Home Blog Page 418

महाराष्ट्रातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा भाजपा युती सरकारचा प्रयत्न, फडणवीस मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना: हर्षवर्धन सपकाळ

0

सिंधुदुर्ग/मुंबई, दि. १५ मार्च २५

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना आहे, अशा मंत्र्यांमुळे राज्यातील सद्भाव, विवेक, महाराष्ट्र धर्म नष्ट होत आहे. भाजपा सरकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणाला निसर्ग सौंदर्य व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे, कोकणच्या या भूमीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वी. स. खांडेकरांचा जन्म झाला, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते असा प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडवगावर यांचा हा जिल्हा, मधू दंडवते, नाथ पै यांच्यासारख्या महान नेत्यांचा हा जिल्हा आहे, एकापेक्षा एक सरस खासदार या जिल्ह्यातून झाले, ज्यांनी सभ्यता, संस्कृती व लोकशाही मुल्ये कशी असतात याचा आदर्श घालून दिला आहे. आज त्याच जिल्ह्यातील काही लोकांच्या तोंडातून दररोज गटारगंगा वाहत आहे. एक मंत्री हम करे सो कायदा म्हणतो, दुसरा आमदार सैराट आहे. आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही अशी धमकी दिली जाते, हा सर्व प्रकार महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रकार आहे.
नारायण राणे हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते १२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिले त्यातील ९ वर्षे ते सत्तेत राहिले, त्यांचा परभाव झाल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना निवडून दिले पण नंतर ते कडगोळे घेऊन दुसऱ्य़ा पक्षात गेले. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते व सत्ता होती म्हणून ते आले होते व सत्ता नाही हे दिसताच ते परत गेले. ते जरी गेले असले तरी या जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता व काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला कोकणात सामाजिक तेढ निर्माण करायचे आहे, संस्कृती मोडून काढायची आहे. आगामी काळात हा जिल्हा काँग्रेसमय करा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जनतेचे प्रश्न हाती घेऊन काम करा.पुष्पा चित्रपटातील झुकेगा नही साला या भावनेने काम करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला पाहिजे, प्रत्येक तालुका, वार्ड, ग्रामपंचायतीत काँग्रेसचा कार्यकर्ता दिसला पाहिजे. काँग्रेस एक चळवळ आहे, काँग्रेसचा विचार जिवंत ठेवा, हा विचार जिल्ह्यातील घरोघरी पोहचवा असे आवाहन सपकाळ यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २०० वर्षानंतर महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली या दोनशे वर्षामध्ये भाजपाच्या त्याकाळातील पिल्लावळींना महाराजांचा इतिहास पुढे आणू द्यायचा नव्हता, आताही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एकही पुरावा ठेवायचा नाही यातून काही विध्वंसह घटना या लोकांना करायच्या आहेत. या विखारी विचारसरणीला थांबवावे लागणार आहे. असेही सपकाळ म्हणाले.

यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस आबा दळवी जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी आदी उपस्थित होते.

२७२७ कोटीचे उद्दिष्ट पण वसुल झाले २१५० कोटीच.. आता महिलांचे ‘दामिनी’पथक देणार झुंज

पुणे शहरात कर संकलनाच्या अनुषंगाने दामिनी महिलांची 12 पथके तयार करण्यात आलेली आहे सदर प्रत्येक पथकामध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांचेमार्फत शहरातील थकबाकीदार मिळकतींची पाहणी करून वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सदरचा प्रयोग हा प्रथमच राबवण्यात आलेला असून त्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे सदर पथकाकडून दहा लाख इतके रक्कम थकबाकी जमा करण्यात आली असून तीन मिळकती जप्त करण्यात आलेले आहेत

-उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप

उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप , महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे , प्रशासन अधिकारीरवींद्र धावरे सर, प्रशासन अधिकारी सोपान वांजळे , प्रशासन अधिकारी श्रीमती.रजनी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पेठ धायरी येथे मध्यवर्ती महिला वसुली पथक व टीम यांचे समवेत मिळकत कारवाईसाठी गेलेल्या पथकाने , मिळकतदाराकडून PDC व चालू चेकने रक्कम रुपये दहालाख रुपये वसूल केले.ही वसुलीमहिला पथक प्रमुख वंदना पाटसकर, प्रीती चव्हाण,शुभांगी खसासे वैशाली कामथे दिपाली चव्हाण गौतमी कोडम व सर्व विभागीय निरक्षक पेठ निरीक्षक चेतन मोकाशी यांनी केली.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता मिळकतकर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.यासाठी महिलांची १२ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यात ६० महिलांचा समावेश आहे.पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २७२७ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण या वर्षात हे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचे जवळपास निश्‍चित झाले असून, आत्तापर्यंत २१५० कोटी रुपयेच वसुल झाले आहेत.त्यामुळे उर्वरित १५ दिवसात सुमारे ६५० कोटी रुपये कर वसुली करणे प्रशासनाला अशक्य आहे. पण या शेवटच्या १५ दिवसात जास्तीत जास्त कर वसुली करून ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे प्रयत्न प्रशासनाचे सुरु आहेत.त्यासाठी महापालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावणे, थकबाकीदाराच्या मिळकतीपुढे बॅंड वाजविणे, इमारती जप्त करणे, टाळे ढोकणे अशी कारवाई केली जात आहे. ही कारवाई आणखी प्रभावी करण्यासाठी खास महिला कर्मचाऱ्यांचे थकबाकी वसुलीचे १४ पथक तयार केले आहेत. त्यात ६० महिलांचा समावेश आहेत.

