच्या कडेने लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणारा नियोजित रस्ता विकसित करणे इ. मागण्यांचा समावेश होता.

मागण्यांच्या संदर्भाने, नार्वेकर यांनी आमदार बापूसाहेब पठारे व पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांशी अभ्यासपूर्ण चर्चा केली. यावेळी नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. येत्या २३ मार्च पूर्वी मतदारसंघातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लागली पाहिजेत. रस्ते व वाहतूक सुधारणा प्राधान्याने करण्यात आल्याच तरच वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. वडगावशेरी मतदारसंघातील वाढती लोकसंख्येचा विचार दोन्ही प्रशासनाने करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने व पालिका प्रशासनाने मिळून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व मागण्याची पूर्तता करावी.”

पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा’ युद्धपातळीवर तयार करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिकस्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जल पर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, परिपयर्टन, ग्रासलँड सफारी आदीबाबींचा विचार करुन सर्वसमावेशक, पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा’ युद्धपातळीवर तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित एकत्रित पर्यटन विकास आराखडाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप वनसंरक्षक तुषार चव्हाण, महादेव मोहिते, अमोल सातपुते, पर्यटन उपसंचालक शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दानी आदी उपस्थित होते.

डूडी म्हणाले, पर्यटन विकास आराखड्यात संगणकीकृत पायाभूत सुविधेच्या माध्यमातून पर्यटकांना पर्यटनस्थळावरील प्रवेश शुल्क, निवासव्यवस्था, अल्पोहार, भोजनालय, पिण्याचे पाणी, थांब्याचे ठिकाण, शौचालय आदीसुविधांबाबत सर्व प्रकारची माहिती मिळाली पाहिजे. पर्यटनस्थळाला देश विदेशातील अधिकाधिक पर्यटक भेट देतील, येणाऱ्या पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध होतील, यादृष्टीने प्रत्येक बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे. देशातील इतर राज्यात करण्यात येणाऱ्या पर्यटन महोत्सवाचा अभ्यास करावा, याकरीता नामांकित वास्तुविशारद, पर्यटनक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.

या बैठकीत जिल्ह्यातील पयर्टनस्थळे निश्चित करण्यात आली होती, त्यादृष्टीने इको टुरिझम, साहसी खेळ, स्थानिकांना रोजगार, स्थानिक लोकपंरपरा, साहित्य, कला, संगीत, नाट्य तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बाबींवरही बाबींवर चर्चा करण्यात आली.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारु दुकान सुरु करण्यासाठी यापुढे,सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

  • महानगरपालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डमध्ये सुरू असलेले मद्यविक्री दुकान बंद करण्यासाठी झालेल्या मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल, त्यानुसार बियर किंवा दारुचे दुकान सुरु किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती.
  • दारुबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची भूमिका; अवैध दारुविक्री रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्षवेधीवर विधानसभेत उत्तर

मुंबई :- राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे.

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा महेश लांडगे आणि अॅड. राहूल कूल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चर्चेत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शासनाची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. अनेक दशकांपासून राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारुदुकानांना परवानगी नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारुदुकाने बंद करण्याचा कायदा आहे. त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारुदुकान सुरु किंवा बंद करण्यासाठी महापालिका वार्डांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान हे ज्या बाजूने होईल, त्यानुसार निर्णय होईल. राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना स्पष्ट केले.

राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोखठोक आणि स्पष्ट उत्तराचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक सदस्यांनी कौतुक केले.

केळी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे : आगामी पाच वर्षात जिल्ह्यात केळी पिकाखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यासह उत्पादकता वाढविणे, प्रक्रियाउद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर) पद्धतीने विकास करण्यात येणार असून त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, केळीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४२ वरून ६५ मे. टन पर्यंत वाढवण्यासाठी शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, निविष्ठांचा योग्य वापर, अधिकाधिक क्षेत्र सेंद्रिय, नैसर्गिक शेतीखाली आणणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, या पिकासाठीची सर्व टप्प्याची प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे या बाबींवर विशेष भर द्यावा लागेल. कृषी विद्यापीठे आणि प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडील तंत्रज्ञान अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, या क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निविष्ठा पुरवठा, ड्रोन सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आदी कामे करावी लागतील.

केळी पिकाखाली इंदापूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यामध्ये १ हजार ६११ हेक्टर क्षेत्र असून ६७ हजार ६०० मे. टन उत्पादन होते. आगामी पाच वर्षात हे क्षेत्र ३ हजार हेक्टरवर आणि उत्पादन सुमारे २ लाख मे. टन वर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे यांनी सांगितले.

या उत्पादन वाढीसाठी तसेच वाढणाऱ्या उत्पादनावरील प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनेतून अर्थसाहाय्य करणे, शीतसाखळी अंतर्गत साठवण गृहे उभारणी आणि बाजार जोडणीसाठी पणन मंडळ तसेच अन्य माध्यमांचा उपयोग करावा, असेही जिल्हाधिकारी डूडी म्हणाले.यावेळी स्ट्रॉबेरी, मिरची, आंबा, स्वीट कॉर्न व बेबी कॉर्न, सूर्यफूल आदी पिकांचे क्लस्टर करण्याच्यादृष्टीनेही चर्चा झाली.