मिळकतकर विभागाचे उपयुक्त माधव जगताप म्हणाले, महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीच्या वसूलीसाठी आता कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी ६० महिला कर्मचाऱ्यांची १२ पथके वसूलीसाठी नेमण्यात आली आहेत.महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांवर ही वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रयोग प्रथमच करण्यात आला असून, पहिल्या दिवशी या पथकाने तीन मिळकती जप्त केल्या आहेत. तर १० लाख रुपयांची वसुली केली आहे.

लिंगायत महिला मंचतर्फे ताणतणाव व्यवस्थापन आणि फिटनेस मार्गदर्शन 

महिलांसाठी रॅम्पवॉक स्पर्धा ; मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग
पुणे: लिंगायत महिला मंचाच्या वतीने महिलांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन आपटे रस्त्याजवळील सेंट्रल पार्क येथे करण्यात आले होते. महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्यांना वाव देणारे विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.

महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ताणतणाव व्यवस्थापन आणि फिटनेस यासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांना आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आणि योग्य आहार, व्यायाम व मानसिक स्वास्थ्याची महत्वाची माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी उपक्रमासाठी सुप्रिया हत्ते, सुप्रिया गाडवे, नीना लिगाडे, राजश्री हापसे, सीमा तोडकर आणि सोनाली कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांसाठी रुद्रपठण स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला  तसेच, रॅम्पवॉक विशेष आकर्षण ठरला, जिथे विविध वयोगटातील महिलांनी आत्मविश्वासाने सहभाग घेतला. या स्पर्धांचे परीक्षण रूपा सुत्तट्टी आणि पल्लवी शिवकुमारश्री यांनी केले. विविध कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली असून, त्यांना स्वतःच्या आरोग्याची आणि सशक्तीकरणाची जाणीव यानिमित्ताने झाली आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका:शरमन जोशी

‘एमआयटी एडीटी’च्या ‘पर्सोना महोत्सवा’चा समारोप

पुणेः आयुष्य प्रचंड आव्हानात्मक आहे. मात्र आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला ‘ऑल इज वेल’ म्हणत विद्यार्थ्यांनी धीराने तोंड द्यायला हवं. यासह, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यात करिअर करायला हवं. आवडीचे क्षेत्र ठरल्यानंतर परिणामाची चिंता न करता 

‘नेवर गिव अप’ वृत्ती स्विकारुन यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका आणि यश प्राप्तीनंतर त्यात झोकून देऊन आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. या प्रक्रियेत ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यांचाच विचार करावा व ज्या नाहीत त्यांची चिंताच करू नका, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते

शरमन जोशी यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सातव्या ‘पर्सोना फेस्ट-२५’ या वर्षातील सर्वांत मोठ्या कला महोत्सवाच्या समारोपात बोलत होते. याप्रसंगी, शरमन यांच्या पत्नी प्रेरणा चोप्रा-जोशी

, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डाॅ.सुदर्शन सानप, डाॅ.विपुल दलाल, डाॅ.रेणू व्यास, डाॅ.सुराज भोयार आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी शरमन जोशी यांनी त्यांच्या ‘थ्री इडियट्स’ या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटातील ‘गिव मी सम सनशाईन’ या गाण्यातील कवितेच्या ओळी म्हणत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील विचाराप्रमाने एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील आहे, असे म्हणत त्यांनी सर्वांचे तोंडभरून कौतुक देखील केले.  प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना २००९ साली अमीर खान व शरमन जोशी यांचा सहभाग असणारा

, ‘थ्री इडियट्स’ हा अतिशय सुंदर सिनेमा पाहण्यात आला. त्या सिनेमात देण्यात आलेल्या संदेशा प्रमाणे विद्यार्थ्यांना कला, डिजाईन आणि तंत्रज्ञान यांचा संगम असणारे व त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे शिक्षण देणारे एखादे विद्यापीठ असावे, अशा विचाराने एमआयटी एडीटी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, असे ते शरमन जोशी यांना उद्देशून म्हणाले. तसेच, पर्सोना सारखे महोत्सव विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणारे तथा त्यांच्यातील कलेचा साक्षात्कार करून देणारे उत्तम व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता, पसायदानाने करण्यात आली. ज्याचे, प्रास्ताविक डाॅ.सुराज भोयार यांनी तर आभार, डाॅ.सुदर्शन सानप यांनी मानले. 

वर्षातील सर्वोत्तम ‘पर्सोनां’चा गौरव-पर्सोना महोत्सवाच्या समारोप प्रसंगी, विद्यापीठात वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘बेस्ट पर्सोना ऑफ द इअर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये तन्वी बोगाडे, अनुष्का जोशी, शिवनेश मोरे, मृण्मयी गोडमाने, सौरेश जबे, तेजस डोंगरे, अक्षत वशीष्ठ, धीर जैन, ओंकार शिंदे, अमोघा पाठक, राहुल देवगावकर, कॅडेट हरमनदीप कौर, आर्या पाटणकर या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यासह, ‘एमआयटी एडव्हेंचर क्लब’ला वर्षातील सर्वोत्तम क्लब म्हणून गौरविण्यात आले.

औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची औरंगजेबाच्या कबर विरोधात तीव्र भूमिका : दिनांक १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन
पुणे : औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची, आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मोर्चे काढेल, आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करून कारसेवा करून ती कबर उध्वस्त करेल. क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणार आहे. तसेच पुण्यात सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ ( फाल्गुन कृष्ण तृतीया, छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११.३० वाजता आंदोलन करून मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देणार आहोत, अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली

यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन, आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे,श्रीपाद रामदासी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी ,विश्वासघात व हिंदू द्वेष यात घालविणारा,आपल्या सख्या भावांचे खून करणारा,बापाला कैदेत टाकणाऱ्या, काशी विश्वनाथ,मथुरा,सोमनाथ मंदिरे फोडणारा ,छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे, त्यामुळे कबर हटवली पाहिजे.

नितीन महाजन म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरिया कायद्यानुसार वागत आहेत. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतून प्रेरणा मिळते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मारेकऱ्याची कबर जतन करण्याची आवश्यकता नाही.

स्वतःच्या वडीलांना तुरुंगात टाकून मारणारा, स्वतःच्या भावांची क्रूरतेने हत्या करणारा घरातल्या लोकांना सोडत नाही त्याच्यासाठी राष्ट्रातले नागरिक व समाजाची काय किंमत असणार ? अशा राष्ट्रघातकी, क्रूर आणि हिंसाचारी प्रवृत्तीच्या औरंग्याचा करावा तितका निषेध कमी असेल.

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंजेस बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) भांडवल बाजाराची प्रमुख नियामक संस्था. मुंबईतील न्यू इंडिया बँकेच्या पाठोपाठ इंडसइंड बँकेतील अनियमितता, अयोग्य जोखीम व्यवस्थापन, इन्सायडर ट्रेडिंग यामुळे पुन्हा एकदा लाखो भागधारकांना कोट्यावधी रुपयांचा “चुना” लागला आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नियामक खरोखरच लायकीचे किंवा योग्य क्षमतेचे आहेत किंवा कसे हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. फक्त “दुर्वा “उपटण्याचे काम या नियामक संस्था करतात काय? त्यांना जाब विचारण्याची व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. इंडसइंड बँक प्रकरणाचा घेतलेला धांडोळा.

इंडसइंड बँकेने गेल्या पाच वर्षात त्यांचा व्यवसाय वाढवताना अनिवासी ठेवींवर (एनआरआय) विशेष भर दिलेला होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जादा व्याजदरही देण्यात येत होता. बँकेच्या ताळेबंदानुसार डिसेंबर 2024 अखेरच्या तिमाहीमध्ये बँकेकडे 58 हजार 600 कोटी रुपयांच्या अनिवासी ठेवी होत्या. एका बाजूला ही ठेवीतील वाढ खूप चांगली झालेली असली तरी त्याचबरोबर बँकेचा ताळेबंद स्वच्छ असणे, बँकेचे परकीय चलन व्यवहार पारदर्शक व योग्य असणे अपेक्षित होते. परंतु बँकेची याबाबतची अंतर्गत रचना अत्यंत गुंतागुंतीची असून खूप जोखमीची होती. परकीय चलनातील ठेवी हा अत्यंत महत्त्वाचा व जोखमीचा विषय असतो. उदाहरणार्थ एखादा अनिवासी भारतीय बँकेत आला व त्याने एकरकमी दहा लाख डॉलर्सची मुदत ठेव एक वर्षासाठी ठेवली. तर या रकमेचे रूपांतर भारतीय रुपयांमध्ये त्यावेळेचा विनिमय दर लक्षात घेऊन केले जाते.अर्थातच ही रक्कम बँकेतर्फे कर्ज वितरणासाठी वापरली जाते. मात्र या ठेवीची मुदत संपली की किंवा मुदत संपण्यापूर्वीच तो ठेवीदार ही रक्कम परकीय चलनामध्ये परत घेऊन जातो. यामुळे परकीय चलनाची गुंतवणूक जोखीम बँकेला टांगत्या तलवारीसारखी असते. ही जोखीम कमी करण्यासाठी इंडसइंड बँकेने ‘ हेजिंग’ च्या पर्यायाचा वापर केला. अर्थात अशा प्रकारे परकीय चलनातील व्यवहाराचे ‘हेजिंग’ करणे हा एक धोरणात्मक निर्णय असतो व तो बँकेने केलाच पाहिजे अशी आवश्यकता नसते.

प्रत्येक बँकेमध्ये ‘ॲसेट – लायबिलिटी मॅनेजमेंट’ विभाग असतो. त्यांची प्रामुख्याने जबाबदारी असते ती बँकेची सर्व येणी आणि देणी यांचे योग्य व्यवस्थापन करणे. अर्थातच यामध्ये परकीय चलनातील ठेवींचा समावेश असतो. त्यामुळे हा विभाग नेहमी एकूण मालमत्ता, दायित्व, व्यवसायातील रोख रकमेची ये-जा ( कॅश फ्लो) तसेच चलनविनिमय दरातील चढ उतार व त्यातील जोखीम या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवून असतो. वर उल्लेख केलेली मुदत ठेव हातात आली तर त्याचे रूपांतर साधारणपणे एक डॉलरला 87 रुपये असा दर लक्षात घेतला तर बँकेला 8.70 कोटी रुपये रक्कम हातात मिळते. त्यामुळे बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेनुसार ही रक्कम चलनाचे खरेदी विक्री करणाऱ्या’ ट्रेडिंग डेस्क’ ला दिली जाते. त्यावेळी 8.70 कोटी रक्कम ॲसेट मॅनेजमेंट करणाऱ्या विभागाला मिळते. त्यानंतर हे दोन्ही विभाग एकमेकांना ठराविक मुदतीने म्हणजे पंधरवडा किंवा महिन्याने व्याजाची देवाण घेवाण करतात. अर्थात ते करताना डॉलर व रुपया यांचा विनिमय दर व प्रचलित व्याजदर लक्षात घेतला जातो. या ठेवीची मुदत संपते तेव्हा ‘ट्रेडिंग डेस्क’ दहा लाख डॉलर्स परत करते व त्या बदल्यात त्यांना 8.70 कोटी रुपये अधिक त्यांनी ठरवलेली फी मिळते. या सर्व व्यवहारांमध्ये डॉलर व रुपया यांच्या विनिमय दरातील चढ-उतार व व्याजदरातील फरक लक्षात घेऊन अंतर्गत रित्या हे व्यवहार पूर्ण केले जातात.

याच वेळी ‘ट्रेडिंग डेस्क’ हा काही आंतरराष्ट्रीय बँकांबरोबर परकीय चलनाचे डेरिव्हेटिव्हजचे व्यवहार करतात. म्हणजे कागदोपत्री डॉलर्सचे खरेदी – विक्री व्यवहार करतात. विनिमय दरामध्ये सातत्याने लक्षणीय चढ उतार होत असल्यामुळे बँकेची अंतर्गत यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारातील खरेदी-विक्रीची जोखीम याचा ताळमेळ न बसल्यामुळे इंडसइंड बँकेला अशा व्यवहारात कोट्यावधी रुपयांचा फटका बसून तोटा झाल्याचे लक्षात आले. वरील उदाहरणात विनिमयाचा दर 80 रुपये झाला तर त्याचा किती फटका बसू शकतो हे लक्षात येऊ शकते. म्हणजे प्रत्येक अनिवासी ठेवी मागे आणि चलनाच्या विनिमय दरातील चढ उतारामुळे बँकेला काही लाख रुपयांचा तोटा होत राहीला. त्यातच त्यांना दिलेला जादा व्याजदर काही तोटा वाढवणारा होता व या सर्वाचा परिणाम बँकेच्या एकूण ताळेबंदावर अत्यंत विपरीत पद्धतीने झालेला होता. अर्थात या ठेवी फक्त डॉलर्समध्ये नसून अन्य चलनातील म्हणजे येन, युरो यामध्येही असल्याने त्यातील चढ उताराचा बसणारा जादा फटका सहज लक्षात येऊ शकतो.

इंडसइंड बँकेने बँकेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व व्यवहारात सुमारे 2100 कोटी रुपयांचा तोटा बँकेला झालेला आहे. ही रक्कम बँकेच्या एका तिमाहीच्या नफ्याएवढी लक्षणीय आहे. आजच्या घडीला बँकेकडे 4 लाख कोटींच्या ठेवी आहेत तर 3.60 लाख कोटींची कर्जे त्यांनी दिलेली आहेत. बँकेचे एकूण भांडवल ( नेट वर्थ) 65 हजार कोटीच्या घरात आहे. तसेच सरकारी रोखे व बाँड्समध्ये एकूण गुंतवणूक 1.18 लाख कोटींच्या घरात आहे. म्हणजे एकूण ठेवींच्या तुलनेत जवळजवळ 45 टक्के ठेवींची बँकेची द्रवता आहे. तसेच आजच्या घडीला बँकेच्या सर्व मालमत्ता विकल्या व काही अनुत्पादित बुडीत कर्जे लक्षात घेतली तरीही सर्व ठेवीदारांच्या रकमा परत देण्याची क्षमता बँकेत आहे. त्यामुळे या बँकेत आजच्या घडीला तरी कागदोपत्री काही धोका वाटत नाही.

परंतु रिझर्व्ह बँक सहकारी बँकांना प्रचंड त्रास देतात, झारीतल्या शुक्राचार्या सारखे चांगल्या बँकांची अडवणूक करतात असे चित्र आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँका किंवा इंडसइंड सारख्या खाजगी बँकांच्या बाबतीत नियामक मूग गिळून बसलेले दिसतात. रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकाद्वारे 1 एप्रिल 2024 पासून बँकांमधील डेरीव्हेटीव्हजच्या अंतर्गत व्यवहारांना बंदी घातलेली आहे. त्यामुळेच इंडसइंड बँकेने अंतर्गत लेखापरीक्षण केल्यानंतर त्यांना एवढा मोठा तोटा झाल्याचे लक्षात आले व त्यांनी ते मान्य केलेले आहे. हा तोटा अलीकडचा नाही. या बँकेला गेल्या पाच ते सात वर्षातील एवढा प्रचंड वाढणारा तोटा लक्षात आला नाही ही अंतर्गत लेखापरीक्षणातील गंभीर चूक आहे. बँकेचे जोखीम व्यवस्थापन व अंतर्गत व बाह्य लेखापरीक्षण प्रक्रिया यातील त्रुटी यामुळे चव्हाट्यावर आल्या आहेत. यात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे किंवा कसे हे निश्चित सांगता येणार नाही पण इंडसइंड सारखा प्रकार अन्य काही बँकांमध्ये झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंडसइंड बँक सध्या विविध घडामोडींमुळे चर्चेत व अडचणीत येताना दिसत आहे. बँकेच्या प्रमुख वित्त अधिकाऱ्याने अलीकडेच तडका फडकी राजीनामा दिला. एवढेच नाही तर सर्वात गंभीर बाब आहे ती इनसाईडर ट्रेडिंग सारख्या गंभीर गुन्ह्याची. बँकेची सर्व अंतर्गत माहिती असणाऱ्या वरिष्ठ मंडळींनी गेल्या काही महिन्यात त्यांचे समभाग बाजारात विकून मोठा नफा कमावलेला आहे.
बँकेला मोठा तोटा झाल्याची त्यांनाच फक्त माहिती होती.त्यामुळे त्यांनी त्याचा वापर करून शेअरची बाजारात खुली विक्री केली. हा इनसाईडर ट्रेडिंग चा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. बँकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुमंत कठपालिया यांनी सरासरी 1437 रुपयांना शेअर्स विकून 118 कोटी रुपये मिळवले आहेत तर उपप्रमुख कार्यकारी अधिकारी खुराणा यांनी 1451 रुपयांना शेअर्स विकून 70 कोटी रुपये मिळवले आहेत. या दोघांनी हे व्यवहार गेल्या काही महिन्यात केलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक परदेशी वित्त संस्थांनीही गेल्या सात आठ महिन्यात त्यांच्याकडील भाग भांडवलाची विक्री केली. त्यांच्याकडे 40.3 टक्के भाग भांडवल होते ते डिसेंबर अखेरीस 24.7 टक्क्यांवर घसरलेले आहे.गेल्या दोन-तीन महिन्यात अजून विक्री झालेली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतातील स्थानिक वित्त संस्था व म्युच्युअल फंडांनी यामध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यांचे भाग भांडवल 28 टक्क्यांवरून तब्बल 43 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. ज्या स्थानिक वित्त संस्था व म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केली त्यांचे बाजार मूल्य 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरलेले आहे. आजमीतिला बँकेच्या प्रवर्तकांकडे 16 टक्के भाग भांडवल आहे तर स्थानिक वित्त संस्थांचे भाग भांडवल 50 टक्क्यांपेक्षा जास्त झालेले आहे. यामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, मिराई ॲसेट, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूटीआय, एलआयसी,टाटा,महिंद्रा, क्वांटम असे देशातील सर्व टॉप 25 म्युच्युअल फंड आहेत. आणि या सर्वांना मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना साहजिकच मोठा चुना इंडसइंड बँकेच्या प्रकरणात लागलेला आहे यात शंका नाही. गेल्या सहा महिन्यात या शेअरचा भाव 50 टक्क्यापेक्षा जास्त घसरल्याने बँकेचे भांडवल मूल्य 14,000 कोटींनी पाण्यात गेलेले आहे. गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी या इंडसइंड बँकेचा शेअर चा गेल्या वर्षभरातील उच्चांकी भाव 1576.35 रुपये होता तर सध्याची घसरण 606 रुपयापर्यंत खाली झालेली आहे. बँकेचे एकूण 4.10 कोटी ग्राहक असून 340 शाखा आहेत व 311 एटीएम आहेत. सर्व साधारण भागधारक 6.17 लाख म्हणजे जवळजवळ 84 टक्के आहेत. त्यात म्युच्युअल फंड,विमा कंपन्या व अन्य वित्त संस्था यांचा समावेश आहे.तसेच किरकोळ भागधारक 3.42 लाखाच्या घरात आहेत.

या साऱ्या घडामोडी एक दोन चार दिवसात झालेल्या नाहीत. तब्बल वर्षभरापेक्षा जास्त काळ हा प्रकार सुरू आहे. अशावेळी रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सेबी सारख्या प्रमुख नियमक संस्था केवळ “दुर्वा” उपटण्याचे काम करतात काय असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदार विचारत आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने या सर्व प्रकरणाची सर्वोच्च पातळीवर चौकशी करून गुंतवणूकदार व भागधारकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे.

लेखक:प्रा.नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे – भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना आता गोरगरिबांच्या पोराबाळांना दुध पिणे महाग होऊन बसले आहे . कुंचे वडील , आजोबा चरवीभर , पितळी तांब्याभर दुध पीत आणि नातवाला अभिमानाने पाजत पण आता तो जमाना गेला,जर्सी गायी, म्हशी आल्या,पण दुध महागच होत गेले.आता नवी बातमी आहे दुधाच्या दारात आजपासून दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सर्वसामान्य नागरिकांना दूध दरात दोन रुपये अधिकचे द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता गाईचे दूध प्रतिलिटर 58 रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर 74 रुपयाला मिळणार आहे. पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात झालेल्या सहकारी आणि खासगी दूध संघाच्या शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

दूध संघाच्या या निर्णयामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील दुधाच्या दरात वाढ झाली आहे. बाकी इतर राज्यात देखील हळूहळू ही दरवाढ दिसून येईल. या निर्णयानुसार आजपासून दुधाच्या किमती दोन रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दूध संघटनांनी सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय सर्वसामान्य व्यक्तींच्या खिशाला कात्री लावणारा आहे, असे मत ग्राहकांनी व्यक्त केले. दुधाचे दर आम्हाला परवडणारे नाहीत, याचा सर्वांनी विचार करायला हवा, असे देखील काही ग्राहक म्हणत आहेत.

सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली आहे. या संदर्भात एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दुधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर मध्ये वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दर सर्वच ठिकाणी लागू होतील, असे देखील ते म्हणाले.

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग लावली आहे. होळीनिमित्त मोठ्या संख्येमध्ये बेवडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलालगत असलेला दहिसर परिसरात गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये अचानक मोठे आगीचे लोट दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार ही आग तिथल्या बेवड्यांनी लावली आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. जवळपास दीड तास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही आग लावण्यात आली, त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र, आगीचे लोट दिसल्यानंतर घटना उघडकीस आली. वनवा लागण्याची घटना ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या रावलपाडा नियत क्षेत्रातील सर्वे नं. 345 ब मधील असून संध्याकाळी 6.30 च्या सुमारास लागलेली आग ही 8 वाजता कु. उ. बो. वनक्षेत्र अधिकरी, वन कर्मचारी आणि रॅपिड टीमच्या प्रयत्नाने पूर्णपणे विझविण्यात आली.

या घटनेबद्दलचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जातोय. संबंधित लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. होळीनिमित्त शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळाला. जागोजागी पोलिसांकडून तपासणी केली जात होती. लोक होळी खेळण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले असता फोर्ड एंडेवर कार १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या झालेल्या अपघातात लोणी काळभोर येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात त्यांचे इतर दोन सहकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.१३) सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडला.

अक्षय म्हस्कू काळभोर (वय-२६), सौरभ जालिंदर काळभोर (वय-२६) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर (वय-२४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय-३५, सर्व रा- रायवाडी, लोणी काळभोर, ता- हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमीं तरुणांना वाई येथील बेलर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरातील चार मित्र दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर याठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर गुरुवार (दि.१३) पाच वाजताच्या सुमारास महाबळेश्वर येथून लोणी काळभोरकडे घरी निघाले होते. दरम्यान, वाई – पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट १०० मीटर दरीत कोसळली.

यावेळी वाई पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना वाई येथील बेलर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय आणि सौरभ काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर बजरंग पर्वतराव काळभोर आणि वैभव काळभोर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेलर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तृप्ती देसाईंना 17 तारखेला बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

बीड- येथील पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या पुण्यातील तृप्ती देसाईंना चौकशीसाठी बोलवले आहे. बीड जिल्ह्यातील 26 पोलिस हे वाल्मीक कराड यांच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप देसाईंनी केला होता. मात्र, त्याचे पुरावे दिले नाही असा त्यांच्यावर आरोप आहे . त्यामुळे त्यांना 17 तारखेला बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आरोप केले त्याचे पुरावे घेवून हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यात बीड पोलिसांनी म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाली मात्र पुरावे मिळाले नाहीत. हे आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडील असलेले पुरावे घेऊन या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता एसपी ऑफीसला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे अनेक प्रकरण बाहेर आले. यावेळी तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे एका सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली होती. या यादीमध्ये हवालदारापासून एपीआय, डीवायएसपी, अतिरीक्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाव असलेले अधिकारी किंवा कर्मचारी वाल्मीक कराडचे निकटवर्तीय किंवा मर्जीतील असल्याचा दावाही तृप्ती देसाई यांनी केला होता. इतकच नाहीतर गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी अशी मागणी केली होती.

कोण-कोणते पोलिस अधिकारी/कर्मचारी कराडच्या मर्जीतले?

बाळराजे दराडे, बीड ग्रामीण-API
रंगनाथ जगताप, अंबाजोगाई ग्रामीण – API
भागवत शेलार, केज बीट – LCB
संजय राठोड, अंबाजोगाई – additional Police
त्रिंबक चोपने, केज – Police
बन्सोड ,केज – API
कागने सतिश, अंबाजोगाई – Police
दहिफळे, शिरसाळा-API
सचिन सानप, परळी बिट – LCB
राजाभाऊ ओताडे, बीड – LCB
बांगर बाबासाहेब, केज – POLICE
विष्णु फड, परळी शहर – Police
प्रविण बांगर, गेवराई – PI
अमोल गायकवाड, युसुफवडगाव ड्रायवर Police
राजकुमार मुंडे, अंबाजोगाई DYSP ऑफिस – police
शेख जमिर, धारूर- Police
चोवले, बर्दापूर – Police
रवि केंद्रे,अंबाजोगाई – police
बापु राऊत,अंबाजोगाई – Police
केंद्रे भास्कर,परळी – Police
दिलीप गित्ते, केज DYSP ऑफिस – Police
डापकर – DYSP ऑफिस केज – Police
भताने गोविंद, परळी – police .
विलास खरात, वडवणी – Police.
बाला डाकने, नेकनूर – Police
घुगे, पिंपळनेर – API

रविवार पेठ येथील बागबान मस्जिद येथे महिलांसाठी विशेष व्यवस्था

पुणे-कोरोना प्रादुर्भावानंतर सन २०२१ पासून रविवार पेठ येथील बागबान मस्जिद येथे महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या महिला नोकरीला असतात किंवा शॉपिंग साठी बाहेर आलेल्या असतात त्यांना नमाजसाठी जागा नसते. तसेच त्यांना वॉशरूम किंवा तोंड, हात-पाय धुण्यासाठी अडचण निर्माण होते. काही महिला लहान बाळ घेऊन प्रवास किंवा घराबाहेर पडतात अशा महिलांना आपल्या बाळांना स्तनपान करण्याकरीता अडचण निर्माण होते.

ही सर्व बाब लक्षात घेऊन बागबान मस्जिद ट्रस्टी हाजी अल्ताफभाई बागबान (शेख), हाजी सिराज बागवान, सामाजिक कार्यकर्ते सैय्यद इसरार शिकीलकर, अन्सार पिंजारी, युसूफ खान, सलीम काजी, परवेज शेख (खलिफा) व इतर यांच्या सहयोगाने मस्जिद मध्ये एक विशेष रूम तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलांच्या या अडचणी दूर होऊन त्यांना सुविधा मिळणार आहेत. याठिकाणी महिला नमाज पठण करतात उपवास (रोजा – इफ्तार) आणि आराम देखील करतात. या सुविधांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

‘दगडूशेठ’ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पुणे: काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्म ला २२,००० शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे.

सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर,राहुल सोलापूरकर,नराधम दत्ता गाडे यांच्या प्रतिमा होळीत दहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या गैरकारभाराची प्रतिकात्मक होळी

पुणे-देशातील सर्वसामान्य नागरिक महागाई व बेरोजगारी या संकटांसोबत धीराने लढत आहेत.परंतु या सोबतच कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत,यासर्व परिस्थितीवर निषेध म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने होळी पेटवण्यात आली.
यावेळी होळीमध्ये वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर,राहुल सोलापूरकर,नराधम दत्ता गाडे यांच्या प्रतिमा होळीत दहन करण्यात केल्या.तसेच “कराडच्या बैलाला घो”, सोलापुरकरच्या बैलाला घो”,”कोरटकरच्या बैलाला घो” फाशी दया फाशी द्या दत्ता गाड़े ला फाशी द्या, असा शिमगा करण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत गैरकारभाराची मालिका महायुतीच्या सरकारमध्ये सुरू आहे.देशपातळीवर असलेली आर्थिक संकटे, महागाई बेरोजगारी तर राज्यभरात असलेले सुरू असलेली दडपशाही, गुंडशाही, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे वाचाळवीर या सगळ्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य माणूस आपल्या मेहनतीने कष्ट करून आपले जीवनमान जगत असताना त्याला सुरक्षा देण्याचे काम सुद्धा सरकार करू शकत नसेल तर हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. आज महिला सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. आपल्या पुण्यनगरीमध्ये स्वारगेट अत्याचार यासारखी दुर्दैवी घटना, बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या ,कोणीतरी एक नराधम हव्या त्या माणसाचा जीव देऊ शकेल इतकी ताकद निर्माण करू शकतो आणि या राज्याची व्यवस्था त्याला संरक्षण पुरवते. राज्याचे सामाजिक परिस्थिती व कायदा व सुव्यवस्था किती घासरली आहे याची ही ज्वलंत उदाहरणे आहेत. आपल्या महापुरुषांनी आपल्या बलिदानातून भूमीला स्वराज्य सन्मानाने स्वाभिमान मिळवून दिला, त्या महापुरुषांबद्दल अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या औलादी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या रूपाने आपल्या राज्यात आहेत,यांना देखील शासनाच्या व्यक्तीने स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते हे देखील चुकीचे आहे.
या पुण्यनगरीमध्ये वाहतूक व्यवस्था देखील अत्यंत ढासळली आहे. शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात जायला तासन् तास ट्राफिक मध्ये अडकावे लागते याचा थेट परिणाम या भागातील उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्यामध्ये होत आहे. हे चित्र देखील सामाजिक अस्थिरतेच्या दृष्टीने आपला प्रवास सुरू असल्याचे द्योतक आहे. अशा या सर्व परिस्थितीमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आजची ही प्रतिकात्मक होळी केली आहे. भविष्यात जर सरकारला वेळीच जाग आली नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची तयारी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही हा संघर्ष नक्की करू” असे देखील प्रशांत म्हणाले.
या प्रतीकात्मक होळी प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, दिपक कामठे,रोहन पायगुडे, पायल चव्हाण,रचना ससाणे,जयदीप देवकुळे, मधुकर भगत राजश्री पाटील यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

कृष्ण धवल काळातील गीतांना श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद

पिंपरी, पुणे- जागतिक महिला दिनानिमित्त हौशी गायकांचा कृष्ण धवल काळातील निवडक गीतांचा निःशुल्क कार्यक्रम विविध भारती म्युझिकल इव्हेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. निगडी, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे रविवारी (दि.९) सायंकाळी झालेल्या हिंदी, मराठी संगीत मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली.
यामध्ये विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शैलेश घावटे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, छाया अय्यर, सुचिता शेटे – शर्मा, डॉ. सायली अरुण सरमाने, अनिल जंगम, निलेश मोरे, विष्वांत काळोखे गायकांनी एकल आणि युगुलस्वरातील कृष्णधवल चित्रपटांतील गाणी सादर केली.
यामध्ये “दुनिया बनाने वाले,..” , “गोरे गोरे बाकी छोरे …” , “अफसाना लिख रही हुं…” , “बाबूजी धीरे चलना ..” , आयेगा आनेवाला आयेंगा ” , “यू तो हमने लाख हंसी देखे हैं ..” अशा एकल गीतांनी मैफलीत रंग भरले जात असतानाच अतिशय तन्मयतेने सादर केलेल्या “देखो मौसम क्या बहार हैं..” , “निंद ना मुझको आये..” , , “याद किया दिल ने कहा हो तुम ..” , “इतना ना मुझसे तू प्यार बढा …” अशा अवीट गोडीच्या युगुलगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले; तर “आजा सनम मधुर चांदणी मे हम…” या बहारदार गीताने बहार आणली. “आएगा आयेगां आनेवाला आयेंगा.” , “ओ रात के मुसाफिर…” , “हाल कैसा हैं जनाब का..” या गीतांनी मैफलीत रंगत आणली.
महिला दिनानिमित्त महिला गायिका आणि ॲड.स्मिता शेटे, डॉ. किशोर वराडे, छाया अय्यर यांचा सत्कार करण्यात आला. लकी ड्रॉ च्या पैठणीच्या मानकरी विमल बऱ्हाटे व शिल्पा कंकाळ, अर्चना भोंडवे, सुहासिनी शिंदे, स्मिता शेटे यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे, सनी शर्मा, अंकिता जंगम यांनी विशेष सहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन व सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण, आकाश गाजुल यांनी छायाचित्रण आणि अरुण सरमाने यांनी निवेदन केले.

महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी; सिंधी तरुणांनी सामाजिक भान जपत एएनपी केअर फाऊंडेशनला दिली रुग्णवाहिका भेट

पुणे: अजराक सुपरजायंट्सने एसएसडी फाल्कन्सचा ४ गडी राखून पराभव करत सहाव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा नरेंद्र लुंड सामनावीर ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर २४ दिवस ही स्पर्धा झाली. कसोटी क्रिकेटच्या धर्तीवर दोन डावांचा अंतिम सामना झाला. प्रत्येक डावात ९ षटके खेळण्यात आली.

नाणेफेक जिंकून एसएसडी फाल्कन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ९ षटकात ७ गडी गमावत ४० धावा केल्या. अजराक सुपरजायंट्सने पहिल्या डावात अवघ्या ५ धावांची आघाडी घेत ८ बाद ४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात एसएसडी फाल्कन्सने आक्रमक खेळ करत ५७ धावा उभारल्या. विजयासाठी ५३ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या सुपरजायंटचा सलामीवीर अष्टपैलू नरेंद्र लुंडने धडाकेबाज ३३ धावांची खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. राज गोविंदानीने दोन्ही डावांत २-२ बळी घेतले. ३३ धावांची खेळी आणि दोन्ही डावांत मिळून ४ बळी घेणाऱ्या नरेंद्र लुंड याला सामानावीराचा किताब मिळाला.

सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून गेल्या सहा वर्षांपासून ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे आयोजन केले जाते. यंदा लीगमधून उभारलेल्या निधीतून एएनपी केअर फाऊंडेशनला अँब्युलन्स देण्यात येणार असल्याचे संयोजक हितेश दादलानी व कन्वल खियानी यांनी सांगितले.

महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी

गंगा वॉरियर्सने सलग दुसऱ्या वर्षी सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकावले. गंगा वॉरियर्स आणि यमुना स्ट्रायकर्स यांच्यात अंतिम सामना रंगला. गंगा वॉरियर्सने कर्णधार शीतल आसवानी (१६ चेंडूत २६ धावा) व ममता (१७ चेंडूत २० धावा)  यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर निर्धारित ८ षटकांत ३ बाद ६० धावा केल्या. विजयासाठी ६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यमुना वॉरियर्सची सुरुवात अडखळत झाली.  शीतलने गोलदांजीतही कमाल करीत २ बळी घेतल्याने यमुना वॉरियर्सचा डाव ८ षटकांत अवघ्या ३५ धावांत संपुष्टात आला. शीतल आसवानीला सामनावीराचा किताब मिळाला. 

संक्षिप्त धावफलक : (पुरुष गट)

पहिला डाव 

एसएसडी फाल्कन्स: ९ षटकांत ७ बाद ४० (जतीन गोविंदानी १२, नरेंद्र लुंड ९-२) 

अजराक सुपरजायंट्स : ९ षटकांत ८ बाद ४५ (कुणाल सिरवानी २२, राज गोविंदानी २०-२)

दुसरा डाव

एसएसडी फाल्कन्स : ९ षटकांत ७ बाद ५७ (राहील दायलानी २८, रोहित मुलचंदानी १४, नरेंद्र लुंड ८-२, जतीन सेवानी १४-२, जय मायारमनी १४-२)

अजराक सुपरजायंट्स : ९ षटकांत ५ बाद ५३ (नरेंद्र लुंड ३३, राज गोविंदानी १०-२, जयेश मायारामानी १०-२)

निकाल: अजराक सुपरजायंट्स ४ विकेट्स राखून विजयी

संक्षिप्त धावफलक : (महिला गट)

गंगा वॉरियर्स – ८ षटकांत ३ बाद ६० (शीतल आसवानी २६, ममता २०) विजयी यमुना स्ट्राइकर्स : ८ षटकांत ६ बाद ३५ (स्वीटी ७, पर्ल ७, शीतल आसवानी ४-२)